जरा विसावतो आता ..

EMOJI

वर्ष संपलं. वर्ष सरताना या वर्षांत आपल्या हातून काय काय झालं याचा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. अर्थात संसारतापे जे काय करावं लागतं, ते करणं कुणाला चुकलेलं नाही. तो आपल्या दैनंदिन कर्तव्याचा भाग असतो व असं कर्तव्य ‘मी केलं’ या सदरात येत नाही. सर्वच जीवमात्र ते करत असतात आणि त्याचं मला फार कवतुक वाटत नाही. मला म्हणायचंय ते सांसारिक कर्तव्याच्या पलिकडे माझ्या हातून जे घडलं ते.

मी माझ्या नैमित्तिक कर्तव्यांच्या पलिकडे जाऊन, माझ्या वर्तुळातल्या लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय. मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचन ही एकच गोष्ट मनापासून केलीय आणि वाचनातून बरंच काही मिळत असलं तरी ‘गांधी’ मिळत नसल्याने नाईलाज म्हणून कुठेतरी, कुणाची तरी बारीक सारीक कामं केली. आपल्या देशातली सामाजिक परिस्थितीच छंदांना प्रोत्साहन देणारी नसल्याने, नाईलाजाची कामं करण्यातच आपल्या सर्वांच्या आयुष्याचा बराच काळ खर्ची पडतो. मी हे या वर्षात करायचं टाळलं आणि माझ्या दैनंदिन आयुष्यातला मोठा समय मी आजवर वाचलेलं माझ्या शब्दांत लिहायचा प्रयत्न केला आणि ते फेसबुक/व्हाट्सअॅपच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. जे वेगळं करायचा प्रयत्न केला म्हणतोय ते हेच. मला, अर्थातच, याची किंमतही चुकवावी लागली हे सांगायला नकोच..!

गेली चार वर्ष मी सातत्याने लेखन करतोय. माझ्या मनाला भिडणाऱ्या, मला अस्वस्थ किंवा आश्वस्त करणाऱ्या विविध विषयांवर व्यक्त व्हावं किंवा मला नव्यानेच कळलेल्या जुन्या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात असं मला जेंव्हा जेंव्हा तिव्रतेनं वाटलं, तेंव्हा तेंव्हा मी लिहिलं. माझ्या लिखाणाला तुम्हा सर्वांचा प्रतिसादही वाढता होता. तुमच्या सर्वांचा प्रतिसाद मला लिहितं ठेवायला प्रोत्साहीत करत होता. माझ्या चार वर्षांच्या लिखाणात आणि गेल्या वर्षभराच्या लिखाणात मोठा फरक होता. माझ्या पूर्वीच्या लिखाणापेक्षा यंदाच्या लिखाणात मी सुधारणा करण्याचा माझ्या परीने निश्चितच प्रयत्न केला, पण जेंव्हा डिसेंबराच्या सरत्या आठवड्यात मी जानेवारीत लिहिलेलं वाचायचा प्रयत्न केला, तेंव्हा मला ते आणखी छान लिहिता येऊ शकलं असतं असं वाटू लागलं. त्यापुर्वीच्या तीन वर्षातलं तर आता माझं मलाच वाचवत नाही अशी परिस्थिती आहे.

फेसबुक/व्हाट्सअॅपवरील कुणाच्याही पोस्ट्सना मिळणाऱे लाईक्स आणि कमेंट्स या जर त्या त्या लिहिणारांच्या लोकप्रियतेच्या कसोट्या असतील, तर त्या कसोटींवर माझं लेखन तुमच्यात प्रिय होत होतं असं मला वाटायला लावणाऱं होतं. मला मिळणाऱ्या कमेंट्स, त्यावर होणाऱ्या चर्चा मला आनंद देणाऱ्या होत्या, काही विचार करायला लावणाऱ्याही होत्या. या लेखन प्रवासात (चार वर्षांच्या लेखन कर्माला ‘प्रवास’ हा शब्द जरा जास्तच भारदस्त वाटतोय याची मला कल्पना आहे. तरीही काळ-वेगाची वेगाने बदलती गती लक्षात घेऊन मी तो वापरलाय) अनेक विचारी मित्र माझ्या व्हर्च्युअली आणि प्रत्यक्षही संपर्कात आले ही एक त्यातील जमेची मोठी बाजू.

माझ्या लिखाणामुळे २०१८ सालाची सुरुवात मी ‘दुरदर्शन’वर पोहोचण्यात झाली, तर या सालाचा शेवट मला ‘एबीपी माझा’ वाहिनीचं लिखाणासाठीचं बक्षिस मिळण्यात झाला. टिव्ही हे माध्यम आपण भारतीयांत प्रचंड आकर्षणाचं असल्याने आणि अशा माध्यमांत मी येतोय असं वाटल्याने, मी यशस्वी होतोय असं माझं मलाच वाटू लागलं. ‘तुम्हाला टिव्हीवर पाहिलं’ हे शब्द जेंव्हा समोरुन कुणालाही ऐकायला येतात, तेंव्हा ते ऐकणाराचं मन आनंदाने मोहरुन येतं. माझंही येऊ लागलं. माझं लिहिलेलं वाचून अनेकांच्या मनात माझं ज्ञान((?), मी माझ्या लेखांतून प्रकट केलेले विचार वाचून माझ्याबद्दल आदर वैगेरे निर्माण होऊ लागलाच होता. मी टिव्ही-पेपरमधे येतोय असं पाहून त्यांचा माझ्याविषयीचा हा समज (खरं तर ‘गैर’) पक्का होतोय की काय, याची मला रास्त शंका येऊ लागली. माझ्याकडे फोन वरुन व्यक्त होताना किंवा रस्त्यात अनपेक्षितपणे भेट झाल्यावर अनेकांच्या डोळ्यातं, वागण्यात माझ्याबद्दलचं काहीतरी ‘वेगळं’ मला जाणवू लागलं होतं. माझ्या दृष्टीत, विचारांत, लिहिण्यात अनेक त्रुटी आहेत हे मला समजत होतं आणि लोकांनी माझ्याबद्दलचा करुन घेतलेला समज मला हवाहवासा वाटत असला तरी, कुठेतरी त्याची भितीही वाटत होती. लोक लंगड्या बैलालाच नंदी समजायची चूक करतायत की काय, असं माझं मलाच वाटू लागलं होतं.

