नवरात्र;उत्सव सृजनाचा-

माझाच एक जुना लेख-

नवरात्र;उत्सव सृजनाचा-

आपले सर्वच महत्याचे सण ज्येष्ठ ते भाद्रपद या महिन्यांत येतात. हे चार महिने पावसाचे. आपला देश पुर्वापार कृषी प्रधान. आजही आपल्या देशातील बहुतांश शेती पावसावरच अवलंबून आहे. पावसाच्या या चार महिन्यांतच आपले सण का असावेत याचं उत्तर शेती आणि पाऊस यांच्या संबंधातच आहे. या दरम्यान झाडंन झाड पाना फुलांनी बहरुन गेलेलं असतं. पावसामुळे अवघी धरीत्री हिरवाकंचं शालू नेसुन उभी असते. या दिवसात धरित्री प्रसवलेली असते आणि नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रीप्रमाणे, भुमातेवर एक वेगळंच हिरवाईचं तृप्ततेज चढलेलं असतं. अवघ्या आसमंतात चैतन्य भरून राहिलेलंअसतं. याच दरम्यान वटसावित्रीपासून सुरू होणारे आपले सण, नांव कुठल्यातरी देवाचं असलं तरी, सृजनाची पुजा करणारे आहेत. असंस्कृत, भटक्या माणसाला स्थिर करून, कुटूंब व्यवस्थेच्या आणि संस्कृती निर्मितीच्या दिशेने एक मोठी झेप घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या शेतीची व ती जिच्यामुळे शक्य होते, त्या भुमातेची कृतज्ञता व्यक्त करणारे आहेत.

शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि तो पर्यंत पशुअवस्थेत असलेला भटका माणूस स्थिर झाला. कळप संपले आणि कुटुंब व्यवस्थेत माणसाचं पाऊल पडलं. असंस्कृतीकडून संस्कृतीकडे माणसाने घेतलेली ही एक फार मोठी झेप होती. म्हणजे एका अर्थी माणूस सुस्कृत झाला तो स्त्रीमुळे. आजही नविन बाळाला आपल्या आपल्या संस्कृतीचं बाळकडू पाजलं जातं, ते आई कडूनचं. माणसाला स्थिर करणारी भुमी आणि सुसंस्कृत करणारी स्त्री या दोघींना देवी स्वरुप न मिळतं तरच नवल..!

स्त्री आणि भुमी या दोघींत विलक्षण साम्य आहे. दोघीही निर्मात्या आहे, सृजनशील आहेत. दोघीही पोशिंद्या आहेत. अवघ्या सजिव सृष्टीचं ‘असणं’ हे ह्या दोघींवरच अवलंबून आहे. या दोघीच सजीवांना जन्म देतात, पोसणाऱ्याही आणि रक्षणकर्त्या ह्याच दोघी, शेवटी आपल्याच कुशीत चीरनिद्रा देणाऱ्याही या दोघीच! ‘माती’ आणि ‘माता’ या दोघांमध्ये विलक्षण साम्य आहे. मातीच्या गर्भातून उगवलेलं पिक हे मातीचं अपत्यच जणू.! स्त्री आणि जमीन यांच्यातलं हे साम्य मनाला मोहवणारं आहे. म्हणून तर नववधुला हिरव्या रंगाच्या साडीचं महत्व, तिची कुस भुमीप्रमाणे सदा ‘हिरवी’ राहो हीच इच्छा हिरवा रंग दाखवतो. *सौभाग्याचा हिरवा रंग फळलेल्या-फुललेल्या निसर्गातून, सृष्टीतून घेतला आहे.

आपले सण पावसांतच का यावेत आणि ह्यातील बहुतेक सर्व सण स्त्रीप्रधान का असावेत, याचं उत्तर मही आणि महिला या दोघींमधील साम्यात आहे. वरवरचं आवरण सणांचं असलं, तरी त्यांचा गाभा स्त्री आणि भुमी यांची मानवजातीवरील उपकारांची पुजा या सणांच्या माध्यामातून केली जावी हा आहे. वटसावित्रीपासून सुरु होणाऱ्या आपल्या या सर्वच सणांमधे स्त्रियांची भुमिका फार महत्वाची असते. वटसावित्री कथेत सावित्री सत्यवानाचे प्राण आपल्या चातुर्याने यमाकडून परत मिळवते, पण पुजा मात्र वडाच्या झाडाला फेरे मारून करते. सावित्रीने वटवृक्षालाच फेऱ्या का माराव्यात हे लक्षात घेण्यासारखं आहे. पारंब्या कुठल्या आणि मुळ कुठलं हे आपल्याला न कळू देणारा वटवृक्ष हा सतत वर्धिष्णू असतो. स्त्रीने वटवृक्षाची पुजा करण्यामागे, तिची ‘तुझ्यासारखंच माझ्याकडूनही वंशसातत्य कायम राहावं’ हीच भावना असावी. इथे सत्यवान फक्त नामापुरता किंवा किंवा ‘त्या’ क्षणांपुरता म्हणा हवं तर..! ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते’ असं का म्हणतात, ते इथं लक्षात येईल. ती पत्नी बनते, तिच मुळात तिची आदीम प्रेरणा असलेल्या मातृत्व प्राप्तीसाठीच..!!

