देवही ‘भावा’चाच भुकेला..

देवही ‘भावा’चाच भुकेला..

काल मुंबईतल्या एका प्रसिद्ध गणपती मंडळाच्या बाजुला एका कामानिमित्त गेलो होतो. तिकडच्या कार्यकर्त्यांपैकी बहुतेक सर्वच ओळखीचे असल्याने, तिकडे कधीही गेलो की कुणी न कुणी ओळखीचं भेटतंच. असाच एक मित्र कम कार्यकर्ता रस्त्यातच भेटला.

म्हणाला, “भाडं मारायचंय का?”.

माझ्या चेहेऱ्यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह उगवलं. ते पाहून पुन्हा म्हणाला, “म्हंजे दर्शन करायचंय का महाराजांचं?”.

ओळखीच्यांना शाॅर्टकटने राजाचं दर्शन घडवण्याच्या क्रियेला इथे ‘भाडं मारणं’ असा शब्दप्रयोग आहे हे समजलं. मौजही वाटली. अर्थात हे भाडं पैशांत घेतलं जात नाही तर ‘काॅलर टाईट’ करण्याच्या स्वरुपात घेतलं हे ही आवर्जून सांगायला हवं. ही त्यांची मानसिक गरज आहे कारण गणपतीचे दहा दिवस ते इकडचे खरे ‘राजे’असतात, उरलेले ३५५ दिवस त्यांना घरचंही फारसं कुणी विचारत नसावं..! हे दहा दिवस जगण्यासाठी हे कार्यकर्ते वर्षाचे उरलेले ३५५ दिवस जगत असतात.

मी म्हणालो,”नाही रे. मी सहजच आलोय. आता भेटलाच आहेस तर चहा घेऊ.”

“बरं..पण इथे येऊन दर्शन घेतलं नाही तर वाईट दिसेल” तो काहीश्या नाराजीने म्हणाला. मी म्हटलं, “कुणाला वाईट दिसेल? मला तर काहीच विशेष वाटत नाही. गणपतीला तर सामान्य माणसाला दर्शन न दिल्याचं वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही. उलट जे सामान्य अगोदरच बारा-पंधरा तास लायनीत ताटकळत उभे आहेत, ते तर लायनीतला एक माणूस कमी होतोय म्हणून दुवाच देतील ”

“मला वाईट वाटेल” तो म्हणाला.

आमचा स्वभाव दुसऱ्याचं मन दुखवण्याचा नसल्याने, आम्ही नको असलेल्या अनेक गोष्टी नाहक गळ्यात अडकवून घेतो. दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही, मग आपल्या मनाचे तुकडे झाले तरी चालतील, ही शिकवण असल्यामुळे त्याने पाजलेल्या ‘चा’ला जागून म्हटलं, “चल जाऊ, पण चटकन बाहेर पडता आलं पाहिजे असं काहीतरी कर”.

असं म्हटल्यावर त्याला चा चढल्यासारखा उत्साह आला आणि मला घेऊन तो त्या गल्ल्या गल्ल्यांच्या खुष्कीच्या मार्गाने निघाला. त्या प्रचंड गर्दीतून त्याच्या मागे जाताना माझी भंबेरी उडत होती. अनेक बाया-बापडे त्या परिसराच्या राजाच्या दर्शनासाठी कुणाकुणाची काकुळतीला येऊन विनंती करत होते. ह्यात बायांचं प्रमाण अंमळ जास्तच होतं. त्यातल्या बऱ्याचश्या बाया सोबत नकावड्या पोरांना घेऊन होत्या. लेकराला राजाच्या पायावर घालायचंय म्हणून घुटमळत होत्या. पोर मोठं होऊन शहाणं व्हावं असं या नव आयांना का वाटत नव्हतं कुणास ठाऊक. आता मी मागेही फिरू शकत नव्हतो. इथं एकवेळ आत शिरणं सोपं, परंतू परत फिरणं अत्यंत अवघड. देवाचा मार्ग असाच असतो की काय हे समजत नाही. चक्रव्युहात शिरलेल्या अभिमन्यूची जी काही अवस्था झाली असेल, तिच अवस्था त्या चिंचोळ्या गल्ल्यांच्या गुंत्यात शिरलेल्या माझी झाली होती.

एकदाचे आम्ही अगदी राजाच्या महालापाशी पोचलो. “हा बघा समोर राजा” मित्र म्हणाला. समोर पाहातोय तो वर भव्य सोनेरी मुगुट व खाली लायनिने सर्वांचे निरनिराळ्या आकाराचे पार्श्वभाग. मला हे दृष्य कळायला थोडा अवधी लागला. देवाच्या दरबारात असाही मेंदूचा आणि मनाचा संबंध काही काळ तुटतोच. दोन-चार सेकंदात पुन्हा माझा मेंदू आणि मनाचं कनेक्शन पूर्ववत झालं आणि लक्षात आलं, की राजाच्या दर्शनाला आलेल्या काही व्हिव्हिआयपी लोक व त्यांचं कुटुंब स्टेजवर राजाकडे त्यांचं मुख आणि आम जन्तेकडे पार्श्वभाग करुन राजाला मनोभावे पाहात होते. राजाच्या मुखदर्शनासाठी खाली उभी असलेली ‘मॅंगो जन्ता’ त्यांचे पार्श्वभाग पाहात मनोभावे हात जोडीत होती.

