मराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं? सरकारने की मुख्यमंत्रांनी की श्री. देवेन्द्र फडणवीसांनी की….?

हा लेख स्वत:च्या व इतरांच्या जातीकडे त्रयस्थ नजरेतून पाहाणाऱ्यांसाठी आहे. इतरांनी वाचून स्वत:ला त्रास करुन घेऊ नये आणि जातीविरहित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासहीत इतरांनाही त्रास देऊ नये ही विनंती.

मराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं?

सरकारने की मुख्यमंत्रांनी की श्री. देवेन्द्र फडणवीसांनी की….?

विषय जुनाच आहे, परंतु मराठा आरक्षणाच्या निनित्ताने नव्याने मनात आला आहे. अर्थातच आरक्षण मिळावं की नाही किंवा मिळालं ते बरं झालं की वाईट, हा मुळात या पोस्टचा विषयच नाही. विषय आरक्षणाच्या निमित्ताने लिहिलेला असला तरी ह्याला एक वेगळा आयाम आहे आणि गेले साधारण वर्षभर तो माझ्या मनाला यातना देतो आहे. माझ्या मनाला झालेल्या वेदना मी या निमित्ताने समोर ठेवतो आहे. मला या पोस्टमधून जे म्हणायचंय, ते मी स्पष्ट म्हटलं आहे. वाचणारानी त्यातून काय अर्थ काढावा हे माझ्या ताब्यात नाही.

साधारण वर्षभरापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं व नंतर ते आरक्षण न्यायालयाने नाकारलं होतं, हे सर्वांना आठवत असेल. त्या दरम्यान मी एका व्हाट्सअॅप ग्रुपवर होतो. तो ग्रुप जाती विरहीत हिन्दूत्व मानणाऱा होता आणि ‘मराठी भाषा’ विषयाशी संबंधीत होता. सहाजिकच जाती-पातीच्या विषयाला तिकडे सक्त मज्जाव होता. अशातच एक दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळालं(पुढे ते कोर्टाने नाकारलं होतं) आणि त्या ग्रुपवर एक मेसेज येऊन थडकला. ‘एका ब्राह्मणाने मराठ्यांना मागास घोषित केलं आणि आरक्षण दिलं. त्यामुळे ब्राह्मणाचं महत्व आजही अबाधित आहे’ असा तो संदेश होता. वास्तविक ‘मुख्यमंत्र्यांनी किंबहूना सरकारने आरक्षण दिलं’ असं म्हणणं जास्त संयुक्तिक होतं. पण तसं न म्हणता मुख्यमंत्र्यांच्या जातीचा उल्लेख केला गेला होता. एका उच्च विद्या विभुषीत व पेशाने (बहुतेक) शिक्षिका असलेल्या एका विदुषीने तो मेसेज पाठवला होता. खरं तर मराठी भाषा या विषयाशी संबंधीत ग्रुपवर तो मेसेज येण्याचं प्रयोजन मला समजलं नाही. मी स्वत: जात मानत नाही आणि माझ्या पुरतं जातीचं तथाकथीत उच्चनिचत्वही मानत नाही आणि म्हणून झाल्या प्रकाराचा निषेध केला होता. त्या ग्रुपमधल्या आणखीही चार-पाच जणांनी निषेध व्यक्त केला, पण तेवढंच. मी लगेच त्या ग्रुपमधून बाहेर पडलो व तेंव्हापासून त्या ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणणाऱ्या व्यक्तींपासूनही अंतर राखून वागू लागलो, त्यामुळे तिथे पुढे काय झालं ते मला समजलं नाही. अर्थात एका मेसेज वरुन सर्वांना जोखणं योग्य नाही हे मला समजतं. पण, एकाने मनातलं बोलून दाखवलं, इतरांच्या मनात तसं नसेल हे कशावरून, ही शंका मनात राहिली ती राहिलीच..!

आज हे आठवायचं कारण म्हणजे आज पुन्हा एकदा मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण व त्यावर सोशल मिडियात उमटलेले याच अर्थाचे पडसाद. ह्या पडसादांच प्रमाण कमी आहे, पण आहे.

मला कुणालाही आरक्षण मिळाल्याचं दु:ख नाही आणि सुखही नाही. ज्यांना आवश्यकता आहे, त्यांना समानतेच्या तत्वाच्या पालनासाठी जे जे करणं शक्य आहे, ते ते केलं पाहिजे यात दुमत नाही. जनतेचं जे काही भलं-बुरं करायचं ते सरकार करतच असतं. किंबहूना ‘सरकार करतं’ असं म्हणण्याचा प्रघात आहे. मग आजच्या मराठा समाजाला आरक्षण मंजूर करण्याचं श्रेय अर्थातच सरकारचं असायला हवं आणि आहे. आपणही तसं म्हणायला हवं ही अपेक्षा झाली. सरकारचा मुख्य या नात्याने ते श्रेय मुख्यमंत्र्यांचं हा युक्तीवादही मान्य. मग असं असताना काहीजण तसं न म्हणता, काहीजण ते एका ‘ब्राह्मणाने दिलं’ किंवा ‘ब्राह्मण मुख्यमंत्र्याने दिलं’ असं का म्हणतात ते मला कळलं नाही..! काहीजण तसं थेट न म्हणता, हेच म्हणणं आडवळणाने म्हणतात.

दोष ब्राह्मणांचा नाही, तर आपल्या एकूणच समाजाच्या मानसिकतेचा आहे. इथे ब्राह्मणाऐवजी मुख्यमंत्री इतर कोणत्याही जातीचे असले असते तरी हेच झालं असतं, एवढी जात आपल्या अंगात आणि मनात भिनली आहे. इथे प्रत्येकजण आपल्या जातीला मोठ समजायला लागलाय. महाराज मराठा जातीत जन्माला आले म्हणून मराठ्यांना कोण अभिमान..! अभिमान असायलाही हरकत नाही, पण महाराजां एवढे जाऊद्या, त्यांच्या नखाच्या पासंगाला पुरेल एवढ तरी आपलं कर्तुत्व आहे का याचा विचार कोण करणार? हेच सर्व जातींमध्ये आहे. आपल्या समाजाचं एकूण वातावरणच केवढं कलुषित आणि म्हणून प्रदुषित झालंय, याचं हे एक उदाहरण. आपलं काहीच कर्तुत्व नसताना प्राप्त झालेल्या कोणत्याही जातीबद्दल एवडा अभिमान किंवा लाज बाळगण्यासारखं काय आहे, ह्याचा विचार कुणालाच का करावासा वाटत नाही..!

मुख्यमंत्री या नात्याने श्री. देवेन्द्र फडणवीसांची कामगिरी अत्यंत दमदार आहे यात मला कोणतीही शंका नाही. पण ती मुख्यमंत्री म्हणून आहे की ब्राह्मण म्हणून? मुख्यमंत्र्यांचं फक्त ब्राह्मणत्व पाहून त्यांना शाबासकी देणारे आपल्याच मुख्यमंत्र्यांचं अवमुल्यन करत आहेत, याचं तसं करणारांना भान नसावं असं वाटतं. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कर्तुत्वाबद्दल अभिमान वाटणाऱ्या त्यांच्या ब्राह्मणेतर चाहत्यांनी, त्यांचा अभिमान मुख्यमंत्री म्हणून बाळगावा की ब्राह्मण म्हणून, असंही अशा पोस्ट वाचल्यानंतर मनाशी वाटून जातं..!

मुख्यमंत्र्यांच्या जातीवरुन त्यांना डोक्यावर घेणारे आणि त्याच कारणाने त्यांना पाण्यात पाहाणारे, यांच्या मनात जातीवाद व जातीच्या उच-निचतेच्या कल्पना किती घट्ट रुजल्या आहेत, याचं हे उत्तम उदाहरण आहे (यात सुशिक्षित आणि अशिक्षित असे दोघेही एकाच वैचारिक पातळीवर आहेत. जातीमुळे किमान या एका बाबतीत तरी आपल्यात समानता आली असं म्हणायला हरकत नाही.). अशी दुभंगलेली मनं आणि फूट पडलेला शिक्षित अडाण्यांचा समाज सोबत घेऊन, भारतमाता जागतिक महासत्ता कशी काय बुवा होणार, हा पुढचा प्रश्न माझ्या मनात उभा राहातो.

देशाला महासत्ता बनवायचं तर सर्वच समाजाने एकजुटीने प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी मनं जुळावी लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीचे सहकारी सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले;कारण त्यांचं व मावळ्यांचं ध्येय निश्चित होतं. जाती-पातीला अतोनात महत्व असणाऱ्या काळात महाराजानी हे करुन दाखवलं (महाराजांना आज जातीच्या चौकटीत बसवणारांचा मी नेहेमीच लेखी निषेध केला आहे.). महाराजांनंतर आज जवळपास ३५० वर्षांनी आपण पुढारलेले व जातीपातीच्या बुरसट कल्पना मागे सोडून पुढे येणं अपेक्षित असताना, आपण महाराजांच्याही काळाच्या मागे असल्यासारखं वागू लागलोय. आज प्रत्येकजण मनातून दुसऱ्यापेक्षा स्वत:ला मोठा समजतोय आणि दुसऱ्याला लहान, मग असा लहान-मोठ्यात मानसिक विभाजन झालेला समाज एकजुटीने पुढे कसा जाणार आणि ती हिन्दू एकता वैगेरे कशी होणार? ‘वसुधैव कुटुंबकम’चा नारा आपण देतो. पण अशा जातीयतेने बरबटलेल्या पोस्ट पाहिल्या, की त्या वसुधेचं काय होईल ते होऊ दे, पण ‘भारतैव कुटंबकम’ कसं होणार याची चिंता लागून राहाते. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ हे प्रतिज्ञेतील शब्द किती बेगडी आहेत, हे यातून समजतं.जातीचा उन्माद आपल्याला विनाशाकडे घेऊन जाणारा आहे. उन्मादी समाज कधीच शहाणा नसतो..

आपण लहानपणापासून सर्व माणसं, अगदी स्त्रीयाही (हे मी मुद्दाम नमूद करतोय. अनेकजण स्त्रीयांना कमअक्कल समजतात), बुद्धीने सारखीच आहेत असं शिकत असतो. तशी ती आहेतही हा अनुभवही आपण मोठं होत असताना घेत असतो. असं असताना अशा पोस्ट्स वाचायला मिळाल्या तर आपण लहानपणापासून जे शिकत आलो ते खोटं होतं की काय, असा विचार मनात येऊन मनाला यातनांशिवाय काहीही होत नाही.

ही पोस्ट मी लिहू की नको, यावर मी बराच विचार केला. जवळपास वर्षभर मला यावर निर्णय घेता येत नव्हता. विषय अत्यंत संवेदनशील. शिवाय लोक मला नेमकं काय म्हणायचंय हे समजून न घेता माझ्यावर तुटून पडणार किंवा माझी वाहवा करणार. माझे अनेक मित्र या पोस्टमुळे नाराज होण्याची दाट शक्यता (पण तसं झालं तर ते मला काय म्हणायचंय हे समजून न घेतल्यामुळे झालं असं मी समजेन). पुन्हा पोस्टची संवेदनशीलता व त्यातून येऊ शकणाऱ्या नाराजीचा विचार करुन न लिहावं तर माझ्याच मनाला यातना. शेवटी माझ्या मनाची शांती महत्वाची हा विचार केला, मनाचा हिय्या केला आणि ही पोस्ट लिहिली.

मला जे म्हणायचंय, ते मी स्पष्ट लिहिलंय. मी जातीपातीचा अभिमान किंवा लाज किंवा माजही बाळगणारा नाही आणि तसा अभिमान, लाज किंवा माज असणारांना काय वाटेल याचा विचार करायची मला या क्षणाला फार गरजही वाटत नाही. त्यामुळे कुणाला वाईट वाटेल किंवा कुणाला बरं वाटेल किंवा कुणाला आणखी काय वाटेल किंवा यातून कोण काय अर्थ काढेल याचा विचार न करता लिहिलं आहे. ज्यांना समजून घ्यायचंय त्यांनी ते घ्यावं, बाकीच्यांना मी काहीच बोलणार नाही.

पाहू आता माझी मित्र यादी किती रिकामी होते ती..!!

-©नितीन साळुंखे

9321811091

1. सोबत मला दिनांक १६.०८.१७ रोजी ग्रुपवर आलेल्या मेसेजचा स्क्रिन शाॅट.

2. काल फेसबुकवर आलेले काही संदेश उदाहरणादाखल. या अर्थाच्या पोस्ट आपणही फेसबुकवर वाचल्या असतील.

नांवं मुद्दाम खोडली आहेत. मला व्यक्ती नाही, तर वृत्ती दाखवायची आहे..

टॅक्सीवाला आणि त्याने मला शिकवलेल्या दोन गोष्टी

टॅक्सीवाला आणि त्याने मला शिकवलेल्या दोन गोष्टी –

बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. एखादा साधा सरळ आणि समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरची व्यक्ती कधी काय शिकवून जाईल हे सांगता येत नाही. अगदी अलीकडे माझ्याबाबतीत अशी गोष्ट घडली. एका साध्या टॅक्सीवाल्याने मला दोन गोष्टी अगदी सहजपणे आणि त्याच्याही नकळत शिकवल्या. त्या सांगताना त्याने कुठेही मोठा आव आणला नव्हता मात्र त्याने सांगितलेल्या त्या दोन गोष्टीने मला मात्र दोन अनमोल चीजा मला शिकवल्या, एक ‘नजर’ मिळाली आणि दुसरं म्हणजे ‘ज्ञान’ मिळालं..!

