कुतुहल लालबागचं- भाग पहिला

गिरणगांवचं मुख्य ठाणं असणारं लालबाग आणि त्याचं ‘लालबाग’ हे नांव आणि सर्वच सण-समारंभात, विशेषत: गणेशोत्सवात ओसंडून वाहाणारा लालबागकरांचा (पक्षी:गिरणगांवकरांचा) उत्साह हा माझ्या कुतुहलाचा विषय.

उद्याच्या गणेशोत्सवानिनित्त, माझ्या मनात लालबागविषयी असलेल्या माझ्या लहानपणापासूनच्या ह्या दोन कुतूहलांचा शोध घेणारा माझा हा लेख दोन भागात..

#भाग_पहिला-

लालबाग; कुतूहल ह्या नांवाचं..

लालबाग. मुंबईतल्या ह्या भागाचं मला लहानपणापासूनच कुतूहल आहे. मुख्य मुंबई शहराच्या हृदयस्थानी असलेला हा भाग हृदयासारखाच धडधडणारा असलेला मी पाहिलेला आहे. त्यात हृदयाचा संबंध रक्ताभिसरणाशी. एकेकाळच्या, म्हणजे गिरणी संपाच्या पूर्वीच्या लालबागचा, मुंबईच्या हृदयस्थानी असलेल्या लालबागच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अभिसरणाशी असलेला, हृदयाच्या रक्ताभिसरणाशी दाखवणारा थेट संबंध, माझं हे कुतूहल आणखी गडद करायचा. लाल रंग हे दृष्टीस पडणारं रक्ताचं मुख्य वैशिष्ट्य, मग ते रक्त कुणाही जाती-धर्माच्या व्यक्तीच असो. हा लाल रंग आपल्या नांवाच्या सुरुवातीच्या अक्षरात धारण करणाऱ्या ह्या विभागाच्या ‘लाल’बाग ह्या नांवांपासूनच माझं कुतूहल सुरु होतं

पुढे थोडासा जाणता झाल्यावर मुंबईच्या एकूणच इतिहासाबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि त्यातून वाचन सुरु झालं. ह्या वाचनात मला भायखळा सांपडलं, परेल सापडलं, माझगांव सापडलं. ह्या त्याकाळच्या मुख्य शहरांचा इतिहास सापडला. परंतु लालबाग काही सापडलं नाही. बर, लालबागला जवळ असलेलं रेल्वेचं स्टेशन म्हणजे चिंचपोकळी. स्टेशन चिंचपोकळी आणि प्रत्यक्षात त्या गावांचं नांव मात्र लालबाग, हे समीकरण मला लहानपणापासूनच पटत नव्हतं. पुढे ह्या नावांचा शोध घेताना, चिंचपोकळी आणि लालबाग ही दोनही नांव, त्या परिसरात कोणे एके काळी असलेल्या दोन बंगल्यांच्या नांवावरून पडलेली आहेत, असं लक्षात आलं.

ब्रिटिश नेव्ही मधले एक अधिकारी बुखानन यांचा ‘चिंट्झ पुगली’ नांवाचा एक बंगला स्टेशन परिसरातच कुठेतरी होता, त्यावरून ‘चिंचपोकळी’ हे येथील स्टेशनाचं नांव आलंय, असं डॉक्टर अरुण टिकेकरांनी त्यांच्या ‘स्थल-काल’ ह्या पुस्तकात लिहून ठेवलेलं मला आढळलं. ह्यातील ‘चिंट्झ’ ह्या शब्दाचा अर्थ ‘रंगीत छापाचं कापड’ असा होतो. त्याकाळी प्रचलित असलेलं ‘चिटा’चं कापड अनेकांना आठवत असेल, ते चिट हे कापडाचं नांव ह्या चिंट्झचा अपभ्रंश आहे. ‘पुगली’ ह्या शब्दाचा अर्थ मात्र मला लागत नाहीय.

चिंचपोकळी हे नांव जर तिथे असलेल्या बंगल्यावरून पडलं असेल, तर तो बांगला निश्चितच ह्या परिसरात कापड गिरण्या सुरु झाल्यानंतरच्या काळात तिथे बांधलेला असलेला पाहिजे, असं तर्काने म्हणता येत. ते खरंही असावं. कारण मुंबईतली पहिली कापड गिरणी १८५४ ला सुरु झाली आणि नंतर हां हां म्हणता, ह्या परिसरात मोठ्या संख्येने कापड गिरण्या सुरु झाल्या होत्या. चिंचपोकळी स्टेशन बांधण्यात आलं ते, ह्या परिसरात कापड गिरण्या सुरु होऊन स्थिरावल्यानंतर १८७७ सालात. त्यामुळे डॉक्टर टिकेकरांच्या म्हणण्यात मला तथ्यांश वाटतो. बाकी इथे विपुल संख्येने असलेल्या चिंचेच्या आणि पोफळीच्या झाडांवरून चिंचपोकळी हे नांव पडलंय, असं बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळतं, परंतु ते काही मला पटत नाही.

तसंच, ‘लालबाग’ ह्या नावाचं आहे. ह्याच नावाचा एक महल सदृश बांगला ह्या परिसरात असलेला मी काही ठिकाणी वाचलेलं होत. नुकतंच मी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांचं श्री. बाबा भांड ह्यांनी लिहिलेलं जीवन चरित्र वाचत होतो. त्यात इंग्लंडचा राजा जेंव्हा मुंबई भेटीवर आला होता, तेंव्हा त्याकाळच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सर्व संस्थानिकांचा दरबार मुंबईत भरवला होता असा उल्लेख आहे. देशभरातले सर्व संस्थानिक त्यावेळी मुंबईत आले होते. त्यांच्या त्यांच्या इतमामाप्रमाणे ब्रिटिशांनी त्यांची मुंबईत राहायची व्यवस्था केली होती. बडोदा संस्थान हे देशातलं एक अग्रगण्य संस्थान होतं. बडोद्याच्या वरती अग्रक्रमाने केवळ एकच संस्थान होत आणि ते म्हणजे हैदराबादच्या निजामाचा. साहजिकच देशात दुसऱ्या क्रमांकाचा मान असलेल्या बडोदा संस्थानाच्या अधिपतींची मुंबईतल्या निवासाची सोय, त्यांच्या इतमामाला शोभेल अशा घरात केली गेली होती आणि त्या घराचं नांव होत ‘लालबाग’, ह्या अर्थाचा उल्लेख सयाजीराव गायकवाडांच्या ह्या चरित्रात आहे. साहजिकच हे घर म्हणजे त्याकाळच्या एखाद्या पारशाचा अथवा यहुद्याचा महाल असावा ह्याच अनुमान बंधन काही अवघड नाही आणि पुढे ह्याच महालाच्या नांवावरून ह्या परिसराला ‘लालबाग’ हे नांव पडलं असावं, असं म्हणता येतं.

भायखळा, परेल, माझगांव हे भाग तेंव्हा तुरळक निवासी वस्तीचे. या भागातील वस्ती मुख्यत: बड्या इंग्लिश अंमलदारांची किंवा मग पारसी-गुजराती व्यापाऱ्यांची. या भागात अजुनही पारशी वस्तीच्या किंवा ब्रिटिशकालीन घरांच्या खुणा दिसून येतात, त्याकाही उगाच नव्हे. तेंव्हा तिथे ही दोन्ही घरं असणं सहज शक्य आहे.

