फ्लोरा फाऊंटन..

मुंबईचा फोर्ट परिसर, त्या परिसरातल्या त्या दगडात घडवलेल्या भव्य, देखण्या वास्तूतलं सौंदर्य सुमारे दिडेकशे वर्ष उलटून गेली तरी मनाला मोहवतं. कोणत्याही प्रकारची फारशी देखभाल नसतानाही आपली नजर खिळवून ठेवायचं सामर्थ्य त्या वास्तूंमधे आहे. या परिसरातील एकेका इमारतीची अदब, दबदबा(दहशत नाही) जाणवतो. त्या इमारतींमध्ये जाणीवपूर्व जपलेली सौंदर्यदृष्टी आंधळ्यालाही दिसेल. कोणत्याही इमारतीच्या प्रवेशदारावरची एखादी नजाकतभरी कमान असो वा वरच्या मजल्यावरच्या एखाद्या लहानश्या झरोख्याचं डिझाईन असो, सौंदर्याची जाणीव ठेवलेली आपल्याला लक्षात येते..

यातलंच एक देखणं कारंज-शिल्प म्हणजे ‘फ्लोरा फाऊंटन’..! तसं या चौकाचं सरकारी दफ्तरातलं आणि बीईएस्टी बसच्या कपाळावर लिहिलेलं नांव ‘हुतात्मा चौक’, परंतु सर्व सामान्यांच्या दृष्टीने तो ‘फ्लोरा फाऊंटन’ एरियाच..!

रंगीबेरंगी फुलांची देवता असलेल्या ‘फ्लोरा’ या रोमन देवतेच्या नांवाने ओळखलं जाणारं हे कारंजं, परवाच, गुरुवार दिनांक २४ जानेवारीपासून, मुंबयकराना त्याच्या जुन्या देखण्या स्वरुपात दिसतं झालं. जुन्या स्वरुपात म्हणायचं कारण असं की, दोन वर्षांपूर्वी हे नितांत सुंदर कारंजं-शिल्प कुणा सरकारी इंजिनिअराने पांढऱ्या (शुभ्र होता की नाहीते आता आठवत नाही) आॅईलपेंटने रंगवून विद्रुप करुन ठेवलं होतं. दगडविटांची कंपाऊंडची भिंत असो की एखादी देखणी वास्तू असो, ‘ब्युटीफिकेशन’च्या नांवाखाली ती आॅईलपेंटने चोपडून काढणं, हिच ज्यांच्या सरकारी सौंदर्यदृष्टीची कमाल मर्यादा असते त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाच ठेवता येत नाही. पण माझ्या या समजुतीला छेद देणाऱ्या काही गोष्टीही सरकारकडून घडत असतात आणि त्यापैकी एक म्हणजे आपल्या जुन्या स्वरुपात नव्याने सामोरं आलेलं ‘फ्लोरा फाऊंटन’..!

गेली दोनेक वर्ष या कारंज्यावर काम सुरु होतं. कामानिमित्त या परिसरात येता-जाताना पांढऱ्या कापडाखाली झाकलेलं ते शिल्प नक्की कुठल्या स्वरुपात सामोरं येतंय याचं पूर्वानुभवावरून भितीमिश्रित कुतूहल असायचं. पण दोन वर्षांनंतर परवा जेंव्हा हे हे शिल्प नजरेसमोर आलं आणि मी ते प्रत्यक्ष तिथं जाऊन पाहिलं, तेंव्हा मात्र नजरेचं पारण फिटलं. बृहन्न्मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने पालिकेच्याच हेरीटेज सेलच्या देखरेखीखाली अत्यंत समाधानकारक रित्या पार पाडलेलं आहे, त्या बद्दल एक मुंबईकर म्हणून, सरकारच्या सौंदर्यदृष्टीवर शंका घेण्याच्या माझ्या स्वभावापलिकडे जाऊन, मला महापालिकेचं मनापासून कौतुक करावसं वाटतं.

आता तुम्ही म्हणाल, येवढं काय आहे त्या कारंज्यात म्हणून. बाकी मला त्या शिल्पातले बारकावे सांगता यायचे नाहीत, परंतू आजच्या भरभराटीला आलेल्या महामुंबईची मुहूर्तमेढीचा काहीतरी संबंध मात्र त्याकाळात उभारल्या गेलेल्या या कारंजं-शिल्पात आहे, हे मात्र नक्की..! मला तिच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. त्यासाठी आपल्याला साधारत: दिड-पावणेदोनशे वर्ष मागे जावं लागणार आहे..

तर गोष्ट आहे सन १८६२ च्या पूर्वीची. खऱ्या मुंबईची व्याप्ती तोवर मुंबईच्या किल्ल्यापुरतीच मर्यादीत होती. किल्ला म्हणजे आताच्या दक्षिणेच्या काळ्या घोड्यापासून ते उत्तरेच्या आताच्या जीपीओपर्यंतचा परिसराभोवती शत्रुपासून संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या तटबंदीच्या आतला परिसर. या तटबंदीच्या आत पूर्व समुद्रकिनाऱ्यावर ब्रिटीशांचं हेड आॅफिस समजला जाणारा किल्ला होता, मोठमोठ्या व्यापारी पेढ्या होत्या, व्यापारी आणि बड्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची निवासस्थनं होती, बाजार होता, शाळा होती, कोर्ट होती आणि बरंच काही होतं. या तटबंदीच्या आत सुरक्षित वातावरणात त्याकाळची मुख्य मुंबई वसलेली होती. आताचा काळा घोडा ते जीपीओ पर्यंतचा परिसर तेंव्हा ‘बाॅम्बे फोर्ट एरीया’ म्हणून ओळखला जायचा आणि आजही तो फोर्ट एरीया म्हणूनच ओळखला जातो. आता माहित नाही, परंतू दहा एक वर्षांपूर्वी या परिसरातल्या बॅंकांच्या नेहेमीच्या क्लिअरिंगप्रमाणेच फोर्ट एरीया क्लिअरींग स्वतंत्रपणे चालायचं.

या तटबंदीतून मुंबईच्या फोर्ट विभागात प्रवेश करायला तीन मुख्य प्रवेशद्वारं होती(आणखी दोन होती, परंतु त्यांचा नीट संदर्भ मिळत नाही).. दक्षिणेवा अपोलो गेट, पश्चिमेला चर्च गेट आणि उत्तरेला बझार गेट. अपोलो गेटची नामेनिशाणी नाही. बोलण्यातही हे गेट येत नाही. उत्तरेच्या बझार गेटचीही कुठलीच निशाणी नाही. मात्र बोलण्यात याचा अजुनही तुरळक उल्लेख येतो. पश्चिमेचं चर्च गेट (याला पवनचक्कीचा दरवाजा असंही म्हणत. कारण या दरवाज्याच्या बाहेरच्या मोकळ्या मैदानात सैन्यासाठी लागणारा गहू दळायची एक पवनचक्की सन १७२५ सालात उभारलेली होती) मात्र प्रत्यक्षात तिथे नसुनही बोलण्यात अजुनही प्रसिद्ध आहे. अर्थात ही प्रसिद्धी पश्चिम रेल्वेच्या ‘चर्च गेट’ या शेवटच्या स्थानकामुळे आहे हे खरं.

मुंबईच्या किल्ल्यांची ही तटबंदी १७१६ साली बांधून पूर्ण झाली होती. या तटबंदी सभोवती त्यावेळच्या पद्धतीपरपमाणे खंदकही होता. या सर्व गोष्टीसाठीचा खर्च रुपये ३,३५,००० मात्र कंपनी सरकार आणि किल्व्यातल्या त्याकाळच्या श्रीमंत लोकांना मिळून केला होता. हा सर्व बंदोबस्त समुद्रातून चालून येऊ शकणाऱ्या शत्रुपासून संरक्षणासाठी होता.

सन १७१६ पासून ते सन १८६०-६२ पर्यंत मुंबईच्या किल्ल्यातली वस्ती भरमसाठ वाढली होती. किल्ल्यात जागा मिळवणं प्रतिष्ठेचं समजलं जावू लागलं होतं आणि त्यामुळे किल्ल्याच्या बाहेरचे धनिक-वणिक किल्ल्याच्या आत यायला बघत होते. आतली वस्ती आणखी वाढू लागली होती. त्याचबरोबर अस्वच्छता, जुनाट लाकडी इमारती पडणं, इमारतीना आग लागणं इत्यादी प्रकार घडू लागले होते. जोडीला अस्वच्छता, रोगराईही वाढू लागली होती. पुन्हा त्यात घोडागाड्या- बैलगाड्या यांची गर्दी होतीच. किल्ल्यतल्या मुंबईचा श्वास कोंडू लागला होता. मोकळी जागाच कुठे नव्हती. किल्ल्याच्या बाहेर एस्पलनेड मैदानावर मात्र प्रशस्त जागा, मोकळी हवा विपुलतेने उपलब्ध होती. लोक सुटीच्या दिवसांत या मैदानावर फिरण्यासाठी जात.

मुंबईच्या अशी घुसमट झालेल्या परिस्थितीत मुंबईचे नवीन गव्हर्नर म्हणून सर बार्टल फ्रिअर यांचं दिनांक २४ एप्रिल १८६२ या दिवशी मुंबईत आगमन झालं आणि मुंबईचं भाग्य बदलायला सुरुवात झाली. एव्हाना मुंबईचे गव्हर्नर परळच्या गव्हर्नर हाऊसमधे राहायला गेले होते तरी कारणपरत्वे त्यांना मुंबईत यावं लागायचं. सर बार्टल फ्रिअर यांनी या सर्व गोष्टींचं निरिक्षण केलं आणि त्यांनी मुंबईच्या किल्ल्याची तटबंदी पाडण्याचा निर्णय घेतला. कोंडलेल्या मुंबईला मोकळं करण्यासाठी किल्ल्याची तटबंदी पाडणं अपरिहार्य ठरलं होतं..सन १८५७ च्यां बंडाला मोडून काढल्यानंतर देशात कंपनी सरकारची सद्दी संपून ब्रिटिश सरकारची सत्ता सुरू झाली होती. ब्रिटिशांची सत्ता मजबुत झाल्याने त्यांना आता इतर शत्रूपासून भयही उरलं नव्हतं आणि सहाजिकच भक्कम तटबंदी आणि खोल खंदकांचीही गरज उरली नव्हती.

सर बार्टल फ्रिअर यांनी तटबंदी पाडायचा निर्णय लगेच अंमलात आणला तो क्षण मुंबईच्या वाढीसाठी निर्णायक ठरला. आताची फळलेली-फुललेली मुंबई दिसते, त्याची मुळं सर बार्टल फ्रिअरच्या या निर्णयात आहेत. तटबंदी पाडल्यानंतर कोटाच्या आत कोंडलेल्या मुंबईला, मुंबई किल्ल्याच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला अफाट मोकळी जागा निर्माण झाली आणि मुंबईने कात टाकली. सर फ्रिअर यांच्या निर्णयाला साथ मिळाली ती त्याच दरम्यान मुंबईच्या म्युनिसिपालिटीचा पहिले कमिशनर असणाऱ्या, आजच्या मुंबईतले रुंद रस्ते आणि फुटपाथ, रस्त्याच्या कडेने लावलेल्या झाडांचा निर्माता आणि तेवढीच वादग्रस्त कारकिर्द असलेल्या आॅर्थर क्राॅफर्ड या प्रचंड उत्साही व्यक्तिमत्वाची.

तटबंदीच्या पश्चिमेला मोकळ्या झालेल्या जागेत सर्वात पहिली वास्तू उभी राहाली ती काळा घोडा चौकातली डेव्हीड ससून लायब्ररीची आणि दुसरी वास्तू जन्माला आली ती अगदी विरुद्ध टोकाला असलेली क्राॅफर्ड मार्केटची. मधलं एस्प्लनेड हाॅटेल, मुंबई विद्यापिठाच्या दोन इमारती, मुंबई उच्च न्यायलयाची इमारत, पीडब्ल्यूडीची इमारत, सीटीओ, मुंबई सीएसएमटी स्टेशनची इमारत, महीपालिकेची इमारत या आजही मुंबईची शान असलेल्या इमारती १८७० ते १९०० च्या दरम्यान नंतर टप्प्या-टप्प्याने इथे उभ्या राहिल्या. मुंबईचा डंका जगात गाजू लागायला सुरुवात झाली ती इथुनचं. पुढे मुंबई जी दक्षिणोत्तर आडवी वाढली, त्याचा श्रीगणेशा या सर बार्टल फ्रिअर यांनी केला होता.

सर बार्टल फ्रिअर यांचा गव्हर्नर म्हणूनचा कालावधी १८६२ ते १८६७ इतकाच होता. पण मुंबईला ‘पूर्वेकडचं लंडन’ बनवण्याचं स्वप्न ते मुंबईत येताना घेऊन आले होते. त्यांनी कल्पिलेल्या या इमारती उभ्या राहिल्या तेंव्हा अर्थातच सर बार्टल फ्रिअर देशात नव्हते, परंतु त्यांच्या काळातच मुंबई बदलायला सुरुवात झाली होती.

अगदी नुकतंच नुतनीकरण होऊन समोर आलेल्या मुंबईच्या ‘फ्लोरा फाऊंटन’चा या कथेशी संबंधं असा की, हे कारंजं सर बार्टल फ्रिअर यांच्या मुंबईच्या भरभराटीत असलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ तेंव्हाच्या मुंबईकर नागरीकांनी वर्गणी गोळा करुन बांधलं आहे. आज जरी हे फाऊंटन फ्लोरा फाऊंटन म्हणून प्रसिद्ध असलं तरी, या कारंजाचं खरं नांव ‘फ्रिअर फांऊंटन’..!

आता थोडसं या फाऊंटनविषयी. या फाऊंटनसाठी पुढाकार घेतला होता तो, १८३० सालात मुंबईत स्थापन झालेल्या ‘अॅग्रो-हाॅल्टिकल्चर सोसायटी आॅफ वेस्टर्न इंडीया’ या वनस्पतींच्या संशोधनासाठी स्थापन झालेल्या संस्थेने. ह्या संस्थेला सरकारने शिवडी येथे दिलेल्या जागेत विविध वनस्पती असलेली एक बाग फुलवली होती. पुढे या जागेत ख्रिश्चन दफनभुमी करायची म्हणून या जागेऐवजी सर फ्रिअर यांच्या काळात सन १८६०-६२ च्या दरम्यान माझंगांव येथे जागा देण्यात आली व तिच पुढे माझंगांव-भायखळ्याच्या सीमेवर असलेली ‘व्हिक्टोरीया गार्डन’ किंवा ‘राणीचा बाग’ म्हणून प्रसिद्ध झाली. बार्टल फ्रिअर यांच्या सन्मानार्थ या बोगेत बसवण्यासाठी म्हणून हे कारंजं-शिल्प ‘अॅग्रो-हाॅल्टिकल्चर सोसायटी आॅफ वेस्टर्न इंडीया’ या संस्थेसाठी आर.नाॅर्मन शाॅ या ब्रिटिश आर्किटक्टने डिझाईन केलं व जेम्स फोर्सिथ या शिल्पकाराने घडवलं.. !

कारंज-शिल्प बनवण्यासाठीचा खर्च पुढे ‘अॅग्रो-हाॅल्टिकल्चर सोसायटी’च्या हाताबाहेर जाऊ लागली आणि ते लक्षात घेऊन तेंव्हा सोसायटीचे अध्यक्ष असलेल्या क्राॅफर्ड यांनी हा प्रकल्प ‘एस्प्लनेड फि फंड’ कमिटिच्या ताब्यात दिला व कमिटिने तो कमिटीच्या पैशांतून नंतर पूर्ण केला. या फाऊंटनसाठी त्याव्ळचे श्रीमंत पारसी व्यापारी शेठ करसेटजी फर्दुनजी यांनी २०५०० रुपयांची देणगी दिली होती.

सर बार्टल फ्रिअर यांनी तोडलेल्या तटबंदीमधील ‘चर्च गेट’ ज्या ठिकाणी होतं, तिच जागा या फाऊंटनसाठी ठरवण्यात आली आणि त्याच जागी दिनांक १८ नेव्हेंबर १८६९ रोजी फ्रिअर यांच्या स्मरणार्थ बसवलं ते गेलं. आजही ते तिथेच आहे.

कोणतीही ऐतिहासीक वास्तू वा वस्तूचा इतिहास माहित असला की, ती पाहाताना त्या काळचा तो इतिहासही आपसूक अनुभवता येतो. फ्लोरा फाऊंटन पाहाताना तुम्हालाही तोच छान यावा अनुभव, यासाठी हा लेखन प्रपंच..!!

