लिहून मला काय मिळतं?

लिहून मला काय मिळतं?

खरं तर हा प्रश्न मला खुपजण विचारतात. विचारणारांचा हेतू अर्थातच चांगला असतो. लिखाणावर माझं चालतं कसं, असं त्यांना विचारयचं असतं, पण तसं थेट विचारणं मॅनर्समधे बसत नसल्याने मला ते असं आडून विचारतात, तुम्हाला लिहून काय मिळतं?

आपल्या देशात कुणीही काहीतरी खटपट करत असतो ते चार पैसे मिळावेत म्हणूनच. किंबहूना आपल्याकडे प्रत्येक क्रियेची सांगड पैशांशी घातली गेल्यामुळे, मी जेंव्हा लोकांना सांगतो की मी पूर्णवेळ लिखाण करतो, तेंव्हा मला हा प्रश्न हटकून विचारला जातो. अगदी स्पष्ट विचारलं नाही तरी त्यांच्या चेहेऱ्यावर तो प्रश्न उमटलेला मला स्पष्ट दिसतो. चूक विचारणारांची नसतेच, ते काळजीनेच विचारत असतात, कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाचं शब्दांची टांकसाळ चालवून भागणार नाही, हे त्यांना पक्क माहित असतं. जे सेलिब्रेटी लेखक आहेत त्यांची बात वेगळी असते आणि माझ्यासारख्यांची वेगळी असते, हे ते जाणून असतात. माझ्यासारख्या नवख्या माणसाला पैसे मिळतच नसतात, उलट पदरमोड करुन लिखाणासाठीची गुंतवणूक करावी लागते याची जाणीव त्यांना असते.

मी लिखाण करु लागलो ते केवळ अपघाताने. आता अनेकांना खोटं वाटेल, पण मला पूर्वीपासूनच लिहायचा भारी कंटाळा. वाचायचा मात्र तेवढाच टोकाचा नाद. चार वर्षांपूर्वीपर्यंत मी कधी लिहायला सुरुवात करेन असं मला स्वत:लाही वाटलं नव्हतं. चार वर्षांपूर्वी आयुष्याने अचानक यु टर्न घेतला आणि हिरवंगार सुंदर दृष्य संपून एकदम रखरखीत रेताड दृष्य सुरू व्हावं, तसं काहीतरी झालं. आयुष्य पार बदलून गेलं. ‘गाफील राहिलो मी, त्या नेमक्या क्षणाला..मागून वार केले,माझ्याच माणसांनी..’ ह्या सुरेश भटांच्या ओळी मी अक्षरक्ष: अनुभवल्या आहेत, अजुनही अनुभवतो आहे.

इथून पुढे मला भरपूर मोकळा वेळ मिळाला. या वेळाचं करायचं काय हा प्रश्न समोर उभा राहिला आणि तिथून पुढे हळुहळू त्या अपघाताच्या धक्यातून बाहेर पडण्यासाठी मी लिहायला सुरुवात केली. कोणत्याही बऱ्या-वाईट कलाकृतीच्या मुळाशी काहीतरी वेदना असते, असं म्हणतात. हे माझ्याबाबतीतही खरं ठरलं. मी अंतर्मुख झालो, तेंव्हा माझ्यातल्या स्वत:लाच मी भेटलो. वेदना माणसाला अंतर्मुख करते आणि ते अंतर्मुखपण अनावर झालं की कलाकृती जन्म घेते, मग ती कविता असो, चित्र असो, शिल्प असो की माझ्यासारख्याचं शब्दांचं लेखन असो. “हज़ार महफ़िलें हो, लाख मेले हों..जब तक खुद से ना मिलो, अकेले ही हों..!” ह्या ओळींतला शब्दन शब्द मला पटला. एकटेपणातून मी अंतर्मुख झालो. कालांतराने त्यातून मी कोण, त्याची ओळख हळुहळू माझी मला पटत गेली आणि मला शब्द सुचू लागले. लिहिताना शब्द मेंदूतून नव्हे, तर अंत:करणातून स्त्रवू लागले. असेच माझ्या अंत:करणापासून जन्मलेले शब्द सोशल मिडियाच्या माध्यमातून देशभरातल्या लोकांपर्यत पोहोचू लागलं. लोकांना आवडू लागलं.

मी लिहू शकतो, हे मला या संकटाने दाखवलं. हे माझ्यावर त्या संकटाने केलेले उपकारच आहेत, अन्यथा मला हे कधीच कळलं नसतं. माझं लेखन कदाचित कलाकृतीच्या सदरात बसणारं नसेलही, परंतू माझ्यासाठी मात्र ती एक अप्रतीम कलाकृतीच असते. कोणत्याही आईचं मुल कुतीही काळ-बेद्र असो, त्या आईला आपलं मुल जगातील सर्वात सुंदर मुलं वाटत असतं. नेमकी तिच भावना मला माझ्या लिखाणाबद्दल असते. मी लिहिलेलं मला आवडायला हवं, मग ते इतरांना आवडतंच आवडतं. मी इतरांना आवडावं म्हणून कधीच लिहिलं नाही. शब्दांमुळे माझ्या आयुष्यात पुढे अनेक माणसं आली. सामान्य माणसं तर आलीच, असामान्यही आली. माझी माणसांची समृद्धी वाढू लागली. पैशांनी नसलो तरी माणसांनी मी श्रीमंत झालो. ही माणसं मी चार वर्षांपूर्वीचं आयुष्य जगत राहिलो असतो, तर कदापीही मिळली नसती. नि:स्वार्थ प्रेम कसं करावं हे शब्दांच्या संबंधातून जोडल्या गेलेल्या संबंधांनी शिकवलं..

‘तुम्ही का लिहिता?’ या आपुलकीनं किंवा क्वचित प्रसंगी चेष्टेनं विचारलेल्या प्रश्नाचं ‘मला समाधान मिळतं’ हेच उत्तर आहे. मला लिहून मिळतं ते हेच. या समाधानाची किंमत, प्रत्येक गोष्ट पैशांच्या तुलनेत पाहाणारांना कळणार नाही. पैसे तर मलाही लागतात. पैशांचं काम पैसाच करतो. मी ही ते मिळवण्यासाठी संघर्ष करतो. पण तो संघर्ष करताना, मी पुन्हा आपोआप लेखन-वाचनाकडे ओढला जातो. शब्दांची टांकसाळ सुरू झाली. मला पैसे मिळतच नाहीत म्हटल्यावर मग केवळ पैशांनेच भागतील अशा गरजाच मी कमी करुन टाकल्या. गंम्मत म्हणजे उरलेल्या अत्यंत कमी गरजांतही मस्त जगता येतं, हे मला समजलं. लिखाणाला प्राधान्य देण्याचा हा एक सुरुवातीला लक्षात न आलेला आनुषंगीक फायदा. लिखाणातून मिळणारं समाधान एवढं आभाळभर असतं की, आपल्याकडे अन्य काही नाही ही भावनाच मनाच्या आसपास फिरकत नाही. एवढंच कशाला मला भवतालाचाही विसर पडतो. म्हणूनही मी लिहितो..!

गत वर्ष-दोन वर्षांत माझं लिहिलेलं काही राज्य-जिल्हा पातळीवरच्या दैनिकांत/साप्ताहिकांत नित्यनेमाने प्रसिद्ध होत असतं. ते वाचून कितीतरी माणसं माझ्या शब्दांवर प्रेम करु लागलीत. कित्येक जणांशी जिवाभावाचं मैत्र जुळलं. एखादा लेख प्रसिद्ध झाला, ती तो आवडल्याचे अनेक फोन येतात, लोक भरभरून बोलतात. आता असं म्हणता येणार नाही, की माझा प्रत्येक लेख अप्रतिमच असतो, परंतू मी लिहिलंय म्हणजे ते चांगलंच असणार, या भावनेनं लोकं तो लेख वाचतात आणि म्हणून ते लेखन कदाचित त्यांना आवडलेलं असतं. इतकं निखळ प्रेम मला मिळतं म्हणून मी लिहितो..

मी हे तुम्हाला का सांगतोय? तर, काल रात्री मला एका बाईंचा फोन आला. त्यांचं वय ७९. राहाणं पनवेलला. मला पूर्णपणे अपरिचित. माझा गणपतीवर लिहिलेला एक लेख वेंगुर्ल्याच्या ‘साप्ताहिक किरात’मधे प्रसिद्ध झाला होता. तो लेख कुठेतरी त्या आजींच्या वाचनात आला. त्यांना तो इतका आवडला की, त्यांनी तो अनेकदा वाचल्याचं त्यांनी मला सांगितलं. एवढंच नाही, तर गेले १० दिवस तो लेख प्रसिद्ध झालेला ‘किरात’चा अंक त्या सतत उशाशी घेऊन झोपताहेत आणि आठवण झाली की पुन्हा पुन्हा वाचतायत, असंही मला त्यांनी सांगितलं. त्यांचं लहानपण माझ्या त्या लेखामुळे गेले १० दिवस पुन्हा पुन्हा त्या जगतायत, असं त्या पुढे मला म्हणाल्या. माझ्याशी फोनवर बोलताना त्यांना भावना अनावर झाल्याचं त्यांच्या आवाजावरून मला समजत होतं. “पुता तुका माझो लय आशीर्वाद आसा, असोच लिवत ऱ्हव आनी लोकांका आनंद देत ऱ्हव. लय मोठो हो. माजो तुका माॅप आशीर्वाद आसा” हे वाक्या त्या १५ मिनिटांच्या आमच्या संवादात किमान तिन वेळा त्यांना उच्चारलं. माझे शब्द कुणाला इतका आनंद देत असतील याची मलाही कल्पना नव्हती. आजीबाईंचं ते बोलणं ऐकून माझाही आवाज कातर झाला होता. मलाही भरून आलं होतं. ‘आजी तुका कदीतरी भेटूक येतय’ असं म्हणून मी फोन ठेवला. आजींच आडनांव झगडे, पुरवाश्रमीच्या वेंगुर्लेकर.

माझे लिखाण वाचणाऱ्या अशा अनेकजणांचे फोन मला अधुमधून येत असतात. ती सर्वच माणसं प्रत्यक्षात कधी भेटलेली नसतात, मपण माझ्या सोबत शब्दांच्या बंधांनी नकळत जोडली गेलेली असतात. माझं वाचून कुणाला लहानपणीचे सोनेरी दिवस आठवतात, तर कुणाला, ‘आपणही लिहायला हवं’, असं तीव्रतेनं वाटतं. कुणाच्या डोळ्यात अश्रू आलेलं असतात, तर कुणाच्या गालावर हसू उनटतं. मला फोन करणारे आपल्या भावना निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करतात. मग माझं मन एका विलक्षण समाधानाने भरून आलं होतं.

पैशांने पोट भरतं. पण अशा अनुभवांनी मन भरतं. समृद्ध होतं. आपण कुणाला काही तरी आपल्याही नकळत काही तरी देतोय ही भावना पैसा नाही देऊ शकत. त्यासाठी लागतं निर्व्याज्य प्रेम. कदाचित, कदाचित, कदाचित त्यासाठीही मी लिहित असावा..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

salunkesnitin@gmail.com

देवही ‘भावा’चाच भुकेला..

देवही ‘भावा’चाच भुकेला..

काल मुंबईतल्या एका प्रसिद्ध गणपती मंडळाच्या बाजुला एका कामानिमित्त गेलो होतो. तिकडच्या कार्यकर्त्यांपैकी बहुतेक सर्वच ओळखीचे असल्याने, तिकडे कधीही गेलो की कुणी न कुणी ओळखीचं भेटतंच. असाच एक मित्र कम कार्यकर्ता रस्त्यातच भेटला.

म्हणाला, “भाडं मारायचंय का?”.

माझ्या चेहेऱ्यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह उगवलं. ते पाहून पुन्हा म्हणाला, “म्हंजे दर्शन करायचंय का महाराजांचं?”.

ओळखीच्यांना शाॅर्टकटने राजाचं दर्शन घडवण्याच्या क्रियेला इथे ‘भाडं मारणं’ असा शब्दप्रयोग आहे हे समजलं. मौजही वाटली. अर्थात हे भाडं पैशांत घेतलं जात नाही तर ‘काॅलर टाईट’ करण्याच्या स्वरुपात घेतलं हे ही आवर्जून सांगायला हवं. ही त्यांची मानसिक गरज आहे कारण गणपतीचे दहा दिवस ते इकडचे खरे ‘राजे’असतात, उरलेले ३५५ दिवस त्यांना घरचंही फारसं कुणी विचारत नसावं..! हे दहा दिवस जगण्यासाठी हे कार्यकर्ते वर्षाचे उरलेले ३५५ दिवस जगत असतात.

मी म्हणालो,”नाही रे. मी सहजच आलोय. आता भेटलाच आहेस तर चहा घेऊ.”

“बरं..पण इथे येऊन दर्शन घेतलं नाही तर वाईट दिसेल” तो काहीश्या नाराजीने म्हणाला. मी म्हटलं, “कुणाला वाईट दिसेल? मला तर काहीच विशेष वाटत नाही. गणपतीला तर सामान्य माणसाला दर्शन न दिल्याचं वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही. उलट जे सामान्य अगोदरच बारा-पंधरा तास लायनीत ताटकळत उभे आहेत, ते तर लायनीतला एक माणूस कमी होतोय म्हणून दुवाच देतील ”

“मला वाईट वाटेल” तो म्हणाला.

आमचा स्वभाव दुसऱ्याचं मन दुखवण्याचा नसल्याने, आम्ही नको असलेल्या अनेक गोष्टी नाहक गळ्यात अडकवून घेतो. दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही, मग आपल्या मनाचे तुकडे झाले तरी चालतील, ही शिकवण असल्यामुळे त्याने पाजलेल्या ‘चा’ला जागून म्हटलं, “चल जाऊ, पण चटकन बाहेर पडता आलं पाहिजे असं काहीतरी कर”.