घराच्या, एखाद्या बंगल्याच्या किंवा आधुनिक काळात एखाद्या सोसायटीच्या दारात असलेला बस थांबा त्या घराच्या, त्या बंगल्याच्या किंवा त्या सोसायटीच्या नांवाने ओळखला जातो व हळूहळू तो परिसरचं त्या नांवाने मशहूर होतो, हे आपल्याला माहित आहे. तसाच काहीस त्याकाळात लालबाग किंवा चिंचपोकळीच झालं असावं. आता हे दोन्ही बंगले नक्की कुठे होते हे शोधणं जरा अवघड आहे, परंतु अशक्य नाही. ते यथावकाश शोधूच. तूर्तास चिंचपोकळी आणि लालबाग ही दोन्ही नांवं, त्या परिसरात असलेल्या घरानावरून पडली आहेत, एवढं कुतूहल तरी शमलं.

-नितीन साळुंखे

9321811091

31.08.2019

दुसऱ्या भागाची ओळख.-

लालबागकरांनी एवढा उत्साह आणला कुठून?

माझं आजोळ लालबागचं. त्यामुळे सणासुदीला आणि एरवीही लालबागचं वेगळेपण माझ्या तेंव्हापासूनच लक्षात यायचं. सणासुदीच्या दिवसात तर लालबाग अधिक सुरेख दिसायचं. वाहत असणं हा रक्ताचा गुणधर्म, तसाच वाहत, अक्षरक्ष: रक्तासारखं सळसळणं काय असत, ते तेंव्हाच्या लालबागच्या लोकांकडे पाहून समजायचं. मुंबईतला हा भाग, सणासुदीच्या दिवसांत उर्वरित मुंबईपेक्षा काही वेगळाच भासायचा. इतका उत्साह हे लोक आणतात तरी कुठून, असा प्रश्न माझ्या तेंव्हाच्या बालमनाला पडायचा. आज ही परिस्थिती बदलत चालली आहे. लालबागच्या जमिनीला घट्ट चिकटून असलेल्या चाळी जमीनदोस्त होऊ लागल्या आणि विकासाचे भ्रष्ट प्रतीक असलेले टॉवर त्याजागी उभे राहू लागले. ह्या टॉवरात अस्सल मुंबईकर मराठी माणूस फक्त धनदांडग्यांची धुणी -भांडी करताना दिसतात आणि जे कोणी मराठी तिथे राहणारे आहेत, त्यांचं आणि ह्या मातीचा काही संबंध उरलेला असेल असं वाटत नाही. असं असूनही लालबागचा सणांमधला उत्साह, असे उत्साही लोक आणि लोकांतील उतसह कमी झालेला असला तरी, तो पार आटलेला नाही , असं अनुभवावरून म्हणता येत. ह्याच उत्साहाचं मूर्त स्वरूप म्हणजे लालबागचा गणेशोत्सव..!

#दुसरा_पूर्ण_भाग_उद्या..

-नितीन साळुंखे

31.08.2019

मेरा भारत महान?

मेरा भारत महान?

फिलहाल नही, पर हो जरूर सकता है..

आज देशाचा स्वातंत्र्य दिन. देश स्वतंत्र होऊन आज ७२ वर्ष पूर्ण झाली. सन १९४७ साली देश स्वतंत्र होताना आपण देशाची अखंडता आणि विविधतामे एकता राखण्याची शपथ घेतली असेल किंवा तसा संकल्प सोडला असेल. तसं आपण दरवर्षी ही शपथ घेतोच. आज पुन्हा ७३व्यांदा तशी शपथ घेऊन संकल्प सोडू आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून आपापल्या जाती-धर्माच्या संम्मेलनात, महासंम्मेलनात, मोर्चात, सभांत किंवा अगदी गेला बाजार ज्ञातीवर्धक मंडळाच्या वळचणीला जाऊन कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ याची हिरीरिने चर्चा करु. वेळ पडलीच तर रस्त्यावरही उतरू, नासधुस करू वैगेरे वैगेरे. हे सर्व २६ जानेवारीपर्यंत चालू राहील. २६ जानेवारीचे २४ तास उलटले, की पुन्हा आपण आपल्या जाती-धर्माच्या कोषात बंदीस्त. हेच चक्र गेली ७२ वर्ष सुरू आहे. पुढेही हेच चालू राहाणार यात शंका नाही. त्यात निवडणुकांच्या आसपासचा स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन असेल, तर देशभक्तीचे नियोजित २४ तास संपले, की पुन्हा जाती-धर्माचा उन्माद अंमळ जास्तच आपल्या अंगात भिनत जातो..

जाती-धर्माचा आपल्या अंगात भिनलेला उन्माद पाह्याल्यावर मला आपलं पारतंत्र्य आठवलं. आता माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला, त्यामुळे १९४७ पुर्वीच्या पारतंत्र्यात नेमकी काय परिस्थिती होती, हे मला समजणार नाही. परंतु जे काही थोडं-फार कळलं, ते लहानपणीच्या शालेय पुस्तकातूनच. परंतू नंतर नंतर माझ्या वाचनातून आणि अलीकडे मुंबई शहराचा अभ्यास करताना माझ्या वाचनात आलेल्या एतद्देशीय लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांतून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत गेली, ती म्हणजे स्वातंत्र वैगेरेशी त्या काळच्या सामान्य लोकांचं फारसं काही देणं-घेणं नसावं. याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांनी इथल्या जनतेला दिलेलं धार्मिक आणि जातीय स्वातंत्र्य. ब्रिटिशांनी इथल्या देवा-धर्मात फारशी ढवळाढवळ केली नाही. किंबहुना धर्मप्रसारासाठी म्हणून हिंदुस्थानला आलेली ख्रिश्चन मिशनऱ्यांची जहाजं त्यांनी मुंबईच्या किनाऱ्यालाही लागू दिली नाहीत. कारण आपापल्या प्रथा-परंपरात मग्न असलेल्या त्याकाळच्या हिन्दुस्थानात चाललं होतं, ते त्यांच्या पथ्यावरच पडणारं होतं. जो पर्यंत लोक त्यांच्या जाती-धर्म व्यवस्थेत मग्न आहेत, तो पर्यंत आपल्याला धोका नाही, हे ब्रिटिश पक्के जाणून होते. मला शाळेत वाचलेलं आठवतंय की, १८५७ सालच्या स्वातंत्र्य संग्रामामागची सैनिकांची प्रेरणा काय असेल ती असो, त्याची ठिणगी पडली होती ती मात्र काडतुसांना लावलेल्या गायीच्या आणि डुकराच्या चरबीच्या आवरणामुळे. त्यामुळे धर्मभ्रष्ट झाल्याची भावना हिन्दू-मुसलमान सैनिकांमधे पडली आणि मग पुढचं सर्व घडलं, तो पर्यंत पलटणींत सर्व आलवेल होतं..!

