मुंबईचा फ़ोर्ट..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

फोर्ट..

दक्षिण मुंबईतील ‘काळा घोडा’ या सुप्रसिद्ध स्थानापासून उत्तरेच्या जीपीओसमोरच्या बझार गेट पर्यंत आणि ‘फ्लोरा फाऊंटन’ ते पूर्वेला टाईन हाॅल’ किंवा एशियाटीक सोसायटी आॅफ मुंबई, या दरम्यान पसरलेल्या आयाताकृती परिसरास ‘फोर्ट एरिया’ म्हणतात. हा मुंबईचा सेन्ट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी). ह्या परिसराचं हे स्थान काही आजचं नाही, ब्रिटीश काळापासूनचं आहे. काही वर्षांपूर्वी समुद्रात भरणी करुन तयार केलेल्या ‘नरिमन पाॅईंट’ने ह्या भागाचं स्थान हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता. तो काही काळ यशस्वीही झाला होता. पण फक्त काही काळच. पुन्हा तो मान फोर्टकडेच आला. आता ह्या परिसराशी ‘बीकेसी’ हा फोर्टच्या उत्तरेला जवळपास ‪९-१०‬ मैलांवर असलेला, मिठी नदीत भराव टाकून तयार केलेला दुसरा एक विभाग स्पर्धा करतोय. ही स्पर्धा कदाचित बीकेसी जिंकेलंही, कारण ती मुंबईची आणि मुंबईकरांची प्रवासाच्या त्रासामुळे आलेली अपरिहार्यता आहे..पण तसं झालं तरी ‘फोर्ट’चं स्थान किंचित वरचंच राहील, कारण या भागाशी खानदानी प्रतिष्ठेशी घातली गेलेली सांगड. या खानदानी प्रतिष्ठेची सर नरिमन पाॅईंट वा बीकेसी या चकचकीत भागाना नाही.

फोर्ट भागातलं कार्यालय म्हणजे प्रतिष्ठेचा ब्रान्ड, हा अर्थ या भागाला प्राप्त झाला तो ब्रिटिशांमुळे. ब्रिटिश सत्तेची सुत्र त्याकाळात इथुनच हलवली जात होती. ब्रिटिश राजसत्तेचा मुंबईतील सर्वोच्च प्रतिनिधी ‘गव्हर्नर आॅफ बाॅम्बे’ इथेच राहायचा. त्याच्या इतमामाला शोभेश्या भव्य, दगडी आणि समान उंचीच्या इमारती आणि वासतू इथे नंतर बांधल्या गेल्या १००-१५० वर्षांपूर्वीच्या या इमारती आजही आपला आब आणि रुबाब राखून आहेत. ब्रिटिशांना मुंबई ही आपली पूर्वेकडची राजधानी आणि फोर्ट विभाग राजधानीचा भाग बनवायचा होता आणि त्या दृष्टीनेच त्यांनी या विभागाची आखणी आणि बांधणी केलेली होता. म्हणून या परिसरावर लंडनची झांक आहे. बॅलाॅर्ड पिअर्सतर प्रती लंडनच. हा सारा परिसरच देखणा, ब्रिटीश साम्राज्यशाहीच्या खुणा अंगाखांद्यावर मिरवणारा. प्रथम पोर्तुगीज व नंतर ब्रिटीश, असा पावणेतीनशे वर्षांच्या परकीय सत्तेच्या खुणा, काही प्रत्यक्ष तर काही नाममात्र, या परिसरात अजुनही दिसून येतात. इथल्या ब्रिटिशकालीन इमारती (एक एक इमारत नुसती इमारत नसून प्रत्येकीला स्वत:ची अशी वेगळी कहाणी आहे) या प्रत्यक्ष दिसणाऱ्या खुणा. म्हणुन तर कधीकाळी घडलेल्या इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक इमारतींमधे आपलं कार्यालय असणं आजही प्रतिष्ठेचं समजलं जातं. ती सर नरिमन पाॅईंट अथवा काहीशा उछृंखल वाटणाऱ्या बीकेसीला नाही.

