सुभाषितांचं खोटेपण..

सुभाषितांचं खोटेपण..

मी लहानपणापासून असं ऐकत आलोय की, ‘मनापासून केलेल्या कामाचं चांगलं फळ मिळतं’. कर्मयोगात ‘काम करत राहा, फळाची इच्छा धरू नका’ असा उपदेश केलेला आहे. ही दोन विरुद्ध अर्थ ध्वनीत करणारी सुभाषितं, वेगवेगळ्या परिस्थितीत माणसाच्या मनाची समजूत घालण्यासाठी तयार केलेली आहेत, अशी माझी आजवरच्या माझ्या व इतरांच्याही अनुभवातून ठाम समजूत होत चाललेली आहे.

माणूस मनापासून काम करतो तेच मुळी मनोवांछीत फळ मिळावं म्हणून. घाम गाळण्याचं काम मरू दे, साधी बिन कष्टाची देवपुजाही मनात फळाची अपेक्षा धरून केली जाते, हे कुणी नाकारणार नाही. माणूस देवळात काय, ‘काय बाबा कसा आहेस, बरं चाललंय ना’ असं म्हणून देवाची विचारपूस करायला निश्चितच जात नाही. तो देवळात जातो तो, ‘इडा पिडा टळो आणि मी मागितलेलं मिळो’ ही इच्छा धरूनच. एकदा का मनापासून केलेल्या कामाचं मनाप्रमाणे फळ मिळालं, की पुढचं कर्म करायला त्याला आणखी बळ येतं, हे देखील सर्वांना मान्य होईल..

फळ अपेक्षित नसेल तर, माणसानं काम करावंच कशाला? समजा केलंच, तर काम करण्यासाठी पोटातून जी उर्जा यावी लागते आणि ती उर्जा येण्यासाठी त्यात काहीतरी जे ढकलावं लागतं, ते फुकट मिळत नाही. काम करायचं, ते मुळात पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी, जो प्रश्न काम करुन फळ मिळालं तरच सुटू शकतो. अशा परिस्थितीत फळाची अपेक्षा न धरता केलेल्या कामात, पोटाचं काय करायचं, हे कुठे कोणी सांगितलेलं माझ्या वाचनात आलेलं नाही. पुन्हा त्या वचनावर विश्वास ठेवून कृती केली आणि पुढे बऱ्याच काळाने फळ मिळालं(च) तर मधल्या काळाची भरपाई कुणी आणि कशी करायची, हा प्रश्न आहेच. दात असताना चणे मिळायला हवेत, बोळकं झाल्यावर मिळून काय उपेग?

मनापासून केलेल्या कामाचं फळ मिळालं नाही, की मग हे वरचे सगळे उदेश प्रसंगानुरूप आठवून स्वत:च्या मनाची समजूत घालत बसायची, एवढ्यासाठीच ह्या उपदेशांचं प्रयोजन असावं असं मला आताशा वाटत चाललंय..! या पार्श्वभुमीवर खरं सुभाषित ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’ हेच असावं.

मनापासून केलेल्या कामाचं मधूर फळ मिळतंच मिळतं, हे सुभाषित आठवत मन लावून काम करायचं आणि ते ‘मन’भर काम समाप्त झाल्यानंतर मिळणारं कणभर फळ पाह्यलं, की मग दुसरं सुभाषित, ‘करम किये जा फल की इच्छा मत कर ऐ इन्सान’ असं म्हणत, स्वत:च्या मनाची समजूत घालून, ‘मनापासून केलेल्या कामाचं फळ मिळतं’ हे पहिलं सुभाषित आठवत स्वत:ला पुन्हा नवीन कामाला जुंपून घ्यायचं आणि पुन्हा काही काळाने दुसरं सुभाषित आठवत, पुन्हा मनाची समजूत घालायत बसायचं, हेच चक्र चालू असताना आजुबाजूला दिसतं. मी चुकत असेन कदाचित, पण माझा अनुभव मात्र असाच आहे.

व्यवहारी जगात सुभाषितांप्रमाणे वागणारांच्या नशीबी सोटाच येतो. सुभाषितं ही कालनिर्णयप्रमाणे भितीवरीच शोभतात, हा वागण्यात नाही. वरची दोन्ही सुभाषितं, स्वार्थी माणसांनी भोळ्या माणसांच्या मनाच्या समजुतीसाठी तयार केलेली असावीत, असं माझ्या वाटण्यावरची माझी श्रद्धा अधिक पक्की होऊ लागते..!

-नितीन अनंत

9321811091

14.05.2019