मी हे का सांगतोय, तर स्वातंत्र्यानंतरही देशी राज्यकर्ते एक्झॅटली ती ब्रिटिशांचीच नीती अंगिकारून राज्य करताहेत, म्हणून. फरक पडलाच असेल तर, ब्रिटिशांनी धर्म-जातीत काही क्रूर प्रथा बंद करण्यापलिकडे थेट हस्तक्षेप केला नाही; स्वतंत्र भारतातले राज्यकर्ते मात्र जाती-धर्माची कास उघडपणाने धरताना दिसताहेत. आपल्या बगलबच्च्यांना तसं करण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसताहेत. दिवसेंदिवस जाती-धर्मांचे रंग जास्त गडद होताना दिसतायत, त्याचा आपल्याला गर्व-अभिमानही वाटू लागलाय आणि हे आपल्यासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठीही धोकादायक आहे, हे आपण विसरत चाललोय. भितीदायक आहे ते हेच. सत्तेसाठी स्वत:चे जाती धर्म जोपासणारे सर्वपक्षीय नेते मला भगवान विष्णूच्या मोहिनी अवतारासारखे वाटतात. त्यांच्या प्रमाणे जर आपण वागलो, तर आपण भस्मसात होणार हे नक्की. आणि अवतार पुन्हा शेषशायी विष्णूसारखा लक्ष्मीच्या सहवासात पुढची पाच वर्ष निवांत पडून राहाणार, हे सर्व जनता जाणते आणि तरीही या दगाबाज पुढाऱ्यांच्या कच्छपी लागते, हे सर्व न समजण्याच्या पलिकडचं आहे.

आणि देशाच्या अखंडतेविषयी काय बोलावं..! अखंडतेची महानता (फक्त)भाषणांतून ऐकण्याची उद्याची ७२वी वेळ. उद्या अखंड भारत ‘बनवण्या’चा संकल्प आपण ७२व्या वेळी सोडणार. जाती-धर्मात दुभंगलेली जनता पाहून, ‘संकल्प सोडणे’ या शब्दप्रयोगाचा बहुतेक आपण शब्दंश: अर्थ घेतलाय, असं सर्व काही सोडलेलं बघून म्हटलं तर चुकू नये असं वाटण्यासारखी सारी परिस्थिती आहे. म्हणायला आपण चार भौगेलिक सीमा असलेला अखंड देश आहोत, पण आतून मात्र दुभंगलेलो, तिभंगलेलो आहोत. जाती-धर्माने आपल्या प्रत्येकात अदृष्य, परंतू सोशल मिडियात स्पष्टपणे दृष्य असलेल्या भिंती उभ्या केल्या आहेत. जो तो जास्तीत जास्त जातीवादी-धर्मवादी कळपांत जाण्यासाठी धडपडतोय. ‘माझा भारत कळपांचा देश आहे’ असं म्हटलं तर चुकू नये. त्या कळपांतही पुन्हा अंतर्गत कळप आणि कळप नायक आहेतच. जो तो आपल्या कळपाचं अस्त्तित्व त्याला ‘जात्या’च लाभलेल्या न्युसन्स पाॅवरचा उपयोग करुन जाणवून देण्यात मशगूल आहे. ‘अखंड भारत’, ‘एकात्म भारत’ किंवा ‘देश प्रथंम’ ह्या फक्त ट्रकांच्या मागे लिहिलेल्या आणि टायरांचा चिखल उडून चिखलाने बरबटलेल्या ‘मेरा भारत महान’सारख्या भाषणातल्या घोषणा म्हणून उरुन राहील्या आहेत.

हे चित्र बदलू शकतं का, तर याचं उत्तर होय असं आहे. ह्यासाठी फक्त एकच निर्धार करावा लागेल, तो म्हणजे अगदी या क्षणापासून कोणत्याही जाती-धर्माच्या, अगदी स्वत:च्याही, आहारी न जाणं. कठीण आहे, पण अशक्य बिलकूल नाही. देश म्हणजे काही हाडामांसाची व्यक्ती नसते. देश ओळखला जातो, तो देशवासीयांमुळे. देशवासी जर एकमेंकाला धरून असतील, अभंग असतील, तरच देश अखंड राहातो. आपल्यातला तीव्र होत जाणारा जातीभेद पाहून परकीय लोक आपल्याला हसत असावेत आणि कदाचिक हा जातीभेद अधिक कडवा व्हावा यासाठी प्रयत्नही करत असावेत. आपले लाचार पुढारी त्यांच्या त्या कृष्णकृत्यात सहभागी असावेत, असं म्हटलं तर फार काही चुकू नये. सरडाछाप पुढाऱ्यांचा हा कावा ओळखून, त्यांना आपल्यात जाती-धर्माचे निर्माण केलेले मनभेद गाडून आणि एकजुटीने ‘भारतीय’ म्हणून उभं राहाण्याचा निर्धार जरी आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी केला, तरी खऱ्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं असं म्हणता येईल.

“आजपासून कोणत्याही जाती वा धर्माधारीत संस्था किंवा संघटना किंवा पक्षाशी मी कोणताही संबंध ठेवणार नाही. माझी जी काही बांधिलकी अाणि निष्ठा असेल, ती मी माझ्या भारतीय समाजाशी आणि देशाशी ठेवेन” अशी शपथ आपल्यापैकी प्रत्येकाने घेऊन निग्रहाने तसं वागावं लागेल. तर आणि तरच हा देश अभंग राहू शकतो. तसा तो सैन्याच्या जीवावर अभंग राहीलही, परतू मग आपल्याला ‘अखंड आणि एकात्म देश’ ही व्याख्या लागू होणार नाही. सर्व पंक्षीय नेत्यांनी अंगिकारलेली फोडा आणि झोडा ही निती ओळखून आणि केवळ आणि केवळ देशहिताला प्राधान्य देऊन वागण्याचा निश्चय आजच्या दिवशी आपण करूया, एवढीच विनंती आजच्या स्वातंत्र्य दिनी करू इच्छितो..!!

“दिन दूर नहीं मनभेद मिटायेंगे, खुद को पुन: अभंग बनाएँगे ।” यह हो सकता है, बस हमे हमकदम होकर कदम बढाने होगे..! तब ही भारत महान बन सकता है..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

स्वातंत्र्य संग्रामात ‘मुंबई शहरा’ने दिलेला लढा –

आजच्या १५ आॅगस्टच्या निमित्ताने..

स्वातंत्र्य संग्रामात ‘मुंबई शहरा’ने दिलेला लढा –

आज १५ आॅगस्ट. आपल्या देशाचा ७२वा स्वातंत्र्य दिन. १५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा माझं जन्मही झालेला नव्हता. मी जन्मलो १९६५ मधे. तेंव्हा भारताचं स्वातंत्र्य कायद्यानुसार नुकतंच तरुण झालं होतं. पुढच्या ८-१० वर्षात मी समजेलासा होईपर्यंत ते २८-३०शीत पोचलं होतं. म्हणजे आपलं स्वातंत्र्य तारुण्याच्या ऐन भरात होतं. सहाजिकच तारुण्याचा जोश त्यात असणं स्वाभाविक होतं.

