गोष्ट आठवणीतली..

गोष्ट आठवणीतली..

एक आटपाट नगर होतं.

तिथे एक राजा राज्य करत होता.

कोणताही राजा असतो, तसा हा राजाही थोडासा चक्रम होता, पण प्रजाहीतदक्ष होता. जगात असलेल्या नसलेल्या सगळ्या गोष्टी, मग त्या उपयोगी असोत वा नसोत, आपल्या राज्यात असाव्यात, असं त्याला वाटे. त्या प्रमाणे तो प्रयत्न करुन आपल्या राज्यात त्या आनणणयाचा प्रयत्न करत असे.

त्याने आणलेल्या गोष्टी प्रजेला आवडतात की नाही, ह्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची एक गुप्त पोलीस यंत्रणा असे.

म्हणजे गुप्त यंत्रणा असं त्या यंत्रणेचं नांव असलं तरी, त्यातले पोलीस सर्वांना माहित असत.

राजाने आणलेल्या सगळ्याच गोष्टी प्रजेला आवडल्या पाहिजेत असा त्या राजाचं म्हणणं नव्हतं.

पण राज्यातल्या त्या उघड असलेल्या गुप्त यंत्रणांचा तसा अलिखित नियम होता.

एके दिवशी त्या राज्यात एक शिंपी येतो.

तो असा तसा शिंपी नव्हता.

त्याच्याकडे खास धागे होते व त्याने तो देवाचे कपडे शिवायचा.

आता देवाचे कपडे शिवले जाणारे धागे आणि ते धागे जवळ असलेला शिंपी म्हणजे भारीच असणार.

राजाची देवावर खुप म्हणजे खुपच श्रद्धा होती. देवाला जो कपडे घालतो, त्या शिंप्याकडून आपणही कपडे शिवायलाच हवेत असं राजाने ठरवलं.

राजाने त्या शिंप्याला आपल्यासाठी कपडे शिवायची आज्ञा केली.

सेम टू सेम देवासारखे कपडे शिवले तर मोठं इनाम द्यायचं कबूल केलं.

शिंप्याने राजासाठी कपडे शिवायचं कबूल केल. पण एक अट घातली की, राजाचे कपडे शिवण्यासाठी त्याला दोन महिन्यांचा समय लागेल आणि तो जे कपडे शिवेल,

ते फक्त राजनिष्ठ लोकांनाच दिसतील.

राजाशी एकनिष्ठ नसनाऱ्यांना ते कपडे दिसणार नाहीत.

राजा खुश झाला.

मनात म्हणाला त्या निमित्ताने राज्यातील आपल्याशी एकनिष्ठ कोण हे कळेल

आणि बेईमान लोक कोण ही शोधता येईल. राजाने शिंप्याला एक खोली दिली आणि कपडे शिवायचं काम सुरू करायला सांगितलं.

शिंप्याने बंद दरवाजाच्या आड काम सुरू केलं. बरेच दिवस कपडे शिवायचं काम सुरू होतं.

बाहेर कापड कापल्याचा, मागावर कापड विणत असल्याचा आवाज यायचा.

राजाची अधिरता वाढू लागली. त्याला देवाच्या धाग्यांची कापडं घालायचे वेध लागले होते.

एक दिवस न राहावून त्याने प्रधानाला त्या शिंप्याकडे जाऊन कपडे शिवायचं काम कुठपर्यंत आलंय, ते पाहायची आज्ञा केली.

प्रधान शिंप्याच्या खोलीत गेला.

शिंप्याने त्याचं स्वागत केलं आणि शिवत असलेले कपडे दाखवू लागला. कपड्यांवरची नक्षी, कशीदा दाखवू लागला.

प्रधान गोंधळला.

त्याला काहीच दिसत नव्हतं.

अचानक त्याला शिंपी म्हणाला होता ते आठवलं शिंपी म्हणला होता की, देवाच्या धाग्याने शिवलेला राजाचा हा पोशाख, फक्त राजनिष्ठ लोकांनाच दिसेल, राजद्रोह्याना दिसणार नाही.

हे आठवताच प्रधानाला अचानक ते कपडे दिसू लागले. कपड्यांवरची नक्षी दिसू लागली.

त्याने कपड्यांची आणि ते शिवणाऱ्या शिंप्याची तारीफ केली आणि तो राजाकडे कपडे कसे झालेयत ते सांगण्यास निघाला.

प्रधान राजाकडे आला आणि त्याने शिंप्याने देवांच्या धाग्याने शिवलेल्या कपड्यांची तोंड भरून स्तुती केली.

राजाची उतकंठा आणखी वाढली.

राजाला आता राहावेना.

