वीणा गवाणकर आणि त्यांची ‘गोल्डा’..!

वीणा गवाणकर आणि त्यांची ‘गोल्डा’..!

तो दिवस होता २२ जून २०१९. वार शनिवार. माझे मित्र व सुप्रसिद्ध लेखक, कवी, समूपदेशक श्री. प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. स्थान होतं वसई.

श्री. प्रसाद कुलकर्णी या बहुआयामी व्यक्तिमत्वाची माझी भेट झाली ती एका व्हाट्सअॅप ग्रुपमधे. त्या ग्रुपवर अनेकदा आमच्या चर्चा व्हायच्या, विचारांचं आदान-प्रदान व्हायचं, फोनवरही बोलणं व्हायचं, पण आमची प्रतिअक्ष भेट अशी काही झाली नव्हती. तो योग त्या दिवशी आला. श्री. कुलकर्णींना भेटता येईल या हेतूने मी वसईला त्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेलो.

कुलकर्णी वसई स्टेशनवरच भेटले. आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी काहीसे लवकर पोहोचल्याने, पाहुण्यांसाठी असलेल्या खोलीत बसून तेवढ्या वेळात आमच्या भरपूर गप्पाही झाल्या. निमंत्रित पाहुणे येत होते. कुलकर्णींची भेट घेत होते. गाडीबरोबर नळ्याचीही यात्रा या न्यायाने, आलेल्यांशी माझीही ओळख करून देत होते. अर्थात, त्यात शिष्टाचाराचा भाग होता. बरं, मी ताड-माड उंचीच्या आणि तेवढ्याच उंचीचं कर्तुत्व असलेल्या कुलकर्णींच्या तुलनेत, मी उंचीने आणि वकुबानेही अगदीच धाकटा. त्यामूळे, माझी ओळख करुन दिल्यावर, ‘ओऽऽऽ, साळुंखे, तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय साहित्य क्षेत्रात’ वैगेरे आनंदाचे चित्कार ऐकू येण्याची सुतराम शक्यता नव्हती. मी मात्र साहित्य क्षेत्रातल्या त्या तोलामोलाच्या महानुभावांना पाहून, त्यांना नमस्कार करताना आनंदात नहात होतो. त्यात कवी अशोक बागवे होते, कवी सतिश सोळांकुरकर होते आणि बालसाहित्यासारखा अवघड साहित्यप्रकार लिलया हाताळणारे एकनाथ आव्हाडही होते. लेखनकामाठी करणारांना माझ्या मनात सर्वोच्च आदराची भावना आहे. त्यात हे सर्व ह्या क्षेत्रातले दिग्गज..! ह्या सर्वांना याची डोळा पाहाण्याचं, त्यांच्याशी दोन शब्द बोलण्याचं भाग्य मला प्रसाद कुलकर्णींमूळे लाभलं होतं. प्रसादजी, मी आपला आभारी आहे.

त्या तिथेच, आमच्यापासून काहीशा दूर अंतरावर दोन स्त्रिया आपसांत गप्पा मारत बसल्या होत्या. कुलकर्णींशी हस्तांदोलन करुन पुढे जाणारे काही पाहुणे, त्या स्त्रियांपाशी जाऊन, अदबीने झुकून त्यांच्याशी दोन शब्द बोलत होते. त्या दोघी कोण, याची माझी उत्सुकता वाढत होती. मधे थोडीशी सवड मिळताच, मी कुलकर्णींना तसं विचारलं. वीणा गवाणकर आणि शोभा बागूल, कुलकर्णी म्हणाले. ती नांवं ऐकून मी तर तीन ताड उडालोच.

मग काही वेळाने, कुलकर्णींनी माझी वीणाताई आणि शोभाताई बागुलांची ओळख करुन दिली. शोभा बागूल म्हणजे बाबुराव बागूलांची कन्या. बाबुरावांची दोन पुस्तक मी वाचलेली होती आणि त्यांच्याबद्दलचा आदर मनात होताच. साक्षात त्यांच्या कन्येला भेटून, बाबुरावांना पाहिल्याचा आनंद मला झाला.

आणि वीणा चंद्रकांत गवाणकरांबद्दल मी काय सांगावं..! वीणाताईना भेटून अाजी म्या परब्रम्ह पाहिल्यासारखं वाटलं. मध्यम चणीच्या, गोरटेल्या चेहेऱ्याच्या आणि कुणातही सामान्य गृहिणी म्बणून सहज खपून जातील अशा वीणाताईं म्हणजे साक्षात सरस्वतीच..! सरस्वतीत लक्ष्मीचा हॅलोजनी दिखावूपणा नाही. तिच्यात समईचा आश्वस्त करणारा शातं, स्निग्धपणा असतो आणि पावित्र्यही असतं! वीणाताईंच्या साध्या व्यक्तिमत्वात मला अशीच मंदपणे तेवणारी समई दिसली, देशोदेशींच्या कर्मवीरांना प्रकाशात आणणारी..!