मला आठवतंय, या दिवशी घरात गोडाचं जेवण असायचं. शाळेत झेंडा वंदनाच्या कार्यक्रमानंतरही आम्हा मुलांना खाऊ दिला जायचा. त्या वयातल्या आमचा स्वातंत्र्याचा संबंध या खाऊपुरताच असायचा, बाकी स्वातंत्र्यातलं फारसं काही कळायच नाही. पुढच्या काळात जसजसा इयत्ता वर चढत गेलो, तस तसं पारतंत्र्य-ब्रिटिश राज-अत्याचार-दमन आणि त्यातून सुटका करुन घेण्यासाठी भारतीय जनतेने केला संघर्ष, नि:स्वार्थी आणि ध्येयवादी नेत्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांशी दिलेला दीर्घ लढा, वैयक्तिक स्वार्थाचा, इतकाच कशाला घरादाराचाही केलेला त्याग, त्यासाठी भोगलेला छळ याच्या कथा शालेय आणि अवांतर वा चनातून नजरेसमोर येत गेल्या आणि स्वातंत्र्य कसं मिळालं, नाही, कसं मिळवलं त्याची समज येऊ लागली. अलम भारतीय जनतेने, आपल्या पाचवीलाच पुजलेली जात, धर्म, प्रांत, पंथ इत्यादी विसरून केवळ ‘भारतीय’ म्हणून, देशावरील ब्रिटिश राजसत्तेचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी तब्ब्ल ९० वर्षे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू इत्यादीं जहाल-मवाळ नेत्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या दीर्घ संघर्षाचा विस्तृत पट डोळ्यांसमोर उभा राहू लागला. या नेत्यांच्या व्यतिरिक्त वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात भागात सिंह, राजगुरू, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरेही इत्यादी भारतीय क्रांतिकारी लढले आहेत आणि फाशीची गेले आहेत. माझा जन्मच स्वातंत्र्यात झालेला असल्यामुळे, मला स्वातंत्र्य संग्राम आणि त्यातील नेत्यांच्या सहभागाबद्दल वाचूनच माहित.

मध्यंतरी डॉक्टर त्र्यंबक कृष्णाजी, अर्थात, त्र्यं. कृ. टोपे यांचा एक लेख वाचनात आला. जुन्या मुंबईच्या आठवणी त्यांनी त्यात लिहिल्या होत्या. त्यात स्वातंत्र्य संग्रामात ‘१९३१च्या मिठाच्या सत्याग्रहात आणि १९४२च्या चाले जावं आंदोलनात मुंबई शहराने अपूर्व लढा दिला होता’ असा उल्लेख मला आढळला. मला स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय भाग घेतलेल्या थोरल्या, मधल्या आणि धाकट्या फळीतल्या नेत्यांची नांवं आणि त्यांचा संघर्ष आणि त्याग वाचून माहित होता, परंतु मुंबई शहराने दिलेला लढा तो कोणता हे माझ्या लक्षात येत नव्हतं. यावर मी जसजसा विचार करू लागलो तेंव्हा लक्षात येऊ लागलं की, टोपेंना अभिप्रेत असलेल्या मुंबई शहराने दिलेला लढा म्हणजे, ह्या शहरातील असंख्य सामान्य माणसांनी ब्रिटिश सत्तेच्या विरद्ध दिलेल्या झुंजीचा लढा असावा. प्रा. टोपे म्हणतात ते मुंबई शहर म्हणजे मुंबईतील सामान्य माणसं. मुंबईकर. ह्या मुंबईकरांना नांव नाही, चेहरा नाही आणि इतिहासात तर त्यांचा कोणताही उल्लेख नाही, म्हणून ते मुंबई शहर..!

शहर ही काही हाडा-मांसाची व्यक्ती नसते. कोणत्याही शहराला व्यक्तिमत्व मिळतं ते त्यात राहाणाऱ्या माणसांनूळे. मुंबई ही तिच्या जन्मापासूनच संघर्ष करणारी आहे. संघर्षाची कारणं वेगळी असली तरी आजही हा संघर्ष जारी आहे. हल्ली याला मुंबईकरांचं स्पिरिट असं म्हटलं जातं. हा असा संघर्ष करताना जात-पात-पंथ-धर्म-भाषा विसरून मुंबईकर एकत्र येतात. त्या काली तर स्वातंत्र्य ह्या जोशपूर्ण शब्दामुळे अख्खा देश एक झाला असेल तर त्यात काही नवल नाही.

पुढे जसजसा मुंबई शहराने केलेल्या संघर्षाची माहिती घेत गेलो तसतशी एकेक कहाणी समोर येत गेली. यातील काही गोष्टी काही जणांना माहित असतीलही, परंतु बऱ्याच जणांना माहिती नसण्याचीच शक्यता जास्त. त्यातलीच एक कहाणी आहे मिठाच्या सत्याग्रहाची. महात्मा गांधींनी १९३०-३१ च्या दरम्यान पुकारलेला मिठाचा सत्याग्रह गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह जरी गुजरातेतील दांडी येथे सुरू झालेला असला तरी त्याचं लोण दांडी, धारासणा, कोकणातलं शिरोडा करत मुंबईच्या विले पार्ल्यातही पोहेचलं होतं.

पार्ल्याची छावणी सत्याग्रहाचं मोठं केंद्र होतं. या छावणीत दररोज कुणा ना कुणा पुढाऱ्यांची भाषणं व्हायची. यात नेहेरू, पटेल, बोस, राजगोपालाचारी, सत्यमूर्ती, सरोजिनी नायडू असे राष्ट्रीय पुढारी असत, तसेच बाळासाहेब खेर, भुलाभाई देसाई, स. का. पाटील असे मुंबईतले पुढारीही असतं. या छावणीचं नेतृत्व जमनालाल बजाज यांच्याकडे होतं. जुहूच्या किनाऱ्यावर मुंबईचा मिठाचा सत्याग्रह चालला होता, तत्पूर्वी त्याच साली गांधीजींची एक सभा पार्ला पश्चिमेला असलेल्या चक्कएका चर्चच्या पटांगणात झाली होता. त्याकाळी एका ख्रिस्ताच्या देवळाणे आपली जागा, ख्रिस्ती धर्मिय ब्रिटीशांविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या एका सभेसाठी द्यावी हे आश्चर्यच होतं. त्या पटांगणावर नंतर कधीही राजकीय सभा झाली नाही.असं पुलंनी नोंदवून ठेवलंय. माझ्या माहितीप्रमाणे ही छावणी, विले पार्ले पश्चिमेला विवेकानंद मार्गावर आज असलेल्या ‘गोल्डन टोबॅको’ या कंपनीच्या तेंव्हा मोकळ्या असलेल्या जागेवर लागलेली होती. रक्तबंबाळ होईपर्यंत गोऱ्या सार्जंटांच्या हातातील छडीचे सपकारे खाऊनही या छावणीतली मुंबईकरांची गर्दी ओहोटीचं नांव घेत नव्हती. लाठ्यांचा मर खाणाऱ्या ह्या मुंबईकरांचं नांव इतिहासात किंवा स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत नमूद नाही. ह्या सत्याग्रहात भाग घेतलेले अनामिक मुंबईकर म्हणजे टोपे म्हणतात ते मुंबई शहर..!.

