इंद्रजीत खांबे; निराकारातून आकाराकडे..!!

आता नक्की आठवत नाही, पण मार्च महिन्याची २० किंवा २२ तारीख असावी. ‘लोकसत्ते’त ‘कणकवलीच्या छायाचित्रकाराचं जगभरात कौतुक’ ही बातमी पाहिली. कणकवली म्हणजे माझ्या सिंधुदुर्गातलं. गांवची बातमी म्हटली, की मी ती वाचतोच. मी ती बातमी वाचली. कणकवलीतले छायाचित्रकार श्री. इंद्रजीत खांबे यांना ‘अॅपल’ या जगप्रसिद्ध अमेरीकन कंपनीकडून, त्यांच्यासाठी फोटो काढण्यासाठी करारबद्ध केल्याची ती बातमी होती. ‘अॅपलने करारबद्ध केलेले, ते देशातील एकमेंव छायाचित्रकार आहेत’ असाही गौरवोद्गार त्या बातमीत काढलेला होता.

मी कायमस्वरुपी मुंबईत मुक्कामाला असलो तरी, माझं मूळ असलेल्या सिंधुदुर्गातल्या कला जगताशी मी बऱ्यापैकी परिचित आहे. मला मुळातच कलांची आवड असल्याने, एखाद्या कलावंताशी ओळख असणं, हा मी माझा बहुमान समजतो. कला याचा अर्थ माणसाला व्यक्त होण्यास वाव देणारं लेखन, कवीता, चित्र-शिल्प-नाट्य इत्यादी कोणतंही माध्यम. सिंधुदुर्गातल्या अशा बहुतेक क्षेत्रातल्या कलावंतांना मी ओळखतो, पण इंद्रजीत खांबे हे नांव मी प्रथमच ऐकलं होतं आणि ते ही फोटोग्राफी क्षेत्रातलं..!

सिंधुदुर्गात आमचा चारचौघांपेक्षा वेगळा विचार करणारा, ‘आम्ही बॅचलर’ हा एक व्हाट्सअॅप ग्रूप आहे. ‘दै. तरुण भारत’चे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमूख श्री. विजय शेट्टी या कल्पक माणसाच्या डोक्यातून ह्या ग्रुपने जन्म घेतला आहे. या ग्रुपमधले बहुतेक सर्वच सदस्य कुठल्या न कुठल्या क्षेत्रात नांव राखून असलेले आहेत. प्रत्येकाचा पिंड एकमेंकांपासून अगदी भिन्न, मात्र दुसऱ्याच्या विचारांचा आदर करण्याचा स्वभाव मात्र सारखा. या समूहातील बहुसंख्य सदस्य काम-व्यवसायात विविध क्षेत्रात असले तरी कलागताशी नजिकचा संबंध ठेवून असणारे. म्हणून मी या समूहात ‘इंद्रजीत खांबे कोण’ अशी चवकशी केली. दुसऱ्या क्षणाला अॅडव्होकेट विलास परबांनी इंद्रजीत खांबेंची माहिती व खांबेंचा नंबर पोस्ट केला. इकडे त्याच ग्रुपातला, परंतु माझा जुना दोस्त बाळू मेस्त्रीने मला माझ्या वैयक्तिक नंबरवर इंद्रजीत खांबेंचा नंबर पाठवला. मी या ग्रुपवर इंद्रदीतना भेटायची इच्छा व्यक्त केली. अशाच स्वरुपाची इच्छा आमच्या ग्रुपमधील इतरांनीही व्यक्त केली आणि पुढच्या काही वेळातच अॅड. विलास परब आणि श्री. विदय शेट्टीनी, कणकवलीत विजय सावंतांच्या घरात १४ एप्रिलला इंद्रजीत खांबेंसोबत आमच्या गप्पा गोष्टींचा एक लहानसा कार्यक्रम आयोजित केला. आमच्या ग्रुपमधल्या अनेकांना या कार्यक्रमाला येण्याची इच्छा होती, पण त्यांच्या त्यांच्या काही अडचणींमुळे ते येऊ शकले नाहीत. शेवटी आम्ही पाच-सहाजण या कार्यक्रमास गेलो.

