होय, मी देशद्रोही आहे..!

होय, मी देशद्रोही आहे..!

गोष्ट अलीकडचीच. ऑगस्ट महिन्याच्या १६-१७ तारखेची. मित्राच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. नुकताच देशाच्या प्रेमाला भरतं आणणारा एक दिवसाचा राष्ट्रीय उत्सव होऊन गेला होता. मित्राच्या टेबलवर एक सुबक बांधणीचा आकर्षक बॉक्स पडला होता. असं काही देखणं दिसलं की माझं कुतूहल जागं होतं. त्या कुतूहलापोटी मी तो बॉक्स पाहायला हातात घेतला. पाहताना लक्षात आलं की, ते एक पॅकिंग होतं. आत भारताचा तिरंगा झेंडा असावा. चालू मोसमातली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या परिसरातील कुण्या युवा नेत्याने त्या सुरेख बॉक्समध्ये लपेटून परिसरातील काही नागरिकांना (पक्षी: मतदारांना ), १५ ऑगस्टच्या निमित्ताने भारताच्या तिरंगी झेंड्याचं वाटप केलं होत. थोडक्यात त्या परिसरातील नागरिकांना आपण किती मोठे देशभक्त आहोत हे दाखवण्यासाठी आणि त्यांचं एक दिवसीय देशप्रेम जागवून आगामी निवडणुकीत आपल्याला(च) मत द्यावं, असं सांगणारा तो एक प्रकार होता. झेंडा अधिक तो बॉक्स ह्याची किंमत नाही म्हटलं तरी हजारभर रुपये असावी. देशभक्ती ही निवडणुकांसाठी आणि निवडणुकांपुरती(च) वापरायची गोष्ट असल्याचे आदर्श प्रस्थापित झाल्याच्या अलीकडच्या काळात, त्या भावी आमदाराचं झेंडा वाटप सुसंगतच होतं असं म्हणायला हवं. आमदार म्हणून निवडून येण्यासाठी झेंड्याच्या माध्यमातून दाखवलेली देशभक्ती हे एक भांडवल होत, असा त्याचा साधा अर्थ.

मित्राने झेंड्याकडे बोट दाखवून, ह्या बॉक्समध्ये तो झेंडा होता असं सांगितलं. त्याने तो झेंडा अभिमानाने आपल्या टेबलवर ठेवला होता. मी जिथे बसलो होतो, तिथून तो झेंडा अगदी नजीक होता. मी पहिल्यांदा माझ्या जागेवरून उठलो आणि झेंड्यापासून जास्तीत जास्त लांब जाऊन बसलो. मित्राच्या चेहेऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उमटलं. त्याने काही विचारायच्या आत मीच त्याला सांगितलं की मी झेंड्यापासून शक्यतो लांब राहतो. माझी सावली त्याच्यावर पडू नये किंवा माझा स्पर्श त्याला घडू नये ह्याची मी नेहेमी काळजी घेतो. झालं, जे देशात चाललंय तेच इथेही झालं, मला देशद्रोह्याचा अप्रत्यक्ष ‘किताब’ मिळाला.

देशात गेली पाच-सहा वर्ष देशभक्तीचा धंदा जोरात आहे. ‘भारत माता की जय’ किंवा ‘वंदे मातरम’ बोलणं म्हणजे गंगेत पापं धुवून पवित्र झाल्यासारखं झालं आहे. मी हे खोटं खोटं बोलणं किंवा करणं नाकारलंय, आणि साहजिकच मी देशद्रोही ठरलो. मला देशद्रोहाचा ‘किताब’ देणाऱ्या माझ्या मित्रच काहीच चुकलं नाही, तो सध्याच्या वातावरणाशी सुसंगतच वागला.