पार्ला हा तेंव्हा मुंबईचा भाग नव्हता. आजही नाही. तेंव्हा मुंबईचं ते एक उपनगर होतं आणि आजही त्याचा दर्जा तोच आहे. त्याकाळी खेड असलेल्या पार्ल्यात हे घडत असताना, मुंबईच नाक असणाऱ्या गिरगाव-फोर्ट विभागात तर स्वतंत्र्य संग्राम आणखी जोशात असल्यास नवल ते काय..! आझाद मैदान-, गिरगांव आणि चोपाटी तर चळवळीचं मुख्य केंद्र बनसं होतं. गल्ल्या गल्ल्यांतून पहाटेच निघणाऱ्या तरुण मुंबईच्या प्रभातफेऱ्या जनमानसाची जबरदस्त पकड घेत होत्या, त्यांना चेतवत होत्या. कोणत्याही परिस्थितीत दर रविवारी चौपाटीवर वा आझाद मैदानावर झेंडावंदन होत असे. या झेंडावंदनात भाग घेतलेल्यांवर बेलगाम लाठीमार होत असे. झेंडा हाती असणाऱ्याला तर रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण होत असे. गिरगांवातलीच एक तरुण मुलगी कृष्णा सरदेसाई झेंडा वंदनात आघाडीवर असे, तिने पोलिसांचा प्रचंड मार खाल्ला, पण एकदाही हातातला झेंडा खाली पडू दिला नाही. ह्या कृष्णा सरदेसाईचं नांव इतिहासात नमूद असेल, नसेल. नसण्याचीच शक्यता जास्त. ह्या व अशा असंख्य कृष्णाने दिलेला लढा, म्हणजेच प्रा. टोपे म्हणतात तो मुंबई शहराने दिलेला लढा. अश्या असंख्य कृष्णानीच मुंबई शहर घडवलंय. त्यांची चिरा आणि पणती म्हणजे साक्षात मुंबई शहर.

परदेशी मालावर बहिष्कार टाकन्याचे आवाहन पुढाऱ्यांकडून केलं गेल्यावर, मुंबईच्या मंगलदास मार्केटमध्ये परदेशी मालाची लॉरी गुंडांच्या आणि पोलिसांच्या मदतीने दुकानात आणण्याचा व्यापारी प्रयत्न करीत असता, बाबू गेनू नावाच्या तरुण हमालाने लोरीसमोर स्वतःला झोकून दिले आणि त्याच्या कोवळ्या शरीरावरुन लॉरी निघून गेली., बाबू गेनू रक्ताच्या थारोळ्यात पडला, इतिहासात अमर झाला. त्याचवेळी मुंबईच्या फोर्टात, डी. एन. रॉड आणि फिरोजशहा मेहता रोडच्या जंक्शनवर असलेल्या ‘व्हाईट, वे अँड लो ‘ या परदेशी कंपनीच्या (आता ह्या जागेवर खादी ग्रामोद्योगचे शोरूम आहे.) भल्यामोठ्या ऑफिससमोर असंख्य मुंबईकर रोज सत्याग्रह करत असत, पोलिसांच्या लाठ्या खात असत आणि विसापूर, नाशिक, ठाणे आणि येरवड्याच्या तुरुंगात भरती होत असत. बाबू गेनू इतिहासात नोंदवला गेला, परंतु ह्या सर्वांचीच नांवे इतिहासात नाहीत. टोपे म्हणतात तो हा ‘मुंबई शहरा’ने दिलेला लढा.

ब्रिटिशांच्या राजसत्तेला शेवटचा मोठा आणि निर्णायक धक्का दिला तो मात्र महात्मा गांधींनी, दिनांक ९ ऑगस्ट १९४२ ह्या दिवशी, मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानातून चाले जाव आणि करेंगे या मरेंगे हे दोन स्फूर्तिदायक मंत्र स्वातंत्र्य लढ्याने दिले आणि अख्खा देश पेटून उठला. ह्या लढ्याचा केंद्रबिंदू मुंबई शहर होता. संपूर्ण देशातून कार्यकर्त्यांचे स्वयंसेवकांचे ठावे मुंबईत येऊ लागले होते. ग्रांट रोडचं ‘काँग्रेस हाऊस’ देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी फुलून गेलं होत. राहायची कोणतीही सोय नाही. लोक मिळेल तिथे आपली पठारी टाकत होती. राज नवीन कार्यकर्ते सामील होत होते. जिथे राहायची काहीच सोया नाही, तिथे ह्या कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याचे काय होत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. पण त्याची तम कुणाला होती..!

अश्या वेळी मुंबईकर गृहिणी पुढे आल्या. चाळीचाळीतील मध्यमवर्गीय अन्नपूर्णा धावल्या. लालबाग-परेल भागातून मराठमोळ्या बायका पुढे आल्या. मलबार हिल वरील उच्चभ्रू पारशींनी आणि भाटिया गुजराती बायका धावून आल्या. त्यांच्यातला जात-पात-धर्म-भाषा-गरीब-श्रीमंत हा भेद आपोआप गाळून पडला. आता त्या फक्त माता होत्या. भरणं पोषण करणाऱ्या माता. त्यांनी काँग्रेस हाऊसच्या स्वयंपाक घराचा ताबा घेतला. मशीद बंदरातून गाड्या भरभरून आटा, तांदूळ, साखर, गहू इत्यादी धान्य येऊन पडू लागलं. भायखळ्याच्या भाजी बाजारातून भाज्यांच्या गाड्या भरभरून येऊ लागल्या कुणाला किंमत चुकवण्याचा किंवा विनंती करण्याची गरजच पडली नाही. सारी माणसे .चाले जाव.’ ह्या मंत्राने झपाटलेली होती. काँग्रेस हाऊसच्या स्वयंपाकघरात २४ तास चूल जळत होती. कानात हिऱ्याच्या कुडी घालणाऱ्या श्रीमंत पारशी-गुजराती स्त्रिया, गिरगाव-गिरणगावातल्या कमलाबाई, सखुबाई आणि गंगुबाईच्या मांडीला मंडी लावून पोळ्या लाटत होत्या. उष्टी-खरकटी भांडी घासत होत्या. सर्व भेदभाव गळून पडले होते आणि केवळ संपूर्ण स्वातंत्र्य ह्याच एकमेव ध्येयाने सर्व स्त्रिया पछाडले होते. सैनिक लढत असले तरी त्यांच्या पोटाला घालणाऱ्या ह्या स्त्रियांची नोंद इतिहासात कितपत आहे माहित नाही. हा मुंबई शहराने दिलेला लढा. टोपे म्हणतात त्याचं प्रत्यंतर मला अश्या पद्धतीने येत गेलं आणि टोपेंच म्हणणं शब्दशः खरं असल्याचं मला जाणवलं.

