सुखानुभव सोशल मिडीयाचा-

सुखानुभव सोशल मिडीयाचा-

असं म्हणतात, की सोशल मिडीया जग आभासी असत. इथे सत्य काहीच नसत, असतो तो केवळ सत्याचा भास. पण, माझा अनुभव नेमका उलट आहे. मला ह्या इथेच अनेक उत्तम माणसं भेटलीयत. त्यापैकी जवळप सर्वांचेच विचार एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, श्रद्धा वेगळ्या आहेत, परंतु, त्यांच्यातलं माणुसकीच तत्व मात्र एकाच आहे. एकमेकांच्या विचारांचं, श्रद्धांचा आदर करून आम्ही एकेमकांच्या जवळ आलोय. त्यातील कित्येकांना मी अद्याप भेटलेलोही नाही, तरीही आमचं जवळच मैत्र जुळलंय. शेवटी, सोशल मिडीया हे एक शस्त्र आहे आणि शस्त्र कधीही वाईट किंवा चांगलं नसत, तर ते शस्त्र हाती धरणारे हात आणि त्यामागचा विचार चांगला किंवा वाईट असू शकतो. कोणत्या विचाराने आपण शस्त्र हाती धरतो, तो विचार महत्वाचा..!

हे सांगण्याचा उद्देश म्हणजे, सोशल मिडीयाचा मला अलीकडेच आलेला एक सुखानुभव. कोणतीच ओळख नसताना, माणुसकीचा प्रत्यय देणारा आणि म्हणून चांगुलपणाची आस आणखी वाढवणारा.

काय झालं ते सांगतो. आमच्या कुडाळात एक आश्रम चालतो. ‘संविता आश्रम’. कुडाळच्या पणदूर इथे तो आश्रम आहे. ‘जीवन आनंद. नांवाची संस्था तो आश्रम चालवते. हा आश्रम माझ्या लक्षात हिला तो त्यांच्या एका वैशिष्ट्यामुळे. ह्या आश्रमाचे पदाधिकारी निराधारांना आधार देतात. हे निराधार आहेत रस्त्यावर त्यांच्याच लोकांनी बेवारस सोडून दिलेली माणसं. ह्या माणसांत वृद्धांचा प्रमाण लक्षणीय. त्यातही अपंगांची संख्या जास्त. तरुणपणी खस्ता खाऊन मोठं केलेल्या, मार्गाला लावलेल्या त्यांच्या मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना त्यांची अडचण होते म्हणून सोडून दिलेले बहुसंख्य वृद्ध आहेत हे. हातपाय थकलेले, त्याहीपेक्षा मनाने खचलेले. आपलीच मुलं आपल्याशी परक्यासारखी वेगळ्याच अपरिहार्य परिणाम त्यांच्या शरीराप्रमाणेच स्मरणशक्तीवरही झालेला. त्यांचं नांव-गाव-ठिकाण असं सर्व विस्मरणात गेलेलं. एका अर्थी हे चांगलंच. कटू आठवणी डोक्यात येतंच नाहीत. त्यामुळे आपली मुलंबाळ आपल्याशी कशी वागली हे आठवत नाही. असे ह्यातील बरचसे वृद्ध. काही मुलंही आहेत त्या आश्रमात. ती ही अशीच. वासनेच्या खेळातून जन्मतःच नकोसे झालेले अनाथ जीव ते. त्यांचा काहीच दोष नसताना उकिरड्यावरचं आयुष्य नशिबी आलेलं. अर्थात हे नशीब असत हे त्या लहानांना कुठून कळावं. त्यांच्या दृष्टीने तेच आयुष्य सत्य असतं. तर अश्या ह्या समाजाच्या उकिरड्यावर फेकलेल्या लोकांना ह्या ‘संविता आश्रमाने आधार दिलेला. त्यांच्याशी माणसाने माणसाशी वागण्याचा प्रयत्न केलेला.

ह्या आश्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा आश्रम पूर्णपणे समाजाच्या मदतीवर चालतो. ह्यांना कोणतीही सरकारी मदत मिळत नाही आणि ते मागायलाही जात नाहीत. समाजातलीच काही संवेदनशील माणसं ह्या आश्रमाला त्यांना जमेल तसा आश्रय देतात. हा आश्रमातल्या निराधारांची संख्या सतत वाढती असल्याने, आश्रमाला मिळणाऱ्या देणग्या काही पुरेश्या पडत नाहीत आणि म्हणून आश्रमाचे पदाधिकारी देणग्या, पैसे किंवा वस्तू रूपाने, मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. आज ह्या संस्थेचे चार ठिकाणी आश्रम आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि मुंबईतल्या खार, सांताक्रूझ आणि विरार इथे.

मध्यंतरी ह्या आश्रमाचे एक पदाधिकारी श्री. संदीप परब यांची समाजाला आवाहन करणारी एक पोस्ट माझ्या वाचनात आली. आश्रमासाठी एका चार चाकी वाहनांची आवश्यकता होती. वापरलेलं, सेकंड हॅन्ड वाहनही त्यांना चालणार होत, पण ते त्यांना भेट स्वरूपात हवं होत. कुडाळ येथील आश्रमातील बहुतेक व्यक्ती वृद्ध आणि अपंग असल्याने, त्यांना वैद्यकीय मदतीची नेहेमीच गरज भासत असते हा आश्रम हमरस्त्यापासून काहीसा दूर असल्यामुळे, अश्या व्यक्तींना दवाखान्यात नेण्याचा प्रसंग आल्यास, आश्रम चालकांची फारच तारांबळ उडते आणि म्हणून त्यांना एका चार चाकी वाहनांची गरज होती. हे वाहन समाजातील कुणीतरी भेट म्हणून द्यावं असं आवाहन करणारी ती पोस्ट होती.

ही पोस्ट मी माझ्या फेसबुक वॉलवर शेअर केली आणि मी माझ्या मित्रपरिवाराला आश्रमाला मदत करण्याचं आवाहन केलं. दोनेक दिवसांनंतरमाझे फेसबुकवर मित्र झालेलय श्री. राजेंद्र कामेरकरांचा मला फोन आला आणि त्यांनी संविता आश्रमाला ते सध्या वाहन भेट देऊन शकत नसले तरी, इतर काहीतरी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. मी श्री. कामेरकर याना, त्यांनी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून घ्यावं आणि आश्रमाला आणखी कोणती गरज आहे ते विचारून तशी मदत करावी अशी विनंती केली. भेट गरज भागवणारी असावी आणि म्हणून ज्यांना गरज आहे, त्यांच्याशीच चर्चा करून कामेरकरांनी काय भेट द्यावी ते ठरवावं, असही मी त्यांना सुचवलं.

पुन्हा दोन दिवसांनी मला श्री. राजेंद्र कामेरकरांचा फोन आला. दरम्यानच्या काळात कामेरकरांच्या ‘सामाजिक बांधिलकी’ संस्थेचे चे काही सदस्य कुडाळतील आश्रमात भेट देऊन आले होते आणि त्यांची संस्था ‘सामाजिक बांधिलकी’ आश्रमाला सात सायकली भेट म्हणून देणार असल्याचं मला फोनवर सांगितलं. संविता आश्रमात निराधार मुलं असून त्यांना शाळेत जाण्यासाठी रोज तीन-चार किलोमीटरची पायपीट करावी लागते व त्यांचा अभ्यासाचा वेळ प्रवासातच खर्च होतो, हे लक्षात घेऊन त्यांनी आश्रमातल्या एकूण सात मुलांसाठी सात नव्याकोऱ्या सायकली भेट देण्याचे आश्रमाच्या पदाधिकार्त्यांशी चर्चा करून ठरवलं. मला आनंद वाटला. नुकताच दिनांक १२ ऑक्टोबरला श्री. राजेंद्र कामेरकर आणि त्यांच्या ‘सामाजिक बांधिलकी’ या संस्थेच्या सहकाऱ्यांनी सहकारी कुडाळच्या संविता आश्रमात जाऊन आश्रमातील मुलांना सायकली भेट देण्याचा लहानसा कार्यक्रम केला.

सुरुवातीला मी सोशल मिडियाचा वापर आपण कोणत्या हेतूने करतॊ, तो हेतू किंवा तो विचार महत्वाचा असतो असं म्हटलंय. असं म्हणण्याचं कारण म्हणजे, ‘संविता आश्रमाचे’चे मुख्य श्री. संदीप परब आणि ‘सामाजिक बांधिलकी’चे श्री. राजेंद्र कामेरकर ह्यांना मी अद्याप भेटलेलो नाही. आमची तिघांचीही भेट सोशल मीडियावर झाली, ती ही वेगवेगळ्या ठिकाणी. श्री. संदीप परब आणि मी सिंधुदुर्गातल्या एका व्हाट्सअँप ग्रुपमध्ये एकत्र आहोत, तर श्री. राजेंद्र कामेरकर माझे फेसबुकवरचे मित्र. आम्ही एकमेकाला अद्याप प्रत्यक्ष भेटलेलो नसूनही आम्हाला एकमेकांच्या कामाविषयी असलेल्या विश्वासातून हे सगळं घडून आलंय. हे जग आभासी असतं, असं जे बोललं जातं त्याला छेद देणारी ही घटना आहे.

आता थोडंसं श्री. राजेंद्र कामेरकारांविषयी..! मी गेली काही वर्ष ‘समाज’ केंद्रस्थानी ठेवून सोशल मिडियातून लेखन करतो, त्या लेखनातून मला अनेक कधीही न भेटताही जवळचे झालेले अनेक मित्र मिळाले, त्यापकी एक श्री. राजेंद्र कामेरकर..! श्री. कामेरकर किंवा त्यांची संस्था ‘सामाजिक बांधिलकी’ चे सदस्य कुणीही धनाढ्य असामी नाहीत. कुटुंबाच्या गरज भागवण्यासाठी नोकरी करणारी ही आपल्या चारचौघांसारखीच सामान्य माणसं आहेत. त्यांचं असामान्यत्व एवढ्यासाठीच की, ही माणसं स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतानाही, समाजातील सामान्य वंचित लोकांनाही जमेल तसं सुखी करण्यासाठी धडपडत आहेत. श्री. कामेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची *सामाजिक बांधीलकी* ही संस्था तळागाळातील शिक्षणापासून वंचित असलेल्या, कुपोषणाने ग्रस्त असलेल्या, अनाथ, वृद्धाश्रमात जीवन कंठित असलेल्या लोकांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्नरत आहे. शिक्षणापासून वंचित, कुपोषित, अनाथ-अपंग-वृद्ध हे देखील समाजपुरुषाचं अंग असून, समाजपुरुषाचं चलनवलन जर व्यवस्थित चालायचं असेल तर, त्या समाजपुरुषाचं कोणतंही अंग अविकसित किंवा दुर्बल असून चालणार नाही, ह्या विचाराने काम करणारी माणसं आहेत.

श्री. कामेरकरांनी त्यांच्या पूर्वायुष्यातील काही काळ, त्यांच्या कौटुंबिक अडचणींमुळे. आश्रमात काढावा लागला आहे. त्यामुळे तिथल्या आयुष्याची, त्यात येणाया अडचणीची त्यांना कल्पना आहे. आपल्यासारखं आयुष्य मुळात कुणाच्या वाटेल येऊ नये आणि आलंच, तर ते जास्तीत जास्त सुकर व्हावं ह्या हेतूने कामेरकर आणि आणि त्यांच्या ११० सहकाऱ्यांनी ही संस्था सुरु केली आहे.

आता सर्वात महत्वाचं. जस मी थेट संदीप परबाना किंवा राजेंद्र कामेरकरांना अद्याप प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, तसाच ‘सामाजिक बांधिलकी’ या कामेरकरांच्या संस्थेतल्या एकूण ११० सदस्यांपैकी अनेकांनी एकमेकांना पाहिलेलं नाही. कारण इथे ओळख महत्वाची नाही, तर हाती घेतलेलं कार्य आणि त्यामागचा उद्देश महत्वाचा आहे..! ओळखीतून फार तर सरकारी काम होतील, फारच झालं तर प्रेम वैगेरे होईल, पण सामाजिक कार्य उभं राहताना कार्य उभं राहताना कठीण..! त्यासाठी लागते हाती घेतलेल्या कामावरची निष्ठा आणि स्वतः ठरवलेल्या उद्दिष्टांवरचा विश्वास..!! ती ह्या संस्थेकडे पुरेपूर आहे.

तसे मी, संविता आश्रमाचे श्री. संदीप परब आणि ‘सामाजिक बांधिलकी’चे श्री. कामेरकर, असे तिघेही जण एकमेकाला भेटलो नसतानाही आम्हा कधी त्याची अडचण जाणवली नाही की आमच्या मनात एकमेकांविषयी किंतु-परंतु आलं नाही. कारण कुणाला तरी, कुणाची तरी, काहीतरी मदत व्हावी हा आणि इतकाच आमचा हेतू होता आणि तो पूर्ण झाला. ही ताकद सोशल मिडियाची. सोशल मिडियामुळे निर्माण झालेल्या एकमेकांविषयीच्या विश्वासाची..!!

-नितीन साळुंखे

9321811091

17. 10. 2019

ताजा कलम –

१. #संविता_आश्रमाला_एका_चार_चाकी_वाहनांची_गरज_अजूनही_आहे. #कुणाला_शक्य_असल्यास_ती_मदत_अवश्य_करावी_ही_विनंती. #वापरलेलं_सेकंड_हॅन्ड_वाहनही_चालेल.

