माझी मैना गावावर राहिली, म्हणून मुंबईत दुसरी पाहिली…

(सदर लेख श्री. आठवलेंवर टीका म्हणून लिहिलेला नसून, त्यांचं वक्तव्य केवळ संदर्भापुरतं घेतलेलं आहे, याची नोंद घ्यावी. लेखावर व्यक्त होण्यापूर्वी कृपया लेख संपूर्ण वाचावा ही नम्र विनंती.)

माझी मैना गावावर राहिली, म्हणून मुंबईत दुसरी पाहिली…

‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतेय काहिली…’ हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं स्वातंत्र्यपूर्व काळात अत्यंत गाजलेलं गाणं. नुकतंच आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री आणि कविसूर्य श्री. रामदास आठवले यांनी, ‘माझी मैना गावाकडे राहिली’ ह्या त्या गाण्याच्या पहिल्या ओळीला जोडून ‘..म्हणून मुंबईकडे दुसरी पाहिली’ अशी स्वरचित ओळ एका कार्यक्रमात म्हटली आणि एकाच गदारोळ उडाला. अर्थात आठवलेंच्या ह्या स्वरचित ओळीमुळे मोठ्या रिस्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसू शकला असता, परंतु त्याच वेळी देशाला ‘३७०’ रिश्टर स्केलचा धक्का बसला आणि आठवलेंचा होऊ घातलेला भूकंपाचा धक्का त्यात कुठल्या कुठे विरून गेला. पुढे महाराष्ट्रात आलेल्या पुरात तर तो पार वाहूनच गेला..

वास्तविक आठवलेंना किंवा त्यांच्या म्हणण्याला काही गांभीर्याने घेण्याची गरज नव्हती. त्यांना तसंही कोण गांभीर्याने घेताही नसावं. आठवले हे स्ट्रेस बर्स्टर आहेत हे मात्र खरं. प्रसंग कोणताही आणि कितीही गंभीर असो, आठवले त्यात सैलपणा आणतात हे मात्र खरं. ‘माझी मैना गावाकडे राहिली’ ह्या त्या गाण्याच्या पहिल्या ओळीला जोडून त्यांनी म्हटलेली ‘..म्हणून मुंबईकडे दुसरी पाहिली’ हा देखील त्यांचा वातावरण हलकं करण्याचाच प्रयत्न असावा. पण काही का असेना, आठवले अनावधानाने का होईना, पण खरं बोलून गेले. अण्णाभाऊ साठे यांनी ज्या काळात ही रचना केली, त्याकाळातल्या मुंबईची परिस्थिती खरीच काहीशी तशी होती. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर निवृत्ती पवार, शाहीर कृष्णराव साबळे हे त्याकाळातल्या गिरणगावात समकालीन म्हणता येतील असे महत्वाचे शाहीर. गिरणगावाचं त्याकाळातील चित्र ह्या सर्वानी आपापल्या विविध रचनांतून उभं केलाय.

इथे मुंबई म्हणजे गिरणगांव हे लक्षात घ्यावं. गिरणगांव वसण्याच्या आधी गिरगाव अस्तित्वात होतं. परंतु ती वस्ती होती पांढरपेशा मध्यमवर्गीय नोकरदारांची. गिरगांव पलिकडे उत्तरेलाही भायखळा, लालबाग, माजगाव, परेल तर एकीकडे वरळी, माहिम ही गांवं होती, पण ती तुरळक वाड्या-वस्तीची किंवा बड्या इंग्रज अंमलदारांच्या बंगल्यांची. परेलला गव्हर्नर हाऊस होतं. मुंबंईची बेटं मधल्या खाड्यांमधे भराव टाकून जोडण्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं होतं. माजगांव, भायखळा, लालबाग, परेल या भागात मोठ्या प्रमाणावर जमिन उपलब्ध झाली होती. आता कमी होती ती या जमिनीवर होणाऱ्या वस्तीची.

मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या जमिनीवर लोकांची वस्ती व्हायला सुरुवात झाली ती साधारण १८३० नंतर, जहाज आणि समुद्र मार्गे प्रवास सुरू झाल्यानंतर. परंतु तिता रेटा कमी होता. पुढे काही वर्षांनी, म्हणजे इसवी सन १८५१ मधे शेठ कावसजी नानाभाई दावर ह्या पारसी उद्योजकाने ‘द बाॅम्बे स्पिनिंग अॅन्ड विव्हींग कंपनी’ या पहिल्या कापड गिरणीची स्थापना मुंबईतल्या ताडदेव येथे केली. त्त्या पुढच्याच तीन वर्षात, १८५४ मधे ही कापड गिरणी सुरू झाली आणि मुंबईच्या गिरणगांवाने पहिलं ‘टॅह्यॅ’ केलं..

ही गिरणी सुरू व्हायच्या केवळ एकच वर्ष अगोदर, १६ एप्रिल १८५३ मधे मुंबईत रेल्वे सुरू झाली होती. १८५४ मधे सुरू झालेल्या ह्या पहिल्या गिरणीनंतर, पुढच्या सहा वर्षांत, म्हणजे १८६० पर्यंत मुंबईत एकून दहा गिरण्यांची धुरांडी धूर ओकत होती. १८८० सालापर्यंत मुंबईतल्या गिरण्यांची संख्या वाढून ती ३१ पर्यंत पोहोचली. ही संख्या पुढे वाढतच राहीली. अर्थात, गिरण्यांची संख्या किती होती हा लेखाचा विषय नसून, त्यामुळे मुंबईचा गिरणगाव कसा वसला आणि आठवले म्हणाले तशी ‘..मुंबईत दुसरी पाहिली’ कशी हे सांगणं आहे, त्यामुळे आता तिकडे येतो.

ह्या गिरण्यांसाठी लागणारा कामगार वर्ग सुरुवातील मुख्यत: आला तो कोकणातून. गिरण्या सुरू होण्यापूर्वी मुंबईत रेल्वे लाईन टाकण्याचं काम सुरु झालं होतं. त्याच्या काही काळ पूर्वी मुंबईत जहाजबांधणीचं काम जोरात सुरू झालं होतं. जहाजांसाठी आणि रेल्वे लाईनच्या स्लिपर्ससाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या लाकडाची तोड रत्नागिरी जिल्ह्यातील (तेंव्हाचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे आताचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे विभाजीत दोन जिल्हे. एकेकाळी ह्या जिल्ह्यांतून तांदळाची निर्यात होत असे) दाट जंगलातून केली होती. प्रचंड प्रमाणात झाडांची तोड झाल्यामुळे, रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीची मोठी धूप होऊन आधीच कमी असलेली शेती योग्य जमिन कमी होऊ लागली होती आणि त्यावर अवलंबून मनुष्बळाला इतर कामांची आवश्यकता भासू लागली होती. हे सर्व मनुष्य बळ रोजगारासाठी मुंबईच्या गिरण्यांकडे आकर्षित झालं. कोकणातून मोठ्या प्रमाणावर कामगार मुंबईत येण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे, कोकण आणि मुंबईला जोडणारा जलमार्ग त्यापूर्वीच कार्यान्वीत झाला हेता. मुंबईची रेल्वे पुढे पुणे मार्गे घाटाशी जोडल्यानंतर, घाटावरूनही शेतमजूर कामगार म्हणून मुंबईत येऊ लागले. पण गिरणगांवचा पाया रचला तो कोकण्यांनीच..!