गणपतीनंतर सुरु होणारा नवरात्रोत्सव तर साक्षात स्त्रीच्या ‘स्त्रीत्वा’चा, तिच्या सृजनशीलतेचा उत्सव..! सबंध देशात साजरा होणारा नवरात्राचा नऊ दिवसांचा तो सोहळा, स्त्रीच्या गर्भारपणाच्या नऊ महिन्यांचं पूजन आहे. त्या नऊ महिन्यांची पुजा या नऊ दिवसांत आपल्या संपूर्ण देशात केली जाते. सत्ताविस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्र वजा केली, की उरतं ते फक्त शुन्य हे बिरबलाच उत्तर जेवढं भुमी-शेती संबंधात खरं आहे, तेवढंच ते स्त्रीच्या मातृत्वाबाबतही सत्य आहे. पावसाच्या नऊ नक्षत्रांत भुमी प्रसवते, तशीच नऊ महिन्यांच्या गर्भारपणानंतर स्त्री प्रसवते, माणसाचं वंशसातत्य टिकवते. ग्रामिण भागात एखाद्या स्त्रीला मुल होतं नसेल, तर तिचं ‘पोटपाणी पिकत नाही’ असं म्हणतात, ते तिच्या भुमीच्या असलेल्या साम्यामुळेच. स्त्रीच्या आयुष्यातले हे नऊ महिने वजा केले, तर पृथ्वीवरील संपूर्ण मनुष्यमात्राचंच अस्तित्वच नाहीस होईल.

नवरात्राचा नऊ दिवस चालणारा हा उत्सव स्त्रीच्या नऊ महिन्यांच्या गर्भारपणाचा उत्सव आहे.नवरात्रोत्सव दुर्गा, भवानी, लक्ष्मी, सरस्वती आदी देवींच्या पुजनाचा सोहळा असला, तरी ती पृथ्वीतलावरच्या तमाम ‘स्त्रीत्वा’च्या गौरवाचा आणि पुजनाचा सोहळा आहे. ‘स्त्री’च्या ठायी असलेल्या ‘प्रसव’ क्षमतेची, ‘मातृत्वा’ची ही महापूजा आहे..सृष्टीतील सर्वच सजीवांचं अस्तित्व अवलंबून असलेल्या सृजनाच्या उत्सवाचा हा सोहळा आहे. नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असंही शास्त्रात सांगीतलं आहे.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी ‘घटस्थापना’ केली जाते. या दिवशी एका कलशात धान्य आणि पाणी भरून त्यामध्ये सुपारी,एक हळकुंड,अक्षता,थोडेसे पैसे वैगेरे ठेलं जातं. या कलशावर आंब्याचे किंवा विड्याचे पानं ठेवून त्यावर नारळ ठेवतात. काही ठिकाणी मातीच्या घटात दिवा लावला जातो व हा दिवा नऊ दिवस सतत तेवता ठेवला जातो. मुंबईसारख्या शहरात गुजरातकडच्या अनेक स्त्रीया नवरात्रात हातात ‘घट’ घेऊन फिरताना दिसतात. या हे घट मातीचे असतात व त्यात एक लहान दिवा तेवत असतो. माझी आई मुंबईत एका परातीत माती घेऊन वेगवेगळं धान्य पेरते व नऊ दिवस ते पाण्याने शिंपते. याला ती ‘रुजवण’ असं ती म्हणते. कलशाला नऊ दिवसाच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पाना-फुलांनी पुजलं जात. यात प्रांताप्रांतानुसार फरक असला, तरी भावना तिच, वंश सातत्याची, मातृत्वाच्या पूजनाची असते. घरी स्थापन केलेला कलश अथवा मातीचा ‘घट’ म्हणजे स्त्रीच्या ‘गर्भाशया’चं प्रतिक आणि त्यात नऊ दिवस सातत्याने मंदपणे तेवत असलेला दिवा म्हणजे त्या ‘गर्भाशया’त फुंकला गेलेला ‘प्राण’. आपल्या संस्कृतीत दिवा हे प्राणाचं प्रतिक मानलं गेलं आहे. परातीत रुजत घातलेलं धान्य आणि शेजारच्या मातीच्या घटात तेवत असलेला दिवा, भुमीच्या उदरातून वर येणारं धान्य आणि स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असलेला गर्भ यातील साम्य दर्शवतात.