असं म्हटल्यावर त्याला चा चढल्यासारखा उत्साह आला आणि मला घेऊन तो त्या गल्ल्या गल्ल्यांच्या खुष्कीच्या मार्गाने निघाला. त्या प्रचंड गर्दीतून त्याच्या मागे जाताना माझी भंबेरी उडत होती. अनेक बाया-बापडे त्या परिसराच्या राजाच्या दर्शनासाठी कुणाकुणाची काकुळतीला येऊन विनंती करत होते. ह्यात बायांचं प्रमाण अंमळ जास्तच होतं. त्यातल्या बऱ्याचश्या बाया सोबत नकावड्या पोरांना घेऊन होत्या. लेकराला राजाच्या पायावर घालायचंय म्हणून घुटमळत होत्या. पोर मोठं होऊन शहाणं व्हावं असं या नव आयांना का वाटत नव्हतं कुणास ठाऊक. आता मी मागेही फिरू शकत नव्हतो. इथं एकवेळ आत शिरणं सोपं, परंतू परत फिरणं अत्यंत अवघड. देवाचा मार्ग असाच असतो की काय हे समजत नाही. चक्रव्युहात शिरलेल्या अभिमन्यूची जी काही अवस्था झाली असेल, तिच अवस्था त्या चिंचोळ्या गल्ल्यांच्या गुंत्यात शिरलेल्या माझी झाली होती.

एकदाचे आम्ही अगदी राजाच्या महालापाशी पोचलो. “हा बघा समोर राजा” मित्र म्हणाला. समोर पाहातोय तो वर भव्य सोनेरी मुगुट व खाली लायनिने सर्वांचे निरनिराळ्या आकाराचे पार्श्वभाग. मला हे दृष्य कळायला थोडा अवधी लागला. देवाच्या दरबारात असाही मेंदूचा आणि मनाचा संबंध काही काळ तुटतोच. दोन-चार सेकंदात पुन्हा माझा मेंदू आणि मनाचं कनेक्शन पूर्ववत झालं आणि लक्षात आलं, की राजाच्या दर्शनाला आलेल्या काही व्हिव्हिआयपी लोक व त्यांचं कुटुंब स्टेजवर राजाकडे त्यांचं मुख आणि आम जन्तेकडे पार्श्वभाग करुन राजाला मनोभावे पाहात होते. राजाच्या मुखदर्शनासाठी खाली उभी असलेली ‘मॅंगो जन्ता’ त्यांचे पार्श्वभाग पाहात मनोभावे हात जोडीत होती.

व्हिव्हिआयपी खासदार साहेब असल्याने, त्यांच्या सारखे लोकप्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबियांचा पार्श्वभाग हाच देव, असं समजण्याची आपल्या जनशाहीतल्या जन्तेला सवय असल्यानं, त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. ‘जन्त(ा)’ आणि पार्शवभाग याचा असाही संबंध असतोच, याचा पुन्हा एकदा नव्याने साक्षात्कार मला तिकडे झाला आणि मी ही समोरच्या त्या दृष्याला मनोभावे नमस्कार करता झालो.

मी ही ते दृष्य पाहात उभा होतो. खासदार साहेब आणि त्यांचं व्हिव्हिआयपी कुटुंबिय स्टेनगनच्या पाजळत्या पाहाऱ्यात परत जायला निघाले आणि एकदम आकाश मोकळं व्हावं तसं राजाचं विराट आणि प्रसन्न दर्शन झालं. आता दोन मिन्टांत स्टेजवर जाऊन राजाच्या पगे लागणं होणार म्हणून सर्वांनी बाप्पाचा एकदम जयजयकार केला.

एवढ्यात बाप्पाचा २० बाय २० बाय २० फुटाचा दरबार एकदम मोकळा करण्यात आला. कोणीतरी आणखी एखादा व्हिआयपी येण्याची चाहूल लागली आणि इथे खाली उभ्या असलेल्या आम जनतेचा जीव परत टांगणीला लागला. अर्थात तेवढंच. नेहमीच्या जिवनातही पदोपदी जीव टांगणीला लागण्याची सवय असल्याने आणि ‘सबुरी’ महत्वाची असं सांगितलेल्या एका प्रसिद्ध सिद्ध पुरुषाच्या वचनावर ‘श्रद्धा’ असल्याने, त्याचं कुणाला काही वाटलं नाही. असंही मध्यमवर्ग ‘टांगलेला’च असतो. सवय असतेच आम्हाला शिखंडीपणाची. असो. दरबारातील (पक्षी:स्टेजवरील) सर्व मानकऱ्यांनी एकदम खडी ताज़ीम दिली. ललकाऱ्या घुमल्या आणि भारताच्या मुंबई विभागाचे आयकर आयुक्त व त्यांचं देखणं कुटूंब राजाच्या दरबारात लीनपणे दाखल झाले. आयुक्त राजासमोर, मंडळाचे पदाधिकारी त्यांच्यासमोर आणि खालचे आम्ही सारे त्या सर्वांच्या पार्श्वभागासमोर मनोभावे हात जोडून उभे राहिलो. आम्हाला ही सवय होतीच, आहेच..! मनात विचार आला, की हा माणूस देवाकडे काय मागत असेल किंवा काय भावनेनं तो राजाच्या दरबारात आला असेल म्हणून, की बाबा भरपूर दिलंस. वरनं दिलंस तसं त्याहीपेक्षा कितीतरी पटीने भरपूर खालनं दिलंस, त्याचे आभार मानत असेल..! मला उत्तर सापडेना.

नोटबदलीचे किंवा कोणत्याही सरकारी योजनेचे फायदे तोटे हा आम्ही खाली त्या आयुक्त-कार्यकर्त्यांचे सुबक पार्श्वभाग पाहात उभे असलेल्या जन्तेच्या निष्फळ फेसबुकी चर्चेचा विषय. सरकारशी समरस झालेल्यांना त्याचे फायदे दिसतात आणि सरकारच्या विरोधकांना तोटे..! वरती उभे असलेल्या त्या कार्यकर्त्या-आयुक्तांना सरकारने काही केलं तरी फायदाच. परवाच एक ओळखीचे सीए आनंदाने उचंबळून सांगत सांगत होते की, हे सरकार भारीच काम करतंय. ह्या सरकारने कायदे एवढे कडक केलेत, की पूर्वी जे काम पन्नास हजारात व्हायचं, तिकडे हल्ली पांच लाख द्यावे लागतात म्हणून. मलाही कडक नियमांचा अभिमान वाटला. राजाच्या दरबारात उभे असलेल्या त्या सर्व व्हिव्हीआयपींचे विविध आकारांचे रंगीत पार्श्वभाग पाहाताना मला सीएंसोबतचा तो संवाद आठवून भरून आलं होतं. देवांचं आणि व्हिव्हिआयपींचं मेतकूट पाहून बरं वाटलं. देवही ‘भावा’चा भुकेला असतो, हे कुठल्यातरी जुन्या ग्रंथात वाचलेलं जुनाट वचन आठवलं;भाव या शब्दाचा आताच्या काळातला संदर्भही स्टेजवरचं दृष्य पाहून उगाचंच आठवल, पण तो क्षणात झटकून टाकून भान हरपून टाकून पुन्हा नतमस्तक झालो.

पुढे बऱ्याच दिव्य व्हिआयपींचे भव्य पार्श्वभाग आणि राजाच्या मुकुटाचं दर्शन खालून झाल्यावर एकदाचं राजाच्या स्टेजवर पोचलो. राजाच्या पायावर आपोआप डोकं धाडकन आपटलं गेलं आणि मी आपोआप बाहेरही फेकला गेलो. तासंतास व्हिआयपींचे पार्श्वभाग पाहात ताटकळल्यानंतर क्षणात देवाचं दर्शन घडून मी तेवढ्यात बाहेरही आलो हा चमत्कार कसा घडला हेच कळेना. मी त्या देवासमोर नतमस्त झालो. कपाळावर कुंकवाचा मळवट भरून धन्य होऊन घरी आलो. टिव्हीवर बातमी होती की कुठल्यातरी उच्च अधिकाऱ्याला गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली म्हणूनची. वास्तवीक देवाच्या दरबारात झालेली मारझोड हा प्रसाद असतो हे लहानपणापासून ऐकलेलं. आम जनता तावातावाने इंटरव्ह्यू देत होती की माजोरड्या मंडळावर कारवाई केलीच पाहिजे म्हणून. मला मात्र राजाच्या दरबारात त्याच्या चरणी ‘भाव’पूर्णतेने लीन झालेले, मी मगाशी पाहिलेले ते व्हिआयपी पार्श्वभाग पुन्हा पुन्हा आठवून, आता त्या अधिकाऱ्याला बदलीचा प्रसाद नक्कीच मिळणार याचा खात्री वाटू लागली.

अरे हो. एक सांगायचंच राहिलं. बाहेर आलो आणि आणखी एक ओळखीचा भेटला. बेवडा, फाटका हे गुण आणि कमालीचा प्रामाणिक हा दुर्गूण अंगात असलेला मॅंगो माणूस. टोप्या विकत होतां. १० रुपयाला एक टोपी.

मी त्याला विचारलं, “किती कमवतोस?”

तो म्हणाला, “साहेब शंभरेक मिळतात चार-पाच तास मेहेनत केल्यावर”.

मी म्हटलं “अरे तू नोकरी करतोस ना?”

“हो”, तो म्हणाला “पन वर्षभर पगार मिळालेला नाय” दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारा तो फाटका माणूस पुढे आनंदाने म्हणाला, “साहेब, पन आमच्या साहेबाने हल्लीच पन्नास लाखांची नवी कोरी फारचुनर गाडी घेतलीय. मीच पुसतो ती”. साहेबीने घतलेल्या पन्नास लाखांच्या गाडीसमोर त्याच्या वर्षभराच्या लाखभर रुपयांच्या पगाराची पत्रास ती काय, हे सत्य त्याला दरबाराच्या परिसरात उमगलं होतं.

अनेकांच्या मेहेनतीच्या पैशावर हात मारत मोठा होऊ पाहाणाऱ्या त्याच्या साहेबाला मी ही (चांगलाच)ओळखतो म्हणून त्याने मला गाडीची माहिती सांगितली. काही वेळापूर्वी हाच त्याचा साहेब आपली शेलाटी बायको आणि तगड्या मुलासोबत राजाच्या दरबारात व्हिआयपी म्हणून आम्हाला त्याच्या व फॅमिलीच्या दिव्य पार्श्वभागाचं भव्य दर्शन धडवून गेल्याचं मी पाहिलं होतं. तो लीन झालेला आणि राजालाही त्याला कुरवाळताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता.

वाचलं होतं आणि म्हणून वाटलंही होतं की देवाच्या दरबारात राव रंक सर्व सारखे म्हणून. पण नाही, हल्लीचे देवही प्रदुषित झालेत. इथे जेवढा लुटारू राव मोठा, तेवढा देवाच्या थेट मांडीवर. बाकीच्यांनी मात्र त्यांच्या xxवर समाधान मानायचं. आम जन्ता त्याच लायकीची. हल्लीचा देवही ‘भावा’चाच भुकेला असतो..।

©️नितीन साळुंखे

9321811091

हिंन्दू संस्कृतीतील देवाचा उगम आणि शंकर-पार्वती आणि गणपती; मला भावलेला एक अर्थ-..

हिंन्दू संस्कृतीतील देवाचा उगम आणि शंकर-पार्वती आणि गणपती; मला भावलेला एक अर्थ-

-नितीन साळुंखे

विश्वातील सर्वात प्राचिन अश्या आपल्या हिंदू धर्मात ईश्वर एकच असला तरी त्याची अनेक रुपं मान्य केली आहेत. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे मान्य करतानाच हिन्दू धर्माने, ईश्वराला सगुण साकार बनवूनही पुजलं आहे. आपला ईश्वर आपण जसा मुर्ती रुपात साकारतो, श्रद्धेने पुजतो, त्याच आणि तेवढ्याच श्रद्धेने आपण निसर्गातही देव शोधतो. ईश्वर सर्वव्यापी असून अवघे चराचर व्यापून वर दशांगुळे उरतो असं मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी, निसर्गातल्या विविध चल-अचल रूपातला ईश्वर स्विकारला त्यात नवल ते काय..! आपला ईश्वर एखाद्या सर्पाच्या रुपात असतो, एखाद्या प्राण्याच्या रुपात असतो किंवा मग अगदी एखादा रस्त्याच्या कडेला पडलेला धोंडाही असू शकतो. आपल्या धर्माने विश्वातल्या सर्व गोष्टी ईश्वराने निर्माण केलेल्या असून, त्या गोष्टीत ईश्वराचा अंश असतो असं आपण मानतो. या सर्व गोष्टीत ईश्वर शोधण्याची शिकवण आपल्या, विश्वातील सर्वात प्राचिन असलेल्या हिन्दू धर्माने दिली आहे. खरं तर ‘धर्माने शिकवण दिली आहे’ असं म्हणणं चुकीचं आहे, कारण ‘हिंदू’ हा धर्म नसून जीवन पद्धती आहे, संस्कृती आहे.. तिला ‘धर्म’ ही प्राप्त झालेली संज्ञा खुप अलीकडची आणि ती ही राजकीय गरज म्हणूण जन्माला घालण्यात आलेली आहे. या लेखात मी हिंदू संस्कृती हाच शब्द सर्वत्र वापरणार आहे.

