जनता स्वत: बदलू इच्छीतेय का?

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

जनता स्वत: बदलू इच्छीतेय का?

मला आज अमिताभ आठवतोय. तोच ८०-९०च्या दशकातला, अन्यायाविरुद्ध लढणारा. गुंड, स्मगलर्स, हप्तेबाज यांच्याविरुद्ध लढणारा, सामान्य माणसाचा ‘राॅबिनहूड’. जंजीर, दिवार, शोले, अमर-अकबर-अॅंथनी अशी किती चित्रपटांची नांवं सांगायची. या व अशासारख्याच दे-मार चित्रपटांनी अमिताभला सुपरस्टार बनवलं. ह्या सर्व चित्रपटांची कहानी वेगवेगळी असली तरी, त्या सर्वच चित्रपटांत एक सूत्र मात्र समान होतं आणि ते म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठणं, प्रसंगी कायदा हातात घेणं आणि सामान्य बस्तीवाल्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देणं..! ह्याच सुत्राने अमिताभला सुपरस्टार बनवलं..!!

पुढे कधीतरी अनिताभ त्याव्ळच्या सामान्य जनतेच्या गळ्यातला ताईत का बनला, त्याचं महत्वाचं कारणं कुठेतरी वाचनात आलं आणि मला ते मनोमन पटलं..

त्याकाळात भारतात लायसन्स राज, परमिट राज जोरात होतं. लहान-सहान गोष्टींसाठी सरकारी अधिकारी जनतेला त्रास देत असत. लायसन्स राज/परमिट राजचं परिवर्तन भ्रष्टाचारात होणं अगदी सहाजिक होतं. स्मगलर्स-गुंड यांना राजकीय आश्रय असे. सामान्य जनतेला कुणीही वाली उरला नव्हता. पण आपण काहीच करु शकत नाही या असहाय्य विचाराने जनतेच्या मनात असंतोष खदखदत होता. अशावेळी मोठ्या पडद्यावर अमिताभ अवतरला आणि जनतेच्या मनातल्या चीड, असंतोष, असहाय्यता आदी भावनांना त्याने पडद्यावर वाट करुन दिली आणि अमिताभ यशस्वी झाला.

आपल्याला जे करावंसं वाटतं, ते जनतेच्या मनातली कृती अमिताभ खोटी-खोटी का होईना, पडद्यावर करत होता आणि म्हणूनच जनतेकडून अमिताभला ‘अॅंग्री यंग मॅन’ची किताबत दिली गेली होती. मला हे कारण मनोमन पटलं होतं.

हे सर्व आठवायचं कारण म्हणजे, काल-परवाच कणकवली-देवगडचे विद्यमान आमदार नीतेश राणे यांनी, अॅंग्री यंग मॅन’च्या भुमिकेत शिरून महामार्ग अभियंता श्री. शेडेकर यांना घातलेली चिखलाची आंघोळ..! अगदी चिखलस्नान नव्हे, पण सरकारी नोकराला वठणीवर आणण्यासाठी असाच काहीसा प्रकार आमदार बच्चू कडू यांनी देखील केलेले आहात. इथे मला श्री. नीतेश राणे किंवा बच्चू कडू वर उल्लेख केलेल्या अमिताभच्या भुमिकेत दिसतात. त्यांनी केलेलं बरोबर की चूक, हा इथे विषय नाही, पण त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनागल्या शासन आणि प्रशासन यांच्याबद्दल मनात साचलेल्या असंतोषाला आणि चिडीला वाट करुन दिली आहे, याबद्दल वाद नाही.