झालं असं, की मुंबईच्या एशियाटीक लायब्ररीत काही पुस्तकांच्या शोधात गेलो होतो. माझं काम संपल्यावर बाहेर येऊन मी चर्चगेट स्टेशनवा जाण्यासाठी टॅक्सी थांबवली. टॅक्सी चर्चगेटच्या दिशेने निघाली. ट्रॅफिकमधून वाट काढताना आमच्या टॅक्सीसमोर एक हातगाडीवाला आपल्या ढकलगाडीवर काही माल लादून चालला होता व त्यामुळे पुढचा रस्ता मोकळा असुनही आम्हाला पुढे जाता येत नव्हते. आम्ही मुंबईकर नेहेमी घाईत असल्याने हा प्रकार मला इरिटेट करणारा वाटला व मी टॅक्सीवाल्याला, “भैया, हॉर्न मारो उसको और बाजू हटने बोलो” असं सांगीतलं. मध्यमवयीन टॅक्सीवाला कमालीचा स्थितप्रज्ञ, त्याच्यावर काहीच परिणाम नाही. मी परत त्याला हॉर्न मारायची आठवण केली. त्यावर त्याने जे उत्तर दिलं त्यांने मला ‘नजर’ मिळाली..अगदी नकळत..!

तो म्हणाला,”साब, जो आप बोले वो तो मेरे भी मन मे है. पर वो जो हाथगाडीवाला आगे चल रहा है ना, वो उसकी गाडी उसका ‘खून’ जला कर चला रहा है और अपनी गाडी पेट्रोल/गॅस पर चल रही है. उसे पिछे गाडी है यह पता बै और वो उसे साईड मिलने पर अपने को आग जाने जगह भी दे देगा. जो खून से गाडी चला रहा है उसका पेट्रोल पर चलनेवाली गाडी वालोंने हमेशा सम्मान करना चाहीये और इसिलीए मै हार्न बजाकर उसे हैरान नही करना चाहता..!” केवढी अनमोल गोष्ट मला त्या सामान्य टॅक्सीवाल्याने नकळत शिकवली. शारिरीक कष्ट करणारांची तर मलाही ‘दया’ येते पण त्यांचा ‘सन्मान’ करायला मला त्या दिवशी त्या टॅक्सीवाल्याने शिकवलं..’दया’ आणि ‘सन्मान’ या दोन्ही टोकाच्या वेगळ्या गोष्टी असतात हा फरक दाखवणारी एक वेगळी ‘नजर’ मला त्याच्याकडून मिळाली..

असंच दुसरं ज्ञान त्याने मला या प्रसंगीच दिलं, ते म्हणजे ‘हॉर्न’ कशासाठी असतो याचं. बऱ्याच वेळेस एखाद्या गोष्टीचं प्रयोजन का हेच आपल्याला कळत नाही. सवयीनं आणि त्यातून होणाऱ्या अतिपरीचयातून आपण ती गोष्ट मुळात अस्तित्वातच का आली याचा विचार करायचं सोडून देतो. बहुतेक सर्वांचंच असं होतं. हॉर्नचं असंच आहे.

आपल्या गाडीचा जो हॉर्न असतो त्याचे कितीतरी प्रकार असतात हल्ली..! आणि त्या सर्व प्रकारात एकच बाब कॉमन असते आणि ती म्हणजे त्याचा कर्कशपणा. जोरजोरात हॉर्न वाजवणं हा काही लोकांच्या आवडीचा विषय असतो. अगदी निर्ममुष्य रस्त्यावरही काही महाभाग काही कारण नसताना जोरजोरात हॉर्न वाजवत सुटतात तर मग मुंबईसारख्या शहरात गर्दीच्या रस्त्यावर तर ते काय करत असतील हे विचारूच नका..मुंबईच्या रस्त्यावर तर आता ‘नो हॉन्कींग’चे बोर्ड नाहतूक पोलिसांनी लावलेत व हॉर्न वाजवणाऱ्यांना दंडही करायला सुरूवात केलीय इतका हा प्रश्न गंभीर झालाय.

मी आमच्या टॅक्सीच्या समोर चालणाऱ्या हातगाडीवाल्याला बाजूला करण्यासाठी टॅक्सीवाल्या हॉर्न मारायला सांगितलं आणि गाडीला हॉर्नची गरजच का पडली या प्रश्नाचं उत्तर अगदी अनपेक्षितपणे मला त्याच्याकडून मिळालं. तो म्हणाला, “जाब पहेले कभी पेट्रोल पर चलनेवाली गाडी का अविष्कार हुवा उसके पहेले लोग या तो पैदल चलते थे या बैलगाड़ी या टांगों की सवारी करते थे. गाड़ी नयी नयी थी और रस्ते छोटे. रस्ते में इंसानों से जादा गाय, बैल और घोड़े जैसे जानवर चलते थे और ये हार्न उन जनावारों को रास्तेसे हटाने के लिए बनाये गए थे और इसीलिए इनका आवाज इतना बड़ा रखा गया है ताकि वो डर के गाड़ी के लिए रास्ता छोड़े.. तभी तो बिएश्टी बस को जो हार्न रहते है वैसेही भोंपू टैप के हार्न थे और इस तरह के हार्न का आवाज बिलकुल गाय या बैल की आवाज जैसे से होता है..जमाना बदल गया, वो भोंपू टैप के हार्न अभी सिर्फ बिएश्टी की बसों में दिखते है और गाड़ियों में तो तरह तरह के हार्न आ गये.. यह बदले हुए हार्न में सिर्फ उसका आवाज बढ़ता गया..शायद अब आदमी ही जानवर बन गया है इसीलिए ऐसा हुवा होगा..”

केवढ मोठं ‘ज्ञान’ तो साधा टॅक्सीवाला मला शिकवून गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता..पण त्या टॅक्सीवाल्याने जे सांगितलं ते पटण्यासारखंच होत हे खरं..!

आपण माणुसकी सोडून जनावरांसारखं वागू लागलोय हेच गाडीच्या हॉर्नच नकळत सांगणं असावं आपल्याला..

– नितीन साळुंखे
9321811091.
salunkesnitin@gmail.com

सर्व राष्ट्रपुरुषांचं ‘राष्ट्रीयीकरण’ करणं गरजेचं आहे..

सर्व राष्ट्रपुरुषांचं ‘राष्ट्रीयीकरण’ करणं गरजेचं आहे..

पूर्वीच्या आपल्या खाजगी बॅंकांचं इदीरा गांधींच्या काळात राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. पहिल्या फेरीत १४ व नंतरच्या काळात ५, अशा एकूण १९ बॅंकांचं राष्ट्रीयीकरण करुन त्या बॅंका राष्ट्राती संपत्ती म्हणून घोषीत करण्यात आल्या. सन १९६९ मधे ही घटना घडली.

तत्पूर्वी ह्या बॅंका खाजगी क्षेत्रात होत्या आणि आपल्या देशाच्या त्यावेळच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेती क्षेत्राच्या प्रगतीच्या आड त्या येत होत्या म्हणून त्यांचं राष्ट्रीयीकरण करणं आवश्यक ठरलं होतं. थोडक्यात, त्यांचं खाजगीपण राष्ट्रीय प्रगतीला बाधक ठरत होतं. ह्याला आणखीही काही कारणं असतील, परंतू ते जे काही मला सांगायचंय त्याच्याशी ती संबंधीत नसल्याने, त्या इतर कारणांचा मी इथे यांचा विचार केलेला नाही.

या बॅंकांमधे काम करणाऱ्या कर्मचारीवर्गाचीही एक खासीयत होती. म्हणजे, एकेक बॅंकेत प्रामुख्याने एकेका प्रांतातल्या माणसांचा भरणा असायचा. मी बॅंकेत नोकरीला असताना, आम्ही एकमेंकात बोलताना, त्या त्या बॅंकेच्या नांवासहीत त्यांच्यात काम करणाऱ्या लेकांचाही उल्लेख करून बोलायचो. उदा. सेन्ट्रल बॅंकेत पारशांचा भरणा जास्त होता, म्हणून ती पारशांची, महाराष्ट्र बॅंकेत आपली मराठी माणसं बहुसंख्य, म्हणून ती मराठी माणसांची, पूर्वीची देवकरण नानशी, म्हणजे देना बॅंकेत गुजराती जास्त, म्हणून ती गुजरात्यांची, तर कॅनरा बॅंकेत कारवार साईडचे शानभाग, राव, कामत वैगेरे जास्त, म्हणून ती कारवाऱ्यांची अशा पद्धतीने. या बॅंका जरी राष्ट्रीयीकृत असल्या, तरी ओळखल्या जायच्या त्या, त्या बॅंकेत काम करणाऱ्या बहुसंख्य माणसांवरून आणि प्रांतावरूनच..

आपल्या देशाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना आपण , नॅशनलांईज्ड बॅंकांना-जरी त्या राष्ट्राच्या असल्या तरी- जसं त्यांच्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रांतांवरून ओळखतात, तसं बनवून टाकलं आहे. म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे किंवा मराठ्यांचे, राणा प्रताप राजस्थानचे किंवा राजपुतांचे, गुरु गोविंदसिंह पंजाब्यांचे किंवा पंजाबचे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, स्वातंत्त्र्यवीर सावरकर ब्राम्हणांचे वैगेरे वैगेरे. ही सर्व नांव राष्ट्राला जोडणारी आहेत, ह्या सर्व विभुती स्वकीयांसाठी परचक्राविरुद्ध, समाजातील जातीयता आणि अनिष्ट रुढी-परंपरा आणि नंतर वेळोवेळी अन्यायाविरुद्ध लढल्या आहेत. देशाला पुढे नेण्यात या व अशा सर्वांचा सहभाग होता. परकीयांविरुद्ध लढताना, अन्यायाविरुद्ध लढताना, जुनाट चालीरितींचा विरोध करताना या महापुरुषांनी तेवळ आपापल्या जाती-पंथाचा किंवा प्रांताचा विचार न करता, तमाम समाज नजरेसमोर ठेवला होता.

दुर्दैवाने हे सर्व विसरून सध्याच्या काळात आपण त्यांना एकेका प्रांतात किंवा एखाद्या विवक्षित जातीत अडकवून टाकलं आहे. यात आता बॅनरबाज राजकीय पक्षांचीही भरं पडली आणि या विभुती पार रसातळाला पाठवल्या गेल्या. असं करतांना आपण त्यांची उंची छाटतोय व त्यांच्या विचारांना पायदळी तुडवतोय हे त्यांच्या अनुयायांच्या, विरोधकांच्या आणि जनतेच्याही लंक्षात येत नाहीय, हे देशाचं दुर्दैव आहे. यातून त्यातल्या त्यात महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद मात्र नशिबवान, हे दोघं मात्र ‘स्टेट बॅंके’सारखी अखिल भारतीय ओळख मिळवण्यात यशस्वी झालेत. त्यांना प्रांत आणि भारताची खासीयत असणारी जन्म’जात’असली तरी, ते त्या पलिकडे पोहोचून ते केवळ राष्ट्रीयच नव्हेत, तर अलम जगतात भारताची ओळख झालेत.

बॅंका त्याकाळी खाजगी असल्याने देशवासीयांपेक्षा स्वत:च्या नफा-नुकसानीचा जास्त विचार करत. परिणामी राष्ट्राच्या विकासावर विपरीत परिणाम होतोय, हे पाहून श्रीमती गांधींनी त्यांचं राष्ट्रीयीकरण करून, त्या ‘राष्ट्राची मालमत्ता आहेत’ असं जाहीर करून टाकलं.

आपले वर उल्लेख केलेले व इतरही काही देशाला मोठं करण्यात योगदान असलेले महापुरूष, ही ‘राष्ट्राची गौरवस्थानं’ आहेत, ती कोणत्याही प्रांताची, जातीची किंवा पक्षाची खाजगी मालमता नाही, हे पुन्हा सर्वांनाच ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे, असं मला वाटतं. या महापुरुषांचं त्या त्या जातीचं, प्रांताचं खाजगी समजलं जाणं आणि या विभुतिंचा संधी मिळताच व्यवसायातल्या करंट असेट्स व फिक्स्ड असेट्स सारखा वापर करणं (प्रत्यक्षात या महापुरुषांचे विचार लायबिलिटीसारखे वाटत असल्याने, ते कोणीच घेत नाही. संधीसाधू व्यापारी लायबिलिटी घेत नाहीत. आजचे राजकारणी आणि मतदारही संधीसाधू आहेत असं म्हटलं तर चुकू नये.) राष्ट्राच्या प्रगतीला मारक असल्याने त्यांचं पुन्हा एकदा ठणकावून ‘राष्ट्रीयीकरण’ करणं सद्यस्थितीत अत्यावश्यक आहे..!

आणखी एक. अशोक स्तंभावरील तीन सिंह आपल्या देशाची राजमुद्रा (emblem)आहे. या राजमुद्रेचा वापर घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती आणि काही नामनिर्देशित अधिकाऱ्यांशिवाय अन्य कुणालाही करता येत नाही. या राजमुद्रेचा दुरुपयोग आणि अपमान कुणालाही करता येत नाही, तसं केल्यास तो गंभीर गुन्हा समजला जातो. तिचा योग्य तो मान राखला जाईल असं पाहावं लागतं. राष्ट्रध्वजाचंही तसंच असतं. राष्ट्रीय प्रतिकांचा मान पाळला जाणं अत्यावश्यक असतं.

