ABP Maza या वृत्तवाहीनीने आयोजित केलेल्या ‘ब्लाॅग माझा’ या स्पर्धेत मी ‘विजेता’ ठरल्याची मेल मला आली. पाठोपाठ एबीपी माझाचे श्री. अादीत्य जोशींचाही फोन आला आणि आज, म्हणजे १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या पारितोषिक समारंभात उपस्थित राहाण्याचं आर्जवी निमंत्रण श्री. जोशींनी दिलं. यावर नक्की कशा तऱ्हेने व्यक्त व्हावं हे माझ्या लक्षातच येईना. कारण मेल मध्ये व नंतरच्या श्री. जोशींच्या बोलण्यात आलेला ‘विजेता’ हा शब्द. ‘विजेता’ हा एकच असतो, म्हणजे मी एकमेंव की आणखीही कुणी आहे, हे ही मला समजेना. पूर्वानुभवांवरून मी नक्कीच एकमेंव विजेता नसावा असं मला वाटं, कारण मी शाळेत असताना, मला ‘तीन पायाची शर्यत’ या स्पर्धेत एकदाच ‘विजेता’ घोषित केलं गेलं होतं, ते ही ‘संयुक्त’ म्हणून. ज्या आडदांडाच्या उजव्या पायासोबत माझा डावा पाय बांधून मला धावायला लागलं होतं, त्याचं श्रेय त्यात जास्त होतं. मी फक्त तोल सावरत मित्रा सोबत धावलो होतो, एवढंच काय ते माझं श्रेय..! त्यामुळे मी एकमेंव विजेता नव्हतो, तर संयुक्त विजेता होतो.
आजच्या बक्षिस समारंभाच्या कार्यक्रमात सपत्नीक पोचलो आणि मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याचं समजलं. काहीतरी पारितोषिक, ते ही स्वतंत्र मिळतंय म्हटल्यावर मला आनंद होणं सहाजिकच होतं. मला खूप आनंद झाला. मी माझ्या मनाची अस्वस्थता घालवण्यासाठी काहीतरी चार शब्द किबोर्डवर टाईपतो. त्याला बक्षिस वैगेरे मिळू शकेल अशी शंकाही मनात कधी नव्हती. मी बक्षिसासाठी कधीही लिहिलं नाही. अगदी पहिली ते पंधरावीपर्यंतचे परिक्षेचे पेपर्सही मार्कासाठी लिहिले नाहीत, तर फक्त आणि फक्त मला समजलेलं व आकलन झालेलं तेवढंच लिहिलं. ब्लाॅग लिहितानाही मी हे पथ्य पाळत आलोय.
माझ्या आताच्या लेखनात बहुतकरुन समाज केंद्रस्थानी असतो. हा ब्लाॅग लिहिताना माझं लिहिलेलं लोकांनी वाचावं आणि त्यांनी समाजाभिमुख विचार करावा एवढीच एकमेंव अपेक्षा होती आणि असते. हा ब्लाॅग स्पर्धेसाठी पाठवताना बक्षिस मिळेल किंवा मिळावं या अपेक्षेने तो पाठवलेला नव्हता. तसा मी गेली चार-पांच वर्ष लिहितोय. पण मी ब्लाॅग लिहायला सुरुवात केली ती अगदी नुकतीच. फार तर सहा-सात महिने झाले असतील नसतील. नकावड्या पोराला कुठे स्पर्धेत उतरवायचं म्हणून मी ते टाळत होतो, पण मित्रांनी फारच आग्रह केला आणि हा नवजात ब्लाॅग स्पर्धेसाठी पाठवला आणि त्याला चक्क बक्षिस मिळालं.
जगभरातून स्पर्धेसाठी आलेल्या मराठी भाषेतल्या एकूण ३५० ब्लाॅग्स पैकी ८ जण विजेते ठरले. त्यात मला उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं, याचं मलाच कौतुक वाटलं. एवढ्या नवजात अर्भकाला बक्षिस मिळेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. अजूनही वाटत नाही. कारण या पुर्वी मला शिक्षा खुप झाल्यात, पण बक्षिसं मात्र फार मिळालेली नाहीत. म्हणून यावर नेमकं कसं व्यक्त व्हावं हेच समजत नाहीय..शाळेतल्या तीन पायांच्या शर्यतीत मित्रामुळे मिळालेल्या ऐतिहासिक बक्षिसाची इथे पुनरावृत्ती झाली. तिथेही मी संयुक्त विजेता होतो आणि इथेही इतर सात विजेत्यांसोब आठवा विजेता होतो. तिथे मित्रासोबत एक पाय बांधून धावलो होतो, इथे मित्रांमुळे उजवा हात चालवून लिहिलो, हाच काय तो फरक..!
माझं भाग्य हेच की मी ज्या हेतूने ब्लाॅग लिहितो, तो हेतू परिक्षकांपर्यंत बरोबर पोचला.. बक्षिसापेक्षाही ‘माझ्या लेखनात समाजाची जाणीव असते’ हे परिक्षकांचे उद्गार माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. मला मिळालेलं बक्षिस माझ्या लिखाणात असलेल्या हेतू बद्दल आहे, असं मी समजतो. या बक्षिसामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे, याची जाणीव मला त्या सभागृहातील विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्वाना पाहून झाली..
माझा ब्लाॅग बक्षिस मिळण्यास पात्र आहे हे मला दाखवून देणारे ABP Mazaचे मुख्य संपादक श्री. राजीव खांडेकर, श्री. अादीत्य जोशी, स्नेहा कदम, प्रविण वाकचौरे, ‘ब्लाॅग माझा’ चे परिक्षक श्री. मुकेश माचकर व श्री. राम जगताप, ABP Maza चं संपादक मंडळ, त्यांचा व्यस्थापकीय चमू या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.
धन्यवाद ABP Maza..!!
-नितीन साळुंखे
9321811091
सदर स्पर्धेच पहिलं बक्षिस श्री. पंकज समेळ यांना मिळालं. योगायोगाने आम्ही दोघेही मित्र आहोत. पंकजचं लेखन प्राचीन भारत व आपला समृद्ध वारसा या विषयावरचं असतं. पंकजचं मनापासून अभिनंदन. या कार्यक्रमात मला अमोल कुलकर्णी हा एक उमदा तरुण मित्र म्हणून मिळाला. अमोल औरंगाबादचा असून तो ‘विज्ञानयात्री’ नांवाचा विज्ञान या विषयावर अतिशय सोप्या शब्दांत ब्लाॅग लिहितो व अमोललाही उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं. अमोलचंही अभिनंदन. श्रीमती अनुराधा कुलकर्णी यांनाही त्यांच्या ‘मी अनु’ या ब्लाॅगसाठी उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं, त्यांचंही अभिनंदन. अन्य विजेते आले नसल्याने त्यांचा परिचय होऊ शकला नाही.
-नितीन साळुंखे
अभिनंदन नितीन जी .
LikeLike