वीणाताईंच्या ‘एक होता कार्व्हर’ची मी पारायणं केली होती. मला वीणाताईंची ओळख होती ती ‘कार्व्हर’ची शब्दजन्मदात्री म्हणूनच. परंतु त्यांनी इतरही त्याच तोलाची पुस्तकं लिहिलीयत, हे माझ्या गावीही नव्हतं. मी चांगला वाचक आहे, असं मला माझ्याबद्दलच असलेल्या गर्वाचं तिथेच हरण झालं. वीणाताईंनी ‘एक होता कार्व्हर’सहीत एकूण १३ पुस्तकं लिहिली आहेत, सर्वच चरित्रग्रंथ..! त्यातल्या ‘एक होता कार्व्हर’च्या ४२, हो, चारावर दोन बेचाळीस आवृत्त्या निघाल्यायत आणि पुढेही निघत आहेत. हे सर्व कार्य अबब प्रकरातच मोडणारं..!

मी अगदी नवोदीत असुनही वीणाताई माझ्याशी आपुलकीने बोलल्या. माझ्या लिखाणाविषयी त्यांनी माहिती करुन घेतली. त्याला पुरक अशा वाचनासाठी काही पुस्तकांची नांवही सुचवली. एवढंच नव्हे तर, ‘अशी ही चरित्रे’ ह्या त्यांच्या ‘प्रतिलिपी’वरील लेखाची लिंकही मला आठवणीने पाठवून दिली. एवढी मोठी लेखिका, आमच्या अवचितच झालेल्या भेटीत माझ्याशी इतक्या आपुलकीने बोलली, याचंच मला अप्रूप वाटलं..! मी तरंगतच घरी परतलो. वीणा गवाणकरांची भेट या गोष्टीसाठीही मी प्रसाद कुलकर्णींचा जन्मभर ऋणी राहीन.

घरी परतलो, ते वीणाताईंनी लिहिलेली सर्व पुस्तकं वाचायची याचा निश्चय करुनच. त्यांचं सर्वात शेवटचं पुस्तक, ‘गोल्डा’ वाचायचं ठरवलं. माझ्या नेहेमीच्या दुकानांतून चौकशी केली असता पुस्तक उपलब्ध नसल्याचंच समजत होतं. असाच एका रात्री दादरच्या ‘आयडीयल’मधे चौकशी केली. एखादी प्रत असेल, पाहातो असं काऊंटरवरच्या विक्रेत्याने सांगितलं. माझी आशा पल्लवीत झाली. दोन मिनिटाने तो, प्रत सापडत नाही म्हणत परत आला. त्यांनाही दुकान बंद करण्याची घाई असावी. मी म्हटलं, शोधून ठेवा, मी उद्या येईन..! तो बरं म्हणाला. तेवढ्यात दुसरा सेल्समन बाहेरून तिकडे आला. त्यांने माझी ‘गोल्डा’ची मागणी त्याच्याही कानावर घातली आणि पुस्तक घेण्यासाठी उद्या हे येतील, असं त्याला सांगितलं. तो म्हणाला एकच मिनिट थांबा आणि अक्षरक्ष: त्या एका मिनिटात त्यांने मला ‘गोल्डा’ हातात ठेवलं..थोडंसं मळलेलं, चुरगळलेलं. बहुदा माझीच वाट पाहात लपून राहिलेली गठ्ठ्यातली सर्वात शेवटची प्रत असावी.

‘गोल्डा’ हातात पडताच मला झालेला आनंद अवर्णणीय होता. मला ते पुस्तक आतून वाचायचं होतं, बाहेरून कसंही असलं तरी माझी काहीच हरकच नव्हती..!

घरी आल्यावर बैठक मारून पुस्तक वाचायला घेतलं. त्या राग्री पहाटे अडीच पर्यंत व दुसऱ्या रात्रीत संपूर्ण पुस्तक वाचून संपवलं. हे माझं पहिलं वाचन. मी कोणतही पुस्तक दोनदा वाचतो. एकदा आधाशासारखं, पटापट आणि दुसऱ्यावेळी सावकाश, रवंथं करत. ‘गोल्डा’चं पहिलं वाचन सपलं आणि दुसरं वाचन सुरू आहे.