आपल्या लोकांची(माझ्यासहीत) मानसिकताच मोठी विचित्र आहे. आपण सतत कुणीतरी अवतार येईल व आपल्याला तारेल याची वाट पाहात असतो. आपल्याला एक ‘दैव हवा असतो. काहीतरी मागायला, गाऱ्हाणं मांडायला आणि दोष द्यायलाही आपल्याला एका देवाची गरज असते. स्वत: काहीच करायचं नसलं तर मग देव गरजेचा असतो. लोकांनी वाचावं, अधिक विचार करावा व त्यातून जाग्या झालेल्या स्वत:च्या त्या विचारावर, कितीही विरोध झाला तरी, निष्ठेनं अंमल करावा हा माझ्या लिहिण्यामागचा उद्देश होता आणि काही तुरळक अपवाद सोडले तर लोक माझ्याच विचारांच्या प्रेमात पडताना मला दिसत होतं. माझा प्रवास देवत्वाच्या मार्गाने झालेला मला नको होता आणि म्हणून लोकांचं माझ्याशी वागणं बदललेलं दिसताच मी सावध झालो.

अशातच माझ्या हाती दुर्गाबाई भागवतांचं ‘आठवले तसे’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लागलं आणि त्या पुस्तकाच्या वाचनातून माझ्यातलं न्युनत्व मला अधिक तीव्रतेने जाणवलं. लोकप्रियतेच्या लाटेवर आरुढ होऊन लिखाण करण्यात किती चूक असते हे दुर्गाबाईंच्या पुस्तकातून मला समजलं. मी ज्यांना माझी दैवत मानतो, त्या दैवतांनीही लोकशिक्षणाचा बहाणा करून लोकप्रियतेच्या मागे जाऊन चुका केल्याचं दुर्गाबाईंनी नांवानीशी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. त्यांचं चालून गेलं, कारण ती माणसं खरोखरीच मोठी होती. मला तसं करून चालणार नव्हतं, चालणार नाही. माझी यत्ता अजून खूप खालची आहे हे मला दुर्गाबाई वाचून समजलं. मला माझ्या लिखाणात आणखी सुधारणा करणं गरजेचं आहे हे जाणवतं. मला अधिक व्यापक विचार करणं गरजेचं आहे असंही जाणवतं. माझी कुणा इतरांशी नव्हे तर माझ्याशीच स्पर्धा करण्याची मला आवश्यकता असल्याचं मला जाणवू लागलं. टिव्ही-वर्तमानपत्रांतून मला अल्पशी प्रसिद्धी मिळत असताना, म्हणूनच मी जास्त सावध झालो. लोक माझं वाचून माझ्याबद्दल जे समजू लागलेयत, त्यांच्या माझ्याबद्गलच्या त्या भावनांना अधिक न्याय देण्यासाठी मला आणखी भरपूर वाचन करण, अधिक अभ्यास करणं गरजेचं असल्याचं मला तीव्रतेने जाणवू लागलंय. २०१८ मिळणे जाता जाता आत्मभानाचं हे बहुमोल दान माझ्या पदरात टाकलं..!

येत्या वर्षात लिहिणं कमी आणि अभ्यास, वाचन अधिक करण्यावर भर देणार आहे. मला अस्वस्थ किंवा आश्वस्त करणाऱ्या कोणत्याही घटनांवर पूर्ण अभ्यास करूच मगच व्यक्त व्हायचं मी ठरवलं आहे. शासनाच्या गॅझेट साठीच काम रखडल आहे माझ्याकडून, ते ही पूर्ण करायचं आहे. ‘मुंबईतल्या इतिहासाच्या पाऊलखुणां’ या माझ्या पुस्तकाला या वर्षात मूर्त स्वरूप द्यायचं ठरवलं आहे. याचा परिपाक म्हणून माझं इथलं लिहिणं थांबलं नाही तरी साहजिकच कमी होणार आहे. हे थांबणं नाही, विसावणं आहे..

भेटूच अधून मधून कधीतरी..
आपल्या सर्वाना नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!

-नितीन साळुंखे
9321811091

आभाळागत माया तुमची  माझ्यावरी राहू दे..!

आभाळागत माया तुमची
माझ्यावरी राहू दे..!

काल-परवाच झालेल्या माझ्या वाढदिवसानिमित्त मला तुम्हा सर्वांच्या प्रचंड प्रमाणात शुभेच्छा मिळाल्या. अजुनही शुभेच्छा येतच आहेत. भारावून जाणं म्हणजे नक्की काय असतं, हे मी गेले दोन दिवस अनुभवतोय..माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व मित्रांचा मी ऋणी आहे. हे माझं मनोगत तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी आहे..