९ ऑगस्ट १९४२ च्या आदेशाने जनता ब्रिटिशांच्या विरोधात पेटून उठली आणि आता ह्या करोडो लोकांवर राज्य करणार तरी कसे असा प्रश्‍न ब्रिटीशांना पडला. याच वेळी त्यांना आपल्याला भारत सोडणं भाग आहे याची प्रचिती अली आणि त्यानंतरच्या पाच वर्षांनी ते भारत सोडून गेले. देश स्वतंत्र झाला, हा इतिहास आपल्या सर्वाना माहित आहे. सर्वच देशाने ह्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता, ह्याची मला जाणीव आहे. परंतु मी मुबईकर असल्याने ‘मुंबई शहरा’चा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग मला विशेषत्वाने नोंदवावासा वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच

मुंबई ही ब्रिटिशांची निर्मिती. सात बेटांची मुंबई सलग, एकसंघ केली ती ब्रिटिशांनी. ब्रिटिशांच्या पूर्वेकडील साम्राज्याला जन्म दिला तो मुंबईने आणि अखेरचा धक्का दिला तो ही मुंबईनेच..! नेत्यांच्या कहाण्या भरपूर लिहिल्या गेल्यात, पुढेही लिहिल्या जातील. परंतु. मुंबई शहराचा स्वातंत्र्य संग्रामातल्या सहभागाची नोंद, एक मुंबईकर म्हणून मला करावीशी वाटते..

-नितीन साळुंखे

९३२१८ ११०९१

२६. ०७. २०१९

संदर्भ –

१. ‘खिल्ली’- लेखक पु.ल. देशपांडे, लेख -एका गांधी टोपीचा प्रवास.

२. ‘माझी मुंबाई’ – लेखक वा. वा. गोखले –

३. लेख ‘मंतरलेली दिवस – लेखक त्र्यं. कृ. टोपे. मुंबई मनपा शताब्दी स्मरणिका -१९९३

माझी मैना गावावर राहिली, म्हणून मुंबईत दुसरी पाहिली…

(सदर लेख श्री. आठवलेंवर टीका म्हणून लिहिलेला नसून, त्यांचं वक्तव्य केवळ संदर्भापुरतं घेतलेलं आहे, याची नोंद घ्यावी. लेखावर व्यक्त होण्यापूर्वी कृपया लेख संपूर्ण वाचावा ही नम्र विनंती.)

माझी मैना गावावर राहिली, म्हणून मुंबईत दुसरी पाहिली…

‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतेय काहिली…’ हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं स्वातंत्र्यपूर्व काळात अत्यंत गाजलेलं गाणं. नुकतंच आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री आणि कविसूर्य श्री. रामदास आठवले यांनी, ‘माझी मैना गावाकडे राहिली’ ह्या त्या गाण्याच्या पहिल्या ओळीला जोडून ‘..म्हणून मुंबईकडे दुसरी पाहिली’ अशी स्वरचित ओळ एका कार्यक्रमात म्हटली आणि एकाच गदारोळ उडाला. अर्थात आठवलेंच्या ह्या स्वरचित ओळीमुळे मोठ्या रिस्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसू शकला असता, परंतु त्याच वेळी देशाला ‘३७०’ रिश्टर स्केलचा धक्का बसला आणि आठवलेंचा होऊ घातलेला भूकंपाचा धक्का त्यात कुठल्या कुठे विरून गेला. पुढे महाराष्ट्रात आलेल्या पुरात तर तो पार वाहूनच गेला..

वास्तविक आठवलेंना किंवा त्यांच्या म्हणण्याला काही गांभीर्याने घेण्याची गरज नव्हती. त्यांना तसंही कोण गांभीर्याने घेताही नसावं. आठवले हे स्ट्रेस बर्स्टर आहेत हे मात्र खरं. प्रसंग कोणताही आणि कितीही गंभीर असो, आठवले त्यात सैलपणा आणतात हे मात्र खरं. ‘माझी मैना गावाकडे राहिली’ ह्या त्या गाण्याच्या पहिल्या ओळीला जोडून त्यांनी म्हटलेली ‘..म्हणून मुंबईकडे दुसरी पाहिली’ हा देखील त्यांचा वातावरण हलकं करण्याचाच प्रयत्न असावा. पण काही का असेना, आठवले अनावधानाने का होईना, पण खरं बोलून गेले. अण्णाभाऊ साठे यांनी ज्या काळात ही रचना केली, त्याकाळातल्या मुंबईची परिस्थिती खरीच काहीशी तशी होती. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर निवृत्ती पवार, शाहीर कृष्णराव साबळे हे त्याकाळातल्या गिरणगावात समकालीन म्हणता येतील असे महत्वाचे शाहीर. गिरणगावाचं त्याकाळातील चित्र ह्या सर्वानी आपापल्या विविध रचनांतून उभं केलाय.

इथे मुंबई म्हणजे गिरणगांव हे लक्षात घ्यावं. गिरणगांव वसण्याच्या आधी गिरगाव अस्तित्वात होतं. परंतु ती वस्ती होती पांढरपेशा मध्यमवर्गीय नोकरदारांची. गिरगांव पलिकडे उत्तरेलाही भायखळा, लालबाग, माजगाव, परेल तर एकीकडे वरळी, माहिम ही गांवं होती, पण ती तुरळक वाड्या-वस्तीची किंवा बड्या इंग्रज अंमलदारांच्या बंगल्यांची. परेलला गव्हर्नर हाऊस होतं. मुंबंईची बेटं मधल्या खाड्यांमधे भराव टाकून जोडण्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं होतं. माजगांव, भायखळा, लालबाग, परेल या भागात मोठ्या प्रमाणावर जमिन उपलब्ध झाली होती. आता कमी होती ती या जमिनीवर होणाऱ्या वस्तीची.

मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या जमिनीवर लोकांची वस्ती व्हायला सुरुवात झाली ती साधारण १८३० नंतर, जहाज आणि समुद्र मार्गे प्रवास सुरू झाल्यानंतर. परंतु तिता रेटा कमी होता. पुढे काही वर्षांनी, म्हणजे इसवी सन १८५१ मधे शेठ कावसजी नानाभाई दावर ह्या पारसी उद्योजकाने ‘द बाॅम्बे स्पिनिंग अॅन्ड विव्हींग कंपनी’ या पहिल्या कापड गिरणीची स्थापना मुंबईतल्या ताडदेव येथे केली. त्त्या पुढच्याच तीन वर्षात, १८५४ मधे ही कापड गिरणी सुरू झाली आणि मुंबईच्या गिरणगांवाने पहिलं ‘टॅह्यॅ’ केलं..

ही गिरणी सुरू व्हायच्या केवळ एकच वर्ष अगोदर, १६ एप्रिल १८५३ मधे मुंबईत रेल्वे सुरू झाली होती. १८५४ मधे सुरू झालेल्या ह्या पहिल्या गिरणीनंतर, पुढच्या सहा वर्षांत, म्हणजे १८६० पर्यंत मुंबईत एकून दहा गिरण्यांची धुरांडी धूर ओकत होती. १८८० सालापर्यंत मुंबईतल्या गिरण्यांची संख्या वाढून ती ३१ पर्यंत पोहोचली. ही संख्या पुढे वाढतच राहीली. अर्थात, गिरण्यांची संख्या किती होती हा लेखाचा विषय नसून, त्यामुळे मुंबईचा गिरणगाव कसा वसला आणि आठवले म्हणाले तशी ‘..मुंबईत दुसरी पाहिली’ कशी हे सांगणं आहे, त्यामुळे आता तिकडे येतो.

