कुतुहल लालबागचं-भाग दुसरा व शेवटचा..

गिरणगांवचं मुख्य ठाणं असणारं #लालबाग आणि त्याचं ‘लालबाग’ हे नांव आणि सर्वच सण-समारंभात, विशेषत: गणेशोत्सवात ओसंडून वाहाणारा लालबागकरांचा (पक्षी:गिरणगांवकरांचा) उत्साह हा माझ्या कुतुहलाचा विषय.

माझ्या मनात लालबागविषयी असलेल्या माझ्या लहानपणापासूनच्या ह्या दोन कुतूहलांचा शोध घेणाऱ्या माझ्या दोन भागातील लेखाचा हा #दुसरा_व_शेवटचा भाग..

#भाग_दुसरा_व_शेवटचा

लालबागकरांनी एवढा उत्साह आणला कुठून?

माझं आजोळ लालबागचं. त्यामुळे सणासुदीला आणि एरवीही लालबागचं वेगळेपण माझ्या तेंव्हापासूनच लक्षात यायचं. सणासुदीच्या दिवसात तर लालबाग अधिक सुरेख दिसायचं. वाहत असणं हा रक्ताचा गुणधर्म, तसाच वाहत, अक्षरक्ष: रक्तासारखं सळसळणं काय असत, ते तेंव्हाच्या लालबागच्या लोकांकडे पाहून समजायचं. मुंबईतला हा भाग, सणासुदीच्या दिवसांत उर्वरित मुंबईपेक्षा काही वेगळाच भासायचा. इतका उत्साह हे लोक आणतात तरी कुठून, असा प्रश्न माझ्या तेंव्हाच्या बालमनाला पडायचा. आज ही परिस्थिती बदलत चालली आहे. लालबागच्या जमिनीला घट्ट चिकटून असलेल्या चाळी जमीनदोस्त होऊ लागल्या आणि विकासाचे भ्रष्ट प्रतीक असलेले टॉवर त्याजागी उभे राहू लागले. ह्या टॉवरात अस्सल मुंबईकर मराठी माणूस फक्त धनदांडग्यांची धुणी -भांडी करताना दिसतात आणि जे कोणी मराठी तिथे राहणारे आहेत, त्यांचं आणि ह्या मातीचा काही संबंध उरलेला असेल असं वाटत नाही. असं असूनही लालबागचा सणांमधला उत्साह, असे उत्साही लोक आणि लोकांतील उतसह कमी झालेला असला तरी, तो पार आटलेला नाही , असं अनुभवावरून म्हणता येत.

हे लालबागवासीय हा उत्साह आणतात कुठून, हे माझं लालबागविषयीच आणखी एक कुतूहल. तेंव्हा तर गिरण्या हेच एकमेव मुख्य उत्पन्नाचं साधन. पगार तुटपुंजा, खाणारी तोंड भरपूर. हात तोंडाची गाठ पडतात पडत नाकी नऊ यायचे तेंव्हा, परंतु सणासुदीतला उत्साह मात्र पैसेवाल्यालाही लाजवेल असा. ह्यांच्यातला हा उत्साह येतो कुठून, ह्याचा माझा शोध जाऊन थडकला, तो थेट एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीला. ह्या अमर्याद उत्साहाचा स्रोत गिरण्यांमधून स्रवला आहे, असं हळू हळू माझ्या लक्षात येऊ लागलं.

इसवी सनाच्या १८५४ साली मुंबईत पहिली कापड गिरणी सुरु झाली आणि नंतरच्या ३०-३५ वर्षांत ही ३१ झाली. ह्या गिरण्या मुख्यतः: वसल्या होत्या त्या लालबाग-परेल-वरळी -माझगाव ह्या औरस-चौरस भागात. ह्या गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी लागणार कामगार वर्ग मुख्यतः आला तो सुरुवातीला कोकणातून आणि नंतर रेल्वे घाटावर पोहोचल्यानंतर, घाटावरून. असं असलं तरी गिरणगावावर पगडा राहिलाय तो कोकण्यांचाच.

