गुजराती पद्धतीचा पदर..

असा पदर पदर,

कुयरी नि मोराचा..

दिसे भर्जरी साजरा,

#गुजराती पद्धतीचा..!!

माझं बऱ्याच लग्नसमारंभातून, सोशल गॅदरींगमधून किंवा अशाच काही विशेष घरगुती सोहळ्यांना जाणं होत असतं. बऱ्याच वर्षांपासून मला असं दिसतं की, अगदी फेटेबंद मराठमोळा असलेल्या या कार्यक्रमातून बऱ्याच कुमार-तरुण ललना मला गुजराती पद्धतीची साडी नेसून दिसतात. काही ठिकाणी तर नववधु किंवा सत्कारमु्र्ती असलेली स्त्री ही गुजराती पद्धतीची साडी नेसलेली आढळते. अर्थात त्यांनी कुठल्या पद्धतीची साडी नेसावी किंवा वेष परिधान करावा, हा त्यांच्या त्यांच्या आवडीचा विषय असतो हे मला मान्य आहे. तरी पण गुजराती पद्धतीच्याच साडीचा या स्त्रीयांना इतका सोस का, दक्षिणेकडच्या किंवा ओरीसा-मणिपुर अशा देशातल्या इतर प्रांतातल्या साड्यांचा का नाही, हा प्रश्न मला पडायचा. नाही म्हणायला कोणत्याही वयाच्या काही कन्यका (बायकांना वयाचं बंधन नसतं, म्हणून सर्व कन्यका) पंजाबी पद्धतीचा लेहेंगा-शरारा, वेस्टर्न पद्धतीचे कपडे, घातलेल्याही दिसतात, पण ही मराठी नसलेली वस्त्र मला त्या मराठी कार्यक्रमात वेगळी वाटत नाहीत. मराठी कार्यक्रमातली गुजराती पद्धतीची साडी मात्र, का कोण जाणे, पण मला थोडीशी खटकते..!!

ह्याचं उत्तर कुणाला विचारावं हा प्रश्नच होता. पुरुषांना विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांना एखाद्या स्त्रीने कुठली साडी नेसली, याच्याशी काहीच कर्तव्य नसतं. ते तिला बघण्यातच मग्न असतात. कशीही असली तरी ते स्त्रीकडे पाहाण्याचा निसर्गाने नेमून दिलेला आपला आपद्धर्म मनोभावे पाळत असतात. स्त्रीयांना विचारावं तर, आज काय एकदम पदरावर घसरलात ते, असं नाहक ऐकून घ्यायची तयारी ठेवावी लागणार. तरीही रेटून उत्तर शोधण्याची थोडी चिकाटी दाखवली तर #MeToo च्या यादीत येण्याची दाट शक्यता.

मग मी आपला चुकला फकीर न्यायाने बायकोकडे (स्वत:च्याच) मोर्चा वळवला. लग्न समारंभात अथवा सोशल गॅदरींग्समधे हल्ली स्त्रीया गुजराती पद्धतीने साडी का नेसतात, या मला पडलेल्या कोड्याचं तिने दिलेलं उत्तर पटण्यासारखं होतं. हेच उत्तर आणखीही एक दोन नात्यातल्या महिलांनी दिलं. साडीचे दोन मुख्य भाग असतात. एक अंग आणि दुसरा म्हणजे पदर. पाहाणारीला (प्रश्न पाहाणारीचाच असतो. आठवा ती जाहिरात, ‘मेरी साडीसे उसकी साडी सफेद कैसे’ वाली. पाहणाराला चेहेरा पुरेसा असतो.) साडीचं बुट्टी, कोयरी किंवा आणखी काही नक्षी असलेलं अंग कुठुनही पाहिलं तरी दिसतं, पण पदराचं तसं नसतं. पदर हा साडीचा खास कलाकुसर केलेला भाग. साडीची मजा या पदरातच (साडीच्याच हो..!) असते व ती दिसण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी म्हणा, पदर फुलवलेला असणं आवश्यक असतो. आपल्या मराठी पद्धतीचा पदर डाव्या खांद्यावरून मागे एकजूट होऊन लटकत असतो आणि मग तो पदरावरचा जरतारीचा मोर व त्याचा फुलवलेला पिसारा पदराच्या मागे लटकणाऱ्या घड्यांमधे पार लपून त्याची लांडोर होऊन जाते. असं झाल्याने कोणी साडीचं व नेसणारीचं कौतुक करत नाही व सर्व खटपट (आणि साडीचे पैसेही) वाया गेल्यासारखं वाटतं. तशी आपल्या पद्धतीच्या साडीच्या पदरावरची कलाकुसरही दिसू शकते, पण मग तो डाव्या मनगटावर आडवा धरून ठेवावा लागतो किंवा शालीसारखा मागून पाठभर पांघरून घ्यावा लागतो. हे दोन्ही तसे उपद्व्यापाचेच प्रकार.

गुजराती पद्धतीच्या साडीचा पदर उजव्या खांद्यावरून पुढच्या बाजुला घेतल्याने व त्याचा एक शेव कंबरेच्या डाव्या बाजूला खोतून ठेवता येतो. त्यामुळे पुढून अंगभर पसरलेला पदर आणि त्यावरचा जरतारीचा मोर किंवा कलाकुसर कुणालाही दिसू शकते. आपल्याकडे कोण कोण पाहातंय, हे हा समजू शकतं. पुन्हा हा पदर सारखा सावरण्याची आपल्या पद्धतीच्या साडीसारखा खटाटोप नसतो, हा एक अन्य फायदा. समारंभात गुजराती पद्धतीची साडी नेसण्याचा सारा अट्टाहास हा ‘पदरावरचा जरतारीचा मोर साजरा हवा. शिवाय तो दिसराही हवा’ ह्यासाठी असतो, मला माझी पत्नी व इतर स्त्रीवर्गाकडून मिळालेलं उत्तर मला पटलं.

तरी या शंकेने माझ्या जागं झालेल्या कुतुहलाला पुढचा प्रश्न पडलाच;की गुजराती आणि मराठी पद्धतीच्या साडी नेसण्यात एवढा १८० अंशाचा फरक का? आता तुम्ही म्हणाल की, गुजराती साडीच का, आपल्या विविधतेने नटलेल्या देशात तर साडी हे वस्त्र अनेक पद्धतीने परिधान केलं जातं, त्यांचा विचार का करु नये?

प्रश्न अगदी रास्त आहे. आपल्या नाना जाती आणि त्यानुसार परंपरा असलेल्या देशात, बहुसंख्य प्रांतातल्या बहुतांश स्त्रीयांची मुख्य वेशभुषा साडी आहे. ती नेसण्याच्या पद्धतीत मात्र प्रचंड वैविध्य आहे. त्या त्या प्रांताच्या हवामानानुसार, कामाच्या प्रकारानुसार वस्त्र आणि अन्न यात वैविध्य आहे. पुन्हा त्या त्या प्रांतातल्या पोटभेदानुसार त्यात पुन्हा विविधता आणलीय. जातीभेदाचे असंख्य तोटे आपण सोसलेत व अजुनही सोसतोय, पण वेश, भाषा आणि खाणं यांत मात्र प्रत्येक जातीने वेगळेपणा आणलाय हे मान्य करायला हवं. जात-प्रांत-पंथ-धर्म यानुसार बनलेल्या वा बनवलेल्या अन्न-वस्त्रादी प्रथा-परंपरांनी आपली हिन्दू संस्कृती विविधतेने समृद्ध केली आहे, यात मला तरी शंका नाही. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी आणि तेवढीच आकर्षक. परंपरांकडे कुतुहलाने पाहाणाऱ्या माझ्यातल्या हुडक्याला हे आश्चर्याचं वाटतं. मी मुंबैकर असल्याने गुजराती साडी दिवसाच्या कोणत्याही प्रहरी आणि कुठेही सतत दिसत असते. म्हणून तर मला आपण, म्हणजे महाराष्ट्रीय स्त्रीया (यात कुशल बद्रीकेही आला हो) आपल्या मराठी पद्धतीने साडी नेसताना, ती कंबरेभोवती घड्याळाच्यी उलट दिशेने गुंडाळून पदर डाव्या खांद्यावरून मागे सोडतात. तर गुजराती स्त्रीया नेमकी उलट क्रिया करतात, ते का हा प्रश्न पडलां. इतर प्रांतातल्या साड्या किंवा वस्त्र हा ही माझ्या कुतुहलाचा विषय आहे आणि मी त्याचाहा अभ्यास करणार आहे, पण तो पुढे. तूर्तास गुजराती साडी समोर आहे.