असंच काहीसं प्रावधान वर उल्लेख केलेल्या किंवा इतर कहा राष्ट्रीय विभुतींबद्दल व्हायला हवं. वरती उल्लेख केलेल्या व्यक्ती व त्यांच्या उंचीच्या इतर व्यक्ती, ही देशाची आदरस्थानं आहेत, त्यांचं स्थान राजमुद्रेपेक्षा किंवा इतर राष्ट्रीय चिन्हांपेक्षा किंचितही कमी नाही आणि म्हणून त्यांचा दुरुपयोग, त्यांचा अपमान होईल अशी कोणतीही क्रिया किंवा राजकीय किंवा कोणत्याही कारणांसाठी त्यांच्या नांवाचा वा त्यांच्या प्रतिमांचा किंवा प्रतिकांचा उपयोग कोणत्याही परिस्थितीत कोणालाही करता येणार नाही, हे ही एकदा जाहीर करणं आवश्यक झालं आहे. तसं करायचं झाल्यास त्यासाठी योग्य ती यंत्रणा निर्माण करुन त्या यंत्रणेची परवानगी घेऊनच तसं करणं कायद्याने अनिवार्य करायला हवं. या महापुरुषांचं नांव, त्यांच्या प्रतिमांचा वा प्रतिकांचा उपयोग करायचा झाल्यास, तो कशापद्धतीने करावा यासाठी स्वतंत्र ‘प्रोटोकाॅल (आचारसंहिता)’ निर्माण करण्यात यावा व त्याची काटेकोर अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी, असं मला सुचवावंसं वाटतं. तसं न झाल्यास कडक शिक्षा व्हावी. हे नियम या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांसाठीही लागू करावेत.

काल-परवा राष्ट्रवादीचे आमदार श्री. प्रकाश गजभीये यांनी विधानभवनात छत्रपती शिवरायांचा वेश धारण करुन महाराजांना अपमानित करणाऱ्या ज्या मर्कटलीला केल्या, त्यावरुन मला मी गतवर्षी लिहिलेला हा लेख पुन्हा पोस्ट करावासा वाटला. गेल्यावर्षी हा लेख मी भीमा-कोरेगांव दंगलीच्या पार्श्वभुमीवर लिहिला होता. ती पार्श्वभुमी आणि श्री. गजभीयेंचा परवाचा आचरटपणा यात फरक असला तरी, दोन्ही ठिकाणी राष्ट्राच्या गौरवस्थानांचं अवमुल्यन झालेलं आहे आणि म्हणून थोडीशी दुरुस्ती करुन हा लेख पुन्हा पोस्ट करावा असं मला वाटला. कुणीही उठावं आणि राष्ट्रपुरुषांचा मुद्दाम किंवा अनवधनाने अपमान होईल अशा प्रकारे वागावं, हे आता सहन करता कामा नये.

©️नितीन साळुंखे
9321811091

जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध

जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध

माझा सायकल ते मोटरसायकल शिकण्याचा प्रयत्न –

कशावरुन कधी काय आठवेल त्याचा नेम नाही. आजही तसंच झालं. ‘लोकसत्ते’त एक बातमी पाहिली. महिन्द्र कंपनी ‘जावा’ मोटरसायकल ‘पुन्हा’ बाजारात आणणार, ही ती बातमी. ही बातमी वाचली आणि मन एकदम मागे गेलं. काही न काही कारणाने मला अशी भुतकाळात मधेच एखादी फेरी मारून यायची सवय आहे, त्याला इलाज नाही. नाहीतरी आपल्या कडू-गोड आठवणी भुतकाळातच असतात, भविष्यात काय वाढून ठेवलंय हे कुणालाच कळत नाही. गत आठवणींना असं अधे-मधे भेटून आलेलं स्वत:च्या आनंदासाठी आणि तब्येतीसाठीही बरं असतं. तर, पेपरातली ‘जावा’च्या पुनरागमनाची बातमी वाचली आणि मधली ३५-४० वर्ष गाळून एकदम मागे गेलो आणि माझं इयत्ता ७वी ते १० वीमधलं लपून सायकल शिकणं, सन ८१ ते ८७ सालातलं माझं काॅलेज जीवन, त्यातले मित्र, मोटरसायकल शिकण्यासाठी केलेली धडपड, माझ्या आयुष्यात आलेल्या मित्रांच्याच जावा/येझदी व इतर मोटरसायकल्स-स्कुटर्स, त्यांनी मला दिलेला आणि अजुनही मनात भरून राहिलेला अवर्णणीय आनंद इत्यादींच्या मनातल्या त्या सर्व आठवणी जिवंत झाल्या आणि हा दोन भागातल्या लेखात शब्दरुप घेऊन उतरल्या..!

मी राहायचो तो अंधेरी पूर्वेचा पंपहाऊस एरिया तसा त्याकाळी निर्जनच होता. आमच्यापुढेच काही अंतरावर महाकाली गुंफांकडे जायचा रस्त्यावर एक तबेला होता, त्याला सागून एक मारुतीचं मंदिर आणि पुढे तर तो रस्ता राना-वनातून जायचा. शेरेपंजाब काॅलनीच्या इमारतींचे रान माजलेले सांगाडे बरीच वर्ष तिकडे उभे होते. ते ठिकाण म्हणजे तेंव्हाच्या तरुण पोरा-पोरींचं लफडी करण्याचं किंवा नुसत्या पोरांनी दारु-सिगरेट प्यायला शिकायचं निर्जन स्थान होतं. कधीतरी आम्ही त्या रस्त्यावरून महाकाली गुंफांमधे पिकनिकला जायचो किंवा कधीतरी रात्री वडिलांच्या ख्रिस्तांव मित्रांसोबत शिकारीला. आता हे सांगुनही कुणाला खरं वाटणार नाही येवढा हा रस्ता गजबजून गेला आहे. थोडक्यात त्याकाळी हा रस्ता अगदी निर्जन असायचा. एखादी टॅक्सी किंवा तबेल्यात गवत घेऊन येणारा बेडफोर्ड कंपनीचा एखादा चुकार ट्रक सोडल्यास रस्ता अगदी मोकळा असायचा.

मी सायकल चालवायला कसा शिकलो, हे सांगण्यासाठी वरचं पाल्हाळ लावणं गरजेचं होतं. मला घरून सायकल चालवायला सक्त मनाई होती. याचं एकमेंव कारण म्हणजे माझ्या आईला मला अपघात होईल याची सतत भिती वाटायची. वरच्या परिच्छेदात वर्णण केलेलं चित्र जर तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल, तर माझ्या आईला वाटायची ती भिती किती फिजूल होती, हे तुमच्या लक्षात येईल..

सन ७६-७७ च्या दरम्यान सायकल आम नव्हती. शेकडा एखाद्याच घरात सायकल असायची व ते घर श्रीमंतात सामील असायचं. आमच्यासारख्यांना सायकल भाड्याने घेण हा एकाच पर्याय असायचा. सायकली तेंव्हा भाड्याने मिळायच्या. ५० पैसे अर्था तास. शाळेत असतानाच मी सायकल चालवायला शिकलो होतो. ती ही चोरून. चोरुन अशासाठी की, माझ्या आईची मी सायकल चालवायला सक्त मनाई होती. अपघात होईल म्हणून. त्यात मी तीन बहिणींमंधला एकुलता एक मुलगा असल्याने मी काय करतो, कुठे जातो यावर तिचं बारीक लक्ष असायचं. त्यात मी सायकल चालवतो का यावर जरा जास्तच लक्ष असायचं. पुन्हा गरिबी. आठ आण्यालाही किंमत होती व म्हणून साय्क्ल्साठीचे ते आठ आणेही मिळायचे नाहीत तेंव्हा. कुणीतरी मावशी-मामाने खाऊसाठी दिलेले पैसे जपून ठेवायचे आणि मग त्यातून जमेल तशी सायकल भाड्याने घेऊन लपून-छपून चालवायची. फार लपताही येत नसे. याचं कारण त्याकाळचे शेजारी. त्यांची एरियातला कोण मुलगा काय करतोय यावर कडक लक्ष असायचं व तसं काही आढळल्यास लगेच झापायचे, वर घरी तक्रार करायचे. सीसीटिव्हीपेक्षाही भारी आणि अत्यंत कार्यक्षम अशी यंत्रणा असायची ही. आताचा कॅमेरा जसं घडलं तसं दाखवतो, तेंव्हाचे शेजारी त्यात स्वत:च्या पदरचंही थोडं टाकून घरापर्यंत पोचवायचे. त्यामुळे त्यांचा धाकही असायचा. आता सारख ‘तुमको क्या करनेका?’ असं बोलायचीही सोय नसे. त्याचीही तक्रार घरी व्हायची व दुप्पट मार खायला लागायचा. ’मी आज जे काही मार्गावर आहे, त्याच बरचस श्रेय ह्या शेजाऱ्यांना जात. ह्या सर्व अडचणीतून मित्रांच्या सक्रीय सहाय्याने मार्ग काढून बऱ्याच खटाटोपीनंतर मी सायकल शिकलो.

सायकल आल्यानंतर आता मोटरसायकल चालवाविशी वाटत होती. इथे सायकल मिळणे दुरापास्त, तिथे मोटार सायकल काय मिळणार, ती तर अगदी दुर्मिळ. त्या काळात मोटरसायकल अभावानेच दिसायची आणि ती ही जास्तकरून पोलिसवाल्यांकडे. तेंव्हाचे राजकारण मुख्यत्वेकरुन समाजकारण असल्यामुळे, समाजात कसलेही भेद नसायचे. एरियातली दादा मंडळीही आपापल्या दारू अथवा मटका व्यवसायात मग्न असायची. सर्वसाधारण माणसाला त्यांचा त्रास नसायचा. असलंच तर प्रोटेक्शनच असायचं. त्यामुळे राजकारणी आणि दादालोक यांच्यामुळे आतासारखा होणारा त्रास त्याकाळी पोलीसांना नसायचा आणि अम्हालाही नसायचा. एकंदर सगळीकडेच शांती असायची. त्यामुळे पोलीसवालेही कधीमधीच दिसायचे आणि म्हणूनच मोटरसायकलही कधीतरीच दिसायची. इतर कुणाकडे नव्हतीच, तर चालवायला मिळण्याचीही शक्यता नव्हती हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल.

मी ८१-८२च्या दरम्यान काॅलेजात दाखल झालो. जोगेश्वरीचं इस्माईल युसुफ हे माझं काॅलेज. स्टेशनजवळच पूर्वेला एका लहानशा टेकडीवर वसलेला हा काॅलेजचा परिसर होता मोठा रम्य.!. छोटसं हिल स्टेशनच होतं ते. घनदाट झाडी, त्यातून वर चढत जाणारे लहानसे रस्ते. एक लहानशी मशिदही होती. डेरेदार वड-पिंपळाची झाडं आणि टेकडीच्या माथ्यावर पिवळसर दगडात ब्रिटिश काळात बांधलेली देखणी एकमजली इमारत. या सर्व देखणेपणामुळे आमच्या काॅलेजात नेहेमी सिनेमाच्या शुटींग्स होत असायच्या.

आमचं हे काॅलेज त्याकाळात दुय्यम दर्जाचं समजलं जात असलं तरी, माझं श्रद्धास्थान असलेले पु. ल. देशपांडे या काॅलेजचे विद्यार्थी होते, याचंच मला जास्त अप्रूप. माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुलेही माझ्याच काॅलेजचे विद्यार्थी. कविवर्य शंकर वैद्य माझ्यावेळी आर्ट्सला शिकवायचे. या काॅलेजात दाखल झालो, अन् आतापर्यंत फक्त सिनेमात पाहिलेलं एक रोमॅंटीक जग समोर उघडं झालं.

काही काळातच काॅलेजात रुळलो. समान गुणधर्माचे सवंगडी मिळाले. माझा जो सगोत्र ग्रुप जमला, त्यात सर्व थरातले मित्र होते. माझ्यासारखे गरिब होते, खात्या-पित्या घरातले होते, तसेच खानदानी श्रीमंतही होते. पण आमच्यात परिस्थिती कधीही आड आली नाही. ह्यातील बहुतेक सर्व मित्रांशी माझी मैत्री अजुनही तशीच टिकून आहे. ही कथा जशी माझ्या मोटरसायकल शिकण्याची आहे, तशीच ती मला गाडी चालवायला शिकवणाऱ्या काही मित्रांचीही आहे.

ह्यापैकी एक मित्र होता. संजय पाटणेकर. श्रीमंत नाही, पण तसं म्हणता येईल अशा घरातला. उंचं, सावळा, नाकेला. एकदम राजबिंडा आणि मित्रांसाठी काही करायची तयारी असलेला. तेंव्हा बहुतेकजण काॅलेजमधे ट्रेन किंवा चालतच यायचे. आता सारख्या त्याकाळात मुलांच्या कुल्याखाली दुचाकी गाड्या नव्हत्या. क्वचितच कुणीतरी प्राध्यापक मोटरसायकल किंवा स्कुटर घेऊन यायचे, त्याचंच भारी अप्रूप वाटायचं आणि मग त्या गाडीला टक लावून बघत राहा, पार्क केलेली असली की हात लावून बघ असले उपद्व्याप सुरू व्हायचे. मोटरसायकल चालवायची अतृप्त इच्छा अशी पूर्ण करायची. अशी एखादी गाडी दुरून जात असली, की आमच्यात त्याची चर्चा व्हायची. त्यातून असं समजलं की, संजूची एक मावशी पालघरला राहाते आणि तिच्या यजमानांकडे मोटरसायकलही आहे म्हणून. एकदा असंच बोलता बोलता, “यार मुझे मोटरसायकल सिखने की इच्छा है, कुछ जुगाड कर ना” अशी माझी इच्छा बोलून गेलो. आणि मित्रांची इच्छा म्हणजे ती इकडची दुनिया तिकडे झाली तरी पूर्ण करायचीच, या स्वभावाच्या संजूने ते लगेच मनावर घेतलं..