-नितीन साळुंखे

9321811091

27.01.2019

टिप-

1. फ्लोरा फाऊंटनच्या नुतनीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेने ५ कोटी रुपयांचा खर्च केला आसून, नुतनीकरणाचे काम वारसा वास्तू जतनासंदर्भातली प्रख्यात संस्था ‘INTACH (ndian National Trust for Art and Cultural Heritage)’ यांनी केलं आहे.

2. नुतनीकरण केलेल्या फ्लोरा फाऊंटनशेजारी, रस्ता खोदकाम करताना सापडलेले मुंबईच्या जुन्या ट्रामचे रुळ, पुन्हा वर काढून जतन करुन ठेवण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी तिथे न दिसणारं हे नवल मुंबईकरांच्या नजरेसमोर राहील असं काम केल्याबद्दल महापालिकेचे मनापासून आभार.

3. सदर लेख लिहिताना महानगरपालिकेच्या हेरीटेज वास्तू विभागात कार्यरत असणारे अभियंता श्री. संजय आढाव या मुंबईवर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्राची बहुमोल मदत झालेली आहे. सदर लेखातील फोटो श्री. आढाव यांनीच मला उपलब्ध करुन दिले आहेत.

संदर्भ –

१. मुंबईचे वर्णन – ले. गोविंद मडगावकर – १८६२

२. मुंबईचा वृत्तांत – ले. मोरेश्वर शिंगणे – १८९३

३. मुंबई नगरी – ले. न.र. फाटक – १९८३

४. स्थल-काल – ले. डॉ. अरुण टिकेकर – २००४

५. Fort Walk- Sharda Dwivedi & Rahul Mehrotra- 2005

‘कंपन्या’ खालसा करू, प्रजेचं राज्य आणू..

कंपन्याखालसा करू, प्रजेचं राज्य आणू..

२६ जानेवारी १९३० रोजी ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने’ संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी ब्रिटीशांकडे केली होती. त्या दिवसाचे प्रतिकात्मक महत्त्व म्हणून स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेचा २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकार करण्यात आला.

देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर, म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ ते २५ जानेवारी १९५० या काळात १९३५ साली केलेल्या Government of India Act वापरून राज्यशकट हाकला जात होता. तो ॲक्ट रद्द होऊन २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्य घटनेचा स्विकार करुन त्यानुसार देशाचा कारभार हाकला जाऊ लागला. या घटनेला आज ६९ वर्ष झाली. सन १९५० च्या आजच्याच दिवशी स्वतंत्र भारतात प्रजेने प्रजेसाठी चालवलेलं प्रजेचं राज्य, प्रजासत्ताक सुरु झालं.

जनतेने जनतेसाठी चालवलेलं जनतेचं राज्य ही संकल्पना मनाला मोहवणारी असली तरी खरंच तशी वस्तुस्थिती आहे की नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा देशात पाचशेच्यावर संस्थानं होती. प्रत्येक रियासतीचा नियम वेगळा, कायदा वेगळा. प्रत्येक रिसासतीचं तोंड वेगळ्या दिशेला. स्वातंत्र्यानंतर या सर्व रियासतींची मोट बांधून भारत नावाचा एकसंघ देश बांधण्याची कठिण आणि कठोरही कारवाई सरदार वल्लभभाई पटेलांनी केली. सर्वच संस्थानं काही बऱ्या बोलाने किंवा आपखुशीने भारतात सामिल झाली नाहीत. काही संस्थानांवर पोलीस आणि लष्करी कारवाई करावी लागली होती. हा इतिहास बहुतेकांना माहित असेल. नंतरच चार सिमांच्या आत वसलेला आजचा एकसंघ भारत निर्माण झाला.

ह्याची थोडक्यात उजळणी करायचं कारण न्हणजे आता पुन्हा देशात तशीच, स्वातंत्र्या मिळण्याच्या उंबरठ्यावर होती तशी, परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेंव्हा संस्थान होती, आता खाजगी कंपन्या आहेत हाच काय तो फरक. म्हणायला हे लोकांचं राज्य आहे, परंतु वास्तवात ते खरंच तसं आहे का, अशी शंका येते.

आपल्या पक्षीय लोकशाहीत अनेक पक्ष आहेत. निवडणुक आयोगाच्या माहितीनुसार देशात ७ राष्ट्रीय पक्षांसहित १८६६ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. ह्यातील बहुसंख्य राजकीय पक्ष हे कुठल्या न कुठल्या कुटुंबाशी संबंधीत आहे. कुटुंबातील सदस्यांशिवाय अन्य कुणालाही ह्या पक्षाच्या महत्वाच्या पदांवर जाता येत नाही. कायद्याच्या दृष्टीने पाहाता हे लोकशाही पद्धतीने चालणारे पक्ष असले तरी प्रत्यक्षात ते एखाद्या पेढीसारखे किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखेच चालतात. लोकसेवेच्या नांवाखाली स्थापण झालेले हे पक्ष खरोखरंच लोकसेवा करत असते तर, आपला भारत कधीचाच महासत्ता झालेला दिसला असता. पण तसं दिसत नाहीत. आजही देशातल्या सर्वांच्याच अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. उलट पक्ष आणि त्यांचे नेते मात्र भरभराटीला आलेले दिसतात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्या आहेत, तर मग ते चालणारही फायदा-तोटाच्या व्यापारी गणितावर. हजारोंच्या पक्ष स्थापन झाले आहेत याचा अर्थ हा धंदा फारच तेजीत आहे असा होतो. कंपन्या स्वतःच्याच फायद्याचा विचार करणार, इतरांच्या नाही, ही साधी समजण्याची गोष्ट आहे. स्वतःचा फायदा कमी होताना दिसलं तर मोठ्या कंपन्या कशा फायद्यासाठी जॉईंट व्हेंचर करतात, तशा याच्या युत्या आणि आघाड्या होतात,

ह्या पक्षांचे कार्यकर्ते म्हणवणारे वास्तवात त्यांचे, थेट वा आडवळणाने ‘पेड वर्कर्स’ असतात. कार्यकर्ता म्हणजे स्वत:चा वेळ, स्वत:चे पैसे आणि प्रसंगी स्वत:चं घर डावावर लावून समाजाचं भलं करण्यासाठी झटणारा मनुष्य प्राणी, असं मी समजतो. माझ्या या व्याख्येत आताच्या प्रायव्हेट लिमिटेड पक्षांचे स्वत:ला कार्यकर्ते म्हणवणारे कुठेही बसत नाहीत. आणि म्हणून मी त्यांना पेड वर्कर्स मानतो. पक्ष श्रेष्ठींचा आणि त्यांच्या कुटुंबातील अगदी कालच जन्माला आलेल्या पोरापर्यंतच्या मधल्या सर्वांचा सातत्याने जयजयकार करायचा, हे यांचं क्वालिफिकेशन किंवा लोकशाहीच्या मराठीत अर्हता. आणि पक्षाच्या मेहेरबानीने एखाद-दुसरं टेंडर किंवा फुटकळ काम मिळणं किंवा अगदीच नाही तर कुठल्यातरी सरकारी कार्यालयात त्या त्या पक्षाचा बिल्ला लावून लायझनींग करणे आणि त्यातून कमिशन मिळवणे हा यांचा मोबदला. हा मोबदला मनासारखा मिळाला नाही किंवा कंपनीच्या सीईओ किंवा व्यवस्थापनापैकी इतर अधिकाऱ्यांनी (यांना खासदार-आमदार-नगरसेवक असंही म्हणतात) सहकार्य न दिल्यास किंवा कमिशनमधे अवाच्या सवा वाटा मागितल्यास लगेच कंपनीही बदलली जाते. सायबाशी न पटल्यामुळे किंवा पाहिजे तसा पगार न मिळाल्याने हल्लीची मुलं कंपनी कशी बदलतात, तशी.

आता आपलं प्रजेचं राज्य चालवण्यासाठीच जन्माला आलेले पक्ष इतक्या वर्षांनंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या झाल्या असतील, तर मग आपण मतदानाचं पवित्र कर्तव्य करणारी प्रजा हे ह्या कंपन्यांचे ‘गिऱ्हाईक’ आहोत हे ओघाने आलंच.

नीट विचार केला तर आपल्याला हे पक्ष इतके वर्ष गिऱ्हाईकच बनवत आले आहेत हे लक्षात येतं. कंपन्या कशा त्यांच्या ब्रान्ड्सच्या विविध ऑफर देत त्यांच्या गिर्हाईकांना त्यांच्याकडे खेचतात आणि ऑफर म्हटल्यावर गिऱ्हाईकंही काहीच विचार न करता त्यांच्या शो रूमवर तुटून पडतात. त्तशाच या कंपन्यानी धर्म, जात, जाती, प्रान्त, आणि भाषा इत्यादी अस्मितांचे ब्रान्ड बनवले आहेत. कुणीतरी तिसराच आपला ‘ब्रान्ड’ला धोका निर्माण करतोय, आपल्याला ‘डिस्काऊंट करतोय’ अशी आवई कम आॅफर दिली की, त्या त्या ब्रान्डची गिऱ्हाईकांचे डोक्यातले मेंदू लगेच आपली जागा सोडून गुडघ्याच्या दिशेने सरकतात आणि त्या त्या ब्रान्डच्या प्रेमात अडकलेले त्वेषाने एकदुसऱ्यावर तुचून पडतात. मग आपलं चार सीमांच्या आत बंदिस्त असलेलं प्रजासत्ताक, वरील ब्रान्ड्सच्या न वरुन दिसणाऱ्या, परंतु आतून लगेच जाणवणाऱ्या अनेक सीमांमधे देशांतर्गत वाटलं जातं. प्रायव्हेट कंपन्यांच्या काही क्षेत्रात काही प्राॅडक्ट्सच्या मोनोपाॅली असतात, तसं काहीसं इथेही होतं. दुसऱ्या कंपनीचा धंदा बसवण्यासाठी आणि आपला वाढवण्यासाठी खाजगी कंपन्या जे जे काही हातखंडे उपाय करतात, तेच हे पक्षही करतात. कंपन्यांची ऑफर हा केवळ शब्दच्छल असतो, अगदी नाममात्र फायदा गिर्हाईकाचा करून प्रत्यक्षात कंपनीने मात्र त्यातून रग्गड नफा कमावलेला असतो. हेच आताचे राजकीय पक्ष सध्याच्या राजकारणात करत असतात.

आता थोडस आपण ‘गिर्हाइकांबद्दल. टाळी एका हाताने वाजत नाही. तसाच राजकारणाच्या भरभराटीला आलेल्या कंपन्या होण्यात केवळ राजकारणी जबादार नाहीत, तर त्यांच्याएवढीच किंबहुना काहीशी जास्तच जबाबदारी त्यांच्या गिऱ्हाईकांची, म्हणजे मतदारांची असते. जगातलं सर्वात मोठं प्रजेने प्रजेसाठी चालवलेलं प्रजेचं राज्य आपल्या देशात आहे. कंपन्या जशा वेळोवेळी डिस्काऊंट्सचं प्रलोभन देऊन आपला माल विकत असतात, तशाच या राजकीय प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या निवडणुकांच्या काळात धर्म-जात-जाती-प्रान्त-भाषा आदी भारतीय मनांच्या बाजारपेठेत हमखास उठाव असलेला माल विक्रीस काढतात. आणि त्या त्या मालाची गिऱ्हाईकं आपली सर्व सद्सद्विवेकबुद्धी आणि विचार शक्ती गहाण ठेऊन माझा पक्ष, माझ्या जातीचा पक्ष, माझ्या धर्माचा पक्ष, माझ्या प्रांताचा पक्ष. देशप्रेमाचा पक्ष, देशद्रोह्यांचा पक्ष, माझ्या नेत्याचा पक्ष वा अन्य कुठल्यातरी कृत्रिमरीत्या निर्माण केलेल्या ब्रान्ड्सच्या लाटेवर सवार होऊन मतदान करतात आणि लाट ओसरली की पुढची पाच वर्ष या कंपन्यांचा वा त्यांच्या युत्या-आघाड्यांच्या तमाशा पाहात पच्छाताप करत बसतात. आपण गिऱ्हाईक बनवलो गेलोय हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. ‘एक बार बेचा हुआ सामान यहाॅं पाच साल पहले बदला नही जायेगा’ हा सर्वांना माहित असलेला नियम नेमका मतदान करताना विसरला जातो.

पुन्हा आपल्या अधिकाराबाबत आणि कर्तव्याबाबतही आपण किती जागरूक असतो हा देखील प्रश्नच आहे. एकवेळ अधिकार समजतात, परंतु कर्तव्याप्रती मात्र आपण फारसा विचार करत नाही. वंदे मातरम, भारत माता कि जय म्हटलं कि किंवा उरी सारखा सिनेमा पाहताना आपलं देशप्रेम जागृत होतं. तेच देशप्रेम, ‘माझं काय’ किंवा ‘मेरा क्या’ किंवा ‘मारू सूं’ म्हणत टेबलाखालून लाच खाताना, दुसऱ्याचा हक्क डावलताना, अगदी रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळतानाही मात्र कुठं जातं कुणास ठाऊक..! देशप्रेम म्हणजे काही बंदूक घेऊन सीमेवरच लढायला जायला हवं असं काही नाही, ते तर नेहेमीच्या आयुष्यातही आपल्या कृतीतून दाखवता येत. जरा कुठे अमेरिका, लंडनला जाऊन आलं की तिथल्या कडक कायद्याची, तिथल्या लोकांच्या देशप्रेमाची स्तुती करायची आणि तोंडात भरलेल्या माव्याच्या तोबऱ्याची पिंक रस्त्यावरच टाकत आपल्याच देशाला शिव्या द्यायच्या, हे बहुसंख्य भारतीयांचं देशप्रेम. घोषणानी सुरु होणाऱ्या आणि घोषणांनीच मावळणाऱ्या देशप्रेमाला काही अर्थ नसतो.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या आपल्या एकदिवसीय देशप्रेमाची साथ ओसरली की लगेच दुसऱ्या दिवसापासून आपापल्या जाती-धर्माच्या संम्मेलनात, महासंम्मेलनात, मोर्चात, सभांत, एखाद्या नेत्याच्या भक्तीत रंगून किंवा अगदी गेला बाजार ज्ञातीवर्धक मंडळाच्या वळचणीला जाऊन बसायचं, ही आपली देशप्रेमाची आपल्या सोयीने आपण केलेली व्याख्या. आपल्या या व्याख्येचा आपल्यावर राज्य करणाऱ्या पक्षरूपी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आणि वेळोवेर्ळी होणारी त्यांची जॉईंट व्हेंचर्स यांनी फायदा उचलला नाही तरच नवल. प्रत्येक जातीचा, धर्माचा ब्रँड करून आपल्याला सतत गिऱ्हाईक बनवण्याची संधी आपणच ह्यांना देतोय याची आपल्याला कल्पना नसेल असं मला वाटत नाही.

हे चित्र बदलू शकतं का, तर याचं उत्तर होय असं आहे. ह्यासाठी फक्त एकच निर्धार करावा लागेल, तो म्हणजे अगदी या क्षणापासून कोणत्याही पक्षाच्या आणि पक्ष नेत्याच्या आहारी न जाणं. जाती-धर्म-प्रान्त-भाषा-पंथ या पलिकडे जाऊन फक्त आणि फक्त देशहीताचा विचार करणं. कुठल्याही पक्षातला कुणाचा तरी पती, पिता, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण वा अन्य कुणीतरी कधीतरी काहीतरी केल्याच्या आधारावर कुणीही तुम्हाला इमोशनल ब्लॅक मेलींग करत मत मागायला हात पसरून उभं असेल आणि तो पक्ष तुम्हाला जाती-धर्म-प्रान्त-भाषा-पंथ इत्यादीच्या पलिकडे जाऊन फक्त देशहीताचा वितार करेल असा तुम्हाला विश्वास आहे, तरी अशा पक्षाला मतदान करु नका. लक्षात ठेवा, घराणेशाही कितीही कर्तुत्ववान असली तरी, एका ठराविक काळानंतर ती आत्मकेंद्रीत होत जाण्याची दाट शक्यता असते. आपल्यावर राज्य करण्याचा ‘कंपनी’ सरकारांचा डाव बाणून पाडून त्यांचं गिऱ्हाईक बनणं टाळणं आपल्याच हातात आहे. दुसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली सामाजिक कर्तव्य कसोशीने पाळणं. निती आणि नियमाने वागण्यात कसलाही कमीपणा नाही, हे स्वत:च्या मनावर बिंबवणं फार गरजेचं आहे. अनैतिक वागणाऱ्या नागरीकांना कोणत्याहा राज्यव्यवस्थेविषयी तक्रार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो आणि कुणी त्यांचं ऐकतही नसतं.