इंद्रजीत खांबे त्यांच्या पत्नीसह आले होते. इंद्रजीतशी गप्पांची सुरुवात झाली आणि उलगडत गेला इंद्रजीतचा सिंधुदुर्गातल्या केशरी आंब्यापासून सुरू झालेला लालबूंद अमेरीकन ‘अॅपल’ पर्यंतचा प्रवास..

कला जन्म घेते, ती मनाच्या अस्वस्थ अवस्थेत. इंद्रजीतची फोटोग्राफीची सुरुवातही अशीच अस्वस्थतेतून झाली. इंद्रजीतचा स्वत:चा व्यवसाय होता. चार पाच माणसं त्याच्या हाताखाली काम करत होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर, चांगलं बस्तान असलेला व्यवसाय असुनही, काही तरी वेगळं करायची उर्मी अधून-मधून त्याच्या मनात उसळी मारायची, पण ती तेवढ्यापुरतीच. पुढे पुढे ही उसळी त्याला स्वस्थ बसू देईना आणि मग काय करावं याचा विचार सुरु असतानाच, त्याच्या मनाने नाटक करायचा विचार केला. खरं तर लौकीकार्थाच्या दृष्टीने हा अविचारच. पण अविचाराने वागणार नाही, तो हाडाचा कलावंतच नाही, असं मी मानतो. विचार करुन कला प्रसन्न होत नसते. इंद्रजीतचंही तसंच झालं..!

इंद्रजीतने कणकवलीचं आचरेकर प्रतिष्ठान जाॅईन केलं आणि नाटकं सुरू झाली. काहा दिवस गेल्यावर, त्याला तिथेही स्वास्थ्य लाभेना. एखादं नाटक करायचं ठरलं, की त्याच्या फार तर महिनानाभर आधी स्क्रिप्ट शोधण्यापासून तयारी व्हायची. स्क्रिप्टही कमीत कमी स्त्री भुमिका असलेली पाहायची, कारण सर्वच हौशी कलावंत असल्यामुळे, ते आपापल्या सोयीने तालमींकरता येणार. त्यात स्त्रीयांच्या आणखीनच अडचणी. एवढं सगळ केल्यावर उगाच केल्यासारखं म्हणून नाटक घालायचं, हे काही इंद्रजीतला जमेना. त्याची स्वप्न मोठी होती. ‘अविष्कार’ किंवा अतुल पेठेंसारख त्याला नाटक जगायचं होतं, केवळ करायचं नव्हतं. पण ते शक्य होईना, काही दिवस झाल्यावर तो कंटाळला आणि नाटकाच्या मार्गाला गुडबाय केलं आणि पुन्हा आपल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागला..

पुन्हा तो व्यवसायात रमला तरी, त्यात मन काही रमत नव्हतं. काही तरी करायचं, पण काय ते सुचेना. असंच एकदा विचार करत मोबाईलशी खेळत असताना, त्याच्या डोक्यात फोटोग्राफी करायचं अचानक क्लिक झालं. फोटोग्राफीत आपण आपल्या मनाचे मालक. कुठला ग्रुप नको, की कुणी सवंगडी नको. कुणावर अवलंबत्व नाही, हा मोठा फायदा. आपल्या वेळेनुसार, सवडीनुसार फोटो काढावेत, मनाला वाटेल त्या ठिकाणी जाऊन फोटो काढावेत. बस्स, आता पक्क ठरलं, फोटोग्राफीच करायची आणि इंद्रजीत सुटला. अचानक मन शातं झालं. देवाने आपल्या बाजुने कौल दिला, की कसं वाटतं, तसंच इंग्रजीतला वाटलं. तनामनात आत्मविश्वास भरून आला आणि त्या नंतरच्या लगेचंच काही दिवसात इंद्रजीत कॅमेरा घेऊन निघाला, कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपलं स्वत:चंच मन टिपायला. साल होतं २०१२..!

