भाषिक संमेलने – एक सामाजिक गरज
रविवार, २३ जून २०१९ रोजी मुंबईतल्या दादर येथे ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलन’ संपन्न झालं. मालवणी बोलीसाठी वाहिलेलं हे सहावं आणि सलग साजरं झालेलं दुसरं संम्मेलन. यापूर्वीची पांच संम्मेलनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरी झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर, मुंबईत झालेलं हे पहिलंच संम्मेलन. मागच्या वर्षीच्या मे महिन्यात कणकवलीच्या प्रख्यात आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात पांचवं संमेलन साजरं झालं होतं, त्या संमेलनाला मी उपस्थित होतो. यंदाचं संमेलन तर माझी कर्मभूमी मुंबईत असल्यानं, मी ते चुकवणं शक्यच नव्हतं. लागोपाठच्या दोन वर्षी सलग साजऱ्या झालेल्या दोन्ही संमेलनाला उपस्थित राहाण्याची संधी मला लाभली.
मुंबईतल्या संमेलनाच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी माझे मित्र श्री. प्रकाश सरवणकर अध्यक्ष असलेल्या, मुंबंईच्या ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’ या नोंदणीकृत संस्थेने घेतली होती. त्यांच्या साथीला होती ‘मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग’ ही लळीत बंधुद्वयांनी मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी चालवलेली संस्था. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर भोगले. प्रसिद्ध साहित्यिक श्री. गंगाराम गवाणकर माजी अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते, तर मालवणचो झील आणि मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डाॅ. सुहास पेडणेकर संमेलनाचे उद्घाटक होते. हा झाला संमेलनाचा तांत्रिक तपशील.
मी या संमेलनाला उपस्थित राहाण्याची आतुरतेने वाट पाहात होतो. तीन महिन्यांपूर्वीच संमेलनाची तारीख व ठिकाण जाहिर झालं होतं. त्यानंतरच्या काळात सोशल मिडिया, वर्तमानपत्रं, फोन, वैयक्तिक गाठी-भेटी इत्यादी जमेल त्या सर्व माध्यमांतून संमेलनाची जोरदार जाहिरात सुरू होती. यापूर्वीची पांच संमेलनं सिंधुदुर्गात होऊनही रसिकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने, ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’ला मुंबईतल्या संमेलनाला कितपत लोक येतील याचीच चिंता असणं नैसर्गिक होतं त्यात संमेलनाचा दिवस होता रविवार. मुंबईत लोकल ट्रेन हेच प्रवासाचं स्वस्त आणि वेगवान साधन असलं तरी, रविवारी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर ‘मेगाब्लाॅक’ नांवाच्या शनीची वक्री दृष्टी असते. अगदी नाईलाज असेल तरच या दिवशी मुंबईकर प्रवासाला बाहेर पडणार. त्यात साहित्य वैगेरेसाठी इतका त्रास कुणी घेतंही नाही हल्ली. त्यामुळे चिंतेत आणखीनच भर पडलेली. बरं जेवणंही पूर्ण शाकाहारी. काळ्या वाटाण्याची उसळ, वडे, बटाट्याची पिवळी भाजी, भात आणि वरण. हिंवसान काहीच नाही. रविवार असून हिॅवसान नाही म्हणजे मालवण्याला जरा कठीणच. म्हणजे ते ही आकर्षण नाहीच. आयोजकांची चिंता काही अगदीच चुकीची नव्हती..!
शेवटी तो दिवस उजाडला आणि अहो आश्चर्यम..! संमेलनाला गर्दी कशी होईल याची चिंता पडलेल्या प्रतिष्ठानला, आता या गर्दीला आवरावं कसं, याची चिंता लागून राहिली. रविवारचा दिवस, मेगाब्लाॅक, शाकाहारी जेवण इत्यादी साऱ्या अडचणींवर मात करुन मुंबई उरलासुरला आणि उपनगरात विखुरलेला अख्खा मालवणी मुलुख’ संमेलनाच्या ठिकाणी लोटांनी येऊ लागला, तो ही कुटुंबासहीत. त्या दिवशी सकाळच्या दोन तासांत, दादर स्टेशन पूर्व ते संमेलनाचं ठिकाण, या एकूण दोनेकशे मिटरच्या अंतरात फक्त मालवणी भाषा ऐकू येत होती. ‘सायबानू ह्यो पत्तो सांगतास काय जरा’ असं म्हणून पत्ता विचारणारी किंवा समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावरचं मालवण बरोबर ओळखून, ‘तुमी पन संमेमलनास इलास की काय?’ ही व अशीच लाल मातीतली बोली बोलणारी मालवणी माणसं दिसत होती. गर्दी होणार नाही, ही आयोजकांची चिंता, मालवणी रसिकांनी साफ फोल ठरवली.