एक रविवार ठरला. बोरिवली ते पालघर हे रेल्वेने साधारणत: साठेक किलोमिटरचं अंतर. आम्ही दोघं होतो, एवढं आठवतं. आणखी कोणी होतं की नाही ते आठवत नाही. आम्ही तीन-चार तासांनी पालघरला पोहोचलो. बिनधास्त आणि बेडर संजूला सवय होती मोटरसायकल चालवायची. मला मात्र हे नवीनच होतं. त्यामुळे माझा उत्साह फसफसून आला होता.

पालघरला पोहोचलो. संजूने मोटरसायकल ताब्यात घेतली. ‘राजदूत-२५०’ माॅडेल होतं ते.. गाडीला कधीतरी हात लावून बघितल होत, तेवढाच माझा आणि गाडीचा संबंध. आज तिच गाडी प्रत्यक्ष चालवायची होती. मला गाडी कशी चालवायची ते फक्त ऐकूनच माहिती होत. तशी त्या माहितीवर मनातल्या मनात गाडी बरीच चालवून झाली होती. चिमणराव-गुंड्याभाऊ हा जुना चित्रपट कुणी पहिला असेल, तर त्यात चिमणराव, म्हणजे आपले दिलीप प्रभावळकर गाडी चालवायला शिकतात असा एक प्रसंम्ग आहे. गाडी चालवणं चिमणरावांच्या अंगात इतकं भिनतं की, ते झोपेतही चक्क गाडी चालवतोय असे हात वारे करत, असा मजेशीर प्रसंग त्या चित्रपटात दाखवलाय. मोठी मजा येते तो प्रसंग पाहताना. त्याच मनोभुमिकेतून मी ही अनेकदा गेलो होतो. अगदी झोपेत नाही, मात्र येत जाता कुणी पाहात नाही असं पाहून अॅक्सिलेटर पिरगळ्यासारखं मनगट वाकव, टेबलवर बसल्या बसल्या पायाने गियर टाकल्याची अॅक्शन कर, असं करत मनातल्या मनात मनात मी भरपूर गाडी चालवली होती.

आता तर मोटरसायकल प्रत्यक्ष चालवायची वेळ आली. संजूने धिर दिला, “xxx डर मत, कुछ हो गया तो मै हूं”. त्याचा विश्वास खुप महत्वाचा होतं. कुठुनसा मनात आणि शरिरात एकदम आत्मविश्वास भरून आला. सायकल येत असल्याने तोल सांभाळायचा प्रश्नच नव्हता. गाडीवर स्वार झालो, किक मारली. पहिला गियर टाकला, गाडी व्यवस्थित उचलली आणि निघालो. पुढे सर्व काम संजून दिलेल्या आत्मविश्वासानेच केलं. व्यवस्थित जमलं. एकदाही पडलो नाही की गाडी मधेच बंद पडली नाही. मी गाडी शिकलो. मला गाडी चालवता येते हा आत्मविश्वास मिळाला, तो आजही शिल्लक आहे. हे सर्व संजय पाटणेकर नांवाच्या मित्राचे उपकार.

परिस्थिती यथातथाच असलेल्या माझ्यासाठी ह्या संजूने खूप काही केलं. अगदी काॅलेजची पुस्तकं, कपडे, बूट काय म्हणाल ते. तोंडातून ‘यार ये चीज होनी चाहिये’ असं म्हणायचा अवकाश, त्याच्या आवाक्यात असेल तर तो लगेच हजर करायचा. अजिबात स्वार्थ नाही. हा माझा प्रिय मित्र चार वर्षापूर्वी वयाची पन्नाशी पूर्ण करायच्या अगोदरच एका लहानश्या आजारपणात देवाघरी गेला. म्हणून वर तो ‘होता’ असा त्याचा उल्लेख केला आहे.

मी फाटका असुनही मित्रांच्या जिवावर पुढे खुप गाड्या उडवल्या, त्याची हकिकत पुढल्या भागात..!

(पूर्वार्ध समाप्त- उत्तरार्ध लवकरच)

©️नितीन साळुंखे
9321811091

#उत्तरार्धाची_ओळख…-

तेंव्हा तीनच प्रकारच्या गाड्या होत्या. मी जिच्यावर गाडी चालवायला शिकलो, ती राजदूत-२५०, येझदी -२५०(जावाही बहुतेक हिलाच म्हणत) आणि राॅयल एन्फिल्ड -३५०. पैकी शेवटची राॅयल एन्फिल्ड किंवा बुलेट ही पोलीसांची समजली जायची. ती गाडी होतीही दणकट, जोरदार फायरींग. मोटरसायकलला फटफटी हे टोपण नांव बहुतेक हिच्याच फायरींगवरून मिळालं असावं. पोलीसांनाच शोभणारी. आताच्या एन्फिल्ड्स (आणि पोलीसहा) म्हणजे त्यांच्यापुढे अगदीच पानी कम. ही गाडी आणि ती वापरणारे पोलीस, दोघंही दणकट, त्यामुळे माझ्यासारख्या बारीक अंगकाठीच्या माणसाला तिच्या वाटेला कधी जावसं वाटलं नाही. ‘राजदूत’ला तसं काही रंगरुप नव्हतं. मला अजिबात आवडायची नाही ही गाडी. हिचा उपयोग मुंबईत जास्त करुन बीएसईएस या इलेक्ट्रीक कंपनीचे मिटर सुपरवायझर्स आणि ग्रामिण भागात दुधाचे भले मोठे कॅन मागे लावून नेण्यासाठी व्हायचा. हिचं फायरींगही अगदीच काहीतरी…।

(..संपूर्ण उत्तरार्ध लवकरच)

-नितीन साळुंखे

आठवणीतलं लहानपण..

आठवणीतलं लहानपण..

माझा जन्म ६५ सालच्या डिसेंबरातला. मी लहान असताना देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ऐन तारुण्यात होतं. त्या माझी आई हौशी असल्यानं, भर तारुण्यात असलेल्या भारतीय स्वातंत्र्याचे २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट हे दोन दिवस घरात जमेल तसं गोड-धोड करुन साजरे व्हायचे. त्याकाळी सर्वच घरात हे व्हायचं. तसाच १४ नोव्हेंबर हा दिवसही गोडानेच साजरा केला जायचा. पण एवढंच. यापेक्षा बालदिन काही वेगळा असतो हे माहित नव्हतं.

माझ्या शाळेतल्या रुजलेल्या आठवणी इयत्ता चौथीपर्यंतच्या आहेत. नंतरच्याही बऱ्याच आहेत, पण त्यांची तुलना त्या चौथीपर्यंतच्या आठवणींशी होऊ शकत नाही, कारण नंतरच्या वाडत्या वयाच्या आणि वाढत्या उंचीच्याही दिवसांनुसार त्यात अनेक आयाम मिसळले गेलेत. बालपण हे चौथीपर्यंतच.

बालदिनाला त्यावेळी शाळेत आम्ही काय करायचो हे आता आठवत नाही, पण हा चाचा नेहरुंचा काहीतरी सण असतो व तो शर्टला गुलाबाचं फुल खोचून साजरा करायचा असतो, असं मला अंधुकसं आठवतं. मी पूर्व प्राथमिक शाळेत असताना आम्हा सर्व मुलांना शिकवायला ‘शर्ट’ नसून ‘साडी’ असल्याने, हा दिवस बाईंच्या तोंडून चाचा नेहरुंच्या गोष्टी ऐकण्यात जायचा. गुलाब लावलेला कोट दिसायचा तो नेहरुंच्या फोटोतच. आमचं बालदिनाचं आकलन हे एवढंच..! आता सारखं कुठल्याही ‘डे’सारखं या ही दिवसाचं फेसबुकी उत्सवीकरण झालेलं नव्हतं, पण उत्साह मात्र असायचा. आता त्याचा उत्सव, साॅरी, इव्हेंट झालाय, उत्साह मात्र हरवला. अर्थात हे होणारच, त्याला इलाज नाही.

इयत्ता चौथीपर्यंत वह्या नव्हत्याच, होती ती फक्त पाटी. काही बऱ्या परिस्थितील्या मुलंकडे बिजगरीवाली जोडपाटी असायचा. त्या पाटीवर तेंव्हा गिरवलेली अक्षर त्याचवेळी स्पंजने पुसून टाकली गेली असली तरी मनावर मात्र लख्ख कोरली गेलीत, ती अजून मिटायला तयार नाहीत. परिक्षा फक्त सहामाही आणि वार्षिक असायच्या. घटक चाचणी नांवाच्या परिक्षाही असायच्या, पण त्या लुटुपुटीच्या..! अभ्यास परिक्षेच्या वेळी आणि दिवाळीच्या सुट्टीच करायची चीज असायची. क्लास, ट्युशन, प्रोजेक्ट वैगेरे तर शब्दही ऐकले नव्हते. आमच्या बाई शिकवणी घ्यायच्या मण ते केवळ ज्ञानदान असायचं, त्या दानाला पैशांचा डाग नसायचा. गोऱ्या, घाऱ्या प्रेमळ डोळ्यांच्या जोशबाई आणि उंचं सावळ्या मिसाळबाई अजुनही जश्याच्या तश्या आठवतात.

वर्षातून एकदा ग्यादरिंग, ते ही मस्त थंडीच्या डिसेंबरात. शाळेत नाटक व नाच बसवला जायचा. मला अभिनयाचे अंग नाही, तरीही मी दोन नाटकांत काम केल्याचं आठवतं. इयत्ता चौथीत ‘शिलेदाराचे सोबती’ हा धडा होता. या धड्यावरील नाटकात मला मुख्य पात्र शिलेदाराचं काम दिलं होतं. तर आणखीही एक नाटक होतं. त्या नाटुकल्यात मला राजाचं पात्र रंगवायचं होतं. माझ्याकडे अभिनयाचं अंग नव्हतं, तसंच माझ्या चेहेऱ्यांचं अंगही नायकाच्या लायकीचं नव्हतं. तरी मला नायक का बनवलं, ह्याचं कोडं मला अजून उलगडलेलं नाही. नाही म्हणायला आता आठवणीपुरतेच उरलेले माझ्या डोक्यावरचे केस मात्र सोनेरी झांक असलेले, पिंगट असे होते. बहुतेक त्याचमुळे मला नायक रंगवायची संधी मिळाली असावी. पण सोनेरी केस हे काय हिरोचं भांडवल होऊ शकत नाही हे खुप नंतर, म्हणजे शशी कपूरचा सोनेरी केलांचा मुलगा करण कपूर पहिल्याच फिल्ममधे फ्लाॅप झाला आणि पुन्हा कधीही दिसला नाही तेंव्हा समजलं. म्हणजे माझ्यात नक्की काहीतरी हिरो मटेरियल असावं. अर्थात असं तेंव्हा आमच्या बाईना का वाटलं, हे मला आताही सांगणं अवघड..!

या दोन्ही नाटकात मला माझ्या रोल पेक्षा कंबरेला लटकावलेल्या तलवारीचं भारी कौतुक वाटलं होतं आणि सर्व नाटकभर माझं सर्व लक्ष त्या तलवारीकडेच होतं. त्या नाटकातलं ‘बाजिराव नाना हो बाजिराव नाना…’ हे गाणं नाटकात गायक बनलेला माझा मित्र नरेश खराडे यांने गायलेलं मात्र चांगलं आठवतं. हा नरेश खराडे नंतर गायन-वादनाच्या क्षेत्रातच मोठा झाला आणि अजुनही मोठा होतोय. बाकी आमचं नायकत्व त्या स्टेजवरच संपलं. नाटकात आणखी काय झालं आता आठवत नाही, पण राजाच्या राणीचं काम केलेली नाजुकशी माधुरी महाले मात्र अजुनही आठवले. ही मला खुप आवडायची आणि आठवली की अजुनही काळजाचा ठोका चुकवून जाते. असो. माझा आणि नाटकाचा संबंध तेंव्हाच संपला आणि नाटकं करणं हे माझं काम नव्हे, हे मला तेंव्हाच कळून चुकलं.

तेंव्हा शाळेचं हस्तलिखीत निघायचं. वर्षातून एकदा. ते मात्र माझं आवडतं काम. या हस्तलिखितात प्रसिद्ध होण्यासाठी मुलांनीच साहित्य द्यायचं असे. माझं हस्ताक्षर (त्यावेळचं) चांगलं आणि रेखीव असल्याने, मुलांनी लिहून आणलेल्या गोष्टी-गाणी हस्तलिखितात माझ्या हस्ताक्षरात लिहायचं काम माझ्याकडे असे आणि मी ही ते मन लावून करे. त्या अंकाचं सुशोभिकरण करणं माझं आणि संजय सुतार नावाचा एक सुरेख चित्र काढणारा मुलगा होता, त्याची जबाबदारी असे आणि आम्ही ते मन लावून करू, येवढं आठवतंय. बाकी माझं मन अभ्यासापेक्षा अशाच गोष्टींत जास्त रमायचं. ही माझी सवय अजुनही टिकून आहे.

आता कारण आठवत नाही, पण मला शाळाजिवनातली पहिली शिक्षा इयत्ता चौथीत झाली होती, ती ही वर्गाच्या बाहेर जाण्याची. मला वाटलं की आता घरी जायला हरकत नाही म्हणून आणि मी चार किलोमिटरचा पायी प्रवास करुन घरी पोचलो होत. मागोमाग काही वेळातच आमच्या शाळेचा शिपाई पंढरीही घामाघूम होऊन माझ्या घरी पोचला. वर्गाच्या बाहेर उभा असलेला मी दिसलो नाही म्हणून बाई घाबरल्या व मला शोधायल् त्यांना पंढरीला पाठवलं होतं. पण येवढं होऊनही माझ्या आई-वडिलांनी बाईंवर आक्षेप घेतला नाही. उलट मलाच मार पडला. आता असं काही झालं, तर थेट कोर्टाची पायरी चढतात पालक. आम्ही लवकर जन्म घेतला हे आमचं नशिब. मला शिक्षा करणाऱ्या सौ. जयश्री मिसाळबाईंना तर मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी माझा आणि वर्गातील सर्वच मुलांचा पुढील आयुष्याचा पाया पक्का केला म्हणून. पुढे वाढत्या वर्गातून बाहेर जायच्या बऱ्याच शिक्षा झाल्या व त्या सरसकट अभ्यासेतर ज्ञानवर्धन करणाऱ्या ठरल्या, पण पहिल्या निष्पाप शिक्षेची सर त्यांना नव्हती. मी दहावीत शाळेतून व नंतर पदवी परिक्षेत काॅलेजातून सर्वप्रथम आलो तेंव्हा मिसाळबाईंना भेटायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आमची भेट होवू शकली नाही. काही भेटी राहूनच जातात, त्यापैकी ही एक भेट.