दोन दिवसांनी राजा शिंप्याच्या खोलीत जायला निघाला.

शिप्याला राजाची सवारी येत असल्याची आणि पोशाख तयार ठेवण्याच्या आज्ञा सुटल्या.

राजा शिंप्याकडे पोचला.

राजाला खोलीत काहीच दिसेना.

शिंपी मात्र कपड्यावरची डिझाईन राजाला दाखवण्यात मग्न.

राजाला शिंप्याचं म्हणणं आठवलं.

राजद्रोह्याना कपडे दिसणार नाहीत, असं तो म्हणाला होता.

आता आपल्यालाच आपले कपडे दिसत नाहीत, म्हणजे राज्याचा राजाच राज्यद्रोही ठरणार. हे राजाने विचार केला की, हे योग्य दिसणार नाही, आपल्याला कपडे दिसायलाच हवेत.

अचानक राजाला शिंप्याने शिवलेले कपडे दिसू लागले. त्यावरचं नक्काशीकाम दिसू लागलं.

राजा समाधानाने महालात परतला.

काही दिवसांनी पोषाख तयार झाला. देनेक दिवसांत येणाऱ्या राजाच्या वाढदिवसाच्या दिवशी तो राजाने परिधान करायचा असं ठरवलं.

दवंडू पिटवली गेली.

देवाच्या धाग्याने शिवलेले राजवस्त्र ल्यालेला राजा पाहाण्यासाठी सर्व प्रजेला निमंत्रण गेलं. जो राजनिष्ठ असेल, त्यालाच ते दैवी धाग्यांनी विणलेलं वस्त्र दिसेल असंही दवंडीत सांगण्यात आलं.

वाढदिवस आला.

राजाला दैवी धाग्यांनी विणलेला सुरेख पोशाख नेसवण्यात आला. तो पोशाख घातलेल्या राजाची उघड्या रथातून मिरवणून निघाली. राजा अभिमानाने छाती फुलवून सर्वांकडे बघत होता.

राजा नागडा होता.

पण राज्यनिष्ठ असल्याने त्याला अंगावरचं दैवी वस्त्र जाणवत होतं.

राजाच्या उघडपणे गुप्त असलेल्या यंत्रणेलाही राजाचं नागडेपण दिसत होतं, पण ते राजनिष्ठ असल्याने, त्यांनाही नागडा राजा वस्त्र घातलेला दिसत होता.

प्रजा डोळे विस्फारून बघत होती.

राजाला त्या डोळ्यात स्वत:चं कौतुक दिसत होतं.

दोन-चार भोळे प्रजाजन होते, त्यांनी “महाराज आप नंगे हो” असं ओरडून सांगितलं.

काहीजण रथावर सवार झालेल्या नागड्या राजाकडे पाहून फिस्सकन हसले.

गुप्त पोलीसांनी लगेच त्यांना राजद्रोही ठरवून राज्याबाहेर जाण्याची शिक्षा ठोठावली..

देव ठरवलेल्या नागड्या राजाची मिरवणूक पुढे निघाली होती.

नसलेले कपडे दिसणाऱ्या राजनिष्ठांची मतलबी टोळी त्याच्या मागे भक्कमपणे होती.

ह्या टोळीत पुढेपुढे भर पडत चालली होती.

राजाचं नागडेपण दिसणाऱ्या राजद्रोह्यांचा बंदोबस्त करुन त्यांना सीमेपार पाठवण्याच्या आज्ञा सुटल्या होत्या.

राजाला नागडा म्हणायची आता कुणाची बिशाद नव्हती..

प्रजा टाळ्या वाजवीत होती.

राजाच्या नागडेपणाला की स्वत:च्या भाबडेपणाला,

ते मात्र समजत नव्हतं..

ही गोष्ट मी लहानपणी वाचली होती. रेळे गुरुजींच्या २४ पानी गोष्टीच्या पुस्तकात. अंधुकशी आठवत होती. तिचा शेवट मात्र लख्ख आठवत होता. हलकीशी आठवणारी गोष्ट थोडी फुलवून लिहिलीय. तात्पर्य मात्र तेच ठेवलंय.

रोज रोज उपदेश करणारे, टिका करणारे किंवा इतिहास सांगणारे लेख कशाला हवेत, कधीतरी गोष्टही सांगू की, म्हणून लिहिली. अन्य उद्देश काही नाही..!!

-नितीन साळुंखे

9321811091

31.03.2019

टिप-

ही पोस्ट राजकीय नाही. कुणाला ती राजकीय वाटल्यास आणि या गोष्टीतून कुणी काही अर्थ काढलाच, तर ती जबाबदारी माझी नाही..!!