खडा पारशी – उपसंहार
भायखळा जंक्शनवरचा ‘खडा पारशी’ जवळपास गेली दोन वर्ष मला छळत होता. रोज काहीतरी माहिती शोधायचो आणि काही कारणांनी पुढचा शोध घेणं आणि म्हणून त्यावर लिहिणं राहून जायचं. कंटाळा हे मुख्य कारण आणि ‘मी हे का आणि कुणासाठी करतो’ ह्याचा विचार मनात येणं हे दुसरं कारण. दुसरं कारण अत्यंत तात्कालिक असायचं कारण त्याच उत्तर, मी हे माझ्या आनन्दासाठी करतो, हे असायचं. पण तरीही कंटाळा हे मुख्य कारण उरायचंच. त्यामुळे त्यावर लिहिणं राहूनच जायचं.
खडा पारशी मला छळत होताच, गेले काही दिवस मात्र तो मानगुटीवरच येऊन बसला आणि मग पुढचा मार्ग त्यानेच मला दाखवला. दोन वर्षांपूर्वी जेंव्हा मी खडा पारश्याला माझ्या मनात जागा दिली, तेंव्हा सुरुवात नेमकी कुठून करायची हा प्रश्न होता. विकिपीडिया हा सर्वात सोपा आणि कधीही उपलब्ध असलेला मार्ग. पण तो तेवढासा खात्रीशीर म्हणता येत नव्हता. तरी सुरुवात तिथूनच केली. मी सुरुवात केली आणि मानेवर बसलेला हा पारशी बाबा चक्क माझ्या बरोबर येऊन माझ्या हाताला धरून मला एक एक ठिकाण फिरवू लागला आणि मग खडा पारश्याच्या माहितीच एक एक दालन दालन माझ्यापुढे खुलं होऊ लागलं. तशी ह्या खड्या पारश्याची माहिती इंटरनेटवर विपुलतेने उपलब्ध आहे, परंतु मला काहीतरी वेगळी आणि सत्यतेचा अधिक अंश असणारी माहिती हवी होती. कुठलंही लिखाण करताना वस्तुनिष्ठ माहिती, ती हि संदर्भासहित, देण्याकडे माझा कटाक्ष असतो. खडा पारश्याच्या बाबतीत मला असेच एक एक संदर्भ मिळत गेले आणि मग मी लिहिती गेलो. जेमतेम चार-पाचशे शब्द भरतील असं वाटत असताना चक्क दोन-अडीच हजार शब्दांचा ऐवज तयार झाला आणि गेल्या तीन-चार दिवसात मी तो तुमच्या वाचनासाठी माझ्या फेसबुकवर आणि ब्लॉगवर पोस्ट केला. लाईक /कमेंट्स भरपूर मिळाल्या, पण बारकाईने किती जणांनी वाचला कुणास ठाऊक..!! पण जाऊदे, तो माझा मुख्य हेतू नाही..!!
इतिहासाचा धांडोळा घेताना काहीतरी शोधताना काहीतरी अनपेक्षित असं हाती लागून जात. हा माझा नित्याचा अनुभव. घरात हरवलेली वस्तू शोधताना, दुसरी मागेच कधीतरी हरवलेली वस्तू आपल्याला अवचित मिळून जाते, हा अनुभव आपणही कधी न कधी घेतला असेल. अशीच खडा पारशाची हकीकत शोधात असताना, मी गेली काही वर्ष शोध घेत असलेली ब्रिटिश काळातली रस्त्याची एक कोनशिला (Plaque) अगदी माझ्यापासून दोन फुटावर स्वतःच येऊन उभी राहिली. आणि तिचा खडा पारश्याच्या इतिहासाशी निकटचा संबंध असल्याने तिची माहिती तुम्हाला देणं मला आवश्यक वाटलं.
