देवगडातलं माझं संचित..

देवगडातलं माझं संचित.. 
बऱ्याच वर्षांनी देवगडात गेलो होतो. वर्षातून दोनदा गांवी जाणं होतं. दोन्ही वेळेस मे महिन्यातच. एकदा कुटुंबाला गांवी सोडायला आणि दुसऱ्यांदा त्यांना मुंबंईला परत न्यायला. माझा गांवचा मुक्काम दोन रात्रींपेक्षा जास्त नसतो. या दोन दिवसांत किमान एक फेरी कणकवलीत असतेच. कणकवलीतल्या जुन्या मित्रांना भेटण्याच्या निमित्ताने माझं कणकवलीत जाणं होतं. माझ्या गांवाहून कणकवलीत जाणंही तसं सोयीचं.

परंतु देवगडचं तसं नाही. देवगड हायवेपासून बरंच आतमधे. रस्ताही वळणवळणाचा. घाटाचा. गाडी चालवायलाही कंटाळा येतो. म्हणून देवगडात जवळचे मित्र असुनही तिकडे हल्ली बऱ्याच वर्षांत जाणं झालं नव्हतं.

पण ह्या वेळेस ठरवून गेलो. सोबत माझ्या मुलांना घेतलंमला भेटायचं होतं माझ्या चार मित्रांना. प्रमोद जोशी, मकरंद फाटक आणि चारू  सोमण. चौथे होते प्रमोद नलावडे. यातल्या प्रमोद जोशी, चारू सोमण आणि प्रमोद नलावडे, या तिघांना मी पूर्वी भेटलोय. आता मला ह्या चार व्यक्तिमत्वाना माझ्या मुलांना भेटवायचं होत. बापाचे दोस्त काय तोडीचे आहेत, ते त्यांना थोडं दाखवायचं होत

चारू तर अगदी जवळच म्हणावा असा मित्र, चारुला कधीही हाक द्यावी, चारू हजर नाही असं कधी घडलेलाच नाही. आताही चारुकडे अगदी आयत्यावेळेस गेलो. चारू आणि त्याच्या पत्नीने भरपेट आंबे खायला घातले. त्यांच्या मुलीही होत्या घरी. पण हा माणूस त्यांच्या हातात कसली तरी हत्यारं देऊन त्यांना कसले तरी स्क्रू पिरगाळायला किंवा ढिले करायला सांगत होता. चारू आहेच अवलिया, कधी काय करेल ते सांगता यायचं नाही, पण जे करेल ते भन्नाटच असेल, याची मात्र खात्री. चारू आणि त्याच ‘गॅलॅक्सी’ हॉटेल माझ्या लेखनातून पूर्वीही बऱ्याचदा तुम्हाला भेटला आहे. 
देवगडच्या प्रमोद जोशींबद्दल मी काही सांगायला हवं असं नाही. प्रमोद जोशींची ओळख करून देणं म्हणजे सूर्याची ओळख करून देण्यासारखं आहे. कोणत्याही विषयावर काव्यातून व्यक्त होऊ शकणारे प्रमोदजी म्हणजे एक अजब रसायन आहे. कावीळ काव्य वैगेरे करण्यासाठी स्फूर्ती वैगेरे यावी लागते असं मी लहान पणापासून वाचत आलो होतो.. पण जेंव्हा पासून प्रमोद जोशींची ओळख झाली, तेंव्हा पासून लहानपणी वाचलेल्या ते फारसं खार नसावं असं खात्रीने वाटायला लागलं. प्रमोदजी दिवसाच्या आणि रात्रीच्याहि कोणत्याही वेळेला कविता करू शकतात, ती ही अगदी अर्थवाही. उगाच आपला शब्दाला शब्द आणि यमकाला यमक नाही. प्रमोदजींच्या कोणत्याही कवितेत चोख अर्थ सापडणारच. प्रमोदजींना भेटलो, मुलांना त्यांचा आशीर्वाद घायला सांगितला. प्रमोदजींनी आशीर्वादही सुगंधी दिला. महाल प्रमोदजींनी चक्क ‘कस्तुरी’ भेट दिली. आजवर कस्तुरी, कस्तुरी मृगाच्या बेंबीत मिळते असं लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचलं होत. आम्हाला ती देवगडात प्रमोद जोशींच्या मठीतही मिळते हे आता समजलं. 
त्यादिवशी देवगडचा बाजार असल्याने, प्रमोद नालावडेंच्या दुकानात काही जात आलं नाही. ती रुखरुख मनात राहिलंच. 
मकरंद फाटकांना मात्र मी पहिल्यांदाच भेटणार होतो. खार तर मला जास्त कुतूहल होतं ते मकरंदाजीचंच..!
गेल्या वर्षी याच मोसमात मला एक मेसेज आला. ‘आंब्याची पेटी पाठवतोय, पत्ता पाठवा’ असं सांगणारा. मला पुस्तकांच्या भेटी बऱ्याच येतात, पण चक्क आंबे, ते ही हापूस..! मला पहिल्यांदा आश्चर्यच वाटलं. मग साहजिकच मेसेज वाचून मला पहिल्यांदा वाटलं की, पाठवणाराने कदाचित चुकून मला मेसेज पाठवला असावा. असं अनेकदा घडतं, मेसेज पाठवायचा असतो एकाला आणि जातो दुसऱ्याकडेच. म्हटलं तसंच असावं, कारण मला कुणीतरी आंब्याची पेटी पाठवेल, असं कुणीही नाही. मला कुणीतरी काही भेट पाठवावी एवढा मी मोठा नाही की, कुठल्याही प्रभावशाली पदावर नाही. मला काही तरी देऊन माझ्या ओळखीने काही तरी काम करुन घेता यावं, इतक्या माझ्या मोठ्या ओळखीही नाहीत. मग असं असताना, अत्यंत सामान्य आयुष्य जगणाऱ्या मला कुणीतरी काहीतरी भारीसं पाठवेल, यावर मी विश्वास का ठेवावा..?