सुरुवातील कोकणातून आणि नंतर घाटावरून गिरण्यांमध्ये काम करायला आलेला हा गिरणी कामगार, एकटाच आला होता. कुटुंब गावाकडे असायचं. महिनाभर राबायचं आणि स्वतःचा मुंबईतला खर्च भागवून उरलेले पैसे गावाकडच्या लोकांकडे धाडायचे, असा जीवनक्रम. असे एकेकटे लोक मिळून राहायचे ते गिरण्यांच्या आवारात किंवा परिसरात असलेल्या एकमजली किंवा दुमजली चाळींमधून. एक खोली भाड्याने घ्यायची, त्यात २० पंचवीस जण राहायचे. सर्वांच्या कामाच्या पाळ्या वेगवेगळ्या असल्याने, एका वेळी एका खोलीत ८ माणसांपेक्षा जास्त माणसं नसायची. झिलग्यांच्या खोल्या म्हणायचे अशा खोल्यांचे. जेवण खानावळीत. यातील कुणालाही मुंबई आपलं कायमचं घर व्हावं असं वाटायचं नाही. मुंबई फक्त पैसे कमावण्यापुरती, स्वतःची चिता मात्र गावीच पेटावी ही बहुतेकांची इच्छा असे.

हे आद्य गिरणगांवकर राहायचे ते गटागटाने. हा गट असायचा नात्यातल्या माणसांचा. ते नाहीच सापडले तर एकाच गावातल्या लोकांचा. त्यानंतर एकाच जिल्ह्यातल्या लोकांचा. हे एका प्रकारे स्वतःच्या इच्छेने निर्माण केलेले ‘घेट्टो’ होते. म्हणून त्याकाळच्या मुंबईत किंवा अगदी आताच्याही उरल्या सुरल्या जीर्ण चाळींमध्ये डोकावलं तर, अशा ठिकाणी एकमेकांच्या नातेवाईकांच्या किंवा गाववाल्यांच्या किंवा एकाच जिल्ह्यातल्या लोकांच्या खोल्या आढळतील. चाळीच्या चाळी नातेवाईकांनी किंवा एकाच गावातल्या लोकांनी भरलेल्या असत तेंव्हा. तेंव्हा आणि काही प्रमाणात आताही. हे लोक म्हणायला समूहात राहत असले तरी ते आपल्या रक्ताच्या माणसांपासून नोकरी-व्यवसायामुळे तुटलेले असत. ती कमी त्यांना जाणवत असे.

नोकरीच्या ठराविक वेळेनंतर त्याच त्याच माणसांबरोबर नुसत्या गप्पा तरी किती मारणार, म्हणून लालबाग परिसरात पहिल्यांदा विविध गाववाल्यांची मंडळं उदयाला अाली. माणूस हा संस्कृतीप्रिय प्राणी. ह्या मंडळांनीच पुढे गिरणगांवकरांच्या सांस्कृतिक भुकेला प्रज्वलीत केलं आणि मग खाऊही घातलं. नोकरी व्यतिरिक्तचा मोकळा वेळ लोक ह्या मंडळातून जमू लागले. आपल्या गावाच्या उन्नतीचा विचार करू लागले. आपल्या कुटुंबाशी संपर्क ठेवण्यासाठी ह्या मंडळांचा उपयोग होत असे. चार लोक एकत्र आले की, मंडळ स्थापन करायचं, ते काही काळ चालवायचं आणि मग त्यातून मतभेद होऊन काही मंडळींनी बाजूला होऊन दुसरं मंडळ स्थापन करायचं, हा मराठी मंडळींचा आवडता बाणा. ह्या बाण्याला जागून एका मंडळातून पुढे अनेक मंडळ स्थापन झाली. ह्यातून निकोप स्पर्धा निर्माण झाली.