मानवी बुद्धीच्या, आकलनाच्या पलीकडचं, ते देवाचं अशा तर्कशात्रातून आपल्या प्राचीन संस्कृतीतील देव/देवतांचा जन्म झाला आहे. धर्म ही संकल्पना अस्तित्वात येण्यापूर्वी हिन्दू संस्कृतीनंतर विविध प्रदेशात जन्म पावलेल्या इतर संस्कृतीतही, याच विचाराने त्याच्या विविध देवतांचा जन्म झाला. जगातील इतर प्राचिन संस्कृतीतील देवाच्या संकल्पनेत आणि आपल्या संस्कृतीतील देवाच्या संकल्पनेत एक साम्य म्हणजे, या सर्वांनीच निसर्गात देव पाहिला. जगातील इतर प्राचिन संस्कृती काळाच्या ओघात जन्म पावलेल्या इतर धर्मांच्या प्रभावाखाली लुप्त झाल्या, तरी हिन्दू संस्कृती मात्र आजपर्यंत टिकून राहीली. हिंदू संस्कृतीतील देवांची प्राचिन रुपं आजही कायम राहीली. आपण अवघ्या निसर्गात देव पहिला. आपण उगवत्या सूर्यात देव पाहिला, कलेकलेने लहान आणि मोठ्या होत जाणाऱ्या चंद्रात देव पाहिला. कडाडणाऱ्या विजेत देव पाहिला आणि वादळी वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पाण्यातही देव पाहिला. आकाशाला स्पर्शायला निघालेल्या उत्तुंग डोंगरालाही आपण देव मानलं आणि त्याच डोंगराचं उदर पोखरून त्यात वास करणाऱ्या सर्पालाही आपल्या संस्कृतीने देवस्वरूप मानलं. आकाशात रात्री चमकणारे तारे आपल्याला देवस्वरूप भासले, तर त्यांना झाकोळणाऱ्या मेघाला आणि सूर्य-चंद्रांना ग्रासणाऱ्या ग्राहणांनाही आपण आपल्या मनाच्या कोपऱ्यात उग्ररुपातील देवांची जागा दिली. प्रचंड मोठा हत्ती आणि हिंस्त्र वाघ- सिंहानाही देवत्व मिळालं. या सर्वांना देवत्व देण्याचं एकमेंव कारण म्हणजे त्या काळातील आपल्या पुर्वजांना त्यांच्या बद्दल वाचणारं आश्चर्य किंवा भिती. निसर्गातील सर्वच गोष्टी त्यांना अचंबित करणाऱ्या आणि त्यांच्या त्यावेळच्या बुद्धीला आकलन न होणाऱ्या असल्याने, त्या काळच्या आपल्या पुर्वजांनी त्यांना देव मानलं असावं यात नवल नाही. आजही जेंव्हा एखाद्या गोष्टीचं आकलन किंवा एखादी गोष्ट घडण्यामागचा कार्यकारण भाव कळला नाही, की आपण ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ किंवा ‘ईश्वराची लीला’ असं म्हणतोच ना? मग हज्जारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांची काय परिस्थिती असेल, याचा अंदाज आपण सहज बांधू शकतो.

आदिम काळातल्या मानवी शक्तीच्या आणि आकलनाच्या पलीकडे असणाऱ्या या निसर्गाच्या या घटकांना आणि शक्तींना आपल्या पूर्वजांनी पुढे कधीतरी त्यांना भावलेल्या/सुचलेल्या आकारात साकारून त्यांचे पूजन करण्याची सुरुवात केली, ती त्या अनाकलनीय शक्ती आपल्यावर नेहेमी प्रसन्न असाव्यात या भावनेतून. माणूस हा निरिक्षण करणारा आणि त्यातून अर्थ काढणारा प्राणी आहे आणि निसर्गात घडणाऱ्या घटनांची प्रथम भिती आणि नंतर त्यातून त्याचं जागं झालेलं कुतूहल आणि पुढं त्या कुतूहलापोटी केलेल्या निरीक्षणातून त्यांना निसर्गाची काही उलगडलेली आणि काही न उलगडलेली कोडी यांचा सुंदर मिलाफ आपल्या दैवातांमध्ये झालेला दिसेल.

असंच त्यांचं एक वर्षानुवर्षांचं निरिक्षण होतं. झाडाला कळ्या येतात, त्यांची फुलं होतात, फुलांतून फळं धरतात, फळं पिकून फुटतात आणि त्याच फळांच्या बिया जमिनीत रुजून पुन्हा त्याच जातीच्या नवीन झाडाचा कोंब जमिनीतून उगवतो आणि पुन्हा हे चक्र सुरु होतं. आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्षे केलेल्या झाडांच्या या तल्लख निरीक्षणातून शेतीचा शोध लागला आणि आपल्या संस्कृतीने उत्क्रांतीची एक मोठी झेप घेतली. एका जातीच्या बिया दुसऱ्या ठिकाणी टाकल्या, तरी त्या ठिकाणी तशीच फळं देणारं झाड उगवतं, या प्रयोगातून शेती जन्माला आली, तरी असं का होतं, याचं आकलन त्या काळच्या आपल्या पूर्वजांना न झाल्याने, आधीच अनेक आश्चर्यांने देवस्वरुप मिळालेल्या निसर्गाच्या अनेक घटकांत, आता मातीचीही भर पडली आणि ती ‘भूमाता’ झाली. अपत्य जन्माच्या वेळीही अशीच काहीशी क्रिया घडते हे निरीक्षणातून आपल्या पूर्वजांच्या लक्षात आलं आणि म्हणून ‘भूमाते’ प्रमाणे स्त्रीमधेही काहीतरी अचाट शक्ती असली पाहिजे, या श्रद्धेनं आपल्या पूर्वजांनी स्त्रीलाही ‘देव’ स्वरूप मानलं. माती, मादी आणि माता या शब्दांतलं साम्य हेच तर सांगत असावं असं मला वाटतं. शेतीचा शोध लागला आणि आपले भटके पूर्वज स्थिर झाले आणि स्थिर झाल्यानं, त्यांना निरिक्षण करायलाही भरपूर वेळ मिळू लागला.

शेतीमुळे स्थिर झाल्यामुळे आता पोट भरण्यासाठी आपल्या पूर्वजांना शिकारीच्यामागे धावण्याची गरज उरली नाही आणि त्याचा उपयोग त्यांनी शेतीविषयक विचार करण्यात घालवला असावा. नांगरणी केल्याने पिक चांगलं येतं हे ही त्यांच्या लक्षात आलं. त्यासाठी ताकदवान बैलाचा उपयोग होऊ शकतो हे ही कालांतराने लक्षात आलं आणि बैलांची उपज करणारी गाय, ‘गोमाता’ म्हणून आपल्या अत्यंत महत्वाच्या देवतांच्या यादीत जाऊन बसली, ती आजतागायत. शेतीपूर्व काळात जंगलात लागणाऱ्या प्रचंड वणव्यांमध्ये मृत पावलेल्या प्राण्यांचं मांस रुचकर लागतं, हे आपल्या पूर्वजांच्या त्यावेळीच ध्यानात आलं होतं. ‘अग्नी’चा तेंव्हाच देव झाला होता. वणव्यात जळून गेलेल्या झाडांच्या जागी नविन झाडं जोमाने वाढतात हे लक्षात आलेल्या आपल्या पूर्वजांनी तोच प्रयोग शेतीतही केला, तो यशस्वी झाला. आजही आपण शेतजमिनीत भाजावळ करतो ते असंच आपल्या पूर्वजांच्या निरिक्षणातून विकसीत झालेलं शास्त्र आहे. बी रुजून येण्यासाठी पाण्याचीही आवश्यकता असल्याने ‘वरूणा’लाही देवत्व मिळालं. आजही आपली शेती बहुतांशी पावसावरच अवलंबून आहे आणि त्या पाऊस देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आजच्या आधुनिक युगात आपल्या देशात आजही यज्ञयाग होत असतात, याची बिजं अशी आपल्या प्राचिन पूर्वजांत सापडतात.

ज्यांना देव मानलं, त्यांची पुजा करण हे ओघानच आलं. मग माती, पाऊस, अग्नी, गाय यांची पुजा करणं सुरु झालं यात देवाने आपल्यावर नेहेमी प्रसन्न असावं ही भावना तर होतीच, त्याच बरोबर महाप्रलय येऊन आपलं नुकसान होऊ नये ही भावनाही असावी. आता शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचं एकत्रित दर्शन होणं आपल्या पूर्वजांना आवश्यक वाटलं असावं. त्यासाठी एखाद्या प्रतिकाचं नेहेमी समोर असणं गरजेचं वाटू लागलं असावं आणि आपल्या पूर्वजांच्या कल्पनाशक्तीने, शेतीलाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा मिलाफ केला, मिश्रण केलं आणि आपल्या देशाच्या आराध्य दैवताचा, ‘भगवान शंकरा’चा जन्म झाला. त्याची पुजा करणं सुरु केलं. आपला भारत देश आज कितीही आधुनिक झाला असला तरी आजही तो कृषीप्रधान देश म्हणूनच ओळखला जातो आणि या देशाचं आराध्य दैवत महादेव हेच आहे. पृथ्वी, अग्नी, पाणी, वारा आणि आकाश(उजेड) ह्या शेतीसाठी अत्यावश्यक घटकांना पुढे आपल्या धर्मशास्त्रांत ‘पंच महाभुतां’चं स्थान मिळालं, त्याची बिजं अशी आपल्या पूर्वजांनी लावलेल्या शेतीच्या शोधात आहेत असं मला वाटतं..

देशाच्या अष्टदिशांतील कोणत्याही गांवात गेल्यास, तिथं शंकराचं मंदीर नाही असं होत नाही. महादेवाची पुजा म्हणजे शेतीची पुजा हा त्याचा साधा अर्थ. भगवान शंकराचं अवघं स्वरुपच शेतीचं आहे. त्याचा वास हिमालय पर्वतात असतो. पर्वत हे मातीचं प्रतिक. शंकराने जटांमध्ये गंगा धारण केलीय. पर्वतातून नद्या उगम पावतात. याचा अर्थ शेती फुलवणाऱ्या त्या नद्यांचं, पाण्याचं प्रतिक. अंगाला फास लेलं भस्म आपण शेतीत करत असलेल्या भाजावळीतून निर्माण झालेल्या राखेचं प्रतिक. शंकराचं वाहन नंदी म्हणजे शेतीसाठी आवश्यक गोवंशाचं-बैलाचं प्रतिक. भगवान शंकराने समुद्रमंथनातून निघालेलं विष प्राशन केलं अशी पौराणिक कथा आहे. हे विष प्राशन करताना, त्यातील काही थेंब पृथ्वीवर पडले आणि ते साप-विंचूदी प्राण्यांनी प्राशन केले आणि ते विषारी झाले असंही ती कथा सांगते. शेतीसाठी साप हा उपकारक आहे आणि म्हणून त्याचं विष सहन करूनही शंकराने त्यांना आपल्या कांठावर गुंडाळून ठेवलाय. साप हा शेतीसाठी उपकारक असतो हे आपल्याला माहित आहे चंद्रप्रकाश वनस्पतीवाढीसाठी आवश्यक असतो असं आधुनिक विज्ञान सांगतं, तेच तर शंकराच्या जटांतील चंद्रकोर सुचवते. सर्वात महत्वाचं म्हणजे माती, पाणी, गो, सर्प, चंद्र या सर्व शेतीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा ‘संकर’, हाच ‘शंकर’ म्हणून मनुष्य रुपात आपण साकारला आणि त्याची पुजा करायला सुरुवात केली. महादेवाचं ‘शंकर’ हे नांव ‘संकर, म्हणजे मिश्रण यावरून आलं सावं, हे या दोन शब्दातलं सख्खेपण मला सुचवतंय. शंकराची पुजा म्हणजे शेतीची पुजा, शेतकर्माची पुजा, शेतकऱ्याची पुजा, दुसरं अन्य काही नसावं असं मला वाटतं. भगवान शंकर हे आपल्या प्राचिन कृषी संस्कृतीचं प्रतिक आहे. प्राचिन काळी जे आपल्या पूर्वजांनी केलं, ते आपणही अद्याप चालू ठेवलंय फक्त त्यातील अर्थ मात्र आपण विसरलोय..!

माणसानंच देवाला जन्म दिला असल्याने, देव हे माणसाचं अपत्य झालं आणि मग जे जे आपल्या जीवनात घडतं किंवा घडू शकेल, ते ते त्या देवाच्या जीवनातही घडू लागलं किंवा घडलेलं पाहाणं मनुष्याला आवडू लागलं असावं. त्यावर मग कथा रचल्या जाऊ लागल्या. शंकरही याला अपवाद कसा ठरेल? मग शंकराला पार्वती बायको म्हणून मिळाली. शंकर-पार्वतीचं प्रेम, रुसवे-फुगवे, शंकराने रागाने निघून जाणं, मग पार्वतीनं तो करणं, मनधरणी करणं, त्यावर मग शंकराने प्रसन्न होऊन वर देणं, दोघांचं फिरायला निघणं, द्युत खेळणं आदी मनुष्याच्या जीवनांत घडणाऱ्या गोष्टी, शंकराच्या जीवनातही घडू लागल्या. मनुष्य रुपात साकारलेल्या शंकराच्या जीवनात त्या काळच्या मनुष्य जीवनाचे प्रतिबिंब पडणं अगदी स्वाभाविक होतं.

