मनातलं काही..!!

मित्रांनो आणि मैत्रिणींनो

एक आनंदाची बातमी.

मी गत चार-पांच वर्षात केलेलं विविध विषयांवरच्या लेखनातल्या अत्यंत निवडक आणि देश परदेशातल्या वाचकांकांच्या पसंतीस उतरलेल्या लेखांचं संकलन करुन, ते एकत्रीतपणे एका डिजिटल पुस्तकाच्या (ई-बुक) स्वरुपात #मनातलं_काही’ या नांवाने लवकरच प्रसिद्ध होणार आहे. हे पुस्तक माझं कोणत्याही स्वरुपातलं पहिलंच पुस्तक..!

ह्या पुस्तकात प्रसिद्ध झालेले काही लेख आपणही वाचले असतील. परंतु सर्वच लेख आपल्या वाचनात आले नसतील. पुन्हा हे लेख पुस्तकासाठी निवडताना, त्यातील काहींचं पुनर्लेखन करु त्यातला ताजेपण टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सदर पुस्तकातील लेखांचं संकलन #ब्रोनॅटो (#BRONATO) ह्या प्रतिष्ठीत ई-प्रकाशन संस्थेने केलेलं असून, त्या पुस्तकावरचं सर्व संस्करण ब्रोनॅटोच्या श्री. शैलेश खडतरे या धडपड्या तरुणाने मनापासून केलंय..

‘मनातलं काही’ हे माझं ई-बुक, वाचनवेड्यांच्या जगात प्रसिद्ध असलेल्या ‘किंडल’वरुन माफक_शुल्कात डाऊनलोड करता येणार आहे. पुस्तक डाऊनलोड करण्यासाठीची लिंक मी लवकरच माझ्या फेसबुकवर आणि ब्लाॅगवर प्रसिद्ध करेन.

या पुस्तकातून जमा होणारी रक्कम माझ्या ‘मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा’ या माझ्या महत्वाकांक्षी पुस्तकाच्या संस्करणासाठी उपयोगात आणली जाणार आहे..

आपण माझ्या या पहिल्या ई-अपत्याचं सहर्ष स्वागत कराल अशी अपेक्षा आहे..!!

धन्यवाद.

आपला,

नितीन साळुंखे

9321811091

30.03.2019

Shailesh Khadtare Bronato

आपली लोकशाही कुठे चाललीय?

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

आपली लोकशाही कुठे चाललीय?

आपल्या देशात बहुपक्षीय पद्धतीची संसदीय लोकशाही आहे. गेली ७० वर्ष लोकशाहीचा हा गाडा चाललाय. लोकशाहीत दोन महत्वाचे भाग असतात. एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष. किंबहूना विरोधी पक्षाची भुमिका लोकशाहीत जास्त महत्वाची असते. सत्ता हा विषयच असा आहे की, ती मिळाल्यावर स्खलन होण्याची शक्यता जास्त असते, मग सत्तेवर कुणीही असो. हम करे सो कायदा ही वृत्ती वाढीला लागते. असं होण्यापासून सत्ताविरोधी पक्षाला रोखण्यासाठी आणि सत्तेचा तोल सावरून धरण्यासाठी संसदेत तेवढाच मजबूत विरोधी पक्ष असणं लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक असतं. विधायक कामासाठी सत्तेचा वापर कसा करायचा हे विरोधी पक्ष दाखवून देत असतो. आज सध्या देशात विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याने किंवा आहेत त्यांचं अस्तित्व जाणवत नसल्याने, येणारी परिस्थिती सशक्त लोकशाहीसाठी चिंताजनक असण्याची शक्यता आहे.

भाजप आणि काॅग्रेस हे दोनच राष्ट्रीय स्तरावरचे मुख्य पक्ष आहेत. डावेपक्षही आहेत, पण त्यांची विश्वासर्हता आणि प्रभाव संपलेला आहे. उर्वरीत बाकीच्या काही पक्षांची मान्यता राष्ट्रीय पक्ष म्हणून असली तरी, त्या त्या पक्षाचा प्रभाव असलेलं क्षेत्र वगळता देशात इतर ठिकाणी ते प्रभाव पाडू शकत नाहीत. त्या अर्थाने त्यांना प्रादेशीक पक्षच म्हणावं लागेल. परिणामी केंन्द्रात सत्ता मिळावी म्हणून हे दृष्टीने भाजप आणि काॅग्रेस हे दोनच पक्ष उरतात. आज देशात अनेक पक्ष असले तरी, केन्द्रीय स्तरावर त्यातील बहुतेकांचं ध्रुवीकरण या मुख्य दोन पक्षांभोवती झालेलं दिसतं. भाजपप्रणीत एनडीए आणि काॅग्रेसप्रणीत युपीए. साधारण १९९० पासून आघाडी सरकारांची सद्दी सुरू झाली आणि २०१४ साली भाजपच्या नेतृत्वाखाली आलेल्या एनडीएने ती संपवली. २०१४ साली केंद्रात आलेलं सरकार जरी एनडीएचं आहे असं म्हटलं जात असलं तरी, एकट्या भाजपकडे संपूर्ण बहुमत होतं. ते भाजपचं सरकार होतं. आणि विरोधी पक्षांचं नेतृत्व काॅंग्रेसकडे होतं.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंन्द्रात स्थापन झालेल्या सरकारला आता पांच वर्ष पूर्ण होऊ घातलीत. या पांच वर्षात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय. मध्यंतरी लोकसभेसाठी झालेल्या बहुतेक पोटनिवडणुका भाजपला गमवाव्या लागल्या. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानसारख्या मोठ्या राज्यातही भाजपची ताकद घटल्याचं दिसून आलं. असं का झालं, याची अनेक कारणं आहेत आणि ती कोणती, यावर चर्चा करणे हा या लेखाचा विषय नसल्याने मी त्यात जात नाही. २०१४च्या तुलनेत भाजप कमकुवत झाला, एवढं समजलं तरी पुरे.

भाजपची ताकदही काहीशी कमी झाल्यासारखी वाटत असतानाच पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाला आणि नंतर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करुन त्याचं चोख प्रत्युत्तर दिलं. आपलं एक फायटर जेट पाकच्या हद्दीत पडलं व त्यातील वैमानीक अभिनंदन वर्तमान यांना सहीसलामत देशात परत आणण्यात सत्ताधारी भाजप यशस्वी ठरला. या घटनेचं व्यवस्थित भांडवल भाजपने केलं नसतं तरच नवल..! अर्थात भाजपच्या जागी काॅंग्रेस असती, तरी तिनेही तेच केलं असतं आणि काॅंग्रेस भाजपला विचारत असलेले प्रश्न, तेंव्हा भाजपने विचारले असते. बुद्धी ऐवजी भावनांवर चालणाऱ्या देशात हे असंच चालणार यात मला काही तरी आश्चर्य वाटत नाही.

भाजपच्या बाजूने लोकमत झुकवण्यासाठी या हल्ल्याचा पुरेपूर उपयोग भाजपने केला आणि यामुळे देशातील लोकांच्या जीवनाशी महत्वाचे प्रश्न जसे रोजगार, शेतकी, चलनवाढ, अधिकाऱ्यांमधला भ्रष्टाचार, माॅब लिंचिंग, देशातील धार्मिक आणि जातीय सलोखा इत्यादी आपोआप मागे पडले आणि केवळ पाकिस्तान आणि दहशतवाद हे दोनच महत्वाचे प्रश्न देशात शिल्लक असून आणि ते हाताळण्यास केवळ भाजपच समर्थ आहे, असा बहुसंख्य जनतेचा समज करुन देण्यात भाजप यशस्वी झाला.

देशाच्या सींमांचं रक्षण करण्याचं सरकारचं कर्तव्यच असतं आणि तसं करताना देशातील जनता आणि सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत एकजुटीने उभे आहेत, अशी भुमिका विरोधी पक्षांनी घेतली असती तर ते अधिक योग्य ठरलं असतं. परंतू तसं न करता हवाई हल्ल्याबद्गल पुरावे मागत बसण्याचा निर्बुद्ध खेळ विरोधी पक्ष करत बसले आणि मग आपोआपच जनतेच्या मुख्य प्रश्नांवरुन जनतेचं आणि विरोधी पक्षांचं लक्ष विचलीत करुन ते देशभक्तीच्या मुद्द्यावर केंद्रीत करण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली आणि भाजपची ताकद पुन्हा एकदा वाढल्यासारखी वाटू लागली.

