अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..
मी हिन्दू आहे.
हिन्दु संस्कृतीने स्वतंत्र विचार करण्याचा जन्मजात अधिकार मला दिलाय..
‘देव आहे किंवा देव नाही’ आणि असलाच तर त्याला कोणत्या रुपात पाहायचं हे माझं मीच ठरवू शकतो.
त्या असले-नसलेल्या देवाशी कसा व्यवहार करायचा ते ही मीच ठरवू शकतो.
मला कोणताही धर्मग्रंथ नाही.
मला कुणीही धर्मगुरू नाही.
माझा वेश कसावा यावर मला कोणतीही बंधन नाहीत.
माझे विचार कसे असावेत आणि आचार कसा असावा यावर मला कुणी बंधनं घातलेली नाहीत.
हिन्दुत्वाची चिकित्सा करण्याचा अधिकार मला जगातल्या या सर्वात प्राचीन संस्कृतीने दिला आहे.
धर्म-शास्त्राची प्रथम चिकित्सा करणाऱ्या चार्वाकालाही ऋषीमंडळात स्थान देणाऱ्या माझ्या संस्कृतीचं मला कवतुक वाटतं.
दुसऱ्याच्या व्यक्ती-विचार स्वातंत्र्यावर कोणतीही गदा न आणता, माझ्या मना-विचाराला पटेल तसं मी वागू शकतो.
जगातल्या कोणत्याही देशावर किंवा धर्मावर या देशाने आक्रमण केल्याचं उदाहरण इतिहासात नाही.
याउलट हजारो वर्षाच्या परकीय, परधर्मियांचं सततचं आक्रमण आणि परकी सत्तेचे पाशवी शारीरिक आणि धार्मिक अत्याचार पचवून हा देश, आजही हिन्दू म्हणून ढेकर देत ताठ उभा आहे, याचं मला प्रचंड कौतुक आहे आणि त्याचा सार्थ अभिमानही वाटतो..
पण मला वाटणाऱ्या हिन्दू संस्कृतीच्या या अभिमानाचं रुपांतर आज काळजीत होऊ घातलंय.
आज तिचा धर्म होऊ घातलाय.
संस्कृती सर्वसमावेशक असते, तिच्या असलेल्या-नसलेल्या सर्वांना ती आपल्यात सामावून घेत अधिक समृद्ध होत पुढे जात असते.
धर्म बंदीस्त असतो.
तिथे बदलाला वाव नसतो.
माझ्यातल्याच कुणाच्यातरी कळपाची गरज म्हणून माझ्या संस्कृतीचा धर्म होताना जेंव्हा मी पाहातो, तेंव्हा मला काळजी अन् भितीही वाटू लागते.
आपल्याच लोकांच्या तना-मनात भिनू लागलेल्या कट्टर धार्मिकपणाची मला चिंता वाटते.
हिन्दू कधीही असा नव्हता.
हिन्दू कधीही धर्म नव्हता
ह्या माझ्या वाटत नसलेल्या आजच्या हिन्दु धार्मिकतेची लागण जर सर्वांना झाली, तर काय उतमात होईल याची काळजी मला सतत सतावतेय.
उद्या आपल्या विचारांचा नाही, तो हिन्दू असला तरी, तो शत्रु मानला जाईल का?
मला भावलेल्या वा न भावलेल्या देवांवर वा प्रथांवर टिका करण्याचा किंवा त्यांना झुगारून देण्याचा माझा जन्मसिद्ध अधिकार माझ्यातलाच कुणीतरी, त्याला आवडत नाही म्हणून, माझ्यापासून हिरावून घेईल का?
एखादा विवक्षित देव मानायलाच हवा किंवा एखादी प्रथा मला कितीही चुकीची आणि समाजविघातक वाटत असली तरी, ती माझ्यातल्याच प्रबळ अशा कुणाला तरी ती बरोबर वाटतेय म्हणून, ती पाळण्याची माझ्यावर सक्ती केली जाईल का?
एखादा धर्मग्रंथ, ठराविक धर्मगुरू मानण्याची मला जबरदस्ती केली जाईल का?
माझ्यातलाच कुणीतरी दुसरा धर्मांध माझ्या विचारांना नियंत्रित करेल का?
एखादा ठराविक वेश आणि ठराविक केशभुषा मला करणं बंधनकारक होईल का?