शेतीरुपी महादेवाचं लग्न करायची वेळ आली आणि त्यासाठी माणसाने बायको मुक्रर केली, ती पार्वती. पार्वती ही हिमालयाची कन्या. हिमालय हा पर्वत आणि पर्वताची मुलगी ती पार्वती. पार्वतीचा मुलगा तो गणपती. गणपती हा फक्त पार्वतीचा मुलगा होता, शंकर-पार्वतीचा नव्हे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. शंकर-पार्वतीचा मुलगा कार्तिकेय(याच फक्त इथे उल्लेख केलेला आहे कारण आपल्या लेखाचा तो विषय नाहीय), गणपती नव्हे. गणपती जन्माची कथा सर्वांनाच माहित आहे. पार्वती आंघोळीला बसली असता, कुणी येऊ नये म्हणून पार्वतीने आपल्या अंगावरील मळापासून एक मुलगा बनवून पाहाऱ्यावर ठेवला. पुढे शंकर तिथे येतो, त्याला तो मुलगा रोखतो, शंकर रागाने त्याची मान उडवतो आणि मग पार्वतीच्या हट्टाने त्या मुलाला हत्तीचं डोकं लावतो आणि गणपती जन्मतो अशी काहीशी ती कथा.

आई आंघोळ करत असता तिथे प्रत्यक्ष तिच्या पतीला, म्हणजे शंकरालाही प्रवेश न देणारा पार्वती ’माते’चा पुत्र म्हणून गणपतीची आपल्याला पहिल्यांदा ओळख होते. पार्वतीने स्नानास बसण्यापूर्वी तीच्या अंगावरील मळापासून श्रीगणेशाची बालमूर्ती घडवली हा या कथेचा सुरुवातीचा भाग. लहानपणी आश्चर्याची वाटणारी ही गणेश जन्माची कहाणी पुढे मोठेपणी प्रश्न म्हणून समोर उभी राहिली आणि पहिला प्रश्न पडला तो असा, की एखाद्या लहान बाळाइतकी मुर्ती घडवायची झाल्यास पार्वतीच्या अंगावरील किती मळ लागला असेल आणि त्यासाठी पार्वती किती वर्ष आंघोळीवाचून राहिली असेल हा..! पुढे कुठेतरी वाचनात आलं, की ही कथाही शेतीचं माहात्म्य सांगणारी आहे. शंकर जसा शेतीचं प्रतिक आहे, तशीच ही कथा शेतीला आवश्यक त्या सर्व घटकांचं प्रतिनिधीत्व करणारी आहे. ‘पार्वती’ ही हिमालयाची म्हणजे ‘पर्वता’ची कन्या आणि अर्थातच पर्वत कन्येच्या अंगावरील मळ म्हणजे ‘माती’ हे थोडासा विचार केला तरी आपल्या लक्षात येईल. पार्वती स्नानाला बसलीय याचा अर्थ पावसाळा सुरु झालाय आणि पावसामुळे मऊ झालेल्या मातीपासूनच मूर्ती/प्रतिमा तयार करता येते. तेच तर तिने केलं आणि श्री गणेशाचं पूर्व स्वरुप तयार झालं. पावसामुळे चिखल झालेल्या मातीला ‘गारा’ असाही एक शब्द आहे. माती आणि पाणी एकत्र करून जो मऊशार चिखल कुंभार बनवतात, त्याला ‘गारा’ असं म्हणतात हे संत गोरा कुंभारांच्या कथेत वाचलेलं मला आठवतं. पावसामुळे तयार झालेल्या मऊशार ‘गारा’पासून पार्वतीने ज्या बालप्रतिमेला जन्म दिला म्हणून ‘गारा’ शब्दापासून पार्वती ‘गौरी’ झाली असणं शक्य आहे. गणेशोत्सवात म्हणून तर गौरीचं महत्व..! गौरी म्हणजे माती, पावसामुळे चिखल झालेली आणि पेरणीस योग्य अशी शेतजमीन. तीच गौरी, तिच पार्वती..! गणपतीत गौरीपुजनाला सारखंच महत्व का दिलेलं आहे, हे यावरून लक्षात येईल आणि गणपती मातीचा का असावा हे ही कळेल.

आता गणपतीच्या स्वरूपाकडे बघू. गणपतीचं मुख ‘हत्ती’चं आहे आणि ‘हत्ती’ हे आपल्या संस्कृतीत पुर्वापार काळापासून समृद्धीचं प्रतिकं मानलं गेलं आहे. ही समृद्धी शेतीतून, पिक-पाण्यातून निर्माण झाली आहे. इथं हत्ती शाकाहारी आहे लक्षात घेणं आवश्यक आहे. शाकाहारी असुनही तो प्रचंड मोठा, बुद्धीमान आणि ताकदवानही आहे. म्हणून गणपतीचं मुख हत्तीचं. आज जरी लोक मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या बाळगत असले, तरी दारी हत्ती झुलणे म्हणजेच श्रीमंती ही आजही मराठी जणांची श्रीमंतीची कल्पना आहे ती त्यामुळेच. गजान्तलक्ष्मी हा शब्दप्रयोग उगिच नाही आला.

गणपती ‘एकदंत’ आहे. त्याचा एक दात तुटलेला आहे आणि तुटलेला तो दात त्याने त्याच्या एका हातात धारण केलेला आहे. नीट निरिक्षण केलं, तर हा तुटलेला दात दिसतो ‘नांगरा’सारखा; नव्हे त्याचा अर्थ ‘नांगर’असाच आहे. गम्मत म्हणजे कन्नड भाषेत ‘नांगर’ व ‘दात’ याला ‘कोळ्ळ’ किंवा ‘कोळ्ळु’ हा एकच शब्द आहे हे कृ. पां. कुलकर्णींचा मराठी व्युत्पत्ती कोष सांगतो. पेशवाईत एखाद्या गावाला शिक्षा म्हणून त्या गांवावरून ‘गाढवाचा कोलु’, म्हणजे गाढवाचा नांगर फिरवायचे ही गोष्ट मी शाळेत असताना वाचलेली मला या निमित्ताने आठवली. ज्यांचा जन्म सन १९६५ च्या आगेमागे झालाय, त्या सर्वांना हे आठवत असेल.

कोकणात गणपतीला इतर कोणतही, अगदी सोन्या-चांदीच डेकोरेशन केलं गेलं तरी त्याच्या डोक्यावर टांगलेली लाकडी मंडपी आणि त्यात केलेली तेरडा, कांगणी, कवंडाळं, सोनतळ, तेरवाड इत्यादी पावसाळी पाना-फुलांच्या मांडणीला अतोनात महत्व आहे. त्याच्या डोक्यावरील मंडपित विराजमान होण्याचा हक्क केवळ पावसाळ्यातच उगवणाऱ्या या रानफुले-फळांचाच. गणपतीला ‘दुर्वा’ आवडतात..दुर्वा आणि डोक्यावरील मंडपित लावलेली रानटी पाने-फुले हे पावसामुळे शेतीतून उगवलेल्या ‘धान्या’चं आणि त्यातून येणाऱ्या ‘धना’चं प्रतिक आहे. ‘धन-धान्य’ हा समृद्धीदर्शक शब्द आपल्या कृषिसंस्कृतीतूनच उगम पावलाय असं म्हणायला हरकत नाही.

गणपतीचं वाहन ‘उंदीर’. उंदीर हा पिकाचा क्रमांक एकचा शत्रु. या उंदराला गणपतीने वाहन म्हणून निवडलं असून त्यावर त्याचे पूर्ण नियंत्रण आहे. हे वाहन आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून त्याने कमरेला सर्पही गुंडाळलेला आहे. ‘उंदीर’ आणि ‘साप’ या प्रतीकांतून पिकाचं रक्षण करण्याची हमी गणपतीने भक्ताला दिलेली आहे. गणपतीच्या पूजनातून सर्पपुजनही अपेक्षित आहे.

गणपतीचं ‘लंबोदर’ असणं दर्शवतं की विश्वाची उत्पत्ती त्याच्या उदरातून झालेली आहे..माझ्या भक्ताचं पोट सदैव भरलेलं राहो हेच ‘लंबोदर’ सुचवतो..त्त्याच्या हातांत पाश, अंकुश आहे..तो भक्ताला उपभोग घे अस ही सांगतो परंतू उपभोगावर ‘अंकुश’ही असावा असेही गणपती आपल्याला सुचवतो..शेतीची, धरीत्रीची पुजा करा. ‘माते’ला आणि ‘माती’ला सांभाळा, तीचा आदर करा असा संदेश देणारा श्रीगणेश आपला लाडका असल्यास नवल ते काय?

अश्या शेतीचक्राचं मुर्तीमंत प्रतिक असणाऱ्या शंकर, पार्वती आणि गणपती या कुटुंबाचा अर्थ मला मानापासून भावलाय. हा अर्थ मला अनेक महानुभवांनी रचलेल्या ग्रंथांच्या वाचनातून गवसला आहे. शंकर-पार्वती-गणपती ह्यांचं पूजन म्हणजे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या माती, पाणी, अग्नी, वारा आणि आभाळ यांचं प्रतिक रुपातलं पूजन..आपल्या प्राचिन पूर्वजांनी साकारलेलं हे सृजनाचं प्रतिक आपण आजही मनोभावे पुजतोय, मात्र त्यामागची मुळ पवित्र भावना आपण हरवून बसलोय. ती सर्वांना कळावी, शेती व शेतकरी यांचं महत्व सर्वांना कळून शेती उत्तम, व्यापार मध्यम व नोकरी कनिष्ठ ही उतरंड आपल्या समाजात पुन्हा प्रस्थापित व्हावी या साठी हा लेखन प्रपंचं..

आपले सर्व मोठे आणि महत्वाचे सण पावसाळ्यात येतात, याला काही अर्थ आहे. पावसाचं महत्व आजही आपल्यी देशात कायम आहे.

हा लेख खरं तर एका पुस्तकाचा विषय आहे. शेतीला पुरक असलेली मातृसंस्कृती, कुटुंब व्यवस्था, मातृसंस्कृतीवर झालेले पुरुष संस्कृतीचे आक्रमण, नांगरामुळे शेती उत्तम होते हे लक्षात येणं आणि तशीच क्रिया अपत्य जन्मापूर्वीही घडते हे लक्षात येऊन पुरुषाला मिळालेलं महत्व, हे सर्व विषय आनुषंगीक असुनही जागेची मर्यादा लक्षात घेऊन मांडता आलेले नाहीत. शंकर-पार्वती-गणपतीची माहितीही शक्य तितक्या कमी शब्दांत लिहायचा प्रयत्न केला आहे, आपल्याला तो नक्की आवडेल असा विश्वास आहे.

आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा..!!

-नितीन साळुंखे

9321811091

बाप्पा, विवेकबुद्धी दे अम्हाला..

बाप्पा, विवेकबुद्धी दे अम्हाला..

इसवी सनाच्या साधारण सहाव्या शतकापासून पुढे लोकप्रिय झालेली ही देवता आज जवळपास अखिल विश्वातील हिंदू जनांचे लाडके दैवत झालेले आहे. तो आद्यदेव, मंगलमूर्ती, विघ्नविनाशक, विविध कलांचा अधिपती, उत्तम पुत्र आहे. पट्टीचा योद्धा, लेखनिक, विचारवंत, मुत्सद्दी असे अनेक गुण त्याच्या ठायी एकवटले आहेत आणि म्हणूनच त्याला ‘गुणपती’ असंही म्हटलं जातं. बुद्धिदाता म्हणूनही गणपती बाप्पा मोठाच आहे. अर्थात बुद्धीचा नि माझा फारसा कधी संबंध आला नाही किंवा जी काही जन्मजात मिळाली होती ती पुरेशी असल्यामुळे मी काही गणपतीकडे बुद्धिदाता म्हणून पाहिलेलं नाही. पुन्हा जास्त बुद्धी घेऊनही तिचं नेमकं करायचं काय, हा ही प्रश्नच होता. म्हणून मी गणपतीला ‘सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची न उरवी’ म्हणून पुजलं.

हे झालं माझं. माझ्या पिढीचं. आता काळ बदलला. आता सुखाचा संबंध पैशाशी, पैशांचा संबंध ज्ञानाशी, ज्ञानाचा संबंधं शिक्षणाशी, शिक्षणाचा संबंध मार्कांशी आणि मार्कांचा संबंध बुद्धीशी जोडला गेल्यामुळे, हल्ली ‘बुद्धिदाता गणेश’ स्वरुपालाच जास्त मागणी आहे. पूर्वी लोक सुखी ठेवायची मागणी करत, कुणी संकटातून सोडवायची मागणी करत, एखाद-दुसरा प्रेमात यश मिळू दे म्हणूनही मागणी करत असे आणि अशाच काहीबाही मागण्या असत. बाप्पाही विविध मागण्या आनंदाने पुरवत असे. आता मात्र केवळ बुद्धिचीच जास्त मागणी असल्याने बाप्पावर लोड येऊ लागला आणि मग त्याने बुद्धीची प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी एक स्पेशल दूत नेमून पृथ्वीवर (पक्षी: फक्त भारतात. ते ही महाराष्ट्रात जास्त) पाठवायचं ठरवलं आणि पृथ्वीवर ‘संगणपती’ अवतरला..

गणरायांचा हा दूत ‘संगणपती’ डिट्टो गणपतीच. हा ‘माऊस’ घेऊनच अवतरला. आई-वडिलांना पृथ्वी समजून एका क्षणात त्यांच्या सभोवती प्रदक्षिणा घालणारा बाल गणेशाचा वेग आणि एका क्षणात 7G स्पीडने पृथ्वीवरच्या यच्चयावत सर्व्हर्सना भेट देऊन येणाऱ्या या दुताचा स्पीडही सारखाच. गणपतीची सोंड, सुपासारखे कानाच्या जागी य दुताने मोडेम-राऊटर आणि मोठाल्या डिश ॲंटेना आणल्या. आधुनिक जगात जायचं म्हणजे कसं अप टू डेट जावं, तसाच हा गणपतीचा दूत ‘संगणक’या भारत भूवर अवतरला.