समाजातील सुप्रसिद्ध व्यक्ती, प्रभावशाली, सत्ताकारणी नेते, अभिनेते इत्यादी व्यक्तीमत्वांना विविध कारणांसाठी जाहीर शुभेच्छा देण्यासाठी मी पुढे की तू पुढे अशी झुंबड उडते. नाक्या नाक्यांवर शुभेच्छांचे मोठमोठाले बॅनर्स लागतात. त्यांना या शुभेच्छा देणाऱ्यांतल्या सर्वांचंच काही त्या त्या व्यक्तींवर प्रेम असतंच असं नव्हे. बऱ्याचशा शुभेच्छा त्यांची कृपादृष्टी स्वत:वर राहावी, त्यांच्याकडून काहीतरी कंत्राट किंवा जिंदगी बनानेवालं एखादं काम मिळावं किंवा गेला बाजार एखादा पुरस्कार मिळतो का ते पाहावं, अशा अपेक्षा असतात असं माझं निरिक्षण आहे.

या उलट समाजासाठी तळमळीने काही काम करणारांना शुभेच्छा देण्यासाठी कधी झुंबड उडालेली माझ्या ऐकीवात नाही किंवा बॅनर्स लागल्याचं पाहाण्यात नाही. मुळात समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्ती मुळातच आता फार कमी आहेत आणि आहेत त्यांना या दिखावूगिरीची गरज नाही. त्यांचं काम बॅनरबाजी न करताही सुरु असतं. त्यांनाही शुभेच्छा देणारा एक मोठा वर्ग असतो आणि त्यांचं काम शांतपणे सुरू असते. वरील व्यक्तींप्रमाणे कोणताही दिखावू कर्कशपणा त्यात नसतो.

मी वरील दोन्ही प्रकारात बसत नाही. राजकारणात किंवा अति वरिष्ठ पदावर नसल्याने माझ्याकडून कुणालाही काहीही भौतिक लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. तसंच मी प्रकाश आमटेंसारखी स्वत:ला वाहून घेऊन समाजाची सेवा करतोय आणि त्या मुळे समाजाचं काही भलं होतंय, अशातलाही भाग नाही. मी एक साधं, सामान्य माणसाचं जीवन जगणारा माणूस आहे. चार शब्द लिहिता येतात हिच काय ती माझी जमेची बाजू. पुन्हा त्यात काही कवतुकही नाही. कारण आजवरच्या माझ्या आयुष्यात वाचन ही एकच गोष्ट आवडीनं केलेली असल्यानं , मी लिहू शकलो तर त्यात काही विशेष नाही. बरं माझं हे लेखन काही कुणात स्फुल्लिंग वैगेरे जागवणार किंवा अलम समाजाला दिशा देणारं असामान्य असतं असंही नाही. रोजचं जीवन जगताना येणारे अनुभव, समाजात दिसणारा उणेपणा, वागण्यातला दुटप्पीपणा, गतायुष्यातल्या काही आठवणी इत्यादी साध्या शब्दांत मांडणं हिच काय ती माझी कला. माझं हे लिखाण जर तुम्हाला भिडत असेल, तर ते त्यातल्या अनुभवांमुळे. कारण माणूस लहान असो की मोठा, रोजचं जिवन जगताना त्याला अनुभवायला लागणारे प्रसंग किंवा प्रापंचिक जिवनातले अनुभव साधारणत: सारखेच असतात. माझ्या लिखाणात येणारे असे अनुभव तुम्हाला आपले वाटतात, याचं श्रेय माझं नव्हे, तर त्या अनुभवांचं..

२० डिसेंबर रोजी मला प्रचंड प्रमाणात शुभेच्छा आल्या. मेसेज आले, यशवंत सावंतभोसले भर दुपारी गुलाबपुष्प घेऊन भेटायला आले, फोनवर बोलताना तर उसंतच नव्हती. इतक्या साऱ्यांना आभाराची उत्तरं देताना माझ्या फोन सारखा आचके देऊ लागला. हे कठीण होतं सारं, पण गोडंही वाटत होतं, हे खरंच..! स्तुती कुणाला आवडत नाही हो, मलाही आवडते. उगाच ताकाला जाऊन भांड लपवणं मला आवडत नाही. मी खुश झालो होतो.

शुभेच्छांचं एकवेळ मी समजू शकतो, पण माझ्यावर काही जणांनी लेख लिहिले. माझ्या वाढदिवसाला ‘झी २४ तास’ या वाहिनीचे स्टार वृत्त निवेदक व माझे मित्र ऋषी देसाई, दीपक पाटेकर, नकुल पार्सेकर, अशफाक शेख, प्रकाश सावसकडे, संजय कदम, भानुदास उकरांदे, मनोज करंजवणे-देशमुख, संदीप जाचक, मिलिंद खोत, चंदन विचारे यांनी माझ्याविषयी लिहिलेली लघु-दीर्घ मनोगतं, सिद्धहस्त कवयित्री श्रीमती वैशाली पंडीत यांनी केलेली कविता, स्वप्नीलराज म्हात्रे यांने खास माझ्यासाठी प्रथमच रचलेली चार कडवी व त्यासाठी सुशांत विश्वासरावानी काढलेलं माझं चित्र, जगदीश दळवी व सुभाष बांदिवडेकरांनी माझ्या फोटोंचे केलेले डेकोरेशन इत्यादी पाहून मी अवाक् होणं अगदी नैसर्गिक होतं. मी अवाक् झालो ते लेखा-कवितांमुळे नाही, तर त्यातील माझ्यासाठी असलेल्या विशेषणांमुळे. त्या मनोगत-कडव्यांमध्ये लिहिलेले कित्येक गुण माझ्यात आहेत की नाही हा विचार करणं मला आता भाग आहे. माझ्यात ते गुण नसतील किंवा अगदी अल्पांशाने असतील तर ते मला अंगी बाणवावे लागतील किंवा असल्यास त्यांची वृद्धी करावी लागेल. माझ्या मित्रांचं माझ्याबद्गलचं म्हणणं खरंच आहे हे सिद्ध करणं आता माझी जबाबदारी आहे असं मी कृतज्ञ भावनेनं समजतो..माझ्या केल्या गेलेल्या स्तुतीने मी खुष झालो असलो तरी, त्याने माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव मला नव्याने झाली. माझ्या वाढदिवसाच्या निनित्ताने मला माझ्या मित्रांकडून मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे असं मी समजतो..!!