श्री. संदिप परब संपर्क (आश्रम)
+91 93730 47628
+91 98202 32765

२. ‘सामाजिक बांधिलकी’ ह्या नोंदणीकृत संस्थेमध्ये जवळ जवळ 110 जण आहेत. सर्वजण आपापली नोकरी सांभाळून जमेल तशी, परंतु, निष्ठने समाजसेवा करीत आहेत. दरमहा काही रक्कम काढली जाते त्यातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. ह्या संस्थेत कुणाला सामील व्हायचं असेल, तर कृपया सोबतच्या पत्त्यावर/दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.

श्री. राजेंद्र सदाशिव कामेरकर,

सामाजिक बांधिलकी संस्था- संस्थापक/ अध्यक्ष

9930134151, 9987146493

मुंबई मेट्रो; खऱ्या समस्यांना बगल देण्याचा यशस्वी(?) सरकारी प्रयत्न..

मुंबई मेट्रो; खऱ्या समस्यांना बगल देण्याचा यशस्वी(?) सरकारी प्रयत्न..

अखेर ‘आरे’तील वृक्षांच्या सरकारी निघृण कत्तलीची माननीय सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन आरेतील सरकारी उपद्व्याप ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात ही पश्चातबुद्धी आहे असं म्हणावं लागेल, कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश येईपर्यंत रात्रीच्या अंधारात रेतील वृक्षांवर ह्या सरकारचा अत्यंत आवडता (एकमेव)उद्योग असलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून झाला होता. सर्जिकल स्ट्राईक हा साधारणतः शत्रूच्या प्रदेशात लपून-छपून केला जातो अशी आमची आपली भोळीभाबडी समजूत होती. परंतु तो आपल्याही प्रदेशात केला जाऊ शकतो, हे कालच्या शनिवारी समजलं. किंवा मायबाप सरकार हा प्रदेश शत्रूचा आहे असही समजत असावं कदाचित, कुणास ठाऊक..!

आता मुद्दा मेट्रो कारशेडचा. मेट्रो कारशेडसाठी आरेतील जंगलाचा सरकारचा (दडपशाही)आग्रह थोडा विचार केला तर सहज समजू शकतो. बहाणा काही एकरांपैकी काही एकर जागेचा असला तरी, खरी गोम वेगळीच असावी असा संशय येतो. आता काही एकरांपर्यंत मर्यादित असलेली कारशेडची जागा पुढे हळूहळू विस्तारत जाईल हे सांगायला कुणा तज्ञाची आवश्यकता नाही. कारशेड झाली की, मग हळू हळू अधिकाऱ्यांचे बंगले येतील, मग कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्स येतील, शेकडो कर्मचारी तिथे कामला येणार मग त्यांच्या पोटापाण्याची सोय म्हणून अधिकृत -अनधिकृत दुकानं-टपऱ्या येतील, त्यांच्या आवागमनासाठी रस्ते येतील आणि नंतरच्या काही वर्षांत तिचे कधी काळी जंगल होतं हे भूगलाच्या पुस्तकातच वाचावं लागेल. ह्यात अतिशयोक्ती वाटली तरी असं काही घडणारच नाही, याची काहीच शाश्वती नाही. सरकार कुणाचंही असो, सरकारातील लोकांचं मुख्य लक्ष भुखंडांचं श्रीखंड खाण्याकडे जास्त असतं, हे सत्य आहे. बाकी, आम्ही त्याच्या दुप्पट तिप्पट झाडं लावू , मेट्रो वनोद्यान निर्माण करू वैगेरे हा सरकारी प्रचाराचा भाग आहे. असं खरोखरच होईल यावर रांगतं पोरही विश्वास ठेवणार नाही.

मेट्रोमुळे रस्ता वाहतुकीवरचा ताण कमी होऊन कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि त्यामुळे कापलेल्या झाडांची कमतरता जाणवणार नाही, अशा अर्थाचं स्पष्टीकरण दिलं गेलं. हे स्पष्टीकरण म्हणजे पंचतारांकीत वातावरणात वावरणाऱ्या सत्ताधाऱ्यांची जमीनीशी आणि सामान्य जनतेशी तुटलेल्या नाळेचं निदर्शक आहे. मेट्रोमुळे रस्ता वाहतुकीवरचा ताण कमी होऊन कार्बन उत्सर्जन कमी होईल हे संपूर्ण सत्य नाही, हे अंधेरी-कुर्ला रोडकडे पाहून म्हणता येतं. अंधेरी कुर्ला रोडवर गेली काही वर्ष मेट्रो सुरू आहे. त्यावेळीही असंच सांगितलं गेलं होतं. प्रत्यक्षात परिस्थिती काय, तर वरती मेट्रोही भरभरून धावतेय आणि खालीही तशीच भरगच्च परिस्थिती..!

दुसरं उदाहरण, श्री. नितीन गडकरींनी मुंबईत ५५ उड्डाण पुल बांधले तेंव्हाचं. तेंव्हाही वाहतुकीवरचा ताण कमी होईल आणि वाहतूक वेगाने होईल असं सांगितलं होतं. पुलांचं काम पूर्ण झाल्यावर काही काळ त्याचा अनुभवही आला. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्याच. वाहतूक वेगवान व्हावी म्हणू बांधलेल्या पुलांच्या तोंडावरच जास्तीत-जास्त वाहतूक कोंडी असते, असा अनुभव येतो. हे विशेषत: पश्चिम द्रुतगती महामार्गावर अनुभवायला येते. प्रचंड वाहतूक कोंडी आणि त्यामुळे दुप्पट-तिप्पट कार्बन उत्सर्जन. अर्थात यासाठी उंची पहूॅंच असलेले बेशिस्त वाहन चालक हे देखील एक कारण आहे, हे नाकारता येत नाही.

मुंबईत नविन मेट्रो आल्याने वाहतुकीवरचा ताण कमी होईल आणि त्याने मोटारींतून होणारं कार्बन उत्सर्जन कमी होईल हा आपला(म्हणजे सरकारचा) भाबडा समज आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा, विशेषत: अंधेरी ते दहिसर या पट्ट्यात, राक्षसी म्हणावेत असे गृहनिर्माण प्रकल्प निर्माणाधीन आहेत. अक्षरक्ष: हजारो फ्लॅट्समधून लाखो लोक नजिकच्या काळात तिथे राहायला येणार आहेत. बाहेरून येणारी ही सर्व संपन्न कुटुंब असणार आहेत. आता तर बहुतेक साधारण मध्यमवर्गीय घरातही दोन गाड्या असतात, तिथे या नव्याने बांधण्यात येणाऱ्या श्रीमंती घरात किंमान दोन गाड्या, त्याही मोठ्या, असणार. ते लोक गाड्या काय गॅरेजमधे ठेवायला घेणार नाहीत, त्या रस्त्यावर येणारच. मेट्रो आल्याने रस्ता वाहतूक सुलभ होणार या विचाराने इथे राहाणाऱ्या माझ्यासारख्या लोकांचं गाडी घेण्याकडे मतपरिवर्तन होणार. मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांत गाड्या विक्रिची संख्या मंदावण्याचं एक कारण, रस्त्यावरची प्रचंड वाहतूक कोंडी हे ही आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. वाहतूक कोंडीमुळे गाड्या चालणारच नसतील, तर त्या घ्यायच्याच कशाला, शा विचार करणारेही आहेत. त्यामुळे मेट्रो झाल्यामुळे गाड्या घेण्याचं आणि त्या रस्त्यावर येण्याचं प्रमाण वाडणार आणि पुन्हा तिच प्रचंड जामची आणि प्रदुषण वाढीची परिस्थिती उद्भवणार.

मुंबईतली गर्दी आणि तिचा सार्वजनिक वाहतुकीवर येणारा ताण हा प्रश्न मुंबईत मुख्यत: रोजगारासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे निर्माण झालेला आहे. मूळ समस्या लोंढे ही आहे आणि जोवर तिच्यावर कायम स्वरूपी इलाज निघत नाही, तोवर आणखी कितीही सुधारणा करा, त्याने काहीच परिणाम होणार नाही. मुंबंईत मेट्रोच्या रुपाने सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय निर्माण होतोय ही बातमी एव्हाना देशाच्यी कानाकोपऱ्यात पोहोचली असेल आणि असंख्य बेरोजगार लोक ती वाचून, आपला बोऱ्या बिस्तरा बांधून मुंबईकडे कुच करण्याच्या तयारीत असतील. त्यात नुकतीच एका पक्षाने १ रुपयात आरोग्य तपासणी आणि १० रुपयात जेवण, असे निवडणूक जाहिरनाम्यात वचन दिलं आहे. त्यामुळे मुंबईतली गर्दी वाढणार यात शंका नाही. ही जर कुणाला अतिशयोक्ती वाटत असेल, तर खुशाल वाटो..!

गाडीबद्दल आपल्या भारतीय लोकांची मानसिकताही लक्षात घ्यायला हवी. आपल्या भारतीय लोकांच्या मनाने गाडीची सांगड प्रतिष्ठेशी घातलेली आहे. आज दादर ते दहिसर या पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवास करताना संध्याकाळच्या वेळी तीन-साडेतीन तास लागतात. सकाळीही साधारण हिच परिस्थिती असते. दिवसाच्या इतर कोणत्याही वेळात या मार्गावर किंमान दोन तास तर लागतातच लागतात. स्वत:च्या गाडीत, सेल्फ ड्रिव्हन किंवा शोफर ड्रिव्हन, बसलेल्या नोकरदारांचा, व्यावसायिकांचा आणि उद्योगपतींचा हा वेळ वाया जात असतो. पण त्याची तमा न बाळगता हे प्रतिष्ठीत लोक स्वत:च्या गाडीने प्रवास करण्याचा हट्ट धरत असतात. याचं एक कारण गाडी हे त्यांचं चालतं कार्यालयही असतं. त्यात गाडीची आणि प्रतिष्ठेशी घातली गेलेली सांगड. एखादी बडा अधिकारी किंवा नामवंत वकिल-डाॅक्टर किंवा उद्योगपती सामान्य माणसासारखा सार्वजनिक वाहनाने प्रवास करतो, ही पेपरची प्रचारकी बातमी होऊ शकते, पण सत्यातली परिस्थिती असू शकत नाही. कारण अशी उच्चपदस्थ आणि यश्स्वी आसामी साधी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरते, हे इथल्यी रस्त्यावर चालणाऱ्या जनता जनार्दनालाच पचणार नाही. मग याच जनतेतून आलेले बडे लोक, ती फारशी वापरणार नाहीत हे ओघानेच येतं..

मेट्रोमुळे मुंबईकरांना आणखी पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण होत असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं(अर्थात, त्यासाठी रात्रीच्या अंधारात ‘आरे’तल्या झाडांची कत्तल केलेल्या शर्विलकी कृत्याचा निषेध आहेच). पण मेट्रो आणण्याबरोबरच बाहेरून येणारे लोंढे, इथल्या लोकांची मानसिकता, अनियमित पार्कींग व्यवस्था, वाहन वापरावरचे कडक निर्बंध, रस्त्यावरची अतिक्रमणं या मूळ समस्येंवर विचार कधी करणार, हा प्रश्न मला, ‘आरे’तील झाडांवर रात्रीच्या अंधारात लपून सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विचारावासा वाटतो.

ह्या मूळ समस्यांचं निराकारण न झाल्यास मुंबईतील तोवर शिल्लक असलेल्या सर्व जंगलांचा घास घेऊन आणखी १० मेट्रो-मोनो आणूनही काही काळाने परिस्थिती जैसे थेच राहाणार यात मला शंका नाही..!

निवडणकीतल्या मतांवरती थेट परिणाम करणाऱ्या या मुद्द्यांना हात घालण्याची आहे का कुठल्या पक्षाची हिम्मत?

-नितीन साळुंखे

9321811091

09.10.2019

मुंबईची श्री महालक्ष्मी..!!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

या देवी सर्वभूतेषु ‘महालक्ष्मी’रूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

मुंबईची_श्री_महालक्ष्मी..!!

मुंबईची महालक्ष्मी. प्रमाणभाषेत तिला ‘”महालक्ष्मी’ म्हणत असले तरी, बोलीभाषेत मात्र ती ‘’महालक्षुमी”. मी या लेखात तिचा उल्लेख तसाच करणार आहे. मी मालवणी असल्याने मला ‘आई’पेक्षा ‘आवस’ हा शब्द अधिक जवळचा वाटतो, तसंच महालक्षुमी हे तिचं नांव मला अधिक भावतं.

तमाम मुंबईकरांचं हे आराध्य दैवत. नवरात्र हा तर साक्षात देवीचा सण, उत्सव. अखंड भारतीत नवरात्राचे हे नऊ दिवस मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. देशाची लक्ष्मी मुंबई आणि मुंबईची लक्ष्मी महालक्षुमी, तिचं नवरात्रातलं स्वरुप तर याची डोळा पाहावं असं असतं. या नऊ दिवसांत महालक्ष्मीच्या परिसराचं स्वरुप स्वर्गापेक्षा जराही उणं नसतं. आपल्या आजुबाजूला देवीचा वावर आहे असा सततचा भास या नऊ दिवसांत सर्वच ठिकाणी होत असतो आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात तर श्रद्धेच्या दागिन्यांनी मढलेल्या, नटल्या-सजलेल्या, गरीब-श्रीमंत घरच्या असंख्य प्रसन्न वदना ‘गृहलक्ष्मीं’चे साक्षात दर्शन होत असते. देवळावर केलेली नयनरम्य रोषणाई, पाना फुलांची सजावट, भक्तीभावाने ओथंबलेले दर्शनाला आलेल्यांचे चेहेरे आणि याहीपेक्षा देवीच्या मुर्तीवर चढलेलं तेज हे स्वत: अनुभवण्यासारखं. हा जिवंत सोहळा अप्रतिम असतो आणि तो याची देह, याची डोळा बघण्यासाठी तमाम मुंबईकर, विशेषत: घरोघरच्या महालक्षुमी मोठ्या भक्तिभावाने वरळी नजिकच्या महालक्षुमीच्या देवळात आपली हजेरी लावतात..

