देशाची प्रकृती बदलतेय..

देशाची प्रकृती बदलतेय..

भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या नेतृत्वाखालील एनडीएचं खुल्या दिलाने अभिनंदन..!

भाजपने त्याला एकट्याला पुन्हा एकदा बहुमत मिळवून दाखवलं त्याबद्दल भाजपचं दुप्पट अभिनंदन..!!

२०१४ साली झालेल्या निवडणुकीतील एकही मुद्दा ह्या निवडणुकीत प्रचाराचा प्रमूख मुद्दा नसूनही, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए २०१४ सालच्या विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या परिस्थितीत आहे आणि हे खरोखरंच अभिनंदनीय आहे..!

भाजप सोडून इतर प्रमुख पक्षांमधे असलेल्या जातीय समिकरणांना आणि घराणेशाहीला लोकांनी नाकारलेलं आहे, हे येत असलेल्या निकालावरून स्पष्ट होतंय आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याचवेळी अती उजवा राष्ट्रवाद आणि हिन्दुत्वाचं होणारं ध्रुवीकरण ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. भारतीय समाजावर याचा परिणाम उद्या कसा होईल हे आता तरी सांगणं अवघड आहे. राष्ट्रवादाच्या आणि हिन्दुत्वाच्या आकर्षणाने जातीवर मात केल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. परंतु हिन्दुत्वाच्या लेबलाखालील उद्याच्या छुप्या जातीयतेचा धोका जनतेच्या लक्षात आलाय की नाही हे समजत नाहीय. त्यामूळे हेच चित्र उद्याही असंच राहील की अधिक चांगलं होईल की आणखी बिघडत जाईल, त्याबद्दलही आताच काही सांगता येत नाही. देशाची प्रकृती बदलतेय हे स्वागतार्ह आहे, परंतु संस्कृतीच्या आडोश्याखाली ती विकृतीत बदलता कामा नये याची काळजी घेणंही आवश्यक आहे आणि ही जबाबदारी आपली आहे, हे देखील मी आग्रहाने सांगू इच्छीतो

ही निवडणूक भाजपने पूर्णपणे भावनांच्या मुद्द्यावर लढवली. पुलवामाचा अतिरेकी हल्लाआणि त्यानंतर केलेला बालाकोट एअरस्ट्राईक भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रमूख मुद्दा बनला आणि त्यातून जनतेच्या मनावर बिंबवल्या गेलेल्या राष्ट्रवादाच्या भावनांचा हा विजय आहे, असा याचा अर्थ. हिन्दुत्वाची राष्ट्रवादाशी खुबीने घातली गेलेली सांगड, त्यातून मतदारांच्या चेतवल्या गेलेल्या भावना आणि त्या भावनांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, काळा पैसा इत्यादी जनतेच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्याआणि जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर केलेली मात भाजपच्या पथ्यावर पडली. विरोधी पक्षही ह्या मुद्द्यांवर भाजप-एनडीएला घेरण्यात अयशस्वी ठरले आणि त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला नेत्रदीपक यश मिळत असल्याचं दिसतं.

हा विजय प्रभावी प्रचाराचा आहे. सोशल मिडीया, इलेक्ट्राॅनिक मिडीया, डिजिटल आर्मी यांचा भाजपने फार कौशल्याने वापर करुन घेतला आणि त्यात काहीच गैर नाही. हे मार्ग तर विरोधी पक्षांनाही उपलब्ध होते, परंतु त्यांना याचा वापर करुन घेता आला नाही. हे विरोधकांचं अपयश आहे. सर्व विरोधी पक्ष स्वार्थापायी एकत्र आलेत, कोणत्याही विरोधी पक्षाकडे मोदींइतका सक्षम उमेगवार पंतप्रधानपदासाठी नाही हे वास्तव आहे. हे वास्तव अधोरेखीत करण्यात एनडीए यशस्वी झाला. भाजप आणि एकूणच एनडीएला मिळालेल्या यशामागे हे देखील एक कारण आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील गेल्या पाच वर्षात सत्तेवर असलेल्या सरकारने विकासाच्या क्षेत्रात उत्तम काम केलंय यात माझ्या मनात काहीच शंका नाही. फक्त त्यांनी या मुद्द्यावर निवडणूक लढवायला हवी होती असं माझा आग्रह होता. माझा विरोध भाजपच्या हिन्दुत्वाच्या ध्रुवीकरणाला होता आणि पुढेही राहील. भारतासारख्या विकसनशील देशाच्या निवडणूकांचा सर्वच पक्षांचा प्रमूख मुद्दा विकास हाच असायला हवा, न की राष्ट्रवाद आणि धर्म..! पण तसं झालं असतं तर आताएवढं यश मिळालं असतं की नाही याची आता शंका येते, कारण भारतीय समाजमन भावनांवर चालत नाही आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या भारी यशामूळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. धर्म आणि राष्ट्रवादाच्या तुलनेत विकास पुन्हा एकदा मागे पडला..!

पण कारणं असली तरी विजय हा विजयच असतो. त्यामुळे भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करायलाच हवं..!!

पंतप्रधान नरेन्द्र मोदी, भाजपचे व एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते, जिंकलेले उमेदवार यांचं मनापासून अभिनंदन..!

फक्त एकच अपेक्षा,

उतू नका, मातू नका,

धर्माच्या आग्रहात,

विकासाचा वसा टाकू नका..!!

-©️नितीन अनंत

9321811091

23.05.2019