आपल्या समाजात कोणाही व्यक्तीबद्दल सरसकट चांगलं बोललं जाण्याची प्रथा फक्त स्मशानात किंवा पांढरे कपडे घालून ‘साजऱ्या’ केल्या जाणाऱ्या शोकसभांतून किंवा मग जीवनगौरव पुरस्कार प्रदान प्रसंगी दिसते. मला तर जिवंतपणीच आणि चांगला कार्यरत असतानाच हे भाग्य प्राप्त झाले. हे भाग्य मला प्राप्त झालं, ते माझ्या शब्दांमुळे..!

मी अक्षरांच्या देवाची पुजा बांधली. शब्द हे त्या अक्षरांच्या देवाचं मूर्त स्वरुप आहे, तर तुम्ही वाचक हे त्याचं प्रकट स्वरुप..मी घातलेली पुजा अक्षरदेवापर्यंत पोहोचतेय व म्हणून कदाचित तुम्हा सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रकट स्वरुपात मला दर्शन दिलं असेल. तुम्ही माझ्यासाठी भगवंतापेक्षा कमी नाहीत..भगवंत प्रसन्न झाला तरच आपल्याला प्रकट स्वरुपात दर्शन देतो, असं पुराणांत वाचलं होतं, परवा २० डिसेम्बरला ते अनुभवलं.
.
मी इथे मी पुजा बांधणारा याचकाच्या रुपात आहे तर तुम्ही वाचक माझ्या भगवंताच्या..माणूस कोणत्याही दैवताची पुजा बांधताना त्याला काही तरी प्राप्त व्हावं म्हणूनच बांधत असतो.

मी तुमचं प्रेम मिळावं या एकमेवं हेतून ही सरस्वतीची आराधना केली होती..
बहिणाबाईंच्या शब्दांत थोडा बदल करून व्यक्त व्हायचं तर,,
आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरीदात वाचकबापा दाये अरूपाच रूप !!
माझ्या तुमच्या आणि तुमची दिलेल्या शुभेच्छांप्रति नेमक्या याच भावना आहेत…

असच तुमचं प्रेम मला चिरंतन लाभो ही तुमच्याकडे प्रार्थना
अक्षरांच्या देवा तुला
शब्द शब्द वाहू दे,
आभाळागत माया तुमची
माझ्यावरी राहू दे
हीच काय ती मागणी…

धन्यवाद..!!

– नितीन साळुंखे
9321811091

(Thanksछायाचित्र श्री. त्रिकाल अडसड यांच्या वॉल वरून.. )

धन्यवाद ABP Maza..!!

d4f1a30a-0801-4454-8339-c4e0e35f74fe.JPG

ABP Maza या वृत्तवाहीनीने आयोजित केलेल्या ‘ब्लाॅग माझा’ या स्पर्धेत मी ‘विजेता’ ठरल्याची मेल मला आली. पाठोपाठ एबीपी माझाचे श्री. अादीत्य जोशींचाही फोन आला आणि आज, म्हणजे १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या पारितोषिक समारंभात उपस्थित राहाण्याचं आर्जवी निमंत्रण श्री. जोशींनी दिलं. यावर नक्की कशा तऱ्हेने व्यक्त व्हावं हे माझ्या लक्षातच येईना. कारण मेल मध्ये व नंतरच्या श्री. जोशींच्या बोलण्यात आलेला ‘विजेता’ हा शब्द. ‘विजेता’ हा एकच असतो, म्हणजे मी एकमेंव की आणखीही कुणी आहे, हे ही मला समजेना. पूर्वानुभवांवरून मी नक्कीच एकमेंव विजेता नसावा असं मला वाटं, कारण मी शाळेत असताना, मला ‘तीन पायाची शर्यत’ या स्पर्धेत एकदाच ‘विजेता’ घोषित केलं गेलं होतं, ते ही ‘संयुक्त’ म्हणून. ज्या आडदांडाच्या उजव्या पायासोबत माझा डावा पाय बांधून मला धावायला लागलं होतं, त्याचं श्रेय त्यात जास्त होतं. मी फक्त तोल सावरत मित्रा सोबत धावलो होतो, एवढंच काय ते माझं श्रेय..! त्यामुळे मी एकमेंव विजेता नव्हतो, तर संयुक्त विजेता होतो.