मुंबईतील महालक्षुमीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे तो सारा परिसरच ‘लक्ष्मीपुत्रां’चा आणि ‘लक्ष्मीकन्यां’चाही. देवळाच्या समोरच पेडर रोडवर ‘प्रभुकुंज’ मध्ये, देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीच्या सारख्याच लाडक्या असलेल्या कन्या मंगेशकर भगिनी त्यांचे बंधू पंडित हृदयनाथांसोबत राहतात. देवळाला लागून असलेल्या ‘शिवतीर्थ’ इमारतीत मराठीची एकेकाळची आघाडीची नायिका ‘जयश्री गडकरां’चं वास्तव्य होत. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती श्री. मुकेश अंबानीही इथून हाकेच्या अंतरावर राहतात. मला माहित असलेली ही काही मोजकी उदाहरणं. शेजारचा ‘ब्रीच कँडी’, देवळापासून काही अंतरावर असलेला ‘कार मायकेल रोड’, ‘पेडर रोड’, ही ठिकाण म्हणजे देशाच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या मोठ-मोठ्या उद्योगपतींचा. या सर्वच परिसरावर महालक्षुमीचा वरदहस्त असून इथे सहज म्हणून फेरफटका मारला तरी ‘महालक्षुमी’चं दर्शन उघड्या डोळ्यांनी अगदी सहजरित्या घडते..

अश्या या ठिकाणी आई महालक्षुमीचे वास्तव्य सध्याच्या ठिकाणी तिच्या दोन बहिणी, महाकाली आणि महासरस्वती, यांच्यासोबत साधारणतः १७८४-८५ पासून असलं तरी, त्यांना अतिशय मोठा इतिहास आहे. सदरचा लेख महालक्षुमी आणि तिच्या दोन बहिणीं सध्याच्या ठिकाणी कशा प्रकट झाल्या त्याची कहाणी सांगणारा आहे.

आताच्या महालक्षुमी मंदिराचा इतिहास साधारणत: अडीचशे वर्ष मागे जातो. मुंबई त्याकाळात सात बेटांची होती. दोन बेटांमधील उथळ खाडी भरून बेत जोडायचा कार्यक्रम ब्रिटीशनी आखला होता. मुंबईचे सन १७७१ ते १७८४ या काळात गव्हर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी यांनी मुंबई आणि वरळी ही दोन बेट समुद्रात भरणी करून बांधून काढण्याचा बेत आखला होता. व्यापारी असलेल्या इस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीचा हा खर्चिक पवित्रा बिलकुल मंजूर नव्हता. तरी हा पठ्ठ्या हिम्मत हरला नाही. मुंबई बेटाचं दक्षिण टोक, म्हणजे सध्या आपल्या महालक्षुमीचे देऊळ आहे ते आणि उत्तरेच्या दिशेला असणारं समोरचं वरळी बेट, म्हणजे सध्या मुंबई महानगरपालिकेचे ‘लव्ह-ग्रोव्ह उदंचन केंद्र’ किंवा ‘अत्रीया मॉल’ आहे ते, तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते. भरतीच्या वेळेस इथून आत घुसणारं समुद्राचं पाणी, पार आताच्या पायधुनी -भायखळ्या पर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबई बेटाच्या पूर्वेकडून पश्चिम दिशेला असलेल्या वरळी-महाल्क्ष्मीकडे जायचं तर होडीशिवाय पर्याय नसायचा. मोठी यातायात असायची ही सारी. समुद्राचे पाणी जिथून आत घुसायचं त्या भागाला ब्रिटिशानी ‘द ग्रेट ब्रीच’ असे नाव दिलं होतं. ब्रीच म्हणजे खिंडार. मुंबईच्या सात बेतांमधे असलेल्या समुद्राच्या खाड्यांमधे ही खाडी सर्वात मोठी होती, म्हणून ती ‘ग्रेट’..! ही यातायात बंद करण्याचे हॉर्नबीने ठरवले आणि त्याने ही खाडी भरून काढायचं आणि मुंबई बेटातून थेट वरळी बेटापर्यंत जाता येईल असा गाडी रस्ता बांधण्याचं काम इंग्लंडच्या कार्यालयाची परवानगी न घेता चालू केलं. ‘वरळीचा बांध’ बांधण्याचे काम असं या कामाला त्यावेळी म्हटलं गेलं होतं. हाच सध्याचा ‘लाला लजपतराय मार्ग’, पूर्वीचा ‘हॉर्नबी वेलॉर्ड’. कृतज्ञता म्हणून लॉर्ड हॉर्नबीचे नाव मुंबईकर जनतेने या रस्त्याला दिलं होतं.

या बांधाच्या बांधकामाचे कंत्राट रामजी शिवजी नावाच्या पाठारे प्रभू समाजातील तरुण इंजिनिअरकडे सोपवण्यात आलं होतं. बांध घालण्याचे काम सुरु झाले. दगडाच्या राशीच्या राशी भरून मोठ्या बोटी इथे येऊ लागल्या. दगडाच्या राशी खाडीत टाकून भरणी करण्याचे काम सुरु झाले. पण होई काय की, बांधकामात थोडी प्रगती झाली की समुद्राच्या पाण्याच्या रेट्याने बांधलेला बांध कोसळून जाई आणि पुन्हा सुरुवात करावी लागे. असं बरेच महिने चाललं. त्याकाळचं तंत्रज्ञान लक्षात घेता हे तसं कठीणच काम होतं. पण रामजी शिवजी आणि हॉर्नबी या दोघांनीही हिम्मत हारली नाही..ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले, परंतु पुन्हा पुन्हा तेच व्हायचं..!

अशा वेळी एका रात्री रामजी शिवजीला महालक्षुमीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं, ‘मी माझ्या बहिणींसोबत महासागराच्या तळाशी आहे. तू मला बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल..!”. त्याकाळात सर्वच जनता भाविक आणि श्रद्धाळू असायची आणि त्याला रामजी शिवजीही अपवाद नव्हता. साहजिकच रामजी शिवजीने त्याला मिळालेल्या दृष्टान्तावर विश्वास ठेवला आणि ही घटना हॉर्नबीच्या कानावर घालायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी रामजी शिवजीने त्याचे स्वप्न आणि त्यातील देवीच्या दृष्टांताची गोष्ट हॉर्नबीच्या कानावर घातली आणि समुद्रात देवीच्या मूर्तींचा शोध घेण्यासाठी परवानगी मागितली. होर्नबी पक्का ब्रिटीश. या असल्या कथांवर त्याचा विश्वास असणंच शक्य नव्हतं, परंतु हाती घेतलेले काम पूर्ण होत नव्हतं हे ही खरं होतं. बांध पुन्हा पुन्हा कोसळत जोता. खर्च वाढत चालला होता. हॉर्नबीच्या डोक्यावर इंग्लंडची परवानगी नसताना कामाला सुरुवात केली म्हणून सस्पेन्शनची तलवार लटकत होती आणि म्हणून वरळीचा बांध बांधायला आणखी उशीर होऊन चालणार नव्हते. त्याला काहीही करून हा बांध पूर्ण करायचा होता आणि म्हणून त्याने काहीही न बोलता हा ही प्रयत्न करून बघू, म्हणून रामजी शिवजीला देवीच्या मूर्तींचा शोध घेण्याची परवानगी दिली.

झाले रामजी शिवजी कामाला लागला. लहान बोटी मागवण्यात आल्या. स्थानिक मच्छिमार बंधूंची मदत घेण्यात आली. समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि खरंच, एके दिवशी जाळी वर काढताना हाताला जड लागली. जाळी बाहेर काढल्यावर रामजी शिवजीच्या स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळ्यात खरोखरच महालक्षुमी, महासरस्वती आणि महाकाली अशा तीन महादेवींच्या मूर्ती सापडल्या. रामजी शिवजीने हॉर्नबीला त्या मूर्ती दाखवून त्याचा दृष्टांत खरा झाल्याचे सांगितले आणि या देवींच्या स्थापनेसाठी जागा देण्याची विनंती केली. हॉर्नबीनेही उदारपणे सध्याच्या महालक्षुमी देवळाची जागा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दिली असं सांगून त्या जागी मूर्ती ठेवण्यास सांगितलं. हॉर्नबीने दिलेल्या आदेशानुसार त्या जागी मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात ठेवल्या आणि नंतर मात्र वरळीचा बांध कोणताही अडथळा न येता पूर्ण झाला. पुढे बांध पूर्ण होऊन हॉर्नबीच्या स्वाधीन केल्यानंतर रामजी शिवजीने आताच्या जागी महालक्षुमीचे देऊळ बांधून त्यात तिच्यासोबत महाकाली व महासरस्वती या तिच्या दोन बहिणींची मोठ्या भक्तिभावाने स्थापना केली. आताचे हे देऊळ सुमारे सन १७८४-८५ च्या सुमारास (काही ठिकाणी सन १७६१ते १७७१ असाही म्हटलं आहे) बांधलं गेलं आहे. महालक्षुमीच्या जन्माची ही आख्यायिका आहे.

या आख्यायिकेमागील श्रद्धेचं पांघरून थोडंसं बाजूला केलं, तर लक्षात येईल की, साधारण चौदाव्या शतकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दशकात मुसलमानांची आक्रमणं मुंबंईवर झाली, त्यात हिन्दूंची अनेक देवालयं उध्वस्त करण्यात आली होती. त्यात मुंबादेवी आणि महालक्षुमीच्या देवळांचाही समावेश होता. ‘Rise of Bombay’ या एडवर्ड यांच्या सन १९०४ साली लिहिलेल्या पुस्तकात तसा उल्लेख आहे. कदाचित प्रभादेवी, वाळकेश्वराचंही देऊळही याच दरम्यान उध्वस्त करण्यात आलं असावं. त्यानंतर १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पुन्हा सर्व पूर्ववत होतंय न होतंय तोवर पोर्तुगीजांचं आक्रमण आलं आणि त्यांनीही तोच कित्ता गिरवला. प्रभादेवीच्या मूर्ती परकीयांकडून विध्वंस होऊ नयेत म्हणून जश्या पाठारे प्रभु समाजाच्या लोकांनी विहिरीत लपवून ठेवल्या होत्या, तशाच महालक्षुमी आणि तिच्या सोबतच्या मूर्तीही तिच्या भाविकांनी समुद्राच्या उथळ पाण्यात सुरंक्षित दडवून ठेवल्या असाव्यात आणि मग ब्रिटीश काळात सर्व स्थीरस्थावर झालंय असं लक्षात आल्यावर पुन्हा पाण्यातून वर काढून त्यांची प्रतिष्ठापना केली असावी, असं म्हणता येतं..पुढे कधीतरी त्यावर कथेचं आवरण चढवलं असावं.

मुंबईतल्या इतर देवतांसारखीच महालक्षुमीही अतिशय प्राचीन दैवत. त्या देवतांप्रमाणे, ही देवीही मुळची कोळ्यांनी स्थापन केली असावी असं म्हटल तर चुकणार नाही. प्रथम मुसलमानी आणि नंतर पोर्तुगीज आक्रमणात महालक्षुमीचं पूर्वीचं जुनं देऊळ इतर देवळांप्रमाणे उध्वस्त करण्यात आलं, परंतु मूर्ती मात्र तिच्या भक्तांनी सुरक्षित ठेवल्या, असं वरच्या कथेवरून स्पष्ट होतं. याचा अर्थ महालक्षुमीचं सध्याचं मंदिर जरी १७८४-८५ च्या दरम्यान बांधलं गेलं असलं, तरी त्यातील प्रतीमा मात्र किमान सात-आठशे किंवा त्याहीपेक्षा अधिक वर्षाचा इतिहास लेवून उभ्या अाहेत असं म्हटल्यास चुकू नये. जुनं मंदिर एक किंवा दोन वेळेला उध्वस्त केलं गेलं असावं. मंदिराची मूळ जागा मात्र आता आहे तिच असावी..!!

श्री महालक्षुमीच्या मंदिरात चैत्र आणि अश्विनातली नवरात्री मोठ्या धामधुमीने साजरी होते. अलम मुंबई या वेळी महालक्षुमीच दर्शन घेण्यासाठी लोटते. दसऱ्याचा दिवसही मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. दिवाळीचे पाचही दिवस, विशेषत: लक्ष्मीपूजनाचा दिवस तर साक्षात लक्ष्मीचा..! लक्ष्मीची आपल्यावर सदा कृपा असावी म्हणून लहान थोर, गरीब-श्रीमंत आणि सर्व जातीचे लोक महालक्षुमीच्या मंदिरात तिच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. पूर्वी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी इथे जत्रा भरत असे, मात्र आता जागेच्या ही जत्रा बंद करण्यात आली आहे. तशीही या देवीला जत्रेची काही आवश्यकता नाही, कारण प्रत्येक दिवशी या मंदिरात जत्रेवढीच गर्दी असते. हल्ली मार्गशीर्ष महिन्यातही देवीच्या दर्शनाला स्त्रियांची प्रचंड गर्दी होते. नवीन लग्न झालेली जोडपी मुंबईची ग्राम देवता आई मुंबादेवीच्या दर्शानंतर आई महालक्षुमीच दर्शन घेतात. ही प्रथाच पडून गेली आहे. कारण त्याशिवाय लग्नाला पूर्णत्व आल्यासारखं वाटत नाही.