माझं लहानपण ज्या चाळीवजा वस्तीत गेलं ती वस्ती अजुनही तशीच आहे. माझ्या शाळेची इमारत मात्र आता नाही. अंधेरीला कधी जाणं झालं तर या दोन्ही ठिकाणी मुद्दाम जातो. कधी कधी मुद्दाम ठरवून जातो. या ठिकाणांवर गेलं की मधला सर्व काळ हरवून जातो व मन पुन्हा लहान होऊन बागडायला लागतं. एकदम रिचार्ज झाल्यासारखं वाटतं. आयुष्यात जमेची बाजू म्हणजे बालपण, बाकी सर्व उणे. पण बालपणात येवढं समृद्धी जमा झालीय की, नंतरचं सर्व उणे होऊनही आयुष्य जमाबाकीच दाखवतंय. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाचा अनुभव यापेक्षा वेगळा नसावा..

बाय द वे, मी ५२ वर्षांचा होऊनही पोरकटपणानं वागतो, असं माझ्या आईचं आणि बायकोचंही मत आहे. दोन विरुद्ध धृवांवर वावरणाऱ्या आणि नात्यांत जागतिक सारखेपणा असणाऱ्या दोघींत एकमत घडवून आणण्याचं काम फक्त ते एक बालपणच करु जाणे..!

©️नितीन साळुंखे
9321811091

आली दिवाळी..-लेख १.

आली दिवाळी..-लेख १.

वसुबारस..

वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबुवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच, कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे. पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, कायदा गाढव असतो..!

आज वसुबारस. अर्थात गोवत्सद्वादशी. पारंपारीक दिवाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली. वसुबारस म्हणजे सवत्सधेनुच्या पुजनाचा दिवस. ज्या गोवंशाच्या मदतीने शेतीतून धान्य पिकवले गेले, त्या गोधनाची कृतज्ञता म्हणून, तिची तिच्या वासरासहीत पुजा करण्याचा हा दिवस. गाय हिन्दू संस्कृतीत अत्यंत पूजनीय आहे, त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तिच्यापासून उत्पन्न झालेल्या बैलांशिवाय शेती अशक्य..! तिच्याप्रती कृतज्ञता म्हणूनच कृषीसंस्कृतीतील दिवाळी या सर्वात महत्वाच्या सणाची सुरूवात गो-पूजनाने केली जाते. गोठ्यातील गायी, म्हशी आणि बैल, शेळ्या-मेंढ्या हीच शेतकऱ्याची खरी धनदौलत. या गोधनाची कृतज्ञता पूजा म्हणजे वसूबारस..

‘वसू’ या शब्दाचा एक अर्थ ‘धन’ किंवा ‘संपत्ती’ असा होतो, वसुधा म्हणजे पृथ्वी म्हणजे जमीन. आज जमिनीला आलेल्या किंमतीमुळे तिची किंमत सर्वांना समजली आहे. परंतु पूर्वीच्या काळात धन-संपत्ती असायची ती गुरा-ढोरांच्या स्वरुपात. गोधन म्हणायचे त्याला. आता पन्नास-पंचावन्न वयात असलेल्याना आठवत असेल, की त्यांच्या लहाणपणातली गाय हटकून ‘वसुधा’ नांवाची असायची, ती गोधन या अर्थानेच असावित. मला तर ‘वसुधा’ हा शब्द गायीला समानार्थी शब्द वाटायचा, अजुनही वाटतो. गाय आणि जमिन यांना एकच शब्द देण्यामागे, या दोघांचं प्राचीन जीवनातील महत्व आणि अलम मानववंशाला इथपर्यंत पोहोचवल्याचा सन्मान करण्याची भावना असावी.

‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी

गाई-म्हशी कुनाच्या, लक्षुमनाच्या..

लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा

दे माई खोबऱ्याची वाटी,

वाघाच्या पाठीत घालीन काठी..!!’

दिवाळीत घरोघरी म्हटल्या जाणाऱ्या या प्रसिद्ध लोकगिताकील शेवटची ओळ ‘वाघाच्या पाठीत घालीन काठी..!’ अशी आहे..गाई-बैलाच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष वाघाच्या पाठीत काठी घालण्याची तयारी दाखवली आहे, ती या गोधनाच्या प्रेमापोटीच..! यातही आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीचा मोठेपणा पहा. वाघाच्या पाठीत फक्त काठीच मारायची भाषा आहे, वाघाला ‘अवनी’सारखं जीवे मारायची नाही..! आपल्या निसर्गपूजक पूर्वजांना वाघाचं निर्सगातील महत्वाचं स्थान माहीत होतं व त्याचा आदरही ते करत होते असा अर्थ यातून काढता येतो.

थोडं विषयांतर. काल-परवाच यवतमाळला अवनी नांवाच्या वाघिणीचा डंके की चोटपर सरकारमान्य खुन करण्यात आला.त्याचा गाजावाजाही करण्यात आला. ‘अवनी’ म्हणजे पृथ्वी. वर्तमानात ‘अवनी’ला मारुन आपण आपलं भविष्य अधोरेखित केलं आहे असं मी समजतो. फटाक्यांवरची बंदी एकवेळ समजू शकतो, मात्र तेच न्यायलय वाघिणीला मारण्यातं समर्थन करतं हे पाहून कायद्याचं गाढवाशी असलेलं नातं मात्र अगदी घट्ट वाटू लागतं. सरकार कायद्याला जन्म देतं. याचा अर्थ a =b, b=c म्हणजे a=c या गणितीय सुत्राच्या न्यायाने, कायदा=गाढव, सरकार=कायदा म्हणून सरकार= गाढव अस होऊ शकतं का? असो.

कोकणातील माझ्या गांवाकडे या दिवशी ह्या दिवशी गावाकडे गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतात. गोठ्यात शेणाच्या गवळणी व श्रीकृष्णाच्या मूर्ती बनवल्या जातात. त्यांची पूजा केली जाते. विशेष म्हणजे ह्या दिवशी घरातल्या स्त्रियाना गोठ्यातलं कोणतही काम करू देत नाहीत. ही आपल्या ‘कृषीसंस्कृती’ने आपल्याच मूळ ‘मातृप्रधान संस्कृती’ला दिलेली मानवंदना आहे. या दोन संस्कृती हातात हात घालून चालल्या व म्हणून आपण इथवर पोहोचू शकलो. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, भूमी, गाय व स्त्री या तिघींमधे असलेल्या प्रसवक्षमतेचा, निरपेक्ष भावनेने व क्षमाशिलतेने पालन-पोषण करण्याच्या त्यांच्या भावनांचा, क्षमाशिलतेचा आपल्या जुन्या संस्कृतीन्ने केलेला हा आदर आहे. आज मात्र आपण या तिघींनाही बाजारात बसवलंय. किमान आजच्या दिवशी तरी या तिघीचं अखिल मानवजातीवर असलेल्या ऋणांचं स्मरण करायला विसरू नका. तसं केलं तरच आजची वसुबारस खऱ्या अर्थाने साजरी झाली असं म्हणता येईल.. अशा या दिवाळीच्या सुरुवातीच्या दिवशी गाय-

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

उद्याचा लेख ‘धनत्रयोदशी’..!!

-नितीन साळुंखे

9321811091

(चित्र-इंटरनेट व माझे फेबु मित्र श्री. नितीन वाघमारे यांच्या वाॅलवरून.)

संदर्भ-

लोकरहाटी – श्री. मुकुंद कुळे

संस्कृतीच्या पाऊलखुणा- श्री. द. ता. भोसले

खुप पूर्वीपासून वाचत आलेली आणखी अनेक लेखकांची अनेक पुस्तकं, ज्यांची मला आता नांवं आठवत नाहीत.

आली दिवाळी..

‘दिवाळी’वरील लेखमालिकेतील हा पहिला लेख. उद्यापासून ‘वसुबारस’ ते ‘भाऊबीज’ अशा दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती मी त्या त्या दिवशी देईन..!

आली दिवाळी..

गणपती गेल्यानंतर वेध लागतात ते नवरात्राचे व त्यानंतर येणाऱ्या दसरा दिवाळीचे..दुकाने नविन कपड्यांनी सजू लागतात, सेल सुरू होतात..वर्तमानपत्रांत इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्यांच्या मोठमोठ्या जाहीराती प्रसिद्ध होऊ लागतात अन् चाहुल लागते ती दिवाळीची..आणि दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत–

“दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी

गाई-म्हशी कुनाच्या, लक्षुमनाच्या..

लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा

दे माई खोबऱ्याची वाटी,

वाघाच्या पाठीत घालीन काठी..!!”

मऱ्हाठी समाजाच्या पिढ्यानपिढ्या या गाण्याने पहिली दिवाळी साजऱ्या करत आल्यात आणि अजूनही मऱ्हाटी कुटुंबातील लहान बाळाच्या हातात फुलबाजा देऊन त्याची दिवाळी याच गाण्याने साजरी केली जाते. तसा शहरी जीवनात आपल्याशी गाई-म्हशींचा संबंध कधी येत नसूनही शहरातली मराठी दिवाळी सुरू होते, ती याच गाण्याने, असं का आणि मुळात गाई-म्हशी आणि दिवाळीचा काय संबंध, असे प्रश्न मला नेहेमी पडायचे. पुढे अनेक पुस्तकांचं वाचन करता करता हळहळू याचं उत्तर सापडत गेलं. हा आनंद अवर्णनीय असतो. आनंद वाटला की वाढतो म्हणतात. या लोकगीताचा आणि दिवाळीचा अर्थबोध झाल्याने मला झालेला माझा आनंद द्विगुणीत होण्यासाठी तुमच्याशी वाटून घेतोय..!!

शहरात अत्यंत थाटामाटात व झगमगाटात आपण साजरी करत असलेल्या श्रीमंत दिवाळीची मुळं आपल्या ग्रामिण संस्कृतीत, गावाकडच्या मातीत रुजलेलीआहेत.. आपल्यासाठी दिवाळी म्हणजे नविन कपडे, फटाके, फराळ, कंदील आणि चार–सहा दिवसाचा आनंद येवढाच तपशील असतो, तर गावाकडे दिवाळी हा गत वर्षभरात निसर्गाने केलेल्या कृपेला स्मरून, नवीन वर्षातही अशीच कृपा आमच्यावर ठेव असं सांगत निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा असतो. आपल्या इतर सर्व सणांप्रमाणेच दिवाळी हे आपल्या प्राचीन व समृद्ध ‘कृषीसंस्कृती’चं आपल्याला देणं आहे..

पावसाळा संपून दसऱ्याला नवीन पिकांची कापणी झालेली असते. नविन पिकांच्या राशी खळ्यात सांडलेल्या असतात. अशाच वेळी शरद ऋतूच्या ऐन मध्यात,आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात, दिवाळी हा सण येतो..घरात नव्याने आलेल्या धान्यरुपी दौलतीची व ती ज्यांच्यामुळं प्राप्त झाली त्या गो-धनाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘दिवाळी’ सण साजरा करण्याची सुरूवात आपल्या ‘कृषीसंस्कृती’त प्राचीन काळी झाली. भूमातेने भरभरून दिलेल्या पिकातून स्वत:च्या वापरापुरतं धान्य घरात ठेवून जास्तीचं धान्य विकलं जायचं व त्यातून आलेल्या पैशातून घर बांधणी, घर दुरूस्ती, घराची रंग-रंगोटी, घरच्या लक्षुमीला एखादा सोन्याचा डाग व घरातील सर्वांनी नविन कपडे केले जायचे , घरात गोडधोड केलं जायचं, एखादी नवीन बैलजोडी किंवा गाडीखरेदी केली जायची. ही प्रथा आपण शहरातही अद्याप जिवंत ठेवलीय. शहरात दिवाळीच्या निमित्ताने आपण फराळाचे पदार्थ करतो, घराला रंग काढतो, एखादी महागडी वस्तू किंवा दागिने घेतो, शहरात बैलजोडी ऐवजी गाडी घेतली जाते. या प्रथांचं मुळ आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीत सापडतं..!

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिव्यांचे महत्व जगातील सर्वच मानवी संस्कृतीत आढळतं. अग्नीच्या शोधानंतर पशूच्या पातळीवर जगणारा आदिम मानव खऱ्या अर्थाने ‘मानव’ म्हणून उत्क्रांत झाला असे म्हटले तर चुकणार नाही. अग्नी हे मनुष्याला मिळालेलं सर्वात मोठ वरदान आहे आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत माणसाच्या जीवनातील बाळाच्या जन्मापासून ते चितेवर दहन होईपर्यंतचे सुख-दु:खाचे सर्वच प्रसंग अग्नीच्या साक्षीनेच साजरे होतात. तर मग दिवाळी हा कृषिसंस्कृतीतील सर्वात महत्वाचा सण आणि या महत्वाच्या सणादिवशी दिव्यांचा लख-लखाट होणे अगदी स्वाभाविक आहे. दिवाळीत दिव्यांचे महत्व आहे ते त्या अर्थानेच. अग्नीने मनुष्याच्या दैनंदिन व सांस्कृतीक जीवनात येवढे महत्वाचं स्थान का प्राप्तं केलं, यावर पुन्हा कधीतरी स्वतंत्रपणे लिहिण्याचा मानस आहे..!

