आली दिवाळी..-लेख १.
वसुबारस..
वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबुवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच, कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे. पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, कायदा गाढव असतो..!
आज वसुबारस. अर्थात गोवत्सद्वादशी. पारंपारीक दिवाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली. वसुबारस म्हणजे सवत्सधेनुच्या पुजनाचा दिवस. ज्या गोवंशाच्या मदतीने शेतीतून धान्य पिकवले गेले, त्या गोधनाची कृतज्ञता म्हणून, तिची तिच्या वासरासहीत पुजा करण्याचा हा दिवस. गाय हिन्दू संस्कृतीत अत्यंत पूजनीय आहे, त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तिच्यापासून उत्पन्न झालेल्या बैलांशिवाय शेती अशक्य..! तिच्याप्रती कृतज्ञता म्हणूनच कृषीसंस्कृतीतील दिवाळी या सर्वात महत्वाच्या सणाची सुरूवात गो-पूजनाने केली जाते. गोठ्यातील गायी, म्हशी आणि बैल, शेळ्या-मेंढ्या हीच शेतकऱ्याची खरी धनदौलत. या गोधनाची कृतज्ञता पूजा म्हणजे वसूबारस..
‘वसू’ या शब्दाचा एक अर्थ ‘धन’ किंवा ‘संपत्ती’ असा होतो, वसुधा म्हणजे पृथ्वी म्हणजे जमीन. आज जमिनीला आलेल्या किंमतीमुळे तिची किंमत सर्वांना समजली आहे. परंतु पूर्वीच्या काळात धन-संपत्ती असायची ती गुरा-ढोरांच्या स्वरुपात. गोधन म्हणायचे त्याला. आता पन्नास-पंचावन्न वयात असलेल्याना आठवत असेल, की त्यांच्या लहाणपणातली गाय हटकून ‘वसुधा’ नांवाची असायची, ती गोधन या अर्थानेच असावित. मला तर ‘वसुधा’ हा शब्द गायीला समानार्थी शब्द वाटायचा, अजुनही वाटतो. गाय आणि जमिन यांना एकच शब्द देण्यामागे, या दोघांचं प्राचीन जीवनातील महत्व आणि अलम मानववंशाला इथपर्यंत पोहोचवल्याचा सन्मान करण्याची भावना असावी.
‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कुनाच्या, लक्षुमनाच्या..
लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी..!!’
दिवाळीत घरोघरी म्हटल्या जाणाऱ्या या प्रसिद्ध लोकगिताकील शेवटची ओळ ‘वाघाच्या पाठीत घालीन काठी..!’ अशी आहे..गाई-बैलाच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष वाघाच्या पाठीत काठी घालण्याची तयारी दाखवली आहे, ती या गोधनाच्या प्रेमापोटीच..! यातही आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीचा मोठेपणा पहा. वाघाच्या पाठीत फक्त काठीच मारायची भाषा आहे, वाघाला ‘अवनी’सारखं जीवे मारायची नाही..! आपल्या निसर्गपूजक पूर्वजांना वाघाचं निर्सगातील महत्वाचं स्थान माहीत होतं व त्याचा आदरही ते करत होते असा अर्थ यातून काढता येतो.
थोडं विषयांतर. काल-परवाच यवतमाळला अवनी नांवाच्या वाघिणीचा डंके की चोटपर सरकारमान्य खुन करण्यात आला.त्याचा गाजावाजाही करण्यात आला. ‘अवनी’ म्हणजे पृथ्वी. वर्तमानात ‘अवनी’ला मारुन आपण आपलं भविष्य अधोरेखित केलं आहे असं मी समजतो. फटाक्यांवरची बंदी एकवेळ समजू शकतो, मात्र तेच न्यायलय वाघिणीला मारण्यातं समर्थन करतं हे पाहून कायद्याचं गाढवाशी असलेलं नातं मात्र अगदी घट्ट वाटू लागतं. सरकार कायद्याला जन्म देतं. याचा अर्थ a =b, b=c म्हणजे a=c या गणितीय सुत्राच्या न्यायाने, कायदा=गाढव, सरकार=कायदा म्हणून सरकार= गाढव अस होऊ शकतं का? असो.
कोकणातील माझ्या गांवाकडे या दिवशी ह्या दिवशी गावाकडे गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतात. गोठ्यात शेणाच्या गवळणी व श्रीकृष्णाच्या मूर्ती बनवल्या जातात. त्यांची पूजा केली जाते. विशेष म्हणजे ह्या दिवशी घरातल्या स्त्रियाना गोठ्यातलं कोणतही काम करू देत नाहीत. ही आपल्या ‘कृषीसंस्कृती’ने आपल्याच मूळ ‘मातृप्रधान संस्कृती’ला दिलेली मानवंदना आहे. या दोन संस्कृती हातात हात घालून चालल्या व म्हणून आपण इथवर पोहोचू शकलो. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, भूमी, गाय व स्त्री या तिघींमधे असलेल्या प्रसवक्षमतेचा, निरपेक्ष भावनेने व क्षमाशिलतेने पालन-पोषण करण्याच्या त्यांच्या भावनांचा, क्षमाशिलतेचा आपल्या जुन्या संस्कृतीन्ने केलेला हा आदर आहे. आज मात्र आपण या तिघींनाही बाजारात बसवलंय. किमान आजच्या दिवशी तरी या तिघीचं अखिल मानवजातीवर असलेल्या ऋणांचं स्मरण करायला विसरू नका. तसं केलं तरच आजची वसुबारस खऱ्या अर्थाने साजरी झाली असं म्हणता येईल.. अशा या दिवाळीच्या सुरुवातीच्या दिवशी गाय-
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
उद्याचा लेख ‘धनत्रयोदशी’..!!
-नितीन साळुंखे
9321811091
(चित्र-इंटरनेट व माझे फेबु मित्र श्री. नितीन वाघमारे यांच्या वाॅलवरून.)
संदर्भ-
लोकरहाटी – श्री. मुकुंद कुळे
संस्कृतीच्या पाऊलखुणा- श्री. द. ता. भोसले
खुप पूर्वीपासून वाचत आलेली आणखी अनेक लेखकांची अनेक पुस्तकं, ज्यांची मला आता नांवं आठवत नाहीत.