समारंभतली गुजराती साडी व तिच्या पदराचं उत्तर तर मिळालं. तरी पुढचा प्रश्न, ती आपल्या पद्धतीच्या साडीच्या उलट का नेसतात, याच्या उत्तराच्या शोधात निघालो. अनेक स्त्रीयांना या बद्दल विचारलं, फॅशन डिझायनर्सना विचारलं. बहुतेकांनी त्यांना त्याची कल्पना नसल्याचं सांगितलं. अनेकांनी ‘तशी परंपरा आहे’ असं उत्तर दिलं. पण परंपरा काही उगाच पडत नाही, त्यामागेही काही कारण असतं, असं मी सांगितलं असता, ‘तसं काही कारण असल्यास माहित नाही’ असं सांगितलं. काहीनी हवामानामुळे असेल असं सांगितलं. ते काहीसं बरोबर असावं असं मला वाचलं, पण समाधानकारक वाटलं नाही.इंटरनेटवर शोध घेतला, पण तिथेही काही सापडेना. मग शेवटी तर्काचा आधार घेऊन गुजराती पद्धतीची साडी आपल्या उलट का नेसतात, याचं तर्कसंगत उत्तर शोधायचा प्रयत्न केला.

साडीचा जन्म अंतरीय आणि उत्तरीय या वस्त्रातून झालाय. अंतरीय म्हणजे कंबरेपासून खाली नेसायचे वस्त्र आणि उत्तरीय म्हणजे कंबरेच्यावर दोन्ही खांद्यांवरून दोन बाजुने पुढे घेण्याचे वस्त्र. हे उत्तरीय काही लोक नुसते खांद्यावरही ठेवत. आजच्या पंजाबी ड्रेसची ओढणी हा उत्तरीयाचाच प्रकार. पुरुषांसाठी असलेल्या अंतरीय आणि उत्तरीय या दोन वेगळ्या वस्त्रांचा मिलाफ होऊन ते साडी नांवाच्या एकवस्त्रात रुपांतरीत झालं असावं. सुरुवातीला स्त्रीया वक्षभाग झाकण्यासाठी काही घालत नसाव्यात, असं अनुमान प्राचीन शिल्प किंवा चित्रावरून काढता येतं. आता आता पर्यंत काही प्रांतांत किंवा जमातींत त्यांच्या त्यांच्या समजुतीनुसार स्त्रीयांनी चोळी घालायची पद्धत नव्हती. पुढे कधीतरी स्त्रीयांचा वक्षभाग झाकण्यासाठी त्यात स्तनपट्टची भर पडली असावी (अनेक स्थित्यंतरातून जाऊन ह्याचंच रुपांतर पुढे आताच्या ब्लाऊज नामक वस्त्रात झालं असावं. ‘चोळी ते ब्लाऊज’ ह्या प्रवासावर मी एक स्वतंत्र प्रकरण लिहितोय). अंतरीय आणि उत्तरीय एक होऊन साडी जन्माला आली.

साडीचा मुळ मुख्य उद्देश स्त्रीयांची पाठ आणि पोट दिसू नये हा होता. पोट, विशेषत: बेंबी दिसणं हा त्याकाळात अशिष्टपणा मानला जायचा, असं मी कुठेसं वाचलं होतं. थोडंसं विषयांतर करतो. मला आठवतंय, मी तरुण असताना(अजुनही आहे) स्त्रीयांमधे साडी बेंबीच्या खुपच खाली नेसण्याची आणि ब्लाऊज खुपच वरती घालण्याची फ्याशन आली होती. ब्लाऊज इतका वर, की तो परिधान करणाऱ्या ललनेने रस्त्यात दूर दिसलेल्या कुणी ओळखीच्या/चीला हात वर करुन ‘हाय’ केलं, की त्या ब्लाऊजने जो झाकायचा, नेमका तोच ऐवज बाहेर पडायचा आणि ते दृश्य पाहाणाऱ्या रस्त्यावरच्या इतरांना ‘हाय-हाय’ करायची पाळी येते की काय, असं वाटावं. आणि साडी इतकी खाली की असं वाटाव, जर भगवंताने स्त्त्रीयांना कंबरेचं ते विशिष्ट वळण दिलं नसतं, तर ती बहुदा खालीच घसरली असती. ब्लाऊज आणि साडी यातील या वाढत्या दुराव्यामुळे बायकांची पोटं आणि पाठ सताड उघडी पडत असे. त्याकाळी अशा ब्लाऊजचं नामकरण ‘पो.टि.मा.’ (पोटावर टिचकी मारा आणि साडीचं नामकरण ‘बें.टि.मा.) असं गंमतीनं करण्यात आलं होतं. त्यावेळच्या दिवाळी अंकांतून या प्रकारांची खिल्ली उडवण्यासाठी झालेलं भरपूर लिखाण मी वाचलेलं मला अजुनही जसच्या तसं आठवतं. एका अंकात तर लिहिलं होतं की, जर ब्लाऊजचं रोड होत जाण्याचं प्रमाण असंच राहिलं तर, भविष्यात गळापट्टी आणि दो दंडांवरचे दो काठ येवढाच प्रकार ब्लाऊज म्हणून अस्तित्वत राहील. सध्याची स्री वर्गातली ‘कोल्ड शोल्डर’ची फ्याशन पाहून मला २५ वर्षांपूर्वी वाचलेलं ते वाक्य सतत आठवतं. असो. विषयांतर समाप्त. तर, साडीनामक वस्त्रात पाठ आणि पोट व्यवस्थीत झाकली जाण्याची सोय होती. तशी ही सोय आपल्या देशातील स्त्रीयांच्या सर्वच वस्त्रात होती व आहे (आपण ती गावंढळपणाची व आऊट डेटेड वाटल्याने वापरत नाही, ही बाब अलाहीदा).

