डॉ.आ.ह. साळुंखे; मला वाट दाखवणारा ध्रूवतारा..

डॉ.आ.ह. साळुंखे; मला वाट दाखवणारा ध्रूवतारा..

काल दिनांक २० जुलै रोजी दादरच्या वनमाळी हाॅलच्या सभागृहात ‘विजय सातपुते स्मृती दिना’निमित्त, ज्येष्ठ विचारवंत, साक्षेपी संशोधक-अभ्यासक-लेखक डॉ.आ.ह. साळुंखे यांना ऐकण्याचा योग आला.

डाॅ. साळुंखे यांच्या ग्रंथांचा मी एक लहानसा वाचक आहे. त्यांची अनेक पुस्तकं मी वाचत असतो. जगताना मला पडत असलेल्या सामाजिक प्रश्नांची आणि माझ्या मनाला जाणवत असलेल्या भारतीय समाजमाणसाच्या मनातील थरांत समस्यांवरची अनेक प्रश्नांची उत्तर मला डाॅ. साळुंखेच्या ग्रंथांमधून सापडतात.

मी गेली काही वर्ष डाॅ. साळुंखेनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत आहे. तसं चालताना मी मला प्राप्त बुद्धीचा उचीत वापर करण्याचाही प्रयत्न करत असतो.

ध्रूव तारा आपल्याला रात्रीच्या अंधारात दिशा दाखवण्याचं काम करत असला तरी, पायाखालची वाट मात्र आपली आपल्यालाच शोधावी लागते. प्रसंगी नवीन वाट पाडायला लागते. त्या दृष्टीने मी डाॅ. साळुंखेंना माझ्या वैचारिक वाटचालीतील दिशादर्शक ध्रुव ताऱ्याचं स्थान माोठ्या सन्मानाने दिलेलं आहे. अशा डाॅक्टर साळुंखेंना ऐकण्याची संधी मी दवडणं शक्यच नव्हतं..!

कालच्या कार्यक्रमात डॉ आ. ह. साळुंखे यांच्याशी गप्पा मारताना, प्रा. वृषाली विनायक आणि श्री. राज असरोंडकर यांनी त्यांना विचारलेल्या अनेक प्रश्नांना डाॅक्टरांनी दिलेल्या उत्तरातून, माझ्या मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरं आपसूक मिळत होती, तर काही प्रश्नांची उत्तरं शोधताना मी करत असलेला विचार योग्य मार्गावर असल्याची नकळतची पावतीही मला मिळत होती. बोलीभाषा-प्रमाणभाषा, धर्म, धर्माची भिती, त्या भितीतून निर्माण झालेले हीतसंबंधं, त्या हितसंबंधांचे माजलेले देव्हारे, गोतम बुद्धाचे विचार, त्या विचारांचं आपल्या मातीशी असलेलं नातं इत्यादीसंबंधीचे त्यांचे विचार, श्रोत्यांना समजेल अशा सोप्या शब्दांत, सहज समजतील अशी उदाहरणं देऊन प्रकट केले. मला कल समृद्ध झाल्यासारखं वाटलं.

अशा या विचारवंतांना प्रत्यक्ष पाहाण्याचा, त्यांच्या विचारधनाचा आनंद घेण्याचा, त्यांच्याशी दोन शब्द बोलण्याचा योग काल मला मिळाला. ही संधी मला ज्यांच्यामुळे प्राप्त झाली ते माझे स्नेही श्री. शरद कदम, माझी छोटी मैत्रिण उल्का मेस्त्री-पुरोहित आणि ‘विजय सातपुते मित्र परिवारा’चा मी आभारी आहे.

-नितीन साळुंखे

9321811091