आजच्या बक्षिस समारंभाच्या कार्यक्रमात सपत्नीक पोचलो आणि मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याचं समजलं. काहीतरी पारितोषिक, ते ही स्वतंत्र मिळतंय म्हटल्यावर मला आनंद होणं सहाजिकच होतं. मला खूप आनंद झाला. मी माझ्या मनाची अस्वस्थता घालवण्यासाठी काहीतरी चार शब्द किबोर्डवर टाईपतो. त्याला बक्षिस वैगेरे मिळू शकेल अशी शंकाही मनात कधी नव्हती. मी बक्षिसासाठी कधीही लिहिलं नाही. अगदी पहिली ते पंधरावीपर्यंतचे परिक्षेचे पेपर्सही मार्कासाठी लिहिले नाहीत, तर फक्त आणि फक्त मला समजलेलं व आकलन झालेलं तेवढंच लिहिलं. ब्लाॅग लिहितानाही मी हे पथ्य पाळत आलोय.

माझ्या आताच्या लेखनात बहुतकरुन समाज केंद्रस्थानी असतो. हा ब्लाॅग लिहिताना माझं लिहिलेलं लोकांनी वाचावं आणि त्यांनी समाजाभिमुख विचार करावा एवढीच एकमेंव अपेक्षा होती आणि असते. हा ब्लाॅग स्पर्धेसाठी पाठवताना बक्षिस मिळेल किंवा मिळावं या अपेक्षेने तो पाठवलेला नव्हता. तसा मी गेली चार-पांच वर्ष लिहितोय. पण मी ब्लाॅग लिहायला सुरुवात केली ती अगदी नुकतीच. फार तर सहा-सात महिने झाले असतील नसतील. नकावड्या पोराला कुठे स्पर्धेत उतरवायचं म्हणून मी ते टाळत होतो, पण मित्रांनी फारच आग्रह केला आणि हा नवजात ब्लाॅग स्पर्धेसाठी पाठवला आणि त्याला चक्क बक्षिस मिळालं.

जगभरातून स्पर्धेसाठी आलेल्या मराठी भाषेतल्या एकूण ३५० ब्लाॅग्स पैकी ८ जण विजेते ठरले. त्यात मला उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं, याचं मलाच कौतुक वाटलं. एवढ्या नवजात अर्भकाला बक्षिस मिळेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. अजूनही वाटत नाही. कारण या पुर्वी मला शिक्षा खुप झाल्यात, पण बक्षिसं मात्र फार मिळालेली नाहीत. म्हणून यावर नेमकं कसं व्यक्त व्हावं हेच समजत नाहीय..शाळेतल्या तीन पायांच्या शर्यतीत मित्रामुळे मिळालेल्या ऐतिहासिक बक्षिसाची इथे पुनरावृत्ती झाली. तिथेही मी संयुक्त विजेता होतो आणि इथेही इतर सात विजेत्यांसोब आठवा विजेता होतो. तिथे मित्रासोबत एक पाय बांधून धावलो होतो, इथे मित्रांमुळे उजवा हात चालवून लिहिलो, हाच काय तो फरक..!

माझं भाग्य हेच की मी ज्या हेतूने ब्लाॅग लिहितो, तो हेतू परिक्षकांपर्यंत बरोबर पोचला.. बक्षिसापेक्षाही ‘माझ्या लेखनात समाजाची जाणीव असते’ हे परिक्षकांचे उद्गार माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. मला मिळालेलं बक्षिस माझ्या लिखाणात असलेल्या हेतू बद्दल आहे, असं मी समजतो. या बक्षिसामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे, याची जाणीव मला त्या सभागृहातील विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्वाना पाहून झाली..

माझा ब्लाॅग बक्षिस मिळण्यास पात्र आहे हे मला दाखवून देणारे ABP Mazaचे मुख्य संपादक श्री. राजीव खांडेकर, श्री. अादीत्य जोशी, स्नेहा कदम, प्रविण वाकचौरे, ‘ब्लाॅग माझा’ चे परिक्षक श्री. मुकेश माचकर व श्री. राम जगताप, ABP Maza चं संपादक मंडळ, त्यांचा व्यस्थापकीय चमू या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.

धन्यवाद ABP Maza..!!

-नितीन साळुंखे
9321811091

सदर स्पर्धेच पहिलं बक्षिस श्री. पंकज समेळ यांना मिळालं. योगायोगाने आम्ही दोघेही मित्र आहोत. पंकजचं लेखन प्राचीन भारत व आपला समृद्ध वारसा या विषयावरचं असतं. पंकजचं मनापासून अभिनंदन. या कार्यक्रमात मला अमोल कुलकर्णी हा एक उमदा तरुण मित्र म्हणून मिळाला. अमोल औरंगाबादचा असून तो ‘विज्ञानयात्री’ नांवाचा विज्ञान या विषयावर अतिशय सोप्या शब्दांत ब्लाॅग लिहितो व अमोललाही उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं. अमोलचंही अभिनंदन. श्रीमती अनुराधा कुलकर्णी यांनाही त्यांच्या ‘मी अनु’ या ब्लाॅगसाठी उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं, त्यांचंही अभिनंदन. अन्य विजेते आले नसल्याने त्यांचा परिचय होऊ शकला नाही.

-नितीन साळुंखे

७० रुपयांचं पुस्तक आणि मी..