गुजरातेत (आता इतरत्रही) नवरात्राच्या रात्री एक मंडपात देवीच्या मांडाभोवती फेर धरून मोठ्या भक्तीभावनेने गाणी गात खेळलं जाणारं ‘गरबा’नृत्यातला ‘गरबा’ हा शब्द प्रत्यक्षात ‘गर्भा’शी सख्खं नातं सांगणारा आहे. नव्हे, ‘गरबा’ हा ‘गर्भा’ शब्दाचाच अपंभ्रंश आहे असं मला वाटतं.

नऊ दिवसांचा ‘नवरात्रोत्सव’ म्हणजे स्त्रीच्या नऊ महीन्यांच्या गर्भार अवस्थेचा सन्मान असून दहाव्या दिवशी साजरा होणारा दसरा नवजात बाळाचं गर्भाशयातून या जगात होणाऱ्या ‘सिमोल्लंघना’चं प्रतिक आहे. नऊ महीन्यांचं गर्भारपण संपून बाळाचा होणारा जन्म, मातीच्या उदरातून तरारून येणाऱ्या पिकापेक्षा वेगळा नाही. म्हणून तर दसऱ्याला दरवाजावर लावल्या जाणाऱ्या तोरणांत आंब्याचा टाळ, गोंड्याची फुलं वैगेरे असं काही असलं, तरी शेतात नुकत्याच तयार झालेल्या भाताची लोंबी मात्र आवर्जून लावली जाते. नुकतीच कापणी केलेल्या कोवळ्या भाताची लोंबी म्हणजे घरात मातेच्या उदरातून सिमोल्लंघन करून कुटुंबात आलेल्या नवीन जीवाचं प्रतिक आहे..

नवरात्रातल्या प्रत्येक माळेचं वैशिष्ट्य वेगवेगळं असलं, तरी आठव्या माळेला म्हणजे ‘अष्टमी’ला विशेष महत्व आहे. असं का, याचा विचार करताना लाहनपणी माझी आई आणि इतर काही जुन्या बायका ‘आठव्या महीन्यात बाळंतपण म्हणजे कठीण’ असं म्हणायच्या ते आठवलं. म्हणजे आठव्या महिन्यात जन्मलेल्या बाळाची जगण्याची शक्यता थोडी कमी असते. इतर वैद्यकीय क्षेत्राच्या म्हणण्याप्रमाणे खरंच असतं की नाही ते माहीत नाही, परंतू आयुर्वेदात याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्या जाणत्या बायकांचा अनुभवही अगदीच खोटा नसावा. आठव्या महिन्यात जन्म घेतलेल्या बाळाने जीव धरावा या साठी अष्टमीपूजनाला महत्व दिलेले असाव असं मला वाटते. नवमी तर साक्षात बाळ जन्माचा दिवस आणि दसऱ्याला आईच्या उदरातून सिमेल्लंघन करून जगात आलेल्या बाळाच्या आगमनाच आनंद सोहळा..! उगाच नाही दसरा साडेतिन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त मानला जात..!

असा हा नवरात्रोत्सव मातृत्वाचा उत्सव आहे. स्त्रीची ओळख ‘माता’ म्हणूनच अाहे. म्हणुनच,

“या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”

असं म्हणून सर्व चराचर व्यापून राहिलेल्या स्त्रीच्या सृजन शक्तीला, आपल्या संस्कृतीने ‘मातृ’ रुपात गौरवलेलं आहे.

देव्हाऱ्यातून सार्वजनिक मंडळांच्या मंडपात येऊन बसलेला, अलम विश्वाचा अधिपती असलेल्या गणपतीचा, संकोच होऊन तो त्या त्या विभागाचा ‘राजा’, ‘महाराज’, ‘सम्राट’ वैगेरे झाला असला, तरी काही दिवसांनी त्याच मांडवात बसणाऱ्या देवीची अद्याप ‘राणी’, ‘महाराणी’, ‘सम्राज्ञी’ झालेली नाही. कारण मातृत्वापुढे ही सर्व पदं अगदी शुल्लक आहेत याची नकळतची जाणीव आपल्या रक्तातच आहे. देवी ही ‘माता’च होती, ‘माता’च आहे आणि ‘माता’च राहाणार, जगाच्या अंतापर्यंत..!!

-नितीन साळुंखे

9321811091

*सौभाग्य या शब्दाची फोड सु+भग अशी कृ. पां. कुलकर्णी देतात. भग म्हणजे स्त्रीजननेंद्रिय किंवा व्हॅजिना. सतत फळती असणारी स्त्री म्हणजे सौभाग्यवती. ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती’चा अर्थ इथे कळतो.

संदर्भ-

1. मराठी व्युत्पत्ती कोश- संपादक कृ. पां. कुलकर्णी

2. लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा- डाॅ. तारा भवाळकर

3. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी- प्रतिभा रानडे