महालक्षुमी मंदिराच्या आवारात इतरही मंदिरं असली तरी, त्यातील केवळ धाकलेश्वर मंदिराची माहिती सांगतो. आहे. हे मंदिर धाकजी दादाजी प्रभू ह्या त्या काळातील नामांकित पठारे प्रभू समाजाच्या व्यापारी गृहस्थाने सन १८३२ साली बांधलेलं आहे. हे मंदिर मुख्यता: श्री महादेवाचं. देवालय स्थापन करणाराने देवाला स्वत:चे अथवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे नांव देण्याच्या त्या काळच्या प्रथेप्रमाणे, या महादेवाचे नांव ‘धाकलेश्वर’ असं ठेवण्यात आलं होत. शेजारीच मयुरेश्वर, म्हणजे जी गणपतीची मूर्ती आहे, त्या गणपतीच नांव धाकजींचा मुलगा ‘मोरेश्वर’ याच्या नांवावरून ठेवण्यात आलं आहे तर, तिसऱ्या स्त्री मूर्तीचं नांव धाकाजींची पत्नी रमाबाई वरून ‘रमेश्वरी’ असं नामकरण करण्यात आलं होत. चौथी मूर्ती हरीनारायणाची असून हे नांव धाकजींचा अन्य पुत्र ‘नारायण’ यांच्या नांवावरून ठेवण्यात अल होत. आणखी एक विनायाकादित्याची मूर्ती आहे. हे मंदिर बांधण्यास त्याकाळात ८०००० रुपयांचा खर्च आला होता अशी माहिती श्री. गोविंद नारायण माडगावकर यांच्या .मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात आहे.

श्री महालक्षुमी मंदिराच्या पूर्वेकडे, म्हणजे आताचा पेडर रोड जिथून सुरुवात होतो त्या कोपऱ्यावर पूर्वी शेठ तुलसीदास गोपालजी किंवा तुलसीदास गोपालदास नांवाच्या व्यापाऱ्याने बांधलेलं एक तळं होत, जे आता बुजवण्यात येऊन ती जागा मोठ्या समारंभासाठी भाड्याने देण्यात येते.

वरळीच्या बांधाने मुंबईच्या ‘महालक्षुमी’ला जन्म दिला हे तर खरंच, परंतू त्याने ‘मुंबई’च्या रूपाने देशाच्या पदरात खरीच ‘लक्ष्मी’ टाकली हे ही खरंच..! वरच्या आख्यायिकेचा एक असाही अर्थ लावता येतो. मुंबईवर ‘लक्ष्मी’ प्रसन्न झाली ती या दिवसापासूनच. या बांधामुळे मुंबईत प्रचंड प्रमाणावर जमीन उपलब्ध झाली. देशभरातील अनेक ठिकाणाहून हुशार व्यापारी, तंत्रज्ञ, कलाकार, कारागीर मुंबईत येऊ लागले. व्यापार उदीम वाढला आणि मुंबई बघता बघता देशाची आर्थिक राजधानी बनली. मुंबईचे आर्थिक जगतातील हे स्थान आजवर देशातील इतर कोणतंही शहर हिसकावून घेऊ शकलेलं नाही. मुंबईवर महा’लक्ष्मी’चा वरदहस्त आहे, नव्हे, मुंबई हे ‘महालक्षुमी’चे साक्षात प्रतिक आहे. वरळीच्या बांधकामामुळे मुंबईला ‘महालक्षुमी’चं देऊळ आणि त्यातील दगडी मूर्ती तर मिळाल्याच, परंतु खऱ्या महा’लक्ष्मी’च्या रुपात साक्षात मुंबईच मिळाली. असं म्हटले तर वावगं ठरणार नाही.

देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या चौदा रत्नांपैकी, ‘लक्ष्मी’ हे एक रत्न आपल्याला मिळालं, असं पुराणकथांमध्ये म्हटलेलं आहे. या पुराणकथेमध्ये आणि वरळीच्या समुद्रात केलेल्या समुद्रमन्थनाच्या घटनेत मला कमालीचं साम्य वाटतं. समुद्र मन्थनातून देवांना ‘लक्ष्मी’ मिळाली, आणि आपल्याला साक्षात ‘मुंबई’ मिळाली. दोन्हींचा काळ वेगळा असला तरी, अर्थ एकच..!

-नितीन साळुंखे

9321811091

संदर्भ-

1. मुंबईचे वर्णन -ले. गोविंद मडगावकर – सन १८६२

2. मुंबईचा वृत्तांत – मोरो विनायक शिंगणे – सन १८९३

3. The Hindu Temples of Bombay – K. Raghunathji – सन १८९५

4. The Rise of Bombay: A Retrospect : Stephen Edwardes – सन 1902

5. मुंबईतील आद्य शक्तिपीठे – श्री. भालचंद्र आकलेकर

6. महालक्षुमी मंदीराच संकेतस्थळ.

आभार-

श्रीं हेमंत पवार, चंदन विचारे, मुसा शेख ह्या माझ्या मुंबई भटकंतीतील साथीदारांचे.

वरळी कोळीवाड्याची देवता श्रीगोलफादेवी..

(लाईक्स किंवा कमेंट्स दिल्या नाहीत तरी चालेल, पण मुंबईच्या इतिहासाच्या नजरेतून हा लेख महत्वाचा असल्याने काळजीपूर्वक वाचावा एवढीच विनंती आहे..)

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

#वरळी_कोळीवाड्याची_देवता_श्री_गोलफादेवी..

मुंबईचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी. मुंबईमध्ये कोळी समाज मुंबई ही ‘मुंबई’ म्हणून ओळखली जाण्यापुर्वीपासून वास्तव्यास आहे. म्हणून तर मुंबई ही कोळ्यांची असे सांगतात. कोळी आणि त्याचं कुटुंब, अश्या सर्वांचच आयुष्य समुद्राशी, त्याच्या लहरीपणाशी, त्याच्या भरती-ओहोटीशी घट्ट निगडीत असल्याने त्यांची वसती समुद्र किनाऱ्यांवर असणं अगदी साहजिक असतं. समुद्रच यांचा माय-बाप, त्यानुळे चुकला कोळी समुद्रावरच सापडायचा, एवढ याचं जीवन समुद्रमय झालेलं असते. सतत समुद्राच्या अंगा खांद्यावर बागडणाऱ्या कोळ्यांच्या अंगात समुद्राचा दिलदारपणा, रांगडेपणा आणि बेडरपणा हे गुण भिनले नसते तरच नवल. याला त्याची घरकारीण कोळीणही अपवाद नाही.

कोळी समाजाच्या या वस्त्यांना ‘कोळीवाडे’ म्हणतात, हे सांगण गरजेच नाही. मुंबई शहर आणि उपनगरे मिळून असे बरेच कोळीवाडे आहेत. खुद्द मुंबई शहराच्या सीमेत जसे माहीम, शींव (सायन), धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, कफ परेड, मांडवी असे काही कोळीवाडे आहेत. यातही मुंबई शहराचा पूर्व किनारा आणि पश्चीन किनारा अशी विभागणी आहे. ब्रिटीशांच्या काळात त्यांची दृष्टी मुख्यत: पूर्व किनार्यावर असल्याने, विविध बंदरांच्या विकासाच्या ओघात पूर्व किनार्यावरचे बरेचसे कोळीवाडे नष्ट झाले किंवा त्याचं स्वरूप अमुलाग्र बदलल. पश्चिम किनाऱ्यावरचे कोळीवाडे, त्यांच्या कालानुरूप बदल झाला असला तरी मात्र, अद्यापही आपल मूळ स्वरूप बऱ्यापैकी टिकवून आहेत.

आज शिल्लक असलेला कोणताही कोळीवाडा दाटीवाटीच्या बैठ्या वस्तीचा आणि चिंचोळ्या रस्त्यांचा असला तरी, ही झोपडपट्टी नाही. शासनाच्या व्याख्येत झोपडपट्टी म्हणजे दाटीवाटीने वसलेली कोणतीही बैठी वसती. परंतु बैठ्या वस्तीतही फरक असतो आणि प्रत्येक बैठी वस्ती ही झोपडपट्टी नसते. ‘प्रत्येक कावळा काळा असतो, पण प्रत्येक काळा कावळा नसतो’ म्हणतात ना, तसं. या पूर्वी मुंबईत बैठ्या वस्त्या असायच्या आणि त्यांना ‘चाळी’ असा सभ्य शब्द होता. झोपडपट्टी म्हणजे दिसेल त्या मोकळ्या जागेवर बारदान आणि पत्रे ठोकून अवैध रीतीने एका रात्रीत उभी केलेली वस्ती. ‘झोपडपट्टी’ हा शब्द आधुनिक काळात विकासाच्या पोटी जन्मलेला आहे. ‘विकास’ आणि त्याच एक अनौरस अपत्य ‘झोपडपट्टी’ या बाप-बेट्याचा जन्मच आधुनिक काळातला आहे. मुंबईच्या प्राचीन सभ्यतेचे आणि संस्कृक्तिक इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेले कोळीवाडे म्हणजे झोपडपट्ट्या नव्हेत, हे शासनात बसलेल्या झापडबंद अधिकाऱ्यांना आणि इतिहास-संस्कृती काही देणं-घेण नसणाऱ्या लोभी राजकारण्यांना कुणीतरी सांगणे गरजेचे आहे. कोळीवाड्यांना इतिहास आहे मात्र वर्तमान परिस्थितीत त्यांना भविष्य आहे की नाही हे सांगता येत नाही. झोपडपट्ट्यांना इतिहास नसतो, मात्र वर्तमान काळात त्यांना उज्वल भविष्य आहे हे नक्की..!

वरळीचा कोळीवाडा-

मुंबईच्या इतिहासाचा असाच एक जिवंत साक्षीदार म्हणजे वरळी कोळीवाडा. वरळी कोळीवाडा ही झोपडपट्टी नाही. या कोळीवाड्याला ७-८०० वर्ष वा त्याहूनही जुना इतिहास आहे. हा कोळीवाडा वरळी गांव म्हणूनही ओळखला जातो. ज्या सात बेटांची मुंबई बनली असं म्हणतात, त्यातील सध्याच्या मुंबईच्या हृदयातलं वरळी हे कुलाब्या खालोखालचं सर्वात लहान बेट. वरळी हा एक लहानसा डोंगरी गांव. या बेटाची व्याप्ती साधारणत: सध्याच्या ‘अत्रिया माॅल’च्या समोर असलेल्या ‘पुनम चेंबर’ या इमारत समुहापासून सुरू होणाऱ्या आणि ‘सेंच्युरी बाजार’पर्यंत जाणाऱ्या ‘अॅनी बेझंट’ मार्गाच्या पच्छिमेस पार समुद्रापर्यंतची आहे. या लहानश्या पट्ट्यात वरळीच्या किल्ल्याच्या जवळ वसलेला वरळी कोळीवाडा हीच तेवढी पूर्वापार अस्तित्वात असलेली वस्ती असावी आणि बाकीचा सर्व भाग तेंव्हा मोकळा असावा. ‘अत्रिया माॅल’च्या समोर असलेल्या लहानश्या टेकडीवरचं ‘मार्कंडेश्वर मंदीर’ वरळीच्या दक्षिण सीमेवरचं असावं असा अंदाज बांधता येतो. वरळी गांव आणि हे मंदीर यात त्या काळात फारशी वसती नसावी. मुळात तेव्हाच्या मुंबईतील सर्व बेटात मिळून चार-पांचशेच्या वर घरं नसावीत, तिथे सर्वात लहान असलेल्या वरळी गांवात अशी कितीश वस्ती असणार, याचा अंदाज बांधा. सर्व मुंबई वरळी गांवची उत्तर सीमा म्हणजे सध्याच्या सेंच्युरी बाझारच्या समोरुन वरळी गांवात जाणारा रस्ता असावा असा अंदाज नकाशावरुन बांधता येतो.

असं हे वरळी गांव बाराव्या व तेराव्या शतकाच्या सुरुवातीला बिंब राजाने त्याचे सरचिटणीस सूर्यवंशी गंभिरराव यास इनाम देऊन त्यास या गांवचा ‘पुरो’ हे पद दिल्याचा उल्लेख ‘महिकावतीची बखर’ या बखरीचं विश्लेषण केलेल्या याच नांवाच्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडेच्या पुस्तकात आहे. केशवाचार्याची ही बखर बखर वाड्मयात फार प्राचीन अशी म्हणता येईल. असाच वरळी गांव इनाम म्हणून दिल्याचा एक उल्लेख श्री. गोविंद नारायण मडगांवकर यांच्या ‘मुंबंईचे वर्णन’ या सन १८६२ सालच्या पुस्तकात आहे. मडगांवकर लिहितात, ‘श्री राज बिंब महाराज यांनी आपले पाटील यांस वरली गांव वंशपरंपरा इनाम दिले होते. त्या गांवातील शेत, जमीन, डोंगर, ताड-माड, खजुरी यांचे उत्पन्न वसूल करून घेऊन पुत्र-पौत्रादिकांनी याचा उपभोग घ्यावा’. मडगांवकरांनी हे लिहिताना सनावळीचा उल्लेख केला नसला तरी, त्यांना एका स्थानिक वृद्ध प्रभु गृहस्थाकडे सापडलेल्या लहानशा बखरीचा हवाला दिला आहे. महिकावतीच्या बखरीपेक्षा मडगांवकर म्हणतात ती बखर वेगळी असावी, कारण मडगांवकराना मिळालेल्या बखरीत वरळीचा पुरातन वृत्तांत होता, असं ते म्हणतात. ‘गंभिरराव सूर्यवंशी’ यांस वरळी गांव इनाम देऊन त्यास वरळी गांवचे ‘पुरो’ हे पद दिल्याचा उल्लेख बखर करते, तर मडगांवकर केवळ वरळी गांव ‘पाटलास इनाम दिले’ येवढाच उल्लेख करतात. एवढा एक फरक सोडल्यास मडगांवकर आणि राजवाडे यांनी दिलेल्या इतर तपशिलात फारसा फरक नाही. ‘पुरो’ हेच पुढे ‘पाटील’ झाले असावेत असं समजण्यास तूर्तास हरकत नाही.