पण एक या गडबीत एक मिस्टेक गलतीसे झाली. बुद्धिदात्या गणरायाने आपल्या या दुताला आपल्या वाहनासकट सारी अवजारं दिली, मेमरीत बुद्धीही ठासून भरली, मात्र त्यात विवेकबुद्धी भरायचं गणोबा विसरले. अर्थात पृथ्वीवरची मागणी बुद्धीची असल्याने आणि विवेकबुद्धीची नसल्याने ही गडबड कुणाच्या लक्षात आली नाही.

विवेकबुद्धी नसल्याचा पहिला घोटाळा असा झाला, की गणपतीच्या या दुतालाच भारतवासी साक्षात बुद्धीदाता गणेश समजले आणि त्याला शरण गेले. ‘आमका उद्धारुक आता अवतार येतलो’ असं म्हणत पिढ्यान पिढ्या अवतारांची वाट पाहात आकाशाकडे दृष्टी लावून बसलेल्या निष्क्रिय भारतवासीयांना बुवा, बापू, महाराज, माॅ, अम्मा आदी देवांच्या एजंटलाच देवावतार समजून त्यांना शरण जाण्याची प्राचीन अध्यात्मिक सवय असल्याने असं झालं नसतं तरच नवल..! गणपतीचा हा बुद्धीमान दुतही या बुवा-बापुंसारखा हवेतून अनेक गोष्टी काढून समोर हजर करू लागला. असं झालं की मग विवेक हरवलेल्या भक्तांचं जे काही अध:पतन होऊ शकतं, तेच या गणपतीच्या दुतालाच बुद्धीची देवता गणपती मानूण चालणाऱ्या आधुनिक भक्तांचं होऊ लागलं.

भक्त आपल्या कच्छपी लागल्यावर या दुताच्या करामती सुरू झाल्या. या दुताचं एक जगातलं काहीही शोधून भक्तासमोर हजर करण्याचं कसब म्हणजे भक्तांना चमत्कार वाटू लागला. बरं, हा संगणदूत हव्या त्या गोष्टींसोबत नको त्या गोष्टीही भक्कांसमोर हजर करु लागला. ‘पॅंट’ शब्द इंग्रजीत टायपला, की पॅटच्या माहिती सोबत ‘पॅंटी’ ते ‘पंत(दादरचे)’ पर्यंत सर्व काही देऊ लागला. ‘बॅंक’ शब्दाची माहिती मागितली, की बॅकेच्या माहितीसोबत विजय मल्ल्याच्या करामतीपासून ते नदीच्या किनाऱ्यापर्यंतची सर्व माहिती हवेतून काढून समोर हजर करू लागला. ‘डाॅन’ शब्दाचा अर्थ विचारला असता, ‘मालक’पासून दिल्ली व्हाया दुबईपर्यंतचे सर्व अर्थ आणि यच्चयावत माहिती क्षणात समोर येऊ लागली.

हव्या त्या माहितीसोबत नको ती माहितीही समोर येते म्हटल्यावर, बुद्धीमान परंतू विवेकबुद्धी नसलेल्या ह्याच्या भक्तांची मती फिरुन ते चेकाळले नसते तरच नवल..! लक्ष नेमकं नको त्या माहितीकडे जाऊन त्याचं आकर्षण वाटू लागलं आणि मग विवेकशुन्यतेचा अनुभव गल्ली ते दिल्ली असा देशभरात सर्वत्र येऊ लागला. सोशल मिडीयावर अवास्तव मेसेज येणं, त्या मेसेजेसना विवेकबुद्धिच्या कसोटीवर न तपासणं आणि विचार न करता असे समाज विघातक मेसेज पुढे पुढे पाठवत राहाणं, समाज विघातक साईटसच्या, पोर्नच्या आहारी जाणं, सायबर क्राईम, माॅब लिंचिंग होणं, प्रक्षोभक धार्मिक आणि जातीय उतारे लिहिणं इत्यादी गोष्टी घडू लागल्या. ही सर्व बुद्धी असल्याची मात्र विवेकबुद्धी नसल्याची लक्षणं गणपती बाप्पाच्या संगणकरुपी दूताच्या आशीर्वादाने घडू लागली.

समाजात बुद्धीमान, म्हणून उच्च शिक्षित, म्हणून पैसा असलेल्या आणि म्हणून प्रतिष्ठाही प्राप्त झालेल्या, परंतु हे सर्व असुनही सदसद्विवेकबुद्धी हरवलेल्या भक्तांमधे हे होणं अपेक्षितच होतं. बरं ह्यात तरुणांपासून अकलेनं श्रेष्ठ म्हणावेत अशा म्हाताऱ्यांपर्यत सर्वांचा हिरिरीने सहभाग. गणपतीच्या बुद्धीमान परंतू विचारशक्ती नसलेल्या संगणक दुताच्या नादी लागलेल्या आणि तेच गुण-अवगुण अंगात भिनलेल्या भक्तांचे पूर्वज कधीतरी माकडं होती यावरचा विश्वास ठाम व्हावा, अशा माकडांच्याही वरताण विचारशून्य मर्कटलीला भारत भुमिवर गल्ली ते दिल्लीत घडू लागल्या. ६४ कलांची देवता असलेल्या गणेशजींच्या या संगणक दुताची त्या ६४ कलांमधील ‘छलिक योग’ या कलेवर अंमळ जास्तच प्रेम असल्याचं आणि तेच जास्त या आधुनिक भक्तांना भावल्याचं दिसू लागलं. अशा परिस्थितीत आपल्या अनेक जाती-पंथ-भाषांनी आणि ताळतंत्र सोडलेल्या राजकीय पक्षांनी भरलेल्या देशातील निरक्षरता, दारिद्रय़, अनारोग्य, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि याहीपेक्षा भयानक अशी धर्मांधता आणि जातियता यांना ऊत येणं अगदी सहाजिकच होतं.

‘विघ्नहर्ता’ गणपती हा मुळात ‘विघ्नकर्ता’ होता, हे आता आठवू लागलं. हाती घेतलेल्या कार्यात त्याने विघ्न आणू नये म्हणून प्रथम त्याची आराधना करण्याची गरज त्या काळच्या लोकांना वाटू लागली आणि त्यातून त्याचं आजचं विघ्नहर्ता हे रुप साकारलं. सध्याच्या अनागोंदीच्या (‘अन’ या कानडी शब्दाचा अर्थ ‘हत्ती’ असाच आहे. अनागोंदी हा शब्द कानडी आहे) समयी त्या विघ्नहर्त्यालाच साकडं घालून आता आपल्या बुद्धीदात्या ह्याना स्वरुपात या भुमिवर येऊन या सर्वांना आवर घालण्याची आणि चिमुटभर विवेकबुद्धी त्याच्या संगणक दुतासाठी आणि त्याच्या नादी लागलेल्या भक्तांचे कान उपटण्यासाठी येण्याची करुणा भाकावी लागण्याची घडी आली आहे. आम्हाला आता आधुनिक युगातील श्री विवेकबुद्धी गणेशाची आणि त्याच्या संगणक दुताची ‘डोळस आराधना’ करण्याची बुद्धी देण्याची प्रार्थना करावी लागणार आहे, यात दुमत नाही. बुद्धीदात्याचं विराट स्वरुप दाखवण्याची विनंती त्या गणपतीला करणं आवश्यक झालं आहे. संगणक हा फक्त विचारशुन्य दुत आहे, बुद्धीदाता विचारी गणेश नव्हे हे आता बाप्पानेच ओरडून सांगायची वेळ आलेली आहे.

बाप्पा, आम्हाला बुद्धी दिलीस तशी थोडीशी विवेकबुद्धीही दे, हेच तव चरणांशी मागणं..

-©️नितीन साळुंखे

9321811091

*फोटो सौजन्य इंटरनेट

अस्वस्थ मन..

अस्वस्थ वर्तमान, अस्वस्थ मन..

परवा चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘चिंतामणी’च्या आगमन प्रसंगी जो प्रकार घडला तो निश्चितच चांगला नव्हता. खरंतर चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा ही त्या भागातलं अतिशय जुनी संस्था. विधायक कार्य करण्याबद्दल त्यांची ख्याती आहे. अनेक समाजोपयोगी उपक्रम हे मंडळ राबवत असतं. असं असताना शतक महोत्सवी वर्षाच्या प्रारंभी घडलेली ही घटना विचार करण्यासारखी आहे. अर्थातच अश्या घटनांना ते मंडळ जबाबदार नसेल किंवा अश्या गोष्टीना त्याचं समर्थन नक्की नसेल, असं मी त्या मंडळाविषयी ठामपणे बोलू शकतो तरीही जे काही घडल, ते निंदनीय तर आहेच, त्याहीपेक्षा चिंतनीय जास्त आहे. ही किंवा अश्या घटना आपल्या समाजात वारंवार का घडू लागल्या आहेत, याचा विचार करण मला आवश्यक वाटू लागत.

‘चिंतामणी’च्या अगमन सोहळ्यात घडलेला प्रकार, श्री. राम कदमांची दहिहंडी, विरोधकांचा भारत बंद ही उदाहरणं केवळ त्या घटना ताज्या आहेत म्हणून दिली आहेत. बाकी अन्यत्रही तेच चाललेलं दिसतं. मुठभर माणसं एकत्र आली की त्यांना कैफ चढतो आणि असं काहीतरी घडतं हे अलिकडे वारंवार दिसू लागलंय. अगदी रोजच्या प्रवासात भेटणारा लोकल ट्रेन मधला इतर प्रवाशांवर दादागिरी करणारा ग्रुप असो की पोलीसांनाही मारहण करणारं (पोलीसांशी लोकं असं का वागतात त्याची वेगळी कारणं आहेत. त्या विषयी पुन्हा कधीतरी) एखादं गणपती मंडळ असो, हिंसा सर्वत्र वाढलेली दिसते. हिंसा म्हणजे फक्त दुसऱ्यांचं रक्त काढणंच नव्हे, तर एखाद्याचं आक्षेपार्ह विधान आणि आक्षेपार्ह भाषा ही हिंसाच असते. हे समाजासाठी घातक आहे. घातक अशासाठी आहे की, आपल्या समाजात वाढीस लागलेल्या ‘उन्मादा’च्या लागणीचा ते एक निदर्शक आहे. जातीचा उन्माद, धर्माचा उन्माद, सत्ता आणि त्यातून वैध कमी आणि अवैध मार्गाने जास्त कमावलेल्या संपत्तीचा उन्माद आणि या सर्वांतून प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेचा उन्माद. आपल्या समाजात एकंदर सर्वच बाबतीत उन्माद वाढल्याचं दिसून येतं. हा उन्माद आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे ह्याची कल्पना जरा केली तरी मनाचा थरकाप उडतो.

कालची चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात घडलेली घटना असो, राम कदमांची दहिहंडी असो, भिमा-कोरेगांव असो, दुसऱ्या फेजमधे झालेला मराठा क्रान्ती मोर्चा असो किंवा आजचा भारत बंदचा कार्यक्रम असो, यात झालेली नासधूस, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, बेभान तरुण हे चित्र पाहिलं मला काही वर्षांपूर्वी आझाद मैदानात एका जमावाने घातलेल्या धिंगाणा वाटतो. आझाद मैदानातला धिंगाणा मुसलमानांच्या संघटनेनं घातलेला होता व मुसलमान एकजात राष्ट्रविरोधी आहेत अशी एकंदर समाजाचीच भावना असल्याने, त्या प्रकाराचे तिव्र पडसादहि उमटले होते. तसं काही बाकीच्या नंतरच्या घटनांच्या वेळी दिसून आलेलं नाही. नंतरच्या घटनांवरही काही प्रतिक्रिया आल्या, पण त्या त्या आपापल्या जातीचा, धर्माचा आणि पक्षाचा आब राखून दिलेल्या प्रतिक्रिया होत्या. आझाद मैदानात घडलेली घटना जर राष्ट्रविरोधी असेल, तर मग नंतरच्या घडलेल्या घटनाही तेवढ्याच राष्ट्रविरोधी आहेत असं कुणालाच वाटलेलं नाही ही चिंतेची गोष्ट आहे.राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तींना कसंही वागायचा अधिकार असतो, असा काहीसा समज अलिकडे वाढीस लागलेला दिसतो. राम कदमांवर मी जेंव्हा टिकेचा लेख लिहिला होता, तेंव्हा राम कदम त्यांच्या मतदारसंघात राॅबिनहूड आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी ते श्रावणबाळ आहेत, लाखो बहिणींसाठी ते श्रीकृष्ण आहेत वैगेरे गोष्टी त्यांच्या एका समर्थकाने मला ऐकवल्या होत्या. त्याच्या म्हणण्याचा स्पष्ट अर्थ असा होता, की या पार्श्वभूनिवर दहिहंडीला घडलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करायला हवं होतं म्हणून. असा समज निर्माण होणं किंवा तसा समज करुन दिला जाणं समाजासाठी घातक आहे, हे कुणीच लक्षात घ्यायला तयार नाही, हे त्याहीपेक्षा चिंताजनक आहे.