भाजप सत्तेवर येईल अशी चिन्ह दिसताच, इतर सर्वच पक्षांतील निवडून येण्याची क्षमता असणारे नेते भाजपात जाण्यासाठी रांग लावून उभे आहेत. भाजप हा वैचारीक बैठक असलेला देशातील प्रमूख पक्ष, परंतू अशा पक्षातही कोणताही विधिनिषेध न बाळगता कुणालाही पक्षात प्रवेश देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. नव्याने पक्षात आलेले भाजपच्या विचारांशी दुरूनही साम्य नसलेले आहेत. यात बहुतेक सर्व घराणेशाहीचे समर्थक-वारस आहेत, भ्रष्टाचारी आहेत आणि कर्जबुडवेही आहेत आणि त्यांना सरकारी संरक्षण हवंय म्हणून त्यांचं हे पक्षांतर आहे, हे भाजपला आणि मतदारांनाही चांगलं समजतंय. नंबर गेमसाठी असं होत असलं तरी, अशामुळे भाजपचं हसू तर होतंच आहे, परंतु घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या विरोधावर २०१४ साली पूर्ण बहुमत प्राप्त केलेला भाजपा, सत्तेसाठी आता अशाच लोकांना पाठिंबा देतंय, असंही चित्र निर्माण होतंय.

देशातील मुख्य विरोधी पक्ष काॅंग्रसच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या पक्षातच शंका आहे. जनतेच्या मनतही तशीच शंका आहे. सरंजामशाही, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत जवळपास सर्वच विरोधी पक्ष फसले आहेत आणि ते बाहेर येण्याची शक्यता नाही. त्यांच्यात एकी नाही. कारण त्यांच्या विचारांतच जमीन-अस्मानाचा प्रश्न आहे. एक-दुसऱ्याचा आधार घेत स्वत:चं अस्तित्व टिकवणं, हाच त्यांच्यासमोरचा प्रमुख प्रश्न आहे आणि म्हणून ते एकत्र आलेत, हे जनता ओळखून आहे. भाजपच्या विरोधात इतर विरोधी पक्षांचं एकत्र येणं कितपत टिकेल, याची तिच्या मनात रास्त शंका आहे. सत्ता स्वार्थाने अंध झालेले विरोधी, जनतेसमोर सक्षम पर्याय उभे करु शकलेले नाहीत. या पक्षांना देशातील जनतेच्या प्रशांबद्दल फारसं काही देणं घेणं नाही, हे जनतेला समजून चुकलेलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर सरकारला बोलण्यास भाग पाडण्यास ते यशस्वी झालेले नाहीत. जनतेचा विश्वास जिंकण्यात बहुतेक सर्वच विरोधी पक्ष नाकाम ठरलेत आणि विरोधी पक्षातल्या ज्यांची निवडून येण्याची खात्री होती, ते बहुतेक भाजपात सामील झालेले आहेत आणि याचा फायदा भाजपला मिळणार आहे.

एकंदरीत येत्या निवडणुकीत विरोधी पक्षांची संख्यास्थिती गंभीर असेल असं वाटतंय आणि हे लोकशाहीसाठी चांगलं लक्षण नाही. लोकशाहीच्या गाड्याची सताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन चाकं असतात आणि त्यातलं एक चाक मागच्याच निवडणुकीत निकामी झाल्यासारखं वाटत होतं. या निवडणुकीत ते संपूर्णपणे तुटतंय, की लोकशाहीचा डोलारा सांभाळण्यासाठी भारतीय जनता शहाणपणाने वागून, ते निदान चालत राहण्यासाठी तरी त्याला आधार देतेय, हे २३ मे रोजीच समजेल.

कोणाच्याही प्रलोभनांना, आश्वासनांना बळी न पडता, कोणत्याही भावनांच्या आहारी न जाता , जनतेने जर बुद्धी वापरून मतदान केलं, तर लोकशाहीची गाडा पुढे सुरु राहील;अन्यथा एकपक्षीय लोकशाहीच्या दिशेने आपला प्रवास सुरु झालेला असेल आणि ते सर्वांसाठीच काळजीचं कारण असेल..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

27.03.2019

चित्र-इंटरनेट

मै भी चौकीदार?

मै भी चौकीदार?

भादूर. आमच्या सोसायटीचा वाॅचमन. त्याचं नांव ‘बहादूर’, पण तो ‘भादूर’ असा उच्चार करतो, म्हणून आम्हाही त्याला भादूरच म्हणतो. नेपाळकडचाच आहे. आडनांव माहित नाही. विचारल्यावर एकदा सांगितलं होतं त्याने, पण त्याचा उच्चार माझ्या कानांना इतका विचित्र वाटला, की ते लक्षात राहूनही माझ्या लक्षात राहीलेलं नाही. पण ते थापा नक्की नव्हतं. बुटकासा, गोरा, गरीब आणि प्रामाणिकही..!

हा आमच्या इमारतीचा वाॅचमन. एकटाच. १२ तासांची रात्रीची ड्युटी. ८ ते ८. सकाळी कामावरुन परत जाताना सोसायटीतल्या गाड्या धुण्याचं काम तो करतो. अर्थात त्याचा पगार त्या त्या गाडीच्या मालकाकडून तो स्वतंत्र घेतो. त्या व्यतिरिक्त सकाळच्या धावपळीच्या वेळात सगळ्याच वाॅचमनना बहुतेक सगळ्याच सोसायट्यात करावी लागणारी कामं, जसं कुणा बाबाचे इस्त्रीचे कपडे आणणे, कुणा शेठला टुथपेस्ट हवी असते, तर कुणा मातेला मीठ इत्यादी कामंही त्याला करावी लागतात. भादूरला या कामांचे स्वतंत्र पैसे मिळत नाहीत. रात्री मात्र वाॅचमनकी व्यत्तिरिक्त भरपूर काम असतं. काही मेंबरांच्या क्वाटर आणायच्या. हे काम त्याला आवडतं, कारण त्यालाही एखादी जीएमची क्वार्टर सुटते त्यातून. सुटते म्हणण्यापेक्षा क्वार्टर आणायला सांगणारेच त्याला, “भादूर तुमको भी लाव.” असं आग्रहाने सांगतात. एकंदरीत क्वाटरभक्त उदारतेत कर्णच..! राष्ट्रीय एकात्मता जशी क्वाटरीत असते, तेवढी कशातच नसते, असं माझं मत आणि अनुभवही..!

भादूरला एक युनिफाॅर्मही आहे. गबाळा, मळलेला, पायात चप्पल वैगेरे. खांद्यावरचे पट्टे सदा ओघळलेले. वाॅचमन बघत असतो, त्याच्याकडे कुणी बघत नसतं. बाकी हा आमचा भादूर तसा हसरा. म्हणजे हा सोसायटीतल्या लोकांना येताना पाहून, त्यांच्याकडे हसत पाहून त्यांना सलाम वैगेरे ठोकतो. पण मेंबरं काही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. वाॅचमनकडे काय बघायचं आणि त्याच्याशी कशाला हसायचं, असे आपले मध्यमवर्गीय कडक इस्त्रीतले विचार. वाॅचमन, रिक्शावाले, वेटर ही काय हसा-बोलायच्या लायकीचे लोक असतात का, असा आपल्या समाजाचा सर्वसाधारण समज. हलकी समजली जाणारी कामं करणारी लोकंही हलकीच असणार, हे साध सरळ अंकगणितीय सूत्र.

मी मात्र त्याच्या हसण्याला हसून प्रतिसाद देतो. कधीतरी त्याच्या सलामला हातही उंचावतो. हा माझा भिडस्त स्वभाव. अर्थात याची किंमतही मला मोजावी लागते. कधीतरी पाच-पन्नास रुपये तो मागतो. परत देण्याच्या बोलीवर. पण ती वेळ कधी येत नाही. मी ही मागत नाही. हा ही माझा भिडस्त स्वभावच..!

अलीकडे मात्र त्याचं वागणं बदललंय. गणवेश त्यातल्या त्यात नीटनेटका होऊ लागला. खांद्यावरच्या पट्ट्या वर गेल्या. टोपीही दिसू लागली. मला आश्चर्य वाटलं. एकदा असंच त्याला विचारलं, “क्या भादूर, आजकल एकदम कडक मे रहता है, क्या बात है? पगार बढा, के बढा के लेना है?”. तो लाजला. म्हणाला, “नै ना साब. वो मै फेस्बूक पे बडा प्रधान को ‘मै भी चौकीदार’ बोलते देखा. अब बडा प्रधान वो ‘भी’ चोकीदार है ऐसा बोलता है, तो उसका इज्जत रखने के लिये अच्छे से रहना तो पडेगा ना? अब हम एक बिरादरी के हुए. वो देश की रखवाली करता है, मै आपके बिल्डींग की. बात तो एक ही है.”

