चित्रकार प्रकाश कबरे-

चित्रकार प्रकाश कबरे-

आज प्रकाश कबरेंच्या चित्र प्रदर्शनात गेलो होतो. मला चित्रातलं फार काही कळत नाही, पण चित्र मनाला आनंद देतात हे कळतं. आणि आनंद देणाऱ्या कोणत्याही गोष्टींचं मी विश्लेषण करत बसत नाही. तर, तो आनंद घेण्यासाठी नेहेमीच चित्रकला प्रदर्शनं पाहायला जात असतो. प्रकाश कबरे तर काय कलावंतांची खाण असणाऱ्या माझ्या सिंधुदुर्गातले. त्यांचं प्रदर्शन मी चुकवणं शक्यच नव्हतं. म्हणून जहाॅगिरला त्यांच्या चित्राकृती पाहाण्यासाठी मी गेलो होतो. दुसरं म्हणजे, मला प्रकाशजींना भेटायचंही होतं.

प्रकाशजींनी कृष्ण हा विषय घेऊन चित्र काढलीत. त्यांना कृष्ण जसा जाणवला, तसा त्यांनी तो चितारला. सर्वच चित्र सुरेख होती. तरही त्यातलं गोवर्धन उचलणाऱ्या कृष्णाचं चित्र मला विशेष वाटलं. ते चित्र काढण्यामागे प्रकाशजींची त्यांची म्हणून एक दृष्टी, कल्पना निश्चितच आहे, परंतु मला मात्र चित्रातला तो गोवर्धनधारी कृष्ण आपल्या देशातल्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा वाटला.

रागावलेल्या इंद्राने (हा इसम कायम रागावलेला किंवा आपलं पद जाईल म्हणून घाबरलेला असतो. अशी व्यक्ती(?)देवांनी आपला राजा म्हणून का निवडावी, याचं मला नेहेमीच आश्चर्य वाटत आलंय. याच्या आणखीही काही एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टीव्हिटीज आहेत, पण आता तो विषय नाही. तुर्तास तो रागावलेला आहे.) मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केल्यावर, त्यापासून संरक्षण व्हावे म्हणून कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन तोलून धरला व सर्व गोप-गोपींचे संरक्षण केले. कृष्णाने गोपांना आपापल्या काठ्याही त्या पर्वताला आधार म्हणून टेकवला सांगितल्या, ही कथा सर्वांना माहित आहे.

या कथेतल्या कृष्णाकडे मी आद्य लोकशाहीवादी म्हणून पाहातो. मी निमित्तमात्र, तुमचा सहभाग महत्वाचा, असं गोप गोपींना सुचवून त्यांना आपापल्या काठ्या, त्यांने उचललेल्या गोवर्धन पर्वताला आधार म्हणून लावायला सांगणारा कृष्ण मला लोकशाहीतल्या आदर्श नेत्यासारखाच(ही जमात फार पुर्वीच लोप पावलीय) वाटत आलाय. म्हणून कदाचित कृष्णाच्या अनेक नांवापैकी एक नांव ‘लोकाध्यक्ष’ असंही आहे. तिन्ही लोकांचा स्वामी या अर्थांने ते आलंय.

प्रकाशजींच्या चित्रातल्या विराट कृष्णानेही गोवर्धन स्वत:च्या करंगळीवर तोलून धरलेला आहे, मात्र त्या खालची ‘जनता’ खुजी होऊन निमूट खाली हात बांधून उभी असलेली दिसते. आपल्या सध्याच्या लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या मथुरेत सध्या अशीच परिस्थिती असलेली दिसते. एकटा ‘उप-इन्द्र’, तो ‘गो’वर्धन पर्वत तोलून ‘लोकाध्याक्षा’च्या विराट स्वरुपात उभा असलेला मला त्या चित्रात दिसला आणि आपल्या देशातली आजची स्थिती आठवली.

कलावंत ज्या समाजात राहातो, वारतो, त्या समाजाचा तो आरसा असतो असं म्हणतात. समाजात जे जे चालतं, त्याचं प्रतिबिंब त्याच्या कलाकृतीत त्याच्याही नकळत उतरत जातं, असंही म्हणतात. याला कोणीही जातिवंत कलावंत अपवाद नाही. प्रकाशजींच्या गोवर्धनधारी श्रीकृष्णाच्या चित्रातही समाजातलं वास्तव- त्यांची तसं चित्र काढण्यामागची दृष्टी वेगळी असली तरीही- त्यांच्याही नकळत उतरलेलं मला दिसलं. किंवा कदाचित माझ्या मेदूने त्या चित्राकडे त्या दृष्टीने पाहाण्याची प्रेरणा मला दिली असावी.