परवाच दादरच्या ‘आयडीयल बुक स्टाॅला’त जाऊन ‘अजब प्रकाशना’ने ७० रुपयांत कोणतंही पुस्तक’ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे, तिचा लाभ घेतला. ह्या ‘सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा’ अशा जवळपास पन्नासएक पोस्ट माझ्याकडे आल्या. वास्तविक मी अशा कोणत्याही पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतोच, त्या मुळे अशा पोस्ट आल्या काय अन् न आल्या काय, मी तिकडे गेलोच असतो. तसंही आयडीयलवरुन जाणं-येणं हा माझ्या नित्याचा क्रम आहे आणि अधनं मधनं मी आयडीयलच्या बोळात कधीतरी जात असतो. आता मला अशा पोस्ट पाठवणाऱ्यांपैकी किती जण तिकडे गेले असावेत, हा प्रश्न माझ्या मनात उगवत होता, पण मी तिकडेच दाबून टाकला.असे प्रश्न विचारायचे नसतात. काही लोक समाजाला शहाणं करण्यासाठी धडपडत असतात.

कोणतंही पुस्तक खरेदी करणं ही माझ्यासाठी महत्वाचं असतं. ‘सुवर्णसंधी’ असते ती खिशात पैसे असतात तेंव्हा; मग मी ते ७० रुपयांत मिळतंय की ७०० रुपयात याचा विचार कधीच करत नाही. ‘पुस्तक खरेदी’ हिच माझ्यासाठी सुवर्णसंधी. ‘७० रुपयात पुस्तक’ मिळतंय ही सुवर्णसंधी आहे की हवं ते पुस्तक मिळतंय ही सुवर्णसंधी आहे, हे समजणं ज्याच्या त्याच्या माईंडसेटचा प्रश्न आहे. माझ्यासाठी मात्र आवडलेलं कोणतंही पुस्तक कोणत्याही किंमतीला खरेदी करण्यासाठी खिशात पुरेसे पैसे असणे, हिच सुवर्णसंधी..!

स्वस्त्यात पुस्तक ही काय मला सुवर्णसंधी वाटत नाही आणि उगाच माफक किॅमतीत पुस्तक मिळतंय म्हणून पुस्तकं घेणं आणि शोपीस म्हणून घरात ठेवणं हे ही मला पटत नाही. तरीही मी अशा पुस्तक प्रदर्शनात जात असतो. न जाणो एखादं उत्तम जुनं पुस्तक सापडूनही जाईल म्हणून. परवा आयडीयललाही गेलो. तासभर होतो. ७० रुपयेवाली विविध विषयांवरची भरपूर पुस्तक आहेत तिकडे. गर्दी होती. गंम्मत म्हणजे बहुतेक गर्दी विविध पदार्थांच्या रेसिपी सांगणाऱ्या पुस्तकांच्या समोर होती. त्या खालोखाल ज्योतिष, धार्मिक, आरोग्य, यश मिळवण्याच्या क्लृप्ती इत्यादी विषयांवरच्या पुस्तकांसमोर होती. ह्या प्रकारच्या पुस्तकांना लोक चाळुन पाहात होते, खरेदीही करत होते. बाकी विषयावरचीही पुस्तकं होती, पण त्या पुस्तकांचं मात्र बहुतकरुन विंडो शाॅपिंग सुरु होतं..

मी ही तीन पुस्तकं घेतली. ‘द इव्हनिंग क्लब’ आणि ‘ट्रेन टू पाकिस्तान’ ही खुशवंत सिंहांची दोन आणि एक मलाला युसुफजाईवर लिहिलेलं. तिन्ही भाषांतरीत. मला खुशवंत सिंहांचं कोणताही आडपडदा न ठेवता केलेलं प्रामाणिक लेखन मला खुप आवडतं आणि त्यांची मराठीत भाषांतर केलेली बहुतेक सर्व पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत. मी कोणतंही पुस्तक खरेदी केलं, की कधी एकदा घरी जाऊन वाचतो असं मला वाटतं..हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणांची आपण आतुरतेनं वाट पाहात असतो ना, अगदी तसं.

घरी गेलो. माझी आवडती सिरियल ‘तारक मेहता’ पाहिली आणि जेवता जेवता रात्री ९ च्या हिन्दी बातम्या पाह्यल्या. मी हिन्दी बातम्याच पाहातो, मराठी बातम्यांमधे, बातम्यांपेक्षा मनोरंजनच जास्त असतं. हिन्दीचीही अवस्था तशीच, पण काहिशी बरी. किमान हिन्दी तरी सुधारतं व मराठी बातम्यांत (आणि इतर कार्यक्रमांतही) हिन्दी शब्द किती आणि कसे आले हे चटकन कळतं..बातम्या पाहून झाल्यावर मी एकूण २१० रुपये खर्चून विकत घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी श्री. खुशवंत सिंहांचं ‘ट्रेन टू पाकिस्तान’ वाचायला घेतलं..

मला आवडणाऱ्या कोणत्याही विषयावरचं पुस्तक मी वाचायला घेतलं, तर पहिल्या दहा-पांच पानांतच त्या पुस्तकाचं गारुड मनावर पसरतं. आणि मग ते पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय मी खाली ठेवत नाही, मग रात्रीचे कितीही का वाजेनात. डाॅ. मीना प्रभुंची सर्व प्रवास वर्णणं मी अशीच वाचून संपवली आहेत. कविता महाजनांची, विजय तेंडुलकरांची, जयवंत दळवींची, राजन खानांची, अनील अवचटांची व इतर काहींची पुस्तकं मी अशीच वाचली आहेत. हे वाचन म्हणजे फक्त डोळ्यासमोर शब्द सरकण्याची प्रक्रिया नसते, तर डोळे, मन, मेटू आणि कल्पना यांचा एक भन्नाट चित्रपट मन:चक्षुंसमोर साजरा होत असतो आणि तो काळ-वेळ आणि आजुबाजुचं जग विसरायला लावणारा असतो..खुशवंत सिंहांचीही काही पुस्तकं मी अशीच एका बैठकीत वाचून संपवली आहेत.