मला समजलं, तो पंतप्रधान नरेन्द्र मोदींविषयी बोलत होता. मी विचारलं, “तू उन्हे बडा प्रधान क्यू बोलता है, वो तो प्रधानमंत्री है ना?”. “पर वो गुजराती है ना. गुजराती लोग उन्हे बडा प्रधान बोलते है” भादूर म्हणाला. गुजरातीत पंतप्रधानांना बडा प्रधान बोलतात हे मला माहित होतं. भादूर पूर्वी गुजरात्यांच्या सोसायटीत काम करत असल्यामुळे त्याच्या तोंडात तोच शब्द बसला होता. गुजराती काही शब्द कसले भारी आहेत. आमदारांना गुजरातीत ‘धारासभ्य’ म्हणतात, असं जेंव्हा पहिल्यांदा ऐकलं, तेंव्हा माझ्या मराठी कानांना, त्यात नेमकं ‘सभ्य’ काय असतं हेच कळेना..!

भादूरला आता त्याला वाॅचमन म्हटलेलं आवडत नाही. त्याला ‘चौकीदार’ म्हणावं असा त्याचा आग्रह आहे. (त्यातही ‘चौ’मधला ‘च’ चहातला, चमच्यातला नाही -किंवा उलटही असेल, आता नीट आठवत नाही- त्यानेच असं सांगितलं. ‘सावन का महीना, पवन करे सोर..’ या गाण्यातला सुनिल दत्त नुतनला समजावतो ना, त्या चालीवर). आता तो मेंबरांची इतर कामं करत असला तरी, मेंबरांच्या क्वाटरी आणायला मात्र तो नकार देतो. विचारलं तर, “न पिऊंगा, न पिने दुंगा” हे उत्तर. ‘न पिऊंगा’ इथपर्यंत ठिक होतं, ‘न पिने दुंगा’ म्हणजे जरा अतीच. पण बहुतेक याला त्या त्या मेंबराच्या गृहमंत्र्यांचा छुपा पाठींबा असावा. बाह्य किंवा अंतर्गत छुपा पाठींबा असल्याशिवाय कुणीही माणूस उघडपणे भलती डेअरींग करत नाही. कुणीही म्हंजे कुणीही..!!

काही दिवस असेच गेले. एक दिवस मला त्याने तक्रार केली. बाजूच्या इमारतीतील ६०२ नंबरच्या फ्लॅटमधील माणसाने स्वत:च्या फेसबुकवर ‘मै भी चौकीदीर’चं प्रोफाईल ठेवलं होतं म्हणे. “साब वो आदमी बहोत पैसा खाता है. दो नंबर का पैसा है सब. त वो भी चौकीदार कैसा?” तो म्हणाला. त्याचा प्रश्न बरोबर होता. स्वार्थाच्या चिखलात नखशिखांत बरबटलेला, तुपाळ चेहेऱ्याचा तो अधिकारपदावरचा माणूस मलाही माहित होता.

मला भादूरचं कौतुक वाटलं. त्याच्या निरिक्षणाबद्दल..! फेसबुकवर स्वत:च्या फोटोसोबत चौकीदाराचं पोस्टर एका भ्रष्टाचाऱ्याने लावलेलं आमच्या प्रामाणिक चौकीदाराला आवडलं नव्हतं.

तो ६०२ मधला माणूस, स्वत:ला ‘मै भी चौकीदार’ म्हणून चौकीदार बडा प्रधानचा अपमान करतो किंवा बडा प्रधानही त्या माणसासारखाच असावा अशी दुसऱ्यांची समजूत करुन देतो, असं त्याचं म्हणणं पडलं. मला ते पटलं.

मी ही माझ्या फेसबुक खात्यातल्या आणि परिचयातल्या, त्या ६०२ टाईप ‘मै भी चौकीदारां’कडे बारकाईने पाहायला आता सुरुवात केलीय.

-©️नितीन साळुंखे

9321811091

२३.०३.२०१९

फोटो-इंटरनेट

विलेक्शनचा फार्स –

विलेक्शनचा फार्स –

नाटकाचे अनेक प्रकार असतात. त्यातल्या ‘फार्स’ ह्या नाट्य प्रकारात, सध्याचं मुख्यतः द्विपात्री आणि द्विसंवादी निवडणुक नाट्य फिट्ट बसतं. या नाटकात मुख्य संवाद असे दोनच, ‘मै भी चौकीदार’ आणि ‘चौकीदार चोर है’ किंवा ‘चौकीदार चोर है’ आणि ‘मै भी चौकीदार’ हे, पण वेगवेगळ्या स्वरात आणि कधीकधी तारस्वरात म्हटलेले. आणखीही काही पात्र यात गरजेनुसार किरकोळ कधी सल्लागारांचे, तर कधी वंचितांचे संवाद म्हणत एन्ट्री घेऊन वावरत असतात आणि एक्झीट घेत असतात. ही पात्र नेमकी कुणाच्या बाजूने संवाद म्हणत असतात हे शेवटपर्यंत काही काळात नसत. पण ती पात्र काही तेवढी महत्वाची नसतात. मुख्य पात्र दोनच. संवादही दोनच..!

यातलं एक पात्र म्हणणार ‘चौकीदार चोर आहे’, तर लगेच दुसरं पात्र म्हणणार ‘मी पण चौकीदार’. कधीतरी दुसरं पात्र म्हणणार ‘मी पण चौकीदार’. लगेच पहिलं पात्र म्हणणार, ‘चौकीदार चोर आहे’. म्हणजे दुसरं पात्र, ‘मी चोर आहे’ अशी कबूली देतंय, की ‘चौकीदार चोरी कसा करेल’ असा प्रश्न विचारून नाकबूल करतंय, हेच प्रेक्षकाना समजेनासं होतं. आहे काही लाॅजीक? नाही ना? फार्स या प्रकाराचा लाॅजीकशी तसाही काही संबंध नसतो. असतो तो निव्वळ बुद्धीशी काहीच संबंध नसलेला विनोद. हेच सध्या चालेलं आहे, असं मला वाटतं. हा फार्स पाहाताना काहींना मात्र ‘तळं राखेल, (हा शब्द ‘राखेल’ असाच आहे, ‘राफेल’ असा नाही. काही नतद्रष्टांना तो ‘राफेल’ असा वाटू शकतो. पण तो ‘राखेल’ असाच आहे याची नोंद घेणे) तो पाणी चाखेल’ आणि ‘जो बोट रोखतो, त्याची चार बोटं स्वतःकडे असतात’ ह्या म्हणी शिंच्या उगाचंच आठवत राहतात.

फार्समधे रंगमंचावरच्या घटना अत्यंत वेगाने घडत असतात. प्रेक्षकांना विचार करायला वावच ठेवलेला नसतो. किंबहूना त्यांनी विचार करुच नये, अशीच अपेक्षा असते. कोण कोणाचा कोण, तो कोण कोणाशी का आणि काय बोलतोय, ह्याचा शेवटपर्यंत पत्ता लागत नसतो. अतिशयोक्ती, असंभवनीय घटना, विदुषकी चाळे, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक करणं, हा या फार्सचा उद्देश. यांत पात्रांचा गोंधळ आणि धिंगाणा नाटकसंपेपर्यन्त चालू असतो.

नाटकाच्या रंगमंचावर अनेक विंगां असतात. काही ‘राईट’ला असतात, काही ‘लेफ्ट’ला असतात. काही अती डावीकडे, तर काही अती उजवीकडे. नाटकात नाट्य भरावं म्हणून किंवा प्रेक्षकांवर धक्का तंत्राचा परिणाम व्हावा म्हणून काही प्रवेश थेट समाजातून (पक्षी:प्रेक्षकातून) योजले जातात.काही विंगा अगदी नेमस्त असल्यासारख्या समोरही असतात. पण समोरच्या विंगेतून फारशी ये-जा होत नाही, कारण मग त्यात नाट्य उतरत नाही. सरळपणात कसलं नाट्य? नाट्य निर्माण होतं ते, जे शक्य नाही तिथून एक्झिट घेतलेल्या पात्राने, अशक्य कोटीतील वाटणाऱ्या विंगेत घेतलेल्या एन्ट्री मुळे. रंगमंचावरची पात्र स्टेजवरच्या या अनेक विंगांतून प्रवेश करत असतात आणि कथेच्या मागणी प्रमाणे अनेक विंगांतून एक्झीट घेत असतात. जसजसा नाटकाचा क्लायमॅक्स जवळ येतो, तसतश्या पात्रांच्या हालचाली वेगवान आणि अतर्क्य होत जातात आणि संवाद विचित्र होत जातात. प्रेक्षकांची मती गुंगवून टाकणे हाच उद्देश असल्याने, असं करणं आवश्यक असतं. त्याशिवाय प्रेक्षक दिक्-मूढ कसा होईल?