संस्थानं साम-दाम-दंड-भेदाने मोडीत काढून सरदार वल्लभभाई पटेलांनी एकसंघ भारत उभा केला होता. आता तशीच वेळ पुन्हा आली आहे, परंतु सरदार आता नाहीत. सरदारांचा जगातला सर्वात उंच पुतळा मात्र आपल्याला प्रेरणा देत उभा आहे. त्या पुतळ्याला स्मरुन आपण देशात उगम पावलेल्या राजकीय प्रायव्हेट लिमिटेड कंपन्याचं त्यांच्यासाठीच चालवलेलं त्यांचं राज्य खालसा करून, खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रजेने प्रजेसाठी चालवलेलं प्रजेचं राज्य आणण्याचा निर्धार करुया. आपणच सरदार बनूया..!!

तसं करण्यासाठी आजच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनी आपल्याला ताकद आणि हिम्मत आणि मुख्य म्हणजे नियत मिळो ह्या शुभेच्छा..!

-@नितीन साळुंखे

9321811091

26.01.2019

(फोटो सौजन्य इंटरनेट)

भारतीय लोकशाही; दशा आणि दिशा..(उत्तरार्ध)

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

भारतीय लोकशाही; दशा आणि दिशा..

(उत्तरार्ध)
भारतीय लोकशाही; दिशा..

आपली लोकशाही हि जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे म्हटले जाते. कायद्याच्या मुद्द्यावर ते बरोबरही आहे. परंतु बारकाईने पाहिल्यास आपल्या देशात लोकशाही आहे का, हा प्रश्नच आहे. गेल्या काही वर्षात आपला देश राजकीय घराणेशाहीने ग्रासलेला दिसतो. काही मोजके पक्ष सोडण्यास, याला कुणीही अपवाद नाही. लोकशाहीत घराणेशाही वेगवेगळ्या मार्गांनी प्रवेश करते. उदा. काही वेळा लोकप्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक लोकप्रिय व्यक्तीच्या ब्रँड व्हॅल्यूचा व सहानूभूतीच्या लाटेचा फायदा घेत नेते होतात किंवा काही वेळा मोठा जनाधार असणार्या एखाद्या नेत्यास एखादे पद काही कारणांमुळे देणे शक्य नसल्यास, त्याची नाराजी टाळण्याकरता ते पद त्याच्या जवळच्या नातेवाईकास देऊ केले जाते. आपल्या सारख्या विचारांच्या आवर्तनापेक्षा भावनांच्या लाटांवर स्वार होण्यास धन्यता मानणाऱ्या तथाकथीत सुशिक्षितांच्या देशात, जनतेच्या या भावनांचा धुर्त राजकीय मंडळी फार हुशारीने उपयोग करून घेतात. लोकही त्याला बळी पडून मृत्यू पावलेल्या त्या लोकप्रिय नेत्याच्या त्यानेच निवडलेल्या राजकीय वारसाची पोच, त्याची पात्रता, त्याचं आपल्या देशातील समस्यांचं आकलन याचा काही एक विचार न करता त्याला निवडून देतात. प्रत्येक वेळी जे आडात असतं, ते पोहऱ्यात असतंच असं नाही. सत्ता आणि त्यातून प्राप्त होणारे अमर्याद फायदे आपल्याच घरात कसे राहतील याचीच काळजी घराणेशाही घेत असते. घराणेशाहीला देशातील समस्यांचं काही फार देणं घेणं नसतं. भविष्यात आपल्या लोकशाहीचं जे काही भलं कमी आणि बुरं जास्त होऊ शकतं, त्यासाठी घराणेशाही हे एक कारण आहे.

केवळ कोणाचे तरी वारस आहेत म्हणून कोणतंही सामाजिक कार्य न केलेल्या व्यक्ती, समाजासाठी नि:स्वार्थ मेहनत करून कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या आकांक्षांना डावलून पुढे जातात, तेव्हा ते लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक बनतं. घराणेशाही एकाधिकारशाहीस, आर्थिक आणि इतर गैरव्यवहारास कारणीभूत होऊ शकते हे आपल्या देशात यापूर्वीच्या काही काळात वारंवार दिसून आलं आहे. समाजाची नाडी न ओळखता, समाजाच्या गरजा न जाणून घेता प्रसिद्धी माध्यमांपुढे फोटो काढण्या पुरती सामाजिक कृती केवळ कर्मकांडाचा भाग म्हणून पार पाडल्या जातात आणि त्यामुळे पुरेशी जबाबदारीची आणि सामाजिक गरजांची जाणीव झालेली नसताना, बापाच्या जीवावर मिळालेल्या लोकशाहीतील महत्वाच्या पदांचा समाजासाठी आवश्यक तो उपयोग होऊ शकत नाही. थोडक्यात घराणेशाहीत लायकी नसलेली व्यक्ती जनतेचा नेता होण्याची दाट शक्यता असते.

आपल्या लोकशाहीची जी काही सद्य दशा आहे किंवा भविष्यात ती आणखी होऊ शकते, ती म्हणजे जात आणि धर्म यांच्या आपल्यावर असलेल्या अतोनात पगड्यामुळे. भलेभले लोक आपली बुद्धी गहाण ठेवून आपापल्या जातीच्या किंवा धर्माच्या उमेदवारांना, मग ते गुन्हेगार असोत किंवा आणखी काही, मतं देतांना आढळतात. हल्लीच्या कोणत्याही निवडणुकांत, निवडणुकांचा प्रचार विकासाच्या मुद्द्याने सुरु होतो आणि संपतो मात्र जात आणि धर्म या मुद्द्याने. शेवटी जात किंवा धर्म धोक्यात आल्याची हाळी देऊन निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न होतात. लोकही वेड्यासारखे आपापले प्रश्न विसरून जात-धर्माच्यीटा नांवाखाली मतदान करताना दिसतात. म्हणून तर इतकी वर्ष होऊनही प्रश्न तिथेच आहेत आणि जात-धर्म मात्र प्रबळ झालेत. या दोघांच्या जोडीला आता प्रान्त आणि भाषा हे दोन भिडू येऊन मिळालेत आणि आपली लोकशाही आता जात-धर्म-भाषा आणि प्रान्त या चार भिडूंची रमी किंवा मेंढीकोट खेळत बसलेली मला दिसतेय; आणि या खेळात जिंको कुणीही, हरते ती मात्र ‘लोक’शाही..!

काही कुटुंबाची घराणेशाही आणि जात-धर्म-प्रांत-भाषा ह्या दोन घातक गोष्टी आपल्या देशात बऱ्याचदा एकत्र काम करताना दिसतात. नव्हे, त्या वरवर वेगवेगळ्या दिसत असल्या तरी आतून एकच असतात. सत्तेतून मिळणारे फायदे विशिष्ट कुटुंबांपर्यंत मर्यादित राहील्यामुळे, ती कुटुंबे ज्या जाती समुदायातून आलेली असतात त्या जाती समुदायासही पुरेसा लाभ प्रत्यक्षात पोहोचू शकत नाही किंवा तसा लाभ पोहोचू दिला जात नाही, असा आपला अनुभव आहे. तरीही आपल्याला पुरेसा लाभ मिळावा किंवा मिळेल या आशेने अशा कुटुंबाना दूर न करताच त्यांचा पाठिराखा समाज अधिक सवलती पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. अशावेळी बाकीच्या समाजाला सत्ता विशिष्ट जाती समुदायाच्या हाती एकवटल्याचे जाणवत रहाते आणि सामाजिक असंतोष निर्माण होतो. याचाच अर्थ सामाजिक असंतोषासाठी जाती-धर्माधारीत घराणेशाही जबाबदार ठरते. आपल्या महाराष्ट्र्त आणि देशातही हे होतं की नाही हे प्रत्येकानं तपासून पाहावं.

आपल्या दशेच्या दिशेने घेऊन जाणारा पुढचा मुद्दा म्हणजे निवडणूकांतला बेफाट पैसा. निवडणूक हा आता व्यवसाय झालेला आहे हे आता आपण अधिकृतरित्या मान्य करायला हवं; आणि व्यवसाय म्हटल, की मग गुंतवणूक आणि त्यावरचा भरभक्कम फायदा ह्या गोष्टी अपरिहार्यपणे येतात. व्यवसायात यशस्वी होण्याला महत्व असते, कोणत्या मार्गाने यश मिळाल याला फारसे महत्व नसते, हा बाजारचा नियम आता निवडणुकांतही अनुभवायला येऊ लागलाय. निवडणुका जिंकण्यासाठी आता प्रत्यक्ष काम करावं लागतच नाही. धंदेवाईक प्रसिद्धी माध्यमं विकत घ्यायची, काहीतरी फुटकळ कामं करुन (फोटोपुरती) टिव्ही-पेप्रात झळकायचं, चमच्यांकडून नाक्या-नाक्यांवर अंगावर येणारे बॅनर लावायचे आणि नेता बनायचं येवढं सोपं झालंय. आपल्या सोसायटीत लाद्या बसवून घेणे, इमारतीला रंग लावून घेणे, सोसायटीतील वृद्धाना तिर्थयात्रा घडवूण आणणे किंवा गांवातील एखाद्या देवळाचं भव्य बांधकाम करुन देण्याच्या बदल्यात मतं विकली आणि विकत घेतली जातात. अशा प्रकारे एकदा का मते विकली, की मग विकत घेणारा त्याचं काय करतो आणि पुढे तो ते आणखी किती फायदा मिळवून विकतो, ह्याचा हिशोब मागणं खरेदी-विक्रिच्या व्यवहारात बसत नाही, हे बाजाराचं तत्व इथेही लागू पडतं.

लाजलज्जा सोडून, सर्व प्रकारच्या तत्वांना हरताळ फासून, दलालीच्या भ्रष्टाचारत बरबटलेल्या राजकीय नेत्यांकडे जाब मागायचा किंवा त्यांच्यावर टिका करण्याचा अधिकार मतं विकणारांना नसतो, याचं भान जोपर्यंत आपल्याला येत नाही, तो पर्यंत आली लोकशाही परिपक्व झाली असं म्हणता येणार नाही. कुटुंब, जात-धर्म-भाषा-प्रांत या वरच्या मुद्द्यासोबत आलेला पैसाही हातात हात घालून चालू लागलाय. लोकशाहीला मारक असे हे तिन घटक एकत्र आल्याचं दु:ख नाही, तर या तिन्ही घटकांच्या जालिम विषारी मिश्रणाला देशातील अशिक्षित ते सुशिक्षित आणि ग्रामिण ते शहरी अशा सर्वच थरातील मतदार ज्या आनंदानं आणि बेहोशीने पितायत, तिथे आपल्या लेकशाहीची खऱ्या अर्थाने दु’र्दशा’ होतेय आणि याची खंत कुणालाच नाही याचं मुख्य दु:ख आहे.

हे बदलणं शक्य आहे का, तर याचं उत्तर होय असं आहे. वेळ लागेल, पण बदल नक्की घडू शकतो. मग काय करावं लागेल? तर, सर्वात पहिलं म्हणजे सर्वांनी मतदानाच्या दिवशी पिकनिकला न जाता सर्वांनी मतदान केलं पाहिजे. मतदार म्हणून विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून देऊ केलेली सर्व प्रकारची वैयक्तिक किंवा मर्यादीत प्रलोभनं निग्रहाने नाकारता आली पाहिजेत. कुणीतरी मतांसाठी पैसे देतोय, लॅपटाॅप देतोय, आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन देतोय किंवा देऊळ बांधून देतोय किंवा तिर्थाटनाला घेऊन जातोय किंवा काहीतरी फुकट देण्याचं आश्वासन देतोय म्हणून मतदान करायचं टाळलं पाहिजे. जात-धर्म-भाषा-प्रान्ताच्यापलिकडे जाऊन उपलब्ध उमेदवारांपैकी जी व्यकती स्वच्छ चारित्र्याची, आपल्या रोजच्या नजरेसमोरची आणि नैतिकता पाळणारी असेल, तिलाच मतदान करायला हवं. असं केल्याशिवाय नितिमत्ता आणि स्वच्छा चारित्र्याचे लोक राजकारणात येणार नाहीत. मतदान करताना फक्त स्वत:च्या समाजाचंच नव्हे, सर्वच समाजाचं भलं कोण होईल, समाजातील सर्व घटकांना एकत्र कोण घेऊन जाऊ शकेल, ज्याचं चारित्र्य स्वच्छ असेल, ज्याला समाजकारणाचा काही पूर्वानुभव अाहे अशाच उमेदवाराला मतदान करणं आवश्यक आहे. एखादा पक्ष सर्वांच आणि देशाचंही भलं करेल असं वाटत असेल आणि अशा पक्षाने जर कोणी बाहुबली किंवा गुंड किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असलेला उमेदवार दिला, तरी अशा उमेदवाराला निग्रहाने नाकारलं पाहिजे. उमेदवार चांगला आहे, पण पक्ष योग्य नाही असं वाटल्यासही त्या ही पक्षाचा उमेदवार नाकारता आला पाहिजे. वरील सर्व परिस्थितीत कायद्यानेच आपल्याला उपलब्ध करुन दिलेला NOTA (None Of The Above) हा पर्याय सर्वांनी स्विकारायला हवा. असं केल्यानेच आपली लोकशाही जागृतीच्या दिशेने निघालीय असं म्हणता येईल. NOTA वापरण्याचं गेल्या काही निवडणूकांत वाढलेलं प्रमाण आपली लोकशाही प्रगल्भ होऊ पाहातेय याचं द्योतक आहे असं मी समजतो.

मला कळतंय, की असं केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, पण ती एखाद दुसऱ्या निवडणूकीत. पुढच्या निवडणूकीत मात्र याचा धडा घेऊन सर्वच पक्ष चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील अशी आशा या नंतर निर्माण होऊ शकेल. भ्रष्टाचारी, गुंड, घराणेशाही यांचा आपल्या लोकशाहीला पडलेला विळखा सोडवण्याचा आपल्याला उपलब्ध असलेला हा सध्या तरी एकमेंव मार्ग दिसतो. दशा दशा झालेल्या जगातील आपल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला प्रगल्भतेच्या दिशेने घेऊन जाणं आपण मतदारांच्याच हातात आहे.

समाप्त.

-©️नितीन साळुंखे
9321811091

देव ‘जिप्सी’द्वारी भेटला..

देव ‘जिप्सी’द्वारी भेटला..

रात्रीतून अख्या जगाची भ्रमंती करुन पुन्हा पू्र्व क्षितीजावर उगवणारा आपला ‘मित्र’ आपल्यासाठी काय घेऊन येईल त्याचा नेम नाही. कधी आनंद, कधी निराशा, तर कधी आशा पल्लवीत करणारी एखादी घटना असं काहीही असो, पण ते कालचं नसतं येवढं मात्र नक्की. त्यात काहीतरी नवीन मिळवून वा वजा करुन तो घेऊनच तो येत असतो. ते नवीन आनंद देणारंच असतं. काहीवेळा दु:ख वजा करणारही असतं, तर काहीवेळा कालच्याच परिस्थितीकडे नव्या नजरेनं कसं पाहावं याची दृष्टी देणारंही असतं..

नोकरीचा धोपट मार्ग सोडून लेखनाच्या क्षेत्रातच मुशाफिरी करायची मी ठरवली त्यानंतर तर हे त्याचं माझ्यासाठी दररोज नव्यानं काहीतरी घेऊन येणं मी दररोज अनुभवतोय..! कधी एखादी नवीन कल्पना सुचते, तर कधी एखादा वेगळाच विषय सुचतो. कधी लिखाण आवडल्याचं सांगणारा दूरवरून एखादा अनपेक्षीत फोन येतो, तर काही चुकलं असेल तर तसं सांगणाराही प्रत्यक्ष येऊन भेटतो..नवीन व्यक्ती तर कितीतरी भेटत असतात आणि माझ्या आयुष्याच्या बेरजेत सामील होत असतात..!