व्हिव्हिआयपी खासदार साहेब असल्याने, त्यांच्या सारखे लोकप्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबियांचा पार्श्वभाग हाच देव, असं समजण्याची आपल्या जनशाहीतल्या जन्तेला सवय असल्यानं, त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. ‘जन्त(ा)’ आणि पार्शवभाग याचा असाही संबंध असतोच, याचा पुन्हा एकदा नव्याने साक्षात्कार मला तिकडे झाला आणि मी ही समोरच्या त्या दृष्याला मनोभावे नमस्कार करता झालो.

मी ही ते दृष्य पाहात उभा होतो. खासदार साहेब आणि त्यांचं व्हिव्हिआयपी कुटुंबिय स्टेनगनच्या पाजळत्या पाहाऱ्यात परत जायला निघाले आणि एकदम आकाश मोकळं व्हावं तसं राजाचं विराट आणि प्रसन्न दर्शन झालं. आता दोन मिन्टांत स्टेजवर जाऊन राजाच्या पगे लागणं होणार म्हणून सर्वांनी बाप्पाचा एकदम जयजयकार केला.

एवढ्यात बाप्पाचा २० बाय २० बाय २० फुटाचा दरबार एकदम मोकळा करण्यात आला. कोणीतरी आणखी एखादा व्हिआयपी येण्याची चाहूल लागली आणि इथे खाली उभ्या असलेल्या आम जनतेचा जीव परत टांगणीला लागला. अर्थात तेवढंच. नेहमीच्या जिवनातही पदोपदी जीव टांगणीला लागण्याची सवय असल्याने आणि ‘सबुरी’ महत्वाची असं सांगितलेल्या एका प्रसिद्ध सिद्ध पुरुषाच्या वचनावर ‘श्रद्धा’ असल्याने, त्याचं कुणाला काही वाटलं नाही. असंही मध्यमवर्ग ‘टांगलेला’च असतो. सवय असतेच आम्हाला शिखंडीपणाची. असो. दरबारातील (पक्षी:स्टेजवरील) सर्व मानकऱ्यांनी एकदम खडी ताज़ीम दिली. ललकाऱ्या घुमल्या आणि भारताच्या मुंबई विभागाचे आयकर आयुक्त व त्यांचं देखणं कुटूंब राजाच्या दरबारात लीनपणे दाखल झाले. आयुक्त राजासमोर, मंडळाचे पदाधिकारी त्यांच्यासमोर आणि खालचे आम्ही सारे त्या सर्वांच्या पार्श्वभागासमोर मनोभावे हात जोडून उभे राहिलो. आम्हाला ही सवय होतीच, आहेच..! मनात विचार आला, की हा माणूस देवाकडे काय मागत असेल किंवा काय भावनेनं तो राजाच्या दरबारात आला असेल म्हणून, की बाबा भरपूर दिलंस. वरनं दिलंस तसं त्याहीपेक्षा कितीतरी पटीने भरपूर खालनं दिलंस, त्याचे आभार मानत असेल..! मला उत्तर सापडेना.

नोटबदलीचे किंवा कोणत्याही सरकारी योजनेचे फायदे तोटे हा आम्ही खाली त्या आयुक्त-कार्यकर्त्यांचे सुबक पार्श्वभाग पाहात उभे असलेल्या जन्तेच्या निष्फळ फेसबुकी चर्चेचा विषय. सरकारशी समरस झालेल्यांना त्याचे फायदे दिसतात आणि सरकारच्या विरोधकांना तोटे..! वरती उभे असलेल्या त्या कार्यकर्त्या-आयुक्तांना सरकारने काही केलं तरी फायदाच. परवाच एक ओळखीचे सीए आनंदाने उचंबळून सांगत सांगत होते की, हे सरकार भारीच काम करतंय. ह्या सरकारने कायदे एवढे कडक केलेत, की पूर्वी जे काम पन्नास हजारात व्हायचं, तिकडे हल्ली पांच लाख द्यावे लागतात म्हणून. मलाही कडक नियमांचा अभिमान वाटला. राजाच्या दरबारात उभे असलेल्या त्या सर्व व्हिव्हीआयपींचे विविध आकारांचे रंगीत पार्श्वभाग पाहाताना मला सीएंसोबतचा तो संवाद आठवून भरून आलं होतं. देवांचं आणि व्हिव्हिआयपींचं मेतकूट पाहून बरं वाटलं. देवही ‘भावा’चा भुकेला असतो, हे कुठल्यातरी जुन्या ग्रंथात वाचलेलं जुनाट वचन आठवलं;भाव या शब्दाचा आताच्या काळातला संदर्भही स्टेजवरचं दृष्य पाहून उगाचंच आठवल, पण तो क्षणात झटकून टाकून भान हरपून टाकून पुन्हा नतमस्तक झालो.