फोर्ट म्हणजे मराठीत किल्ला. किल्ला म्हणजे शत्रुपासून संरक्षणासाठी व त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी सभोवताली लांब-रुंद-उंच दगडी बुरूजबंद तटबंदी आणि त्या मधे वसलेलं गांव, नगर किंवा शहर. चारेकशे वर्षांपूर्वीची मुंबई अशीच होती. बेटा बेटांच्या मुंबईतली वस्ती मर्यादीत होती, ती फक्त ह्या फोर्ट एरियापुरतीच. मी या लेखात उल्लेख केलेली मुंबई म्हणजे फक्त एवढाच भाग, हे लक्षात घ्यावं. ‘फोर्ट’ हे नांव या विभागाला मिळालं, ते या परिसरात कधीकाळी अस्तित्वात असलेल्या किल्ल्यामुळे. कधीकाळी म्हणजे साधारणत: इसवी सन १६७०-७५ पासून १८६० पर्यंतच्या काळात. आज मुंबई शहराचा अविभाज्य असलेला भाग तेंव्हा लहान लहान बेटांच्या स्वरुपात होता. बेटं जोडली गेली नव्हती. मधे खाडी असलेल्या बेटांवर वस्ती होती, ती त्यावेळच्या स्थानिक लोकांची आणि ती ही दूरवर असललेल्या लहान लहान तुरळक वाड्यांच्या स्वरुपातली. अगदी नगण्य म्हणावी अशी.

थोडासा मागचा आढावा घेऊ. इसवी सन १५३० पासून पोर्तुगीजांचा अंमल मुंबईवर सुरु झाला होता. पण पोर्तुगीजांचं मुख्य ठाणं होतं वसई आणि मुंबई हा भाग त्याच्या दृष्टीने दुय्यम होता. तशी ही बेटं होतीही ओसाड. म्हणून सन १५४८ मध्ये मुंबई त्यांनी मेस्टी डायगो (Meste Diago) या पोर्तुगीज माणसाला ती भाड्याने दिली (या डायगोचा आपल्या या कथेशी काहीच संबंध नसला तरी, त्याचा उल्लेख मुद्दाम केला आहे. कारण पुढे मुबैकरांच्या जीवनाचा आणि जिव्हाळ्याचा झालेल्या ‘पागडी’ या शब्दाच्या जन्मास ही पोर्तुगीज व्यक्ती नकळत कारणीभूत झाली होती). डायगोचा मुक्काम होता माजगांवात. पुढच्या दोन वर्षांनी, सन १५५० मधे, मेस्टी डायगो यांचे भाड्याचे हक्क पोर्तुगीज वनस्पती शास्त्रज्ञ ‘गार्सिया दा ओर्ता’ कडे वर्ग करण्यात आले. मुंबई लीजवर घेतलेला ओर्ता प्रत्यक्षात मुंबईत अवतरला तो मात्र इसवी सन १५५४-५५ च्या दरम्यान. ओर्तीने आपल्या मुक्कामासाठी स्थान निवडलं ते आताच्या फोर्ट विभागात. नेमकं सांगायचं तर आताच्या टाऊन हाॅलच्या मागे, पूर्वेच्या किनाऱ्यावर. हेच ते गार्सिया दा ओर्ताचं ‘मनोर हाऊस’ नांवाचं घर.