कालचा दिवसंही असाच उजाडला. सकाळीच मोबाईलवर एक मेसेज आलेला पाहिला. ‘मी मुंबंईला येतोय, माझा नंबर अमुक अमुक आहे. जमलं तर फोन कर, कधीतरी भेटायचं आहे..’ मी आधी चष्मा आणि मग डोळे पुन्हा पुन्हा चोळून मेसेज पुन्हा पुन्हा पाहिला. मेसेज करणारांचं नांव पुन्हा पुन्हा तपासलं. माझा विश्वासच बसेना. बायकांची नजर तेज, त्यातही नवऱ्याच्या मोबाईलवर येणाऱ्या मेसेजेसबद्दल तर अधिक तेज, म्हणून हिला दाखवला. तिनेही तेच नांव सांगितलं. मी काही काळ ब्लॅंक झालो. मला क्षणभर कळेनाच की काय करावं म्हणून..! मेसेज होताच तश्या वजनदार व्यक्ती कडून आलेला. म्हणजे देवाने भक्ताला ‘भेटूया का’ असं अनपेक्षीतपणे विचारलं, तर भक्ताची जी काय अवस्था होईल ना, नेमकी तिच माझी अवस्था काल सकाळी तो मेसेज आणि त्याहीपेक्षा मेसेज पाठवणाराचं नांव वाचून झाली होती..

मेसेज माझ्या देवाचाच होता. मेसेज मराठीतल्या एका प्रसिद्ध लेखकाचा होता. लेखक (अर्थात, कोणत्याही कलेच्या माध्यमातून व्यक्त होणारी कुणीही व्यक्ती.) माझ्यासाठी साक्षात देवच. गदा-शंख-चक्रधारी असा कथेतला आपल्या भाळी काहीतरी अगम्य लिहिणारा ‘भाळ’लेखक आणि जगण्याचं सुत्र वाचता येण्यासारख्या शब्दांतून पांढऱ्या कागदावर उलगडून दाखवणारा हाडा-मांसाचा कथा-लेखक, असे दोघंजण मला जर कधी एकदम रस्त्यात भेटले, तर मी आधी लेखकाचं दर्शन घेईन आणि त्यातून वेळ मिळालाच तर मग शिष्टाचार म्हणून ‘भाळ’लेखकाची विचारपूस करेन. अर्थात पहिला मला भेटणं जवळपास अशक्यच..! कारण कथेतल्या देवाच्या मागे जावं असं फारसं कधी वाटलं नाही. ‘वाईट वागणाराला देवबाप्पा नरकात पाठवतो’ हे लहानपणी ऐकलेलं वाक्य, मोठं झाल्यावर ‘वाईट वागणाराला देवबाप्पा स्वर्गात पाठवतो’ इतक्या विरुद्ध अर्थानं खरं होताना अनुभवून, कथेतल्या देवावरचा विश्वास साफ उडाला. कथा-लेखकावरचा माझा विश्वास मात्र दिसेंदिवस वाढत चालला आहे.

नशिब लिहिणाराची चिकित्सा करण्याची सोय नाही. म्हणजे त्याचं काहीच म्हणणं नसावं, पण स्वत:ला त्याचे भक्त म्हणवणारे तसं करु देत नाहीत. कागदावर लिहिणाऱ्याची मात्र चिकित्सा होऊ शकते. त्याच्याशी वाद-संवाद होऊ शकतो. नशिब लिहिणारा आंधळं करतो, कागदावर लिहिणारा-त्याचं लिहिलेलं पटो वा न पटो-दृष्टी देत असतो. तेहेतीस कोटी देवापेक्षाही याचे अवतार कितीतरी अधिक आहेत आणि ते किती आहेत हे आपण ठरवायचं असतं. उदा. एकाच पु.ल.चे विनोदी लेखक, नाट्यकार, संगितकार ते जगावं कसं आणि का ते सांगणारे तत्वज्ञानी असे कितीतरी अवतार आहेत. आपल्याला भावेल त्या अवताराची आराधना करावी. ही परंपरा अगदी पुरातन काळापासूनची आहे. म्हणून मी लेखक-कवी-कलावंत यांना पुराणकथांतल्या देवापेक्षा वरचं मानतो. असाच एक देव मला भेटू इच्छित होता. माझा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता..!!

तो मेसेज होता मराठीतले प्रसिद्ध लेखक श्री. वसंत वसत लिमये यांचा. ‘लाॅक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ ह्या दोन रहस्य-थ्रिलर कादंबऱ्यांतून चोखंदळ मराठी वाचकांच्या घरात आणि मनात पोहेचलेले श्री. वसंत वसंत लिमये यांची काल माझी भेट झाली. अगदी ठरवून झाली.

श्री. वसंत लिमये यांची पुस्तकं वाच असं मला माझा आणखी एक कलावंत मित्र अमरजीत आमले याने बजावून सांगितलं होतं. अगदी वाॅर्निंगच दिली होती म्हणा. तुला काही तरी भन्नाट, भवतालाचं भान विसरून मन खिळवून ठेवणारं काही वाचायचं असेल, तर या दोन कादंबऱ्या वाच, असं दर भेटीत अमर मला आवर्जून सांगायचा. मला ‘लाॅक ग्रिफिन’ काही मिळाली नाही, पण ‘विश्वस्त’ माझ्याकडे आहे. मी अद्याप ती वाचायला सुरुवात केलेली नाही हे मात्र खरं.

श्री. वसंत वसंत लिमये यांचं मला लेखक म्हणून आकर्षण तर होतंच, पण त्यांच्या वैशिष्यपूर्ण नांवाविषयीही आकर्षण होतंच. या पूर्वी असं नांव इंग्लंड-स्पेन आदी देशांच्या राजांविषयीच वाचलेली आठवत होती. म्हणजे पहिला जाॅर्ज-दुसरा जाॅर्ज असं. मराठीत हे नांव पहिल्यांदाच वाचलं होतं आणि तेंव्हापासून ते मनात अगदी फिट्ट बसलं होतं. असं नांव धारण करणारी व्यक्ती, अंगात काहीतरी वेगळे गुण धारण करणारी असणारच याबद्दल शंका नव्हती. काल त्यांच्या भेटीत माझा अंदाज बराचसा खरा ठरला..त्यांनी त्यांच्या नांवामागची कथा तपशिलवार उलगडूनही सांगितली.

मला वसंतराव लेखक म्हणून माहिती. पण ते आय.आय.टी.चे इंजिनिअर आहेत हे माहित नव्हतं. मला आवडणारे बहुतेक लेखक आय.आय.टी.तून शिकून बाहेर पडले होते. चेतन भगत, अच्युत गोडबोले ही तर सर्वांच्या माहितीची नांवं. यावरून आय.आय.टी.त मशिनींच्या इंजिनिअरींगबरोबरच शब्दांचं इंजिनिअरींगही शिकवत असावेत असा माझा आपला ग्रह झाला आहे. वसंतरावांना भेटून तो अधिक घट्ट झाला.

पहिल्यापासून दऱ्या-खोऱ्यात फिरण्याची होस असलेले वसंतराव आजही तसेच आहे. जेमतेम पाच-सहा वर्ष नोकरी केली आणि नंतर मात्र सर्ववेळ आपल्या गिर्यारोहणाच्या छंदासाठी दिला. मग या छंदातून मिळणारा आनंद, मिळालेले अनुभव आपल्या मित्रांसाोबत लिहून शेअर करु लागले व ते पुढे कधीतरी ‘महानगर’चे निखिल वागळे यांच्या नजरेस आले व त्या लेखनाची मालिका ‘महानगर’मधे छापून आली. ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक कुमार केतकर यांनी पुढे वसंतरावांची दीर्घ कथा प्रसिद्ध केली. हे दोन्ही प्रयत्न वाचकांना प्रचंड आवडले. नंतर ‘ग्रंथाली’च्या दिनकर गांगलांनी त्यावर ‘धुंद स्वच्छंद’ हे पुस्तक प्रकाशित केलं. ते ही दणक्यात संपलं. आणि मग लिहिण्याची स्वच्छंद धुदी चढू लागली. पुढे ग्रंथालीनेच ‘लाॅक ग्रिफिन’ प्रसिद्ध केली आणि पुन्हा काही वर्षांनी दिलीप माजगांवकरांच्या ‘राजहंस’ने ‘विश्वस्त’ प्रसिद्ध केली. या दोन्ही पुस्तकांच्या पाच-पाच आवृत्त्या निघाल्या (एक आवृत्ती हजार पुस्तकांची असते). सह्याद्री ते हिमालय येवढ्या दीर्घ पल्ल्यात केलेल्या भटकंतीतून वसंतरांवांच्या मनात घर केलेल्या गुढाचा स्पर्श या दोन्ही कादंबऱ्यांच्या कथावस्तूंमागे आहे..

तासाभराच्या आमच्या भेटीत मला उलगडलेले वसंतराव मी माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वसंतरावांच्या अंगी आणखीही काही कला आहेत. ते व्यव्स्थापनाचं प्रशिक्षण देतात व ते प्रशिक्षण त्यांना डोंगर दऱ्यांतून केलेल्या भटकंतीच्या, गिर्यारोहणाच्या अनुभववार आधारीत असतं. या विषयवावर ते व्याख्यानही देतात. नाना कळा आहेत त्यांच्या अंगी. परंतु अत्यंत दिलखुलास असलेल्या या व्यक्तीमत्वातलं मला सर्वात जास्त काय आवडलं असेल, तर त्यांची भटकंती. कारण मी हा त्याच पंथातला. माझी झेप व पल्ला मुंबईच्या परिघातला, तर वसंतरावव पार सह्याद्रीपासून ते हिमालयाला गवसणी घालणारे. आमच्या क्षमतेत जमीन-अस्मानाचा फरक असला तरी आमचा पिंड एकच.

आमची कालची भेट झाली, ती शिवाजी पार्कातल्या ‘जिप्सी’त. वसंतरावांच्या आणि माझ्या भेटीला एका लिमयांचं ‘जिप्सी’. साक्षी असावं, हा केवळ योगायोग मानायला मी तयार नाही. हा संकेत आहेत. देव असाच साक्षात्कार देत असतो ना?

-@नितीन साळुंखे

9321811091

19.01.2019

भारतीय लोकशाही; दशा आणि दिशा.. (पूर्वार्ध)

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

भारतीय लोकशाही; दशा आणि दिशा..

(पूर्वार्ध)

भारतीय लोकशाही; दशा..

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षाचा कालावधी लोटला. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक लहान मोठ्या संस्थांनानी बनलेला हा उभा-आडवा देश, स्वातंत्र्यानंतरच्या काही काळात एक अखंड देश म्हणून जगासमोर आला. ब्रिटीशांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी वारशात मिळाल्या, त्यात ‘लोकशाही’ नांवाची अप्रुपाची एक गोष्टही मिळाली.

विविध लहानमोठ्या आणि एकमेंकांमध्ये मैत्रीपेक्षा शत्रुत्वच्याच सीमा जास्त असलेल्या राज्या-संस्थानांच्या या देशात, स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही राज्यपद्धती सुरू झाली. एक देश, एक संविधान, एक ध्वज असलेला भारत एकच राष्ट्र म्हणून जगाला माहिती झाला. जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची आज ओळख आहे. भारत जगाच्या ज्या दक्षिण आशिया भागात येतो, त्या भागात असलेल्या इतर देशांच्या राजकीय परिस्थितीकडे पाहीलं, तरी त्यांच्या तुलनेत भारत लोकशाही टिकवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे असं दिसतं. पण खरंच तसं आहे का? इथे सर्वच आलवेल आहे का? की लोकशाहीच्या बुरख्याखाली काही वेगळंच सुरू आहे? मला पडलेल्या या प्रश्नाचं विश्लेषण आणि त्यावर उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न मी या दोन भागातल्या लेखांतून करणार आहे. या दोन भागांचं सामायिक शीर्षक एकच असलं तरी त्याची ‘भारतीय लोकशाही; दशा’ हा आपल्या लोकशाहीची सद्यस्थिती सांगणारा पूर्वार्ध आणि ‘भारतीय लोकशाही; दिशा’ हा आपल्या लोकशाहीची सद्यदशा सुधारण्यासाठी आपण मतदारांनी कोणत्या दिशेने विचार करायला हवा त्याची चर्चा करणारा उत्तरार्ध, अशी सोयीसाठी विभागणी केलेली आहे.

या लेखनात काही त्रुटी राहील्या असण्याची शक्यता मी नाकारत नाही कारण मी काही राजकारणाचा जाणकार नाही. तसंच या लेखांमधे एखाद्या मुद्द्याची पुनरावृत्ती असण्याची शक्यता आहे, कारण अशा प्रकारच्या लेखात हे टाळता येण्यासारखं नसतं..

हे खरंय, की स्वातंत्र्योत्तर काळात देशांतर्गत असलेल्या विविध संस्थानांच्या सीमा पुसल्या गेल्या आणि देशाला चहुबाजूने असलेली एकच सीमा मिळाली. आपल्या देशाला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळख मिळाली. १९४७च्या स्वातंत्र्य मिळालेल्या रात्री पं. नेहरुंनी “बहुत साल पहले हमने नियति से एक वादा किया था..” असं भावूक भाषण केलं होतं. हे भाषण भविष्यातल्या सोनेरी स्वप्नांचं असणं अगदी सहाजिक होतं. नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्याच्या आनंदात, भविष्यात समोर उभ्या ठाकू शकणाऱ्या समस्यांची कल्पना त्याव्ळच्या राजकारण्यांना होती की नाही याचं आकलन आता होत नाही.

पुढे काही वर्षांनी संस्थानं विलीन होऊन आपापल्या भाषेची अस्मिता जागृत झालेले प्रांत निर्माण झाले. सुरुवातीला ताज्या ताज्या मिळालेल्या स्वातंत्र्याच्या कैफात ही नव्याने निर्माण झालेली संस्थानच आहेत आणि त्यांच्यातला सीमा आणि भाषा प्रश्न पुढे जटील होणार आहे याची जाणीव झालेली नव्हती. मुसलमानांना त्याच्या मागणी प्रमाणे पाकिस्तान देऊन टाकल्यानंतरही आपल्या देशातल्या मुसलमानांची धार्मिक समस्या पुढे किती अवघड होणार आहे याचीही कुणाला कल्पना नसावी. स्वातंत्त्रयप्राप्तीसाठी खांद्याला खांदा लावून लढलेल्या जाती-जमाती-पंथ आणि त्यांच्यातली उच्च निचतेची भावना अजून जागी झाली नव्हती. नुकतच मिळालेलं स्वातंत्र्य, त्यासाठी केल्या गेलेल्या कठोर संघर्षाच्या फळाचे गोडवे गाण्यात सर्वच मशगुल होते.

राजकीय स्तरावर सुरुवातीला देशात देशव्यापी म्हणता येतील असे काॅंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे केवळ दोनच राजकीय पक्ष होते. तर, पश्चिम बंगालातला फॉरवर्ड ब्लॉक, तामिळनाडूतला द्रमुक, काश्मिरातला नॅशनल काॅन्फरन्स, केरळातली मुस्लिम लीग, पंजाबातलं अकाली दल आणि काही दोन-चार राजकीय पक्ष त्या त्या राज्यात कार्यरत होते, पण त्यांची ताकद आणि प्रभाव मर्यादीत होता. देशात आणि राज्यांतही खऱ्या अर्थाने प्रभाव होता तो काॅंग्रेसचाच. देशाचा स्वातंत्र्य लढा मुख्यत: काॅंग्रेसच्याच नेतृत्वाखाली लढला गेल्याने आणि काॅग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळालं अशी लोकांची भावना (आणि कृतज्ञताही) असल्याने असं होणं अगदी सहाजिकच होत.

याचाच परिणाम म्हणून स्वातंत्र्यानंतर बराच काळ काॅंग्रेसने या देशावर अभिषिक्त राज्य केलं. पुढे आणखी काही वर्षांनी स्वातंत्र्य लढ्याचा कैफ उतरायला सुरुवात झाली आणि इतका काळ काॅंग्रेस सोबत असलेल्या राजकीय व्यक्तीमत्वांना, काॅग्रेस चाखत असलेली सत्तेची फळं लक्षात येऊन, इतर पक्षांतही सत्तेपर्यंत जायच्या आकांक्षांना धुमारे फुटू लागले. आता पर्यंत ब्रिटीश या सामायिक शत्रूविरुद्ध लढण्याचं लक्ष आतापर्यंत संपुष्टात येऊन काॅंग्रेस हा सामायिक राजकीय शत्रू ठरला आणि मग इथून पुढे भारतीय लोकशाहीची विटंबना व्हायला सुरुवात झाली.

