आठवणीतलं लहानपण..
माझा जन्म ६५ सालच्या डिसेंबरातला. मी लहान असताना देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ऐन तारुण्यात होतं. त्या माझी आई हौशी असल्यानं, भर तारुण्यात असलेल्या भारतीय स्वातंत्र्याचे २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट हे दोन दिवस घरात जमेल तसं गोड-धोड करुन साजरे व्हायचे. त्याकाळी सर्वच घरात हे व्हायचं. तसाच १४ नोव्हेंबर हा दिवसही गोडानेच साजरा केला जायचा. पण एवढंच. यापेक्षा बालदिन काही वेगळा असतो हे माहित नव्हतं.
माझ्या शाळेतल्या रुजलेल्या आठवणी इयत्ता चौथीपर्यंतच्या आहेत. नंतरच्याही बऱ्याच आहेत, पण त्यांची तुलना त्या चौथीपर्यंतच्या आठवणींशी होऊ शकत नाही, कारण नंतरच्या वाडत्या वयाच्या आणि वाढत्या उंचीच्याही दिवसांनुसार त्यात अनेक आयाम मिसळले गेलेत. बालपण हे चौथीपर्यंतच.
बालदिनाला त्यावेळी शाळेत आम्ही काय करायचो हे आता आठवत नाही, पण हा चाचा नेहरुंचा काहीतरी सण असतो व तो शर्टला गुलाबाचं फुल खोचून साजरा करायचा असतो, असं मला अंधुकसं आठवतं. मी पूर्व प्राथमिक शाळेत असताना आम्हा सर्व मुलांना शिकवायला ‘शर्ट’ नसून ‘साडी’ असल्याने, हा दिवस बाईंच्या तोंडून चाचा नेहरुंच्या गोष्टी ऐकण्यात जायचा. गुलाब लावलेला कोट दिसायचा तो नेहरुंच्या फोटोतच. आमचं बालदिनाचं आकलन हे एवढंच..! आता सारखं कुठल्याही ‘डे’सारखं या ही दिवसाचं फेसबुकी उत्सवीकरण झालेलं नव्हतं, पण उत्साह मात्र असायचा. आता त्याचा उत्सव, साॅरी, इव्हेंट झालाय, उत्साह मात्र हरवला. अर्थात हे होणारच, त्याला इलाज नाही.
इयत्ता चौथीपर्यंत वह्या नव्हत्याच, होती ती फक्त पाटी. काही बऱ्या परिस्थितील्या मुलंकडे बिजगरीवाली जोडपाटी असायचा. त्या पाटीवर तेंव्हा गिरवलेली अक्षर त्याचवेळी स्पंजने पुसून टाकली गेली असली तरी मनावर मात्र लख्ख कोरली गेलीत, ती अजून मिटायला तयार नाहीत. परिक्षा फक्त सहामाही आणि वार्षिक असायच्या. घटक चाचणी नांवाच्या परिक्षाही असायच्या, पण त्या लुटुपुटीच्या..! अभ्यास परिक्षेच्या वेळी आणि दिवाळीच्या सुट्टीच करायची चीज असायची. क्लास, ट्युशन, प्रोजेक्ट वैगेरे तर शब्दही ऐकले नव्हते. आमच्या बाई शिकवणी घ्यायच्या मण ते केवळ ज्ञानदान असायचं, त्या दानाला पैशांचा डाग नसायचा. गोऱ्या, घाऱ्या प्रेमळ डोळ्यांच्या जोशबाई आणि उंचं सावळ्या मिसाळबाई अजुनही जश्याच्या तश्या आठवतात.
वर्षातून एकदा ग्यादरिंग, ते ही मस्त थंडीच्या डिसेंबरात. शाळेत नाटक व नाच बसवला जायचा. मला अभिनयाचे अंग नाही, तरीही मी दोन नाटकांत काम केल्याचं आठवतं. इयत्ता चौथीत ‘शिलेदाराचे सोबती’ हा धडा होता. या धड्यावरील नाटकात मला मुख्य पात्र शिलेदाराचं काम दिलं होतं. तर आणखीही एक नाटक होतं. त्या नाटुकल्यात मला राजाचं पात्र रंगवायचं होतं. माझ्याकडे अभिनयाचं अंग नव्हतं, तसंच माझ्या चेहेऱ्यांचं अंगही नायकाच्या लायकीचं नव्हतं. तरी मला नायक का बनवलं, ह्याचं कोडं मला अजून उलगडलेलं नाही. नाही म्हणायला आता आठवणीपुरतेच उरलेले माझ्या डोक्यावरचे केस मात्र सोनेरी झांक असलेले, पिंगट असे होते. बहुतेक त्याचमुळे मला नायक रंगवायची संधी मिळाली असावी. पण सोनेरी केस हे काय हिरोचं भांडवल होऊ शकत नाही हे खुप नंतर, म्हणजे शशी कपूरचा सोनेरी केलांचा मुलगा करण कपूर पहिल्याच फिल्ममधे फ्लाॅप झाला आणि पुन्हा कधीही दिसला नाही तेंव्हा समजलं. म्हणजे माझ्यात नक्की काहीतरी हिरो मटेरियल असावं. अर्थात असं तेंव्हा आमच्या बाईना का वाटलं, हे मला आताही सांगणं अवघड..!