घर म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहातं, त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी अशी ही वास्तू होती. लहानसा किल्लाच म्हणा ना. आज त्या मुळच्या किल्ल्याचं पोर्तुगीजकालीन प्रवेशद्वार आणि त्या समोरील ‘सूर्य घड्याळ (Sundial)’ या चिजा नेव्हीच्या (INS Angre) अखत्यारीत असलेल्या, एशियाटीक सोसायटीच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या आहेत. हा भाग संवेदनशील असल्याने, आपल्याला त्या पाहाता येत नाहीत. ओर्ता वनस्पती शास्त्रज्ञ असल्याने त्याने परिसरात मोठी बागही राखली होती. टाऊन हाॅल बहुतेक त्या घरासमोरच्या आवारात बांधला गेला असावा आणि टाऊन हाॅलच्या समोरचं हाॅर्निमन सर्कलही मनोर हाऊसच्या समोरच्या बागेचा अंश असावं. पुढची वस्ती या मनोर हाऊसभोवतीच अर्धवर्तुळाकार वाढत गेली. मनोर हाऊस, म्हणजे आताचा टाऊन हाॅल हा मध्य कल्पून उत्तरेला बझार गेट ते दक्षिणेला लायन गेट व्हाया चर्च गेट असं काढलेलं अर्धवर्तुळ म्हणजेच नंतर ब्रिटिशांच्या काळात नांवारुपाला आलेल्या ‘फोर्ट’चा परिसर..! गार्सिया दा ओर्ताचं हे घर व त्या घराभोवती नंतरच्या ब्रिटिश काळात बांधण्यात आलेली गढी, काळाच्या ओघात बाहेरची वाढत गेलेली वस्ती आणि नंतर या सर्वाभोवती बांधण्यात आलेली बुरुजबंद तटबंदी, तटबंदी बाहेरील खोल खंदक म्हणजेच नंतर प्रसिद्धीस आलेला ‘फोर्ट’ विभाग..! त्याचीच ही गोष्ट.

गार्सिया दा ओर्ताच्या नंतर जवळपास १०० वर्षांनी, म्हणजे इसवी सन १६६५ ते १६६८ च्या दरम्यान मुंबई बेटाचा ताबा पोर्तुगीजांकडून ब्रिटीशांच्या ताब्यात आला, तेंव्हा सहाजिकच या ‘मनोर हाऊस’चा ताबाही ब्रिटीशांकडे आला. त्यापूर्वी ब्रिटिशांचं बस्तान सुरतेला होतं. सुरत येथील राजकीय वातावरण त्याकाळात अस्थिर होतं. मुघलांच्या मनमानी कारभारामुळे ब्रिटिश त्रस्त झालेले होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम इसवी सन १६६४ आणि नंतर १६७० मधे सुरतेवर टाकलेल्या धाडीमुळे ब्रिटिश अधिकच घाबरले होते. आपल्या व्यापारासाठी ते अन्य एका सुरक्षित स्थानाच्या शोधात होते. अशातच १६६८ साली मुंबई बेटं ब्रिटीशांकडे आली आणि ब्रिटिशांनी हुश्श म्हटले.

जुलै १६६९ मधे ईस्ट इंडीया कंपनीच्या सुरत वखारीचा अध्यक्ष जेराल्ड आॅजिये (Gerald Aungier) मुंबईचा गव्हर्नर म्हणून मुंबईत आला. (मुंबईचा सर्वच क्षेत्रात झालेला आजचा जो विस्तार दिसतो, त्याची पायाभरणी आॅजियेनी केलेली आहे). आॅजियेचा मुक्काम वर लिहिलेल्या गार्सिया दा ओर्ता याच्या ‘मनोर हाऊस’ मधेच होता. ह्या मनोर हाऊस भोवती आॅंजियेने भक्कम गढी उभारली. संरंक्षणाची व्यवस्था केली. हे मुंबईचं पहिलं ‘गव्हर्नर हाऊस. ब्रिटिशांचं हेड क्वार्टर. मुंबई पुढे जी जगप्रसिद्ध झाली, त्याची सुरुवात इथून झाली.