वरळी गांवाची पूर्व सीमा समजल्या जाणाऱ्या डाॅ. अॅनी बेझंट रोडला लागूनच श्री निळकंठेश्वराचं एक जुनं मंदीर आहे. या मंदीरात एक जुना गधेगळ आहे. गधेगळी या सामान्यत: इनाम वा बक्षिस वा दान दिलेल्या गांवाच्या सीमा आखण्यासाठी लावल्या जातात. गधेगळ जीथे असतो, त्या सीमेच्या अातलं क्षेत्र त्या इनाम, बक्षिस वा दान दिलेल्या व्यक्तीचं असतं व त्यात कुणी हस्तक्षेप करु नये, अशी ती एक ताकीद असते. निळकंठेश्वराच्या मंदीरात असलेल्या ह्या गधेगळीवर शेंदूर-तेल माखून आता तिचा देव बनवल्याने ती वाचता येत नाही, परंतू ही वरळी गांव इनाम दिल्याची सीमा खुण असावी असा अंदाज बांधता येतो. याचा अर्थ तेराव्या शतकात मुंबईत राज्य स्थापन करणाऱ्या बिंबराजाच्या पूर्वीपासून वरळी कोळीवाडा मुंबईत अस्तित्वात होता.

प्रताप बिंब हा मुंबईचा पहिला राजा समजण्यास हरकत नाही. कारण प्राचीन मुंबईवर अनेक घराण्यांची येऊन गेली असली तरी, मुंबईच्या माहिमला राजधानी स्थापन करणारा हा पहिला राजा. तत्पूर्वी प्रताप बिंब राजाने केळवे माहीम येथे आपली राजधानी स्थापन केल्यानंतर, आपल्या राज्याची आखणी करताना, त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या काही महत्वाच्या अधिकाऱ्यांना दमण ते वाळकेश्वरापर्यंतची गांवे इनाम म्हणून दिली, त्यात वरळी गांव आपले सरचिटणीस गंभिरराव किंवा इथल्या पाटलाला त्याच्या वंश परंपरागत इनाम हक्काने दिलं. याचा अर्थ बिंब राजाच्या राज्यात सामील केलं गेलेलं वरळी गांव, बिंब राजा मुंबईत येण्याच्याही पूर्वी लहानशा स्वरुपात का होईना, पण अस्तित्वात होतं, असा होतो. सदर पाटलाचा हा हक्क पुढे पोर्तुगीज आणि नंतर इंग्रजानीही कायम ठेवला होता असा उल्लेख श्री. गोविंद नारायण माडगावकर यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात आहे. राजा बिम्बाने दिलेले हे वरळी गांवचे इनाम पुढे अनेक कारणाने इतराच्या हातात गेलं असलं तरी, ‘नऊ पाटलांचा मान’ आजही या कोळीवाड्यात जपला जातो, तो याच संदर्भाने असावा. या ठिकाणी ग्राम पद्धती अद्यापहीशाबूत असून, प्राचीन काळच्या परंपरा अजूनही आवर्जून जपल्या जातात.

श्री गोलफादेवी –

कोळी लोकांचा व्यवसाय समुद्राशी निगडीत असतो. लहरी समुद्र कोणत्या वेळेला कोणतं दान पदरात टाकेल याची काहीच शाश्वती नसते. वर्षानुवर्ष्याच्या अनुभवाने बांधलेले अाडखेही कधी कधी चुकतात आणि मग जीवावर बेतू शकतं. समुद्रावरची मासेमारी म्हणजे रोज जिवावरचा खेळ असतो. मासेमारीला खोल समुद्रात गेलेला नाखवा सुखरूप परत येतो, पण तो येईलच याची काही शाश्वती नसते. म्हणून तर त्यांच्या कुटंबातील लोक असे मानतात की, जोपर्यंत ती व्यक्ती घरी सुरक्षित पोहचत नाही तोपर्यंत ती त्यांची नसते. आणि कदाचित म्हणूनच कोळी समाज देवावर प्रचंड श्रद्धा असणारा असतो. कोळी समाजातील बहुतेक सर्वचजण कार्ल्याच्या डोंगरातली देवी श्री एकवीरा देवी आणि जेजुरीच्या खंडोबाला दरवर्षी भेट देतात.

श्री एकविरेप्रमाणे प्रत्येक कोळीवाड्याचं स्वत:चं एक दैवत असतं. आपल्या देशातील कोणत्याही प्रांतातील कोणत्याही गांवचं स्वत:चं असं एक श्रद्धेय दैवत असतं आणि ते बहुतकरून देवी रुपात असतं. ह्या देवीला गांवदेवी असंही म्हणतात. अशीच वरळी गांवची ग्रामदेवता आहे श्री गोलफादेवी. श्री गोलफादेवी या नांवाचा उगम कसा झाला असावा, याचीही काही ठोस माहिती मिळाली नाही

वरळी कोळीवाड्याच्या श्री गोलफादेवीची स्थापना बिंब राजाने केल्याचं सांगीतलं जात असलं तरी, या देवीची स्थापना कुणी आणि कधी केली त्याबद्दल निश्चित असं काही सांगता येत नाही. श्री. भालचंद्र आकलेकरांच्या ‘मुंबंईतील आद्य शक्तिपीठे’ या पुस्तकातही असाच उल्लेख आहे.

आपण वरच्या परिच्छेदात पाहिल्याप्रमाणे जर वरळी कोळीवाडा राजा बिंबाच्या मुंबईतील आगमना पूर्वीपासून अस्तित्वात होता, तर मग या गांवची ग्रामदेवता श्री गोलफादेवी बिंब राजा मुंबईत येण्या पूर्वीपासून अस्तित्वात होती, असं ओघानेच म्हणावं लागतं. कारण आपल्या देशात प्रत्येक गांवची एक स्वतंत्र देवता असणं, ही आपली परंपरा आहे. परंतू माझ्या वाचनात आलेल्या मुंबईची कहाणी सांगणाऱ्या जुन्या पुस्तकात श्री गोलफादेवीचा उल्लेख नाही. ‘Bombay Gazetteer of Bombay City and Island’ या सन १९०६ साली लिहिलेल्या सरकारी दस्तावेजातही श्री गोलफादेलीचा उल्लेख नाही. वरळी (जुनं नांव वरोली) गांवाचाही फारसा उल्लेख नाही. जुन्या इंग्रजी पुस्तकांत वरळीची स्पेलिंग Worli अशी न लिहिता Varli, Vadali, Vareli, Verulee, वारोळी अशी विविध पद्धतीने केलेली लक्षात येते. वरळी हे अगदी पाडा म्हणावं असं लहानसं गांव असावं आणि त्या मुळे कदाचित, तेथील देवतेचं अस्तित्व जुनी पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं नसावं, असं म्हणता येईल. परंतू वरळी गांव होतं म्हणजे देवताही असावी, असं तर्काने म्हणता येईल.

मग श्री गोलफादेवीच्या स्थापनेशी बिंबराजाचं नाव कसं जोडलं गेलं असावं, याचा विचार करताना दोन शक्यता लक्षात येतात.

1. वरळी कोळीवाड्याची देवता श्री गोलफादेवी पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याने, बिंब राजाच्या मुंबईतल्या आगमनानंतर बिंब राजाने श्री गोलफादेवीला शाकंभरीचंच रुप मानलं असावं.

2. बिंब राजाने श्री गोलफादेवीचं पूर्वीपासून अस्तित्वात असलेलं मंदीर नव्याने बांधून त्यात श्री शाकंभरी देवीची श्री गोलफादेवी नांवाने पुनर्स्थापना केली असावी.

यातील पहिल्या शक्यतेवर विचार करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. मुंबईत राज्या स्थापन करणारा हा बिंब राजा यादव कुळातला की चालुक्य कुळातला, हे दोन विचारप्रवाह अभ्यासकांमधे आहेत आणि त्यात आपल्याला पडायची आवश्यकता नाही. महिकावतीच्या बखरीत या राजाची कुळदेवता शाकंभरी, गोत्र भारद्वाज आणि त्याचा गुजरातेतील अनहीलपाटण प्रांतातल्या सोळंकी राजाशी असलेला संबंध लक्षात घेता, हा बिंब राजा चालुक्य कुलातला वाटतो. चालुक्यांची कुळदेवता श्री शाकंभरी, गोत्र भारद्वाज आणि या घराण्याचा गुजरातशी आलेला राज्यसंबंध व या सर्व तपशिलाचं राजा बिंबाच्या तपशिलाशी असलेलं साधर्म्य यावरुन राजा बिंब चालुक्य कुळातला असं मानायला जागा आहे. आता पहिली शक्यता असं सांगते की, आपल्या राज्यात पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या वरळी गांवातील या देवीला त्याने शाकंभरीचं स्वरुप मानलं असावं आणि तिची पुजा करण्यास सुरुवात केली असावी. परंतू श्री गोलफादेवीची नि:शस्त्र मुर्ती, तिची पाना-फुलांनी-भाज्यांनी केली जाणारी पुजा पाहाता, ही शक्यता ग्राह्य वाटत नाही. श्री गोलफादेवीची म्हणून पुजली जाणारी मूर्ती शाकंभरीचीच असावी असं वाटत. या संदर्भात अधिक संशोधन व्हायला हवं.

दुसरी शक्यता, बिंब राजाने श्री गोलफादेवीचं पूर्वीपासून अस्तित्वात असलेलं मंदीर नव्याने बांधून त्यात श्री शाकंभरी देवीची श्री गोलफादेवी नांवाने पुनर्स्थापना केली असावी, ही शक्यता अधिक स्विकारार्ह वाटते. कारण नव्याने राज्यावर आलेला राजा आपल्या दैवतांची मंदीरं आपल्या राज्यात स्थापन करत असतो किंवा राजाची दैवतं, राजाची भाषा आणि काही प्रसंगात राजाचा धर्मही प्रजा स्वीकारत असते असं इतिहास सांगतो. या शक्यतेवर अधिक विचार केला असता आणखी काही गोष्टींवर प्रकाश पडतो.

बिंब राजाची कुलदेवता श्री प्रभावती देवी असल्याचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत आहे. वरळीपासून नजिकच असलेल्या प्रभादेवी भागात असलेल्या प्रभादेवीच्या मंदीरातील प्रभादेवी ही ‘प्रभादेवी’ म्हणून ओळखली जात असली तरी, तिचं मुळ नांव श्री प्रभावती असून, ती श्री शाकंभरी देवी आहे. श्री शांकंभरी ही चालुक्यांची तशीच राजा बिंबाचीही कुलदेवता. आताच्या या प्रभादेवीची स्थापना माहिमात राजा बिंबाने केली होती, परंतु तद्नंतर आलेल्या अनेक परकी आक्रमणांच्या संक्रमणांतून जात, हिचं देऊळ सध्याच्या जागी नव्याने स्थापन करण्यात आल्याचा उल्लेख ‘मुंबईतील आद्य शक्तिपीठे’ या श्री. भालचंद्र आकलेकरांच्या पुस्तकात आहे. या प्रभादेवीची जत्रा किंवा यात्रा ही पौष पौर्णिमेला होते. पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात. याचप्रमाणे वरळीच्या श्री गोलफादेवीची यात्राही याच दिवशी भरते, हा योगायोग नव्हे. श्री गोलफादेवीच्या मुर्तीचं स्वरुप, पौष पौर्णिमेला प्रभादेवीप्रमाणेच श्री गोलफादेवीचीही भरणारी यात्रा, या बाबी श्री गोलफादेवीची पुनर्स्थापना राजा बिंबाने केली असावी किंवा बिम्बाची देवता कोळीवाड्याने स्वीकारली असल्याच्या शक्यतेस पुष्टी देते.

वरील दुसऱ्या शक्यतेस बळकटी देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, श्री प्रभादेवीच्या मंदीरात ज्या प्रमाणे तिच्या डाव्या-उजव्या हाताला अनुक्रमे श्री कालिका व श्री चंडीकादेवी आहेत, त्या प्रमाणेच प्रमाणेच श्री गोलफादेवीच्याही मंदिरात तिच्या डाव्या-उजव्या हाताला अनुक्रमे श्री हरबादेवी व श्री साकबादेवी अशा आणखी दोन मुर्ती आहेत. श्री प्रभादेवीच्या मंदिरातली श्री कालिकादेवी वरळी गांव इनामात मिळालेल्या राजा बिंबाचे सरचिटणीस सूर्यवंशी गंभिररावांची कुळदेवता आहे, तर श्री चंडीका देवी बिंबराजाचे राजगुरू हेमाडपंडीतांची कुळदेवता असल्याचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत आहे. श्री प्रभादेवी( शाकंभरी) बिंबराजाची कुळदेवता असल्याने, आपल्या कुळदेवतेच्या मंदीरात बिंबराजाने आपल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या कुळदेवतांना स्थान दिलं असावं. तसंच श्री गोलफादेवीच्या मंदीरातली श्री हरबादेवी राजा बिंबाचे सरसबनीस शेषवंशी आनंदरावांची कुळदेवता आहे, असं बखर म्हणते. प्रभादेवीच्या मंदीरातील श्री कालिका देवी ज्याची कुळदेवता आहे, तो सूर्यवंशी गंभिरराव वरळी गांवचा इनामदार आहे याचा अर्थ, राजा बिंब, श्री प्रभादेवी आणि श्री गोलफादेवी यांचा निकटचा संबंध आहे, असा होऊ शकतो.