निवडणुक नाट्याच्या पार्श्वभुमीवर अशीच काही पात्र आता विविध वेश पालटून किंवा रुप बदलून विविध विंगांतून ये जा करु लागली आहेत. काही लेफ्टच्या विंगांतून बाहेर पडतायत, काही तरी अगम्य तत्वाची बडबड करत राईटच्या विंगेत शिरतायत, तर काही नेमकं उलट करतायत. गंम्Iमत म्हणजे सर्व विंगा मागच्या रंगपटात उघडतात आणि तिथे मात्र राईट, लेफ्ट, समोररचे, मागचे (पिछडलेले) असे सर्वच एकत्र येऊन चा-बिस्कीटावर ताव मारत, सिग्रेटी फुंकत ‘काय यार साॅलिड रोल केला, अगदी खरं वाटावं असा’ असं एकमेकांना म्हणत एकमेकांची पाठ थोपटत बसलेले असतात. प्रेक्षक मात्र, फार्सातल्या ज्या ज्या पात्राच्या बाजूने उभे राहीलेले असतात, ते आपापसात फुकाचा वितंडवाद घालत बसलेले असतात..

असंच काहीसं सध्या विलेक्शनच्या फार्स-कम-नाट्यात चाललेलं आहे. आपण विचार करु नये, फक्त टाळ्या पिटाव्यात, जमल्यास मध्यमवर्गीय अवघडलेपण बाजूला ठेवून शिट्या माराव्यात किंवा पिवळे, भगवे, हिरवे इत्यादी विविध रंगांचे रुमाल (मनातल्या मनात)उडवावेत एवढाच प्रेक्षकांचा (पक्षी: मतदारांचा) रोल.

लोकशाही नाट्य चिरायू होवो.

झमुरे, बजाओ ताली..!

– नितीन साळुंखे

‪9321811091‬

२०. ०३. २०१९

फोटो सौजन्य- इंटरनेट

शेवटचा राजयोगी गेला..

शेवटचा राजयोगी गेला..

काल मनोहर पर्रीकर गेले. उभा देश हळहळला. ते ज्या पक्षाचे नेते होते, त्या पक्षाला पर्रीकरांचं जाणं म्हणजे ‘पक्षा’चं मोठं नुकसान झालं असं वाटणं अगदी सहाजिक आहे. ते ज्या पक्षांचे नव्हते, त्यांना ‘राजकारणा’चं मोठं नुकसान झाल्यासारखं वाटलं. त्याहीपेक्षा अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, ज्यांचा राजकारणाशी फक्त निवडणुकांपुरताच संबंध येतो, अशा करोडो सामान्य लोकांना पर्रीकरांचं जाणं म्हणजे ‘देशा’चं नुकसान झालं असं वाटलं. सामान्यजणांचं ह हळहळणं ‘राजकीय’ नव्हतं, तर मनापासूनचं होतं, हे जाणवत होतं..! एक अटलजींचा अलिकडचाच अपवाद सोडला तर, सामान्य जनतेला असं वाटणं, ही सध्याच्या गढुळलेल्या वातावरणात काहीशी आश्चर्याचीच बाब..!!

तसं पाहायला गेलं तर, मनोहर पर्रीकर काही राष्ट्रीय राजकारणात नव्हते. केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी पार पाडलेली अल्पकाळाची जबाबदारी वगळता, त्यांची संपूर्ण कारकीर्द गोव्यापुरतीच मर्यादीत होती. लोकसभेच्या अवघ्या दोन जागा असलेलं, गोवा देशातील सर्वाच लहान राज्य. असं असुनही या लहानश्या राज्यातलं एक व्यक्तिमत्व अखील भारतीय का होतं, त्यांच्या जाण्याने अख्खा देश का हळहळतो, असं काय वेगळेपण होतं या माणसात, याचा विचार करता, हाती लागतं ते एक कारण आणि ते म्हणजे त्यांचा साधेपणा आणि रोजच्या जगण्यातला सहजपणा. मला वाटतं, हा साधा-सहजपणाच या देशातील लोकांना जास्त भावला असावा आणि म्हणून ते देशाच्या राजकारणात नसूनही साऱ्या देशाचे झाले..! हे भाग्य देशाच्या राजकारणात तप्त सूर्याप्रमाणे तळपणाऱ्यांना लाभेल की नाही ते खात्रीलायकरित्या सांगता येत नाही..!

भारतीय जनमाणसाच्या मनाला साधेपणा प्रचंड भावतो. त्यातही उच्च पदावर आरुढ झालेल्या कोणाही व्यक्तिमत्वाचा वागण्या-बोलण्यातला साधेपणा, त्या व्यक्तीचा आपल्याशी संबंध येवो वा न येवो, अखिल भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या कोणत्याही माणसाच्या मनाचा ठाव घेतो. उच्च विचारसरणी असुनही साधी राहाणी असलेले गांधीजी म्हणूनच सर्व देशाचे झाले असावेत. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकांच्या मनात किंतू-परंतु असले असतील, परंतु त्यांचं ‘नंगा फकीर’ असणं सर्वच जनतेला भावलं होतं. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर वर्षातल्या काही काळातले नेते जनतेला आपले वाटत, त्या मागचं कारणही बहुतेक हेच असावं. ते सर्वच नेते साधा झब्बा-लेंगा, शबनम बॅग, साधी चप्पल आणि सार्वजनीक वाहनांनी फिरणारे असत.

आपल्यालारखेच कपडे घालणारा, आपल्यासारखाच टपरीवर चहा कटींग चहा पिणारा, आपल्यालारखाच हसणारा-बोलणारा-वागणारा कुणीही नेता सामान्य जनतेला आपला वाटतो. पर्रीकरांचं वेगळेपण होतं ते इथेच..! साधा अर्ध्या बाह्याचा बुशकोट, साधीच पॅंट, एकवादी चप्पल आणि बुलंद भारत की बुलंद तसवीर असणाऱ्या ‘हमारा बजाज’ वरुन फिरणारे पर्रीकर जनतेला, सर्व जनतेशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध न येताही, तिचे स्वत:चे वाटले, ते त्यामुळेच असावेत..! विशेषत: रोज सकाळ-संध्याकाळ वेगवेगळ्या, महागड्या जाकीट-कोटात दिसणाऱ्या आणि रणगाड्यांसमान फाॅर्च्युनर गाड्यांतून, मटणाची चालती बोलती दुकानं वाटावीत अशा बाॅक्सर्सच्या गराड्याच सदोतीत वावरणाऱ्या, वर स्वत:ला ‘सेवक’ आणि ‘फकीर’ म्हणवणाऱ्या नेत्यांच्या आणि किरकोळ कार्यकर्त्यांच्याही पार्श्वभुमीवर मनोहर जनतेला मनोहारी वाटले असावेत. काल ज्यांनी ज्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्या सर्वांच्या बोलण्यात पर्रीकरांचा साधेपणा हा एकमेंव समान मुद्दा होता..!!

मी पूर्वी जेंव्हा ‘जन्मकुंडली’ पाहायचो, तेंव्हा अनेकजण माझ्याकडे कुंडली पाहायला यायचे. त्यातील अनेकजणांचा प्रश्न ‘मला राजयोग आहे का’ असा असायचा. त्यांना तसं कुणा ज्योतिषांने पूर्वी सांगितलेलं असायचं, असं त्यांचं म्हणणं असायचं. मी त्यांना ‘राजयोग’ म्हणजे त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, असं विचारायचो. त्यावर त्यांचं उत्तर असायचं राजासारखं ऐश्वर्य..!