गुजरातचा काही भाग वाळवंटी असला तरी, हा तसा दुधाचा अभिषेक मागणाऱ्या सोमनाथाचा आणि दह्या-दुधाची चोरी करणाऱ्या कृष्णाचा प्रदेश. दुधा-दह्याने समृद्ध असलेल्या या प्रदेशातील स्त्री-पुरुषांच्या अंगी लागलेलं ते दुध-दही सहज दिसतं. गुजराती लिपी जशी गोलाई असलेली आहे, तशाच तिथल्या ललनाही. तरुणपणी शिडशिडत असलेल्या बहुतेक गुर्जर कन्यांच्या काही ठराविक वयानंतर, त्यांच्या शरीरवर हवा तिथं आणि नको तिथही त्यांनी खालेल्या दह्या-दुधाचा परिणाम(परिणाम या शब्दाच्या अगोदर ‘सु’ किंवा ‘दु’ लावणं हे आपापल्या दृष्टीकोनावर ठरवावं) दिसू लागतो. शरीराच्या काही ठिकाणी आवश्यक आणि काही ठिकाणी अनावश्यक गोलाई घेतलेलं मागचं-पुढचं क्षेत्रफळ सहजतेने दिसू नये, यासाठी ही पुढे पदर घेण्याची प्रथा पडली असावी की काय, अशी सहज शंका मला येते. पुढच्या बाजुला पदर घेताना, त्या पदराचा मागे रुळणारा भाग नितंब झाकण्याचं काम करतो व पुढचा पदर पोट आणि वक्षस्थळाला अगदी सहजपणे पडद्याआड ठेवतो, हे मात्र खरं. मराठी पदरातही ही सोय आहे, पण गुजराती पदराएवढी सहज नाही..!

पुन्हा गाई-म्हशींच्या गोठ्यात किंवा खेतरमधे (गुजरातेत शेताला खेतर म्हणतात) उकीडवं बसून काम करताना, पदर मागच्या बाजूने गुरांच्या शेणा-मुतात किंवा चिखलात लडबडब नये, अशीही दृष्टी अशा पद्धतीच्या साडीची परंपरा पाडणाऱ्यांमधे असू शकते..! आपल्या पद्धतीच्या नऊवारी वा सहावारी साडीत पदर मागे असल्याने, गोठ्यात किंवा शेतात काम करताना तो कंबरेकडे पुढे घेऊन खोचावा लागतो. स्त्री असो की पुरुष, नित्याची कामं करताना अडचणीची होऊ नयेत आणि चालताना गतीला बाधा येऊ नये, अशीच सर्वांची वस्त्र परंपरेने डिझाईन केल्याचं दिसून येतं. कोळणीच्या साडीचा घट्ट कासोटा तिला पाणथळ जागी उकिडवं बसून काम करताना अडचण होऊ नये याचसाठी असतो. गुर्जर स्त्रीयांची साडी आणि त्यांच्याकडची कामं, ह्यामागेही हे तत्व आहे, असं म्हटलं तर चुकू नये..!

दुसरा तर्क असा की, गुजरातवर बराच काळ मुस्लीम शासकांचं राज्य होतं. या काळात शासकांची संस्कृती-पद्धती व त्या प्रदेशातील मुळ संल्कृती व पद्धती यांचा मिलाफ होऊन तिसरीच वेगळी संस्कृती, प्रथा, परंपरा बनतात, हा अनुभव जगभरात सर्वत्र येतो. तसाच तो गुजरात-राजस्थान व काही प्रमाणात महराष्ट्रातही अनुभवायला येतो. मुसलमान शासकांच्या बुरखा पद्धतीकडून आपण डोक्यावरचा पदर, घुंघट किंवा गोषा घेतला. ज्या ठिकाणी मुसलमान शासक पोहोचू शकले नाहीत, तिथे डोक्यावरनं पदर घेण्याची किंवा घुंघट काढण्याची प्रथा नाही. गुजरातेवर बराच काळ मुसलमान शासन असल्याने गुजरात व त्या पलिकडील राजस्थानात पदर किंवा/वा घुंघट घेण्याची प्रथा पडली. गुजराती पद्धतीत उजव्या खांद्यावरुन पुढे येणारा पदर, आपल्या मागे जाणाऱ्या पदराच्या तुलनेत, चटकन डोक्यावर घेण्यास जास्त सोपा आहे. आपल्या पदराचा शेव मागे असल्याने, पदर डोईवर घ्यायचा असल्यास तो प्रथम मागून पाठीवरून घेऊन मग डोक्यावर घ्यावा लगतो व त्याचा शेवही पुढे घ्यावा लागतो. गुजराती पदर पद्धतीत पदर मागून पुढे येत असल्याने, त्या स्त्रीयांना फक्त त्या पदराचा मानेकडचा मागचा भाग डोक्यावर ओढून घेणं येवढी एकच क्रिया करावी लागते व कुणी परकं आल्यास पदर डोईवर घेण्यास सोयीचं होतं. गुजराती साडी नेतण्याची व पदराची पद्धत नेमकी आपल्या उलट का, याचा हा मला सुचलेला आणखी एक तर्क.

अर्थात त्या त्या प्रांतातली वस्त्र प्रावरणं कशी विकसीत झाली, हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. त्यासाठी त्या त्या प्रांततल्या साहित्य-संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल. गुजराती पद्धतीची साडी नेमकी तशीच (इथेही प्रांतानुसार भेद आहेतच)का नेसतात, यावरही तिकडे संशोधन झालंच असेल, परंतु मला गुजराती भाषा अवगत असली तरी ती बोलण्यापुरतीच असल्याने आणि ती मला नीट वाचता येत नसल्याने, गुर्जर साहित्य-संस्कृती मला अभ्यासता आलेली नाही. असं असलं तरी किमान या विषयाशी संबंधीत माहिती मिळवण्याचा माझा प्रयत्न यापुढेही असाच सुरु राहाणार.

स्त्रीयांच्या शरीराचा, त्यांच्या शरीरधर्माचा व समाजात त्या काळात अस्तित्वात असलेल्या लाजेच्या कल्पनांचा विचार करुन तयार केलेलं साडी हे वस्त्र मला अत्यंत आवडतं. अत्यंत ग्रेसफुल असलेल्या ह्या वस्त्रात काळानुसार काही बदल झाले असले तरी त्याची मुळ आखणी मात्र तिच राहिलीय. आपल्या देशातील कोणत्याही प्रांतातील कोणत्याही पद्धतीची व ती साडी नेसलेली स्त्री मला आकर्षकच वाटते, हे खरं. इथे गुजराती पद्धतीचा विचार केलाय एवढंच. गुजराती साडी तशीच का नेसतात, ह्याचा माझा शोध सुरुच राहाणार. त्याचं समाधानकारक कारण सापडत नाही तोवर मी बांधलेल्या ह्या तर्कांवरच मला समाधान मानावं लागणार..!

-©️नितीन साळुंखे

9321811091

फोटो आणि शीर्षक कविता इंटरनेच्या सौजन्याने.

नऊवारी लुगडं..

नऊवारी लुगडं..

‘लुगडं’ म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना जागृत होत असतील. कुणाला आजीच्या, आईच्या जुन्या लुगड्यापासून बनवलेल्या उबदार गोधडीची आठवण येईल, तर कुणाला आठवणीतल्या कुणाच्या तरी शालुरूपी लुगड्यावरील ‘पदरावरचा जरतारीचा मोर..’ उगाचंच अस्वस्थ करेल. मला मात्र लुगडं हा शब्द ऐकला की, नऊवारी साडीच डोळ्यासमोर येते. वास्तवीक नव्वार किंवा नऊवार हे कापडाच्या लांबीचं माप आहे, नेसायची पद्धत नाही. स्त्रीयांनी परिधान करायच्या पाचवारी-सहावारी साडीलाही लुगडं हाच शब्द आहे. परंतू माझी मात्र लुगडं म्हटलं की ते नऊवारीच अशी धारणा आहे. माझ्या मनातलं नऊवारी आणि लुगडं हे द्वैत, चितळे आणि बाकरवडी (हा शब्द नेमकी कसा लिहितात हे मला माहित नाही. त्यामुळे तुम्हाला हवा तसा उच्चार आपण करु शकता) सारखं अगदी पक्क आहे. बाकरवडी म्हटलं की चितळे आठवतातच, तसं लुगडं हा शब्द कुठेही कानावर पडला की मला नऊवारीच आठवते.