लोकशाही मार्गाने काॅंग्रेसला सत्तेवरुन खेचायचं म्हणजे काॅंग्रेसच्या मतपेटीला खिंडारं पाडायची हे ओघानेच येत. मग मतदारांमधे भाषा-प्रांत-धर्म-पंथ यावरून भेद निर्माण करायचा अपरिहार्य मार्ग दिसू लागला. आणि इथपासूनच आतापर्यंत सख्ख्या बहिणींप्रमाणे सुखाने नांदणाऱ्या देशांतर्गत भाषा आणि प्रान्त एकमेकाचे हे एकमेकांचे शत्रू म्हणून एकमेंकासमोर उभे ठाकले. धर्मावरून लढाया आणि दंगली आपल्याला काही नविन नव्हत्या, परंतू आता मात्र त्यात राजकारणाने प्रवेश केला. जाती-जमातींना आपापल्या उच्च-निचतेच्या जाणीवा खुणावू लागल्या. हे कमी की काय म्हणून आहेरे आणि नाहीरे अशीही दरी निर्माण झाली. आणि यातील प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जाऊन त्या त्या गोष्टीचं रुपांतर मतपेटीत करण्याचा प्रयत्न होऊ लागला. जात-धर्म-भाषा-प्रांन्त-गरीब-श्रीमंत अशा प्रत्येकाची व्होटबॅंक तयार होऊ लागली आणि याचा अपरिहार्य परिणाम म्हणून, या सर्वांचा कैवार घेण्याचं नाटक वठवणाऱे अनेक राजकीय पक्ष या देशात निर्माण झाले. लक्षात घ्या, १९४७ च्या दरम्यान केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील येवढ्याच असलेल्या राजकीय पक्षांची संख्या जवळपास ५०-६० पटीने वाढली. सन २०१४ सावी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत देशभरात एकूण ४१८ राजकीय पक्षांनी भाग घेतला होता. यातील बहुसंख्य पक्ष जात, भाषा, धर्म, पंथ यांच्या पायावर उभे आहेत. राष्ट्रीयत्वाची भावना असलीच, तर ती लोकशाहीची तोंड देखल्या का होईना, पण लाज राखावी म्हणून असावी.

तिकडे बराच काळ सत्तेत राहिल्यामुळे सत्तेची ताकद आणि मधूर फळं काॅंग्रेसच्या लक्षात आली काॅंग्रेसनेही डिव्हाईड आणि रुलचं राजकारण सुरू केलं. हे असं करण्यात केवळ काॅंग्रेसच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्ष हिरिरीने पुढे येऊ लागले. जात-पात-प्रान्त-धर्म आदी भावनेने विचारशक्ती गमावलेल्या लोकांचे कळपच्या कळप आपापल्या वाटणाऱ्या (फक्त वाटणाऱ्याच बरं का..!) पक्षांच्या मागे उभे राहू लागले. ‘लोकांचं लोकांसाठी लोकांनी चालवलेलं सरकार’ हे लोकशाहीचं उदात्त वाटणारं तत्व मागे पडून ‘आपल्या लोकांचं आपल्या लोकांसाठी आणायचं आपल्या लोकांच सरकार’ अशी नविन विस्तारीत व्याख्या जन्म पावू लागली. वरतून कल्याणकारी वैगेरे वाटणारं राज्य ही कल्पना मागे पडू लागली आणि राजकारण हे लोकांसाठी केल्याचा देखावा करत केवळ सत्तेसीठीच होऊ लागलं आणि सत्ता फक्त स्वत:च्या स्वार्थासाठीच हे मुख्य तत्व झालं. देशातली काॅंग्रेसची सत्ता आणि वर्चस्व हळहळू कमी होऊ लागलं होतं, तरी संपुष्टात आलं नव्हतं.. काॅंग्रेसच्या कमी होणाऱ्या जागांवर विविध विरोधी तत्वाचे राजकीय पक्ष निवडून येऊ लागले होते. सत्तेसाठी त्यांची अनैतिक शय्यासेबत होऊ लागली होती. देशात अशा अनैतिक शय्यासोबतींना ‘आघाडी सरकार’ असं गोंडस नांव देण्यात आलं होतं आणि मुलामा होता कधीच न होऊ शकलेल्या लोककल्याणाचा..!

एव्हाना राजकारणातले बाकी सर्व प्रश्न मागे पडून जात आणि धर्म, भाषा आणि प्रान्त हे प्रश्न महत्वाचे ठरू लागले होते. आपापल्या जाती-धर्म-भाषांचा आधार घेऊन उदयाला आलेल्या पक्षप्रमुखांची नवी पिढी राजकारणात येऊ घातली होती. त्या त्या प्रांताची, भाषेची, जातीची, धर्माची अस्मिता जपण्यासाठी निर्माण झालेल्या पक्षांनी कधीना कधी सत्तेची फळं चाखलेली होती आणि या देशातल्या लोकशाहीचा उपयोग स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी अनिर्बंधपणे आणि उत्तम प्रकारे करता येतो याची त्यांना सार्थ जाणीव झालेली होती आणि म्हणून विविध अस्मितांचा बागुलबुवा उभा करुन सत्तेसाठी आणि त्यातून येणाऱ्या काळ्या-पांढऱ्या संपत्तीचा ओघ फक्त आपल्या आणि आपल्याच घरीच कसा राहील याचा काळजी घेतली जाऊ लागली आणि भारताततल्या लेकशाहीत घराणेशाहीचा शिरकाव झाला. इथे भारतातील लोकशाहीने एक भयानक वळण घेतलं आणि जर का वेळीच आवरलं नाही, तर आता ती कुठे जाऊन आदळेल याची कुणालाही कल्पना नाही. आपली लोकशाही इथून पुढे ‘लेक’शाही झाली. पक्ष खाजगी पेढ्या झाले आणि आपण मतदार भांडवल..स्वहित मोठं झालं आणि ते साधण्यासाठी देशहीताचाही बळी द्यायला सर्वपक्षीय राजकारणी कमी करणार नाहीत, अशी भावना जनमानसात तयार होऊ लागली..

सुरुवातीला ८ ते १० पर्यंत मर्यादीत असलेले राजकीय पक्ष गेल्या ७० वर्षात ६०- ७० पटीने वाढले आणि यातील बहुसंख्य पक्ष खाजगी कंपन्या आहेत. हे पक्ष वाढण्याचं वरवरचं कारण लोकसेवा हे असलं, तरी मुख्य कारण राजकारणात मिळणारा प्रचंड बेहिशोबी पैसा हे आहे. या पैशाचा हिशोब देण्याची गरज नसते. कुणी विचारायचं धाडस केलंच, तर मग ‘सिद्ध करून दाखवा’ हा परवलीचा मंत्र म्हणायचा. कारण सर्वसामान्यांच्या डोळ्यांना स्वच्छ दिसत असलेलं हे पुढाऱ्यांचं नागडं पाप, सिद्ध करताच येणार नसतं. सर्वच यंत्रणा भ्रष्चाचारात लडबडलेल्या, त्यामुळे कोण कोणासमोर काय सिद्ध करणार? सिद्ध करायला जातात आणि शुद्ध करुन घेतात असा सर्वांचा स्वार्थाचा नंगा नाच सर्वत्र चालू आहे. ‘क्लिन चिट’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ चारित्र्याचा दाखला असा घ्यायचा असला तर खुशाल घ्यावा, मी मात्र तो ‘स्वच्छ फसवणूक-क्लिन चीट’ असाच घेतो. स्वातंत्र्यानंतर कुणा पुढाऱ्याला, अलिकडचे लालू आणि भुजबळ सोडल्यास, अवैध संपत्ती बाळगली म्हणून आजन्म तुरुंगवास झाल्याचं आठवतंय का?

राजकीय पक्षांच्या झालेल्या अनिर्बंध वाढीमुळे सत्तेचं वाटलं जाणं सहाजिकच होतं. कुणा एकाच सरकार येणं अशक्य असल्याने मग एकमेकांबरोबर अनैतिक शय्यासंबंध सुरु झाले (या शय्यासोबतींना ‘घोडेबाजार’ असं नांव देऊन प्रामाणिकपणात पहिला क्रमांक असणाऱ्या घोड्यांना का बदनाम केलं जातं हे मला कळत नाही.). वर ‘राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो’ असं या शय्यासंबंधांचं उदात्तीकरणही सुरु झालं. गेल्या अनेक वर्षात असे अनेक निर्लज्ज संबंध आपल्या राजकारणात आपण पाहात आलो आहोत. सत्तेसाठी वाटेल ते करण्याचा हिडीस तमाशा आपण उघड्या डोळ्यांनी आणि हताशपणे पाहात आलो आहोत. भारतातील कोणत्याही माणसाला त्याचं आजच्या राजकारणाविषयी मत विचाराल, तर पहिलं राजकारण्यांच्या आया-बहिणींच्या गुह्य अवयवांचा उद्धार करून, ‘वीट आलाय या राकारणाचा आणि राजकारण्यांचा’ हेच उत्तर ऐकायला मिळेल. अपवाद फक्त नेत्यांच्या फेकल्या उष्ट्यावर जगणाऱ्या आणि कणा हरवलेल्या त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांच्या व्यक्तीपुजेने आंधळ्या झालेल्या फाॅलोअर्सचा..

(पूर्वार्ध समाप्त..)

-@नितीन साळुंखे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(उत्तरार्ध)

भारतीय लोकशाही; दिशा..

आघाडी सरकारं, भ्रष्टाचार, बजबजपुरी, माजोरी झालेले सरकारी अधिकारी आणि गल्ली ते दिल्ली स्तरावरचे राजकारणी यांना कंटाळलेल्या जनतेने, सन २०१४ सालात झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये बहुमताने श्री. नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या झोळीत आपल्या मतांचं दान टाकलं आणि केंद्रात भाजपाचं एकट्याच्या बळावरचं सरकार आलं. भारतीय राजकीय इतिहासात ही निवडणूक, धर्म-जात-पंथ-भाषा हे मुद्दे वगळून केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली…

(उत्तरार्धाचा पुढील भाग आणखी काही दिवसांनी)

-@नितीन साळुंखे

9321811091

उत्तरार्धाची ओळख..

या निवडणूकीत यशाचं दान भाजपाच्या झोळीत पडण्यामागे जसा विकासाचा मुद्दा, श्री. नरेन्द्र मोदींनी गुजरातेत केलेल्या यशस्वी आणि भ्रष्टाचाररहीत केलेल्या कारभार आणि भाजपाच नसलेली घराणेशाही लोकांच्या नजरेसमोर होता.

चित्र सौजन्य- इंटरनेट

भायखळ्याचा ‘खडा पारशी’ – उपसंहार

खडा पारशी – उपसंहार

भायखळा जंक्शनवरचा ‘खडा पारशी’ जवळपास गेली दोन वर्ष मला छळत होता. रोज काहीतरी माहिती शोधायचो आणि काही कारणांनी पुढचा शोध घेणं आणि म्हणून त्यावर लिहिणं राहून जायचं. कंटाळा हे मुख्य कारण आणि ‘मी हे का आणि कुणासाठी करतो’ ह्याचा विचार मनात येणं हे दुसरं कारण. दुसरं कारण अत्यंत तात्कालिक असायचं कारण त्याच उत्तर, मी हे माझ्या आनन्दासाठी करतो, हे असायचं. पण तरीही कंटाळा हे मुख्य कारण उरायचंच. त्यामुळे त्यावर लिहिणं राहूनच जायचं.

खडा पारशी मला छळत होताच, गेले काही दिवस मात्र तो मानगुटीवरच येऊन बसला आणि मग पुढचा मार्ग त्यानेच मला दाखवला. दोन वर्षांपूर्वी जेंव्हा मी खडा पारश्याला माझ्या मनात जागा दिली, तेंव्हा सुरुवात नेमकी कुठून करायची हा प्रश्न होता. विकिपीडिया हा सर्वात सोपा आणि कधीही उपलब्ध असलेला मार्ग. पण तो तेवढासा खात्रीशीर म्हणता येत नव्हता. तरी सुरुवात तिथूनच केली. मी सुरुवात केली आणि मानेवर बसलेला हा पारशी बाबा चक्क माझ्या बरोबर येऊन माझ्या हाताला धरून मला एक एक ठिकाण फिरवू लागला आणि मग खडा पारश्याच्या माहितीच एक एक दालन दालन माझ्यापुढे खुलं होऊ लागलं. तशी ह्या खड्या पारश्याची माहिती इंटरनेटवर विपुलतेने उपलब्ध आहे, परंतु मला काहीतरी वेगळी आणि सत्यतेचा अधिक अंश असणारी माहिती हवी होती. कुठलंही लिखाण करताना वस्तुनिष्ठ माहिती, ती हि संदर्भासहित, देण्याकडे माझा कटाक्ष असतो. खडा पारश्याच्या बाबतीत मला असेच एक एक संदर्भ मिळत गेले आणि मग मी लिहिती गेलो. जेमतेम चार-पाचशे शब्द भरतील असं वाटत असताना चक्क दोन-अडीच हजार शब्दांचा ऐवज तयार झाला आणि गेल्या तीन-चार दिवसात मी तो तुमच्या वाचनासाठी माझ्या फेसबुकवर आणि ब्लॉगवर पोस्ट केला. लाईक /कमेंट्स भरपूर मिळाल्या, पण बारकाईने किती जणांनी वाचला कुणास ठाऊक..!! पण जाऊदे, तो माझा मुख्य हेतू नाही..!!

इतिहासाचा धांडोळा घेताना काहीतरी शोधताना काहीतरी अनपेक्षित असं हाती लागून जात. हा माझा नित्याचा अनुभव. घरात हरवलेली वस्तू शोधताना, दुसरी मागेच कधीतरी हरवलेली वस्तू आपल्याला अवचित मिळून जाते, हा अनुभव आपणही कधी न कधी घेतला असेल. अशीच खडा पारशाची हकीकत शोधात असताना, मी गेली काही वर्ष शोध घेत असलेली ब्रिटिश काळातली रस्त्याची एक कोनशिला (Plaque) अगदी माझ्यापासून दोन फुटावर स्वतःच येऊन उभी राहिली. आणि तिचा खडा पारश्याच्या इतिहासाशी निकटचा संबंध असल्याने तिची माहिती तुम्हाला देणं मला आवश्यक वाटलं.

खडा पारशी च्या दुसऱ्या भागात अलेक्झांड्रा शाळेच्या संदर्भात मेजर वुडबीचं नांव आलेलं आपण वाचलं असेल. ही शाळा फोर्ट विभागातल्या बाॅम्बे जिमखान्यालगतचा ज्या हजारीमल सोमानी मार्गावर आहे, त्या रस्त्याचं पूर्वीच नांव ‘वुडबी रोड’. लष्करात मेजर असलेले सिडनी जेम्स वुडबी त्यांचे साथीदार प्रायव्हेट इलाही बक्ष आणि प्रायव्हेट सोनक टंक १८८० सालात अफगाणिस्थानातल्या दुबराई (Dubrai ) येथे झालेल्या लढाईत शत्रूशी लढताना धारातिर्थी पडले होते. ही लढाई अॅंग्लो-अफगाण युद्ध म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. त्या मेजर वुडबी यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ ह्या रस्त्याला त्यांचं नांव दिल गेलं होत.

मेजर वूडबींच्या शौर्याची माहिती देणारी एक संगमरवरी कोनशिला (Plaque) त्या रस्त्यावर आहे अशी माहिती मला मुंबईवरच्या जुन्या पुस्तकांत मिळाली होती, पंतू गेली तीन-चार वर्ष शोध घेऊनही मला ती कोनशिला काही सापडत नव्हती. दरम्यान त्या रस्त्याचंही बऱ्याचदा नूतनीकरण झालं होत आणि इतिहासाशी काहीच नातं नसलेल्या म.न.पा. आणि सा.बां.खात्याच्या स्थितप्रज्ञतेवर माझा गाढ विश्वास असल्याने, ती कोनशिला या दोन यंत्रणांच्या कृपेने कुठेतरी अज्ञानात विलीन झाली असावी, असं मी धरून चालत होतो (सायनच्या ‘डंकन कॉजवे’ची पाटीही अशीच मला सापडत नाहीय, हा पूर्वानुभव होताच). परंतु ‘इच्छा असली, की प्राप्ती होतेच’ या उक्ती’प्रमाणे आज ती पाटी काहीच हासभास नसताना अचानक माझ्या अगदी समोर येऊन उभी राहिली.