आमदार नीतेश राणेंची कृती पाहून ८०-९०च्या दशकातला अमिताभ आठवला तरी नीतेश राणे अमिताभ नाहीत, याची मला जाणीव आहे. इथे प्रश्न नितेश राणेचा नाही, तर ते ज्या शासनात जनतेचं प्रतिनिधीत्व करतात, ती शासन नामक व्यवस्था, एखाद्या अधिकाऱ्याला अपमानीत करण्यासाठी, स्वत: चारित्र्यवान आहे का, हा खरा प्रश्न आहे. शासनात जाण्यासाठी प्रचंड चढाओढ असते, एका रात्रीत पक्षनिष्ठा बदलते किंवा प्रसंगी खूनही पडतात, ते काय जनतेची सेवा करण्यासाठी नाही. शासनात जाण्याची स्पर्धा असते ती, तिथे असलेल्या प्रचंड बेहिशोबी पैशांसाठी, हे आपण सारेच जाणतो. अमिताभच्या भराच्या काळात हे पैसे लायसन्स-परमिटच्या मार्गातून मिळवले जायचे, तर आताच्या डिजिटल इंडीयात हे पैसे टेंडरांच्या माध्यमातून मिळवले जातात. असे पैसे मिळवण्यात सर्वच पक्ष आघाडीवर असतात, इथे सोवळं कुणीही नाही. .! तेंव्हाचे ‘गरीबी हटाव’वालेही त्यात होते आणि आताचे ‘न खाऊंगा और न खाने दुंगा’ वालेही त्यात आहेत. गुंड-खंडणीखोर तर आता स्वत:च नेते झालेत. अशा परिस्थित कोण कोणावर नियंत्रण ठेवणार, हा प्रश्नच आहे. यांच्यापैकी कुणीही कुणावर नियंत्रण ठेवताना आढळलं, तर निवडणुका जवळ आहेत असं खुशाल समजावं.

शासन आणि प्रशासन यांचा वास्तविक एकमेकांवर वचक असवा अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात हे दोन्ही महत्वाचे घटक हातात हात घालून एकमेकांचं (मुख्यत्वेकरून आर्थिक)हित साधण्यात मग्न असल्याचं दिसून येते. जेंव्हा या दोन्हीपैकी एकावर आरोप केला जातो, तेंव्हा हे दोन्ही घटक, कायद्याच्या निरनिराळ्या खऱ्या-खोट्या कलमांच्या आडून एकमेकांना सांभाळून घेताना पाहायला मिळतं.

आणि, आणि या दोन घटकांवर जिचं सर्वोच्च नियंत्रण असावं अशी अपेक्षा असते, ती सार्वभौम जनती तरी कुठे शुद्ध आहे? तिनेही आपलं स्वातंत्र आपापल्या जातीच्या, धर्माच्या, पक्षाच्या किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या चरणी वाहीलेलं दिसत. शासन-प्रशानातल्या चुकीच्या गोष्टींवर बोलताना, चूक करणारा आपल्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा किंवा साहेबांचा माणूस तर नाही ना, हे पाहून जनता आपली भुमिका ठरवत असताना दिसते. त्यातून एखाद्याने तसं धाडस केलंच, तर मग त्याच्यावर जातद्रोहाचा, धर्मद्रोहाचा, पक्षद्रोहाचा आणि आता तर थेट देशद्रोहाचाच आरोप केला जातो.

जनतेला शासन-प्रशासनावर वचक ठेवायचा असेल तर, प्रथम जात-धर्म-पक्ष-नेता यांचा लोभ आणि भिती दूर करायला हवी. हेच ते लोभ आणि भितीचं जोडपं, जे महामार्गावरच्या खड्ड्यांना आणि खेकड्यांनी उध्वस्त केलेल्या धरणांना जन्म देतं.

आपण सर्वांनीच वैयक्तिक फायद्यांसाठी स्वत:ला या भ्रष्ट यंत्रणांना विकलेलं आहे, हे नाकबूल करण्यात काहीच अर्थ नाही. एकदा का आपण स्वत:ला शासन नामक यंत्रणेला विकलं की, त्यामुळे प्राप्त अधिकारांचा उपयोग या यंत्रणेने आपल्याला गृहीत धरण्यासाठी केला, तर त्यात नवल काहीच नाही. आपल्या देशात हेच सध्या सुरू आहे..!

आपण बदललो, की शासन-प्रशासन आपोआप बदलेलं. इथे प्रश्न हा आहे की, जनता हे सर्व बदलू इच्छीते का आणि तसं इच्छीत असेल तर, तिची स्वत: बदलायची इच्छा आहे का?

-नितीन साळुंखे

9321811091

08.07.2019