नऊवारी लुगड्याला जगात तोड नाही.. पाहाणाऱ्याच्या दृष्टीनुसार एकाच वेळी खानदानी शालीन आणि शृंगारीक मादक भावना जागृत करण्याचे सामर्थ्य या एकमेव महाराष्ट्रीय वस्त्रात आहे. कुठल्याही स्त्रीने नेसल्यावर अत्यंत देखण्या दिसणाऱ्या व सर्व काही झाकूनही स्त्री देहाची सर्व सर्व वळणं विलक्षण नजाकतीने दाखूनही तिला सुरक्षित वाटायला लावणाऱं नंऊवारी लुगडं हे एकमेंव वस्त्र. उगाच नाही महाराष्ट्रीय पैठणीला महावस्त्राचा मान मिळालाय. मऱ्हाठी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याचा नऊवारी लुगडं हा अविभाज्य भाग झालाय. नऊवारी लुगड्याशिवाय मराठी स्त्री मला तरी मऱ्हाठी वाटतच नाही. तशी नऊवारी लुगडी ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्येही नेसली जातात, परंतु आपल्या मराठी स्त्रियांच्या नऊवारी लुगडं नेसण्याच्या पद्धतीची नजाकत आणि सर त्यांना नाही.. माझे देवगड निवासी कविमित्र प्रमोद जोशींच्या शब्दांत सांगायचं तर,

एकमेव हे वस्त्र असे की,

दिसते सात्विक हरेक नारी!

या ओळीला यमक म्हणुनही,

किती शोभते बघ नऊवारी!

या साडीने मंचावरची,

देवघरातच दिसते बाई!

या साडीने नदीत साध्या,

दिसू लागते गंगामाई!

ठेवत नाही झाकुन सौष्ठव,

तरीही नजरा झुकती खाली!

भास असा की स्वर्ग सोडुनी,

स्वतः शारदा भूवर आली!

किती यथार्थ वर्णन आहे नाही?

महाराष्ट्रीयन पद्धतीने नऊवारी लुगडं नेसण्याच्या पद्धतीचं अनेक चित्रकार- शिल्पकारांना आकर्षण होतं, आहे. मराठी धाटणीचं लुगडं सर्वात सौष्ठवयुक्त आणि शिल्पात कोरायला आणि चित्रात उतरायला आव्हान देणारं आहे, असंही त्यांना वाटायचं. नऊवारी साडीचं ओटीपोटा जवळचं केळं, ओचा, निऱ्या, कासोट्याच्या पट्टीची रुंदी, दोन्ही पायांच्या टाचांपर्यंत समान नेसणं हे प्रमाण जिला जमलं, ती ललना दिसायला कशीही असु द्या, ती देखणीच दिसणार. आपल्या नऊवारी लुगड्याच्या देखणेपणाचं हिन्दू देव-देवतांना चेहेरा देणाऱ्या सुप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मालाही प्रचंड आकर्षण होतं. म्हणून तर त्याने रंगवलेल्या आपल्या देवता-अप्सरा बहुतकरुन नऊवारी लुगड्यात दिसतात. आज आपण पुजत असलेल्या बहुतेक देवी प्रतीमा ह्या मुळच्या राजा रविवर्माच्या कुंचल्याने जन्म दिलेल्या आहेत. सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या आजही आपण पुजत असलेल्या प्रतिमा मुळात राजा रविवर्माच्या कुंचल्यातून उतरलेल्या आहेत. या देवी चितारताना राजा रविवर्माने माॅडेल म्हणून एक सुंदर गोवेकरीण नऊवारी लुगडं नेसवून समोर बसवली होती, अशी माहिती डाॅ. अरुण टिकेकरांच्या ‘जन-मन’ या पुस्तकात मिळते. देवी म्हणून अप्रत्यक्षरित्या पुजनाचा मान मिळालेल्या या देखण्या गोवेकरणीचा, पुढे तिच्याच घरातील नोकराने कामवासनेपायी खुन केला, अशी माहितीही टिकेकर देतात. बाईपण देवीलाही सुटलं नाही.

नऊवारी लुगड्याच्या काष्टा पद्धतीमुळे देवघर, स्वयंपाकघर, माजघर, शेतघरातला रोजचा वावर ते थेट घोड्यावर मांड ठेकून रणांगण गाजवण्यापर्यंत ही काष्टा पद्धतीचं हे नऊवारी लुगडं अत्यंत सोयीचं आणि तेवढीच सुरक्षितही. राजा रविवर्माने चितारलेल्या द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगातली द्रौपदी नऊवारीत दिसते ती त्यामुळेच असावी. वस्त्रहरण करणाराना थोडेसे कष्ट पडून लज्जारक्षणार्थ कान्हा येई पर्यंत द्रौपदीची अब्रू रक्षणाचं काम या नऊवारीनेच केलं असावं. या नऊवारी लुगड्याच्या सुरक्षिततेचा येवढा विश्वास की, घरगुती कष्टकरी स्त्रीया ते इतिहासात होऊन गेलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराराणी इत्यादी त्याकाळच्या लढवय्या स्त्रीयांनी घोड्यावर मांड ठोकली, ती नऊवारी लुगड्यातच. आजही या नऊवारी लुगड्याची भुल कमी झालेली नाही. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत तरुण मुली आवर्जून नऊवारी लुगडं नेसताना दिसतात. आता घोडा गेला आणि बुलेट-अक्टीव्हा आली हाच काय तो फरक..!

महाराष्ट्राचं लोकगीत असलेल्या लावणीचा फड तर नऊवारीशिवाय कल्पनेतही पाहाता येत नाही. हे वाक्य लिहिताना माझ्या नजरेसमोर ‘फेरारी की सवारी’ या हल्लीच येऊन गेलेल्या चित्रपटातील लावणी सादर करणारी विद्या बालन आहें तुम्ही तुमच्या मनात बसलेली कोणतीही लावणी आणू शकता. नऊवारी लुगड्या शिवाय इतर साडीत लावणीची कल्पनाही करु शकत नाही.

नऊवारी साडीची उत्क्रांती नेमकी कुठून आणि कशी झाली ते सांगता येणार नाही, परंतू त्याच्या जोडीने येणारा आणि अस्सल मराठी वाटणारा ‘लुगडं’ हा शब्द मुळचा मात्र गुजरातचा. व्यापारानिमित्त सर्व दूर जाणाऱ्या गुजराथी व्यापाऱ्यांनी हा शब्द त्यांच्या सोबत आपल्या महाराष्ट्रात आणला आणि आपण त्यात किंचितसा बदल करुन, म्हणजे ‘लुगडू’चं ‘लुगडं’ करून, तो संपूर्णपणे आपलासा केला. गुजरातेत स्त्रियांच्या साडीलाच नव्हे, तर पुरुषाच्या धोतरालाही लुगडू असंच म्हणतात. किंबहूना पुरुषाच्या धोतरावरूनच स्त्रीयांच्या काष्टा असलेल्या साडीचा शोध लागला आणि तिलाही धोतराप्रमाणेच ‘लुगडू’ असं म्हणण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या उत्तर सिमेला लागून असलेल्या वलसाडी-वापी इत्यादी दक्षिण गुजरातेतल्या गुजराथी बायकाही आपल्यासारख्याच, परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने कासोट्याच्या साड्या नेसतात, ते लुगडं. माझ्या लहानपणी मुबईत माझ्या शेजारी राहाणारे बलसाड गावचे गुजराती त्यांचं वाळत घातलेलं धोतर शोधताना ‘मारू लुगडु क्यां गयु..’, असं त्यांच्या बायकोला विचारताना मी ऐकायचो, तेंव्हा मला भारी मौज वाटायची. हा माणूस धोतराला लुगडूं का म्हणतो, असा विचार तेंव्हा मनात यायचा, कारण माझ्या तेंव्हाच्या ठाम समजुतीप्रमाणे लुगडं म्हटलं की, ते नऊवारी असतं.