श्री गोलफादेवीच्या डाव्या हाताला असलेली श्री हरबादेवी ही राजा बिंबाचे सरसबनीस शेषवंशी आनंदराव यांची कुलदेवता असल्याचे महिकावतीच्या बखरीत नोंदलेलं आहे. श्री हरबादेवी बिंबराजाच्या उपास्य दैवतापैकी ही एक मोठी देवता असावी किंवा ही बिंबाची मुळ ग्रामदेवता असावी किंवा ती शेषवंशी समाजाच प्रतिनिधित्व करणारी असावी असं म्हणता येईल. कारण राजा बिम्बाने मुंबईत येताना आपल्या सोबत जी कुळें आणली, त्यात शेषवंशी कुळे असल्याचा उल्लेख बहुतेक जुन्या पुस्तकांत आहे. म्हणून मुंबई आणि साष्टी परिसरात जिथे राजा बिम्बाची सत्ता होती, त्या मुंबई व साष्टीमधल्या अनेक ठिकाणी श्री हरबादेवीची मंदीरं सापडतात. हिरबादेवी, हरिबादेवी, हरबाई अशी हिची नांव असल्याचंही दिसून येतं. काही कोळीगीतांत हरबादेवीचा उल्लेख येतो.

श्री गोलफादेवीच्या संमती शिवाय वरळी गांवातील कोणतीही खाजगी वा सार्वजनिक हिताची कामं केली जात नाहीत. देवीने दिलेल्या कौलानुसार वागलं असता कुणीही अडचणीत येत नाही, अशी इथल्या रहिवाशांची श्रद्धा आहे. देवीचा कौल घेण्याची परंपराही अत्यंत प्राचीन आहे आणि आजच्या काळातही ती आवर्जून पाळली जाते. श्री गोलफादेवीच्या मंदीरात असलेल्या तीन देवतांपैकी, केवळ श्री गोलफादेवी व श्री हरबादेवीला कौल लावला जातो. मंदीरात असलेली आणखी एक देवता श्री साकबादेवीला मात्र कौल लावला जात नाही. असं का, याचं उत्तर ‘तशी प्रथा आहे’ या पलिकडे आज तरी कुणाला देता येत नाही.

श्री साकबादेवीला कौल का लावला जात नसावा, यावर मी केलेला एक तर्क या लेखाच्या शेवटच्या टप्प्यात दिला आहे.

श्री गोलफादेवीची वार्षिक जत्रा पौष पौर्णिमेला, म्हणजे शाकंभरी पैर्णिमेला भरते. साधारणत: जानेवारी महिन्यात ही तिथी येते. यात्रेच्या आदल्या रात्री मंदीरात सामुदायिक अभिषेक व हरिपाठ केला जातो. नंतर देवीला नेसवली जाऊन तिला अलंकाराने सजवतात. यात्रेच्या दिवशी पुन्हा पुजा देवीची पुजा केली जाऊन मंदीर भाविकांसाठी खुलं केलं जातं. या दिवशी हजारो भक्तगण नवस फेडण्यासाठी येतात. लग्नानंतर वरळी गांव सोडून गेलेल्या सासुरवाशीणी न चुकता पोरा-बाळांसकट देवीच्या दर्शनाला येतात. खणा-नारळाने देवीची ओटी भरतात. आपल्या देशातील कोणत्याही गांवातील कोणत्याही जत्रेप्रमाणे श्री गोलफादेवीचीही जत्रा असते. कोणत्याही जत्रेप्रमाणे या ही जत्रेत विविध प्रकारच्या वस्तू विकणारी दुकाने लागतात, खेळाचे चक्री पाळणे लागतात, मेवा-मिठायांची ठेले लागतात. पहाटेच सुरू झालेला श्री गोलफादेवीच्या जत्रेचा हा सोहळा मग उत्तररात्रीपर्यंत सुरू राहातो. श्री गोलफादेवीच्या यात्रेचा इतिहास फार-तर शंभर-सव्वाशे वर्षांचा असावा. कारण सन १९०६ च्या ‘Bombay Gazetteer‘मधे मुंबईत होणाऱ्या यात्रांची तिथी आणि ती यात्रा किती दिवसांची असते त्याची यादी दिलेली आहे, त्यात श्री गोलफादेवी यात्रेचा उल्लेख नाही. याचा अर्थ श्री गोलफादेवीची यात्रा या नंतर कधीतरी सुरु झाली असावी.

या व्यतिरिक्त चैत्र शुद्ध अष्टमीला ‘भवानी उत्पती महोत्सव’ आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या नऊ दिवसांच्या कालावधीत ‘शारदीय नवरात्रोत्सव’ही मंदिरात साजरा केला जातो.

श्री गोलफादेवीच्या जत्रेतलं एक वैशिष्ट्य म्हणजे, या जत्रेत काठीयावाडी गुजराती भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. गुजरातच्या ह्या समाजाला ‘वाघरी’ समाज असे म्हणतात. यांची भाषा राजस्थानी मिश्रित गुजराथी असून, हा देविपुजक समाज आहे. हे लोक दरवर्षी श्री गोल्फादेविला देवीला झेंडा अर्पण करतात. काठीयावाडी लोकांनी या जत्रेला येण्याची परंपरा अत्यंत जुनी आहे. एवढच नव्हे तर या वाघरी समाजाने मुंबईत अनेक ठिकाणी श्री गोलफादेवीची मंदीर स्थापन केली आहेत. काठेवाडी गुजराती लोक या यात्रेला येण्याच कारण काय हे शोधता शोधता मी राजकोटच्या श्री. उमेशभाई सोलंकी आणि श्री. जयसिंगभाई उग्रेजिया यांच्या पर्यंत पोहोचलो. श्री. उमेशभाई सोलंकी यांनी “શ્રી દેવીપૂજક (વાઘરી) સમાજના દેવ અને દેવિઓ અને પૂર્વજોની અમર ગાથાઓ” हे पुस्तक लिहिले आहे. श्री. सोलंकी यांच्याशी बोललो असता त्यांना वरळीच्या गोल्फादेविबद्दल काही सांगता येईना. म्हणून त्यांनी मुंबईच्याच श्री. जयसिंगभाई उग्रेजीयांशी बोलण्यास सांगितले. श्री. उग्रेजीयानी सांगितले की, जेंव्हा त्यांचा वाघरी समाज मुंबईत स्थलांतर करता झाला, तेंव्हा मुंबईच्या देवतेची आपल्यावर कृपा असावी यासाठी त्यांनी श्री गोल्फा देवीची निवड केली आणि तेंव्हा पासून हा समाज श्री गोल्फादेविला पुजत आलेला आहे.

मुंबईत हा समाज कधी आला याची ठोस अशी माहिती मिळालेली नाही, तरी श्री उग्रेजीया यांच्या म्हणण्याप्रमाणे साधारण शंभर-दीडशे वर्षापूर्वी हा समाज मुंबईत आला. हा समाज गुजरातेतील राजकोट, सौराष्ट्र, अहमदाबाद व इतरही ठिकाणी पसरलेला असल्याची माहिती श्री उग्रेजीया यांनी दिली. उग्रेजीया पुढे म्हणाले की, त्यांचा राजा सोलंकी घराण्याचा होता म्हणून त्याची देवताही ते पूजतात. सोलंकी हे आडनाव चालुक्यचा अपभ्रंश आहे, असे महिकावातीची बखर लिहिणाऱ्या श्री राजवाडे आणि ह्याच बखरीच नव्याने विश्लेषण करणाऱ्या श्री अशोक सावे यांनीही लिहिलंय. असं असेल तर गुजरातच्या ह्या राजाची कुळदेवता श्री शाकंभरी ठरते आणि म्हणून कधीकाळी त्याचे प्रजाजन असलेला वाघरी समाज श्री गोल्फादेविला पुजत असावा असा अंदाज बांधला तर चुकीचा ठरू नये.

श्री साकबादेवीला कौला का लावला जात नाही, या विषयी एक अंदाज बांधायचा तर, श्री शाकंभरी देवीच जे एक स्थान राजस्थानातल्या सिकर इथे आहे, तिथे या देवीचं नांव ‘सकराई’ किंवा ‘सकराय’ असही आहे ( ‘सकराई’चा उच्चार ‘सागराई’ असाही होऊ शकतो आणि सागर हा तर कोळ्यांची माता-पिता असा सगळाच आहे. राजभवनाच्या परिसरातील श्री गुंडी या ऐतिहासिक ठिकाणावर असलेली देवी कोळी लोकांच्यात ‘सकलाई’ नांवानेच ओळखली जाते, हे ही इथे लक्षात घ्यायला हवं). श्री गोल्फादेविच्या दर्शनाला येणाऱ्या वाघरी लोकांची भाषा गुजराती मिश्रित राजस्थानी आहे, हे लक्षात घ्यायला हवं. देवीच्या या नांवाचा अपभ्रंश ‘सकलाई’, सकबाई’, ‘सकबा’ असा विविध प्रकारे होऊ शकतो. मग श्री गोल्फादेविच्या मंदिरातली ही श्री साकबादेवी शाकंभरीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. वरळीची श्री गोलफादेवी हे शाकंभरीचं रूप असल्याने एकाच मंदिरातल्या दोन शाकंभरी मातांना कौल कसा लावणार, म्हणून श्री साकबादेविला कौल लावला जात नसेल का, असाही प्रश्न उभा राहतो. अर्थात हे माझ्या मनात उभे राहिलेले प्रश्न आहेत, पुढील काळात यावर अधिक संशोधन व्हायला हवं असं वाटतं..!!

वरळीच्या कोळीवाड्यात कोळीवाड्यांच्या सीमांच रक्षण करणारा, गांवाचं आद्य स्थान असलेला श्री चेडदेव, श्री पापविमोचनेश्वर, श्री मारुती मंदीर, श्री प्रभू येशू आणि मेरी प्रार्थनास्थळ आणि पीर दर्गा अशी इतरही धार्मिक स्थळ आहेत. तसेच उत्तरेला समुद्र काठावर श्री वेताळांच मंदिरही आहे. पाण्यातला वेताळ आणि आग्या वेताळ यानाही कौल लावला जातो. कोळी बांधव समुद्रात मच्छिमारीसाठी जाताना वेताळ देवाला हात जोडून त्यांच्या सुरक्षेसाठी साकड घालतात. नारळी पौर्णिमेचा उत्सवही वरळी गांवात उत्साहात साजरा होतो. शिवाय या बेटाच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी समुद्र किनाऱ्यावर बांधलेला एक किल्लाही या गांवात असून, तो अजूनही बऱ्यापैकी स्थितीत आहे.

अशी ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वरळी गांवाची कथा..!!

– नितीन साळुंखे

9321811091

संदर्भ –

1. महिकावतीची बखर – श्री. वि. का. राजवाडे

2. मुंबईचे वर्णन– श्री. गोविंद नारायण मडगांवकर

3. मुंबई नगरी– श्री. न. र. फाटक

4. वरळी कोळीवाड्याची ग्रामदेवता श्री गोलफादेवी – श्री. विलास वरळीकर

5. मुंबईतील आद्य जागृत शक्तिपीठे – श्री. भालचंद्र आकलेकर

6. Bombay Gazetteer of Bombay City and Island- Vol. I, II, III-1906

7. श्री. सी. डी. काटकर, वरळी गांव

8. श्री. विलास वरळीकर, वरळी गांव

9. श्री. उमेशभाई सोलंकी, राजकोट

10. श्री. जयसिंगभाई उग्रेजीया, राजकोट

11. श्री. अधिश काटकर, वरळी गांव

12. श्री. सागर कोळी

13. श्री. चंदन विचारे, मुंबई.

#पुढचा_लेख_मुंबईची_श्री_महालक्ष्मी..!!

वाळकेश्वरची_श्री_गुंडीदेवी..

(लाईक किंवा कमेंट्स देण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी लेख काळजीपूर्वक वाचावा ही विनंती..)

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा–

#वाळकेश्वरच_श्री_गुंडीदेवी..

वाळकेश्वर. वाळकेश्वर ज्या टेकडीवर आहे, ती मलबार हिल भौगोलिक दृष्ट्या मुंबईतली सर्वात उंच टेकडी. या टेकडीच्या उंची सारखीच उंची ऐहिक आयुष्यात गाठलेली इथली माणसं. वाळकेश्वराची वस्तीच गर्भश्रीमंतांची. तसंच हा मुंबंईचा राजनिवासांचा विभाग. वाळकेश्वर म्हटलं, की आठवतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडामोडीचं केंद्रस्थान असलेलं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘वर्षा’, देश-विदेशातील पाहुण्यांसाठी असलेलं ‘सह्याद्री गेस्ट हाऊस’, अनेक मंत्री, बडे अधिकारी यांची निवासस्थानं आणि या सर्वांचं मुकुटमणी शोभेल असं महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे निवासस्थान ‘राजभवन’..!

मलबार हिलच्या दक्षिणेकडे उतरत समुद्रात घुसलेल्या दगडांवर उभे असलेले आणि ३०० वर्षांचा मुंबईच्या आणि देशाच्याही राजकीय इतिहासाचं साक्षीदार असलेलं राजभवन हा जवळपास ४७ एकराचा परिसर आहे. सन १८२० साली ब्रिटिश काळातील भारताचे (मुंबई प्रांताचे) तत्कालीन गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी या टेकडीचं स्थान, तिच्यावरील हवामान आणि निवांतपणा लक्षात घेऊन ‘मरीन व्हिला’ नांवाची एक छोटीसी बंगली बांधली आणि नंतर हळुहळू मलबार हिल राजकारणाचा केंद्रबिंदू होत गेली.