कोणतंही पुस्तक पहिल्या काही पानातच -आपल्या आवडत्या लेखकाचं किंवा विषयाचं असलं तरी- आपल्याला भावणार की नाही ते कळतं. श्री. भलचंद्र नेमाडेंचं ‘हिन्दू’ असंच वाचायला घेतलं व पहिल्या काही पानांतच मला कंटाळा आला आणि ते बाजुला ठेवलं, ते आजतागायत. तसंच काहीसं मला ७० रुपयांत घेतलेलं खुशवंत सिंहाचं पुस्तक वाचताना वाटलं. इथे प्रश्न कथावस्तूचा नव्हता, खुशवंतांचे लेखन मला आवडतंच. इथे अडचण येऊ लागली, ती पुस्तकाच्या स्वरुपाची..

पुस्तकाचं स्वरुप कसं असावं, ह्याची प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते. मला पुस्तक त्याच्या मुळ स्वरुपातच वाचायला आवडते. ७० रुपयांमधे मिळणारं पुस्तक, स्वस्त्यात पुस्तक मिळाल्याचा आनंद देते हे खरंय, पण मला तरी तो आनंद तेवढाच वाटतो. कारण ही पुस्तकं नवी कोरी असली तरी, अशा पुस्तकात पुस्तकाचं मुळ स्वरुप मात्र कुठेतरी हरवलेलं असतं.

पुस्तकाचं मुळ स्वरुप म्हणजे काय, तर मुळच्या प्रकाशकाने छापलेलं मुळचं पुस्तक. पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठावर असलेला बार कोड यामधला सर्व ऐवज. नामवंत किंवा कोणत्याही प्रकाकाने छापलेलं मुळ पुस्तक, त्याचं मुखपृष्ठ, मुखपृष्ठावरील चित्र, पुस्तकाच्या कागदाचा पोत, रंग, त्याची छपाई, त्याच्या रंगांचा दर्जा, आतील पहिल्याच पानावर असलेलं पुस्तकाचं व लेखकाचं नांव, त्याच पानावर सर्वात खाली असलेलं प्रकाशकाचं नांव, नंतरच्या पानावर डाव्या बाजुला लेफ्ट अलाईनमेंन्ट करुन असलेलं लेखक व काॅपीराईट धारकाचं नांव, त्या खाली असलेली प्रकाशक, मुद्रक, मुद्रित शोधक यांची श्रेय नामावली, आयएसबीएन नंबर व सर्वात शेवटी लिहिलेली किंमत इथपासून ते सर्वात शेवटच्या पानावर छापलेली त्याच लेखकाच्या इतर पुस्तकांची यादी किंवा संदर्भ ग्रंथ इतकं मिळून कोणतही पुस्तक सिद्ध होत असतं. ह्यात प्रत्यक्ष कथावस्तू, त्या कथावस्तूच्या ओळींची छपाई, त्या छपाईचा फाॅन्ट, फॅान्टचा पाॅईंट, दोन ओळींमधलं अंतर याचा परिणामही पुस्तकाच्या वाचनावर होत असतो. पुस्तकातं भौतिक वजन हा ही एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो. हे असं मुळ स्वरुपातलं पुस्तक अंतर्बाह्य देखणं असतं, मग ते किती का जुनं असेना..!

इतरांचं माहित नाही, पण माझ्यासाठी पुस्तक वाचन हा एक सोहळा असतो. पहिलं ते पुस्तक पुन्हा पुन्हा निरखून पाहाणं, त्याच्या स्पर्शाचा आनंद घेणं, त्याला चोबाळणं, त्याचा हवाहवासा वाटणारा वास घेणं, मधुनच चाळून पाहाणं, त्यातून आतल्या लेखनाचा अंदाज घेणं वैगेरे आरोह-अवरोह झाले की मग एखाद्या गायकाने प्रत्यक्ष गाण्यासाठी बैठक मारावी, तसं मग माझं पुस्तक वाचन सुरु होतं. पहिल्या काही तानांतच गवयाने आपल्या तना-मनाचा ताबा घ्यावा आणि भवताल विसरून आपण त्या सुरांच्या स्वर्गिय मैफिलित रंगून जावं, तस पहिल्या काही पानांतच पुस्तक आपला ताबा घेतं आणि मग सुरू होते एक उत्तरोत्तर रंगत जाणारी यादगार मैफील. मूळ स्वरुपातल्या कितीही जुन्या असलेल्या पुस्तकात हे मला अनुभवता येतं. अगदी नव्या कोऱ्या स्वस्त पुस्तकात मला ही जादू आजतागायत अनुभवता आलेली नाही. महागडं तिकिट काढून पहिल्या रांगेत बसून पाहिलेली जानदार मैफिल आणि मैफिलीतली तिच गाणी सिडीवर ऐकणं यात फरक हा राहाणारच.