आपली गफलत होते ती इथेच. शब्द नीट लक्षात न घेतल्याने. ‘राजयोग’ या शब्दातला पहिला ‘राज’ हा शब्द सर्वांच्या चटकन लक्षात येतो, पण दुसऱ्या ‘योगी’ या शब्दाकडे सर्वांचंच दुर्लक्ष होतं. आपल्या भारतीय संस्कृतीत राजा हा योग्यासारखा वागावा हे अपेक्षित असतं. आधुनिक शब्दांत सांगायचं तर तो ‘ट्रस्टी’ असतो. सर्व संपत्ती ही प्रजेची असून मी तिचा रखवालदार (चौकीदार हा शब्द मी मुद्दाम टाळलाय) आहे, असा त्याचा अर्थ. योगी या शब्दाचं हिन्दीत जोगी होतो. म्हणजे संन्यासी. मला वाटतं पर्रीकर असे राजयोगी होते. गोव्याचे तीन-चारवेळा मुख्यमंत्री, काही काळ देशाचे संरक्षण मंत्री ह्या ‘राजा’सम पदांवर असुनही ते सदैव वावरले ते एखाद्या ‘योग्या’च्या भुमिकेत. सत्ता-संपत्तीचा त्यांनी स्वत:च्या अर्ध्या बाह्यांना विटाळ होऊ दिला नाही, असं त्यांच्या विषयी सर्वच जे म्हणतायत, त्यावरून निष्कर्ष काढता येतो. नेत्या-जनतेसकटचे पर्रीकरांविषयी काढले गेलेले उद्गार ‘गेलेल्या विषयी वाईट बोलू नये’ या प्रकारचे नक्कीच नव्हते. ते अंत:करणापासूनचं विव्हळणं होतं. असं विव्हळायला लावणारे मनोहर पर्रिकर शेवटचे. राजयोग म्हणतात तो हा..! त्यासाठी भगवी वस्र परिधान करुन देखावा करायची आवश्यकता नसते.

संरक्षण पर्रीकर संरक्षण मंत्र्यांच्या भुमिकेत असताना सर्जिकल स्ट्राईक झाला. त्याचं भांडवल त्यांच्याच पक्षाचे नेते करत असताना, संरक्षण मंत्री असलेले पर्रीकर मात्र ‘मी माझं कर्तव्य केलं’ याच भावनेने निर्लेपपणे वावरत होते. तेंव्हा मला ते ‘संन्यस्त योद्ध्या’सारखे वाटले होते. त्यातही त्यांनी त्यांचं संन्यसत्व सोडलं नाही. हा त्यांचा अभिनिवेश नव्हता, तर अगदी सहज म्हणावा असा अंगभूतपणा होता..!

सध्याच्या ‘सेवक’ आणि ‘योगी’शब्दांतून, त्या शब्दांत अपेक्षित असलेल्या नम्र सौम्यपणापेक्षा आक्रमक आक्रस्ताळेपणाच उठून दिसणाऱ्या राजकीय पार्श्वभुमीवर, मनोहर पर्रीकरांचा साधे-सौम्यपणा उठून दिसतो, तो ते राजयोगीपणा जगल्यामुळेच..!!

शेवटचा राजयोगी गेला..!

-©️नितीन साळुंखे

9321811091

18.03.2019

पागडी..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा- लेखांक ३४ वा

पागडी..

‘पागडी’ हा शब्द घरासंदर्भात वापरला जातो. मुंबईकरांच्या अतियंत जिव्हाळ्याचा असलेला हा शब्द, हल्लीच्या पुनर्विकास आणि त्यातून मिळणाऱ्या ओनरशिप घरांच्या काळात हळुहळू विस्मृतीत चाललाय. पण एकेकाळी मुंबईत कुठेही घर घ्यायचे असलं, की ते पागडीनेच मिळायचं. आजची वैभवशाली मुंबई घडवलीय, ती अशाच पागडीच्या घरात राहून क

ष्ट करणाऱ्या मुंबईकरांना. या अर्थाने ‘पागडी’ या शब्दाशिवाय मुंबईचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

‘पागडी’ची घरं म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचं तर भाड्याने घेतलेलं घर. घर मालक किंवा चाळमालक कुणीतरी एक असायचा व तो गरजुंना त्याच्या मालकीच्या जागेवरची किंवा चाळीतली घरं भाड्याने द्यायचा. मालक कायम असायचा, भाडेकरू बदलत असायचे. तेंव्हा मालकीची घरं ही संकल्पना नसायची, कारण त्या काळात मुंबईत माणसं यायची, ती फक्त रोजगारापुरती. ती ही बहुतेक सर्व एकटी. कुटुंबं गांवाकडेच असायची. दिवसभर गिरणीत नाही तर गोदीत राबायचं आणि रात्री पाठ टेकायला घरी यायचं. महिन्याचा पगार झाला, की आपल्या खर्चापुरते पैसे बाजुला काढून उर्वरीत सर्व रक्कम कोकणातल्या किंवा घाटावरच्या गावातल्या आपल्या कुटुंबाकडे मनीआॅर्डरने पाठवून द्यायची, हा बहुतेकांचा जीवनक्रम.

रिटायर झालं की आपल्या गांवी परत जायचं, आपण काही मुंबईचे कायमचे रहिवासी नव्हेत, या उद्देशाने त्याकाळचे बहुतेकजण मुंबईत नोकरी करत असल्याने, त्यांना मुंबईत स्वत:च्या मालकीचं घरं नको असायचं आणि त्यामुळेच पागडीच्या घरात राहायचं, अशी सर्व व्यवस्था असे. सरकारी फाॅर्म्सवरही याच उद्देशाने ‘सध्याचा पत्ता’ आणि ‘कायमचा पत्ता’ असे दोन स्वतंत्र रकाने पत्त्यांसाठी असत, ते याच मतलबाने. अजुनही हे रकाने असेच असलेले पाहायला मिळतात.

या सर्व नोकरदारांना चाकरमानी म्हणायचे. पण मुंबंई हा असा एक पिंजरा आहे, की ज्यात एकदा आत शिरलेला माणूस बाहेर म्हणून काही पडू शकायचा नाही. आपल्याला काही या पिंजऱ्यातून बाहेर पडायला जमत नाही हे लंक्षात आल्यावर, मग जमेल तसं आपलं कुटुंबही मुंबईत आणायचं आणि मुंबईत पागडीच्या घरात राहून कायमचं मुंबईकर व्हायचं, असा जणू त्याकाळच्या लोकांचा शिरस्ताच झाला होता..!

मी ही असाच अंधेरीच्या एका बैठ्या चाळीतील पागडीच्या खोलीत राहायचो. तेंव्हा ‘घरं’ नसायची, ‘खोल्या’ असायच्या, पण त्यांना लांबी-रुंदी व खोलीही फारशी नसायची. वडील नोकरी करायचे व त्यांनी ही खोली पागडीने घेतलेली होती. ४ हजार रुपये पागडी आणि १०-१२ रुपये महिन्याचं भाडं. ‘पागडी’ हा शब्द तेंव्हापासूनच माझ्या कानावरुन गेला होता व मला त्याचं कुतुहलही वाटायचं. पुढे जरा कळता झाल्यावर ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय असावा, हा विचार मनात यायचा, परंतु तो तेवढ्यापुरताच. पुढे जीवनचक्रात अडकल्यावर ह्या शब्दाचा विचार थोडा मागे पडला, तरी विस्मृतीत गेला नव्हता. अधुन-मधून कारणपरत्वे हा शब्द माझ्यासमोर येऊन मला त्रास द्यायचा. मी ही अनेकांना विचारुन, पुस्तकांतून, शब्दकोशांतून शोधुनही मला त्याचा मला पटेल असा अर्थ काही सापडत नव्हता..!

असंच एकदा मुंबईवरील जुनी पुस्तकं वाचताना, ‘पागडी’ हा शब्द कुठून आला असेल याचा मला एक धागा सापडला. माझ्या मनाने कौल दिला, की इथेच पागडी या शब्दाचा जन्म झाला. हा धागा सोळाव्या शतकात मुंबईत अस्तित्वात असलेल्या पोर्तुगीज सत्तेच्या व नंतरच्या ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या चलनाकडे ‘पागडी’चा जन्मदाता म्हणून बोट दाखवतो. ‘पागडी’ शब्द कसा अस्तित्वात आला असावा, हे समजण्यासाठी आपल्याला प्रथम पोर्तुगीज व नंतरच्या ब्रिटिश भारतातील चलनाचा धावता आढावा घ्यावा लागणार हे ओघानेच येतं.