या दोन्ही नाटकात मला माझ्या रोल पेक्षा कंबरेला लटकावलेल्या तलवारीचं भारी कौतुक वाटलं होतं आणि सर्व नाटकभर माझं सर्व लक्ष त्या तलवारीकडेच होतं. त्या नाटकातलं ‘बाजिराव नाना हो बाजिराव नाना…’ हे गाणं नाटकात गायक बनलेला माझा मित्र नरेश खराडे यांने गायलेलं मात्र चांगलं आठवतं. हा नरेश खराडे नंतर गायन-वादनाच्या क्षेत्रातच मोठा झाला आणि अजुनही मोठा होतोय. बाकी आमचं नायकत्व त्या स्टेजवरच संपलं. नाटकात आणखी काय झालं आता आठवत नाही, पण राजाच्या राणीचं काम केलेली नाजुकशी माधुरी महाले मात्र अजुनही आठवले. ही मला खुप आवडायची आणि आठवली की अजुनही काळजाचा ठोका चुकवून जाते. असो. माझा आणि नाटकाचा संबंध तेंव्हाच संपला आणि नाटकं करणं हे माझं काम नव्हे, हे मला तेंव्हाच कळून चुकलं.
तेंव्हा शाळेचं हस्तलिखीत निघायचं. वर्षातून एकदा. ते मात्र माझं आवडतं काम. या हस्तलिखितात प्रसिद्ध होण्यासाठी मुलांनीच साहित्य द्यायचं असे. माझं हस्ताक्षर (त्यावेळचं) चांगलं आणि रेखीव असल्याने, मुलांनी लिहून आणलेल्या गोष्टी-गाणी हस्तलिखितात माझ्या हस्ताक्षरात लिहायचं काम माझ्याकडे असे आणि मी ही ते मन लावून करे. त्या अंकाचं सुशोभिकरण करणं माझं आणि संजय सुतार नावाचा एक सुरेख चित्र काढणारा मुलगा होता, त्याची जबाबदारी असे आणि आम्ही ते मन लावून करू, येवढं आठवतंय. बाकी माझं मन अभ्यासापेक्षा अशाच गोष्टींत जास्त रमायचं. ही माझी सवय अजुनही टिकून आहे.
आता कारण आठवत नाही, पण मला शाळाजिवनातली पहिली शिक्षा इयत्ता चौथीत झाली होती, ती ही वर्गाच्या बाहेर जाण्याची. मला वाटलं की आता घरी जायला हरकत नाही म्हणून आणि मी चार किलोमिटरचा पायी प्रवास करुन घरी पोचलो होत. मागोमाग काही वेळातच आमच्या शाळेचा शिपाई पंढरीही घामाघूम होऊन माझ्या घरी पोचला. वर्गाच्या बाहेर उभा असलेला मी दिसलो नाही म्हणून बाई घाबरल्या व मला शोधायल् त्यांना पंढरीला पाठवलं होतं. पण येवढं होऊनही माझ्या आई-वडिलांनी बाईंवर आक्षेप घेतला नाही. उलट मलाच मार पडला. आता असं काही झालं, तर थेट कोर्टाची पायरी चढतात पालक. आम्ही लवकर जन्म घेतला हे आमचं नशिब. मला शिक्षा करणाऱ्या सौ. जयश्री मिसाळबाईंना तर मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी माझा आणि वर्गातील सर्वच मुलांचा पुढील आयुष्याचा पाया पक्का केला म्हणून. पुढे वाढत्या वर्गातून बाहेर जायच्या बऱ्याच शिक्षा झाल्या व त्या सरसकट अभ्यासेतर ज्ञानवर्धन करणाऱ्या ठरल्या, पण पहिल्या निष्पाप शिक्षेची सर त्यांना नव्हती. मी दहावीत शाळेतून व नंतर पदवी परिक्षेत काॅलेजातून सर्वप्रथम आलो तेंव्हा मिसाळबाईंना भेटायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आमची भेट होवू शकली नाही. काही भेटी राहूनच जातात, त्यापैकी ही एक भेट.
माझं लहानपण ज्या चाळीवजा वस्तीत गेलं ती वस्ती अजुनही तशीच आहे. माझ्या शाळेची इमारत मात्र आता नाही. अंधेरीला कधी जाणं झालं तर या दोन्ही ठिकाणी मुद्दाम जातो. कधी कधी मुद्दाम ठरवून जातो. या ठिकाणांवर गेलं की मधला सर्व काळ हरवून जातो व मन पुन्हा लहान होऊन बागडायला लागतं. एकदम रिचार्ज झाल्यासारखं वाटतं. आयुष्यात जमेची बाजू म्हणजे बालपण, बाकी सर्व उणे. पण बालपणात येवढं समृद्धी जमा झालीय की, नंतरचं सर्व उणे होऊनही आयुष्य जमाबाकीच दाखवतंय. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाचा अनुभव यापेक्षा वेगळा नसावा..
बाय द वे, मी ५२ वर्षांचा होऊनही पोरकटपणानं वागतो, असं माझ्या आईचं आणि बायकोचंही मत आहे. दोन विरुद्ध धृवांवर वावरणाऱ्या आणि नात्यांत जागतिक सारखेपणा असणाऱ्या दोघींत एकमत घडवून आणण्याचं काम फक्त ते एक बालपणच करु जाणे..!
–©️नितीन साळुंखे
9321811091