तो तसं का म्हणायचा, हे आता समजू लागलंय आणि त्यातून हे स्फुट साकार झालं. मी इथे नऊवारी लुगडं हा शब्द सर्वसाधारण म्हणून वापरला आहे. मराठी पद्धतीचं नऊवारी लुगडं नेसण्याच्या नउवारीत पण खूप प्रकार आहेत . ब्राम्हणी, कोळी, कुणबी, कोकणी, तमाशातील इत्यादी नेसण्याचे अनेक प्रकार आहेत याची मला माहिती आहे. तसंच नऊवारी साड्यांचेही चंद्रकळा, रास्ता, गुलाली, अंजिरी, रुद्रकाठी, पोफळी, धावडी, येवली, अमदाबादी, कर्नाटकी, नारायणपेठी, पैठणी, शालू इत्यादी अनेक प्रकार आहेत याचीही कल्पना आहे. या लेखात मला नऊवारी लुगड्याची माझ्या डोक्यातली समजूत काय, हे दाखवणं एवढाच मर्यादीत हेतू होता..!!

-नितीन साळुंखे

9321811091

संदर्भ-

‘जन-मन’ -डाॅ. अरुण टिकेकर १९९५

चित्र संदर्भ – इंटरनेट

स्त्रिला कामेच्छा आणि वासना असतात का?

स्त्रिला कामेच्छा आणि वासना असतात का?

त्रिला कामेच्छा आणि वासना असतात का, हा श्री प्रकाश सरवणकरांच्याएका ग्रुपवरील चर्चेत लोकांनी उपस्थित केलेला प्रश्न. याच प्रश्नाचा उपप्रश्न म्हणजे, त्या भावना असल्याच तर त्या पुरुषांइतक्या तीव्र असतात का, हा प्रश्नच मुळात अवघड. त्यात मी पुरुष. स्त्रिचा यातला नेमका काय अनुभव असतो ते मला कधीच कळणार नाही. स्त्रिमध्ये परकाया प्रवेश करुनच लिहायचा प्रयत्न करावा लागणार. जे खाली लिहितोय ते केवळ कल्पनेनं

स्त्री-पुरुष हे इतर कोणत्याही प्राणीमात्राप्रमाणे प्राणीच. भय, आहार, मैथुन आणि निद्रा या भावना सर्वच सजिवांमधे असतात, तद्वत त्या माणसांतही असतातच. स्त्रितही आहेत आणि पुरुषातही आहेत. माणसासहीत सर्व प्राणीमात्रांमधे कामभावनेची निर्मिती निसर्गाने वंशसातत्यासाठी केलेली आहे. निसर्गाने नेमून दिलेलं हे कार्य सर्व प्राणीमात्र कर्तव्य भावनेनं करत असतात.

भय, आहार, मैथुन आणि निद्रा हे सर्व प्राण्यांमधे समान असले तरी माणसामध्ये निसर्गाने एक जास्तीचा गुण दिला आहे आणि तो म्हणजे बुद्धी. बुद्धीमुळे माणूस प्राणी असुनही वेगळा ठरतो. जी कामक्रिडा प्राणी निसर्गावे नेमून दिलेलं विहित कर्तव्य म्हणून करतात, त्या कामक्रिडेत माणसाच्या बुद्धीने आनंद शोधला. पशुपक्ष्यांचा विणीचा हंगाम ठरलेला असतो व त्या हंगामाव्यतिरिक्त पशुपक्ष्यांमधे नर-मादीचं मिलन होत नाही. कुत्री भाद्रपदातच ‘तशा’ अवस्थेत दिसतात, इतर वेळी नर चुकुनही ‘त्या’ अर्थाने मादीच्या जवळ गेलेला पाहायला मिळत नाही. माणसांमधे मात्र कामक्रिडा हा वंश सातत्यासोबतच आनंदाचाही भाग असल्याने, माणसाची ही गंमत सतत सुरू असते. पुढे पुढे तर वंशसातत्य हा भागही दुय्यम झाला आणि सेक्सच्या आनंदाला महत्व आलं. सेक्स हा स्त्री आणू पुरुष अश्या दोघांच्याही आनंदाचा भाग आहे.

या विषयावर लिहू तेवढं थोडं असल्याने, मी थेट प्रकाश सरवणकर यांच्या एका गृपवर चर्चेला आलेल्या प्रश्नाकडे येतो.

स्त्रीला कामभावना असतात का, तर अलबत असतात. मग त्या पुरुषांइतक्या तीव्र असतात का, तर याचं उत्तर मला तरी देणं अवघड आहे. याचं उत्तर असतील किंवा असणार नाही यामधलं कुठलंही असू शकतं. पुन्हा ते प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळंही असू शकतं. मी या संदर्भातला माझा निरीक्षणातून तयार झालेला दृष्टीकोन, तो ही आताच्या काळाच्या संदर्भात, मांडण्याचा प्रयत्न करतो.

स्त्री पुरुषांच्या शरीराची भूक भागवण्यासाठी बहुतेक सर्वच मनुष्यात लग्न हा समाजमान्य विधी आहे. एक पाय पुराणकाळात आणि एक पाय अवकाशयुगात असलेल्या आपल्या भारतीय समाजाच्या संदर्भात तर तोच एकमेंव समाजमान्य मार्ग आहे. लग्नाची कल्पनाच मुळी शरीराच्या भूकेची पूर्ती व्हावी म्हणून आहे. आता लग्नपत्रीकेवर वापरात असलेला ‘विवाह’ हा शब्द पूर्वी सरळ सरळ ‘शरिरसंबंध’ असा थेट विषयाला भिडणारा वापरला जात असे, हे ह्या दृष्टीने लक्षात घेणं गरजेचं आहे. विवाहसंबंधात फक्त पुरुषाच्याच नव्हे, तर स्त्रिच्याही शरीर भुकेचा विचार केला गेलेला आहे. लग्न या संकल्पनेचा शोध, मनुष्य प्राणी आणि भटक्या टोळी अवस्थेतून संक्रमित होत शेतीच्या शोधानंतर स्थिर झाला त्यानंतर कधीतरी लागलेला आहे. शेतीचा शोधाने भटक्या अवस्थेतल्या मनुष्याला एका जागी स्थिर केलं, त्यातून कुटुंब व्यवस्था जन्मली आणि मालमत्ता निर्मितीमुळे ती घट्ट झाली. लग्नसंस्था अस्तित्वात येण्यापूर्वी आपल्या समाजात फ्रि सेक्स पद्धती होती. कुणीही कुणाबरोबर कितीही वेळ संग करू शकत असे आणि त्यातून निर्माण होणारी अपत्य ही त्या त्या टोळीची मालमत्ता असायची. स्त्री अपत्य निर्माण करते म्हणजे काहीतरी दैवी शक्ती तिच्या ठायी आहे असं समजून स्त्रीला ‘देवी’चं स्वरुप मानलं गेल्याचा हा काळ.. पुढे कालांतराने पुरुषाचा अपत्य निर्मितीतला सहभाग लक्षात आल्यानंतर हळू हळू पुरुष वरचढ होत गेला आणि त्यातून स्त्री आणि कुटुंब यावर त्याची मालकी प्रस्थपित होत गेली. अपत्य प्राप्तीसाठी एका स्त्रीने एका पुरुषाबरोबर एकनिष्ठ राहणे हळूहळू महत्वाचे होत गेले. इथून पुढे पुरुषप्रधानत्वाला महत्व येत गेलं आणि त्यामुळेच सहाजिकच पुरुषाचा इच्छेलाही. स्त्रिला गृहित धरणं सुरु झालं. तिच्यावर जबाबदाऱ्या लादण्यात आल्या, योनीशुचितेची आणि पातीव्र्यात्याची कल्पना रंगवण्यात आली व त्यातून तिच्यावर व्रत-वैकल्ये, उपास तपास इत्यादी थोपवण्यात आले. तिच्या सर्व इच्छांना पावित्र्याच्या मुलाम्याखाली बांधण्यात आलं.. यातून तिची कामेच्छाही सुटली नाही, तिही मर्यादीत करण्यात आली. किंबहुना ती मर्यादित करणे हाच मुख्य हेतू या मागे असावा.