आज जे वाळकेश्वर पाॅलिट आणि एलिट लोकांचा भाग म्हणून ओळखलं जातं, ते पूर्वी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जायचं. वाळकेश्वरचं खरं नांव ‘वालुकेश्वर’. वालुकेश्वर याचा अर्थ समुद्राच्या वाळुपासून तयार केलेले लिंग. काही जुन्या पुस्तकांत लिहिल्याप्रमाणे, त्या काळी घनदाट अरण्य असलेल्या या वाळकेश्वरच्या टेकडीवर येथील पूर्वी ऋषी-मुनी तपश्चर्या करीत. प्रभू श्रीराम जेंव्हा सीताहरणानंतर पंचवटी येथून लंकेच्या दिशेने सीतेच्या शोधार्थ शोधात निघाले, तेंव्हा ते या ऋषी मुनीच्या दर्शनासाठी या ठिकाणी काही काळ थांबले होते. या ऋषी मुनीनी त्यांना शिवलिंगाची पूजा करण्याचा सल्ला दिला होता व त्यानुसार प्रभू श्रीरामचंद्रांनी पूजेसाठी इथल्या समुद्राच्या वाळूपासून या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून त्याची पुजा केली आणि तेंव्हापासून हे ठिकाण ‘वालुकेश्वर’ या नांवाने ओळखलं जाऊ लागलं, अशी कथा सांगितली जाते. असं हे साक्षात प्रभु रामचंद्रांनी स्थापन केलेलं स्थान अशी श्रद्धा असलेलं श्री वालुकेश्वराचं लिंग, भगवान श्री रामचंद्रांनी जमिनीत बाण मारून उत्पन्न केलेलं अशी श्रद्धा असलेलं शेजारचं बाणगंगा तीर्थ आणि बाणगंगेच्या परिसरात नंतर वसलेली आणखी पांच-पन्नास देवस्थानं, इथून काहीसंच दूर असणारं बाबुलनाथाचं मंदिर, असा हा सर्व एकेकाळच्या तीर्थस्थानांचा परिसर. आज जरी हा परिसर ‘हा काय इथंच आहे’ म्हणण्याएवढा जवळ व जाण्यास सोपा आणि दिसण्यास रमणीय वाटत असला तरी, हजार-आठशे वर्षांपूर्वी, मुंबईच्या सात बेटांमधून इथं जाणं सोपं नव्हतं. वाळकेश्वर हे त्या काळात जंगलांची, मुंबई बेटातील मुख्य जमिनीपासून काहीशी तुटलेली, ओसाड अशी टेकडी होती. या टेकडीवरच्या देवांचे उत्सव व सणा-समारंभालाच या टेकडीवर काय ती वर्दळ असायची. एरवीच्या बाकी दिवशी हे एक शांत, घनदाट अरण्याचं निर्जन स्थान होतं.

वास्तविक वाळकेश्वराचं मूळ मंदिर आता जिथं राजभवन वसलंय त्या ठिकाणी होतं, असा उल्लेख बऱ्याच जुन्या पुस्तकांतून आहे. याच ठिकाणी, तिन्ही बाजूंच्या समुद्राच्या अगदी निकट, मधोमध एक सुईच्या मेढ्यासारखा चिंचोळी खांच असलेला मोठा दगड होता. अवघड जागच्या दगडाच्या या चिंचोळ्या भेगेतून आरपार जाणं तेवढं सोपं नव्हतं. दगडाच्या या खाचेंतून पलिकडे गेल्यावर पापमुक्ती होते आणि नविन जन्म होतो, असा समज त्या काळी होता. या दगडाच्या खाचेतून पलिकडे जाऊन, हातून कळत-नकळत घडलेल्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी येथे देशभरातून भाविक यायचे, असं जुन्या पुस्तकातून म्हटलं आहे. या दगडाला ‘योनी’ असंही म्हणायचे. योनी हे जन्माचं प्रतिक आहे म्हणून किंवा त्या दगडातील खांचेचा आकार योनीसारखा होता (vagina) म्हणून, असं म्हटलं जायचं..

छत्रपती शिवाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे आणि राघोबादादा पेशवे या इतिहास गाजवलेल्या महापुरूषांनी श्री गुंडीला भेट दिल्याच्या कथा सांगितल्या जातात. अफजल खानाच्या वधानंतर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेल्याची कथा सांगीतली जाते, तर राघोबादादांनी काही कामासाठी युरोपात त्यांचे दोन वकील पाठवले होते व त्याकाळी परदेशगमन हे पाप समजलं जात असल्याने, परदेशात वकीलांना पाठवल्याचं प्रायश्चित म्हणून राघोबादादांनी खडकाच्या या भेगेतून आरपार जाऊन त्या पापातून मुक्ती मिळवल्याची कथाही त्यासोबत सांगीतली जाते. काही ठिकाणी नारायणराव पेशवेंच्या खुनापासून मुक्ती मिळावी म्हणून राघोबादादानी या ठिकाणाला भेट दिली असंही लिहिलेलं आहे. सन १७७६ साली रघुनाथराव पेशवे जेव्हा पुण्याहून मुंबईत इंग्रजांकडे राजकीय आश्रयार्थ आले, तेंव्हा ते याच परिसरात मुक्कामाला होते, असा उल्लेख बाॅम्बे गॅझेटीअरमधे आहे.

राघोबादादांच्या मलबार हिलवरच्या भेटीची माहिती उपलब्ध आहे, मात्र त्यांनी या दगडाच्या भेगेतून पलीकडे जाऊन स्वत:ची शुद्धी करून घेतली, या कथेवर विश्वास ठेवणं काहीसं अवघड वाटतं. तसंच शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांनी श्री गुंडी दगडाचा अनुभव घेतला, या कथेवरही विश्वास बसत नाही. कारण याच ठिकाणी असणारं वाळकेश्वराचं देवालंय, चौदाव्या शतकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दशकाच्या आसपास मुंबईवर सुरु झालेल्या मुसलमानांच्या किंवा मग सोळाव्या शतकातील पहिल्या-दुसऱ्या दशकाच्या काळात आलेलं पोर्तुगीजांच्या धर्मांध आक्रमणात उध्वस्त झाल्याच्या कथा जुन्या पुस्तकातून आहेत. जर वाळकेश्वराचं देऊळ उध्वस्त झालं, तर मग त्या खालोखाल असलेल याच ठिकाणचं हिन्दूंचं श्रद्धास्थान श्रीगुंडीचा दगडही उध्वस्त करण्यात आलाच असावा, हे ओघानंच येतं. असं झालं असेल तर, सन १६३० ते १६८० दरम्यानचे छत्रपती शिवाजी महाराज, महाराजांच्या मागोमाग उदयाला आलेले कान्होजी आंग्रे आणि अठराव्या शतकातले राघोबादादा, यांनी, ते या ठिकाणी आले असले तरी त्यांनी श्री गुंडीचं अनुभव घेतला या कथा केवळ आख्यायिका म्हणूनच ठरवाव्या लागतात.

कथांच्याच बाबतीत बोलायचं तर, वाळकेश्वराचं देवालय उध्वस्त करताना कदाचित श्री गुंडीचा दगड सुरक्षित राहिला असावा आणि नंतर इंग्रजांच्या काळात कारणपरत्वे इथे आलेल्या शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे आणि राघोबादादा यांनी या दगडाचा अनुभव घेतला असावा असं म्हटलं, तर त्या काळच्या आख्यायिकाना आधार मिळतो. अर्थात, लिखित काही नसल्याने या गोष्टी तर्कानेच जाणून घ्याव्या लागतात..

श्री गुंडीचा खडक आता तिथे नाही, परंतु सध्या त्या ठिकाणी देवीचे एक मंदिर आहे. ह्या देवळाचं नुकतंच सन २०१५ मधे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. या देवीला आता सकलाई, सागर माता किंवा श्रीगुंडी म्हणून तिचे भक्तगण ओळखत असले तरी, जुन्या पुस्तकात या देवीचा उल्लेख नाही अथवा या देवीला नांव नाही. नांव नसलेली मुंबंईतली ही एकमेव देवता असावी. मात्र राजभवनासारख्या अति महत्वाच्या ठिकाणी ही देवी आहे याचा अर्थ, ती नक्कीच प्राचीन असावी. कदाचित श्रीगुंडी दगडाची आठवण म्हणून तिचं लहानसं मंदीर पूर्वी कधीतरी बांधलं गेलं असावं. किंवा वाळकेश्वराच्या मंदीरासोबत ह्या देवीचं देऊळही पूर्वी इथे असावं आणि मुसलमानी व पोर्तुगीज अंमलात वाळकेश्वरासोबत या देवीचं मंदिरही नष्ट करण्यात आलं असावं आणि त्यांचा अंमल संपल्यावर या देवीची स्थापना पुन्हा या ठिकाणी केली गेली असावी, असा फक्त अंदाज बांधता येतो. या देवी संदर्भात लिखीत असं, श्री. सदाशिव गोरक्षकर यांच्या ‘राजभवन्स ऑफ महाराष्ट्र’ या इंग्रजी पुस्तकाव्यतिरिक्त, काहीच नसल्याने, केवळ तर्कांनेच विचार करावा लागतो.

ह्या देवीची पुजा मुख्यत: कोळी समाज करतो. कोळी हे मुंबंईचे आद्य रहिवासी असल्याने ही कोळ्यांची देवता असावी असं म्हटलं तर चुकू नये. या देवीची वार्षिक जत्रा आषाढी पौर्णिमा, अर्थात गुरुपौर्णिमेच्या नंतर लगेचच येणाऱ्या मंगळवारी साजरी होते. पूर्वी मुंबईतले कोळी लोक आपल्या बोटी सजवून त्या बोटीतून जत्रेच्या दिवशी देवीच्या दर्शनाला येत व त्या दिवशी पहिली पूजा करण्याचा मान कोळी लोकांना होता असे राजभवनातील जुने लोक सांगतात. पुढे सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रातून कोळी लोकांचे येणे बंद झाल. या ठिकाणी देवीला, मुख्यत: देवीच्या शेजारी असलेल्या म्हसोबाला बळी अर्पण करायची प्रथा अनेक वर्षे सुरु होती, परंतू ती आता बंद करण्यात आली आहे. जत्रेच्या या दिवशी राजभवनाच्या परिसरात सर्वांना मुक्त प्रवेश असतो. या देवीचे हजारो भक्तगण लांब लांबहून या जत्रेसाठी येतात. चौपाटीवरून राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या तीन बत्ती चौकापासून ते श्रीगुंडी देवीच्या देवळापर्यंत जत्रेला आलेल्या लोकांची प्रचंड गर्दी असते. सकाळीच सुरु झालेली ही एका दिवसाची जत्रा रात्री संपते व नंतरचे उरलेले ३६४ दिवस या देवीची पुजा-अर्चा राजभवनाचे सुरक्षा रक्षक व विविध विभागातील कर्मचारी वर्ग मोठ्या आत्मियतेने करत असतो..!!

राजभवनाच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर डावीकडे खाली समुद्राच्या दिशेने उतरत जाणाऱ्या लहानशा रस्त्याच्या अगदी टोकावर श्री गुंडीचं हे लहानसं देवालंय आहे. समोर तिन्ही बाजूने समुद्र, त्याच्या दगडावर आपटणाऱ्या फेसाळ लाटा, भणाणता वारा, मागे राजभवनाची भव्य वास्तू, टेकडीवरची घनदाट झाडी, सहज दिसणारे मोरांसहितचे विविध पक्षी असं हे अत्यंत रमणीय स्थान आहे.

राजभवनाच्या परिसरात हे देवस्थान असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव एरवी इथे जायला मिळत नाही. सध्याचे राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी राजभवन जनतेसाठी खुले केले आहे. अर्थात त्यासाठी राजभवनच्या संकेतस्थळावरून आगाऊ बुकिंग करावे लागते आणि असं ऑनलाईन बुकिंग केलेलं असल्यास, इतर दिवशी देखील देवीचे दर्शन घेता येऊ शकते. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या मंगळवारी होणाऱ्या या देवीच्या वार्षिक जत्रेच्या दिवशी मात्र ह्या पवित्र आणि रमणीय स्थळाचं दर्शन कुणालाही घेता येतं..!!

-©नितीन साळुंखे

9321811091

संदर्भ-

1. मुंबईचे वर्णन– श्री. गोविंद नारायण माडगांवकर

2. मुंबईचा वृत्तांत- श्री. मोरो विनायक शिंगणे

3. मुंबई नगरी– श्री. न. र. फाटक

4. महाराष्ट्रातील राजभवने- वैभवशाली इतिहासाची साक्षीदार – राजभवनाने प्रकाशित केलेले काॅफी टेबल बुक

5. Rajbhavans in Maharashtra – श्री. सदाशिव गोरक्षकर

6. श्री. उमेश काशीकर – जनसंपर्क अधिकारी, राजभवन

7. बाॅन्बे गॅझेटीयर-१९०४

आभार-

मुंबईच्या भटकंतीसाठी कधीही आवाज दिल्यावर तयार असणारे माझे सोबती छायाचित्रकार हेमंत पवार, श्री. मुसा शेख, श्री. चंदन विचारे. Hemant Pawar Musa Shaikh चंदन विचारे

#पुढचा_लेख_वरळी_कोळीवाड्यातील_’श्री_गोल्फादेवी_वर..!

…आणि गांधी विचारांची महती मला समजत गेली..!!

…आणि गांधी विचारांची महती मला समजत गेली..!!

मी तसा महात्मा गांधींचा विरोधक.

माझ्या वयाच्या एकूण ५४ वर्षांपैकी,

पहिली ४५ वर्ष मी गांधीजींची कुचेष्टा करण्यातच घालवली.

हा आजुबाजूच्या वातावरणाचा परिणाम होता.

त्याचा नकळतचा परिणाम माझ्यावर होऊन

मला गांधी हा उपहासाचाच विषय वाटत होता.

मला वाचनाची आवड असुनही

मी स्वत: गांधींना कधी वाचलेलं नाही.

ज्या समाजात मी राहिलो किंवा राहातो,

त्या समाजात गांधी हा उपहासाचाच विषय होता.