झुंडशाही आणि त्यातून निर्माण होणारा हिंसक उन्मादाचं मूळ कुठे आहे याचा बारकाईने विचार केला असता, राजकारण ह्या एकच उत्तराकडे सर्व काटे स्थिर होतात. राजकारणाला नको इतकं महत्व प्राप्त झाल्याने असं घडत असावं असं ठामपणे म्हणता येतं. सत्तेवर निवडून आलेला पक्ष, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते व्यक्ती, त्यांच्या हातात असलेली आणि हवी तशी वाकवता येत असलेली सत्ता, त्याच्या समोर आपल्याला स्वतंत्र अधिकारांचा कणा आहे हेच मलईदार पोस्टींगच्या स्वार्थापायी विसरलेलं नागरी प्रशासन, जनतेच्या रक्षणासाठी घटनेने दिलेले हातातले अधिकार राजकारण्यांच्या इशाऱ्यावर तिच्याच दमनासाठी वापरणारे पोलीस प्रशासन आणि हे सर्व हतबलपणे पाहात बसणारी आपण असंघटीत जनता, हे या मागचं कारण आहे असं मी समजतो.

अर्थात आपल्या हतबलतेला आपणच कारणीभूत आहेत हे ही खरं. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले सेवक आहेत हेच आपण विसरलोय आणि आपण त्यांच्याकडे आपले त्राता या नजरेतून पाहू लागलेयत आणि त्यांना देव्हाऱ्यात बसवून त्यांची पूजा करु लागलोयत. म्हणून तर साध्या घरगुती किंवा गल्लीतल्या भांडणातही आपल्याला यांची मध्यस्ती लागते. यातूनच आपल्याला सारं काही समजते आणि आपणच जनतेचे तारणहार अशी यांची मनोभुमिका वाढते आणि यांचा हळुहळू देव होऊन जातो. अशा व्यक्तींना मिळत असलेली प्रतिष्ठा हे अम्पल्या समाजाच्या आजच्या ऱ्हासाच मुख्य कारण आहे.

आपल्या हिन्दी लेकांना एकूणच देव या संकल्पनेविषयी भलताच (नको तेवढा) आदर आणि भयंकर भिती आहे. ‘देवाला सर्व माफ असतं’ आणि ‘त्याचं ऐकलं नाहीतर तो आपल्याला पाप करेल’ हे लहानपणापासून आपल्या मनात ठासून भरवलेलं असतं. देवाविषयी जशी आपल्याला भिती आणि त्यातून निर्माण झालेला (आभासी)आधार वाटतो, तशीच भिती आणि काळजी करण्यासारखा आधार या लोकशाहीतल्या बेगडी देवांचाही वाटू लागलाय आणि ते ह्या देवांनी पुरतं ओळखलंय. ‘भित्यापाठी ब्रम्हराक्षस’ या न्यायाने है ‘लोकराक्षस’ आता ‘लोकरक्षकां’चं रुप घेऊन आपल्याच मागे लागलेले आहेत. देवाने केलेली शिक्षा हे आपल्याच पापाचं फळ असतं असं समजून आपणही शांत बसतो आणि त्याला हतबलतेचं लेबल लावतो. त्यातूनच ही अशी झुंडशाही वृत्ती वाढीला लागते हे आपल्याला समजत असतं, पण देवाला कोण शिक्षा करणार, असं म्हणत पुढच्या निवडणूकीत हे देव बदलून दुसरे बसवण्याचा आपण निर्धार करतो.

देव बदलतो पण परिस्थिती तिच राहाते. आपण पुजत असलेल्या आकाशातल्या देवाला जसा माणसानेच जन्म दिला आहे, तसाच लोकशाहीच्या संगमरवरी मखरात बसलेल्या नगरसेवक, आमदार, खासदार आदी देवांनाही आपणच जन्म दिला आहे, ह्याचंच जन्मदात्री जनतेला विस्मरण झालेलं आहे आणि जनतेच्या हतबलतेचं कारण हेच आहे. राक्षस-भुतादी योनीतील आत्मे जसे अमावस्या-पोर्णिमेला ऐन भरात असतात, तसे हे लोकशाहीतील नविन देव निवडणुकांच्या दरम्यान उत्तेजित होतात आणि त्यातून असे प्रकार घडतात. हे प्रकार निवडणुका जस जश्या जवळ येतात तसे वाढीला लागतात. देवासारखं वागावं ही आणखी एक आपल्याला मिळालेली शिकवण. तरुण पिढी या नविन देवांसारखी वागू बघते आणि आपल्यासारखंच वागू पाहाणाऱ्यी ह्यी पिढीवर देवांचा हात असल्याने, आपलं शष्पही कोणी वाकडं करु शकत नाही, अशी अनुभवांती रास्त समजूत तरुणाईची आणि एकूण सर्वांचीच होते आणि अशा हिंसा घडतात. आजवर कुठल्याच बेकायदेशीर घटनांमध्ये राजकारण्यांना शिक्षा झालेली आपल्याला दिसलेली नाही. राम कदमानाही एव्हाना क्लीन चिट मिळाली असेल. ह्याचाच आकर्षण तरुणाईला वाटून ती त्यांच्यामागे वाहवत जाते, हे वास्तव आहे.

कोणत्याही समाजाचं नैतिक सुदृढपण त्या समाजासमोर आदर्श कोणाचे आहेत त्यावर ठरतं. स्वातंत्र्यपूर्व काळात असे आदर्श आपल्या समाजात होते. तो काळच ध्येयाने भारलेला असल्याने, त्या काळातल्या राजकारण, लेखन, चित्रपट, कला आदी विविध क्षेत्रात मिर्माण झालेलं नेतृत्व समाजाच्या चांगल्या-वाईटाचा विचार करणारं होतं. त्यांच्या विचारातून समाजाला मार्ग मिळत होता. या नेतृत्वावर समाजाचीही श्रद्धा होती. स्वातंत्र्योत्तर काळातही काही वर्ष स्वातंत्र्यपूर्व काळातल्या विचारवंतांच्या विचाराचा प्रभाव जनतेवर होता व त्यातून सामाजिक नैतिकता पाळली जायची. नंतरही नरहर कुरुंदकर, पु. ल. देशपांडे, मधु दंडवते, अटलबिहारी वाजपेयी, चित्रपट-नाटक क्षेत्रातील काही धुरीण आदी समाजातल्या अपप्रवृत्तींवर वेळोवेळी टीका करत असत व समाजाला आणि राज्यकर्त्यानाही ट्रॅकवर ठेवायचा प्रयत्न करत असत. समाज आणि राज्यकर्तेही त्यांच्या म्हणण्याचा विचार करत असत. नंतरच्या काळात महाराष्ट्रात विचारवंत झाले नाहीत असं नाही, परंतू त्यांच्या म्हणण्याकडे समाज आणि राज्यकर्त्यांनीही दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. पुढे तर वेगळा विचार म्हणजे आपल्या विरोधी विचार असे त्यांनीच ठरवून अश्या मार्गदर्शकांवर वेवेगळ्या ‘इझम’चे शिक्के(ते हि स्वत:च) मारून त्यांना बेदखल करायला सुरुवात केली. विचारांचा सामना विचारांनी करायचा असतो हे केवळ पुस्तकातल एक वाक्य बनून राहून गेल. अशा काही विचारवंतांनीही मग अपरिहार्यपणे कुठल्यातरी अ(प)क्षाकडे झुकणं स्वीकारलं आणि मग समाजाचा विचार करायची धुरा केवळ कुठल्यातरी पक्षाकडे आली. हे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत मिळाल्यासारखं झालं आणि मग त्यातून झुंडशाही निर्माण झाली. हे असं होणं हे सहाजिकच होतं आणि त्याचेच परिणाम म्हणून वर उल्लेख केलेल्यी घटना घडल्या असा माझा निश्कर्ष आहे..गुंड-पुंड-भ्रष्ट आणि भल्या-बुऱ्या मार्गाने सत्तेवर येण्यासाठी अट्टाहास करणारे राजकारणी (माननीय गणपतराव देशमुखांसारखे आणखी काही मोजके अपवाद वगळता) तरुण पिढीसमोर आदर्श असताना दुसरं काही अपेक्षितच नाही. राजकारणाला आणि ते करणाऱ्या राजकीय व्यक्तींना नाहक मिळणाऱ्या प्रतिष्ठेमुळे असं घडलंय. पेपरातही एखाद्याने काही अतुलनीय कार्य केल असेल तर त्या बातमीला दुय्यम स्थान दिल जात आणि गावोगावी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात (शक्यतो सत्ताधारी पक्षात. कारण टेंडरं आणि कमिशन) प्रवेश करणाऱ्या बेकार तरुणांचे फोटो ठळक जागी झळकतात. राजकारणात जाण्यासाठी लागलेली स्वार्थी चढाओढ, हे आपल्या समाजाचं नैतिक अधपतन वेगाने होत असल्याचं लक्षण आहे.,

हल्ली राजकारण याचा एकच अर्थ राहिला आहे. केवळ विशिष्ट गटाचा स्वार्थ साधणारी संघटना उभी करायची आणि दमदाटी किंवा देशकालपरिस्थितीचा विचार न करता संप, मोर्चे, जाळपोळ करत सुटायचं. ह्यात सारेच सामील. वर्षानुवर्ष चाललेल्या वांझोट्या चर्चा आणि निरर्थक चौकश्या समित्या यातून काहीच निष्पन्न होत नाही म्हटल्यावर, लोकशाही मार्गाने सभा-मोर्चे काढून, सार्वजनिक संपत्तीच नुकसान न करता करून आणि जीवित हानी होऊ न देता आपला निषेध नोंदवता येतो यावरचा विशाव्स उडून गेला आहे. अश्या परिस्थितीत दंगा किंवा जाळपोळ हाच एक मार्ग उरतो. झुंड शाहीतून निर्माण होणाऱ्या उन्मादी दहशतीपुढे कोणतेही सरकार झुकते हे लक्षात आल्याने, त्याच मार्गाचा जास्तीत जास्त अवलंब केला जातो. हल्ली कोणत्याही कारणाने एकत्र येणं या गोष्टीचा समारोप धिंगाणा घालण्यानेच होतो याचा अर्थ नेमका काय हे शोधताना मला ‘उन्माद’ हे एकच कारण दिसतं. कालचा चिंतामणीचा आगमन सोहळा असो की आजचा भारत बंद असो. मागच्याच आठवड्यात राम कदमांचा जाहिर तमाशा हे याचंच फलित होत.

सध्या चाललेल्या या उन्मादी प्रकाराने मला एक प्रकारची चिंता वाटू लागली आहे. चिंता अशासाठी की अशा प्रकारांमुळे माणसामाणसांत अनेक अदृष्य भिंती उभ्या राहू लागल्यायत. ह्या भिंती जातीच्या आहेत, धर्माच्या आहेत आणि त्याही पेक्षा पक्षाच्या आहेत. जो आपल्या मताचा नाही, तो शत्रू अशी वागणूक मिळू लागली आहे. आपल्या विरोधी मतं मांडणारांवर विविध ‘इझम’चे शिक्के मारून त्याला खड्यासारखं बाजूला टाकलं जात आहे. कोणी तसं का म्हणतोय, ह्याचा विचार करायची गरज कुणाला वाटेनासी झालीय. विचाराचा सामना विचाराने करायला जास्त हिम्मत लागते. त्यापेक्षा शिक्का मारून बाजूला काढणं जास्त सोपं असतं. शिक्का मारायला कुठे डोकं लागतं? आकाशात उगवणाऱ्या इंद्रधनुष्याच्सा सात रंगांतही या राजकारणाने भिती उभ्या केल्यायत. उद्या असंच चालू राहिलं तर आपण दिसायला एकसंघ दिसत असलेला समाज असलो तरी, आतून मात्र एक भागीले एकशेपंचविस कोटी असे आहोत याची जाणीव होते आणि मन मनातल्या चिंतेची जाणीव भीती रूपाने समोर उभी ठाकते..

माझं मन अस्वस्थ होतं आणि स्वत:लाच एक प्रश विचारत, हे कधीतरी बदलणार आहे का?

-नितीन साळुंखे

9321811091

माझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव..

माझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव..

उपोद्घात (Prelude)-

माझं आजोळ लालबागचं. सुरुवातीची मुंबई कोकणातून उतरली ती भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबैची नंतरची पिढी जन्मली ती परळच्या वाडीयात. माझा जन्मही वाडीयाचाच. पुढं जे काही लालबाग आणि लालबागेतल्या सणांचं वर्णन केलंय, ते माझ्या लहानपणी आई-मामाचं बोट धरून फिरताना मला त्यावेळी जे दिसलं आणि त्या वयात मला त्याचं जे आकलन झालं, तसंच लिहायचा प्रयत्न केलाय. आता हे सारं लिहीताना मी त्याच सात-आठ वर्षाच्या वयात आहे असं समजून लिहीलंय. माझ्या बालपणी मी अनुभवलेल्या गोष्टी व मी तेंव्हा त्यांचा लावलेला तेंव्हाच अर्थ जशाचा तसा दिलाय. म्हणून तो कदाचित आताच्या माझ्या आणि तुमच्याही आताच्या ‘समजे’शी जुळेल असं नाही. लेखाचा समारोप मात्र आताच्या परिस्थितीचा संदर्भ देऊन केलाय. हे सारं लक्षात ठेवून हा लेख वाचावा. ह्याच परिसरात लहानाचं मोठं झालेल्या व्यक्तींचा त्याच गणेशोत्सवांचा अनुभव माझ्यासारखाच असला तरी त्यांच्या त्यावेळच्या आकलनानुसार त्याच्या अर्थात फरक पडू शकतो हे कृपया ध्यानात घेऊन हा लेख वाचावा हि विनंती. हे इतिहास लेखन नाही, तर आठवणी आहेत आणि त्या वयाचा होऊन लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. शब्द आताचे असले, तरी भावना त्या लहान वयातलीच आहे.

-नितीन साळुंखे

माझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव..