इंद्रजीतने पहिला दोरा केला तो पंढरपूर, सोलापूर, बीड, म्हसवड ह्या दुष्काळी भागाचा. स्वत:च्या मनाने जगायचं, तर ‘दुष्काळा’चा सामना करावा लागतो, त्याचा हा जणू संकेत होता. ह्या दौऱ्यात इंद्रजीतने अनेक छायचित्र टिपली. पंढरपूरला त्याला वयाने जराजर्जर झालेले आजोबा भेटले. ‘पुता, आमच्या नशिबीच दुष्काळ लिवलेला हाय बग, आता त्या पांडुरंगाचाच आसरा’ असं म्हणत निराश झालेले. त्यांच्या नशिबातला दुष्काळ त्यांच्या भेगाळलेल्या कपाळावर स्वच्छ लिहिलेला इंद्रजीतला दिसला आणि त्याही परिस्थितीत त्यांचा ज्यावर दुर्दम्य विश्वास होता, तो त्यांचा त्राता पांडुरंगही तिथेच वास करुन असलेला दिसला. ‘अत्यंत बोलकं हे छायाचित्र सोबत दिलेलं आहे). दुष्काळाचे त्याने टिपलेले असे अनेक फोटो आम्हाला इंद्रजीतने दाखवले.

पुढे त्याने केलेल्या फोटोच्या अनेक सिरिज त्याने दाखवल्या. त्या त्या फोटोमागची त्याची कल्पना आणि भावनाही त्याने उलगडून दाखवली. स्वत:च्या पत्नीच्या गरेदरपणाच्या सातव्या महिन्यात उद्भवलेल्या अडचणींचा सर्व प्रवास इंद्रजीतने ‘चेसिंग द क्वेश्चन मार्क’ या शीर्षकाखाली कॅमेराबद्ध केलेला त्याने आम्हाला दाखवला..मला त्यातलं फार काही कळलं नसलं तरी, या सिरिजचं शीर्षक मात्र जाम आवडलं, ‘चेसिंग द क्वेश्चन मार्क’..! स्त्रिची प्रसूती म्हणजे प्रश्नचिन्हच असतं. कशी होईल इथपासून ते काय होईल आणि जे होईल, ते व्यवस्थीत असेल ना, इथपर्यंत अनेक प्रश्न या दरम्यान सतावत असतात. शिवाय पोटुशी स्त्री, एका बाजूनं पाहिली असता, दिसतेही प्रश्नचिन्हासारखी..! त्यात त्यांच्या पत्नीच्या गर्भारपणात काही अडचणी निर्माण झाल्याने, प्रश्नचिन्हाखाली असलेलं टिंब जरा जास्तच गडद झालेलं होतं. इंद्रजीतच्या पत्नीचा व त्यांचा स्वत:चाही ह्या गडद टिंबाच्या प्रश्नचिन्हामागे धावण्याचा प्रवास, कृष्न-धवल फोटोंत त्यांनी फार सुरेख पकडला होता..! रिझल्ट लागेपर्यंत त्यांच्या मनातही कृष्ण-धवल भावनाच होत्या, त्याचंच प्रतिबिंब ती छायचित्र होती..!

या व्यतिरिक्त मातीतून जन्म घेणारे आणि त्याच मातील पाठ लागू नये याची काळजी घेणारे कोल्हापूरच्या तालमीतले मल्ल, दापोली नजिकच्या बुधल गांवातल्या, घरबांधणीपासून मासेमारी करणाऱ्या महिला, ‘हिरवी’ गांय अशा अनेक सिरिज, त्यांच्या जन्मकथा आम्हाला इंद्रजीतने दाखवल्या, उलगडून सांगितल्या. शेवटी ती त्याची प्रसिद्ध सिरिज आली. आमच्या सिंधुदुर्गातले सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत श्री. ओमप्रकाश चव्हाण यांच्यावर केलेली..