मुंबईतल्या गिरणगावाचा पैस म्हणायचा तर, पश्चिम रेल्वेवरची दादर ते महालक्ष्मी ह्या स्टेशनांच्या पूर्व- पश्चिमेचा परिसर, मध्य रेल्वेवरच्या दादर ते भायखळा मधल्या स्टेशनांच्या पूर्व-पश्चिमबाजूचा परिसर आणि हार्बर रेल्वेवरच्या काॅटन ग्रीन ते शिवडी दरम्यानचा परिसर. मुंबईतल्या बहुतेक सर्व गिरण्या ह्याच परिसरात वसल्या होत्या. ह्या गिरण्यांमधे काम करणाऱ्या गिरणी कामगारांनी आपली घरं थाटली ती ह्या गिरण्यांच्या आधाराने. काही गिरण्यांनी आपल्या कामगारांना राहाण्यासाठी, गिरण्यांच्याच आवारात चाळीही बांधून दिल्या होत्या. तेंव्हा कामाच्या वेळा अनियमीत असल्याने, कामावर येणं-जाणं सोपं व्हावं म्हणून प्रत्येक गिरणीचा कामगार, त्या गिरणीपासून चालत जाण्याच्या दहा-ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर राहाण्यास प्राधान्य देत असे. १८५० नंतरच्या १०० वर्षांत अशा प्रकारे गिरणगांव वसला. गिरण्यांच्या आधाराने वसला म्हणून तो गिरणगांव.

गिरणगाव बसण्यापूर्वी मुंबईत गिरगाव नावाचा विभाग अस्तित्वात होता. गिरगांव आणि गिरणगांव ह्या दोन्ही मराठी माणसांच्याय वसाहती असल्या तरी त्या दोघात एक मुलभूत फरक होता. हा फरक, त्या दोघांचं नांव एकमेकापासून वेगळं करणाऱ्या ‘ण’ या अक्षरात नेमका दिसतो. गिरगांव शिक्षित, देशी-विदेशी कंपन्या, शाळा काॅलेजातून कारकून- अधिकारी-शिक्षक अशी बौद्धीक कामं करणाऱ्या लोकांचा भाग, तर गिरणगांव निव्वळ कामगारांचा, अंगमेहेनतीची कामं करणाऱ्या कष्टकऱ्यांचा..! दोघांच्या भावनांचा अविष्कारही वेगळा. गिरगावातील लोक मध्यमवर्गीय संस्कृतीतले, त्यामुळे घर, व्यवसाय आणि आपली सामाजिक प्रतिष्ठ ह्याला बाधा येणार नाही असे व्यक्त होणार, तर जिरं गाव व्यक्त होण्यात एकदम ग्राम्य, रोखठोक, कसलीही पर्वा न करता आपलं मत समोर मांडणार. आता आता पर्यंत ह्या ‘ण’ चा फरक दिसून येत होता पण, आता ते सारं संपत आलंय आणि मुंबईवर गुजराती-मारवाडी ‘ण’ ने ताबा मिळवलाय. ह्याची कारण वेगळी आहेत आणि ह्या ठिकाणी त्यांची चर्चा करण्याचं काहीच कारण नसल्याने, इथे फक्त त्याचा उल्लेख केला आहे.

आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊ. गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी प्रथम मोठ्या प्रमाणात कोकणातून आणि नंतर घाटावरून जे मनुष्यबळ गिरणी कामगार म्हणून मुंबईत आला, त्या पैकी बहुतेक पुरुषांनी आपलं कुटुंब आपल्या गावीच ठेवलं होत. गिरणीत काम करायचं, लावणी-पेरणी साठी अथवा दसरा–दिवाळीनिमित्त गावाकडे जाणे, हाच त्यांचा परिपाठ असायचा. एकट्याने नोकरीसाठी यायचं, भाड्याच्या खोलीत सर्वानी मिळून राहायचं, गिरणीतल्या आपापल्या पाळीप्रमाणे झोपण्याखाण्याच्या वेळा वाटून घ्यायच्या असं सारं होत. एकेक खोलीत त्याकाळात २०-३०जण राहत. पहिली-दुसरी-तिसरी प्लाइ अश्या कामाच्या वेळा असल्याने, एके वेळेस एका खोलीत त्या वीस तीस जणांपैकी जास्तीतजास्त १०-१५ लोकच असत. अश्या खोल्यांचे ‘झिलग्याची खोली’ म्हणत. झील म्हणजे कोकणात सडे पुरुष. सगळेच घरी असतील तेंव्हा आपल्या पठारी चाळीच्या गॅलरीत आणि रात्री चक्क फुटपाथवर पसरायची ही पद्धत होती. झिलग्याची फुटपाथवर पसरी पसरायची प्रथा १९६०च्या आसपास रामन राघवचा उदय होईपर्यंत सुरु होती. रामन राघव ह्या सिरीयल किलरने फुटपाथवर झोपलेल्या काही लोकांचा खून कारल्यानंतर, मुमबीतल्या लोकांचं फुटपाथवर झोपणं बंद झालं. खोली झोपण्यापुरती, जेवणखाण खानावळीत. त्यावेळच्या ह्या गिरणगावकरांनी मुंबईला कधी आपलं म्हटलंच नाही. मुंबईत त्यांच्यापुरती कामाचे ठिकाण असे आणि त्यांचं सर्व लक्ष गावाकडचं असे. मुंबईत भाड्याने किंवा झिलग्यांच्या खोलीत एकत्र राहायचं आणि पुरेसे पैसे जमले की गावाकडे पक्क घर बांधायचं, हे बहुतेकांचं स्वप्न असे.