ह्या गिरण्यांसाठी लागणारा कामगार वर्ग सुरुवातील मुख्यत: आला तो कोकणातून. गिरण्या सुरू होण्यापूर्वी मुंबईत रेल्वे लाईन टाकण्याचं काम सुरु झालं होतं. त्याच्या काही काळ पूर्वी मुंबईत जहाजबांधणीचं काम जोरात सुरू झालं होतं. जहाजांसाठी आणि रेल्वे लाईनच्या स्लिपर्ससाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या लाकडाची तोड रत्नागिरी जिल्ह्यातील (तेंव्हाचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे आताचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे विभाजीत दोन जिल्हे. एकेकाळी ह्या जिल्ह्यांतून तांदळाची निर्यात होत असे) दाट जंगलातून केली होती. प्रचंड प्रमाणात झाडांची तोड झाल्यामुळे, रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीची मोठी धूप होऊन आधीच कमी असलेली शेती योग्य जमिन कमी होऊ लागली होती आणि त्यावर अवलंबून मनुष्बळाला इतर कामांची आवश्यकता भासू लागली होती. हे सर्व मनुष्य बळ रोजगारासाठी मुंबईच्या गिरण्यांकडे आकर्षित झालं. कोकणातून मोठ्या प्रमाणावर कामगार मुंबईत येण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे, कोकण आणि मुंबईला जोडणारा जलमार्ग त्यापूर्वीच कार्यान्वीत झाला हेता. मुंबईची रेल्वे पुढे पुणे मार्गे घाटाशी जोडल्यानंतर, घाटावरूनही शेतमजूर कामगार म्हणून मुंबईत येऊ लागले. पण गिरणगांवचा पाया रचला तो कोकण्यांनीच..!

मुंबईतल्या गिरणगावाचा पैस म्हणायचा तर, पश्चिम रेल्वेवरची दादर ते महालक्ष्मी ह्या स्टेशनांच्या पूर्व- पश्चिमेचा परिसर, मध्य रेल्वेवरच्या दादर ते भायखळा मधल्या स्टेशनांच्या पूर्व-पश्चिमबाजूचा परिसर आणि हार्बर रेल्वेवरच्या काॅटन ग्रीन ते शिवडी दरम्यानचा परिसर. मुंबईतल्या बहुतेक सर्व गिरण्या ह्याच परिसरात वसल्या होत्या. ह्या गिरण्यांमधे काम करणाऱ्या गिरणी कामगारांनी आपली घरं थाटली ती ह्या गिरण्यांच्या आधाराने. काही गिरण्यांनी आपल्या कामगारांना राहाण्यासाठी, गिरण्यांच्याच आवारात चाळीही बांधून दिल्या होत्या. तेंव्हा कामाच्या वेळा अनियमीत असल्याने, कामावर येणं-जाणं सोपं व्हावं म्हणून प्रत्येक गिरणीचा कामगार, त्या गिरणीपासून चालत जाण्याच्या दहा-ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर राहाण्यास प्राधान्य देत असे. १८५० नंतरच्या १०० वर्षांत अशा प्रकारे गिरणगांव वसला. गिरण्यांच्या आधाराने वसला म्हणून तो गिरणगांव.

गिरणगाव बसण्यापूर्वी मुंबईत गिरगाव नावाचा विभाग अस्तित्वात होता. गिरगांव आणि गिरणगांव ह्या दोन्ही मराठी माणसांच्याय वसाहती असल्या तरी त्या दोघात एक मुलभूत फरक होता. हा फरक, त्या दोघांचं नांव एकमेकापासून वेगळं करणाऱ्या ‘ण’ या अक्षरात नेमका दिसतो. गिरगांव शिक्षित, देशी-विदेशी कंपन्या, शाळा काॅलेजातून कारकून- अधिकारी-शिक्षक अशी बौद्धीक कामं करणाऱ्या लोकांचा भाग, तर गिरणगांव निव्वळ कामगारांचा, अंगमेहेनतीची कामं करणाऱ्या कष्टकऱ्यांचा..! दोघांच्या भावनांचा अविष्कारही वेगळा. गिरगावातील लोक मध्यमवर्गीय संस्कृतीतले, त्यामुळे घर, व्यवसाय आणि आपली सामाजिक प्रतिष्ठ ह्याला बाधा येणार नाही असे व्यक्त होणार, तर जिरं गाव व्यक्त होण्यात एकदम ग्राम्य, रोखठोक, कसलीही पर्वा न करता आपलं मत समोर मांडणार. आता आता पर्यंत ह्या ‘ण’ चा फरक दिसून येत होता पण, आता ते सारं संपत आलंय आणि मुंबईवर गुजराती-मारवाडी ‘ण’ ने ताबा मिळवलाय. ह्याची कारण वेगळी आहेत आणि ह्या ठिकाणी त्यांची चर्चा करण्याचं काहीच कारण नसल्याने, इथे फक्त त्याचा उल्लेख केला आहे.

आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊ. गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी प्रथम मोठ्या प्रमाणात कोकणातून आणि नंतर घाटावरून जे मनुष्यबळ गिरणी कामगार म्हणून मुंबईत आला, त्या पैकी बहुतेक पुरुषांनी आपलं कुटुंब आपल्या गावीच ठेवलं होत. गिरणीत काम करायचं, लावणी-पेरणी साठी अथवा दसरा–दिवाळीनिमित्त गावाकडे जाणे, हाच त्यांचा परिपाठ असायचा. एकट्याने नोकरीसाठी यायचं, भाड्याच्या खोलीत सर्वानी मिळून राहायचं, गिरणीतल्या आपापल्या पाळीप्रमाणे झोपण्याखाण्याच्या वेळा वाटून घ्यायच्या असं सारं होत. एकेक खोलीत त्याकाळात २०-३०जण राहत. पहिली-दुसरी-तिसरी प्लाइ अश्या कामाच्या वेळा असल्याने, एके वेळेस एका खोलीत त्या वीस तीस जणांपैकी जास्तीतजास्त १०-१५ लोकच असत. अश्या खोल्यांचे ‘झिलग्याची खोली’ म्हणत. झील म्हणजे कोकणात सडे पुरुष. सगळेच घरी असतील तेंव्हा आपल्या पठारी चाळीच्या गॅलरीत आणि रात्री चक्क फुटपाथवर पसरायची ही पद्धत होती. झिलग्याची फुटपाथवर पसरी पसरायची प्रथा १९६०च्या आसपास रामन राघवचा उदय होईपर्यंत सुरु होती. रामन राघव ह्या सिरीयल किलरने फुटपाथवर झोपलेल्या काही लोकांचा खून कारल्यानंतर, मुमबीतल्या लोकांचं फुटपाथवर झोपणं बंद झालं. खोली झोपण्यापुरती, जेवणखाण खानावळीत. त्यावेळच्या ह्या गिरणगावकरांनी मुंबईला कधी आपलं म्हटलंच नाही. मुंबईत त्यांच्यापुरती कामाचे ठिकाण असे आणि त्यांचं सर्व लक्ष गावाकडचं असे. मुंबईत भाड्याने किंवा झिलग्यांच्या खोलीत एकत्र राहायचं आणि पुरेसे पैसे जमले की गावाकडे पक्क घर बांधायचं, हे बहुतेकांचं स्वप्न असे.