पुढे बऱ्याच दिव्य व्हिआयपींचे भव्य पार्श्वभाग आणि राजाच्या मुकुटाचं दर्शन खालून झाल्यावर एकदाचं राजाच्या स्टेजवर पोचलो. राजाच्या पायावर आपोआप डोकं धाडकन आपटलं गेलं आणि मी आपोआप बाहेरही फेकला गेलो. तासंतास व्हिआयपींचे पार्श्वभाग पाहात ताटकळल्यानंतर क्षणात देवाचं दर्शन घडून मी तेवढ्यात बाहेरही आलो हा चमत्कार कसा घडला हेच कळेना. मी त्या देवासमोर नतमस्त झालो. कपाळावर कुंकवाचा मळवट भरून धन्य होऊन घरी आलो. टिव्हीवर बातमी होती की कुठल्यातरी उच्च अधिकाऱ्याला गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली म्हणूनची. वास्तवीक देवाच्या दरबारात झालेली मारझोड हा प्रसाद असतो हे लहानपणापासून ऐकलेलं. आम जनता तावातावाने इंटरव्ह्यू देत होती की माजोरड्या मंडळावर कारवाई केलीच पाहिजे म्हणून. मला मात्र राजाच्या दरबारात त्याच्या चरणी ‘भाव’पूर्णतेने लीन झालेले, मी मगाशी पाहिलेले ते व्हिआयपी पार्श्वभाग पुन्हा पुन्हा आठवून, आता त्या अधिकाऱ्याला बदलीचा प्रसाद नक्कीच मिळणार याचा खात्री वाटू लागली.

अरे हो. एक सांगायचंच राहिलं. बाहेर आलो आणि आणखी एक ओळखीचा भेटला. बेवडा, फाटका हे गुण आणि कमालीचा प्रामाणिक हा दुर्गूण अंगात असलेला मॅंगो माणूस. टोप्या विकत होतां. १० रुपयाला एक टोपी.

मी त्याला विचारलं, “किती कमवतोस?”

तो म्हणाला, “साहेब शंभरेक मिळतात चार-पाच तास मेहेनत केल्यावर”.

मी म्हटलं “अरे तू नोकरी करतोस ना?”

“हो”, तो म्हणाला “पन वर्षभर पगार मिळालेला नाय” दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारा तो फाटका माणूस पुढे आनंदाने म्हणाला, “साहेब, पन आमच्या साहेबाने हल्लीच पन्नास लाखांची नवी कोरी फारचुनर गाडी घेतलीय. मीच पुसतो ती”. साहेबीने घतलेल्या पन्नास लाखांच्या गाडीसमोर त्याच्या वर्षभराच्या लाखभर रुपयांच्या पगाराची पत्रास ती काय, हे सत्य त्याला दरबाराच्या परिसरात उमगलं होतं.

अनेकांच्या मेहेनतीच्या पैशावर हात मारत मोठा होऊ पाहाणाऱ्या त्याच्या साहेबाला मी ही (चांगलाच)ओळखतो म्हणून त्याने मला गाडीची माहिती सांगितली. काही वेळापूर्वी हाच त्याचा साहेब आपली शेलाटी बायको आणि तगड्या मुलासोबत राजाच्या दरबारात व्हिआयपी म्हणून आम्हाला त्याच्या व फॅमिलीच्या दिव्य पार्श्वभागाचं भव्य दर्शन धडवून गेल्याचं मी पाहिलं होतं. तो लीन झालेला आणि राजालाही त्याला कुरवाळताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता.

वाचलं होतं आणि म्हणून वाटलंही होतं की देवाच्या दरबारात राव रंक सर्व सारखे म्हणून. पण नाही, हल्लीचे देवही प्रदुषित झालेत. इथे जेवढा लुटारू राव मोठा, तेवढा देवाच्या थेट मांडीवर. बाकीच्यांनी मात्र त्यांच्या xxवर समाधान मानायचं. आम जन्ता त्याच लायकीची. हल्लीचा देवही ‘भावा’चाच भुकेला असतो..।

©️नितीन साळुंखे

9321811091

2 thoughts on “देवही ‘भावा’चाच भुकेला..

  1. खरंतर जनतेनेच ठरवलं पाहिजे की एका ठिकाणी दर्शनासाठी थांबायचे की नाही. आपली भाबडी आणि देवभोळी मानसिकता ह्या वृत्तीला खतपाणी घालते.

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s