मुंबईच्या गिरण्यांत काम करायला आलेल्यांत मोठ्या संख्येने पुरुष होते. गिरण्यातली कामे मोठ्या कष्टाची आणि अंगमेहेनतीची असल्याने, ते साहजिकच होत. ज्यांना गावी काहीच आधार नसे, अशा काही स्त्रियाही गिरणींत कामाला म्हणून आल्या होत्या. स्त्रियांना गिरणीत शक्यतो काम मिळत नसे आणि मिळालंच तर, ती हलक्या स्वरूपाची काम असत. त्यामुळे गिरणगावातल्या त्याकाळच्या लोकसंख्येत पुरुषांचं प्रमाण जास्त होत. मुंबईत आलेल्या काही स्त्रियांपैकी काहीजणी खाणावळी चालवत किंवा गिरणीत जी काम मिळत त्यावर आपली गुजराण करत. पण एकंदरीत मुमबीतल्या गिरणगावात स्त्रियांची एकूण संख्या पुरुषांच्या तुलनेत कमीच होती. ह्यातील बहुतेक स्त्रिया असत त्या विधवा किंवा परित्यक्त्या किंवा निराधार अशा असत.

गावाकडे आपापलं कुटुंब ठेवून मुंबई शहरात कामानिमित्त एकेकट्या आलेल्या ह्या स्त्री-पुरुषांना सहाजिकच त्यांच्या वैवाहिक सहजीवनाला मुकावं लागलेलं असायचं. त्यातील कित्येक स्त्री-पुरुषांचा गिरणीतील कामानिमित्त अथवा खानावळीत एकत्र येत असल्याने, एकमेकांशी जवळकीचे संबंध प्रस्थापित होत असत. तरुण ते प्रौढ वयातील अनोळखी स्त्री-पुरुष जेंव्हा खूप काळ एकत्र येतात, तेंव्हा असे संबंध प्रस्थापित होणं काही नवीन नाही. मुंबईच्या गिरणगावातही त्याकाळात तसंच घडलं असावं. त्यातील काही संबंध हे तात्कालिक असत, तर काही संबंध अखेरपर्यंत सुरु राहत. मुंबईत कामासाठी गेलेल्या आपल्या नवऱ्याचे एखाद्या अन्य स्त्रीशी असलेले संबंध कालांतराने त्याच्या बायकोच्या, कुटुंबाच्या कानावर जात. थोडीशी कुरकुर करून, काहीशी टीका करून शेवटी गावाकडील त्याची बायको आणि कुटुंब त्याकडे दुर्लक्ष करीत आणि आपल्या नवऱ्याचे असे संबंध त्या स्वीकारीत असत. एका अर्थाने ह्या संबंधांना अघोषित का होईना, पण समाजमान्यता होती. खरी कमाल तर पुढेच होत असे. अश्या पुरुषांचं गावाकडचं कुटुंब मुंबईत राहायला आल्यावर, मुंबईतल्या आपल्या नवऱ्याचे संबंध असलेली त्या दुसऱ्या स्त्रीलाही त्या कुटुंबात राहायला जागा मिळत असे. आपल्या अधिकृत पत्नीशी आणि त्या दुसऱ्या स्त्रीशीही त्या पुरुषाचे संबन्ध निर्वेधपणे पुढे चालू राहत असत. ह्या दुसऱ्या स्त्रियांना त्या पुरुषाच्या कुटुंबात पुरेसा मानही मिळत असे. त्यांच्या अपत्यांना त्या पुरुषाचं नांव मिळत असे. ह्या स्त्रियाही त्या पुरुषाशी आणि त्याच्या कुटुंबाशी एकनिष्ठ राहत.ह्या बायांचा त्यांच्या कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात सहभाग असे. तिचं मत काय आहे, हे देखील विचारलं जात असे. त्या पुरुषाचा संसार त्या दोघी सामोपचाराने करत असत. त्यातील अनेक ‘दुसऱ्या’ स्त्रियांनी आपल्या पुरुषाची पहिली बायको वारली असता, त्याचं दुसऱ्या स्त्रीशी लग्न लावून दिल्याचीही उदाहरणं होती. त्यांनी मात्र त्यांच्या पुरुषाशी जाती-पोटजातींमुळे लग्न करायचं नाकारलेलं असे, त्या तशाच त्याच्यासोबत राहत. दोघींची मुलं आपपरभाव न करता त्या दोघीही सारख्याच प्रेमाने सांभाळत. पुरुषांच्या अधिकृत स्त्रियांना हे स्वीकारणे तेवढं सोपं गेलं नसावं, पण कदाचित त्या कालची परिस्थिती आणि पुरुषप्रधान समाजव्यवस्था तशी तुलनेने सहिष्णू असावी. पुन्हा स्त्रिया कमावत्या नसल्याने त्यांना आपल्या नवऱ्याचे असे संबंध स्वीकारण भाग पडले असावं कदाचित..!

‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली’ ह्या शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या गाण्यात, गावाकडे आपली बायको सोडून घाम गाळण्यासाठी मुंबईत आलेल्या कामगाराची व्यथा मांडली आहे. घरदार गावाकडे सोडून मुंबईच्या गिरणीत कमला आलेला तो बायकोच्या आठवणीने व्याकुळ झालाय, तिची त्याला आठवण येतेय आणि त्यातून त्याच्या जीवाची कशी काहिली होतेय हे सांगणार हे नितांत सुंदर गाणं आहे. ह्या गाण्याचा आणि रामदास आठवलेंच्या दुसऱ्या ओळीचा काही एक संबंध नाही. शाहिरांनी ह्या गाण्यात पुढेही अनेक कडवी जोडावीत ज्यात, संयुक्त महाराष्ट्र, त्यावेळचे नेते, कामगार, कामगारांची अवस्था ह्यांचं वर्णन येत, पण तो आपल्या लेखाचा विषय नाही. शाहिरांच्या ह्या गाण्याची ‘माझी मैना गावावर राहिली’ ही पहिली ओळ घेऊन, त्यात शीघ्रकवी श्री. रामदास आठवलेंनी स्वतः रचलेली ‘.. म्हणून मुंबईकडे दुसरी पाहिली’ ही ओळ त्यांनी गमतीने म्हटली असली तरी, अनावधानाने त्यामुळे माझ्यासमोर मुंबईतल्या गिरणगावाचा हा इतिहास उभा राहिला. मुंबईत कामासाठी आलेल्या अशा अनेक राघूची मैना गावाकडे राहिल्यामुळे मुंबईत दुसरी पहिली होती ही त्याकाळची वस्तुस्थिती होती. आठवलेंचं गंमतीतलं म्हणणं काही अगदीच खोटं नव्हतं..!

-नितीन साळुंखे

१०. ०८. २०१९

9321811091

संदर्भ –

पुस्तक ‘कथा मुंबईच्या गिरणगावची’ – लेखिका नीरा आडारकर आणि मीना मेनन

ज्यांना मुंबईच्या गिरणगावच्या उदयास्ताचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, त्याने हे पुस्तक अवश्य वाचावं.