ग्रामीण संस्कृतीतूनच शहरी संस्कृती उदयाला आल्यामुळं गावाकडची दिवाळी शहरातही आली. मात्र शहरीकरणाच्या वेगात दिवाळीचं रुपड साफ पालटून तो एक शहरी इव्हेन्ट झाला. असं असलं तरी शहरातल्या दिवाळीची सुरुवात आज हजारो वर्षानंतरही ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी..’ याच गाण्यानं होते. गावातून आलेल्या चाकरमान्यानीच शहर वसवलं असल्याने त्यांच्याबरोबरच गावातलं गाण शहरी जीवनात आलं, काळाच्या ओघात त्याचा अर्थ मागे पडला तरी मात्र ते शहरातही पक्क रुजलं..!

शहरातल्या घाईगर्दीत आपण अनेक गोष्टींसाठी शोर्टकट्स शोधत असताना मुळ उद्देश अपरिहार्यपणे बाजूला पडत असतो, तसच दिवाळीचही झालं. हा सण किंवा कोणताही सण आपण का साजरा करतो हेच आपण काळाच्या ओघात विसरून गेलो..परंतू आपल्या मुळ संस्कृतीची मुळं इतकी घट्टअसतात, की ती त्यांची ओळख, त्यांचं आपल्याशी असलेलं सख्खं नातं कोणत्या न कोणत्या रुपाने टिकवून ठेवत असतात. आपलं ग्रामीण संस्कृतीशी असलेलं तेच नातं ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ या गाण्यातून चिवटपणे टिकून राहिलेलं दिसतं. अर्थात प्रांता प्रांतानुसार हा सण साजरा करण्यात वेगळेपणा जरूर असतो, मात्र मुळ सण शेतीचाच हे सत्य त्यात असतच..

आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीतील आत्यंतिक महत्वाच्या दिवाळसणाची सुरवात ‘वसुबारस’पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. आपण वर्षभर वाट पाहात असतो व पुढचं वर्षभर मनात रेगाळत असलेला असा एकूण सहा दिवसांचा हा सोहळा..

दिवाळी संपली, की मग त्या वर्षातल्या सणांचीही सांगता होते व पुन्हा नविन वर्षात मकर संक्रमणाने हेच चक्र नव्याने सुरु होते, पुन्हा सर्व सण ओळीने येत जातात. आपण जुने होत जातो पण सण मात्र नव्याने भेटत जातात. मला तर वाटतं, की सणांमुळे जगायला मजा येते. सणांची वाट पाहात पाहात आयुष्य कसं सरतं हेच कळत नाही..

वर्षांतून केवळ मोजके सण साजरे करणारे त्यांतं आयुष्य कसं काढत असतील हा प्रश्न मला अनेकदा पडतो. ते कसंही असलं, तरी आपल्या इतकं समृद्ध नसावं हे नक्की. म्हणून तर इतर धर्मीय आपल्या आयुष्याचा वेळ लढाया किंवा धर्मप्रसार करण्यात घालवत असले पाहिजेत, असं मला वाटतं..! विविध जाती-पंथांमधे हिन्दू टिकले, त्याचं मोठं श्रेय निसर्गाच्या कलाने चालणाऱ्या आपल्या कृषीसंस्कृतीतील सणांना आहे असं मला वाटतं. आणि जसजस शेती आणि शेतकऱ्याचं महत्व कमी होतंय, तस तसं सणांचाही आनंद कमी होत चाललाय असंही माझं निरिक्षण आहे, काळजी करण्यासारखं जर काही असेल, तर ते हेच..सण संपले की मग आपणही संपू असं मला राहून राहून वाटतं..!

‘वसुबारस’ ते ‘भाऊबीज’ अशा दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती मी त्या त्या दिवशी देईन..!

– नितीन साळुंखे

9321811091

संदर्भ-

लोकरहाटी – श्री. मुकुंद कुळे

संस्कृतीच्या पाऊलखुणा- श्री. द. ता. भोसले

आणखी अनेक पुस्तकं, ज्यांची मला आता नांवं आठवत नाहीत.

ही सहा लेखांची माझी संपूर्ण लेखमाला साप्ताहीक ‘लोकप्रभा’, दि २८.१०.२०१६ मध्ये गतवर्षी प्रसिद्ध झालेली आहे..! – नितीन साळुंखे

पुलं वाचतची गेलो, तेथे पुलं होवूनिया ठेलो..!’

पुलस्पर्श होताच दु:खे पळाली

नवा सूर, आनंदयात्रा मिळाली..

नैराश्येतुनी माणसे मुक्त झाली

जगू लागली, हास्यगंगेत न्हाली..!

– कविवर्य मंगेश पाडगावकर

वेंगुर्ल्याच्या ‘साप्ताहिक किरात’च्या दिवाळी विशेषंकात ‘पु. ल. देशपांडें’वर प्रसिद्ध झालेला हा माझा लेख..

पुलं वाचतची गेलो, तेथे पुलं होवूनिया ठेलो..!’

‘साप्ताहिक किरात’च्या दिवाळी विशेषंकासाठी संपादकांनी ‘पु. ल. देशपांडें’विषयी लेख लिहायची सुचना केली. वास्तविक किरातच्या संपादकांची सुचना मी आज्ञा म्हणूनच घेतो. ‘किरातचा’ विषय होता पुलंच्या साहित्याचा माझ्या किंवा समाजाच्या जडण घडणीवर झालेला परिणाम. पुलंच्या लिखाणाचा समाजावर काय परिणाम झाला याचं मुल्यमापन करण्याइतका काही मी मोठा नाही, परंतु माझ्या स्वत:च्या वैचारिक जडण घडणीवर पुलंच्या साहित्याचा नि:संशय परिणाम झाला आहे. आज मी जे काही चार वेडेवाकडे शब्द लिहू शकतो, त्यामागे पुलंच्या साहित्याचा सिंहाचा वाटा आहे.

मला पुलं पहिल्यांदा भेटले, ते पहिल्यांदा ‘बटाट्याच्या चाळी’त. कुतुहल टक्क जागं असणाऱ्या शाळकरी वयातच मला पुलं भेटले हे माझं भाग्य. लहान वयातच मला वाचनाची सवय लागण्यामागे जसं रोजचा पेपर, चांदोबा, किशोर, चंपक यांचा मोलाचा वाटा होता, तेवढाच मोठा वाटा पुलंचा होता. पुढे जसजशी मला पुस्तकं उपलब्ध होत गेली, तसतसा पुलंची पुस्तकं वाचायचा मी सपाटा लावला. पुलंच्या पुस्तकांचं पहिलं वाचन मी आधाशासारखं केलं. त्या वाचनामागे निश्चित असा काही विचार नव्हता. पोटभर हसता यावं, याच एका उद्देशाने मी पुलंच्या साहित्याचा अक्षरक्ष: फडशा पाडता झालो.

पुढे जसं जशी समज येत गेली, तस तसे पुलं मी सावकाशीनं वाचत गेलो आणि दरवेळी पुलं मला नव्याने उलगडत गेले. पुलंवर खरं तर विनोदी लेखक म्हणून शिक्का मारून आपण त्यांच्यावर अन्याय केला आहे असं मला वाटतं. पुलं तत्वचिंतक होते. विचारवंत होते. तत्वज्ञानासारखा निरस, रुक्ष विषय पुलंनी आपल्याला विनोदाच्या माध्यमातून हसत खेळत शिकवला. आपण मात्र पुलंच्या सांगण्याकडे विनोद या पलिकडे पाहिलं नाही. त्यांचं साहित्य आपण डोक्यावर घेतलं, पण त्यातल्या विचाराकडे मात्र सोयिस्करपणे दुर्लक्षच केलं. रोजच्या जगण्यातूल नेमकी विसंगती पकडायची आणि ती न दुखावता विनोदाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवायची कशी, हे पुलंनीच दाखवून दिलं. खरंतर विनोदाच्या माध्यमातून पुलंनी तत्वज्ञानाचे जहाल डोस विनोदाच्या आवरणातून समाजाला पाजले असं मी समजतो. हेच जर त्यांनी जड शब्दांतून आणि उपदेश करायच्या आवेशाने शिकवलं असतं, तर पुलं हे ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व’ कधीच होऊ शकले नसते. तसं झालं असतं तर महाराष्ट्रातले एक विचारवंत म्हणून त्यांची पुस्तकं वाचनालयात वाचकांची वाट पाहात बसली असती. तसं झालं नाही हे महाराष्ट्राचं सुदैव आणि पुलंनी साध्या सोप्या शब्दांतून सांगितलेला विचार महाराष्ट्राने फारसा मनावर घेतला नाही, हे मात्र महाराष्ट्राचं दुर्दैवं..!

पुलंची बहुतेक सर्व पुस्तकं मी वाचली आहेत. पुन्हा पुन्हा वाचली आहेत. जेवढ्यांदा ही पुस्तकं मी वाचली, तेवढ्यांदा त्यातून नविन काहीतरी सापडत गेलं. गव्हापासूनच पोळ्यांचं पीठ, करंज्यांचा मैदा आणि गोडाच्या किंवा तिखटाच्या शिऱ्यासाठी रवा सापडावा, तसं. लिखाण एकच, पण दरवेळी नविन, अधिक रसदार आणि विचाराच्या तब्येतीला मानवणारं असं काहीतरी सापडतंच सापडतं. पुलंचं लेखन विचार कराचला भाग पाडतं. उदाहरणच द्यायचं तर, मी पुलंच्या ‘एक शुन्य मी’ या लेखसंग्रहाचं देईन. पुलंचा हा लेखसंग्रह माझ्यासाठी गीता, कुराण, बायबल काय म्हणाल ते आहे. जिवनातील प्रत्येक समस्येवर उत्तर आणि जिवनातले आनंदाचे क्षण कसे साजरे करावेत, यावरचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात मला सापडते. जेंव्हा जेंव्हा मी अस्वस्थ असतो, तेंव्हा तेंव्हा मी हे पुस्तक काढून त्यातला जो समोर येईल तो लेख काढून वाचत बसतो आणि माझ्या अस्वस्थपणावर त्यात ‘उतारा’ हमखास सापडतो आणि माझ्यातला तो अस्वस्थपणा शब्दांतून कागदावर उतरत जातो आणि मन मोकळं मोकळं होत जातं. हा लेख लिहितानाही मला पुलंवर काय लिहावं आणि काय नको ते मला कळत नव्हतं. पुलं माझं दैवत आहे. नको नको, दैवत म्हटलेलं पुलंना आवडणार नाही. पुलं मला माझे मित्र वाटतात. चांगल्यासाठी पाठीवर हाताने थाप मारणारे आणि चुकीच्या गोष्टीसाठी त्याच हाताने कान पिळणारे. अशा मित्रावर काय आणि किती लिहावं हेच मला समजत नव्हतं. अशा अवस्थेत मी सवयीप्रमाणे ‘एक शुन्य मी’ उघडलं आणि पुढचं सर्व आपोआप शब्दबद्ध होत गेलं..

समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेची एखाद्या कुशल शल्यविशारदाच्या नजाकतीने शल्यक्रिया कशी करावी, हे पुलंनी फार उत्तम रितीने दाखवलंय. ‘एक शुन्य मी’ या पुस्तकातल्या त्याच नांवाच्या लेखात पुलंनी म्हटलंय, मुंबईतील वांद्र्याच्या एका देवीची ‘दुखरे अवयव बरी करणारी देवी’ म्हणून ख्याती आहे. आपला जो अवयव दुखत असेल त्या अवयवाची मेणाची प्रतिकृती करुन देवीच्या चरणी वाहिली की त्या अवयवाचं दुखणं नाहीसं होतं अशी सर्वच भाविकांची श्रद्धा. यापेक्षा पुलंनी विनोदी अंगाने शंका विचारली, की त्यांच्या शेजारच्यांना मुळव्याध आहे, तर त्यांनी कोणता अवयव देवीला अर्पण करावा. यावर उत्तर नव्हतं. लोकांनी हसून वेळ मारून नेली, परंतू पुलंच्या प्रश्नातलं मर्म त्यांना बरोबर समजलं होतं. हेच जर ’ह्या तुमच्या साऱ्या अंधश्रद्धा आहेत’ असं जर पुलंनी एखाद्या तत्ववेत्याचा आव आणून सांगितलं असतं, तर धार्मिक भावना दुखावल्या म्हणून समाजात बरंच काही विपरीत घडलं असतं. पुलं पुढे म्हणतात, की देवी जर खरंच असे दुखरे अवयव दुरुस्त करत असेल, तर तिला सर्वांनी आपापल्या मेंदूची प्रतिकृती अर्पण करायला हवी, जेणे करुन लोकांचे मेंदू दुरुस्त होतील. पण तसं घडणार नाही असा विश्वासही पुलं व्यक्त करतात, कारण खरोखर तसं झाल्यास सर्वात पहिली देवळं, मशिदी नि चर्चेस इत्यादी दुकानं बंद होतील. देवालाही स्वत:च्या भवितव्याची चिंता आहेच की. लोकांनी मेंदू जागृत ठेवून वागावा हे पुलंनी विनोदाच्या आधाराने सांगितलं. माझेही देव आणि दैव यांच्यावरचे विचार काहीसे असेच असून, पुलंच्या पुस्तकांच्या वाचनाने त्यांना बळ मिळालं आहे. पुलंनी समाजातील अंधश्रद्धा आणि राजकारण यावर बराच काही लिहिलंय. माझेही हे दोन चिंतेचे विषय. मी माझ्या कुवतीने लिखाणाच्या माध्यमातून समाजात वाढीला लागलेल्या बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि हल्लीच स्वार्थांध राजकारणावर लिहायचा जो प्रयत्न करत असतो, त्यानागे पुलंची प्रेरणा आहे..

