वेल डन मित्रहो, जिंकलास भावांनो..

#मालवणी_बोली_साहित्य_संमेलन

वेल डन मित्रहो, जिंकलास भावांनो..

काल मुंबईतल्या दादरमधे सहावं ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलन’ ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर भोगले यांच्या अध्यक्षतेखाली साजरं झालं. सलग वर्षी संपन्न झालेलं हे दुसरं संम्मेलन. गत वर्षी साधारण याच सुमारास पांचवं संम्मेलन कणकवलीत साजरं झालं होतं आणि त्याही संम्मेलनाला उपस्थित राहाण्याचं भाग्य मला लाभलं होतं.

कालचं संम्मेलन अनेक अर्थांनी वेगळं होतं. मुंबईत मालवणी भाषा साहित्य संम्मेलन भरवण्याचं आव्हान, नव्यानेच स्थापन झालेल्या ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’ या संस्थेनं स्वीकारलं होतं. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा कोणताही प्रत्यक्ष अनुभव नसताना प्रतिष्ठानच्या अधर्व्यूंनी हे आव्हान स्वीकारणं हे मोठंच वेगळेपण. दुसरं वेगळेपण म्हणजे कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना चहा-अल्पेपहार-जेवण इत्यादी संपूर्ण नि:शुल्क देण्याचं आव्हान. तिसरं वेगळेपण म्हणजे या संम्मेलनात कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींची नसलेली लुडबूड. हे सर्वात महत्वाचं वेगळेपण. मालवणी भाषेवर प्रेम करणाऱ्या सामान्य मालवणी माणसाने, सामान्य मालवणी माणसाचं, असामान्यपणाने केलेलं हे प्रेमाचं आदरातिथ्य होतं..!!

सतत तीन महिने अनेक माध्यमांतून या संम्मेलनाची जाहिरात करण्यात येत होती. त्या शिवाय अगत्याची वैयक्तिक निमंत्रणंही जात होती. येवढं करुनही कितपत रसिक हजेरी लावतील याची शंकाच होती. अशी शंका येण्याचं कारण म्हणजे यापूर्वी झालेल्या पाचंही संम्मेलनात रसिकांचा फारसा प्रतिसाद नव्हता, ते ही ही पाचंही संम्मेलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली असताना. त्यातल्या कणकवलीत झालेल्या गेल्या पांचव्या संम्मेलनात मी ही उपस्थिती लावली होती आणि न-गर्दीचा अनुभव घेतला होता. त्या अनुभवाची भिती मनात होतीच, वर संम्मेलनाचा दिवस रविवार, म्हणजे मुंबई लोकलच्या मेगाब्वाॅकचा दिलस. लोक या दिवशी घराबाहेर पडायलाच घाबरतात. म्हणून जास्तित जास्त मालवण्यांनी मुंबईतल्या संम्मेलनात यावं, याचा सर्वबाजूने प्रयत्न सुरू होते.

आणि काल मुंबईच्या पावसाप्रमाणेच, सर्वांचे अंदाज चुकवत मुंबईतला मालवणी माणूस बायका-पोरासहित (स्वत:च्याच), कुठल्यातरी रवळनाथाच्या किंवा आंगणेवाडीच्या जत्रेला नटून-थटून श्रद्धेनं जावं त्याच उत्साहाने मालवणी माणूस कालच्या आपल्या भाषा उत्सवाला आला आणि थेंब पावसाचे पडल्यावर अत्तराचे भाव जसे कोसळतात, तसेच पावलांच्या पडलेल्या अमाप ठशांनी आयोजकांचे सर्व अंदाज कोसळवले..