त्याचं झालं असं, मानेकजी कर्सेटजी यांची अधिकची काही माहिती मिळते का, ते पाहण्यासाठी मी हजारीमल सोमानी मार्गावरच्या अलेक्झांड्रा शाळेत गेलो होतो. तिकडच्या उत्साही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडची असलेली सर्व माहिती मला आनंदाने दिली. मानेकजींच्या ‘व्हिला भायखळा’ या जागेनंतरच्या सध्याच्या जागेत सुरु झालेल्या शाळेच्या पूर्वीच्या इमारतीचं नांव ‘अल्बर्ट हॉल’ होत हे मला त्या कर्मचाऱ्यांनीच सागितलं. ह्या गोष्टीचा अन्यत्र कुठेही उल्लेख नाही. त्यांचा निरोप घेताना मी सहज म्हणून त्या कोनशिलेची चौकशी केली, तर जवळपास ५-६ तुकड्यात तुटलेली ती संगमरवरी कोनशिला शाळेने त्यांच्या गेटच्या आतल्या बाजुला निगुतीने चिटकवलेली ती संगमरवरी पाटी मला त्यांनी चटकन दाखवली. सोबत फोटो दिलाय. फोटोत तुटलेली पाटी सहज दिसून येते.

काही वर्षांपूर्वी रस्त्याचं काम सुरु असताना, रस्त्याच्या कंत्राटदाराकडून ही कोनशिला तुटली होती किंवा तोडली गेली होती. हे शाळेच्या लक्षात आल्यावर शाळेने ती कोनशिला, डेब्रिजरूपाने कुठेतरी गडप होण्यापूर्वी कंत्राटदाराकडून मागून घेतली आणि तिचे तुटलेले तुकडे काळजीपूर्वक चिटकवून आपल्या गेटच्या मागे लावली आणि म्हणुनच मला त्या इतिहासात डोकावणं शक्य झालं. मानेकजी करसेटजींचा आणि अलेक्झांड्रा शाळेचा इतिहास ह्या पाटीशिवाय अपुरा राहिला असता आणि म्हणून मला ही माहितीही तुम्हाला सांगाविशी वाटली.

इतिहासाचं शोधकाम असो की पुरातत्वाचं खोदकाम असो, कोणती गोष्ट अनपेक्षितरित्या समोर आणून आनंद ठेवतील, ते सांगता यायचं नाही..!! असो.

-नितीन साळुंखे 
9321811091
16.01.2019

भायखळ्याचा ‘खडा पारशी’..- ( भाग दुसरा)

खडा पारशी..

भाग दुसरा व शेवटचा –

‘खडा पारशी’ करसेटजींचे चिरंजीव मानेकजी करसेटजी यांच्या ‘व्हिला भायखळा’ या घरात १ सप्टेंबर १८६३ रोजी सुरु झालेली ‘अलेक्झांड्रा हायस्कुल’ ही मुंबईतील मुलींना इंग्रजी शिक्षण देणारी पहिली शाळा. ह्या शाळेच्या १९६४ सलत झालेल्या पहिल्या बक्षिस वितरण सोहळ्याला त्याकाळचे गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर (मुंबईला देखणं स्वरूप देण्यात या व्यक्तीचा मोठा सहभाग आहे) सपत्नीक उपस्थित होते. पुढे सन १८६५ मधे ही शाळा फोर्ट विभागातील हाॅर्नबी रो’वरच्या (आताचा डि. एन. रोड) एका इमारतीत तात्पुरती हलवण्यात आली, ती तिथे सन १८८१ पर्यंत होती. दरम्यानच्या काळात शाळेसाठी त्यावेळच्या वूडबी (Major Sidney James Waudby ) मार्गावरील (फोर्टच्या बाॅम्बे जिमखान्याला लागून असलेला आताचा हजारीमल सोमानी मार्ग) स्वत:ची जागा मुक्रर करण्यात आली. या ठिकाणी शाळेच्या इमारतीची पायाभरणी दिनांक २३ एप्रिल १८७८ रोजी त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल (रिचर्ड टेम्पलचा पुतळा भायखळ्याच्या राणी बागेतील भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या ईस्ट लाॅनवर पाहायला मिळतो) यांच्या हस्ते झाली होती, पुढच्या तीनच वर्षात या जागेवर शाळेची ‘अल्बर्ट हॉल’ ही गॉथिक पद्धतीने बांधलेली स्वत:ची देखणी इमारत उभी राहीली आणि सन १८८१ मधे हाॅर्नबी रोडवरील तात्पुरत्या जागेवरून अलेक्झांड्रा शाळा कायमची या ठिकाणी आली. शाळेची ही नवी इमारत बांधली होती त्या काळातले प्रसिद्ध इंजिनिअर खान बहादूर मंचेरजी कावसजी मर्झबान यांनी. त्या काळातली ही देखणी आणि भव्य इमारत त्याकाळच्या फोर्ट विभागाची ओळख बनली होती.

मानेकजींची ‘द अलेक्झांड्रा नेटीव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन’ ही शाळा आजही हजरीमल सोमाणी मार्गावरच्या त्याच ठिकाणी कार्यरत आहे. फक्त स्वातंत्र्योत्तर काळात शाळेच्या नांवातून ‘नेटीव्ह’ हा शब्द गाळण्यात आला आणि आता ही शाळा ‘द अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन’ किंवा केवळ ‘अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूल’ या नांवाने ओळखली जाते.

२०१८ सालातील सप्टेंबर महिन्यात या शाळेला १५६ वर्ष पूर्ण झाली. अल्बर्ट हॉल ही शाळेची इमारत जीर्ण झाल्याने पाडून टाकण्यात आली आणि त्या जागी नवीन इमारत बांधण्यात आली. आताची शाळा नव्याने बांधलेल्या इमारतीत आहे. शाळेची आधुनिक इमारत बांधताना, शाळेच्या अल्बर्ट हॉल या ब्रिटिश काळातील जुन्या इमारतीच्या कमानीचा काही अंश आणि त्यासोबत सर रिचर्डच्या हस्ते १८७८ साली बसवलेली ‘अल्बर्ट हाॅल’ इमारतीची कोनशिला आजही शाळेने जपून ठेवली आहे. काळासोबत चालताना शाळेने तिचं तिच्या इतिहासाशी असलेलं नातं तोडलेलं नाही.

या शाळेला शेजार लाभला आहे भारताच्या औद्योगिक भविष्याचा पाया रचणाऱ्या जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांच्या ‘२९, एस्प्लनेड हाऊस’ या पवित्र वास्तुचा..! मुंबईतील मुलींच्या ‘पहिल्या’ शाळेला, देशातील अनेक महत्वाच्या क्षेत्रांत ‘पहिले’पणाचा मान असलेल्या टाटांचा शेजार मिळणं, हा शुभ संकेतच असावा..

आता पुन्हा करसेटजींच्या पुतळ्याकडे येऊ. मुलींच्या शिक्षणात कमालीचा रस असलेल्या मानेकजींना ज्या आपल्या वडिलांचा पुतळा उभारावासा वाटला, ते करसेटजी मानेकजी श्राॅफ मंबईतील धनाढ्य पारशी व्यापारी होते. मुंबईला नावारूपाला आणण्याच्या प्रयत्नात त्यांचा सहभाग होता. पारशी पंचायतीचे ते सन्माननीय सदस्य होते. त्यांची स्वतःची जहाज होती, बँकर होते(श्रॉफ हे आडनाव त्यामुळेच त्यांना मिळालं होत, जे पुढे मानेकजींनी वगळलं व त्यांच्यापासून पुढे करसेटजी हे आडनांव म्हणून स्थिर झालं), ज्यांना व्यापार करायचा असे, अशाना त्यांनी नेहेमी मदत केली होती. त्यांच्याबद्दल समाजात एवढा आदर होता, की अगदी घरगुती भांडण सोडवायलाही लोक करसेटजींना मध्यस्थी करण्याची विनंती करायचे आणि त्यांनी दिलेला निर्णय मान्य करायचे.

सन १८३५ मध्ये करसेटजींना धंद्यात खोट आली आणि त्यांच्या नशिबाचे फाटे पलटले. त्यात करसेटजींचं इंग्रज सरकारशी काहीतरी भांडण सुरु होतं व ते भांडण कोर्टात असल्याने त्याचा लवकर निकाल लागत नव्बता. याचा परिणाम पैशांचं आणि व्यापाराचं नुकसान होण्यात होतं होता. या भांडणाचा उल्लेख ‘दुर्दैव’ असा मानेकजींनी लॉर्ड एल्फिन्सटन याना दि. ३० नोव्हेबर १८४३ रोजी लिहिलेल्या पत्रात केला आहे. मानेकजी पत्रात लिहितात, “…The Thing, however, discourages me the most and poiganantly is that I am deprived of means pecuniary(by the reverse of my fathers fortune) to enable me to keep pace with my inclination to make myself useful not only to my family, but also to my countrymen in general, by introducing reforms in the former as might without much difficulty be imitated by the latter. The destruction of my father’s fortune, by his unfortunately procrastinated proceedings at law with the Government, destroys all my hopes of that independency which i once pictured to myself. This misfortune led to my asking and obtaining an office under the government, which I now hold, and which, though in point of honour and responsibility is great, and, by the way, the first of kind conferred on a native of India, yet ill paid, I must confess, in corresponding ratio. My recent trip to England, though it certainly improved my mind and body, yet impaired my finances in no small no small measures.”

मानेकजींनी याना एल्फिन्सटन लिहिलेल्या पत्रातील ह्या उताऱ्यावरून, मानेकजींचं कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्याचं लक्षात येतं आणि म्हणून त्यांना इंग्रजांकडे नोकरी कारण भाग पडल्याचं लक्षात येत. ह्याचा आणखी पुरावा दिनांक १० मार्च १९६६ रोजी मानेकजींच्या नातवंडांनी महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री. सुखटणकर याना लिहिलेल्या पत्रात मिळतो. हे पत्र त्यांनी ‘खडा पार्शी पुतळ्याच्या स्थानांतराबद्दल लिहिलं होत. ह्या पत्रात करसेटजीचं निधन ७ मे १८४५ रोजी झाल्याचा उल्लेख करून, निधन समयी करसेटजीनी त्यांच्या वारसांसाठी साठी फक्त ३० हजार रुपयांचा वारसा ठेवला होता, असा स्पष्ट उल्लेख आहे. लॉर्ड एल्फिन्सटनला लिहिलेल्या पात्रात मानेकजींनी त्यांच्या कुटुंबावर दुर्दैव कसल्याच उल्लेख केला आहे, त्याला त्यांच्या नातवंडांच्या पत्रात दुजोरा मिळतो. ह्यावरून एक अंदाज असा बांधता येतो की, व्यापारात सुरु झालेल्या दुर्दैवामुळे करसेटजींचे निधन झालं असावं आणि ती रुखरुख त्यांचे पुत्र मानेकजींच्या मनात राहिली असावी आणि वडिलांनी दिलेल्या चांगल्या शिक्षणआणि संस्कारांमुळेच आपल्याला चांगले दिवस येऊ शकले या विश्वासानेच त्यांनी आपल्या वडिलांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असावा. अर्थात हा माझा अंदाज आहे, सत्य नव्हे हे कृपया लक्षात घ्यावं.

‘खडा पारसीं या नांवाने भायखळ्याच्या दोन उड्डाण पुलंच्या बेचक्यात उभा असलेलय कारशेटजींच्या पुतळ्याचं हे मूळ स्थान नव्हे. मुळातला पुतळा इथून जवळच असलेल्या ‘नागपाडा जंक्शन येथे सन १८६८ मध्ये उभारण्यात आला होता.

सन १८६२ मध्ये मानेकजी इंग्लंड येथे गेले असताना त्यांनी एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनास भेट दिली होती व तेथे ‘मेसर्स कोलब्रुकडेल’ या कंपनीने चिली या दक्षिण अमेरिकेतल्या देशासाठी तयार केलेलं एक कारंजं त्यांच्या नजरेला पडलं आणि त्यांना ते जसंच्या तसं आपल्या वडिलांच्या पुतळ्यासाठी असावं असं वाटलं. त्या कारंज्याच्या मधोमध असलेल्या उंच खांबावर असलेल्या ‘गोडेस ऑफ स्प्रिंग -वसंत ऋतूची देवता’ च्या ऐवजी वडिलांचा पुतळा उभा करण्यास सांगून, त्या कंपनीला तसंच एक पुतळ्यासहितचं कारं जं त्यांच्यासाठी बनवण्याची ऑर्डर दिली. पुतळा तयार व्हायला ५ वर्ष गेली आणि सन १८६७-६८मध्ये कारंज्यासह पुतळा मुंबई बंदरात आला. हा पुतळा मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात देऊन तो उभारण्यासाठी नागपाडा जंक्शन येथील जागाही देण्यात आली. ज्या जागेवर हे कारंजं आणि त्यावरील करसेटजींचापुतळा उभारला होता, त्या जागी एक तलाव होता आणि त्या तलावासह ती जागा करसेटजींच्या मालकीची होती. पुतळा कारंज्यासह असल्यामुळे पाणी असं आवश्यक होत आणि म्हणून ती तलावाची जागा नक्की करण्यात आली होती. तलाव बुजवून त्याजागी कारंज्यासह पुतळा उभारण्यात आला. साल होत १९६८.

नागपाडा जंक्शन म्हणजे बेलासिस रोड (मुंबई सेंट्रल स्टेशनहून भायखळ्याच्या दिशेने येणार आताचा जहांगीर बोमन बेहराम मार्ग), दोन टाकीतून येणार डंकन रोड आणि इस्ट बेलासिस रोड (सात रस्त्यातून येणार आताचा मौलाना आझाद मार्ग) हे चार रस्ते नागपाड्यात ज्या ठिकाणी एकत्र येतात, ते जंक्शन. पुढे १९२८ साली ह्या ठिकणी असलेल्या पुतळ्याच्या चहुबाजूने जाणाऱ्या ट्रामच्या ओव्हरहेड व्हायरसमुळे पुतळा खराब होतो हे महानगरपालिकेच्या लक्षात आलं आणि मग हा पुतळा आता ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी उभारण्याचं ठरवलं. पुतळ्याचं आताच्या ठिकाणी स्थानांतरण करण्यापूर्वी महानगर पालिकेच्या आयुक्तानी ‘खडा पारशीचे नातू आणि लघुवाद न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सी. एम. करसेटजी यांची अनुमती घेतली होती. महानगर पालिका आणि ‘खडा पारशी’चे वारसदार यांच्या सर्वसंमतीने नागपाडा जंक्शन येथे असलेला हा पुतळा, सन १९२९ साली आताच्या जागी उभारण्यात आला. तो अजूनही तिथेच आहे. मध्यंतरी हा पुतळा त्याच्या मूळच्या जागी, म्हणजे नागपाडा जंक्शन येथे पुनःप्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या, परंतु ह्या स्थलांतराला करसेटजींच्या वंशजांनी हरकत घेतल्याचं त्यांनी महानगर पालिकेच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून समजतं.

कारंजं आणि पुतळा ह्याच मूळचं स्वरूप आतापेक्षा खूप वेगळं होतं. त्याची वर्णनं इंटरनेटवर विपुलतेने वाचायला मिळतात आणि म्हणून त्याची पुररूक्ती इथे करत नाही.

भायखळ्याच्या दोन उड्डाण पुलांच्या बेचक्यात उभा असलेला आणि जाता-येता सहज नजरेला पडणाऱ्या ‘खडा पारशी’ आणि त्यांच्या वंशजांनी मुंबईला आजचं स्वरूप देण्यात फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. एकूणच पारशी समाजाचं मुंबईवर फार मोठं ऋण आहे. करसेटजिच्या ‘खडा पारशी पुतळ्याकडे लक्ष जाताच हा सर्व इतिहास आपण क्षणभरासाठी आठवावा आणि आपण सर्वानी त्या सर्व महानुभावांचे उपकार स्मरावे, यासाठी हा लेखन प्रपंच. इतिहासात होऊन गेलेल्या अश्यासारख्याच अनेकांनी मुंबईला मुंबईपण मिळवून दिलं आहे. जात-पंत-धर्म आणि ज्या देशाने आपल्याला आपलं म्हटलं, त्या देशाच्या सर्वसामान्य जनतेसाठी चांगलं करता येईल, ते या लोकांनी मनापासून केलं आणि त्याच स्मरण आपल्याला नित्य असावं ह्या हेतूने मी हे लेखन केलं आहे.

-@नितीन साळुंखे . 
९३२१८११०९१

महत्वाच्या टीप –

१. अलेक्झांडर शाळेत मुख्य ब्रिटिश शिक्षिकेला मदत करणाऱ्या मानेकजींच्या मुलींची नांव शिरीन आणि अमी अशी होती.