तेंव्हा-

मध्य मुंबईचा लालबाग भाग हा नेहेमीच उत्सवी राहीलाय. किंबहुना उत्साह आणि उत्सव याचं दुसर नांव म्हणजे लालबाग, असं म्हणायलाही हरकत नाही. नेहेमीच्या जीवनात बारश्यापासून ते मयतापर्यंत लालबागकरांचा हा उत्साह सारखाच असतो आणि सणांमध्ये तर हा पार फसफसून उफाळून येतो. हा भाग म्हणजे गिरणगाव समजल्या जाणाऱ्या भागाचं धडधडत हृदयच जणू..!

कोणत्याही आकर्षक स्त्रीकडे माणसं आकर्षित हेतातच, तसं देशभरातून लोक मुंबैकडे आकर्षित झाले, ते मुंबईच्या दोन ‘हिरॉइन्स’मुळे. एक रेल्वे आणि दुसरी कापडाची गिरण. साधारणत: पश्चिम/मध्य रेल्वेवरील दादर टि.टी. आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते साधारण माजगांव-भायखळ्यापर्यंतच्या औरस-चौरस विभागाला गिरणगांव म्हणत आणि याच्या हृदयस्थानी वसलंय लालबाग.

गिरणगांवातील गिरण्या आणि त्यात तिन पाळ्यांमधे काम करणारे गिरणी कामगार यांच्या वस्तीचा लालबाग हा मध्यवर्ती भाग कायम जागता आणि धगधगता असायचा. कामगारबहुल भाग असल्यामुळे गिरण्यांचे तिन्ही त्रिकाळ वाजणारे भोंगे, त्या भोंग्यानुसार हातात जेवणाचे उभट डबे घेऊन गिरण्यांच्या दिशेने घोळक्याने निघालेले कामगार, कामगारांचे पगारवाढ, बोनस यासाठी संप, लढे, मोर्चे यामुळे या भाग सतत जिवंत आणि धगधगता असायचा. या भागावर त्यावेळी कामगारांसाठी लढणाऱ्या ‘लाल’भाई कम्युनिस्टांच वर्चस्व असल्याने, हा भाग ‘लाल’बाग म्हणून ओळखला जाऊ लागला की काय कोण जाणे..! खर तर हे नाव ‘लालबाग’ ऐवजी ‘लालभाग’ किंवा ‘लालआग’ असं काहीतरी असायला हवं होतं असं मला सारखं वाटतं, कारण ते लालबागच्या स्वभावाशी जास्त मिळत जुळत वाटतं.

मध्य रेल्वेवरच्या करी रोड आणि चिंचपोकळी या स्थानकांच्यामध्ये असलेल्या, पूर्वेकडील भागाला लालबाग म्हणतात. हा भाग चिंचपोकळी स्टेशनला अधिक नजीक. या भागाला लालबाग म्हणतात तरी या परिसराच्या स्टेशनला चिंचपोकळी नांव का दिल, हा प्रश्न मला तेंव्हाही पडायचा आणि आजही पडतो. लालबागची लोकवस्तीत कोकणी माणसांचा टक्का बराच मोठा, तर पश्चिमेला, आताच्या ना. म. जोशी मार्गाच्या दुतर्फा, बहुतकरून सातारा, सांगली, कोल्हापूर इत्यादी घाटावरच्या लोकांची वस्ती. महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या प्रांतांमधला हा फरक मला त्या नकळत्या वयातही सहज लक्षात यायचा तो वेषावरून. घाटावरचे रांगडे गडी कायम पांढरा लेंगा, पांढरा सदरा आणि टोपी आणि गिरणीत कामावर जाताना खाकी हाफ पँट या वेषात, तर तसा वेष नसलेले कोकणी, इतकी साधी सरळ दृश्य विभागणी होती. त्याकाळी प्रांतवाद हा राजकारणाचा भाग नसल्याने घाटावरच्याला घाटी आणि कोकणातल्याला कोकणी असं म्हटलं तरी कुणाला राग वैगेरे यायचा नाही.

गिरण्यांमधे तिन पाळ्यांत राबणारा कोकणी असो वा घाटी, ह्या माणसांत असणारी गरीबी हा समान धागा असायचा. गरिबीची व्याख्या श्रीमंती ठरवते आणि त्याकाळी केवळ टाटा-बिर्लाच श्रीमंत असल्याने, उरलेले ते सर्व गरिबीच्या समान पातळीवर असायचे. तेंव्हा पैसा हे फक्त विनिमयाच साधन होतं, मिरवायचं नाही आणि म्हणून माणूस माणसाला माणसासारखं वागवायचा. हे तेंव्हा कळत नसलं तरी, आता मात्र प्रकर्षानं जाणवतं. प्रत्येकाचंच स्वत:चं मोठं कुटुंब. हम दो, हमारे दो वैगेरे तेंव्हा कुणाला कुणी सांगीतलं असतं, तर एकतर त्याला वेड्यात काढलं असतं किंवा मग नवऱ्याची दोन आणि बायकोची दोन असा त्याचा अर्थ लावला असता आणि तो पुढच्या विस्ताराच्या तयारीला लागला असता. घरची स्वतःची मोठी मनुष्य संपदा, त्यात गांवावरून शिकायला/ नोकरीला आलेले आणि दोनचार भाचे-पुतणे असा सारा संसार त्या १० बाय १० किंवा १२ बाय १२च्या खोलीत समाधानाने नांदत असायचा. नांदत असायचा म्हणजे, अर्धा खोलीत, काही बाहेर गॅलरीत, तर काही झोपायला थेट फुटपाथवर. फुटपाथवर झोपणं तेंव्हा आम बात होती, त्यात कोणाला काही गैर वाटायचं नाही, ते बंद झालं ते रामन राघवने फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या केलेल्या हत्याकांडानंतर.

अश्या या सदा उत्साही आणि आनंदी लालबागचं खरं स्वरूप सामोरं यायचं ते कोणत्याही उत्सवाच्या निमित्ताने. त्यातही श्रावण ते कार्तिक असे चार महिने तर लालबागच्या उत्साहाला उधाण आलेलं असायचं. गटारी अमावास्येच्या आसपास लालबाग मार्केट तऱ्हे तऱ्हेच्या हिरव्यागार भाज्यांनी फुलून जायचं. पावसाळा असल्याने हे तसेही नेहेमी दिसणारे दृश्य, पण श्रावण आल्याची वर्दी द्यायची, ती बाजारात भाज्यांच्या गर्दीत मोठ्या संख्येने दिसू लागणारी केळीची हिरवी-पोपटी पानं. लालबाग मार्केट केळीच्या पानांनी भरलेलं दिसलं, की सण सुरु झाल्याचा सुवास मनात भरू लागायचा. सणांचे दिवस काही वेगळेच असतात, हे मला तेंव्हाही जाणवायचं अन् आताही जाणवतं. श्रावण आला, की वर्षभर दाबून ठेवलेल्या कोकणी माणसाच्या उत्साहाला केळीची पानं हिरवा सिग्नल द्यायची आणि गिरणगांवातील कोकण्यांच्या उत्साहाची गाडी सुसाट सुटायची.

नागपंचमी हा सण, पुढे तुळशीच्या लग्नापर्यंत दर आठ-पंधरा दिवसांनी येणाऱ्या कोणत्या न कोणत्या सणांच्या मालिकेतला पहिला सण. हा सण असतो हे आताच्या फ्लॅटाळलेल्या पिढीला समजणार नाही आणि समजलं तरी त्यात साजरा करण्या एवढं काय असतं, हे कळणार नाही, पण तेंव्हा हा सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. मग येणारं रक्षाबंधन, दहीहंडी ते पार दसरा-दिवाळी-तुळशीच्या लग्नापर्यंत पर्यंत दर आठ-पंधरा दिवसांनी कोणता न कोणता तरी सण यायचाच आणि लालबागला तो सारख्याच उत्साहाने साजरा केला जायचा;आणि या सणांचा राजा असायचा तो गणेशोत्सव..! एकूणच कोकणी माणसाला दिवाळी ही सणांची राणी वैगेरे काही वाटत नसे, आजही वाटत नाही. सणांचा राजा गणपतीच..!!

बाजारात केळीची पान आणि दुकानात सजावटीच्या शोभेच्या वस्तु, रंगीबेरंगी पडदे, मखर, पताका दिसू लागल्या, की गणपती मुंबैला यायला निघाले अस मला त्या काळी कळायचं. जस जशी गणेश चतुर्थी जवळ येईल, तस तसं बाजारातील गर्दीला उधाण येऊ लागायचं. बाजार, दुकान, रस्ते गर्दीने फुलून जायचे. घराघरात खोबरं-गुळाच्या करंज्या तळत असल्याचा खमंग सुवास दरवळायला लागायचा, गणपतीच्या स्वागतासाठी गांवी पळण्यासाठी यश्टीच्या रिझर्वेशनची धांदल उडायची. कोकणी माणूस एकवेळ पर्मनंट नोकरीला लाथ मारेल, पण गणपतीला गांवी कोकणात जाणार म्हणजे जाणारचं. हा बाणा कोकण्यांनी अजूनही जीवापाड जपलाय. तेंव्हा यश्टीचं रिझर्वेशन मिळणं म्हणजे आतासारखं सोपं नव्हतं. परळ, मुंबै सेंन्ट्रल डेपोत रात्रभर लाईन लावावी लागायची, तेंव्हा कुठे तिकीटं हाती यायची. ती तिकीटं मिळाल्याचा आनंद, प्रत्यक्ष गणपती प्रसन्न होण्यापेक्षा कमी नसायचा.

माझ्या लहानपणचा गणपती हा बहुतकरून घरगुतीच असायचा. बहुसंख्य लोकांचा गणपती गांवीच असायचा तर काहींचाचं मुंबईत. ज्यांच्या गांवीही गणपती नाही व मुंबईतही नाही, असे लोक मग सार्वजनिक गणेशोत्सवात आपला गणपती साजरा करायचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव हे तेंव्हापासूनच लालबागची ओळख बनली होती. आमच्या घरी गणपती बसत नसल्यानं, सार्वजनिक गणपतीच मला माझा वाटायचा, तो अजूनही मला तसाच वाटतो.

लालबाग तेंव्हाही सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ओळखलं जायचं पण ती ओळख मर्यादीत होती. त्यावेळच्या गणेशोत्सवाचा आतासारखा बाजार झाला नव्हता. तेंव्हा श्रद्धा, सामाजिक जाणीव महत्वाची होती. लहानपणी लालबागचे गणपती बघायला जाणं हा माझ्यासाठी आनंदाचा सोहळा असायचा. आई, मावश्या, सोबत एखादा मामा घेऊन आम्ही गणपती पाहायला रात्री जेवून खावून निघायचो. उत्तरेकडचं करी रोड ते चिंचपोकळी आणि चिंचपोकळीच्या दक्षिणेस राणीच्या बागेपर्यंतचे गणपती पाहून आम्ही मध्यरात्री परत घरी, असा साधारण कार्यक्रम असायचा. लालबागचा भौगोलिक विस्तार तेंव्हा एवढाच होता आणि आताही तेवढाच आहे, मात्र मंडळांची संख्या आता काहीशी वाढलेली आहे. गणपती पाहायला येणाऱ्याची गर्दी तेंव्हाही असायची पण आता एवढा गर्दीचा महापूर तेंव्हा नव्हता. तेंव्हाची गर्दी सुखद वाटायची आता मात्र गिळून टाकणारी वाटते. मुंबईची लोकसंख्याही त्याकाळी कमीच होती आणि वाहतुकीची साधनंही मर्यादित, त्यामुळे गर्दीला आपोआप मर्यादा येत असे.

आतासारखे गणपती तेंव्हा मंडपाच्या जाड ताडपत्रीआड लपवलेले नसायचे. गणपतीच्या मांडवाची पुढची बाजू उघडीच असल्याने (काही गणपतींची अजुनही असते), लांबूनही गणपती सहज दिसायचे. त्यामुळे फार मोठी लाईन वैगेरे भानगड नसायची. लालबागच्या चाळीत राहणारी गिरणी कामगारांची कुटुंब कायम उघडया दरवाजाच्या घरात राहायची. खाजगीपणा, प्रायव्हसी वैगेरे मानसांना बेटं बनवणारे शब्द तेंव्हा कोणाच्या खिजगणतीतही नसायचे. राहण्याचा अन् वागण्याचाही असा खुल्लम खुल्ला माहौल, सार्वजनिक ठिकाणी वा उत्सवाच्या निमित्ताने प्रतिबिंबित व्हायचा असं आता मला वाटत. तेंव्हाचं काय किंवा आताचं काय, कोणतंही सार्वजनिक कार्य, ते साजरं करणाऱ्या लोकांच्या खाजगी जीवनाचं प्रतीबिंबं असतं, असं माझ्या लक्षात आलंय.

त्यावेळी आता सारखा गणपती एकटाच मांडवात बसलेला किंवा उभा नसायचा, तर त्याच्या सोबतीला एखादं पुराणातलं दृष्य, चालु घडामोडी, सामाजिक प्रश्न यांवर भाष्य करणारे हलते-चालते पुतळे असायचे. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य तेंव्हा ताज ताज असल्याने, गांधी, नेहरू, सुभाषबाबू वैगेरे नेत्यांचे पुतळे कोणत्या न कोणत्या मंडळाच्या गणपतीच्या मांडवात गणपतीच्या सोबतीने उभे असलेले पाहायला मिळायचे. कधी कधी तर गणपतीच या नेत्यांच्या अवतारात हटकून पाहायला मिळायचा आणि गंम्मत म्हणजे, तेंव्हा असं केलं म्हणून कुणाच्या भावना वैगेरे नाजूक चिजा अजिबात दुखावायच्या नाहीत, उलट त्यात एक कौतुकच असायचं. लालबागचे गणपती पाहायला लोक यायचे असं म्हटलं, तरी लोक ते गणपती पाहण्यापेक्षा ती चित्र, ती दृश्य पाहण्यासाठी जास्त यायचे. माझ्या लहानपणातल्या लालबागचा गणपती आपल्याएवढाच, माणसाच्या उंची रुंदीचा असायचा, आता सारखं अंगावर येणारं विराट (की विक्राळ?) स्वरुप तेंव्हाच्या गणपतीनं घेतलेलं नव्हतं. पापं वाढली की परमेश्वर विराट स्वरूप दाखवतो, असं कुठंतरी पुराणकथांत वाचलं होतं, ते खरच असावं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे सध्या, हे मात्र खरं..!