इसवी सन १५३० पासून पोर्तुगीजांचा अंमल मुंबईवर सुरु झाला होता. पण पोर्तुगीजांचं मुख्य ठाणं होतं वसई आणि मुंबई हा भाग त्याच्या दृष्टीने दुय्यम होता. तशी ही बेटं होतीही ओसाड. म्हणून मुंबईतल्या जमीनी पोर्तुगीज शासन कर्त्यांनी त्यांच्या देशातल्या बड्या लोकांना भाडेपट्ट्यांने दिल्या होत्या. अशा लोकातलाच एक होता मेस्टी डायगो (Meste Diago-काही ठिकाणी हे नांव Mestre Diago असंही नोंदवल्याचं दिसतं. त्यातील Mestre किंवा Meste हे इंग्रजी Mister सारखं संबोधन असावं आणि डायगो हे नांव असावं). ह्या डायगोला दिलेल्या जमीनीचं भाडं होतं वर्षाला १४३२.५ पारडो(Pardaos). पोर्तुगीज़ अंमलाखाली असलेल्या पश्चिम किनार्‍याच्या भागत १६व्या शतकात, Fedea-Fuddea, Tanga, Pardao इत्यादी नावाची नाणी the वापरात होती. Fedea हे सर्वात लहान चलन. ह्याचाच मराठी अपभ्रंश पुढे ‘फद्या’ असा झाला. फद्या हा शब्द माझ्या वयाच्या लोकांनी लहानपणी कुठे न कुठे ऐकला असेल, त्याचा उगम अशा रितीने पोर्तुगीज काळातील चलनात सापडतो. ‘फद्या’ हे पोर्तुगीजकाळातील दुय्यम चलन असल्याने, हा शब्द एखाद्याच्या कमकुवतपणाची टिंगल करण्यासाठी देखील वापरला जातो.

‘Fedea’च्या थोडं वरच्या दर्जाचं चलन म्हणजे ‘Tanga’ किंवा ‘Tanka’. ह्याचा मराठीतला उच्चार साधारण ‘टांगा’ किंवा ‘टॅंगा’ किंवा ‘टंका’ असा होतो. हाच शब्द पुढे अपभ्रंशीत होऊन ‘टका’ किंवा ‘टका’ म्हणून रुढ झाला. (संजय पवारांचं एक नाटक होतं, ‘कोण म्हणतो टका दिला’ या नांवाचं. त्यातला ‘टका’ बहुतेक हाच असावा. मराठीतला ‘टक्का’ किंवा ‘टक्के’ हा प्रतिशत या अर्थाचा शब्दही बहुतेक याच्याच पोटातून जन्मला असावा, कारण हे चलन पोर्तुगीजांच्या काही काळ अगोदर गुजरातेत प्रचलीत होतं व याची किंमत साधारणत: नंतरच्या काळातल्या रुपयांचा एक भाग, म्हणजे १/१०० एवढी होती.). चार fedea म्हणजे एक tanka आणि पांच ‘टका’ म्हणजे पोर्तुगीज चलनातला एक ‘पारडो (Pardao)’ किंवा २० fedea म्हणजे एक pardao असंही म्हणता येईल.

मुंबई बेटांवरील पोर्तगीजांची सत्ता १६६१ साली संपुष्टात येऊन, सन १६६५ पासून ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीची सत्ता मुंबई बेटांवर आली. तत्पूर्वी ईस्ट इंडीया कंपनीचं अस्तित्व दक्षिणेतल्या राज्यांमधे होतं आणि दक्षिणेत असलेल्या भारतीय राजसत्तांचं काही चलन ब्रिटीशही वापरत असत.

ईस्ट इंडीया कंपनीची मुंबईवर सत्ता आल्यावर काही पोर्तुगीज मुंबईत वास्तव्याला होते. त्यांना पोर्तुगीज राज्यकर्त्यांकडून लिजवर मिळालेल्या जमीनीही त्यांच्या ताब्यात होत्या. फक्त आता त्यांना ईस्ट इंडीया कंपनीला त्यांच्या चलनात भाडं द्यावं लागत असे. आणि त्या पैकी एक चलन होतं Pagoda. दक्षिणेतल्या मद्रास प्रांतातलं हे चलन, १७ व्या शतकाच्या मध्यावर मुंबईतही अस्तित्वत होतं, असं अनुमान ‘मुंबईचा वृत्तांत’ ह्या पुस्तकातल्या माहितीवरून काढता येतं. पोर्तुगीज चलनातले साधारणत: ३.५ पारडो म्हणजे ब्रिटीश काळातील १ पॅगोडा, अशी याची किंमत होती.

ज्या पोर्तुगीजांना, पोर्तुगीज मुंबईत ‘पाराडो’मधे जमीनीचं भाडं भरावं लागत हथं, त्या पोर्तुगीजांना आता ब्रिटीश मुंबईत ‘पॅगोडा’मधे जमीनीचं भाडं भरावं लागत होतं. जमीन अमुक अमुक ‘पॅगोडा’ भाड्याने घेतली किंवा दिली, असं तेंव्हा बोली भाषेत बोललं जात असणं शक्य आहे. पुढे पुढे कालौघात, ‘भाड्याने’ हा शब्द लयाला जाऊन, जमीन ‘पॅगोडा’ने घेतली असं त्याचं रुपांतर झालं असाव. ‘भाडे’ या शब्दाला ‘पॅगोडा’ हा समानार्थ शब्द प्राप्त झाला असावा व पुढे तो ‘पागडी’ म्हणून स्थिर झाला असावा, असं अनुमान बांधलं तर चुकीचं ठरू नये, कारण ‘पागडी’ या शब्दाची समाधानकारक व्युत्पत्ती मला अद्याप कुठेही मिळालेली नाही.

पुढे पोर्तुगीज गेले, ब्रिटीशही गेले, त्यांची जुनी चलनंही गेली, पण त्याकाळातल्या ‘पॅगोडा’या चलनाचे अवशेष ‘पागडी’ या शब्दांच्या रुपात मागे उरले, असं माझं मत आहे. ’पागडी’ची जागा म्हणजे ‘भाड्या’ची जागा हा त्या काळातला अर्थ आजही बदललेला नाही.

-©️नितीन साळुंखे

9321811091

13.03.2019

संदर्भ\टिपा-

1. चलनाच्या विनिमयाचा दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो. सबब, इथे दिलेला दर केवळ माहितीसाठी दिलेला आहे. त्या काळातली चलनं माहित असावी व त्यांचा एकमेकांशी कसा संबंध होता, हे दाखवण हा मर्यादित हेतू इथे आहे.

2. ज्यांना जुन्या काळातल्या चलनाबद्दल अधिक माहिती हवी आहे, त्यांनी http://www.aisiakshare.com/node/1068 या वेबसाईटवरील श्री. अरविंद कोल्हटकर यांचा दिनांक २४.०७.२०१२ रोजीचा लेख अवश्य वाचावा.

3. Pagoda या चलनाविषयी अधिकच्या माहितीसाठी https://en.m.wikipedia.org/wiki/Pagoda_(coin) या वेबसाईटला भेट देऊन, त्या साईटवर दिलेले संदर्भ अवश्य अभ्यासावेत.

4. Bombay in the msking (1661-1725)- लेखक फिरोज मलबारी.

5. मुंबईचा वृत्तांत- लेखक श्री. मोरो विनायक शिंगणे

‘कारगील के वक्त भी ऐसाही हुवा था..’

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

‘कारगील के वक्त भी ऐसाही हुवा था..’

नुकताच अमृतसरला जाऊन आलो. ज्या दिवशी अमृतसरला पोहोचलो, तो दिवस प्रचंड तणावाचा होता, कारण नेमक्या त्याच्या आदल्या दिवशी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातल्या बाळकोट येथे हवाई हल्ला केला होता. आता पाकिस्तान प्रत्युत्तरादाखल काहीतरी करणार, अश्या विचाराने आमच्या गाडीत गंभीर वातावरण होत. सर्वच प्रवाश्यांमध्ये युद्ध होईल किंवा नाही आणि झालाच तर आपलं काय होणार, हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. प्रवाशांमधले बरेचजण आमच्यासारखेच सुवर्ण मंदिर आणि भारत पाकिस्तान सीमेवरच्या अटारी सीमेवरचा बोटिंग रिट्रीट सोहळा पाहण्यासाठी निघालेले होते. त्यात आमच्याच डब्यात भारतीय फौजेतला एक अधिकारी त्याच्या कुटुंबासह सुट्टीच्या प्रवासाला निघालेला. त्याला तात्काळ कर्तव्यावर हजर होण्याचा फोन आल्यामुळे, त्याने आपल्या कुटुंबाला गाझियाबाद्च्या पूर्वीच्या स्टेशनवर उतरवून परत घरी पाठवून दिल्याची बातमी अाली. बातमी अगदी खरी होती, कारण त्यांच्या रिकाम्या झालेल्या सिटांवर बसून आपल्या मुंबईतले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कॅरमपटू नागसेन एटांबे, महेंद्र तांबे व त्यांचा चमू त्या अधिकाऱ्यांसोबत गप्पा मारत आले होते व त्यांनीच आम्हाला ही बातमी सांगितली. बातमी खरीच होती.