मी या संमेलनाला जाण्यासाठी अत्यंत उत्सूक होतो. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, फेसबुकवरच्या अनेक मित्रांना या ठिकाणी प्रत्यक्ष भेटता येणार होतं. त्यांच्याशी गप्पा मारता येणार होत्या, त्यांच्यासोबत फोटो काढून घेऊन ते फोटो फेसबुकवर मिरवता येणार होते. याच उत्साहात संमेलन ठिकाणी पोचलो नि कसलं काय, माझ्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळाल्या. तुडंब गर्दी झालेली. हाॅलमधे शिरायला हवेलाही जागा नाही. बाहेरही तेवढीच गर्दी. त्याचा परिणाम बाहेर आधीच गरम असलेल्या वातावरणात कमालीची वाढ होऊन, हॉल मध्ये निर्माण झालेली प्रचंड उष्णता आणि त्यामुळे घामाच्या धारा. त्यातही थ्री पीस सुटातले आणि जाकीटातले विचारपीठावरील पाहुणे पाहून, गर्मीची जाणिव अंमळ जास्तच होत होती. मी सरळ गच्चीची वाट धरली आणि संध्याकाळी चार-पांचपर्यंत तिकडेच बसून होतो. मधेच माझाही एक कार्यक्रम होता, तेवढा तासभर फक्त मी आत गेलो होतो आणि माझा कार्यक्रम आटोपल्यावर घामाचं सचैल स्नान करून पुन्हा गच्चीची वाट धरली होती. माझ्या अपेक्षेप्रमाणे फारसं कुणाला भेटणं झालं नाही की, काही नवीन ओळखी झाल्या नाहीत.
मी हॉलमध्ये प्रत्यक्ष हजर नसल्याने, तिथे प्रत्यक्षात काय कार्यक्रम झाले आणि त्याच फलित काय, यावर मला काहीच भाष्य करता येणार नाही. मात्र संमेलनाला एवढी अभूतपूर्व गर्दी का झाली, याचा विचार करावासा मला वाटला. माझ्या मनात उमटलेले विचार आपल्याशी बोलावेत असं वाटल्याने हा लेखाचा प्रपंच.
सहाव्या ‘मालवणी बोली साहित्य संमेलना’चे मुंबईतील आयोजक असलेल्या ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’ या संस्थेने, या संमेलनाची प्रचंड जाहिरात केली होती. अशी जाहिरात करण्यामागे, लोक संमेलनाला येत नाहीत, हा त्यांच्या पूर्वसुरींच्या पूर्वानुभव कारणीभूत असावा. दहाजणांपर्यंत आपले निमंत्रण पोहोचले तर, त्यातील तीन जण येतील अशी शक्यता त्यांनी गृहीत धरली असावी. आणि तशी शक्यता गृहीत धरून तेवढ्याच क्षमतेचा हॉल बुक केला असावा. प्रत्यक्षात काय घडलं, तर सिंधुदुर्ग प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी निमंत्रण दिलेले दहाजण तर आलेच, वर येताना ते आणखी तीन जण जास्तीचे घेऊन आले. मी ही तसंच केलं होतं. जेमतेम तीस टक्के रसिक येतील अशी शक्यता गृहीत धरली होती, तिथे १३० टक्के लोक आले. मग जे व्ह्यायच होत तेच झालं. जेमतेम दोनशे जणांच्या क्षमतेच्या हॉलमध्ये सहाशेहून अधिक रसिक आले आणि त्याचा ताण संपूर्ण व्यवस्थेवर आला. अर्थात त्याही परिस्थितीत प्रतिष्ठानच्या स्वयंसेवक/कार्यकर्त्यांनी आपलं मानसिक संतुलन न ढळू देता सर्व कार्यक्रम ठरलेल्या वेळी पार पडतील आणि जेवणादि व्यवस्था चोख राहील याची काळजी घेतली, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
संपूर्ण संमेलनात गच्चीवर बसून राहिलेल्या मला या गर्दीच मात्र भारी कौतुक वाटलं. त्याहीपेक्षा कौतुक, खिशात तांदूळ ठेवले असते तर घामाच्या धारांत मुरून खमीसाच्या खिशातच त्याचा भात तयार होईल इतक्या प्रचंड उकाड्यात हॉलमध्ये बसून, सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेणाऱ्यांचं वाटलं. कुणीही आपली जागा सोडायला तयार नव्हतं. त्यामागे एकदा उठलो तर पुन्हा जागा मिळणार नाही ही भीती होतीच, त्याहीपेक्षा समोर चाललेले देखणे आणि श्रवणीय कार्यक्रम हुकतील ही भीती जास्त होती. घामातून अंगातील पाण्याचा आपोआप निचरा होत असल्याने, कुणाला बहिर्दिशेला जाण्याची निकडही भासत नव्हती. सबब, आतले आत आणि बाहेरचे बाहेर अशी परिस्थिती होती.