ऑंजिये ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी होता. ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी असल्याने, कंपनीचा भर साहजिकच शहरातील व्यापार वाढवण्यावर होता. व्यापार उदीम वाढवायचा म्हणजे शहरातील वस्ती वाढली पाहिजे, व्यापारी असले पाहिजे आणि हे सर्व करायचं म्हणजे जनतेला आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या जीविताची आणि मालाच्या संरक्षणाची हमी दिली पाहिजे. तो काळ मुघल, मराठे, सुलतान, सिद्दी इत्यादींच्या आपापसातल्या लढायांचा होता आणि म्हणून त्याकाळातला मुख्य भर संरक्षणावर असायचा. जेराॅल्ड आॅंजियेने त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली. बाहेरचे लोक शहरात यासाठी प्रयत्न सुरु केले. व्यापारी व जनतेवर कोणत्याही प्रकारची जोर-जबरदस्ती करण्याच येणार नाही असे त्याने जाहीर केले. जनतेला सुखसोयी देता याव्यात म्हणून जनतेला व व्यापाऱ्यांना कर भरण्याचे आवाहन केले. बदल्यात त्यांच्या जीविताची आणि मालमत्तेच्या संरक्षणाची हमी देण्यात आली. आॅजियेने अंगिकारले हे धोरण त्याच्या पश्चात मुंबईचे गव्हर्नर झालेल्या हेन्री आॅक्झंडेन, चाईल्ड, हॅरीस आदींनीही पुढे सुरू ठेवला. परिणामस्वरुप मुंबईची वस्ती वाढू लागली. देश-परदेशातून व्यापारी येथे येऊ लागले. शत्रूपासून संरक्षण व्हावे यासाठी शहराभोवती तटबंदी बांधून शहराचं रुपांतर किल्ल्यात करण्याचं काम ऑंजियेच्या काळातच सुरु झालं होत, त्याला सन १६९० मधे, गव्हर्नर जॉन चाईल्डच्या काळात गती मिळाली आणि हे काम सन १७१६ मधे गव्हर्नर चार्ल्स बूनच्या कारकिर्दीत पूर्ण झालं होतं. किल्ल्याचा उत्तर, दक्षिण व पश्चिम दिशेकडे विस्तार करून त्याला पक्के बुरूज व मजबूत तटबंदी केली. मुंबईचा किल्ला पूर्ण झाला होता. एव्हाना मुंबईतली वस्ती भरपूर वाढली होती. लोकांच्या झुंडीच्या झुंडी किल्ल्याच्या आतील शहरात वसाहती करण्यास येऊ लागल्या होत्या.

किल्याव्या तटबंदीला शहरात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी तीन मुख्य दरवाजे होते. उत्तरेस, सध्याच्या सीएसठी स्टेशनसमोर असलेल्या दरवाजाला ‘बझार गेट’, दक्षिणेला आताच्या काळाघोडा किंवा जहांगीर आर्ट गॅलरीच्या परिसरात असलेल्या गेटला ‘अपोलो गेट’ तर पश्चिम दिशेस ‘चर्च गेट’ अशी नांव दिली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव या गेटमधून येण्याजाण्याच्या वेळा निश्चित केलेल्या होत्या व त्या वेळेनंतर कुणालाही आत किंवा बाहेर जाता येत नसे. बाहेरच्या माणसाला विना परवानगी किल्ल्यात रात्रीचा मुक्काम करता येत नसे. चर्चगेट’ हे सध्याचं जे फ्लोरा फाऊंटन आहे, बरोबर त्याच कारंजाच्या जागी होतं. पूर्वेस गव्हर्नर हाऊस किंवा ब्रिटिशांचं मुख्यालय व त्यापुढे समुद्राचंच सानिध्य होतं. तटबंदीच्या दक्षिणेस अपोलो गेट व उत्तरेस बझार गेट. या व्यतिरिक्त, आजचा टाऊन हॉल ते लायन गेट दरम्यान आणखी दोन गेट्स होती. त्यांना ‘मरिन गेट्स’म्हणत. ही गेट्स फक्त बोटीने आलेला माल आणि महत्वाच्या व्यक्तीच्या येण्या-जाण्यासाठी होती. आजचं ओल्ड कस्टम हाऊस ह्या पोतुगीज काळातल्या इमारतीचं प्रयोजन त्यासाठीच त्या ठिकाणी होतं. वर उल्लेख केलेल्या तीन दरवाजाच्या आतील भागाला ‘फोर्ट’ हे नांव मिळालं, हाच तो मुंबईचा ‘फोर्ट विभाग’..!

