मै भी चौकीदार?

मै भी चौकीदार?

भादूर. आमच्या सोसायटीचा वाॅचमन. त्याचं नांव ‘बहादूर’, पण तो ‘भादूर’ असा उच्चार करतो, म्हणून आम्हाही त्याला भादूरच म्हणतो. नेपाळकडचाच आहे. आडनांव माहित नाही. विचारल्यावर एकदा सांगितलं होतं त्याने, पण त्याचा उच्चार माझ्या कानांना इतका विचित्र वाटला, की ते लक्षात राहूनही माझ्या लक्षात राहीलेलं नाही. पण ते थापा नक्की नव्हतं. बुटकासा, गोरा, गरीब आणि प्रामाणिकही..!

हा आमच्या इमारतीचा वाॅचमन. एकटाच. १२ तासांची रात्रीची ड्युटी. ८ ते ८. सकाळी कामावरुन परत जाताना सोसायटीतल्या गाड्या धुण्याचं काम तो करतो. अर्थात त्याचा पगार त्या त्या गाडीच्या मालकाकडून तो स्वतंत्र घेतो. त्या व्यतिरिक्त सकाळच्या धावपळीच्या वेळात सगळ्याच वाॅचमनना बहुतेक सगळ्याच सोसायट्यात करावी लागणारी कामं, जसं कुणा बाबाचे इस्त्रीचे कपडे आणणे, कुणा शेठला टुथपेस्ट हवी असते, तर कुणा मातेला मीठ इत्यादी कामंही त्याला करावी लागतात. भादूरला या कामांचे स्वतंत्र पैसे मिळत नाहीत. रात्री मात्र वाॅचमनकी व्यत्तिरिक्त भरपूर काम असतं. काही मेंबरांच्या क्वाटर आणायच्या. हे काम त्याला आवडतं, कारण त्यालाही एखादी जीएमची क्वार्टर सुटते त्यातून. सुटते म्हणण्यापेक्षा क्वार्टर आणायला सांगणारेच त्याला, “भादूर तुमको भी लाव.” असं आग्रहाने सांगतात. एकंदरीत क्वाटरभक्त उदारतेत कर्णच..! राष्ट्रीय एकात्मता जशी क्वाटरीत असते, तेवढी कशातच नसते, असं माझं मत आणि अनुभवही..!

भादूरला एक युनिफाॅर्मही आहे. गबाळा, मळलेला, पायात चप्पल वैगेरे. खांद्यावरचे पट्टे सदा ओघळलेले. वाॅचमन बघत असतो, त्याच्याकडे कुणी बघत नसतं. बाकी हा आमचा भादूर तसा हसरा. म्हणजे हा सोसायटीतल्या लोकांना येताना पाहून, त्यांच्याकडे हसत पाहून त्यांना सलाम वैगेरे ठोकतो. पण मेंबरं काही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. वाॅचमनकडे काय बघायचं आणि त्याच्याशी कशाला हसायचं, असे आपले मध्यमवर्गीय कडक इस्त्रीतले विचार. वाॅचमन, रिक्शावाले, वेटर ही काय हसा-बोलायच्या लायकीचे लोक असतात का, असा आपल्या समाजाचा सर्वसाधारण समज. हलकी समजली जाणारी कामं करणारी लोकंही हलकीच असणार, हे साध सरळ अंकगणितीय सूत्र.

मी मात्र त्याच्या हसण्याला हसून प्रतिसाद देतो. कधीतरी त्याच्या सलामला हातही उंचावतो. हा माझा भिडस्त स्वभाव. अर्थात याची किंमतही मला मोजावी लागते. कधीतरी पाच-पन्नास रुपये तो मागतो. परत देण्याच्या बोलीवर. पण ती वेळ कधी येत नाही. मी ही मागत नाही. हा ही माझा भिडस्त स्वभावच..!

अलीकडे मात्र त्याचं वागणं बदललंय. गणवेश त्यातल्या त्यात नीटनेटका होऊ लागला. खांद्यावरच्या पट्ट्या वर गेल्या. टोपीही दिसू लागली. मला आश्चर्य वाटलं. एकदा असंच त्याला विचारलं, “क्या भादूर, आजकल एकदम कडक मे रहता है, क्या बात है? पगार बढा, के बढा के लेना है?”. तो लाजला. म्हणाला, “नै ना साब. वो मै फेस्बूक पे बडा प्रधान को ‘मै भी चौकीदार’ बोलते देखा. अब बडा प्रधान वो ‘भी’ चोकीदार है ऐसा बोलता है, तो उसका इज्जत रखने के लिये अच्छे से रहना तो पडेगा ना? अब हम एक बिरादरी के हुए. वो देश की रखवाली करता है, मै आपके बिल्डींग की. बात तो एक ही है.”