२. मानेकजींचा ‘व्हिला भायखळा’ हा बंगला सध्याच्या भायखळा पोलीस स्टेशनच्या गल्लीत कुठेतरी होता. बहुतेक सध्याच्या ‘रेजिना पेचीस’ कॉव्हेन्ट शाळेच्या जागी किंवा त्याच्याच आजूबाजूला कुठेतरी तो असावा, त्याकाळचे बहुतेक सर्व मोठे व्यापारी आणि अधिकारी याच लव्ह लेनमध्ये राहत असत. नक्की जागा कुठे होती त्याचा शोध घेत आहे.

३. मानेकजींचे वडील, ज्यांचा पुतळा ‘खडा पारशी’ म्हणून ओळखला जातो, त्यांचं गिरगाव घर चौपाटी नजीक कुठेतरी होतं. त्याचंही नक्की ठिकाण समजलेला नाही. शोध जारी आहे.

४. सध्याची अलेक्झांड्रा शाळा ज्या ठिकाणी आहे, तो हजारीमल सोमानी मार्ग म्हणजे पूर्वीचा ‘वुडबी रोड’. त्या वुडबी रोडच्या नामकरणाची आणि त्याच्या हरवलेल्या आणि मला सापडलेल्या संगमरवरी शिळेची माहिती मी स्वतंत्र रित्या देणार आहे.

संदर्भ –

1. विकिपीडिया

2. Glimpses of Old Bombay & Western India with Other Papers – James Douglas

3. ‘A few passing ideas for the benefit of India and Indians-Series IV’ हा मानेकजींनी विविध इंग्रज अधिकाऱ्यांशी केलेला पत्रव्यवहार

4. Cultural Intermediaries in a colonial City- The Parsis of Bombay- ह्या श्रीमती सीमिन पटेल यांच्या प्रबंधातील अंश.

5. एसीएम कारसेटजी, बेहरोज करसेटजी आणि अमी रुस्तमजी यांनी १० मार्च १९६६ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त श्री. सुखटणकर याना लिहिलेले पत्र.

6. अलेक्झांड्रा शाळेच्या प्रिन्सिपॉल, कर्मचारी वर्ग.आणि त्यांची वेबसाईट

7. फोटो सौजन्य – अलेक्झांड्रा शाळा आणि इंटरनेट. खडा पारशी फोटो -द हिंदू या वर्तमानपत्रातील विवेक बेंद्रे यांनी काढलेला फोटो.

8. मदत सौजन्य – श्री सुधीर मोरे व त्यांची मोटर सायकल.

भायखळ्याचा ‘खडा पारशी’.. – (भाग पहिला )

मुंबईतील ऐतिहासिक पाऊल खुणांचा मागोवा.. – लेखांक ३१
खडा पारशी..
भाग पहिला
 
मुंबईतून आपण डॉ. आंबेडकर मार्गाने दादरच्या दिशेने यायला निघालो की, आपल्या डाव्या हाताला मुंबई महानगर पालिका मुख्यालयाच्या इमारत, टाईम्स ऑफ इंडियाची इमारत, पुढे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, अंजुमन इस्लाम शाळा लागते. इथूनच पुढे जे. जे. उड्डाणपूल लागतो. हा उड्डाणपूल जे. जे. रुग्णालयाकडे खाली उतरतो लगेचच काही अंतरावर आपण इस्माईल मर्चंट चौकात पोहोचतो. या चौकातून आणखी एक फ्लाय ओव्हर सुरु होतो, जो पुढे काही अंतरावर जाऊन दोन विरुद्ध दिशांना विभागतो. फ्लाय ओव्हरचा उजवीकडचा हिस्सा आंबेडकर मार्गाने दादरच्या दिशेने जातो, तर दुसरा रास्ता किंचित डावीकडे जात मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयाच्या पुढे उतरतो. हा फ्लाय ओव्हर मागे जिथे दोन दिशांना विभागते, बरोबर त्याच बेचक्यात एक पूर्ण पुरुष उंचीचा काळा पुतळा दिसतो. पुतळा उभा आहे म्हणून तोखडाआणि पारश्याचा आहे म्हणूनपारशी‘. हाच तो आपलाखडा पारशी’..!!
हे एवढं वर्णन करण्याचं कारण म्हणजे, मुंबईत नव्याने येणारे अनेक जण मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी असलेल्या फिरोजशहा मेहता यांच्या उभ्या पुतळ्यालाहीखडा पारश्याचा पुतळा समजतात म्हणून. भायखळा उड्डाण पुलाच्या बेचक्यातील पुतळा आणि फिरोजशहा मेहतांच्या या पुतळ्यात बरंच साम्य असल्याने हा गैरसमज होतो. दोन्ही पुतळे काळे, दोन्ही उभे आणि दोघंही पारशी..! फिरोजशहा मेहतांच्या पुतळ्याच्या संदर्भातखडा या शब्दावरून एक चावट कोटीही केली जाते, पण ती इथे सांगणं अप्रस्तुत होईल. ‘फिरोजशहा मेहतांच्या पुतळ्याला खडा पारशी म्हणतातअसा चुकीचा उल्लेख मी मुंबईवरच्या एका इंग्रजी कादंबरीत (बहुतेक सुकेतु मेहतांची कादंबरी असावी, नक्की आठवत नाही) वाचला होता. मलाही तसंच वाटायचं. इतर कुणाचा माझ्यासारखा गैरसमज होऊ नये म्हणून पहिल्या परिच्छेदात वर्णन दिलेलं आहे.
हातात चंदनाच्या लाकडाचे दोन तुकडे आणि डाव्या हातात छातीशी झेंद अवेस्ताचा ग्रंथ धरलेला हाखडा पारशीपुतळा आहे ब्रिटिश आमदनीतील धनाढ्य पारशी व्यापारी करसेटजी मानेकजी श्राॅफ यांचा. हा पुतळा करसेटजींचे चिरंजीव मानेकजी करसेटजी यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ उभारलेला आहे. पुतळा ज्यांचा आहे, त्यापेक्षा पुतळा ज्यांनी उभारलंय त्यांचं कार्य, विशेषतः मुंबईतल्या मुलींच्या शिक्षणतलं, मोठं आहे.
 मुंबईतल्या त्या वेळच्या इतर बहुतेक सर्व पारश्यांप्रमाणेच व्यापारी घराण्यात जन्म घेतलेल्या मानेकजी कर्सेटजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. इंग्रजी भाषेवरचं हेच प्रभुत्व मानेकजींना इंग्रज राज्यकर्त्यांच्या अधिक जवळ घेऊन गेलं. किंबहूना मानेकजींना इंग्लिश राज्यकर्त्यांबद्दल जरा जास्तच महत्व होतं असं म्हटलं तरी चालेल. याच कारणाने बहुतेक त्यांचं, मुंबंईतील पारशी समाजाची शीर्षस्थ संस्था असलेल्यापारशी पंचायतीशीवितुष्टही आलं होतं. इंग्रजी राज्यर्त्यांसोबतची त्यांच्या जवळीकीने त्यांना मुबईत सरकारातली मानाची अधिकारांची पदही मिववून दिली. मानेकजींना त्यावेळच्या ज्युरीमधेही स्थान मिळाले होते. मानेकजी त्यावेळच्याबोंबे ब्रांच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी (आताची एशियाटीक सोसायटी आॅफ मुंबईचे निवडून आलेले पहिले भारतीय सदस्य होते. हे सदस्यत्व त्यांना २९ जानेवारी १८४० राजी मिळाले. पुढे ते रॉयल जिओग्राफिक सोसायटीचेही फेलो झाले.(पान २१ /४२ ग्लिम्प्सेस ऑफ बोंबे अँड वेस्टर्न इंडियाजेम्स डग्लस१९००)
 माणेकजींना मुंबईतल्या स्त्रीयांच्या शिक्षणाविषयी कळकळ होती. त्यासाठी त्यांनी दोन तीन वर्ष त्याकाळातल्या इंग्रज अधिकाऱ्यांशी आणि मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार त्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीही घेतल्या होत्या. मानेकजी आणि इंग्रज कराज्यकर्ते यांच्यातला हा सर्व पत्रव्यवहार ‘A few passing ideas for the benefit of India and Indians’ या त्यांनी सन १८६२ साली लिहिलेल्या पुस्तकात प्रसिद्ध केला आहे. या पुस्तकाची एकूण चार भागांची मालिका असल्याचं त्यांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे. मी फक्त चौथा भाग, जो मुलींच्या शिक्षणासंबंधी आहे, वाचला आहे.
 या सर्व लोकांकडे त्यांनी मुंबईतल्या धर्मजात, अंधश्रद्धा इत्यादी समस्यांतून मार्ग काढण्याठी पत्रांतून चर्चा केलेली लक्षात येते यातून मार्ग काढण्यासाठी मुली शिकल्या पाहिजेत असं म्हणून, मुलींसाठी शाळा सुरु करण्याचा त्यांचा मनोदय पत्रांतून बोलून दाखवला होता या कामात त्यांनी स्वत:ला मदत करावी अशी विनंती केल्याचं दिसतं. या अधिकाऱ्यांना त्यांनी ते सुरु करणार असलेल्या मुलींच्या शाळेसाठी एखादी चांगली शिक्षिका लंडनहून पाठवून देण्याची वारंवार विनंती केली त्यांच्या पत्रांतून दिसून येते.
 या पुस्तकातल्या पान क्रमांक ७८ वर त्यांनी इंग्लंडमधल्या त्यांच्या कुणा मित्राला लिहिलेल्या दिनांक १८ मार्च १८६० रोजीच्या पत्रात, ते सुरु करणार असलेल्या मुंलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करण्यास तयार असणाऱ्या मिसेस स्मिथ भेटून गेल्याचं कळवलं आहे. मिसेस स्मिथच्या कामाची वेळ त्यांना महिना रु. २०० पगार ठरवल्याचंही म्हटलं आहे. शाळेसाठीयंग लेडीज इन्स्टिट्यूटअसं तात्पुरतं नांव ठरवल्याचं आणि शाळा स्वत:च्याव्हिला भायखळा (Villa Byculla)’ या राहात्या घरात सुरु करायचं ठरवलं असल्यांचं म्हटलं आहे. या शाळेमधील प्रवेशासाठी मुलींचं वय ११ स्त्रियांसाठीचं वय १२ ते १९ असावं असंही निश्चित केल्याचं कळवलं आहे. या शिवाय मुलींच्या शाळेसाठी विषय कोणकेणते असावेत, शाळेचा खर्च कसा सांभाळावा इत्यादी नियम तयार कळवून त्यांनी इंग्लंडला कळवलं होतं. गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिनस्टन यांनी मानेकजींच्या या प्रयत्नांबद्दल गौरवोद्गार काढल्याचाही उल्लेख या पत्रसंग्रहात आहे. हा सर्व पत्रसंग्रह वाचण्यासारखा आहे जिज्ञासुंना तो अवश्य वाचावा.
 अखेर मानेकजी करसेटजी यांनी दिनांक सेप्टेंबर १८६३ रोजी स्त्रियांसाठी मुंबईतली सर्वात पहिली आणि ती ही इंग्रजी माध्यमाची शाळा अलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशनया नांवाने आपल्या राहत्या घरी, ‘व्हिला बायकुला (Villa Byculla)’ येथे सुरु केली. सुरुवातील या शाळेत १३ विद्यार्थिनी होत्या. या मुलींना शिकवण्यासाठी ब्रिटिश शिक्षिका (बहुतेक मिसेस स्मिथ, नक्की नांव सांगता येत नाही) पगारावर नेमण्यात आली होती आणि त्या शिक्षिकेच्या मदतनीस म्हणून मानेकजींच्या इंग्लंडहबन शिकून आलेल्या मुली काम करत होत्या.
(क्रमश🙂
 पुढील कथा आगामी भाग मध्ये
-@नितीन साळुंखे
9321811091
व्हिला भायखळाफोटो सौजन्यअलेक्झांड्रा शाळा,
टीपसंदर्भ पुस्तकांची यादी दुसऱ्या भागाच्या शेवटी दिली जाईल.

पशु-गॅवार, ढोर अरु नारी, ये सब ताडन के अधिकारी’

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

पशु-गॅवार, ढोर अरु नारी,

ये सब ताडन के अधिकारी’

केरळातल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश असावा की नसावा यावरुन देशात युद्धसदृष परिस्थिती आहे. स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही, ही काही कालच घडलेली घटना नाही. गेली ८०० वर्ष ही प्रथा सुरू आहे. अधे मध्ये ह्या प्रथेला किरकोळ विरोध व्हायचा, पण पूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटलेले माझ्या स्मरणात नाहीत. मग आताच अशी बेबंद परिस्थिती निर्माण होणं हा निवडणुकांच्या मोसमात काही किंवा सर्वच राजकारणी पक्षांच्या स्वार्थाचा भाग आहे, हे ओळखणं अवघड नाही. हे लक्षात येतं. राजकारणाच्या बाहेर आधुनिक युगात जुनाट आणि कालबाह्य परंपरा उराशी कवटाळून बसणं योग्य नाही हे वैयक्तिकरित्या बहुतेकांना मान्य असतं, पण अशा व्यक्तिश: मान्य असणारांचा कळप झाला आणि ह्या कल्पक उद्दिष्ट राजकीय असाल, की मग हे ‘मानते’ आधुनिक युगातून थेट आदीम युगात पोहोचतात आणि आपल्या जुन्या परंपरांचा त्यांना ज्वलंत वैगेरे अभिमान वाटू लागतो आणि समाजाच्या अर्ध्या अंगाला त्याज्य ठरवणाऱ्या ह्या कालबाह्य परंपरा कवटाळून बसण्याचा आग्रह होतो आणि हिंसाही होते.

जुन्या परंपरांचा असा अभिमान वाटणं एकवेळ ठिक आहे, मलाही वाटतो. पण त्या प्रथा-परंपरा जन्माला आला तो काळ, त्या काळची परिस्थिती आणि त्या परिस्थितीचा त्या काळातील आपल्या पूर्वजांनी, त्या काळच्या त्यांच्या बुद्धीने लावलेला अर्थ जर त्या काळाच्या संदर्भात समजून घेतला तर, आपल्याला त्या प्रथा-परंपरांबद्दल आजच्या काळात वाटत असलेला अभिमान किती व्यर्थ आहे ते समजून येतं. परंतु जुन्या प्रथा-परंपरा केवळ राजकीय स्वार्थापायी उराशी कवटाळून बसलेल्या काही कळपांना अशी बुद्धी होणार नाही आणि ते कळप इतरांना तशी बुद्धी होऊ देणार नाहीत. राजकीय पक्षांना आपले कर्तेधर्ते मानणाऱ्या अनुयायांना तर, त्यांना पटत असलं तरी, त्यांच्या नेत्यांचं अंधानुकरण करण्यावाचून पर्याय नसतो. कारण अनुयायांनी त्यांच्या कुठल्या न कुठल्या स्वार्थापायीच त्या कळपात प्रवेश केलेला असतो आणि तो स्वार्थ त्यांना परमार्थ नक्की कशात आहे हे समजूनही उमजू देत नाही. कळप म्हटला की बुद्धीचा संबंध असाही तुटतोच.

शबरीमला असो, शनी शिंगणापूर असो की मग इतरही काही धार्मिक ठिकाणं असोत, जिथे स्त्रीचा प्रवेश किंवा तिचा संचार ज्या काळात मर्यादीत केला गेला, त्या मागच्या काळाचा आढावा घेतला तर, प्राचीन काळातला आपला समाज स्त्री कडे काय दृष्टीने पाहात होता, ते समजतं. ‘पशु-गॅवार, ढोर(ढोल) अरु(और) नारी, ये सब ताडन के अधिकारी’ हे तुलसीदासांचं सुप्रसिद्ध वचन आपण सर्वांनी कधी न कधी ऐकलं असेलच. ह्या वचनाचे दोन अर्थ काढता येतात. वचनाचे म्हणण्यापेक्षा ह्या वचनातील ‘ताडन’ ह्या शब्दाचे. ‘ताडन’ ह्या शब्दाकडे पाहिलं असता, त्याचा एक अर्थ ‘पीडा’ असा होतो. त्याकाळातील समाज देव-धर्माच्या प्रचंड पगड्याखाली होता, त्या काळात स्त्री ही धर्माच्या, मोक्षाच्या काळातली धोंड मानली जात असे. क्षुद्र आणि नारी याना धार्मिक कार्यात वा कर्मकांडात भाग घेण्याचा अधिकार नाही असं समजलं जात होत. आजही रजस्वला स्त्रीला धार्मिक कार्यात भाग घेता येत नाही हे वास्तव आहे. मग त्याकाळात काय होत असेल याची कल्पना करा. नाही धार्मिक कार्याच्या आड येऊ पाहणाऱ्यांना पीडा देणं हे त्या काळात समाजसंमत होतं.