इस्त्राएल आणि त्या देशाची ‘मोसाद’ ही गुप्तहेर संस्था, हा माझ्या कुतूहलाचा आणि कौतुकाचाही विषय. ‘म्युनिक’, ‘आपरेशन ब्लॅक थंडर’, ‘आईकमन’, ‘आॅपरेशन फिनाले’ इत्यादींसारखे त्यांच्या चित्तथरारक कारवायांवरचे चित्रपट तर मी अनेकदा पाहिले होते आणि अजुनही पाहातो. त्या चित्रपटांतून, हातात शिलगवलेली सिगारेट घेऊन, समोरच्यांना स्वत: काॅफी बनवून देत शांतपणे राजकीय पटावरच्या बुद्धीबळाचा डाव कसा खेळावा हे समजावून सांगणाऱ्या इस्त्राएलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्डा मेंअरच्या, निर्विकार चेहेऱ्याचं होणारं दर्शन पाहून, तिच्याबद्दलचा दरारा आणि आदरमिश्रीत कुतूहल जागृत झालं होतं. पुढे ‘किबुत्झमधला डॅनी इथे आला होता’ हे अनंत सामंत यांचं एंटेबे कारवाईवरचं तेवढंच खिळवून ठेवणारं पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि तिच्याबद्दलचं माझं कुतुहल अधिकच गडद झालं होतं.

आता वीणाताईंनी लिहिलेल्या ‘गोल्डा’चं वाचन करुन माझं कुतूहल बरंचसं शमलं आणि तेवढं आणखी वाढीसही लागलं. वाढीस लागल्याचं कारण म्हणजे वीणाताईंच्या पुस्तकातून गोल्डाचं माणूस म्हणून सामोरं येणं. गोल्डाला मी आतापर्यंत मी दगडी काळजाची इस्त्राएलची एक राजकीय व्यक्तिरेखा म्हणूनच ओळखत होतो, पण ती त्याही पलिकडे एक माणूस होती आणि केवळ इस्त्राएलमधील ३०-३५ लाखांच्या ज्यूंचीच नव्हे, तर जगभारात पसरलेल्या दिड-दोन कोटी ज्यूंची माताहा होती, हे मला वीणाताईंच्या पुस्तकातून समजलं आणि मला तिच्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली. कोणतंही पुस्तक आपल्याला अधिक वाचनास उद्युक्त करतं, ते पुस्तक खरा ज्ञानग्रंथ समजावा ह्या कसोटीवर ‘गोल्डा’ पूर्णपणे खरं उतरतं..!

स्वत:ला फक्त ‘गोल्डा’ म्हणून संबोधावं असं आग्रहाने सांगणाऱ्या गोल्डाचं, त्याच नांवाचं हे चरित्र वीणाताईंनी मोठ्या ताकदीने शब्दबद्ध केलंय. म्हणायला याची नायिका गोल्डा मेअर असली तरी, हे पुस्तक इस्त्राएलची उभारणी कोणत्या कष्टांतून आणि ज्यूंच्या दुर्दम्य इच्छशक्तीतून कशी झाली आणि त्यातून गोल्डाचं नेतृत्व कसं आकाराला येत गेलं, याची यथार्थ कल्पना देतं. गोल्डासोबतच हे पुस्तक, सभोवतालच्या २० अरब शत्रू राष्ट्रांना आपल्या ताकदीच्या जरबेत ठेवलेल्या इस्त्राएलचाही चरित्र ग्रंथ आहे, असं समजण्यास हरकत नाही. वीणा ‘कार्व्हर’करांचं ‘गोल्डा’ पुस्तक आपण सर्वांनी हे वाचायलाच हवं..!

गोल्डा मेअरचं शब्दचित्र आपल्या ओघवत्या शैलीतून समर्थपणे उभं करताना वीणाताईंनी घेतलेलं कष्ट पानेपानी जाणवतात. ह्या पुस्तकातील दहा ओळींचा एक परिच्छेद लिहिण्यासाठी वीणाताईंना शेकडो पानांची काही पुस्तकं नक्की वाचावी लागली असणार. अक्षराक्ष: हजारो संदर्भ त्यांना तपासावे लागले असणार, ह्याची मला कल्पना आहे. स्वत: वीणाताईनी हे पुस्तक लिहिताना, हे पुस्तक निर्दोष व्हावं म्हणून, पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत, बारा-बारा तास ह्या पुस्तकावर काम केल्याचं म्हटलं आहे. पण मला वाटतं त्याहीपेक्षा जास्त कष्ट त्यांनी घेतलेले असावेत. अन्यथा रुक्ष राकीय डावपेचांची तेवढीच रुक्ष डाॅक्युमेंटरी बनू शकणारं हे पुस्तक, उतकंठा वाढवणाऱ्या, खिळवून ठेवणाऱ्या एखाद्या रोमांचक चित्रपटासारखं बनूच शकलं नसतं.

वयाच्या सत्तरीत गोल्डा इस्त्राएलची पंतप्रधान झाली. त्याच वयात आता स्वत: असताना वीणातईंनी ‘गोल्डा’ला आपल्यासमोर समर्थपणे उभं केलंय. वय ही फक्त एक संख्या असते ही उक्ती, जिच्याविषयी लिहिलं गेलंय ती गोल्डा आणि ज्यांनी लिहिलंय त्या वीणाताई यांच्याकडे पाहाताना पटू लागते..

वीणाताई, औक्षवंत व्हा आणि असेच शब्दखजिने आम्हासमोर खुले करत राहा..!

-नितीन साळुंखे

9321811091

13.07.2019