तो मेसेज माझ्यासाठीच पाठवलाय का याची खात्री करण्यासाठी, मेसेज आलेल्या नंबरवर मी फोन केला. म्हटलं मला चुकून मेसेज आलेला असायचा आणि ज्यांना तो मेसेज जाणं पाठवणाराला अपेक्षित असावं, त्यांना तो गेलेलाच नसायचा. असं होऊ नये म्हणून मी फोन केला. तो फोन होता मकरंद फाटकांचा आणि मेसेजही माझ्यासाठीच होता. आता दुसऱ्यांदा आश्चर्यचकीत होण्याची माझी पाळी होती..  

मकरंद फाटक. माझे फेसबुकरचे मित्र. फेसबुकवर आम्ही मित्र कधी झालो, फ्रेन्ड रिक्वेस्ट त्यांनी मला पाठवली, की मी त्यांना पाठवली हा तांत्रिक तपशील मला आठवत नाही. ते माझे आणि मी त्यांचा मित्र झालो, हे मात्र खरं..!

मी असं काय केलं होतं, की मकरंदजीना मला पाबे पाठवावेसे वाटले? मी कधीही त्यांना भेटलेलो नव्हतो, त्यांच्यासाठी काहीही काम केलेलं नव्हतं, त्यांच्या कधीही उपयोगीही  पडलेलो मला आठवत नव्हतं. आपल्याकडे प्रेमापोटी कुणाला काही करण्यापेक्षा, आपल्या फायद्याच्या ठरणाऱ्या किंवा ठरू शकणाऱ्या माणसांना काही ना काही भेटी देऊन उपकृत करण्याची प्रथा आहे. माणसाची ‘कमोडिटी’ झाली कि असं व्हायचंच. 