ओमप्रकाश चव्हाण हे सिंधुदुर्गातले सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत. स्त्री भुमिका करणारे. यांच्यासोबत इंद्रजीत सतत २-२.५ वर्ष सावलीसारखे वावरले. त्यांचेअसंख्य फोटो काढले. नेहेमीचं आयुष्य जगताना काढले, तसंच भुमिकेत शिरल्यानंतर त्यांच्यात झालेला अमुलाग्र बदलही त्यांनी नजाकतीने टिपला. जातीवंत पुरुषाचं रुपांतर, तेवढ्याच जातीवंत स्त्रीमधे होतानाचे इंद्रजीत साक्षिदार आहेत. ओमप्रकाश चव्हाण एकदा का स्त्रिवेशात शिरले, की त्यांच्यातला पुरुष जणू लुप्त व्हायचा. इतका की, त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या वावरण्यात, कपडे बदलण्यात एक स्त्रीसुलभ सहजता यायची. ‘हा पुरूष आहे’ हे सांगुनही तिऱ्हाईताने ते मान्य केलं नसतं, एवढे ओमप्रकाश अमुलाग्र बदलून जायचे. ओमप्रकाशजींचं हे एका क्षणात होणारं ट्रान्सफाॅर्मेशन इंद्रजीतने अनेकदा अनुभवलं आणि आलेला प्रयेक अनुभव पहिल्यापेक्षा अद्भूत होता..

ओमप्रकाशजींचा पुरु-स्त्री-पुरुषात होणारा प्रवास उलगडून दाखवणारा एक आणि एकमेंव फोटो इंग्रजीतना त्यांच्यासोबतच्या दोन-अडीच वर्षांत टिपता आला. तसा फोटो पुन्हा मिळाला नाही. तो फोटो सोबत देतोय.

ह्या फोटोत भुमिकेतून बाहेर आल्यानंतर ओमप्रकाश साडी सोडताना दिसतो. अंगावरचे दागीने अद्याप उतरवलेले नाहीत. अंगात ब्लाऊज नाही. ह्या फोटोतील ओमप्रकाशजींची साडी बदलताना जी सावली भिंतीवर पडलीय, त्यात या फोटोचं आणि ओमप्रकाशजींच्या जगण्याचं अवघं मर्म इंद्रजीतने नेमकं पकडलं आहे. इद्रजीतच्या एकूणच फोटोंत सावल्यांचा खेळ जास्त बोलका आहे. पण ओमप्रकाशजींची अवघी कहाणी सांगणारा हा फोटो मला जास्त बोलका वाटला..साडी सोडता सोडता, त्यांच्यातली स्त्री हळुहळू झाड सोडत असताना त्या स्टील फोटोत मला दिसली..साडी सोडतानाच्या ओमप्रकशजींच्या भिंतीवरच्या सावलीत, स्त्री शरिराची सगळी वळणं उतरलीयतं. नुसती सावली पाह्यली असता, ती स्त्रीच आहे असं कुणालाही वाटेल. परंतु फोटोतल्या ओमप्रकाशजींच्या छातीवरचं जावळ त्यांची स्त्री असण्यापासूनची फारकत दिसतेय..

विज्ञानातलं एक महत्वाचं तत्व या फोटोत मला दिसलं. पुरुषात x आणी y क्रोमोझोन्स असतात आणि स्त्रीमधे दोन x, असं विज्ञान सांगते. याचा अर्थ सर्व पुरषांत एक सुप्त स्त्री असतेच, असा मी घेतो आणि नेमकं तेच इंद्रजीतने टिपलेल्या ओमप्रकाशजींच्या या फोटोत मला दिसलं. पुरुषांत स्त्री असते म्हणूनच अर्धनारी-नटेश्वर होतो, सिता-राम होतो, राधा-कृष्ण होतो, उमा-महेश होतो. ही नांव उलटी वाचली जाऊ शकत नाहीत. ओमप्रकाशींचं हे स्त्री आणि पुरुषामधलं, दोघांचाही आब राखूनचं, जगण दाखवलेला हा इंद्रजीतने टिपलेला फोटो, मला सर्वात जास्त आवडला..!!