सन १६६८ पासून सुरु झालेली मुंबईची वाढ नेत्रदीपक होती. मुंबईचा बोलबाला झाला होता. साऱ्या जगातून लोक इथे येत होत होते, व्यापार करत होते. शहराभोवती मजबूत तटबंदी आणि किल्ल्यात संरक्षणासाठी सैन्य होते. त्याकाळात ब्रिटिश सतत मराठे आणि मोघलांच्या भीतीखाली वावरत असायचे, कारण मुंबईची मुख्य वस्ती व व्यापारी पेढ्या संरक्षणाच्या दृष्टिने किल्ल्याच्या आतच असल्या तरी, मुंबई शहराची हद्द तेंव्हा आतासारखीच माहीम-सायनपर्यंत होती. त्यापुढच्या मिठी नदी किंवा माहीमच्या खाडीपलीकडील ठाणे-वसई पर्यंतचा भूभाग साष्टी म्हणून ओळखला जायचा आणि त्या विस्तृत भूभागावर अजुनही पोर्तुगीजांचं राज्य होतं. देशात इतर ठिकाणी मुघल, इतर मुस्लिम शाह्या आणि मराठ्यांचा अंमल असतानाही पोर्तुगीजांनी वसई व जवळच्या प्रदेशात आपली सत्ता कायम ठेवलेली होती. पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात सतत युद्ध चाललेली असायची आणि त्याची झळ आपल्याला बसून आपल्या व्यापारात खंड पडेल याची ब्रिटिशांना सतत धास्ती असायची. पोर्तुगीज, मराठे किंवा सिद्धी यांच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी ब्रिटीशानी मिठीच्या दक्षिण तीरावर सायन व पश्चिमेस माहीम असे दोन किल्ले राखले होते.

अशातच इसवी सन १७२० मधे मराठ्यांनी पोर्तुगीजांचा कल्याणवरील अंमल संपुष्टात आणला आणि पुढे पोर्तुगीजांचं या प्रदेशातील एकेक ठाणं मराठ्यांनी हस्तगत केलं आणि मंबईतले ब्रिटिश अधिक सावध झाले. सन १७३७ मध्ये जास्तीची सावधानता म्हणून त्याकाळचा ब्रिटिश गव्हर्नर जॉन हॉर्न याने सायन आणि माहीमच्या किल्याच्या बरोबर मध्ये, आताच्या धारावीत, मिठी नदीच्या किनाऱ्यावर एक छोटेखानी किल्ला (feeder fort ) बांधला. आजही हा बुरुजवजा किल्ला धारावीच्या निसर्ग उद्यानासमोर अस्तित्वात असून त्याला ‘काळा किल्ला’ म्हणून ओळखलं जात. अशातच सन १७३९ मध्ये चिमाजी आप्पानी पोर्तुगीजांकडून साष्टी हस्तगत केली आणि ब्रिटिश अधिकच सावध झाले. ब्रिटिश कोणाहीपेक्षा जास्त मराठ्यांना घाबरत, त्याच एक उदाहरण सांगतो. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याची बातमी जेंव्हा ब्रिटिशांकडे आली, तेंव्हा ब्रिटिशांनी त्या बातमीवर विश्वास ठेवला नाही. ब्रिटिश म्हणाले होते, की जेंव्हा शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या बातम्या येणं बंद होईल, तेंव्हा ते मरण पावले असं आम्ही समजणार. ब्रिटिशांच्या दृष्टीने अति खतरनाक अश्या मराठ्यांचे राज्य आता ब्रिटिश मुंबईच्या अगदी हद्दीला भिडले होते आणि म्हणून ब्रिटिश अधिकच घाबरले. खबरदारी म्हणून आधीच बांधलेल्या तटबंदीच्या बाहेरून लांब-रुंद आणि खोल खंदक खणण्याचे काम ब्रिटिशांनी सुरु केलं. हे काम सुरु करण्यापूर्वी ब्रिटिशांनी किल्ल्याच्या आतील व्यापारी, प्रतिष्टीत जण आणि आम जनतेची सभा बोलावली होती. अगदी दाराशी येऊन ठेपलेल्या संकटाची जनतेला जाणीव करून देऊन मराठ्यांपासून जास्तीचं संरक्षण व्हावं यासाठी किल्ल्यासभोवती खंदक बंधने किती गरजेचं आहे हे सर्वाना समजावून सांगितलं. इतकंच नाही तर त्या खंदकाचा काही खर्च सर्वांकडून वर्गणी काढून जमा करण्यात आला होता. या खंदकासाठी ३ लाख रुपये खर्च आला होता व त्यापैकी ३०००० रुपये त्यावेळच्या मुंबईकर नागरिकांनी करून दिले होते.(ही रक्कम वेगवेगळ्या पुस्तकांत वेगवेगळी दिलेली आहे. पण मुंबईकरांनी त्यावेळी वर्गणी काढली होती, हे मात्र सिद्ध होते.).