मुंबईच्या गिरण्यांत काम करायला आलेल्यांत मोठ्या संख्येने पुरुष होते. गिरण्यातली कामे मोठ्या कष्टाची आणि अंगमेहेनतीची असल्याने, ते साहजिकच होत. ज्यांना गावी काहीच आधार नसे, अशा काही स्त्रियाही गिरणींत कामाला म्हणून आल्या होत्या. स्त्रियांना गिरणीत शक्यतो काम मिळत नसे आणि मिळालंच तर, ती हलक्या स्वरूपाची काम असत. त्यामुळे गिरणगावातल्या त्याकाळच्या लोकसंख्येत पुरुषांचं प्रमाण जास्त होत. मुंबईत आलेल्या काही स्त्रियांपैकी काहीजणी खाणावळी चालवत किंवा गिरणीत जी काम मिळत त्यावर आपली गुजराण करत. पण एकंदरीत मुमबीतल्या गिरणगावात स्त्रियांची एकूण संख्या पुरुषांच्या तुलनेत कमीच होती. ह्यातील बहुतेक स्त्रिया असत त्या विधवा किंवा परित्यक्त्या किंवा निराधार अशा असत.

गावाकडे आपापलं कुटुंब ठेवून मुंबई शहरात कामानिमित्त एकेकट्या आलेल्या ह्या स्त्री-पुरुषांना सहाजिकच त्यांच्या वैवाहिक सहजीवनाला मुकावं लागलेलं असायचं. त्यातील कित्येक स्त्री-पुरुषांचा गिरणीतील कामानिमित्त अथवा खानावळीत एकत्र येत असल्याने, एकमेकांशी जवळकीचे संबंध प्रस्थापित होत असत. तरुण ते प्रौढ वयातील अनोळखी स्त्री-पुरुष जेंव्हा खूप काळ एकत्र येतात, तेंव्हा असे संबंध प्रस्थापित होणं काही नवीन नाही. मुंबईच्या गिरणगावातही त्याकाळात तसंच घडलं असावं. त्यातील काही संबंध हे तात्कालिक असत, तर काही संबंध अखेरपर्यंत सुरु राहत. मुंबईत कामासाठी गेलेल्या आपल्या नवऱ्याचे एखाद्या अन्य स्त्रीशी असलेले संबंध कालांतराने त्याच्या बायकोच्या, कुटुंबाच्या कानावर जात. थोडीशी कुरकुर करून, काहीशी टीका करून शेवटी गावाकडील त्याची बायको आणि कुटुंब त्याकडे दुर्लक्ष करीत आणि आपल्या नवऱ्याचे असे संबंध त्या स्वीकारीत असत. एका अर्थाने ह्या संबंधांना अघोषित का होईना, पण समाजमान्यता होती. खरी कमाल तर पुढेच होत असे. अश्या पुरुषांचं गावाकडचं कुटुंब मुंबईत राहायला आल्यावर, मुंबईतल्या आपल्या नवऱ्याचे संबंध असलेली त्या दुसऱ्या स्त्रीलाही त्या कुटुंबात राहायला जागा मिळत असे. आपल्या अधिकृत पत्नीशी आणि त्या दुसऱ्या स्त्रीशीही त्या पुरुषाचे संबन्ध निर्वेधपणे पुढे चालू राहत असत. ह्या दुसऱ्या स्त्रियांना त्या पुरुषाच्या कुटुंबात पुरेसा मानही मिळत असे. त्यांच्या अपत्यांना त्या पुरुषाचं नांव मिळत असे. ह्या स्त्रियाही त्या पुरुषाशी आणि त्याच्या कुटुंबाशी एकनिष्ठ राहत.ह्या बायांचा त्यांच्या कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात सहभाग असे. तिचं मत काय आहे, हे देखील विचारलं जात असे. त्या पुरुषाचा संसार त्या दोघी सामोपचाराने करत असत. त्यातील अनेक ‘दुसऱ्या’ स्त्रियांनी आपल्या पुरुषाची पहिली बायको वारली असता, त्याचं दुसऱ्या स्त्रीशी लग्न लावून दिल्याचीही उदाहरणं होती. त्यांनी मात्र त्यांच्या पुरुषाशी जाती-पोटजातींमुळे लग्न करायचं नाकारलेलं असे, त्या तशाच त्याच्यासोबत राहत. दोघींची मुलं आपपरभाव न करता त्या दोघीही सारख्याच प्रेमाने सांभाळत. पुरुषांच्या अधिकृत स्त्रियांना हे स्वीकारणे तेवढं सोपं गेलं नसावं, पण कदाचित त्या कालची परिस्थिती आणि पुरुषप्रधान समाजव्यवस्था तशी तुलनेने सहिष्णू असावी. पुन्हा स्त्रिया कमावत्या नसल्याने त्यांना आपल्या नवऱ्याचे असे संबंध स्वीकारण भाग पडले असावं कदाचित..!

‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली’ ह्या शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या गाण्यात, गावाकडे आपली बायको सोडून घाम गाळण्यासाठी मुंबईत आलेल्या कामगाराची व्यथा मांडली आहे. घरदार गावाकडे सोडून मुंबईच्या गिरणीत कमला आलेला तो बायकोच्या आठवणीने व्याकुळ झालाय, तिची त्याला आठवण येतेय आणि त्यातून त्याच्या जीवाची कशी काहिली होतेय हे सांगणार हे नितांत सुंदर गाणं आहे. ह्या गाण्याचा आणि रामदास आठवलेंच्या दुसऱ्या ओळीचा काही एक संबंध नाही. शाहिरांनी ह्या गाण्यात पुढेही अनेक कडवी जोडावीत ज्यात, संयुक्त महाराष्ट्र, त्यावेळचे नेते, कामगार, कामगारांची अवस्था ह्यांचं वर्णन येत, पण तो आपल्या लेखाचा विषय नाही. शाहिरांच्या ह्या गाण्याची ‘माझी मैना गावावर राहिली’ ही पहिली ओळ घेऊन, त्यात शीघ्रकवी श्री. रामदास आठवलेंनी स्वतः रचलेली ‘.. म्हणून मुंबईकडे दुसरी पाहिली’ ही ओळ त्यांनी गमतीने म्हटली असली तरी, अनावधानाने त्यामुळे माझ्यासमोर मुंबईतल्या गिरणगावाचा हा इतिहास उभा राहिला. मुंबईत कामासाठी आलेल्या अशा अनेक राघूची मैना गावाकडे राहिल्यामुळे मुंबईत दुसरी पहिली होती ही त्याकाळची वस्तुस्थिती होती. आठवलेंचं गंमतीतलं म्हणणं काही अगदीच खोटं नव्हतं..!

-नितीन साळुंखे

१०. ०८. २०१९

9321811091

संदर्भ –

पुस्तक ‘कथा मुंबईच्या गिरणगावची’ – लेखिका नीरा आडारकर आणि मीना मेनन

ज्यांना मुंबईच्या गिरणगावच्या उदयास्ताचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, त्याने हे पुस्तक अवश्य वाचावं.