असं का घडलं किंवा मी असं का म्हणतो, तर स्त्रिची कामेच्छा पुरुषांसारखीच असते, परंतु तिची सेक्स उपभोगण्याची क्षमता मात्र पुरुषापेक्षा जास्त असते म्हणून. स्त्री तिची इच्छा असो वा नसो, काम क्रिडेत भाग घेऊ शकते. तिची या बाबतीतला क्षमता अमर्याद आहे. ह्याच तिच्या क्षमतेने पुरुषाच्या मनात न्युनगंड निर्माण होऊन त्याने स्त्रिवा बंधनात ढकललं आणि पतिव्रता, योनीशुचितेच्या जाळ्यात अडकवलं. स्त्री-आणि पुरुषामध्ये या संदर्भात एक विषमता आहे, असं मी समजतो. वर्षानुवर्षाच्या संस्कृती बंधनात दाबली गेलेली आताची स्त्री पुरुषासारखी थेट सेक्सची मागणी करत नाही. तिला प्रेम महत्वाचं असतं. तिला फुलवणारा पुरुष हवा असतो, सेक्सपेक्षा फोर प्ले तिच्यासाठी जास्त महत्वाचा असतो व हे सर्व करणाऱ्या पुरुषासोबत ती मनापासून आणि कितीही काळ रमणाम होते. या उलट पुरूष थेट भिडणारा असतो. त्याला फोर प्लेमधे फार रस नसतो. त्याला फक्त पेनिट्रेटीव्ह सेक्समधेच जास्त रस असतो. इरेक्शन चटकन येतं, आपला कार्यभाग साधला की दोन मिनिटात ते जातंही. पुरुष हा ‘पुरष’ म्हणून एकावेळी फारतर ५-७ मिनिटं टिकतो, नंतर तो गलितगात्र होऊन जातो. तारुण्याची सुरुवातीची काही वर्ष सोडली तर एक सेक्स नंतर बराच काळ तो काम क्रिडेत भाग घेऊ शकत नाही. स्त्रीमात्र पुन्हा सेक्स साठी लगेच तयार असते.

स्त्रीचं आणखी एक असतं.. स्त्रीला चेतण्यासाठी बराच काळ लागतो व विझण्यासाठीही तेवढाच बराच समय लागू शकतो. पुरुषाचं हे अक्षरक्ष: क्षणिक पुरुषत्व व स्त्रीचं सेक्समधे कशाही परिस्थितीत एकाच खेपेत कितीही वेळा भाग घेण्याचं बलस्थान लक्षात घेऊन, पुरुषाने तिच्यावर बंधनं लादली. सेक्स मध्ये पुरुष अॅक्टीव्ह असतो तर स्त्री पॅसिव्ह. त्यामुळे सेक्स होणं अथवा न होणं पुरुष हे संपूर्णपणे पुरुषावर अवलंबून असतं. पुरुषाची इच्छा नसेल आणि स्त्रीची इच्छा असेल तर सेक्स होऊ शकत नाही या उलट स्त्रीची इच्छा नाही परंतु पुरुषाची आहे तर सेक्स होतो. म्हणून बलात्कार स्त्रीवर होतो, पुरुषावर नाही. स्त्रीच्या कामेच्छेची पूर्तता तिच्या पुरुषाद्वारे व्हावी यासाठी आणि त्यासाठी त्याचं पुरुषत्व ‘जागं’ राहावं म्हणून तिने त्याच्या मनासारखं वागावं, त्याला खुश करावं, साज-शृंगार करावा, कामोत्तेजक त्रिगुण विडा द्यावा, मादकता दाखवावी व्हावं असं तिच्या मनावर बिंबवलं गेलं. स्त्रीमध्ये कामेच्छा नसती तर तिला असं वागणं खरच जमलं असतं का, हा ही विचार करणे आवश्यक आहे. स्त्रीतही कामभावना असते, तिव्रता कमी-जास्त असू शकेल, परंतु आपले सामाजिक नियम, बंधन यामुळे ती दाबली जाते.

‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते’ ही म्हण आपल्या सर्वांना माहित आहे. ज्यांचं लग्न होऊन मुलंही झाली आहेत अशा नवऱ्यांना तर अनेकदा या म्हणीचा सर्वच संदर्भात अनुभव येत असेल. विषय सेक्सचा आहे म्हणून सेक्समधेही येत असेल याची गॅरंटी. मुलं झाली की बायकोचा सेक्समधला रस कमी होतो हा बहुतेक सर्वांचा अनुभव. पण तिचा सेक्समधला रस कमी होत नसून, तिच्यातलं वात्सल्य त्या क्षणिक आनंदाला दुय्यम ठरवतं व ती नवऱ्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष करते किंवा झालीच तर अनिच्छेनेच सामिल होते. अनिच्छेने सामिल झाल्यामुळे कामक्रिडा व्यवस्थित होत नाही व पुरूष ‘तिचा सेक्समधला रस कमी झाला’ असा अर्थ काढून मोकळा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री जेंव्हा अनिच्छेने सेक्समधे भाग घेते, तेंव्हा तिच्यातून वॅजिनल डिसचार्ज बाहेर पडत नाही आणि त्यामुळे योनीमार्ग कोरडा झाल्याने (यासाठी इतरही वैद्यकीय कारणं असू शकतात) तिच्यासाठी कामक्रिडा अत्यंत वेदनादायी होते व ती त्यातून लवकर निवृत्त होते. याचा सेयिस्कर अर्थ ‘तिला सेक्समधे रस नाही’ असा काढून पुरूष मोकळे होतात आणि पेनिट्रेटीव्ह सेक्ससाठी दुसरीकडे संधी शोधू लागतात. पुन्हा अनेक पुरुषांना जसा वीर्यपतनाच्या क्षणाला वेळी काम पुतीचा आनंद मिळतो, तसा आनंद स्त्रीला मिळतो का, याचा विचार कायची गरज भासत नाही. पुरूषाच कशाला, असं काही ‘ऑर्गाझम’ नावांच काही असतं, हे अनेक स्त्रियांच्या गावीही नसत. स्त्रियांचे अनैतिक संबंध जे जुळतात त्यामागे हे ही एक कारण असू शकतं. पुरुषांचे अनैतिक संबंध अश्या स्त्रियांशी जुळतात, ते काय त्या पुरुषासह रमणाम होवू इच्छीणाऱ्या अन्य स्त्रिला प्रेमभावना व त्यातून कामभावना असल्याशिवाय का? पुन्हा तिथेही तिच कथा घडते. ती दुसरी स्त्री प्रतःम प्रेम भावना आणि त्यातून सेक्स अश्या अपेक्षेने आलेली असते आणि हा बाबा फक्त सेक्सच्या अपेक्षेतून. मग त्यातून पुढे ती स्त्री त्या पुरुषावरच प्रेम आते पर्यंत गप्प बसते आणि त्याचा तिच्यासोबत सेक्स उपभोगायचा इंटरेस्ट संपला आणि त्याने दुर्लक्ष सुरु केले की मग अपेक्षाभंग होऊन फसवणूकीचा आरोप करते. पण तो पर्यंत पुरुषाचं काम झालेलं असतं. बहुतेक पुरषाचं प्रेम बेडपर्यंत जाण्यासाठीच असतं. आमच्या वेळी कोलेजच्या तरुण मुलांमधे एक म्हण होती, ‘if you love her, she will fuck you whole life & if you fuck her, she will love you whole life’ प्रेमबीम काही नसत, फक्त सेक्स करण्यासाठी पोरगी हवी हा त्या म्हणीचा पुरुषी भावार्थ. पुरुषांची मानसिकता समजून घेण्यासाठी एवढी एक म्हण पुरेशी आहे.