हाडाच्या मुंबईकराला गर्दीच तसं काही कौतुक नाही आणि भीतीही नाही. जन्मल्यापासूनच उभा जन्म दहा बाय दहाच्या खोलीत सात-आठ माणसांसोबत घालवल्यामुळे, गर्दीत अॅडजस्ट होण्याची कला त्याच्याकडे उपजतच असते. त्यात जेमतेम शंभर माणसं मावतील इतक्याच लोकलच्या डब्यात कोंबलेल्या तीनचारशे माणसांसोबत सकाळ संध्याकाळ प्रवास करण्याचीही त्याला सवय असते. जीवघेण्या गर्दीतून रोज प्रवास करत असताना, मुंबईकर त्यातही आनंद शोधात असतो. गच्च भरलेल्या लोकलच्या डब्यात दोन माणसं भांडू लागली, की त्यांना भांडण्यासाठी त्या प्रचंड गर्दीत पुरेशी जागा करून देण्याची उदरताही तो दाखवत असतो. गर्दीत स्वतःच शारीरिक आणि मानसिक व्यवस्थापन कसं करायचंआणि जे काही समोर चाललंय, त्याचा निमूटपणे आनंद कसा घ्यायचा, ह्याच चोख व्यवस्थापन त्याच्याकडे असतं. हाच मुंबईकर परवाच्या संमेलनात आलेला असल्याने, प्रचंड गर्दी आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेला तोंड देत सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेत आनंदाने बसलेला पाहून मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. मला आश्चर्य वाटलं ते ‘साहित्य संमेलन’ ह्या फारश्या आकर्षक नसलेल्या सोहळ्याला एवढी गर्दी जमली कशी, याचं..!
ह्या सर्व गर्दीला सिंधुदुर्गातल्या लाल मातीचा चेहेरा होता. मालवणी माणूस, त्याच्या गावोगावी असलेल्या स्वयंभू रामेश्वरासारखा किंवा रावळनाथासारखा स्वयंभू. सगळेच स्वयंभू म्हटल्यावर ते सगळे एकत्र येणं तसं कठीणच. सिंधुदुर्गात आणि सिंधुदुर्गवासीयांमध्ये त्यामुळेच सहकाराची चळवळ फार तग धरत नसावी. एकाच गावातली मुंबईतली चार माणसं पूर्वी एकत्र येत, ती पाचव्याला खांद्यावर घेऊन स्मशानापर्यंत पोचवण्यासाठी. हल्ली मयतंही अँब्युलन्समधून वैकुंठास जाऊ लागल्यामुळे, ते एकत्र येणंही संपलं. आता ती आता एकत्र येतात ती मोबाईलमधला ल्युडो गेम खेळण्यासाठी. नाही म्हणायला एकत्र येऊन नाटकं घालणं हा आणखी एक छंद, परंतु टीव्हीचं आक्रमण आणि मुंबईतली जागेची कमतरता, ह्यामुळे ते एकत्र येणंही संपलंच जवळपास.
तर मग परवाच्या संमेलनाला एवढी गर्दी का झाली असावी, याचा आणखी विचार करताना माझ्या लक्षात येऊ लागलं की, घर आणि कार्यालय अश्या चक्रात आयुष्य अडकलेल्या मालवण्याला, कुठेतरी त्याच्या एकटेपणाची जाणीव होऊन, त्या जाणिवेतून आपल्या मुलखातील माणसं काहीतरी निमित्ताने एकत्र येतायत, ह्याच त्याला अप्रूप वाटून, त्या एकत्र येण्यात आपलाही त्यात सहभाग असावा ह्या हेतूने तो परवाच्या कार्यक्रमाला आला असावा. त्याच्या मनात आणखीही एक भावना असावी. पूर्वी कधीतरी आपल्या कष्टाने आणि घामाने या मुंबईनगरीला वैभवशाली बनवणारा मराठी माणूस, आज त्याच मुंबईत उपरा ठरलाय. मुंबईला आजची दिमाखदार मुंबई बनवणाऱ्या मराठी माणसात मालवणी कोकण्यांची संख्या लक्षणीय होती. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी, मुंबईचं हृदय असलेल्या दादर ते लालबाग ह्या पट्ट्यात फिरताना, हमखास मालवणी भाषा कानावर पडत असे. आज जिथे मराठीच ऐकू येईना झालीय, तिथे मालवणी बोली तर फार लांबची गोष्ट.