खडा पारशी च्या दुसऱ्या भागात अलेक्झांड्रा शाळेच्या संदर्भात मेजर वुडबीचं नांव आलेलं आपण वाचलं असेल. ही शाळा फोर्ट विभागातल्या बाॅम्बे जिमखान्यालगतचा ज्या हजारीमल सोमानी मार्गावर आहे, त्या रस्त्याचं पूर्वीच नांव ‘वुडबी रोड’. लष्करात मेजर असलेले सिडनी जेम्स वुडबी त्यांचे साथीदार प्रायव्हेट इलाही बक्ष आणि प्रायव्हेट सोनक टंक १८८० सालात अफगाणिस्थानातल्या दुबराई (Dubrai ) येथे झालेल्या लढाईत शत्रूशी लढताना धारातिर्थी पडले होते. ही लढाई अॅंग्लो-अफगाण युद्ध म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. त्या मेजर वुडबी यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ ह्या रस्त्याला त्यांचं नांव दिल गेलं होत.

मेजर वूडबींच्या शौर्याची माहिती देणारी एक संगमरवरी कोनशिला (Plaque) त्या रस्त्यावर आहे अशी माहिती मला मुंबईवरच्या जुन्या पुस्तकांत मिळाली होती, पंतू गेली तीन-चार वर्ष शोध घेऊनही मला ती कोनशिला काही सापडत नव्हती. दरम्यान त्या रस्त्याचंही बऱ्याचदा नूतनीकरण झालं होत आणि इतिहासाशी काहीच नातं नसलेल्या म.न.पा. आणि सा.बां.खात्याच्या स्थितप्रज्ञतेवर माझा गाढ विश्वास असल्याने, ती कोनशिला या दोन यंत्रणांच्या कृपेने कुठेतरी अज्ञानात विलीन झाली असावी, असं मी धरून चालत होतो (सायनच्या ‘डंकन कॉजवे’ची पाटीही अशीच मला सापडत नाहीय, हा पूर्वानुभव होताच). परंतु ‘इच्छा असली, की प्राप्ती होतेच’ या उक्ती’प्रमाणे आज ती पाटी काहीच हासभास नसताना अचानक माझ्या अगदी समोर येऊन उभी राहिली.
त्याचं झालं असं, मानेकजी कर्सेटजी यांची अधिकची काही माहिती मिळते का, ते पाहण्यासाठी मी हजारीमल सोमानी मार्गावरच्या अलेक्झांड्रा शाळेत गेलो होतो. तिकडच्या उत्साही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडची असलेली सर्व माहिती मला आनंदाने दिली. मानेकजींच्या ‘व्हिला भायखळा’ या जागेनंतरच्या सध्याच्या जागेत सुरु झालेल्या शाळेच्या पूर्वीच्या इमारतीचं नांव ‘अल्बर्ट हॉल’ होत हे मला त्या कर्मचाऱ्यांनीच सागितलं. ह्या गोष्टीचा अन्यत्र कुठेही उल्लेख नाही. त्यांचा निरोप घेताना मी सहज म्हणून त्या कोनशिलेची चौकशी केली, तर जवळपास ५-६ तुकड्यात तुटलेली ती संगमरवरी कोनशिला शाळेने त्यांच्या गेटच्या आतल्या बाजुला निगुतीने चिटकवलेली ती संगमरवरी पाटी मला त्यांनी चटकन दाखवली. सोबत फोटो दिलाय. फोटोत तुटलेली पाटी सहज दिसून येते.
काही वर्षांपूर्वी रस्त्याचं काम सुरु असताना, रस्त्याच्या कंत्राटदाराकडून ही कोनशिला तुटली होती किंवा तोडली गेली होती. हे शाळेच्या लक्षात आल्यावर शाळेने ती कोनशिला, डेब्रिजरूपाने कुठेतरी गडप होण्यापूर्वी कंत्राटदाराकडून मागून घेतली आणि तिचे तुटलेले तुकडे काळजीपूर्वक चिटकवून आपल्या गेटच्या मागे लावली आणि म्हणुनच मला त्या इतिहासात डोकावणं शक्य झालं. मानेकजी करसेटजींचा आणि अलेक्झांड्रा शाळेचा इतिहास ह्या पाटीशिवाय अपुरा राहिला असता आणि म्हणून मला ही माहितीही तुम्हाला सांगाविशी वाटली.
इतिहासाचं शोधकाम असो की पुरातत्वाचं खोदकाम असो, कोणती गोष्ट अनपेक्षितरित्या समोर आणून आनंद ठेवतील, ते सांगता यायचं नाही..!! असो.