अनैतिक प्रेम संबंधात सेक्स हा भाग असतोच. लग्नाच्या वयाच्या पूर्वीचे संबंध आणि लहान किंवा मध्यम वयात आलेल्या वैधव्यानंतर अनेक स्त्रियांचे पार पुरुषाशी संबंध आलेले दिसतात. त्यातून गुन्हेही घडतात. ह्या गोष्टी स्त्रीला कामभावना असल्याशिवाय शक्य नाही. पुन्हा सांगतो स्त्रीला कामभावना जरूर असतात, त्यांची तीव्रता प्रत्येक स्त्रीमध्ये कमी जास्त असू शकते हे खरं, परंतु भवना ह्या असतात. काही स्त्रिया वयाच्या ६०-६५ पर्यंतही आनंदाने सेक्स उपभोगतात तसेच काही पुरुष वयाच्या ५०शीतहि सेक्स मधून निवृत्त होप्तात. ह्या गोष्टी सब्जेक्टिव्ह म्हणाव्या अश्या आहेत, याला नियमांत बांधता येत नाही.

या शिवाय आपल्या समाजात जगताना आपल्याला अनेक संघर्षांना सामोरं जावं लागतं. त्यातून निर्माण होणार्या ताणतणावामुळे मन मलूल असेल तर, स्त्री काय किंवा पुरूष काय, सेक्सचा आनंद सोडा, त्यात भाग घण्याचीही त्यांची इच्छ नसते, हा भाग वेगळा. हा आपला सामाजिक दुष्परिणाम आहे. शहरी भागात हल्ली हा प्रकार अनुभवायला मिळतो.

प्रकाश सरवणकरांच्या ग्रुपवर विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्यात दिलेली कथा सेक्यपेक्षा मानसशास्त्राशी जास्त संबंधीत आहे आणि त्याचं विश्लेषण प्राजक्ता सामंतानी चांगलं केलंय. मी स्त्रियांच्या कामभावनेचा वेध घेण्याचा प्रयत्न केलाय. कथेतील माईला सेक्स भावना आहेतच, परंतु संस्कृतीच बंधन त्याहीपेक्षा मोठं असल्याने, ती प्रत्यक्ष कामक्रीडा करण्यापर्यंत मजल मारत नाही तर ती मनातूनच ते उपभोगत राहते आणि त्यातून तिच्यात मेंटल डीसऑर्डर निर्माण होते आणि पुढच सर्व घडतं. सेक्सच दमन न झालेल्या माईसारख्या अनेक स्त्रिया आहेत व त्यांच्यात काही मानसिक विकृतीही निर्माण झालेल्या आढळतात. बाकी विषय भलामोठा आणि प्रचंड गुंतागुतीचा आहे. त्यातून जमेल तेवढा लहान करुन लिहायचा प्रयत्न केला आहे. इथे लिहिलेले स्त्री आणि पुरुष हे शब्द त्या त्या संदर्भात बहुसंख्य म्हणून घ्यावेत. सर्वच स्त्रीया आणि सर्व पुरुष असा त्या शब्दांचा अर्थ काढू नयेत ही विनंती.

-नितीन साळुंखे

9321811091

श्री. प्रकाश सरवणकरांचा या विषयावरचा मुख्य लेख-

जांभळ्या स्तनांचा तालिबानी संदेश..

जांभळ्या स्तनांचा तालिबानी संदेश..

कवी श्री. दिनकर मनवर यांच्या कवितेवरुन जो काही निर्बुद्ध गदारोळ आपल्यी समाजात सुरु आहे, तो पाहाता आपल्या एकंदर समाजानेच सारासार विचारशक्ती गमावली आहे की काय, याची रास्त शंका यांवी अशी परिस्थिती आहे. अलिकडे संस्कृतीरक्षणाकडे लोकांचा ओढा जरा वाढलाच आहे आणि संस्कृतीरक्षकही वाढले आहेत. पुन्हा संस्कृती म्हणजे काय, याची ठराविक अशी व्याख्या नाही. एखाद्याला एखाद्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर ते संस्कृतीभंजन समजलं जातं, इतक्या उथळपणे आपण वागू लागलो आहोत. जात-धर्म यांच्याबद्दलच्या जाग्या झालेल्या टोकाच्या अस्मिता आणि आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या उत्कर्षासाठी त्या पुन्हा कधीही झोपू नयेत याची व्यवस्थित काळजी घेणाऱ्या स्वार्थांध राजकारण्यांनी, देशातील माणसांनी विचार करुच नये याची व्यवस्थित काळजी अगदी लोकांच्या शाळेपासूनच घेतलेली आहे, त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत व यापुढेही भोगावे लागणार आहेत.

श्री. दिनकर मनवर यांची कविता मी वाचली. दोन पानाच्ंया त्या कवितेत आणखीही बरंच काही अर्थपूर्ण आहे. मनवरांनी त्या कवितेतून ‘पाणी’ हे प्रतिक घेऊन, आपल्याकडच्या सामाजिक परिस्थितीमुळे त्यांच्या मनात निर्माण झालेले काही प्रश्न कवितारुपाने समाजासमोर ठेवले आहेत, ते गांभिर्याने विचार करण्यासारखे आहेत.

जवळपास ५० ओळींच्या या कवितेत कविॅनी समाजासमोर आजच्या वर्तमानातलं दाहक वास्तव मांडलं आहे. “किंवा अदिवासी पोरींच्या स्तनांसारखं जांभळं” या पाच शब्दांच्या ओळीकडे सर्वांचं लक् गेलंष. त्यातही या ओळीतील पाच शब्दांमधील ‘स्तन’ ह्याच शब्दाकडे जास्त लक्ष गेलं असण्याचीच शक्यता जास्त आणि मग पुढचं सगळं घडलं असावं. ‘या ओळींमळे मनात लज्जा उत्पन्न होते’ अशा आशयाचं विधान काही राजकीय नेत्यांकडून केलं गेलं (खरं तर निर्लज्जपणा कोळून प्यायलेल्या राजकीय लोकांच्या मनातही लाज उत्पन्न झाली, ही या कवितेची आनुषंगिक जमेची बाजू पकडायला हवी). मला आश्चर्य वाटतं की, याच कवितेच्या एका कडव्यात,

“पाणी स्पृष्य असतं की अस्पृष्य?

पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रम्ह?

पाणी ब्राम्हण अस्तं की क्षत्रिय की वैश्य?

पाणी शुद्र असतं की अतिशुद्र?

पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का

या वर्तमानात?”