पुढे मिरत कॅन्टोनमेंट स्टेशनवर तर वरच्या बातमीला पुष्टी देणारी परिस्थिती होती. आमच्या ट्रेनच्या सशेजारी भारतीय सेनेची एक अक्खी टेन उभी होती. त्या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात लष्करी गणवेशातील जवान होते व प्रत्येक डब्याच्या दारात एकेक जवान सावधानच्या पावित्र्यात बंदूक सरसावून उभा होता. त्या ट्रेनला जोडलेल्या प्रत्येक कॅरेजवर रणगाडे, जिप्सी, मिलिटरी ट्रक्स, चिलखती गाड्या तोफा इत्यादी रण साहित्य निघाले होते. हे पाहून आता कोणत्याही क्षणी युद्ध भडकणार ह्या विषयी, मी सोडून इतरांच्या मनात कोणतीही शंका उरली नाही. मला पहिल्यापासूनच, अगदी पुलवामा हल्ल्यापासूनच, ह्यात काहीतरी वेगळं शिजतंय याची शंका येत होती.

तसं झालंच तर काय करायचं, याची आम्ही चर्चा करू लागलो. आमच्याच डब्यात आमच्या शेजारी एक सरदारजी सहप्रवासी होते. एकटेच होते. आमची चर्चा ऐकून ते हसत होते. पुढे त्यांच्याशी बोलताना, ते जलंदर येथील असून, पेशाने शिक्षक असल्याचं समजलं. ते आमच्या चर्चेत भाग घेत म्हणाले की, “युद्ध-बिध कुछ्छ होणेवाला नही है , इलेक्शन का माहौल है, समझ जाओ । आप बेफिक्र होकर जाईये, दो दिन मे सब शांत हो जायेगा ।”. त्यांचं हे बोलण माझ्या ग्रुपमधल्या इतरांना किती पटलं माहित नाही, पण मला मात्र १०० टक्क्यानी पटलं. हे गृहस्थ पहाटे चारला आपल्या जलंदर कॅन्टोनमेन्ट येथे उतरुन निघून गेले व त्या पुढे काही वेळाने, पहाटे सहा वाजता आम्ही अमृतसरला पायउतार झालो. हाॅटेलवर जाण्यासाठी आम्ही रिक्शात बसलो. रिक्शावाल्यापाशी हाच विषय काढला. त्याचं म्हणणं तर ट्रेनमधल्या त्या सरदार गुरुजींच्या एक पाऊल पुढचं होतं. तो तर म्हणाला की, ह्या नाटकात पाकिस्तानपण सामील असण्याची शक्यता आहे म्हणून. ‘कारगील के वक्त भी ऐसाही हुवा था’ हे त्याचं पुढील वाक्य होतं.

अमृतसर हा सीमावर्ती भाग. इथून पाकिस्तानची सीमा केवळ २०-२५ किलो मिटर दूर. आम्ही पोहोचलो, त्याच दिवशी किंवा त्याच्या एक दिवस अगोदर आपल्या अभिनंदन वर्तमान यांचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदनना पाकिस्तानने आपल्या ताब्यात घेतलं होतं. पेपर-टिव्ही नसल्यामुळे आम्हाला तर ह्या बातमीचा सुगावाही लागला नव्हता. अशा सीमेवरच्या प्रदेशात तर भारत-पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीची केवढी गडद छाया असायला हवी होती. पण तिथे तर त्याचा मागमुसही नव्हता. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. साधा पोलीस पहाराही कुठे नव्हता. युद्ध किंवा युद्धसदृष स्थिती कुठेही नव्हती..! भारत-पाकिस्तानात निर्माण झालेला तणाव ‘नाटकी’ आहे, यावरील माझा संशय आता गडद होत चालला होता. आम्ही अटारी सीमेवर गेलो होतो, त्याच्या दुसऱ्याच दिवशी विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने विनाअट भारताच्या स्वाधीन केलं. अभिनंदन परत आले हे चांगलंच झालं तरी, राजनैतीक दबाव वैगेरे ठिक आहे, पण आपलं विमान पाडणाऱ्या शत्रुराष्ट्राच्या सैन्य अधिकाऱ्याला हे असं विना अट त्या देशाच्या स्वाधीन करणं, हे मला कसाही आणि कितीही विचार केला तरी पटत नव्हतं. अमृतसरच्या सरदारजी रिक्शावाल्याचं म्हणणं माझ्या कानात गुंजत होतं.

त्याच दिवशीच्या संध्याकाळी आम्ही अमृतसरपासून २०-२५ किलो मिटर दूर असलेल्या अटारी-वाघा बाॅर्डरवर ‘बिटिंग रिट्रीट’ सोहळा पाहायला पोहोचलो. तिथेही नेहेमीच्याच उत्साहात सर्व सुरू होतं. दोन्ही बाजुचे प्रेक्षक आपापल्या देशभक्तीपर गाण्यांवर बेभान होऊन नाचत होते. युद्धाचे ढग कुठेही नव्हते. विंग कमांडर अभिनंदन याच दरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात होते. ह्या घटनेचं सावट सीमेवर दिसायला हवं होतं, पण तिथं तर नेहेमीसारखंच उत्सवी वातावरण होतं. मग मात्र माझी खात्रीच पटली, की गेले दोन दिवस उठणाऱ्या युद्धाच्या बातम्या म्हणजे भारताच्या रंगभुमीवर होऊ घातलेल्या निवडणुकांच्या महानाट्याच्या नेपथ्याचा भाग असाव्यात. पुलवामाच्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यामुळे त्या नाट्याला खऱेपणाचा फिल अाला होता.

शत्रुराष्ट्र आपल्यावर हल्ला करणार किंवा आपण शत्रुराष्ट्रावर हल्ला करणार, अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा कृत्रीमरित्या निर्माण केली गेली, की मग देशातील महत्वाचे सर्व प्रश्न बाजूला पडतात आणि देशभक्तीची एक लाट देशवासीयांमधे निर्माण होते आणि मग या लाटेवर स्वार होऊन सत्तेचा सोपान चढणं सोपं होऊन जातं. विकास, जनतेच्या मुलभूत गरजांची सोडवणूक, रोजगार इत्यादी महत्वाचे प्रश्न आपसुकच बाजूला पडतात आणि देशाची सुरंक्षितता हाच एकमेंव मुद्दा उरतो. देशाच्या सरहद्दींचं आणि देशवासियांचं शत्रुपासून संरक्षण करण्याचं प्रत्येक सरकारचं घटनादत्त कर्तव्यच असतं, त्याचा बाऊ करायचं काही कारण नाही. आता जे काही एअर स्ट्राईकच्या निमित्ताने सुरू आहे, एअर स्ट्राईक आणि पुलवामा यांचं जे प्रचारी भांडवल करुन मतं खेचायचा जो काही हीन प्रयत्न सुरू आहे, तो निखालस आक्षेपार्ह आहे. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान, पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून हा मार्ग हमखास अवलंबला जातो. किंबहूना भारत आणि भारतातील हिंदू यांच्याविषयी पराकोटीचा वैरभाव पाकिस्तानवासीयांच्या मनात पैदा करायचाआणि त्या जोरावर आपली सत्ता शाबूत ठेवायची, हा प्रकार पाकिस्तानातील प्रत्येक सरकार, मुलकी असो वा लष्करी, आजवर करत आलं आहे आले आहे.

२०१४ साली ‘सबका साथ, सबका विकास’चा मंत्र जपत व त्यातून येणाऱ्या ‘अच्छे दिन’चं आमिष दाखवत पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेल्या एनडीए सरकारचं विरासाचं गणीत अपूर्ण राहिलंय किंवा चुकलंय, याची खात्री पटल्यामुळे आता पाकिस्तानचा बागुलबुवा, मुसलमान आणि देशभक्ती यांची सांगड घालून पाकिस्तानसारखाच प्रकार आपल्याकडेही सुरू झालाय की काय, ह्याची मला वरील प्रकार पाहून शंका येते.