राजकारणातं झालेलं गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचाराचा माजलेला राक्षस यावरही पुलंनी वेळेवेळी निर्भिड टिका केली आहे. राजकारण हा समाज जिवनाचा गाभा होत चाललाय. राजकारणाचा दुष्परिणाम म्हणजे बुद्धीभेद करण्याचं प्रमाण वाढलेलं असून कुणाचाच कुणावर विश्वास राहीलेला नाही. तेंव्हाच्या राजकारणावर पुलंनी जे भाष्य करुन ठेवलंय, ते जसंच्या तसं आजही लागू पडतं. आणीबाणीच्या काळात काॅंग्रेसवर टिका केली असताना, “तुम्हा साहित्यिक लोकांना राजकारणातलं काय कळतं?” असा प्रश्न काॅग्रेसचे लोक विचारत असत. या सवालाला उत्तर देताना पुलंनी लिहिलं होतं, “खरं म्हणजे सामान्य जनतेलाच मुळात राजकारणातलं काय कळतं हा प्रश्न त्यांना विचारायचा असतो. तुम्ही आम्हाला निवडून दिलंत की तुमचं काम संपलं. त्यानंतर आम्ही जी तत्वभ्रष्टता दाखवतो, जो भ्रष्टाचार करतो, आज मिठ्या मारलेल्या राजकीय पुढाऱ्याचा उद्या गळा दाबायला जातो, काल ज्याला हुकूमशहा म्हणत होतो त्याच्या टोळीशी नाते जमवून त्याला आज लेकशाहीवादी म्हणतो हे सारे काय आहे असले प्रश्न विचारू नका. हे राजकारण आहे, तुम्हाला कळणार नाही.” पुलंनी हे सन १९७९ मधे लिहिलेल्या ‘सत्तेच्या साठमारीत लोकशाहीचा बळी’ या लेखातलं म्हणणं मला मध्यंतरी जेंव्हा खासदार श्रीमती पुनम महाजनांनी ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांना उद्देशून ‘कलाकार, साहित्यिक यांनी फालतू भाष्य करु नये” असे उद्गार काढले होते, त्या समयाला आठवलं. मी त्यावेळेस सोशल मिडियावर श्रीमती पुनम महाजनांच्या त्या वक्तव्यावर टिका केली होती, त्यानागे माझ्या स्वत:च्या विचारांसोबत पुलंच्या विचारांचाही पगडा होता. पुलंच्या वेळपेक्षा आताचं राजकारण जास्त कोडगं, जास्त निर्लज्ज, जास्त क्रिमिनल झालंय. पेपरात पुराव्यासकट भ्रष्चाचार सुद्ध करणारे लेख लिहिले तरी त्याची दखल घेतली जात नाही, भ्रष्चाचारासाठी जबाबदार अधिकाऱ्याना जाब विचाराचं सोडाच, त्याला बढती दिली जाते. अशावेळी गप्प मी एकटा/एकटी काय करणार म्हणून गप्प न बसता राजकारणी आणि अधिकारी यांच्या गैरकृत्यांचा जमेल तसा आणि जमेल तेवढा निषेध करायलाच हवा हे मी पुलंकडून शिकलो.

पुलंच्या निरीक्षणाबद्दल मी काय बोलाव? अगदी साध्या साध्या गोष्टीतून पुलंनी जे चिंतन केलाय, त्याला तोड नाही. साधी विराम चिन्ह घ्या. रोजच्या वापरातल्या प्रश्नचिन्हावर लिहिताना पुलं म्हणतात, “प्रश्नातून या जगातल्या कुणाचीच सुटका नाही..! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोश्वास घेणे की वेळोवेळी पडत असलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? – हा देखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका..! त्या प्रश्नाचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा संकेतील भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नाचिन्हाच्या त्या आकृतीखालीच टिंब, म्हणजे शून्य हे त्याचे उत्तर असते.” वर वर पाहताना हे वाचायला छान वाटते. पण या छोट्याश्या वाक्यांतून पुलंनी आपल्याला आपलं रोजचं आयुष्य जगताना पडणाऱ्या विविध प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायला हवा असा संदेश दिला आहे. ती उत्तर शोधताना कदाचित हाती काहीच लागणार नाही, परंतु ती उत्तर शोधताना काहीतरी दुसर, अनपेक्षित आणि मनाला उभारी देणार काहीतरी नक्की सापडेल, असाही संदेश पुलंनी दिला आहे, असं मी मानतो, कुठे काहीकाळ थांबायचं, हल्ली कुठे पूर्ण थांबायचं, कुठे वळायच आणि कुठे काय बोलायचं, याच कुणाला फार भान असेल अस वाटत नाही. अलीकडे विराम चिन्हेही कुणी वापरताना दिसत नाही. मग ती योग्य त्या ठिकाणी असावीत याची काळजी करण्याच कुणाला काही कारणच उरत नाही. आपल्या आजच्या जगण्याच प्रतिबिंब असं विराम चिन्हांतून दिसत असत. पुलंचा हा उपदेश आता माझ्या जगण्याचा पाया झाला आहे. मी हि अनेक प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात भटकत असतो. त्या भटकण्यातून माझ्या हाती बरचस ठोस असं काहीतरी सापडत असत. त्या साप्द्लेल्यातून पुन्हा नवे प्रश उभे राहत असतात आणि पुन्हा त्यांची उत्तर शोधण्याच्या मागे मी जात असतो. निखळ आनंदाचा खेळ आहे हा. पुलंचा माझ्या वैचारिक जडणघडणीवर झालेला हा सर्वात सुंदर परिणाम आहे. पुलंनी विनोदाच्या माध्यमातून, माणसाने माणूस म्हणून कसे वागावे आणि कसे नाही, हे फार सुंदर रीतीने दाखवून दिले आहे आणि मी तसं जगण्याचा प्रयत्न करत असतो..मी पुलं व्हायच्या प्रयत्न करतोय, सातत्याने करतोय.

वारकरी साहित्यात देव पहायला गेलेला भक्त हा देवच होतो, अशी मान्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देव पहावया गेलो । तेथे देवची होवूनी ठेलो ।“. पुलंबद्दल माझी नेमकी अशीच भावना आहे. मी तुकाराम महाराजांसारखा थोर भक्त नाही किंवा पुलंसारखा थोर विचारवंत लेखकही नाही. परंतु तुकाराम महाराज जसे नेहेमी पांडुरंगाच्या वाटेवर चालत राहिले, तशीच काहीशी माझीही भावना पुलाच्या साहित्याच वाचन करताना असते. म्हणून म्हणालो, “पुलं वाचतची गेलो, तेथे पुलं होवूनिया ठेलो..!’

– नितीन साळुंखे

९३२१८ ११०९१.

आठवणीतील दिवाळी..

आठवणीतील दिवाळी..
(Repost)

माझ्या लहानपणीची दिवाळी खुप छान असायची. माझा लहानपण म्हणजे मला समजू लागल्यापासून समज येईपर्यंतचं वय. नेमकं सांगायचं म्हणजे ६८-६९ सालापासून ते ८०-८५सालापर्यंतचा काळ. मी तेंव्हा अंधेरी पूर्वेच्या पंपहाऊस येथील एका बैठ्या चाळीत राहायचो. तेंव्हा चाळीच असायच्या आणि दुसरा वर्ग थेट बंगला. बलाक, फ्लॅट अद्याप जन्मले नव्हते. आणि चाळीला चाळच म्हणत, ‘स्लम’ हा तुच्छतादर्शक शब्द अवतरला नव्हता. माझ्या समोरही अशीच एक बैठी चाळ होती. समोरासमोरच्या दोन्ही चाळीतील मिळून १६ खोल्यांत तिन गुजराती बिऱ्हाडं सोडली, तर बहुतेक सर्व मालवणी आणि मालवणी माणूस म्हणजे मुर्तीमंत उत्साह. चाळीतील खोली म्हणजे, एकून दिडशे चौ-फुटाच्यावर लांबी, रुंदी नसलेल्या खोलीत बसवलेले दोन लहान खण. लांबी-रुंदी-उंची नसुनही तिला खोली म्हणायचे, कारण तिच्यात राहाणारी गरीब माणसं मनाने खोल होती. आतासारखा फ्लॅट उथळपणा तेंव्हा कुणाच्यातच नव्हता. चाळीतील अशा खोलीत राहाणारांना आत आंघोळीसाठी मोरी आणि वर कौलं. निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी थेट निसर्गातच जायला लागायचं. तेंव्हा आजुबाजूला खरा आणि बक्कळ निसर्ग होता आणि प्रदुषण हा संधीसाधू शब्द तेंव्हा कुणालाच माहित नव्हता. तेंव्हाच्या सरकारलाही बरीच कामं असावीत बहुदा. त्यामुळे आपापली पोटं कोण कुठं साफ करून प्रदुषण करतंय, यावर सरकारचं लऱ्क्षही नसायचं. लक्ष असलंच, तर भटक्या गाई-बैलांचं असायचं. आता सरकार आणि प्रदुषण, असे दोघही गंभीर झाल्याने निसर्गाच्या सानिध्यात करायच्या गोष्टी घरात करायला लागतात.

आमच्या चाळीतले बाबालोक कामाला कुठेतरी प्रायव्हेट कंपनीत किंवा मग एसआयसी किंवा पोष्टात. प्रायव्हेटमधे सरकारी नोकरीपेक्षा थोडासा पगार जास्त असे, वर बोनसही मिळे. सरकारात तेंव्हा फक्त पगारावरच समाधान मानायला लागे. त्यामुळे आतासारखी सरकारी नोकरी करण्याकडे कोणाचा फारसा कल नसायचा. सरकारी नोकरीतून देशसेवा वैगेरे करता येत असल्याचा साक्षात्कार साधारण ८४-८५ सालापासून सुरू झाला आणि आता तर सरकारी नोकरीतून देशसेवा करायला मिळावी म्हणून लोक काहीही तयार आहेत. असो, घरात कमावते फक्त बाबा आणि आया घरी. तेंव्हा आयांनी नोकरी करण्याची प्रथा आजच्यासारखी सर्रास झाली नव्हती. मुलं कमीतकमी चार असायचीच. रात्री जेवणं झाली, की मग दोन चाळीतल्या मधल्या गल्लीत बायका पोरांचा गप्पांचा फड रंगायचा. गप्पांचा ग्रुप वयेमानानुसार ठरायचा. पुरुषांचे पत्ते सुरू व्हायचे. दुसरी करमणूक काहीच नसायची.

अशा या चाळीतल्या वातावरणात दसरा संपला की मग कुठूनतरी रंगांचा वास यायला सुरुवात व्हायची. चाळीतल्या कुणीतरी घरात रंगकाम करायला घेतलेलं असायचं. रंगाचा तो विशिष्ट वास माझ्यासाठी दिवाळी नजिक आल्याची वर्दी देणारा दूत बनूनच यायचा. आजही, माझ्या वयाच्या ५२व्या वर्षात, कुठेही आणि कोणत्याही मोसमांत रंगाचा वास आला, कि मला चटकन दिवाळीच आठवते, इतकं रंग आणि दिवाळी यांचं नातं माझ्या मनात पक्कं ठसलं आहे. आता तिन रुमांच्या एकाच फ्लॅटमधील एका रुमच्या बंद दरवाज्याआड काय चाललंय, ते त्याच फ्ल्याटातल्या दुसऱ्या रुममधे कळत नाही, तर शेजारच्या फ्लॅटातलं काय डोंबलं (हा उच्चार मी ‘डोंबलं’ असाच करतो.) कळणार? प्रदुषणाप्रमाणे प्रायव्हसी ही दुसरी अतिरेकी, ही आधुनिक काळाची देण. कालाय तस्मै नम:. आताही टिव्हीवर नेरोलॅक किंवा एशीयन पेंट्सच्या जाहिराती दिसायला लागल्या, की माझ्या मनात दिवाळी सुरू होते. रंग आणि दिवाळीचं नातं तेच लहानपणातलं असलं, तरी ते काळासोबत ते रंगांचा गंध ते रंगांचं चित्र एवढं बदललंय. हे ही कालाय तस्मै नम:..

दसऱ्याला सुटलेले रंगकामाचा वास विरतोय न विरतोय, तोच कोजागिरीपासून पुढे घराघरांतून जात्यांची घरघर ऐकायला यायची. आधी जात्यावर दळल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पिठांचा दरवळ आणि नंतर तळल्या जाणाऱ्या फराळाच्या पदार्थांचा घमघमाट चाळीत घुमायला लागायचा आणि ‘पहिली आंघोळ’ आता अगदी तोंडावर आल्याचं कळायचं. तेंव्हा आजच्यासारखा आपण आपल्या घरापुरता फराळ करण्याची पद्धत नव्हती. ‘रेडीमेड’ असा शब्दही तेंव्हा जन्मलेला नव्हता. चाळीतल्या सर्व स्त्रीया रात्री एकमेकींच्या घरी जाऊन लाडू, करंज्या, चकल्या, शेव, शंकरपाळ्या, चिवडा वैगेरे पदार्थ करीत. कोणाच्या घरी कोणता पदार्थ करायला कधी जायचं, याचा दिवस, नाही रात्र ठरलेली असायची. हा कार्यक्रम हमखास कोजागिरीनंतरच्या दोन-चार दिवसांनी सुरू व्हायचा ते पहिल्या आंघोळीच्या दोन दिवस अगोदर संपवायचा. पहिल्या आंघोळीपूर्वीचे ते आठ-दहा दिवस तर चाळीतलं वातावरण भारलेलं आणि खमंग वासाने भरलेलं असायचं.