या कविने विचारलेल्या आणि समाजाचा घटक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला आपलीच लाज वाटावी अशा प्रश्नाबाबत मात्र कुणालाच लाज का वाटत नाही किंवा कुणाच्याही मनात लज्जा का उत्पन्न होत नाही, याचं उत्तर कुणाकडेच नाही. या कडव्यात आणि एकूणच कवितेत श्री. दिलिप मनवरांनी विचारलेला प्रश्न कुणाला बोचत नाही, अस्वस्थ करत नाही आणि स्तन मात्र अस्वस्थ करतात, हे माझ्या तरी आकलनाच्या पलिकडचं आहे.

स्त्रियांच्या शरिराच्या एका किंवा अनेक भागांचं वर्णण वाचून अस्वस्थ होणारांना, तिच्या शरिराचे त्यांच्यासहित अनेकांनी अनेकांगानी घेतलेले भोग मात्र अस्वस्थ करत नाहीत. तिचे भोग घेतले जात असताना मात्र ती आपल्या जाती-धर्माची आहे का नाही आणि भोग घेणारा कोणत्या जाती-धर्माचा आहे यावर ज्या समाजाचा पावित्रा अवलंबून असतो, त्या समाजाचं भवितव्य फार चांगलं नसतं. दिलीप मनवरांनी आपल्या कवितेत ‘अदिवासी’ पोरीचा केवळ उल्लेख केलाय म्हणून अदिवासी समाज, म्हणजे अदिवासी नेते भडकले. त्या जांभळ्या स्तनांच्या अदिवासी पोरीच्या जागी कोणत्याही रंगाचे स्तन आणि तो तो रंग धारण करणाऱ्या कोणत्याही समाजाची पोरगी असती तरी त्या त्या समाजात हेच झालं असतं यात शंका नाही.

स्त्री म्हणजे फक्त तिचे स्तन किंवा जननेंद्रिय इतकंच असतं, हेच आपला बहुसंख्य समाज समजतो. दुसऱ्याला त्या अवयवांचा प्रतिकात्मक म्हणून उल्लेख करायची मुभा नाही, असा काहीतरी आपला समज अलिकडे झालाय. तो तसा उल्लेख का झालाय यासाठी त्या लेखक/कविंची ती पूर्ण कलाकृती समजून घ्यावी लागते, हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. अशा लोकांना विंदांच्या ‘झपताल’ या कवितेतल्या, “आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठींतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते..” आणि “मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात..”. या ओळींमधे सेक्सच दिसणार आणि त्या ओळी वाचून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होणार. ‘प्रेम कुणार करावं’ या कवितेतील ‘प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,..प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं..” या कुसुमाग्रजांच्या ओळीत अश्लिलता दिसते असे लोक आज आपल्या समाजाचे नेतृत्व करत आहेत, हे दुर्दैवी आहे. उद्या या नितांतसुंदर कवितांवरही बंदी आणल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या व अशांसारख्या कवितांवर बंदी आणायची झुंडशाही मागणी विंदा किंवा कुसुमाग्रजांनी या कविता लिहिल्या तेंव्हा केली गेली नाही याचा अर्थ आपला पूर्वीचा अशिक्षित व अर्ध शिक्षित समाज आताच्या सुशिक्षित उच्च शिक्षित समाजापेक्षा जास्त शहाणा होता, असा होतो. शिक्षणाने पगार आकाशाच्या दिशेने वाढले, अक्कल मात्र जमिनीच्या दिशेने निघाली. आपल्या शिक्षणातच मोठी खोट आहे, असे मी सुरुवातीस म्हणालो ते याचमुळे.

माझी आई रोज देवी महात्म्य वाचते. गेली तीस-पस्तिस वर्ष तरी मी ते ऐकत आलो आहे. त्यातील पंधराव्या अध्यायातील काही श्लोकांत देवीच्या रुपाचं वर्णन आहे. श्लोक सांगतात,

आतां सर्व देवशरिरांपासूनी ।

जी कां प्रकट जाहली भवानी ।

अमितप्रभा त्रिगुणरुपिणी ।

महालक्ष्मी प्रत्यक्ष ॥ ११ ॥

महिषमर्दिनी ती जाण ।

श्र्वेत असे तियेचे आनन ।

जियेचे भुजं नीलवर्ण ।

श्र्वेत स्तनमंडल जिचें ॥ १२ ॥

रक्तमध्य शरीर जाण ।

रक्त असती जियेचे चरण ।

जंघा ऊरु रक्तवर्ण ।

अत्यंत मद जियेचा ॥ १३ ॥

अत्यंत चित्र जियेचे जघन ।

चित्रमाल्यांबरभूषण ।

अंगी शोभे चित्रानुलेपन ।

कांतिरुप सौभाग्य शील ॥ १४ ॥

या ओळींचा सोप्या मराठीतील अर्थ, “महिषासुरमर्दिनी म्हणजेच साक्षात त्रिगुणात्मिका महालक्ष्मीच आहे. तिचं मुख शुभ्र धवल, हात निळे, तिची स्तन मंडलं अत्यंत शुभ्र, कंबर, पाय व जांघा हे अवयव रक्तासारखे लाल असून, ती मद्यपानामुळे उन्मत्त अवस्थेत असते. तिचा जघन भाग चित्रविचित्र असून, तिने चित्र विचित्र रंगाच्या माळा, वस्त्र व अलंकार परिधान केलेले आहेत. विविध प्रकारच्या सुगंधी उट्या अंगाला लावल्या आहेत व तिच्या ठायी कांती, सौंदर्य व सौभाग्य यांचा प्रकर्ष झालेला आहे” असा आहे. साक्षात देवीबद्दल असा विचार करणारे शेकडो वर्षांपूर्वीचे ते स्तोत्रकर्ते अधिक शहाणे होते की आताचे स्वत:ला नेते मानणारे अश्लिलमार्तंड अधिक शहाणे, हे मला कळत नाही.

दिनकर मनवरांच्या कवितेबद्दल जो काही हिडिस तमाशा आपल्याकडे सुरू आहे, त्यामुळे मला काही वर्षांपूर्वी तालिबान्यांनी अफगाणीस्तानातल्या बामियान येथील पुरातन बुद्ध मुर्ती तोफा लावून उध्वस्त केल्या होत्या, ती घटना आठवली. मुनवरांच्या कवितेसंबंधी जो धुडगुस घातला गेला, तो मला तालिबान्यांनी बुद्धमुर्ती उध्वस्त केल्यासारखाच वाटतो. हुल्लडबाजी करुन यावर बंदी, त्यावर बंदी अशा मागण्या आणि त्या बेलगाम झुंडशाहीपुढे झुकणारे लोकनियुक्त सरकार अशा अलिकडच्या वारंवार घडणाऱ्या घटना पाहिल्या की, आपण जागतिक महाशक्ती होण्याच्या दिशेने चाललोय की वेगाने तालिबान्यांच्या दिशेने चालू लागलो आहोत, हेच कळेनासे होते.

गोरेपान स्तन आणि लाल जांघा असलेली ती महिषासूरमर्दीन लवकरात लवकर अवतार घेवो आणि आजच्या समाजाचं नेतेृत्व करणाऱ्या महिषांचं पुन्हा एकदा निष्ठूरतेने मर्दन करो, हेच तिच्याकडे येणाऱ्या नवरात्रानिमित्त मागणं. शेवटी आपातकालीन स्थितीत देवमंडळाने देवीची मनधरणी केल्याचे व देवीने देवांना तारल्याचे अनेक दाखले पुराणांत आहेतच. आपल्याला तारण्यासाठी तोच नुस्खा आपण मर्त मानवांनी पुन्हा एकदा अजमावावा असं मला तिव्रतेने वाटू लागलं आहे.

-नितीन साळुंखे

9321811091