आजच निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं. भाजपाच्या दिल्लीस्थित मुख्यालयासमोर भाजपच्या एका कार्यकर्त्याला अॅकर प्रश्न विचारत होता, की यंदा तुमच्या प्रचाराचा केंद्रबिंदू काय असणार म्हणून. त्या कार्यकर्त्याचं उत्तर होतं, देशाची सुरक्षा आणि राष्ट्रवाद हा आमच्या प्रचाराचा केंद्रबिंदू असणार..! हे ऐकून देशभक्ती, पाकिस्तान, राम मंदिर आणि यांच्यात समान असलेला मुसलमान हा दुवा लक्षात घेऊन आणि त्यांची आभासी ढाल उभी करुन देशात सत्तेसाठी पुढच्या दोन-अडीच महिन्यात काय काय अघटीत घडेल किंवा घडवून आणलं जाईल, या शंकेने मन भयभीत झालय..!!

अमृतसरच्या त्या सामान्य, परंतु माझ्यापेक्षा चार पावसाळे, ते ही सीमेवरचे, अधिक अनुभवलेल्या बुजुर्ग ‘कारगील के वक्त भी ऐसाही हुवा था’ हे रिक्शावाल्याचं म्हणणं मला पटत चाललं आहे..!

-©️नितीन साळुंखे

9321811091

10.03.2019

चित्र – इंटरनेट

सावित्रीच्या आजच्या लेकी..

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने..

सावित्रीच्या आजच्या लेकी..

आजच्या स्त्रिया शिकल्या, सावरल्या, देश चालवत्या झाल्या, परंतु धर्म-प्रथा-परंपरांमधलं स्त्रियांवर अन्यायकारक वाटणारं, कालबाह्य झालेली जोखडं त्या आजही पूर्णपणे फेकून देऊ शकल्या आहेत, असं ठामपणे म्हणता येत नाही. धर्म-प्रथा-परंपरांच्या नांवाखाली स्त्रियांचं दमन आजही सुरू आहे. आणि आपलं हे दमन पाप-पुण्याच्या नांवाखाली स्त्रिया आनंदाने (की मुकाट्याने !) सहन करतात, हेच मला न पटण्यासारखं आहे. असं करणारात अशिक्षित-सुशिक्षित अशा सर्व थरातल्या स्त्रिया असलेल्या आढळून येतात. पुन्हा या अन्यायकारक प्रथा-परंपरांचं समर्थन स्त्रिया मोठ्या हिरीरीने करताना दिसतात.

उदाहरणच द्यायचं तर नुकत्याच घडून गेलेल्या शबरीमला प्रकरणाचं देता येईल. केरळातील हरिहराच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही, ही प्रथा गेली अनेक शतकं सुरू आहे. ही प्रथा जेंव्हा केंव्हा सुरू झाली, तेंव्हाच्या काळातील समजुतीप्रमाणे कदाचित तेंव्हा ती बरोबर असेलही, परंतु आता त्या समजुती कालबाह्य ठरल्या असुनही अजून त्यांच्या नांवाखाली तेंव्हा सुरू झालेल्या प्रथा सुरूच आहेत. त्यापैकी ही एक. देवाच्या आणि प्रथा-परंपरांच्या नांवाखाली स्त्रियांना मंदिर प्रवेश निषिद्ध ही गोष्टच आजच्या समानतेच्या समाजात, समाजाच्या अर्धांगावर अन्याय करणारी आहे, हे कुणाला पटेल न पटेल, पण स्त्रियांना मात्र ते पटायला हवं. परंतु ह्या प्रथेच्या विरोधात जेंव्हा न्यायालयाने निर्णय दिला, तेंव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाच्या विरोधात स्त्रियाही मैदानात उतरलेल्या पाहून मला तर आश्चर्यच वाटलं होतं. ह्यात सुशिक्षित-अर्धशिक्षित-अशिक्षित तशाच, शहरी व ग्रामीण भागातील स्त्रियाही होत्या. केरळात तर शिक्षणातं प्रमाण १०० टक्के आहे असं म्हणतात. असं असताना, शिकल्या-सवरल्या स्त्रियांचं हे वागणं मला विपरीत वाटलं..!

शबरीमला हे एक उदाहरण झालं. स्त्रीला दुय्यमत्व देणाऱ्या अशा अनेक प्रथा-परंपरा सांगता येतील. मी असं का म्हणतो, ते सांगतो. एके काली भारतात स्त्रियांनी शिकणं निषिद्ध मानला गेलं होतं. त्याकाळच्या चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेत तर क्षुद्र समजल्या जाणाऱ्या वर्गात तर कुणालाही शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा काळात त्या अन्यायकारक प्रथा-परंपरांच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या. १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करण्यात आली होती. जेव्हा ही शाळा सुरु केली, तेंव्हा त्या काळच्या समाजव्यवस्थेने संताप व्यक्त केला. सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांच्यावर शेण टाकणे, चिखल फ़ेकणे, अचकट-विचकट भाषेचा वापर करणे, निंदानालस्ती करणे असे अनेक प्रकार सुरु होते. परंतू सावित्रीबाई फ़ुले अशा अनेक अडचणी आणि संकटांना त्यांनी भीक घातली नाही. कारण जे कार्य त्यांनी हाती घेतले ते भारतातील महिलांसाठी उज्वल भविष्य निर्माण करणारे होते .त्याकाळी स्त्रीयांना अजिबातच स्वातंत्र नव्हते. स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप आहे असे समजले जात असे. या अन्यायकारक समजुती/प्रथांविरुद्ध श्री व सौ फुले उभे राहिले. मुलींसाठी शिक्षण प्रसार करुनच हे दांपत्य थांबलं नाही, तर समाजातील विधवाविवाह, केशवपन, सहगमन इत्यादी त्या काळच्या स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या प्रथाविरुद्धही ते ठामपणे उभे राहिले. हेच कार्य भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वेंनीही पुढे चालवलं. या व अशा महान समाजसुधारकांमुळेच आजच्या स्त्रिया स्वत:च्या पायावर सुशिक्षित, स्वयंसिद्धा होऊन उभ्या राहीलेल्या दिसतात.

जुन्या काळातल्या स्त्रियांवर होणाऱ्या सामाजिक प्रथा-अन्यायाविरुद्ध काही लोक ठामपणे उभे राहिले म्हणून आजच्या स्त्रिया स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करू शकतात, वावरु शकतात. परंतु याच स्त्रिया जेंव्हा शबरीमलासारख्या प्रकरणात किंवा तत्सम जुनाट व अन्यायकारक प्रथांच्या बाजुने उभ्या राहताना दिसतात, तेंव्हा मात्र फुले-कर्वे यांचं त्या काळच्या स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या प्रथा-परंपरांच्या विरोधात उभे राहाण्याचं कार्य व त्यामागचा अर्थ या स्त्रियांना समजलाच नाही की काय, असं वाटू लागतं. स्वत:ला मोठ्या अभिमानाने ‘सावित्रिच्या लेकी’ म्हणवून घेणाऱ्या आजच्या आधुनिक स्त्रिया शिक्षणाने फक्त साक्षर झाल्या, सुशिक्षित व्हायचं मात्र विसरल्या, असं म्हटलं तर चुकू नये. मला वाटतं सावित्रीच्या कार्याचा अर्थ स्त्रियांना केवळ साक्षर करणं एवढाच नव्हता, तर त्यांना त्यांचा त्या त्या काळातील अधिकार मिळवून द्यायचा, असाही होता. हे जर आजच्या स्त्रियांना समजत नसेल, तर मग आजच्या स्त्रियांना स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असं मी समजतो. धर्म-प्रथा-परंपरा आणि आता राजकारणही यांच्या नांवाखाली जेंव्हा जुनाट प्रथा परंपरांचं पालन करण्याची बंधन स्त्रियांवर घालण्यात येतात, त्या त्या वेळी त्या विरुद्ध जेंव्हा आजच्या स्त्रिया उभ्या राहतील, तेंव्हाच त्या सावित्रीच्या लेकी म्हणवून घेण्याच्या पात्रतेच्या ठरतील. सावित्रीच्या कार्याचा तो खऱ्या अर्थाने गौरव झालेला असेल. तो दिवस लवकर उजाड एवढीच ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनी’ माझी अपेक्षा आहे.

-नितीन साळुंखे 
9321811091
08.03.2019