त्या दोन-तीन तासांत काही तरी वेगळं करु पाहाणाऱ्या, कणकवलीसारख्या कोकणतील एका छोट्या शहरातील एका अस्वस्थ माणसाचा जगप्रसिद्ध छायाचित्रकारापर्यंत झालेला प्रवास उलगडला. निराकाराकडून आकाराकडे झालेला हा प्रवास सोपा नव्हता. वर कुठेतरी म्हटल्याप्रमाणे, स्वत:च्या मनाला न्याय द्यायचा, तर जीवनात दुष्काळ सदृष परिस्थितीला तोंड द्यायची तयारी लागते. तशी तयारी इंद्रजीतने ठेवली, आणि त्याला लहान-लहान गोष्टीतला आनंद दिसू लागला. मग कणकवलीतल्या गडनदीतील दगडांत त्याला कन्याकुमारीचं शिल्प दिसलं आणि सावंतवाडीच्या नरेन्द्र डोंगरात त्यांना कांचनगंगा दिसलं. अशी दिव्य दृष्टी प्रत्येक संवेदनशील कलावंताला आपोआप लाभत असते आणि मग दुष्काळाचा सदैव सुकाळ होतो. इंग्रजीतला अशी दृष्टी लाभलीय..!

सच्ची अस्वस्थता योग्य मार्ग सापडला असता माणसाला किती उंचीवर घेऊन जाऊ शकते, ह्याचं इंद्रजीत हे उत्तम उदाहरण..! काहीतरी करु पाहाणाऱ्या इंद्रजीतचा प्रवास, आणखी छान करु कडे सुरू झाला आहे..

बहुतेक सर्व फोटो त्याने मोबाईलने टिपलेत, हे आम्हाला त्यांने वारंवार सांगुनही खरं वाटेना. यापुढे जाऊन जेंव्हा इंद्रजीतने सांगितलं, की त्याला ‘अॅपल’चं मिळालेलं प्रतिष्ठेचं काम, त्याने मोबाईलवर काढलेल्या फोटोमुळेच मिळालंय, तेंव्हा मला फक्त झीट यायची बाकी होती. इंद्रजीतचं पुढचं म्हणणं, मला अधिक पटलं. तो म्हणाला, की डोक्यात पक्का झालेला विचार जेंव्हा नजरेत उतरतो, तेंव्हा तंत्र आणि साधन दुय्यम ठरतं. तुमचा विचार पक्की असेल, तर तुम्ही साध्या कॅमेऱ्यानेही विष्य स्पष्टपणे मांडणारा फोटो काढू शकता आणि तोच पक्की नसेल, तर मग कितीही महागडा कॅमेरा घ्या, तुम्ही फक्त फोटो काढू शकाल, त्यात मॅटर असेलच असं नाही.

चित्रकार नामानंद मोडक यांनी रेखाटलेलं इंद्रजीतचं फ्रेमबद्ध केलेलं केलेलं अर्कचित्र आम्ही या भेटीची आठवण म्हणून इंद्रजीतला नजर केलं..!

इंद्रजीतने गप्पांचा शेवट अगदी सोप्या भाषेत गहन तत्व सांगून केला. इंद्रजीत म्हणाला, विचार आणि महत्वाचा, तंत्र आणि साधन दुय्यम..! हेच तत्व सर्व कलांना आणि कलावंतांना सारखंच लागू होतं. मला तुरुंगातल्या भिंतींवर महाकाव्य लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आठवले उगाचंच..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

22.04.2019

खांबेने तस नाटक सोडलेले नाही. आचरेकर प्रतिष्ठान या नामवंत संस्थेत काम करतोय.