गणपती पाहण्यासाठी लालबागला मामाकडे दोन-तिन दिवस राहायला जाण्याची मी वर्षभर वाट पाहत असे. त्यात गणपतीपेक्षा, गणपतीनिमित्ताने भरणारी जत्रा, त्यातील विविध खेळ, खाऊ-खेळणी यांचीच ओढ जास्त असायची. गणपती हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव असायचा त्या काळी. लालबागच्या गणपतींचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे, गणपतीच्या निमित्ताने तिथं भरणारी चित्र प्रदर्शनं. इथं चित्र म्हणजे पुतळे. ही प्रदर्शनं एखाद्या पुराणातल्या किंवा इसापनितीतल्या बोधकथेवर आधारित असत. यात स्टेज खालील, डोळ्यांना दिसू नये अशा पद्धतीने बसवलेल्या यांत्रिक करामतीने, पुतळ्यांची माणसासारखी कथेनुसार हालचाल केलेली असे. यांत्रिक करामत वैगेरे शब्द नंतर कळले, परंतु लहानपणी हे सारं गूढ आणि जादुई वाटायचं. आमच्या ‘अनंत निवास’ बिल्डींगच्या (गणेश टाॅकीजला अगदी लागून असलेली चार मजली इमारत) अगदी दारात असलेल्या गणेशोत्सवात, कांबळी आणि फाटक (दोघंही कोकणीच) या मुर्तिकारांची अशी हलती चित्र प्रदर्शनं भरत. असंच प्रदर्शन पेरूच्या चाळीच्या गणपतीतही भरायचं. ह्या प्रदर्शनात तिकीट लावून प्रवेश असायचा आणि तिथे घेऊन जाण्यासाठी मी आईकडे हट्ट करत असे किंवा लाडीगोडी लावत असे, हे मला लख्खं आठवतं. ती प्रदर्शनंही अजून चांगलीच आठवतात. त्या प्रदर्शनांनी माझं बालपण समृद्ध केलं हे मात्र खर. ती समृद्धी मला अजुनही भरभरून देतेय.

लालबागचा गणपती म्हटलं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर चटकन उभा राहातो, तो म्हणजे चिंचपोकळी स्टेशनच्या पुलाखालील ‘चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव’चा गणपती. हा गणपती सध्या ‘चिंतामणी’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे मंडळही लालबागचे जुने (बहुतेक सर्वात) गणेशोत्सव मंडळ आणि हे मंडळ सुरुवातीपासूनच त्याच्या सामाजिक बांधिलकी माणून कार्या करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आजही या मंडळाने तो वारसा आणि उत्सवातील पवित्रता जपलेली दिसते. हा माझ्या घरचा गणपती. घराचा अशासाठी साठी, कि या मंडळाशी माझा मामा संबंधित होता, अजूनही आहे. या गणपतीला एक दिवस नैवेद्य दाखवून त्याचा आशीर्वाद घ्यायची माझ्या आईची प्रथा गेली ५५ वर्ष अबाधित सुरू आहे.

त्यानंतर आमच्या बिल्डींगच्या समोरच असलेला कांबळी आणि फाटक यांचे सार्वजनिक गणपती. हे गणपती, गणपतीपेक्षा त्यांच्या हलत्या चित्र प्रदर्शनासाठी प्रसिद्ध होते. त्यानंतरचा गणपती आठवतो, तो लालबाग मार्केट समोरच्या पेरूच्या चाळीतील गणपती. हा गणपतीही प्रदर्शनासाठी मला आवडायचा. पुढे तेजुकाया मँन्शनचा देखणा गणपती. हा गणपती आजही त्याच्या देखणेपणासाठी प्रसिद्ध आहे. तेजुकायाच्या पुढे करी रोडच्या पुलाखालील गणपती. हा मला तितकासा स्पष्ट आठवत नाही.

तेजुकायाच्या समोरच गणेश गल्लीचा गणपती, नंतर हिरामण मार्केटचा गणपती, त्यानंतर लालबाग मार्केटचा गणपती, पुढे रंगारी बदक चाळीचा गणपती आणि त्याच्याही पुढे जयहिंद सिनेमाचा गणपती, एवढे गणपती म्हणजे माझ्या तेंव्हाच्या मते लालबागचे गणपती. हे सारे गणपती एखाद्या रात्री बघायचे, एखाद प्रदर्शन पहायचं, आई-मामला मस्का मारून एखाद खेळणं पदरात पाडून घ्यायचं, दत्ताराम लाड मार्गावरील जत्रेत मृत्यूगोलातील मोटारसायकलचा खेळ श्वास रोखून पहायचा आणि एखादी कुल्फी खाऊन अतीव आनंदात घरी येऊन झोपून जायचं हा आणि एवढाच गणेशोत्सव माझ्या मनात असायचा. माझ्या मनातली गणेशोत्सवाची कल्पना आजही तिच आहे.

श्रद्धा, भक्ती, दर्शन वैगेरे कठिण शब्द तेंव्हा आसपासही नव्हते आणि म्हणून कदाचित लहानपणातले गणपती आनंद घेऊन यायचे अस मला आता समजत्या वयात वाटत. पाहाणं सहज असतं, दर्शन म्हटलं की मग इतर व्यवधानं आपोआप येतात. तेंव्हा पाहाणं असायचं, आता दर्शन घेणं..!!

लालबाग आणि सार्वजनिक गणपती याचं नातं पार अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासूनचं असलं तरी, त्याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली, ती गणेश गल्लीच्या गणपतीपासून. या मंडळाने पंचवीस-एक वर्षांपूर्वी, मला आठवत, २२ की २३ फुट उंचीची गणपतीची मूर्ती बसवली आणि लालबाग सर्व देशभरात मशहूर व्हायला सुरुवात झाली. तेंव्हा लालबागचा गणपती म्हणजे गणेशगल्लीचा गणपती अस समीकरण रूढ होऊ लागलं आणि हा गणपती पाहायला उभ्या देशातून हवशे नवशे गवशे येऊ लागले, गर्दी वाढू लागली आणि हळू हळू लालबागचे प्रसिद्ध गणपती सुप्रसिद्ध होऊ लागले. गणेश गल्लीचा गणपती पहायला येणारे, मग आजूबाजूचेही गणपती पहायला गर्दी करू लागले आणि मग लालबाग आणि सार्वजनिक गणपती आणि गर्दी याचं नात दृढ होऊ लागल. पुढे काही वर्ष गणेश गल्लीच्या गणपतीची उंची गाजत राहिली आणि मग मुंबईतल्या इतर मंडळांनीही त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली आणि मुतीची उंची ही सामान्य बाब झाली आणि उंचीचं कौतुक ओसरलं. इथून पुढे मंडपात उघड्यावर असलेल्या मूर्ती जाड पडद्याआड बंदिस्त व्हायला लागल्या आणि मंडपांच्या समोर लांब रांगा लागायला सुरुवात झाली. इथेच गणपती ‘पाहणे’ संपून ‘दर्शन घेणे’ संज्ञा रूढ होऊ लागली. गणेश गल्लीच्या गणपतीच (गणेशगल्लीचा गणपती हल्ली ‘मुंबईचा राजा’ नांवाने ओळखला जातो.) कौतुक कमी झालं आणि मग अवतरला ‘लालबागचा राजा’. हा मात्र अजूनही आपल नांव आणि महाम्य टिकवून आहे. गणेशगल्लीचा गणपती

सध्या ‘लालबागचा राजा’ नांवाने सुप्रसिद्ध असणारा गणपती माझ्या लहानपणी लालबाग मार्केटचा गणपती म्हणून ओळखला जायचा. काही जुने लोक याला कोळणींचा गणपती म्हणूनही ओळखायचे. हा गणपती आता एक बडं प्रस्थ झालाय. ह्याच्या दर्शनाला देशभरातील मंत्री, उच्च सरकारी अधिकारी, चित्रपट-खेळातील बडी प्रस्थं आणि पार सातासमुद्रा पलीकडूनही लोक येतात. या व वर उल्लेख केलेल्या गणपतींचा इतिहासही तेवढाच रंजक आहे परंतू तो त्या त्या मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याने इथं दिलेला नाही. शिवाय या माझ्या लहानपणीच्या आठवणी असल्याने आणि लहानपण नेहेमी वर्तमानातच जगत असल्यानं, तेंव्हा इतिहास आणि भविष्य आसपासही नसायचे.

..आणि आता-

लालबागचे गणपती जसे देशभरात प्रसिद्ध होऊ लागले, तशी गर्दी वाढली आणि त्या गर्दीत लपलेला पैसा चलाख कार्यकर्त्यांच्या लक्षात आला, तसा गणपती बंदिस्त झाला. श्रद्धेने ‘पाहण्या’चं, पावती फाडून ‘दर्शन घेणं’ झालं. आणखी एक बदल घडला आणि तो म्हणजे गणपतीपेक्षा, मंडळाचा कार्यकर्ता नवसाला पावणं गरजेचं होऊ लागलं . तासनतास दर्शनाच्या रांगेत राहाण्यापेक्षा, मंडळाच्या एखाद्या कार्यकर्त्याकडे ‘वशिला’ लावून चुटकीसरशी दर्शन घेण्याचं प्रमाण वाढू लागलं. पूर्वी सरिव भक्त असायचे, त्यात आता व्हिआयपी आणि व्हिव्हिआयपी असा नवा उच्चवर्ग तयार झाला. आणखी एक ठळक बदल गेली काही वर्ष जाणवतो आणि तो म्हणजे सध्या सरळ, खट्याळ हसु चेहेऱ्यावर खेळवणाऱ्या ‘गणपतीं’च झालेलं नामकरण. पूर्वीचा गणपतीं, गणपतीच असायचा. त्याला आतासारखी नांव नसायची. तो तो गणपती, त्या त्या मंडळाच्या नांवाने ओळखला जायचा. गणपतींना राजा, महाराजा, युवराज, सम्राट वैगेरे उपाध्या-पदव्या देण्याची सुरुवात अलीकडे, म्हणजे साधारण विसेक वर्षांपूर्वी झाली असावी आणि याची सुरुवात, माझ्या आठवणीप्रमाणे, लालबागच्या राजापासून झाली.

लालबागच नव्हे तर मुंबईतल्या निरनिराळ्या लहान मोठ्या गल्ल्यांमधील गणपती आता राजा, महाराजा, युवराज, सम्राट अशी नांव धारण करू लागले आणि आपण पुन्हा संस्थांनी युगात पोचल्याच मला उगाचच वाटू लागल. बदलेल्या समाजच प्रतिबिंब, वर म्हटल्याप्रमाणे, अश्या पद्धतीने उत्सवात प्रतिबिंबित होऊ लागल. सार्वजनिक आणि खाजगी जीवनातला चाळीतला खुला मामला फ्लॅटात बंदिस्त झाला आणि गणपती पडद्याआड गेला, माणसं एकटी राहण्यात मोठेपणा मानू लागली तशी पूर्वीच्या गणपतीच्या सोबतची हलती चालती बावली अंतर्धान पावली. तासनतास दर्शनाच्या रांगेत उभं राहाण्यापेक्षा, ‘वशिला’ लावणं अधिक योग्य वाटू लागलं. दलालांना महत्व आलं. तेंव्हा श्र्द्धेला पावणारा गणपतीही ‘नवसा’च्या वशिल्याशिवाय (की लाचेशिवाय) पावेनासा झाला. गणपतीपेक्षा कार्यकर्ता मोठा झाला आणि सार्वजनिक जीवनात सार्वभौम लोकांपेक्षा लोकप्रतिनिधी मोठा झाला.

आपण सगळेच बदललो. आपलं जगणं बदललं. श्रद्धेच्या शुचितेच्या, प्रामाणिकपणाच्या व्याख्याही बदलल्या आणि मग आपले गणपतीही बदलले त्यात नवल ते काय? आपलं खाजगी जगणं उत्सवात प्रतिबिंबीत होतं, ते असं..प्रत्याक्षात काही करण्यापेक्षा केल्यासारखं करणं आणि त्याच्या कैकपटीने त्याचं मार्केटींग करणं महत्वाचं ठरू लागलं. सर्वच मंडळं सामाजिक कार्यात मदत करतात, भाग घेतात परंतू त्याची जाहिरात मात्र मोठी करतात. खरं तर उजव्या हाताने केलेलं डाव्या हातालाही कळू नये असं आपली संस्कृती सांगते. आता डावा हातच काय, पायाच्या नखापर्यंत ती बातमी कशी जाईल हे पाहिलं जातं.

पुढून देखणा दिसणारा नाचरा मोर, मागून तेवढाच किळसवाणा दिसतो हे आपण सारेच विसरत चाललोय याचंच प्रतिबिंबं आपल्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनात दिसतंय..!

कालाय तस्मै नम:..!!

– नितीन साळुंखे

9321811091

(सोबतचे फोटो केवळ त्याकाळातील गणपती कसे असत, ते दाखवण्यासाठी आहेत. फोटो नेटवरून घेतले आहेत.)