प्रकाशजींशी गप्पा मारताना मला एक वेगळीच गोष्ट समजली. जे.जे. कला महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी ‘जी. एस. मेडीकल काॅलेज’मध्ये ‘आर्टीस्ट’ म्हणून नोकरी केली होती. जी. एस. मेडीकल काॅलेजला सामान्य लोक ‘केईएम’ किंवा ‘केम’ हाॅस्पिटल म्हणून ओळखतात.

मला हे काहीसं आश्चर्यकारकच वाटलं. “म्हणजे तुम्ही नक्की काय काम करायचेत?”, मी विचारलं.

प्रकाशजी म्हणाले, “मी काही एकटाच आर्टीस्ट नव्हतो, तर आम्ही एकूण सोळा लोक आर्टीस्ट म्हणून काम करायचो. फाडलेल्या प्रेतांच्या अवयवांची चित्र काढायचो. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यासाठी शरीराच्या आतले अवयव कसे असतात आणि प्रकृतीत आणि विकृतीत कसे दिसतात हे समजण्यासाठी अशा चित्रांची आवश्यकता लागायची. तेंव्हा काॅम्प्युटर्स नव्हते, म्हणून हाती चित्र काढावी लागत असत. पोस्टमाॅर्टेम करताना, मेडीकोलिगल प्रकरणं असल्याने मात्र कॅमेरा वापरून फोटो काढायचो.”

प्रकाशजींनी दिलेलं उत्तर ऐकून मला थेट लिओनार्दो दा विंचीच आठवला ना राव. शरीराची आतली रचना कशी असते हे समजून घेण्यासाठी विंची प्रेतं फाडून त्यांचं निरिक्षण करत असे. त्यासाठी लागणारी प्रेत मिळवण्यासाठी त्या कर्मठ काळात त्यांने काय काय दिव्य केली होती, त्याची चित्तथरारक वर्णनं मी वाचली होती. चित्रकार असलेल्या प्रकाशजींचं, चित्रकार व इतरही बरंच काही असलेल्या विंचीशी असलेल्या साम्याचं मला आश्चर्यच वाटलं. प्रकाशजींच्या चितारलेल्या कृष्णाकृतींमधे दिसणारी प्रमाणबद्धता त्यांच्या तपस्येचं फळ आहेच, परंतु त्यामागे त्यांचे जीएस मेडीकलमधले दिवसंही कारणीभूत असावेत असं मला वाटून गेलं..प्रकाश कबरे आणि लिओनार्दो विंची यांची मूळं वेगळी असली तरी कुळ मात्र एकच आहे असं मला जाणवलं..!!

प्रकाशजींशी मारलेल्या गप्पांमधून जीएस मेडीकलमधली आणखी एक गंम्मत कळली. पोस्टमाॅर्टेम रुममध्ये किंवा शवागारात वावरताना, सुरुवातीला तिथल्या फाॅरमिलनच्या उग्र वासाने डोळे चुरचुरायचे. मग काही वेळाने बाहेर येऊन बसावं लागत असे. त्यावेळी सहाजिकच डोळ्यांतून पाणी वाहात असे. शवागाराच्या बाहेर डोळ्यात पाणी घेऊन बसलेला तो तरुण प्रकाश पाहून अनेकजण “कोण?” असं पाठीवरुन सांत्वनाचा हात फिरवून विचारायचे. सुरुवातीला तो खरं काय ते सांगायचा. पण पुढे पुढे तसं सांगण्याचा कंटाळा येऊन तो सरळ नातेवाईक म्हणून सांगायला लागला.

तसं बघायला गेलं, तर आज जाती-धर्मात वाटले गेलेलो आपण एकमेकांचे कुणीही नसलो तरी, मागच्या हजारो पिढ्यांचा हिशोब मांडायला गेलो, तर आपण एकमेकांचे नातेवाईक लागतोच. विश्वची माझे घर म्हटल्यावर तर हे नातं अधिक घट्ट होतं. त्या दृष्टीने प्रकाशजींचं म्हणणं बरोबरच होतं..!

-©️नितीन साळुंखे

9321811091

03.06.2019