दोन-अडीचशे लोक येतील न येतील या अंदाजाने एअर कंडिशन्ड हाॅल बुक केलेला, तिथे सहाशेच्यावर मालवणी रसिक आले. जवळपास तिप्पट. ऐन मिरगाचा वखत असुनही पवासाच्या धारांत भिजणं काही झालं नव्हतं, परंतु प्रचंड गरमीने घामाच्या धारा लागलेल्या. बसायला जागा नाही. एसीने कधीच राम म्हटलेला. तरीही आयोजक उत्साहाने कार्यक्रमाचं संचालन करत होते आणि कोट-जाकीटं घातलेले पाहुणे त्साच उत्साहाने भाषणही करत होते. मालवणी रसिकही घाम पुसत पुसत ते आनंदाने ऐकत होते. सर्वचजण समान पातळीवर होते. कुठेही कुणाची तक्रार नाही की हुल्लडबाजी नाही. घरचं कार्य असताना काही अडचणी आल्याच तर, तर एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं, अशा समजूतदारपणाने सर्व सोहळा चालू होता. सर्वच एकरुप झालेले असतात, तेंव्हा कुठेही अडचणी जाणवत नाहीत, याच उत्तम उदाहरण म्हणजे कालचा ‘मालवणीचा गोंधळ’..!

गोंधळ या शब्दाचा मराठी अर्थ विस्कळीतपणा असा असला तरी, मालवणीत तो श्रद्धा असा आहे..त्या अर्थाने मी ‘मालवणीचा गोंधळ’ असा शब्दप्रयोग केला आहे..!

संम्मेलनातली उतू जाणारी मालवणी गर्दी पाहून, मला गृहप्रवेशाच्या वेळी केला जाणारा एक पारंपारीक विधी आठवला. नवीन घरात प्रवेश करताना, त्या घरातील नवीन चुलीवर(आपण गॅसवर म्हणू) दूध मुद्दामहून उतू घालवतात. नवीन घरात सुख-समृद्धी भरून वाहो, ही भावना त्यामागे असते. कालचं सम्मेलन हे मुंबईत नव्यानेच आयोजित केलं होतं. प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या नूतन कार्यात भरून वाहात असलेल्या कालच्या गर्दीकडे पाहून, मला ते उतू जाणारं समृद्धीचं प्रतिक असलेलं दूध आठवत होतं. कालची उतू जाणारी माणसांची समाधानी गर्दी, मला मालवणीच्या भविष्यातील समृद्धीसाठी शुभसंकेत वाटला..

काल संपन्न झालेलं मालवणी भाषा संम्मेलन सर्वच अर्थानी यशस्वी झालं. सिंधुदुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश सरवणकर, पदाधिकारी श्री. नितीन, श्री. राजेश राणे, श्री. राम साळुंके, सल्लागार व माझे मित्र हेमंत पवार, दर्शन नेवरेकर, वैभव परब, अभिषेक कांबळी, प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी /कार्यकर्ते यांनी घेतलेल्या कष्टाचं सार्थक झालं..पहिलंच एवढं मोठं सार्वजनिक कार्य असुनही त्यांनी ते कल्पनेबाहेर यशस्वी करुन दाखवल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन..! (मला कृपया सर्व कार्यकर्त्यांनी आणि नऊवारी धारण केलेल्या कार्यकर्तींनीही, आपापले फोटो व नांव माझ्या नंबरवर व्हाट्सअॅप करावीत, म्हणजे सर्वांची नांवं लिहिता येतील, ही विनंती)

काल माझा एक मित्र संम्मेलनात मला भेटायला आला. गर्दी पाहून मला म्हणाला, “नितीनजी, पुढचं संम्मेलन तुम्हाला शिवाजी पार्कातच घ्यावं लागणार बहुतेक, आतापासूनच बुक करुन ठेवा..!” माझ्या गैरमालवणी मित्राने काढलेले हे उद्गारचं कालच्या संमेलनाच्या यशस्वीततेची पावती आहे, असं मी मानतो..

वेल डन मित्रहो, जिंकलास भावांनो..

-नितीन साळुंखे

9321811091

24.06.2019

*हा कालच्या संम्मेलनाचा वृत्तांत नव्हे, तर मी या संमेलनात काय अनुभवलं आणि त्याकडे कसं पाह्यलं, त्याची कथनी आहे.