निरविराळे फतवे निघतील का?
आणि हे सर्व मान्य केलं नाहीतर मला देहांत प्रायश्चित घ्याव लागेल का?
याहीपेक्षा भयानक विचार माझ्या मनात येतो, तो ‘जातीयतेचा’..!
हिन्दू संस्कृती थोर आहे यात मला शंका नाही, पण तिला जातीयचतेची काळी किनारही आहे.
हिन्दू कधीही एकटा नसतो,
त्याची जात त्याच्यासोबत अपरिहार्यपणे येतेच.
सावली सारखी.
आणि सावली नेहेमी काळीच असते.
तर मग कट्टर हिन्दू धर्मात काळ्याकुट्ट जातीयतेचं काय होणार?
कोणत्या जातीचं महत्वाचं स्थान असेल?
कोणती जात इतर जातीना नियंत्रित करेल? हे त्या जातीच्या संख्येवर ठरेल की जातीच्या हातात असणाऱ्या आर्थिक-राजकीय ताकदीवर?
ज्या जाती राज्य करण्यास लायक समजल्या जाणार नाहीत, त्या जाती मग पुढे हिन्दू धर्माचा भाग म्हणून राहातील का? की अन्य सोयीचा मार्ग स्वीकारतील?
हिन्दू धर्म म्हणून एकत्र येऊ पाहाणाऱ्या सर्व जातीय हिन्दूंना, उद्या खरोखरंच धर्माचं राज्य स्थापन आलं तर, जातीयतेचा सामना करावा लागणार नाही याची काय शाश्वती?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण मंजूर केल्यानंतर समाजमाध्यमांत उठलेल्या जातीय हुंकाराचा, उद्या खरोखरंच धर्माचे राज्य आलं तर, विनाशकारी चित्कार होणारच नाही याबद्दल हिन्दू धर्माचे आजचे पुरस्कर्ते ग्वाही देऊ शकतात का?
आज हिन्दू धर्माचा हिरीरिने पुरस्कार करणाऱ्या सर्व जातीयांना, उद्या धर्माचं राज्य आल्यावर, धर्मासाठी त्यांनी केलेल्या कर्तुत्वावरुन पाहिलं जाणार, की जातीवरुन पाहिलं जाणार?
या व अशा अनेक प्रशांचं मोहोळ माझ्या मनात उठतं आणि पुढल्या पिढीचं भवितव्य काय असेल, माझ्या देशाचं काय होईल या काळजीने मन ग्रासतं.
पण आपलाच इतिहास आठवून मन लगेच आश्वस्तही होतं.
या देशातल्या विविध जाती-पंथ-प्रांतामध्ये विभागलेल्या आणि आसेतूहिमाचल पसरलेल्या माझ्या देशबांधवांच्या एकत्रित शहाणपणावर माझा विश्वास आहे.
हजारो वर्षांचं परकीय आक्रमण पचवून आणि हिन्दू धर्म अस्तित्वात नसुनही हिन्दू म्हणूनच हा देश आजही उभा आहे तो या सामान्य लोकांच्या शहाणपणामुळे..
हे शहाणपण सामान्यजन न बोलता नेहेमीच दाखवत आले आहेत. आताही घरातल्याच धार्मिक आक्रमणापासून हेच सामान्य लोक देशाला वाचवण्याचं शहाणपण दाखवतील यात मला शंका नाही..
आगीशी पाण्यानं लढायचं असतं आणि तप्त आग्नींचं रुपांतर चिखलाच्या थंड गोळ्यात करायचं असतं, हे समजण्याचं शहाणपण ह्या सामान्यांत आहे.
सामान्यांच्या ह्या एकत्रित शहाणपणालाच मी ‘हिन्दूत्व’ समजतो.
त्या अर्थाने, ‘होय, मी हिन्दू आहे’..!
आणि त्यासाठी मला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही..
-@नितीन साळुंखे
9321811091
आज काय झालं एवढे का भडकला आहात?
LikeLike
काय सांगू सर, शबरीमला प्रथेला मी विरोध केला तर माझ्या मित्रांकडबन मी हिन्दू नाही, सुंता करुन घ्या किंवा देश सोडून जा असं ऐकावं लागलं. म्हणून मला त्रास झाला. त्यांनाच ठणकावून सांगण्यासाठी ही पोस्ट लिहिली.
LikeLike