शंकानिरसनासाठी मी पुन्हा मकरंदजीना पुन्हा फोन केला आणि माझ्या मनातली शंका त्यांना विचारली. मकरंदीजीनी दिलेलं उत्तर मला अचंबित आणि माझ्यावरचे जबाबदारी अधिक वाढवणार होत. ते उत्तर काय होत हे सांगण्याआधी मी त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. 
मी गेली चार-पांच वर्ष काही ना काही लिहित असतो. लिखाण करताना मी विषयाचं असं कोणतंच बंधन मी पाळलेलं नाही. मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या कोणत्याही विषयावर मी लिखाणातून व्यक्त होत असतो. मर्यादा सांभाळतो ती फक्त भाषेची आणि शब्दांची. न आवडलेल्या विषयावर व्यक्त होतानाही, माझी भाषा आणि शब्द समोरच्याला रक्तबंबाळ करणार नाहीत, याचं भान मी नेहेमी बाळगत आलो आहे. टीका करतानाही समोरच्या व्यक्तीची, त्याच्या पदाची, प्रतिष्ठेची हानी होणार नाही याचीही काळजी मी घेत असतो. माझ्या लिखाणातून मी व्यक्त करत असलेले विचार हे माझे असतात, ते कुणाला पटावे किंवा पटू नयेत यासाठी मी लिहीत नाही. हे माझं लिखाण माझ्या मनाशी मी केलेलं उघड, परंतु प्रामाणिक स्वगत असतं. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या या लिखाणावर भरपूर कमेंट्स किंवा लाईक्स येत असतात. माझ्या लेखांतून मी व्यक्त केलेल्या विचारांशी, ते वाचणारे सर्वच सहमत असतात असं नव्हे. माझी ती अपेक्षाही नसते. माझी अपेक्ष वाचणारानी त्यांचे विचार मांडावेत, व्यक्त व्हावं आणि चर्चेची घुसलं व्हावी एवढीच असते आणि मला सांगायला आनंद वाटतो, की ती बऱ्यापैकी पूर्ण होत असते. माझ्या मूळ लेखापेक्षा त्यावरच्या कमेंट्स, त्यातील संवाद आणि क्वचितप्रसंगी होणारे वाद-विवाद जास्त वाचनीय असतात, असं मला अनेकांनी खाजगीत सांगितलं आहे. माझ्या लेखांवर सातत्याने  कमेंट्समधून व्यक्त होणारी किंवा लाईक्स देणारी काही माणसं माझ्या चागलीच लक्षात राहातात. त्यातलेच एक श्री. मकरंद फाटक..
श्री. मकरंद फाटकांना माझं लेखन आवडतं, त्यातले विचार त्यांना पटतातच असं नव्हे, परंतु त्यांना त्यातून आनंद मिळतो असं मला त्यांनी फोनवरून सांगितलं. त्याच आनंदामुळे मला ते आंब्याची भेट पाठवत असल्याचं मला त्यांनी फोनवरून सांगितलं. कुठल्याही लिहिणाऱ्याला त्याच लेखन कुणाला तरी आवडत, यापेक्षा जास्तीचा आनंद असूच शकत नाही. मला तो आनंद मकरंद फाटकांनी मिळवून दिला. त्यांनी पाठवलेली आंब्याची भेट यथावकाश माझ्या घरी पोहोचली. हे म्हणजे माझ्या आनंदावर सोन्याचा वर्ख दिल्यासारखं झालं..
मकरंदजींच्या ह्या भेटीने माझ्या घरातल्यांच्या नजरेत माझी प्रतिमा वाढली, हा त्याचा दुसरा भाग. आपला मुलगा, नवरा किंवा आपला बाप मोबाईलवर सारखं काहीतरी बडवत असतो आणि त्या बडवण्यामुळे त्याला कुणीतरी मित्र अमूल्य अशी भेट पाठवतो ह्याचा आनंद माझ्या अनुक्रमे आई-वडिलांना, बायकोला आणि मुलांना झाला. हा आनंद मी बाजारातून आंबे आणून त्यांना खायला घातले असते, त्यापॆक्षा कैक पटीने मोठा आहे. नव्हे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही.  
हे झालं गेल्यावर्षीच. यंदाही तेच झालं. मकरंदाजीचं मेसेज आला, आंबे पाठवलेत, कृपया ताब्यात घ्या, सांगणारा. मकरंदजींच्या बागेतला, त्यांच्या घामाच्या फवारणीने पोसलेला आणि वर ‘उगाच एवढंसं म्हणून’ घातलेल्या प्रेमाच्या मात्रेच्या आंब्याची चव काही न्यारीच लागली मला. ‘उगाच एवढंसं म्हणून  म्हणजे नेमकं किती, हे फक्त प्रेमाने खाऊ घालणाऱ्या अन्नपूर्णांना माहित असत. माझं लिहिणं कृतार्थ झालं. भविष्यात आणखी जबाबदारही होईल. 
देवगडात मकरंदजींच्या घरी गेलो. मकरंदजीना उराउरी भेटलो. सौ. मनीषा वहिनींचा आपुलकीचा पाहुणचार घेतला. थंडगार पन्ह प्यायलो. पुन्हा मागूनही घेतले. त्यांनी ते तर दिलाच, वर घरी नेण्यासाठी बाटलीत भरूनही दिल. वर चवींचा समतोल साधावा म्हणून आंब्याचं लोणचंही दिल बाटलीत भरून, त्या लोणच्यासोबतच माझं साध्याच जेवण जातंय. किंबहुना ते लॉन्च आहे म्हणून मला सारखं जेवावंसं वाटत. मकरंदजींच्या सर्व कुटुंबाला भेटलो, त्यांच्या वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि भरून पावून घरी आलो. 
-नितीन साळुंखे 
14.06.2019
(31.05.2019)