ह्या मंडळातील नेहेमीच कुणी ना कुणी अधून मधून गावाला जाणारा असे. मग त्याच्या हातून आपल्या कुटुंबियांना निरोप, एखादी चिठ्ठी, खाऊची ‘भ्याट’, कधीतरी पैसे पाठवणं सोयीचं होत असे. तो गावाला जाणारा एक असला तरी, त्याला पोचवायला २०-२५ गाववाले मुंबई सेंट्रलच्या किंवा परेलच्या डेपोवर अगत्याने जात असत. जाणारा एक आणि त्याला गाडीत बसवायला पोचवायला पंचवीस असं दृश्य त्याकाळच्या मुंबईतल्या एसटी डेपोंमधलं सर्रास दृश्य होत. पोचवायला आलेले काहीकाळ त्या एसटीसोबत मनाने स्वतःच्या गावी जात असत. कुटुंबापासूनचं तुटलेपण ते अश्या पद्धतीने भरपाई करण्याचा प्रयत्न करत असत.

गिरणगांवात स्थापन झालेल्या विविध ग्रामस्थ मंडळातून पुढे भजनी मंडळ निघाली, लेझिम पथकं स्थापन झाली, गल्ली गल्लीत व्यायामशाळा निघाल्या. आपापल्या गावच्या देवांचे उत्सव गिरणगावात भजन गाऊन साजरे करू लागले. माझ्या लहानपणी रात्री सात-आठ वाजल्यानंतर एखाद्या चाळीतून दूरवरून येणारे असे अनेक भजनाचे आर्त स्वर मी ऐकले आहेत. भजनांच्या स्पर्धा होऊ लागल्या. डबल बाऱ्या रात्र गाजवू लागल्या. भजन मंडळातील बुवांची काय वाट असायची तेंव्हा. ह्या भजन मंडळीतून पुढे विविध गायन मंडळं, नाटक मंडळी निघाल्या. कोकण्यांनी गिरणगावात दशावतार, मेळे आणले-खेळे आणले, नमन आणलं-नाटकं आणली. घाट्यानी पोवाडे, भारुडं, लावण्या आणल्या. मेळे, भारूडं, लावण्या, पोवाडे, दशावतार, जलसे अशी महाराष्ट्रातली जी म्हणाल तो लोककला गिरणगावात दिसू लागली.

गावाकडून पैसे कमावण्यासाठी मुंबईत आलेल्या शिड्या चाकरमान्यांनी त्यांच्या त्यांच्या मातीतली कलाही मुंबईत आणली. त्यामुळेच मुंबईत, विशेषतः लालबाग परेल विभागात अलम महाराष्ट्राची संस्कृती एकाच ठिकाणी दिसून येऊ लागली, बहरली. त्यातून या लोककलांच्या माध्यमातून गिरणगांवातील कष्टकऱ्यांचं राजकीय आणि सामाजिक प्रबोधनही होऊ लागलं. ह्यातून पुढे गिरणगावच्या सामाजिक, राजकीय जाणिवांचा परिघही वाढत गेला.

ह्या सर्वांवर कडी करणारा सांस्कृतिक उत्सव म्हणजे गिरणगावातला गणेशोत्सव. सन १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी गिरगावातल्या केशवजी नाईकांच्या चाळीत मुंबईतल्या सार्वजनिक गणेशत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर जवळपास २७ वर्षांनी, म्हणजे १९२०साली गिरणगावातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. गिरणगावातला पहिला सार्वजनिक गणेशत्सव म्हणजे लालबागचा ‘चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळा’चा गणपती. यंदा हे मंडळ आपला शतकमहोत्सव साजरा करतंय. ह्या मंडळाच्या गणेशत्सवाच्या सुरुवातीनंतरच्या काही वर्षांत लालबाग भागात अनेक गणेशत्सव मंडळ स्थापन झाली. त्याकाळी कुटुंब गावी सोडून गिरणीत कामगार म्हणून आलेल्या चाकरमान्यांना गणेशत्सव मंडळ म्हणजे, आपला रिकामा वेळ घालवण्यासाठी उत्तम साधन वाटलं असेल तर नवल नव्हे.