मुंबईतलं कोकणी माणसाचं आणि एकूणच मराठी माणसाचं अस्तित्वच आज संपत चाललंय. तो फेकला गेलाय मुंबईच्या उंबरठ्याबाहेर कुठेतरी विरार-बदलापूर किंवा त्याहीपुढे. त्या उंबऱ्याबाहेरच त्याच घर म्हणजे उरलंय केवळ लॉगिंग बोर्डिंगसारखं. त्याला रात्री झोपायला फक्त घर हवं असत किंवा मग मोबाईल सिमला लागणाऱ्या पत्त्याच्या पुराव्यासाठी म्हणून. जिथे त्याला स्वतःच्या कुटुंबालाच भेटणं अवघड झालाय, तिथे गाववाल्याना-शिववाल्याना भेटण्याची बात तर बहोत दूरची. मुंबईत अल्पसंख्य झालेला मालवणी समाज, आपण एकत्र आलो नाही तर आपलं अस्तित्वच संपून जाईल या सुप्त भावनेनं कालच्या संमेलनात मोठ्या संख्येने एकत्र आला असावा, असं मला कालच्या संमेलनाला झालेल्या उत्स्फूर्त गर्दीकडे पाहून वाटलं. कोणताही समाज जेंव्हा अल्पसंख्य होतो, तेंव्हा तो समाज आपल्या समाज बांधवाना जातीच्या-धर्माच्या आणि भाषेच्याही आधाराने धरून राहण्याचा कसोशीने प्रयत्न करतो, हेच यातून अधोरेखित होतं. मुंबईत गेली पाच-सहा किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्ष भरवल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल कोकण’ या भव्य प्रदर्शनाला सातत्याने होणारी कोकण्यांची प्रचंड गर्दीकडे पाहून मला हेच वाटत आलंय. मुंबईतल्या ‘मालवणी जत्रां’ना मिळणार भरघोस प्रतिसादही मला हेच सांगतो. आणि परवाच्या मालवणी बोली साहित्य संमेलनातली गर्दीही मला मूकपणे हेच सांगत होती. मुंबईसारख्या प्रचंड गर्दीत प्रत्येक माणूस एकटा आहे. त्या माणसाचा हा दर्द समजला म्हणजे, अशा कार्यक्रमांना गर्दी का होते, याचं कारण लक्षात येईल.
माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे असं विज्ञान सांगते. हे समूह अनेक प्रकारचे असतात, तसेच ते भाषिकांचेही असतात. आपल्या समुहापासून तुटलेपण येऊ नये अशी सगळ्याच माणसांची असोशी असते आणि एकत्र येण्यासाठी वाटेल तो त्रास सहन करायची त्यांची तयारीही असते. दादरला परवाच पार पडलेल्या सहाव्या ‘मालवणी बोली साहित्य संमेलना’त, संमेलनातील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेणं हे कारण जरी असलं तरी, होणाऱ्या सर्व त्रासाकडे सपशेल दुर्लक्ष करून, मालवणी रसिकांनी केलेल्या अलोट गर्दीकडे मी, एकटेपणाच्या जाणीवेमूळे एकत्र येण्याची ‘सुप्त भावना’ या भावनेने पाहत होतो. यावेळी या सर्व मालवण्यांना एकत्र येणाचं कारण होतं, आपली मालवणी बोली.
जाती-धर्मापेक्षा भाषेवर आधारीत अशी संमेलनं दरवर्षी व्हायला हवीत. भाषेने जोडलेली माणसं जात आणि धर्माच्या पलिकडची असतात. अनेक वाटांवर एकटी पडलेली महानगरातल्या गर्दीतली माणसांची बेटं एकत्र याचला ‘भाषा’ हा सांस्कृतिक धागा जास्त चिवट असतो आणि म्हणून अशी संनेलनं आवश्यक असतात. ही एक सामाजिक गरज आहे.
-नितीन साळुंखे
9321811091
26.06.2019
-लेख शीर्षक कृतज्ञता – सौ. प्राजक्ता सामंत.
प्रसिद्धी – ‘दै. तरुण भारत’, सिंधुदुर्ग आवृत्ती, दिनांक २९.०६. २०१९ शनिवार
टीप- तरुण भारत मध्ये आज प्रसिद्ध झालेला लेख, जागेच्या मर्यादेमुळे एडिट करण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यावी.