पुढे ३०-४० वर्ष काही फार घडले नाही आणि काही वर्षांनी सन १७७५ मध्ये रघुनाथराव पेशव्यांशी झालेल्या एका करारान्वये साष्टीची बेट व्यापाराकरिता म्हणून ब्रिटीशांच्या ताब्यात देण्यात आली आणि ब्रिटिश निश्चिंत झाले. पुढे ही काही इतिहास घडला परंतु आपल्या विषयाशी त्याचा फारसा संबंध नसल्याने त्याचा विचार इथे केलेला नाही.

एव्हाना ब्रिटिशांचं बस्तान चांगलाच बसलं होत. व्यापार उदीम सुरु होता, वाढत होता. मुमबीची भरभराट होत होती. पुढच्या ७०-८० वर्षात किल्ल्यातल्या मुंबईची भरमसाट वाढ झाली होती. वसतीला जागा अपुरी पडू लागली होती. ब्रिटिशांनी त्यांच्या बहुतेक सर्व शत्रूवर विजय मिळवला होता किंवा त्यांच्याशी करार त्यांना दूर ठेवलं होत. १८५७ चं बंड मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन देश थेट इंग्लंडच्या राणीच्या अधपत्याखाली आला होता. ब्रिटिशांना प्रबळ शत्रूच उरला नव्हता आणि म्हणून आता किल्ल्याच्या सभोवतालचा खंदक, तटबंदी आणि दरवाजे याची काहीच आवश्यकता उरली नव्हती. किल्ल्यातील वाढत्या वस्तीला आता उत्तरेच्या दिशेने वाट करून यायची आवश्यकता वाटू लागली होती.

अशातच दिनांक ‪२४ एप्रिल‬ १८६२ रोजी मुंबईचा गव्हर्नर म्हणून सर बार्टल फ्रियर यांनी सूत्र हाती घेतली आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला तो ही तटबंदी तोडण्याचा. सर बार्टल फ्रिअर यांनी तटबंदी पाडायचा निर्णय लगेच अंमलात आणला, तो क्षण मुंबईच्या वाढीसाठी निर्णायक ठरला. आताची फळलेली-फुललेली मुंबई दिसते, त्याची मुळं सर बार्टल फ्रिअरच्या या निर्णयात आहेत. तटबंदी पाडल्यानंतर कोटाच्या आत कोंडलेल्या मुंबईला, मुंबई किल्ल्याच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला अफाट मोकळी जागा निर्माण झाली आणि मुंबईने जग पादाक्रांत करण्यासाठी निघाली. अजूनही तिची आगेकूच सुरूच आहे.

फोर्ट काळाच्या पडद्याआड गेला असला तरी नामरूपाने तो अजूनही जिवंत आहे. आजच्या मुंबईकरांनी गतकाळाच्या कडू-गोड इतिहासाला ‘फोर्ट’च्या नावाने आपल्या मनात स्थान दिलेलं आहे. इतक्या घडामोडींनी भरलेल्या व भारलेल्या या विभागात आपलं कार्यालय असणं म्हणूनच तर अभिमानाची गोष्ट समजली जाते. ह्या परिसरात काम करताना, काम केल्याची जी भावना मनात निर्माण होते, ती इतरत्र होत नाही, हा माझा अनुभव आहे.