तेंव्हा ह्या दहा-बारा दिवसाच्या गणेशोत्सवाची सुरुवात महिनाभर पूर्वीच व्हायची. वर्गणी काढण्यापासून उत्सवाची सुरुवात व्हायची. ह्यात त्या परिसरातील सर्वच चाकरमान्यांचा समावेश असायचा. गणपतीच्या मांडवाच्या कनाती, पताका लावण्यापासून ते गणपतीचं डेकोरेशनपर्यंतची सगळी काम मंडळांचे कार्यकर्ते स्वतःच करायचे. सर्वच कामांचं कॉन्ट्रॅक्ट देण्याची प्रथा खूप अलीकडची, उत्सवात राजकारणी आणि जाहिरातदार घुसल्यानंतरची. जे पडेल ते काम, उत्सव आपला नव्हे तर माझाच आहे, ह्या भावनेनं मंडळाचे आणि त्या मंडळांच्या परिसरातलेही लोक तेंव्हा करायचे. कुटुंबापासून तुटल्यामुळे आलेलं रितेपण घालवण्यासाठी इतर सांस्कृतिक कार्यक्रमाप्रमाणे गणेशत्सव हा एक उत्तम साधन होते. मुंबईत बहरलेल्या महाराष्ट्रातील सर्वच लोकसंस्कृतीना सार्वजनिक गणेशत्सवामुळे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झालं.

लोकांचं प्रबोधन, मनोरंजन करण्यासाठी निर्माण झालेल्या विविध मंडळाना गिरणगांवातील गणेशोत्सवाने एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यातून अनेक उत्तम, सर्जनशील कलावंत, वक्ते, गायक, नट, नाटककार, चित्रकार, शिल्पकार लालबाग-गिरणगाव परिसराने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिले. ‘कामगार रंगभूमी’ नावाची स्वतंत्र शाखाच गिरणगांवाने महाराष्ट्राला दिली..! गिरणीतलं आणि गिरणीतल्या कामानंतरच एकटेपणच जीवन सुसह्य होण्यासाठी, समूहात असणाऱ्या, तरीही ‘एकटं’ असणाऱ्या चाकरमान्यांनी विविध सांस्कृतिक कारणांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला समृद्ध केलं.

माझा जन्म १९६५चा. मी साधारण ७० सालात कळता झालो आणि तेंव्हापासून मी गिरणगांवकरांचा, विशेषत: लालबागकरांचा उत्साह पाहात आलोय. माझं आजोळ ‘अनंत निवास’ या गणेश टाॅकीज जवळच्या बिल्डींगमधे. तेंव्हा किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरच्या बुरूजातून दिसलेलं आणि दिसत आलेलं गिरणगांव आणि गिरणगांवकरांचा उत्साह मला तेंव्हापासून अचंबित करत आलाय. कुणाच्या बारशापासून ते मयतापर्यंत किंवा दहिहंडी-गणेशोत्सवापासून ते दंगलींपर्यंत, कारण किंवा प्रसंग कोणताही असो लालबागकरांचा सारखाच उत्साह मला दिसायचा.

हा उत्साह ह्या फाटक्या अंगाच्या माणसांमधे येतो कुठून याचा मी तेंव्हापासून शोध घेत होतो. जवळपास तीन दशकांचं वाचन, निरिक्षण यातून माझ्या लक्षात आलं की, लालबागकराच्या न आटणाऱ्या उत्साहाचं कारण, आताच्या लालबागकरांच्या गिरणी कामगार पूर्वजांचं, संसार गांवी सोडून इकडे ‘एकटं’ राहाणं हे होतं.

गिरणगांवकरांच्या त्या ‘एकटे’पणाने निर्माण केलेला त्यांच्या उत्साहाचा झरा अजुनही वाहतो आहे..!

त्यांच्या ‘एकटेपणा’तून एवढं सगळं सांस्कृतिक वैभव निर्माण झालंय, हे खरं वाटेल कुणाला?

-©️नितीन साळुंखे

9321811091

01.09.2019