मी खरंच देशद्रोही आहे, असं मला वाटतं. का ते सांगतो. माझ्याकडे पूर्वी गाडी होती, त्या गाडीतही मी छोटेखानी झेंडा कधीही लावला नाही. तेंव्हाही माझे मित्र कम सहप्रवासी मला त्याच कारण विचारायचे. मी उत्तर देण्याचं टाळायचो. ते मला थेट देशद्रोही म्हणाले नाहीत तरी त्यांच्या चेहेऱ्यावरचा भाव तोच असायचा. त्यांना काही वाटलं तरी मी माझा हट्ट कधीही सोडला नाही. किंबहुना, दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून मी माझ्या मनाविरुद्ध कधी वागलो नाही. माझ्याकडे गाडी असताना गाडीत दारूकाम सर्रास व्ह्यायच. चार ग्लास तर कायम गाडीच्या डिकीत ठेवलेली असायची . दारू पिऊन अनेकदा मी गाडी चालवलेली आहे. सिगारेटी फुकल्या आहेत. रहदारीचे नियम तोडणे तर जन्मसिद्ध हक्क होता. त्यातून पकडला गेलोच तर, ट्राफिक हवालदाराला लांच देऊन मंदावली करण्याचा यशस्वी प्रयत्न मी बऱ्याचदा केलेला आहे.

एवढंच कशाला, केवळ लांचेवर (ह्याला कमिशन असं गोंडस नांव आहे) ज्यांची फाईव्ह स्टार उपजीविका आहे, अशा माणसांसाठी मी काम केलेलं आहे. लहान-सहान खोटं तर मी अनेकदा बोलत असतो. सरकारातली माझी कामं लवकरात लवकर व्हावीत म्हणून मी काही राष्ट्रभक्त अधिकारी-पुढाऱ्यांना पैसे देऊन, तेच काम व्हावं म्हणून लायनीत बसलेल्या अनेक गरजूंवर अन्याय केलेला आहे. अनेक अनैतिक कामंही केलेली आहेत. अश्या कितीतरी गोष्टी सांगता येतील, ज्या नियमबाह्य आहेत परंतु मी त्या केलेल्या आहेत. अलीकडे तसं होऊ नये ह्याचा माझा प्रयत्न असला तरी, अद्यापही तसं वागणं संपूर्णपणे थांबलेलं नाही.

मग या व अश्या अशा अनेक गोष्टीत नियमबाह्य वागणाऱ्या, सोयीनुसार कायदे पाळणाऱ्या किंवा तोडणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला देशप्रेमी म्हणवून घ्यायचा अधिकार आणि त्याचा पुरावा म्हणून झेंड्याबद्दल प्रेम दाखवण्याचा नैतिक अधिकार नसतो असं मी समजतो.

ही सर्व गैरनैतिक कामं, त्या अनेक त्यागी देशभक्तांच्या (अर्थात स्वातंत्र्यपूर्वीच्या) रक्ता -मांसाच्या सिंचनाने आणि त्यांनी स्वतःच्या घरादाराची रांगोळी करून मिळवलेल्या तिरंग्याच्या साक्षीने व्हावीत असं मला वाटत नाही, म्हणून मी झेंड्यापासून अंतर ठेवून वागतो, म्हणून जर का मी देशद्रोही ठरत असेन तर, होय, मी देशद्रोही आहे..!

.

पुन्हा, मला लिहिता येते हा शोध लागल्यापासून मी देशभक्त सरकारच्या मला न पटलेल्या अनेक धोरणांवर, खोट्या प्रचारावर जाहीर टीका करत आलो आहे. देशातल्या सध्याच्या धार्मिक आणि जातीय द्वेषाच्या दूषित वातावरणावर मी अनेकदा लिहिलेलं आहे. ह्या देशात राहाणारे सर्वच, अगदी मुसलमानही, माझे बांधव आहेत हे प्रतिज्ञेतील शब्द मी पाळत आलोय. सरकार म्हणजे देश नाही, हे मी अनेकदा वारंवार म्हणत आलो आहे. कुणा थोरा-मोठ्याची मेहेरनजर राहावी म्हणून त्याचा जयजयकार करण्याचं नाकारलंय. कुणाचीही अप्पलपोटी भक्ती माझ्याकडून होणार नाही याची मी काळजी घेत आलोय. ह्यातून माझं देशद्रोहीपण अधिकच सिद्ध होत नाही काय?

-नितीन साळुंखे

9321811091

10.09.2019