इकडे आमची कंदील तयार करायची धांदल उडालेली असायची. चाळीतील सर्व १६ बिऱ्हाडांसाठी एकाच प्रकारचे कंदील करायचं काम आमच्याकडे असायचं. आम्ही तिन-चारजण मुलं कागद, गोंद खरेदी करून दिवाळीच्या दोन दिवस अगोदर कंदीलाचं काम आटोपून टाकायचो. कंदील प्रत्येक खोलीच्या बाहेर लागून प्रकाशमान झाले, की आम्हाला कृतकृत्य वाटायचं. मग टेलर आणि वेळ यांचा नवरा-बायकोचा संबंध तेंव्हाही माहित असल्याने, टेलरकडे शिवायला दिलेले कपडे देण्याचा तगादा त्याच्या मागे लावायचा. रेडीमेड हा शब्द फराळासारखाच कपड्यांनाही तेंव्हा लागू झाला नव्हता. तेंव्हा वर्षातून एकदाच नवे कपडे मिळायचे, ते ही दिवाळीतूनच. कापडखरेदी रंगकामासोबतच झालेली असायची. कापड मळखाऊ आणि टिकावू असणं एवढाच निकष असायचा, म्याचिंग-बिचिंगची भानगड नसायची. कपडेही ‘बॅंन्ड’वाल्यांलारखे एकाच प्रकारचे. आता ‘ब्रॅन्ड’मधे किंमत सोडली तरी वेगळं काय असतं..! रंगाप्रमाणेच आजही नविन कपड्यांचा तो कोरा गंधं आणि त्यांची सरमिसळ झाल्याने टेलरच्या दुकानात येणारा एक विशिष्ट वास मला हमखास लहानपणीच्या दिवाळीची आठवण करून देतो. आज कपड्यांचा सुकाळ झाला असला, तरी दिवाळीच्या निमित्ताने कपडे खरेदी करायची हौस अद्याप टिकून आहे. या कपड्यांची मजा आणि त्यांचा तो गंध काही औरच..!

मग ती रात्र उजाडायची. पहिल्या आंघोळीच्या आदल्या दिवसाची रात्र. प्रत्येक मजेच्या दिवसाचा हा जो आदला दिवस असतो ना, तोच खुप मजेचा असतो. उद्या मजा ही कल्पनाच मोठी मजेची असते. रविवारपेक्षा शनिवरीच रविवारचं सुख रविवारपेक्षा जास्त अनुभवता येतं, तसंच..! प्रत्यक्ष सुखापेक्षा सुखाची कल्पनाच जास्त सुखदायी असते, तसंच दिवाळीच्या आदल्या रात्री वाटायचं. रात्री रांगेळीच्या ठिपक्यांचा कागद, रांगोळीची पुस्तकं, रंगांच्या डब्या शोधून ठेवलेली असायची. रात्री रांगोळीची जागा लाल गेरूने सारवून ठेवायची आणि उद्या पहाटे लवकर उठायचं म्हणून लवकर झोपून जायचं.

मग आतुरतेने वर्षभर वाट पाहात असलेली ती पहिल्या आंघोळीची पहाट अवतरायची. वाजण्याइतपत थंडी पडलेली असायची. तेंव्हाची पहाट, पहाटे ५ वाजताच व्हायची. परिसरातून दिवाळीच्या स्वागतासाठी फटाक्यांच्या जोरदार सलामी सुरु झालेल्या असायच्या, त्या आवाजाने जाग यायचीच. आजुबाजूच्या खोल्यांतून चालू झालेली मालवणी गडबड, दोन सुत जाड पत्र्यांच्या भिंतीतून स्पष्ट ऐकायला यायची. उठलो की आई आंघोळीकरता मोरीत ढकलायची. थंडीतलया पहाटेच उठून आंघोळीच्या पूर्वी ते थंडगार उटणं अंगाला लावताना अंगावर अगदी काटा यायचा पण पुढची मज्जा दिसत असल्याने तो जाणवायचा नाही. उटणं लावून झालं की मस्त कढत पाण्याचे दोन तांबे अंगावर एतून घ्यायचे आणि अंगाला सुवासिक साबण लावायचा. सुवासिक हा शब्दही नंतरचा, आम्ही त्याला वासाचा साबण म्हणायचो. कारण एरवी वर्षभर ‘लाईफ बाॅय’ नांवाचा एक वासहीन ठोकळा साबण म्हणून वापरलेला असायचा. कपड्यांप्रमाणे या गंधहीन साबणाचा निकषही मळखाऊ आणि टिकावू एवढाच असायचा. त्यामुळे लाईफ बाॅयच्या व्यतिरिक्त कोणताही साबण, आमच्यासाठी वासाचाच असायचा.

पहिली आंघोळ झाली, की मी रांगोळी काढायला बसायचो. मला रांगोळी काढायची अतोनात हौस होती तेंव्हा. हे काम इतर घरातल्या बायका करायच्या तर आमच्याकडे मी. माझी रांगोळी तेंव्हाच्या माझ्या वयाच्या मानाने चांगलीही यायची. एका वर्षी मी काढलेली झाडावर बसलेल्या मोराची चित्ररांगोळी माझ्याच मनात इतकी पक्की बसलीय, की मला कुठेही मोराचं चित्र पाहिलं, की मला ती रांगोळीच आठवते. रांगोळी काढून होईपर्यंत दोस्त कंपनी जमा झालेली असायची आणि मग फटाके फोडणं या मुख्य कार्यक्रमाकडे वळायचं. जेवढा औरंगजेब गाण्यात मशहूर होता, तेवढाच मी खाण्यात असल्याने, फराळ हा खाण्यासाठी नसून फक्त वास घेण्यापुरताच असतो हा माझा समज आजही कायम आहे. त्यामुळे फराळाला फाटा देऊन, नवे कपडे घालून फटाके फोडणं हा मुख्य कार्यक्रम सुरु व्हायचा.

फटाक्यांत फुलबाजे, लवंगी, केपा, आणि अगदीच कोणा दोस्ताच्या हौशी बाबांनी घेऊन दिलेले ‘ताजमहाल’ बाॅम्बची लडी. लक्ष्मीबाॅम्ब आमच्यापेक्षा माठ्या मुलांचा प्रांत होता. ‘लक्ष्मी’ आणि ‘ताजमहाल’ ही वाजवायच्या फटाक्यांची नांवं आहेत एवढंच माहित होतं तेंव्हा, हे ‘स्फोटक’ ऐवज आहेत हे आत्ता आत्ता कळतंय. असो. केपा किंवा टिकल्या फोडण्यासाठी हातोडी असायची. पिस्तुलांची हौस परवडण्यासारखी नव्हती. जमिनचक्र, पाऊस वैगेरे ठराविकच, म्हणजे अर्धा डझनच, मिळायचे म्हणून ते जपून वापरायचे. इतके जपून की त्यातले काही पुढे दिवाळी संपल्यानंतरही शिल्लक राहायचे. अर्थात प्रत्यक्ष फोडण्यापेक्षा ते शिल्लक राहीले ह्याचा आनंदही काही कमी नसायचा. शिल्लक राहाण्यासारखंच वापरायचं याची शिकवण तेंव्हा अशी नकळत मिळायची. ही सवय मग पुढे सर्वच बाबतीत लागली. लवंगी, ताजमहाल फोडतानाही पूर्ण माळ लावायची नाही, तर त्या माळेतला एक एक लहान फटाका सुटा करून अगरबत्तीने शिलगावून करून एक एक करून फोडयचा. अख्खी माळ फोडण्यापेक्षा ती सुटी करून एक एक करून आणि ते सर्व मित्रांनी मिळून फटाके फोडण्यात मजा असते हे तेंव्हाच कळल होतं. पहाटे पाच ते साधारणत: सात-साडेसातपर्यंतचे दोन-अडीच तास, परिसरात वाजणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेलेला असायचा. पुढे पहाटे लवकर उठणं झालेलं असल्याने सकाळी १०-११ च्या दरम्यान पेंग येऊ लागायची. उत्साह तर असायचा पण डोळे आपोआप मिटले जायचे आणि ‘पहिल्या आंघोळी’च्या सुखात झोपून जायचं.

आणि हो, माझी लहानपणीची दिवाळी दिवाळी अंकांशीही निगडीत आहे. तेंव्हा आतासारखे भरमसाठ जाहिरातींनी भरलेले व काही तेवढ्यासाठीच काढलेले दिवाळी अंक नसायचे. आवाज, जत्रा, हंस, मोहिनी, दक्षता, किशोर इ. मोजकेच अंक तेंव्हा मिळत. ते ही कोणाकडे गेलो तरच. दिवाळी अंक विकत घेणं शक्यच नव्हतं, तरी शेजारची काही घरं ते घ्यायची. तिथे दमतील तसे वाचून त्यांचा फडशा पाडायचा बे काम मी आवडीने करायचो. पुलं, वपु, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, श्रीकांत सिनकर इत्यादी माझ्या दैवतांची पहिली ओळख मला दिवाळी अंकांतूनच झाली. खलिल खानांची, मंगेश तेंडुलकरांची त्यावेळच्या अंकात पाहिलेली व्यंग चित्र आजही मनात घर करुन आहेत. ‘आवाज’मधली खिडकी चित्र पाहात राहाविशी वाटायची, पण ती चोरून पाहावी लागायची. पुढे थोडं कळतं झाल्यावर त्यातील मजा समजू लागली. मिळवता झाल्यावर मी दिवाळी अंक आवरजून विकत घेऊ लागलो. आजही थोडेतरी दिवाळी अंक घेतल्याशिवाय मला दिवाळी, दिवाळी वाटतच नाही..पण लहानपणीची ती मजा मला आताच्या दिवाळी अंकांतून नाही मिळत हे मात्र खरं..!!

आता सर्वच बदललं. सुखाच्या, आमंदाच्या कल्पनाही बदलल्या. काळाबरोबर हे सारं बदलणारच, पण त्या लहानपणात अनुभवलेल्या दिवाळीचं सुखं आताच्या अनुभवतांना, नकळतच ‘आमच्या वेळची’ दिवाळी काही औरच आणि जास्त राजस होती असं वाटतं. हे प्रत्येक पुढीला वाटत असतं. आम्ही लहान असताना आमच्या आईवडीलांनाही तसंच वाटत असणार यात शंका नाही. पुढे जाणारी प्रत्येक पिढी आपल्या मागच्या दिवसांत रमलेली असतेच. असं रमलेलं असताना आपण जगतोय मात्र आताच्या काळात, हे विसरून चालणार नाही. जुन्या आठवणी कायम ठेवून नविन काळात स्वत:ला रुजवणं आवश्यक आहे..

असं असुनही काही गोष्टी स्विकारला अजून मन होत नाही. उदा. फटाक्यांचा आवाज. फटाक्यांचा दणदणाट नाही, तो धुराचा संमिश्र वास नाही, तर दिवाळी कसली, असा तेंव्हा माझा समज होता आणि आजही आहे. मला तर आजची पहिली आंघोळ, पहिली आंघोळ वाटलीच नाही. यंदा फटाका फोडल्याचा दणदणीत मरो, पुसटसाही आवाज ऐकलेला नाही. दिवाळीसारखी सणांची राणी येणार आणि तिला आपण फटाक्यांच्या तोफांच सलामी देणार नाही, तर मग वर स्वर्गात बसून, दिवाळीला खाली पृथ्वीवर पाठवणाऱ्या देवांना, ती पृथ्वीवर पोचल्याचं कळणार कसं? आता तर फटक्यांवर कोर्टाने बंदी घातलीय. कोर्ट पूर्वीही होती, पण पूर्वीच्या कोर्टालाही तेंव्हा न्यायदानाचंच काम असल्याने, ते लोकांच्या आनंदात आतासारखं नाक किंवा तत्सम चीजा खुपसतही नसे. (अर्थात लोकंही संयमाने वागायचे आणि हा संयम गरीबीचं डिफाल्ट बायप्राॅडक्ट होतं हे ही खरंच.) काळा आणि पांढरा असे दोनच रंग माहित असणाऱ्या कोर्ट आणि सरकारादी कौतुकांना, दिवाळीची बहुविध रंगांची, गंधांची आणि आवाजाची दुनिया काय कळणार..!

लहानपणीची मी अनुभवलेला दिवाळीचा जादुई काळ माझ्या वयाच्या प्रत्येकाने अनुभवला असावा. आताच्या ‘प्रदुषण’, ‘प्रायव्ह’सी इतक्याच ‘परिक्षा’ या भयंकर शब्दानं, तेंव्हा आमचं बालपण हिरावून घेतलं नव्हतं. अभ्यास हा शाळेतच करायचा असतो हा अनुभवसिद्ध समज होता. तेंव्हाच्या शाळेत ज्ञानाच्या व्याख्येत बसेल असं काहीतरी गवसायचं आणि त्याचं प्रात्यक्षिक समाजात पाहायला, अनुभवायलाही मिळायचं. चार आकडी पगार ही श्रीमंतीची कल्पना असलेल्या त्या दिवसांत, गरीबी हा काॅमन फॅक्टर असल्याने, सर्वांच्या आनंदाची व्याख्याही कमी-अधीक फरकाने सारखीच असायची. सर्व माणसं समान पातळीवर असायची. थोडक्या गोष्टीत काय गंमत असते, हे आता सर्वच उतू जाणाऱ्या परिस्थित जन्मलेल्या आताच्या पिढीला नाही कळायचं.

असो. कालाय तस्मै नम: म्हणत आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि जे जसं समोर आलंय, ते तसंच आनंदाने उपभोगायचं. ही शिकवणही बालपणीचीच..!!

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!

-नितीन साळुंखे
९३२१८११०९१