फोर्ट सेंट जॉर्ज –

मुंबईच्या किल्ल्याच्या तीन गेट्सपैकी ‘अपोलो गेट’ तर नांवासकट गायब झालं आहे तर ‘चर्च गेट’ व ‘बझार गेट’ नांवापुरतं का असेना, अस्तित्वात आहे..इंग्रजांचा ‘फोर्ट’ कधीचाच काळाच्या पडद्याआड गेला असला तरी या किल्ल्यावा नेपोलियनच्या हल्ल्याच्या भितीने सीएसटी स्टेशनच्या मागील बाजूस, १८६० नंतर केलेल्या वाढीव तटबंदीचा काही भाग मात्र अजुनही बऱ्यापैकी शाबूत आहे. बंगालचे मुख्य इंजिनिअर सर आर्किबाल्ड कॅम्पबेल याना ब्रिटिश सरकारने मुंबईच्या मजबुतीसाठी येथे पाठवले होते व त्यांनी या किल्ल्याच बांधकाम सन १८६९ (काही पुस्तकात वेगळं साल नोंदवलेले आहे) मध्ये करून घेतलेलं आहे. या वाढीव बांधकामाला ब्रिटीशांनी नांव दिलं ‘फोर्ट सेंट जाॅर्ज’..! सध्याचं सेंट जाॅर्ज हाॅस्पिटल याच्याच भागावर उभारून त्याला ‘सेंट जाॅर्ज’ असं नांव दिलंय ते त्यामुळेच..! (संदर्भ-स्थलकाल, अरुण टिकेकर). या जागी त्या पूर्वी डोंगरीच्या किल्ला होता अशी माहिती बऱ्याच ठिकाणी मिळते.

सीएसटी स्टेशनच्या मागे असलेल्या ‘पी.डीमेलो’ मार्गाने (आताचा शहीद भगतसिंग रोड) जाताना, सेंट जाॅर्ज हास्पिटलचं या रस्त्यावरचं प्रवेशद्वार व सीएसटी स्टेशनचं नव्याने बांधलेलं मागील प्रवेशद्वार यांच्या दरम्यान अगदी रस्त्यावरच फोर्ट सेंट जॉर्जचा बाहेरचा भाग सहज पाहता येतो. याच्या मागेच सेंट जाॅर्ज हाॅस्पिटलआहे. मूळ किल्ला दिड किलोमिटर लांब आणि अर्धा किलोमीटर रुंद होता. आता मात्र याचा काही भागच शिल्लक आहे. या किल्ल्याच्या बुलंद भिंती, समुद्रातून चाल करून येणाऱ्या शत्रूवर तोफा-बंदुकांचा भडीमार करता यावा यासाठी समोरच्या समुद्राच्या दिशेने ठेवलेल्या उभट, अरुंद फटी (गनस्लीट्स), किल्ल्याचं दणकट छत, आतील तीन-साडेतीन फुट रुंद भिंती पाहता येतात. किल्ल्याचा हा तटबंदीसहीतचा हा भाग दारूगोळ्याचं कोठार असावं. सध्या या ‘किल्ल्यात’ महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याचं कार्यालय आहे. मुंबईच्या इतिहासात अमराव मिळालेल्या ‘फोरत चा हा एवढा एक अवशेष, गट कालच्या स्मृती जागवत अजूनही उभा आहे.

-नितीन साळुंखे

‪९३२१८११०९१‬

१२.०२. २०१९

संदर्भ –

1. श्रीमती उज्वला आगासकर, मुंबईच्या अभ्यासक, आर्किटेक्ट व फोटो जर्नालिस्ट. सोबतच किल्ल्याचा आराखडा श्रीमती आगास्करानी हाती रेखाटलेला आहे.

2. स्थल-काल – डॉ. अरुण टिकेकर

3. मुंबईचा वृत्तांत – आचार्य आणि शिंगणे

4. A handbook for India. Part ii. Bombay- प्रकाशकी जॉन मरे

5. Bombay in the Making, Phiroze B M Malabari, 1910

6. Fort Walk – शारदा द्विवेदी व राहुल मेहरोत्रा

चित्र संदर्भ –

1. श्रीमती उज्वला आगास्कर यांनी रेखाटलेला नकाशा .

2. किल्ल्याचा छापील नकाशा मला https://bijoor.me/2016/07/03/cycling-to-fort-george-the-last-remaining-vestige-of-bombay-fort/ या वेबसाईटवर मिळाला.