‘ताडन’ ह्या शब्दाचा दुसरा अर्थ ‘जाणणे’ किंवा ‘परीक्षा पहाणे’ किंवा ‘ओळखणे’ असा होतो. आजही आपण ‘ताडने’ ह्या शब्दाचा मराठीतला अर्थ ‘ओळखणे’ असा घेतो. आता पशु, नोकर (शूद्र),आणि ढोल ह्यांची ‘परीक्षा’ आजही आपण प्रेमाने काही घेत नाही, तिथे त्याकाळात काय परिस्थिती असेल याची सहज कल्पना आपल्याला येते. पशु, नोकर आणि ढोल हे बडवल्याशिवाय समजत नाहीत किंवा बडवल्याशिवाय त्यांना कळत नाही, हीच धारणा त्याकाळात असली तर नवल नाही. ह्या सर्वांची तुलना ‘नारींशी केली गेली आहे आता त्या काळातली स्त्री जर पशू आणि क्षुद्रासमान समजली जात असेल, तर मग पशुं आणि क्षुद्र जातीच्या वाट्याला येणारी सर्व कर्म आणि दु:ख तिच्याही वाट्याला आलीच असणार. म्हणून तर तिला स्वतंत्रपणे धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घेता येत नव्हता..! पशुंना आणि क्षुद्रांना मंदिरात प्रवेश नाही, पासून असलाच तर तो फक्त बलिवेदीपर्यंत जाण्यासाठी. पशुंना-क्षुद्रांना-नोकरांना शिक्षणाचा अधिकार नाही. त्यांना फक्त ‘माणसा’च्या आज्ञा पाळण्याइतपतच अक्कल असावी. पशूंनी-नोकरांनी मालकांचं आज्ञापालन केलं नाही तर त्यांचं मालकाचा मार खाणं हेच त्याचं कर्तव्य होतं. हीच समजूत त्याकाळात नारीच्या बाबतीतही होती असा तुलसीदासांच्या वचनाचा अर्थ होतो. अशा समजुती असलेल्या काळाच्या पुढे-मागे उगम पावलेल्या ह्या सर्व प्रथा-परंपरा आहेत. शबरीमला मंदिर किंवा अशा काही ठिकणी स्त्रीयांना जी प्रवेशबंदी आहे, त्या मागे जुन्या प्रथांवर त्या काळात असलेल्या स्त्री विषयक या क्षुद्र भावनांचा अद्यापही प्रभाव आहे आणि तो किती चुकीचा आहे, हे थोडा विचार करता लक्षात येईल..!

आज नारीची तुलना (जाहिररित्या) पशुसोबत केली जात नाही. त्याकळच्या समाजाची असलेली जाहीर भुमिका आज निश्चितच बदललेली आहे (खाजगीतलं वास्तवं बरंचसं वेगळं आहे). समाजाच्या या बदललेल्या जाहीर धारणेमागे आपल्या समाजात होऊन गेलेल्या समाजसुधारकांचे उर्वरीत सनातन सामाजाचा रोष पत्करुन केले गेलेले प्रयत्न आणि त्या त्या वेळच्या राजसत्तेकडून वेळोवेळी केले गेलेले आणि तेवढ्याच कठोरपणे राबवले गेलेले कायदेही तेवढेच कारणीभूत आहेत. शिक्षणाचाही थोडाफार परिणाम झाला आहे. सुधारकांच्या आणि कायद्याच्या दट्ट्याने स्त्रीला पशूपासून माणूस म्हणून मान्यता देण्याचं धाडस समाजपुरूष दाखवू शकतो, असं असलं तरी, आजच्या आधुनिक काळात, कायद्याने स्त्रीला समानता दिली असली तरी, समाजात नारीचं स्थान आजही दुय्यम आहे. अनेक महत्वाच्या व्यवहाराचे निर्णय आजही बहुतकरुन पुरुषच घेत असतो. ‘बायकांना अक्कल नसते’ ह्यावर बहुतेक पुरषोत्तमांचा विश्वास असतो आणि ते ते प्रसंगानुरूप बोलूनही दाखवत असतात. कुत्रा-घोडा-हत्ती आदींना शिकवणारा ट्रेनर आजही हातात हंटर घेऊन उभा असतो आणि ‘माझं ऐकलं नाहीस तर बघ’ हे बहुतेक ‘विवाहित मालकांचं’ त्यांच्या ‘नोकराला’ ‘बजावणं’ असतं.

स्त्रीला आज समाजात कायद्याने समानता लाभली असली तरी आपल्या समाजाच्या खाजगी आणि सार्वजनिक मनातून ‘पिता रक्षति कौमार्ये, भर्ता रक्षति यौवने, पुत्रश्च स्थाविरे भावे, न स्त्री स्वातंत्र्य मर्हती !’ या मनुच्या वचनाचा प्रभाव संपूर्णपणे गेलेला नाही, असं म्हणायला वाव आहे. मनुने जेंव्हा कधी हे लिहिलं, तेंव्हा ते त्या काळाशी सुसंगत असेलही. पण आताच्या काळात हे संपूर्ण गैरलागू आहे.

आज स्त्री देशा-परदेशात सोडाच, अंतराळातही स्वतंत्रपणे एकटी जातेय. देश चालवतेय, तिचे निर्णय ती घेतेय, पण तिला, ती केवळ स्त्री असल्याने, काही मंदिरांत मात्र जाता येत नाही, आश्चर्य म्हणजे पुरुषांइतकं स्त्रीयांच्या मनावरुनही या मनूच्या वचनाचा पगडा अद्याप साफ पुसला गेलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायधिशांच्या खंडपिठातील न्यायमुर्ती श्रीमती इंदू मल्होत्रांनी यांनीच महिलांवरील प्रवेशबंदी उठवण्याच्या विरोधात मत नोंदवले. न्यायालयाने धार्मिक परंपरांच्या प्रश्नात लक्ष घालू नये, असे न्या. मल्होत्रा यांचे म्हणणे लक्षात घेता तसाच अर्थ काढावा लागते. स्त्रियांचीच स्त्रियांविषयी हि भावना असेल, तर पुरुषांच्या मनात काय असेल याचा विचार करा.

मुंबईच्या हाजी अलीच्या मजारीत स्त्रियांना प्रवेशनिषेध, बुरखा आणि तीन तलाक या मुसलमानांतील ‘प्राचीन धार्मिक प्रथा’ बंद करण्यास मुसलमान पुरुषांचा ठाम विरोध होता किंवा आहे. याबाबतही नेमकी शबरीमालासारखीच भावना मुसलमान पुरुषांमध्ये होती किंवा आहे. त्यावेळी हिंदू पुरुष या प्रथेबाबत मुसलमान पुरुषांच्या विरुद्ध आणि मुसलमान स्त्रियांच्या बाजूने उभा होता. ज्या हिंदूंना मुसलमानांमध्ये असलेल्या बुरखा आणि तीन तलाक या प्रथा मुसलमान स्त्रीयांवर अन्याय करणाऱ्या वाटतात, त्याच हिंदूंना शबरीमाला मंदिरात किंवा शनीच्या चौथऱ्यावर असलेली स्त्रियांची प्रवेशबंदी मात्र ‘प्राचीन धार्मिक प्रथा’ या नावाखाली समर्थनीय वाटते, ही गम्मतच आहे. ‘स्त्रीविषयक’ भावनांबाबतचा हा दुटप्पीपणा नाही तर काय ? हिन्दू आणि मुसलमान या एकमेंकांमधून विस्तवही न जाणाऱ्या धर्मातील पुरुषांमध्ये, आपापल्या धर्माच्या स्त्रीकडे पाहण्याच्या त्याच जुनाट दृष्टीकोनाबाबत मात्र कमालिची एकजूट दिसते. एकंदर ‘बाईधर्मा’बाबत देशातील प्रमुख धर्मांच्या मनात अगदी तिच पुरातन ‘मालकीची’ भावना आहे आणि हे दुर्दैवच आहे.

धर्माचं राज्य आणू पाहणाऱ्यांच्या मनातलं हे वास्तव जोपर्यंत बदलत नाही, तो पर्यंत आपल्या समाजाचं उत्थान होणार नाही.. !

-@नितीन साळुंखे

9321811091

*फोटो सौजन्य इंटरनेट.

होय, मी हिन्दू आहे..!!

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

मी हिन्दू आहे.

हिन्दु संस्कृतीने स्वतंत्र विचार करण्याचा जन्मजात अधिकार मला दिलाय..

‘देव आहे किंवा देव नाही’ आणि असलाच तर त्याला कोणत्या रुपात पाहायचं हे माझं मीच ठरवू शकतो.

त्या असले-नसलेल्या देवाशी कसा व्यवहार करायचा ते ही मीच ठरवू शकतो.

मला कोणताही धर्मग्रंथ नाही.

मला कुणीही धर्मगुरू नाही.

माझा वेश कसावा यावर मला कोणतीही बंधन नाहीत.

माझे विचार कसे असावेत आणि आचार कसा असावा यावर मला कुणी बंधनं घातलेली नाहीत.

हिन्दुत्वाची चिकित्सा करण्याचा अधिकार मला जगातल्या या सर्वात प्राचीन संस्कृतीने दिला आहे.

धर्म-शास्त्राची प्रथम चिकित्सा करणाऱ्या चार्वाकालाही ऋषीमंडळात स्थान देणाऱ्या माझ्या संस्कृतीचं मला कवतुक वाटतं.

दुसऱ्याच्या व्यक्ती-विचार स्वातंत्र्यावर कोणतीही गदा न आणता, माझ्या मना-विचाराला पटेल तसं मी वागू शकतो.

जगातल्या कोणत्याही देशावर किंवा धर्मावर या देशाने आक्रमण केल्याचं उदाहरण इतिहासात नाही.

याउलट हजारो वर्षाच्या परकीय, परधर्मियांचं सततचं आक्रमण आणि परकी सत्तेचे पाशवी शारीरिक आणि धार्मिक अत्याचार पचवून हा देश, आजही हिन्दू म्हणून ढेकर देत ताठ उभा आहे, याचं मला प्रचंड कौतुक आहे आणि त्याचा सार्थ अभिमानही वाटतो..

पण मला वाटणाऱ्या हिन्दू संस्कृतीच्या या अभिमानाचं रुपांतर आज काळजीत होऊ घातलंय.

आज तिचा धर्म होऊ घातलाय.

संस्कृती सर्वसमावेशक असते, तिच्या असलेल्या-नसलेल्या सर्वांना ती आपल्यात सामावून घेत अधिक समृद्ध होत पुढे जात असते.

धर्म बंदीस्त असतो.

तिथे बदलाला वाव नसतो.

माझ्यातल्याच कुणाच्यातरी कळपाची गरज म्हणून माझ्या संस्कृतीचा धर्म होताना जेंव्हा मी पाहातो, तेंव्हा मला काळजी अन् भितीही वाटू लागते.

आपल्याच लोकांच्या तना-मनात भिनू लागलेल्या कट्टर धार्मिकपणाची मला चिंता वाटते.

हिन्दू कधीही असा नव्हता.

हिन्दू कधीही धर्म नव्हता

ह्या माझ्या वाटत नसलेल्या आजच्या हिन्दु धार्मिकतेची लागण जर सर्वांना झाली, तर काय उतमात होईल याची काळजी मला सतत सतावतेय.

उद्या आपल्या विचारांचा नाही, तो हिन्दू असला तरी, तो शत्रु मानला जाईल का?

मला भावलेल्या वा न भावलेल्या देवांवर वा प्रथांवर टिका करण्याचा किंवा त्यांना झुगारून देण्याचा माझा जन्मसिद्ध अधिकार माझ्यातलाच कुणीतरी, त्याला आवडत नाही म्हणून, माझ्यापासून हिरावून घेईल का?

एखादा विवक्षित देव मानायलाच हवा किंवा एखादी प्रथा मला कितीही चुकीची आणि समाजविघातक वाटत असली तरी, ती माझ्यातल्याच प्रबळ अशा कुणाला तरी ती बरोबर वाटतेय म्हणून, ती पाळण्याची माझ्यावर सक्ती केली जाईल का?

एखादा धर्मग्रंथ, ठराविक धर्मगुरू मानण्याची मला जबरदस्ती केली जाईल का?

माझ्यातलाच कुणीतरी दुसरा धर्मांध माझ्या विचारांना नियंत्रित करेल का?

एखादा ठराविक वेश आणि ठराविक केशभुषा मला करणं बंधनकारक होईल का?

निरविराळे फतवे निघतील का?

आणि हे सर्व मान्य केलं नाहीतर मला देहांत प्रायश्चित घ्याव लागेल का?

याहीपेक्षा भयानक विचार माझ्या मनात येतो, तो ‘जातीयतेचा’..!

हिन्दू संस्कृती थोर आहे यात मला शंका नाही, पण तिला जातीयचतेची काळी किनारही आहे.

हिन्दू कधीही एकटा नसतो,

त्याची जात त्याच्यासोबत अपरिहार्यपणे येतेच.

सावली सारखी.

आणि सावली नेहेमी काळीच असते.

तर मग कट्टर हिन्दू धर्मात काळ्याकुट्ट जातीयतेचं काय होणार?

कोणत्या जातीचं महत्वाचं स्थान असेल?

कोणती जात इतर जातीना नियंत्रित करेल? हे त्या जातीच्या संख्येवर ठरेल की जातीच्या हातात असणाऱ्या आर्थिक-राजकीय ताकदीवर?

ज्या जाती राज्य करण्यास लायक समजल्या जाणार नाहीत, त्या जाती मग पुढे हिन्दू धर्माचा भाग म्हणून राहातील का? की अन्य सोयीचा मार्ग स्वीकारतील?

हिन्दू धर्म म्हणून एकत्र येऊ पाहाणाऱ्या सर्व जातीय हिन्दूंना, उद्या खरोखरंच धर्माचं राज्य स्थापन आलं तर, जातीयतेचा सामना करावा लागणार नाही याची काय शाश्वती?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण मंजूर केल्यानंतर समाजमाध्यमांत उठलेल्या जातीय हुंकाराचा, उद्या खरोखरंच धर्माचे राज्य आलं तर, विनाशकारी चित्कार होणारच नाही याबद्दल हिन्दू धर्माचे आजचे पुरस्कर्ते ग्वाही देऊ शकतात का?

आज हिन्दू धर्माचा हिरीरिने पुरस्कार करणाऱ्या सर्व जातीयांना, उद्या धर्माचं राज्य आल्यावर, धर्मासाठी त्यांनी केलेल्या कर्तुत्वावरुन पाहिलं जाणार, की जातीवरुन पाहिलं जाणार?

या व अशा अनेक प्रशांचं मोहोळ माझ्या मनात उठतं आणि पुढल्या पिढीचं भवितव्य काय असेल, माझ्या देशाचं काय होईल या काळजीने मन ग्रासतं.

पण आपलाच इतिहास आठवून मन लगेच आश्वस्तही होतं.

या देशातल्या विविध जाती-पंथ-प्रांतामध्ये विभागलेल्या आणि आसेतूहिमाचल पसरलेल्या माझ्या देशबांधवांच्या एकत्रित शहाणपणावर माझा विश्वास आहे.

हजारो वर्षांचं परकीय आक्रमण पचवून आणि हिन्दू धर्म अस्तित्वात नसुनही हिन्दू म्हणूनच हा देश आजही उभा आहे तो या सामान्य लोकांच्या शहाणपणामुळे..

हे शहाणपण सामान्यजन न बोलता नेहेमीच दाखवत आले आहेत. आताही घरातल्याच धार्मिक आक्रमणापासून हेच सामान्य लोक देशाला वाचवण्याचं शहाणपण दाखवतील यात मला शंका नाही..

आगीशी पाण्यानं लढायचं असतं आणि तप्त आग्नींचं रुपांतर चिखलाच्या थंड गोळ्यात करायचं असतं, हे समजण्याचं शहाणपण ह्या सामान्यांत आहे.

सामान्यांच्या ह्या एकत्रित शहाणपणालाच मी ‘हिन्दूत्व’ समजतो.

त्या अर्थाने, ‘होय, मी हिन्दू आहे’..!

आणि त्यासाठी मला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही..

-@नितीन साळुंखे

9321811091