आयडीयल मधून प्रत्येकी अवघ्या ७० रुपयात मिळालं म्हणून घेतलेल्या खुशवंत सिंहांच्या ‘ट्रेन टू पाकिस्तान’ या पुस्तकाचं वाचन करताना माझं असंच झालं पहिल्या पंधरा-विस पानांतच कंटाळा आला. विषय उत्तम होता, तरीही ते पुस्तक माझ्या मनाची पकड घेईना. म्हणून ‘द इव्हनिंग क्लब’ उघडलं, तर तिथेही तिच परिस्थिती. मी सरळ पुस्तकं बाजूला ठेवून दिली. असं का होतं याचा विचार केला असता, त्या मागे मला वर उल्लेख केलेली कारणं त्या मागे आहेत असं लक्षात आलं. वरील महत्वाच्या गोष्टी ७० रुपयांच्या पुस्तकांत नाहीत. अर्थात मुळ स्वरुपातलं पुस्तक २००-३०० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त आणि ७० रुपयात मिळणारं पुस्तक यात फरक हा राहाणारच याची मला कल्पना आहे.

स्वस्त्यात पुस्तक मिळणं ही ज्यांना पर्वणी वाटते, त्यांनी मग मुंबईच्या फोर्टातील फुटपाथ धुंडाळावेत. अत्यंत कमी किमतीत एखादं सुरेख पुस्तक जुन्या, परंतु त्याच्या मुळ स्वरुपात मिळून जातं. असं पुस्तक कितीही जुनं असलं, तरी त्या पुस्तकाचं गारुड तना-मनावर भरून राहातं.

हल्लीच मी सवयीप्रमाणे फुटपाथ शोधत असताना मला श्री. नारायण महाडीक यांनी लिहिलेलं ‘कैदी नं.३१४६७’ हे पुस्तक अवघ्या शंभर रुपयात सापडलं. श्री. महाडीक हे काही लेखक नव्हेत. अत्यंत सुखवस्तू घरातला हा हरहुन्नरी मुलगा मोठेपणी दैववशात एका गुन्ह्यात सापडतो व त्याला तुरुंगवास होतो. त्याच्या तुरुंगातल्या आठवणी, त्याच्या अंगातल्या कला-कोशल्यामुळे त्याला जेल प्रशासनाकडून मिळालेली सन्मानाची वागणूक व बढती, कैद्यांची मानसिकता, कैद्यांमधे असलेलं माणूसपण इत्यादींचं अत्यंत सुंदर वर्णन अत्यंत ओघवत्या भाषेत श्री. महाडीक यांनी केलेलं आहेत. या अधेमधे त्यांचं वैयक्तिक आयुष्य, पत्नी, मुलं, नंतर आयुष्यात आलेल्या स्त्रिया यांचीही माहिती आहे. महाडीक रत्नागिरीच्या तुरंगात बंदी असताना त्यांना स्वातंत्र्वीर सावरकरांची सेवा करण्याची तीन महिन्यांसाठी मिळालेली संधीवरचं प्रकरण मुळातून वाचण्यासारखं आहे. लेखक नसलेल्या या लेखकाचं सन १९७४ साली प्रसिद्ध झालेलं (दुसरी आवृत्ती १९८६) हे आत्मचरित्रात्मक पुस्तक मनाचा ठाव घेतं. हे पुस्तक जवळपास ३२ वर्ष जुनं असुनही मूळ स्वरुपात असल्याने, मला वरच्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या गाण्याच्या मैफिलीचा आनंद देऊन गेलं. अशी अनेक पुस्तकं मी फुटपाथवर वेचली आहेत. रुपये ७० मध्ये मिळालेल्या नव्या कोऱ्या पुस्तकात मला हा आनंद घेता येत नाही. ही कदाचित माझी मानसिकता असावी.

तरीही ७० रुपयांत मिळणाऱ्या पुस्तकांचेही काही फायदे आहेत. मुख्य म्हणजे एखाद जुनं दुर्मिळ पुस्तक इथे अवचित मिळून जातं. माझा मित्र श्री. अजित दुखंडे यांने असंच श्री. गोविंद नारायण मडगांवकरांचं ‘मुंबईचं वर्णन’ हे सन १८६२ सालातलं पुस्तक इथेच विकत घेतलं (तेंव्हा ५० रुपयांत कोणतंही पुस्तक मिळायचं) आणि मला भेट दिलं. या पुस्तकामुळेच माझी ‘मुंबईतील ऐतिहासिक पाऊल खुणांचा मागोवा’ ही दीर्घ लेखमाला आकाराला आली. ज्यांना पुस्तक वाचनाची आवड आहे, परंतु आर्थिक कारणांनी त्यांना ती विकत घेणं जमत नाही, त्यांच्यासाठी ही एक पर्वणी असते हे खरं..प्रत्येक गोष्टीत फायदा-तोटा हा असायचाच. पुन्हा फायदा कशाला म्हणावा आणि तोटा कशाला म्हणावा, हा ज्याचा त्याच्या मानसिकतेचा प्रश्न असतो, हा ही भाग आहे.

आज ‘दै. लोकसत्ता’ने ‘अप्रकाशित पु.ल.’ प्रकाशित केलं. सकाळीच उठलो. भक्तीभावाने पेपरवाल्यापाशी पोचलो. त्या एकत्र बांधलेल्या पन्नासेक कागदांची पेपरवाल्याच्या दृष्टीने असलेली किंमत मात्र रुपये ६० पेपरवाल्या भैयाच्या हाती ठेवली व मोट्या भाविकतेनं तो अमुल्य ठेवा घरी घेऊन आलो. आज रात्री पुन्हा तो सोहळा रंगणार आणि उत्तररात्रीपर्यंत उत्तरोत्तर रंगत जाणार..मूळ स्वरूपातल्या नव्या कोऱ्या पुस्तकांबद्दल माझी भावना काहीशी अशी असते..!

-@नितीन साळुंखे
9321811091