मला समजलं, तो पंतप्रधान नरेन्द्र मोदींविषयी बोलत होता. मी विचारलं, “तू उन्हे बडा प्रधान क्यू बोलता है, वो तो प्रधानमंत्री है ना?”. “पर वो गुजराती है ना. गुजराती लोग उन्हे बडा प्रधान बोलते है” भादूर म्हणाला. गुजरातीत पंतप्रधानांना बडा प्रधान बोलतात हे मला माहित होतं. भादूर पूर्वी गुजरात्यांच्या सोसायटीत काम करत असल्यामुळे त्याच्या तोंडात तोच शब्द बसला होता. गुजराती काही शब्द कसले भारी आहेत. आमदारांना गुजरातीत ‘धारासभ्य’ म्हणतात, असं जेंव्हा पहिल्यांदा ऐकलं, तेंव्हा माझ्या मराठी कानांना, त्यात नेमकं ‘सभ्य’ काय असतं हेच कळेना..!

भादूरला आता त्याला वाॅचमन म्हटलेलं आवडत नाही. त्याला ‘चौकीदार’ म्हणावं असा त्याचा आग्रह आहे. (त्यातही ‘चौ’मधला ‘च’ चहातला, चमच्यातला नाही -किंवा उलटही असेल, आता नीट आठवत नाही- त्यानेच असं सांगितलं. ‘सावन का महीना, पवन करे सोर..’ या गाण्यातला सुनिल दत्त नुतनला समजावतो ना, त्या चालीवर). आता तो मेंबरांची इतर कामं करत असला तरी, मेंबरांच्या क्वाटरी आणायला मात्र तो नकार देतो. विचारलं तर, “न पिऊंगा, न पिने दुंगा” हे उत्तर. ‘न पिऊंगा’ इथपर्यंत ठिक होतं, ‘न पिने दुंगा’ म्हणजे जरा अतीच. पण बहुतेक याला त्या त्या मेंबराच्या गृहमंत्र्यांचा छुपा पाठींबा असावा. बाह्य किंवा अंतर्गत छुपा पाठींबा असल्याशिवाय कुणीही माणूस उघडपणे भलती डेअरींग करत नाही. कुणीही म्हंजे कुणीही..!!

काही दिवस असेच गेले. एक दिवस मला त्याने तक्रार केली. बाजूच्या इमारतीतील ६०२ नंबरच्या फ्लॅटमधील माणसाने स्वत:च्या फेसबुकवर ‘मै भी चौकीदीर’चं प्रोफाईल ठेवलं होतं म्हणे. “साब वो आदमी बहोत पैसा खाता है. दो नंबर का पैसा है सब. त वो भी चौकीदार कैसा?” तो म्हणाला. त्याचा प्रश्न बरोबर होता. स्वार्थाच्या चिखलात नखशिखांत बरबटलेला, तुपाळ चेहेऱ्याचा तो अधिकारपदावरचा माणूस मलाही माहित होता.

मला भादूरचं कौतुक वाटलं. त्याच्या निरिक्षणाबद्दल..! फेसबुकवर स्वत:च्या फोटोसोबत चौकीदाराचं पोस्टर एका भ्रष्टाचाऱ्याने लावलेलं आमच्या प्रामाणिक चौकीदाराला आवडलं नव्हतं.

तो ६०२ मधला माणूस, स्वत:ला ‘मै भी चौकीदार’ म्हणून चौकीदार बडा प्रधानचा अपमान करतो किंवा बडा प्रधानही त्या माणसासारखाच असावा अशी दुसऱ्यांची समजूत करुन देतो, असं त्याचं म्हणणं पडलं. मला ते पटलं.

मी ही माझ्या फेसबुक खात्यातल्या आणि परिचयातल्या, त्या ६०२ टाईप ‘मै भी चौकीदारां’कडे बारकाईने पाहायला आता सुरुवात केलीय.

-©️नितीन साळुंखे

9321811091

२३.०३.२०१९

फोटो-इंटरनेट