अगदी काल-परवापर्यंत होता.

आणि आजही आहे.

गांधींचं अर्धनंगेपण, त्यांचं टक्कल,

त्यांचा चष्मा, त्यांचा उपवास,

त्यांचं मुसलमानांना आपलं म्हणणं,

त्यांचे सत्याचे प्रयोग, त्यांचा स्वावलंबनाचा आग्रह इत्यादी

माझे मस्करीचेच विषय असायचे.

ह्या नाटकी आणि हट्टी माणसाने आपल्या देशाची वाट लावली

अशी माझी ठान समजूत होती..

पण. पण, गेल्या ८-९ वर्षांपासून

गांधी मला चढत्या क्रमाने समजत आहेत.

त्यांना न वाचताही उमजत आहेत.

मझ्यात हळुवारपणे उतरत जात आहेत.

हा देखील आजच्या वातावरणाचाच परिणाम,

लाखांचे सूट घालण्याच्या आणि

ते ही दिवसातून अनेकवेळा बदलण्याच्या काळात,

देशातील दरिद्री नारायनणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गांधींचं

अर्धनंगत्व मला आपोआप समजत आहे.

गांधींच्या नंग्या फकिरीचं महत्व,

आजच्या श्रीमंती फकिरीच्या

दि’खाऊ’ पार्श्वभुमीवर मला अधिक स्पष्ट होत आहे.

त्यांची नि:पक्ष आणि न्याय बुद्धीला सामावून घेणारं त्यांचं टक्कल,

आजच्या कुटील आणि विकृत मेंदूना लपवणाऱ्या

टकलांपेक्षा मला जास्त आकर्षक वाटतं आहे

आणि त्यांच्या वीतभर छातीसमोर

इंची छाती पोकळ वाटत आहे… .

गांधींच्या चष्म्याआडचे त्यांचे निर्मळ डोळे,

मला आजच्या खुनशी डोळ्यापेक्षा

जास्त तेजस्वी वाटत आहेत.

आणि गांधी मला आपोआप समजत आहेत..

गांधीनी मुसलमानांवर जेवढं प्रेम केलं,

तेवढंच किंवा त्याहीप्क्षा जास्त प्रेम

या देशातील जातीद्वेषाने आणि

उच्च-नीचतेत विखुरलेल्या गेलेल्या समाजावर केलं,

हे मला आजच्या वातावरणात

अधिक उठून दिसत आहे

आणि गांधी मला समजत जात आहेत.

सत्त्तेपासून दूर राहाणारे त्यांचे सत्याचे प्रयोग,

आज सत्तेसाठीच केल्या जाणाऱ्या धडधडीत असत्याच्या प्रयोगातून

अधिक खरे वाटत आहेत

आणि मला गांधी समजत जात आहेत.

.

गांधीजींचा उपवास आणि त्यांचं हट्टीपण,

आजच्या उपहासाच्या आणि कडवेपणाच्या वातावरणात

मला जास्त पवित्र वाटत आहे

आणि गांधी मला आपोआप समजत आहेत..

गांधींना मुळापासून समजण्यासाठीच आजचं वातावरण

आणि ‘वाचा(ळ)’वरणही नियतीने निर्माण केलं आहे

असं मला वाटू लागलंय..!

मला याक्षणी भगवान विष्णूचा मोहिनी अवतार आठवतो.

आजच्या उलटसुलट आणि विखारी विचारांच्या मंथनातून

गांधी विचारांचं अमृत वर येऊ पाहत आहे.

आजचे अविचारी भस्मासुर ह्या अमृतावर

आपलाच स्वार्थी हक्क सांगू पाहत आहेत..

खून झालेल्या मोहनने मोहिनी अवतार घेतलेला आहे

आणि खुनासाठीच आसुसले

आणि सारासार विवेकबुद्धी गमावलेले आजचे भस्मासुरही

त्याचीच नक्कल करू लागलेयत,

त्यांचं भस्म होणार हे निश्चित.

आज नाहीतर उद्या

आज नाहीतर उद्या,

पण निश्चित..!!.

भस्मासुर-मोहिनीची कथा

म्हणूनच आठवली

आणि गांधी विचारांची महती

मला समजत गेली..!

मला समजत गेली..!!

-नितीन साळुंखे

93218 11091

०२. १०. २०१९

एक विनंती..

माझा ब्लाॅग वाचणारे भारताच्या बाहेर कोण कोण आहेत ते मला समजू शकेल का? मला त्यांचा परिचय करुन घ्यायला आवडेल..

देवी_श्री_प्रभादेवी..

(लाईक किंवा कमेंट्स देण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी लेख काळजीपूर्वक वाचावा ही विनंती..)

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा –

देवी_श्री_प्रभादेवी..

मुंबईचा प्रभादेवी भाग आज जगभरात प्रसिद्ध आहे, तो इथल्या श्री सिद्धिविनायकामुळे. अलम जगातून या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी त्याचे भक्तगण येत असतात..पण एक गंमत आहे, हा श्री सिद्धिविनायक कितीही प्रसिद्ध झालेला असो वा अगदी परदेशातही प्रतिष्ठापित झालेला असो, तो ओळखला जातो, तो ‘प्रभादेवी’चा सिद्धिविनायक म्हणूनच. आपल्या देशातील बहुसंख्य देवता विविध नांवाने जरी ओळखल्या जात असल्या तरी, ती आहेत शंकर-पार्वतीचीच रुपं. म्हणजे एका अर्थाने प्रभादेवी ही श्री सिद्धिविनायकाची आईच म्हणायला हरकत नाही आणि उगाच नाही त्याला ‘प्रभादेवी’चा सिद्धिविनायक म्हणत..! श्री प्रभादेवीचं देऊळही आहे श्री सिद्धिविनायकाच्या मंदीरापासून अगदी हाकेच्या अंतरावर..!

श्री प्रभादेवीचा प्राचीन इतिहास मोठा रंजक आहे. प्रभादेवीचं मंदीर आता जिथं पाहातो, ते हिचं मूळ ठिकाण नव्हे. श्री प्रभादेवीचं मूळ मंदीर होतं मुंबईच्या माहिमात. श्री प्रभादेवीच हे प्राचीन मंदिर मुंबईच्या महिमात नेमकं कुठं आणि कुणी बांधलं ह्याचा शोध घेताना, दोन वेगळ्या प्रकारची माहिती मिळते. पहिली माहिती मिळते ती ‘महिकावतीच्या बखरी’त. महिकावती हे महिमच एक नांव आहे. सदर बखर सन १४४८ ते सन १५७८ या दरम्यान लिहिली गेलेली असून, यात (शके १०६२) सन ११४० ते साधारणत: सन १३४० पर्यंतच्या अदमासे २०० वर्षांच्या दरम्यान बहुतकरून केळवे-माहीम आणि मुंबई माहीम या परिसरात घडलेल्या राजकीय घटनांचा उल्लेख आहे. यातील घटना सन ११४० पासून चालुक्य कुळातला राजा प्रताप बिंबाच्या मुंबईतल्या आगमनापासून सुरु होतात आणि सन १३४० च्या आसपास कुठेतरी संपतात. या दोनशे वर्षांच्या काळात मुंबईवर राज्य केलेल्या राजांचा इतिहास सांगणारी ही बखर आहे.

‘महिकावातीची बखर’ सांगते की, श्री प्रभावती ही मुंबईचा चालुक्य कुलाचा राजा प्रताप बिंबाची देवता. चालुक्यांची कुलदेवता श्री शाकंभरी, जिला प्रभावती असंही नांव आहे. राजा प्रताप बिंबाने त्याची कोकण प्रांतातली मूळ राजधानी केळवे-माहिम हातची गेल्यानंतर, शके १०६२ मधे (सन ११४० च्या दरम्यान) मुंबईतील माहिम येथे नविन राजधानी केली. कोणत्याही नविन गोष्टीची सुरुवात कुलदेवतेच्या स्थापनेने करायची प्रथा आपण आजही पाळतो. तद्वत, प्रताप बिंबाने माहिम येथे राजधानी स्थापन करताना, आपली कुलदेवता श्री प्रभावती हिचं देऊळ स्थापन केलं असावं, बखरीत असं कुठेही म्हटलेलं नाही, मात्र असा तर्क केल्यास तो चुकीचा ठरणार नाही. हा तर्क मला अधिक संयुक्तिक वाटतो, कारण आताच्या श्री प्रभादेवीच्या मंदीरात तिच्या डाव्या-उजव्या हाताला असणाऱ्या श्री कालिका आणि श्री चंडिका देवींच्या मूर्ती..! श्री कालिका देवी ही राजा प्रताप बिंबाचे सरचिटणिस गंभिरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता, तर श्री प्रभादेवीच्या डाव्या हाताला असलेली श्री चंडीका देवी, राजा प्रताप बिंबाचे पुरोहीत असलेल्या हेमाडपंतांची कुलदेवता असल्याचा उल्लेख ‘महिकावतीच्या बखरी’त स्पष्टपणे आहे. पुरोहित हेमाडपंत आणि गंभिरराव सूर्यवंशी राजा प्रताप बिम्बासोबत माहिमला आल्याची नोंद बखरीत आहे. या गंभीरराव सूर्यवंशीना वरळी गाव इनामात दिल्याची नोंदही बखरीत आहे. राजा प्रताप बिंबाने त्याच्या कुलदेवतेसोबत, त्याच्या या दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या कुलदेवतांना बरोबरीचं स्थान देऊन त्यांचा सन्मान केला असावा किंवा या कुलदेवता असलेल्या समाजाला आपल्या राज्यात बरोबरीचं स्थान आहे, असा संकेत दिला असावा असं वाटण्यास जागा आहे. या देवता आजही श्री प्रभादेवीच्या मंदिरात तिच्या सोबत आहेत. यावरून श्री प्रभादेवीच मूळ माहीम येथील मंदिर राजा प्रताप बिम्बाने आजपासून सुमारे ८७९ वर्षांपूर्वी स्थापन केलं असावं, असा तर्क मांडल्यास तो चुकीचा ठरू नये.

श्री प्रभादेवीच्या मंदिराच्या अनुषंगाने दुसरी माहिती मिळते, ती श्री. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के. रघुनाथजी या पाठारे प्रभू समाजातील व्युत्पन्न लेखकाने इसवी सन १८९०-९५ सालात लिहिलेल्या ‘The Hindu Temples of Bombay’ ह्या पुस्तकात. ह्या पुस्तकात श्री प्रभादेवीचं मंदीर शके १२१७, म्हणजे इसवी सन १२९५ मध्ये माहिममधील ‘कोटवाडी’ इथे उभारल्याचा उल्लेख श्री. के. रघुनाथजींनी केला आहे. त्याच वर्षीच्या पौष पौर्णिमेला या देवीची प्रतिष्ठापना पाठारे प्रभू समाजाचे उपाध्ये हेमाद्रीपंतांच्या हस्ते झाल्याचंही ह्या पुस्तकात म्हटलेलं आहे. थोडक्यात प्रभादेवी मंदिराची स्थापना महिमातील कोटवाडी येथे पठारे प्रभू समाजाने केली असा त्याचा अर्थ. हा अर्थ बरोबर आहे असं गृहीत धरल्यास, आजच्या श्री प्रभादेवीच्या मंदीराचा इतिहास आजपासून सुमारे ७२५ हून अधिक वर्ष मागे जातो.

श्री प्रभादेवीचं हे मंदीर कुठे बांधलं याचाही उल्लेख बखरीत नाही, तरी ते माहिमातच असावं, असं म्हणता येईल. कारण प्रताप बिंबाची राजधानी माहिम होती व कुलदेवतेचं मंदीर राजधामा नजिकच असणार, हे नक्की. महिकावतीच्या बखरीत याचा उल्लेख नाही, मात्र के. रघुनाथजींच्या पुस्तकात मात्र हे मंदीर माहिमच्या लेडी जमशेटजी मार्गावरील ‘कोटवाडी’त होतं असा उल्लेख आहे. ही कोटवाडी माहिममध्ये नेमकी कुठे आहे आणि असल्यास तिचं आताचं नांव काय, याचा शोध घेताना, ती माहिममध्येच आणि जुन्या नांवानेच अद्यापही अस्तित्वात असल्याचा शोध लागला. नेमकं सांगायचं म्हणजे, माटुंगा पश्चिमेस असलेल्या लेडी जमशेटजी मार्गावरील सिटी लाईट सिनेमावरून सेना भवनच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला येणारी दुसरी लेन म्हणजे ‘बाल गेविंददास रोड’. ह्या रोडच्या तोंडावरच असलेल्या आश्रय हाटेलला लागून असलेला ‘बाल गोविंददास रोड पुढे रुपारेल कालेजच्या सर्कलला जातो. हा रस्ता ह्या सर्कलला जिथे मिळतो, तिथेच डाव्या हाताला ‘यशवंत नाट्यगृह’ आहे आणि डाव्या हाताला जी वस्ती आहे, तिच के. रघुनाथजींच्या पुस्तकात उल्लेख केलेली ‘कोटवाडी’. इथे आता काही इमारती, टाॅवर, बैठी वस्ती, महानगरपालिकेची शाळा वैगेरे आहेत. के. रघुनाथजींच्या पुस्तकात या ठिकाणाबद्दल दिलेली माहिती, मधल्या सात-आठशे वर्षात झालेले बदल वगळल्यास, या ठिकाणाशी तंतोतंत जुळते.

पाठारे प्रभू समाजातील काही जाणकारांशी चर्चा केली असता, त्या पैकी काहीजण, आताचं शितला देवीचं मंदीर पूर्वी प्रभादेवीचं होतं असं सागतात. तो धागा पकडून शोध घेतला असता, जुन्या पुस्तकात शितालादेवीचा उल्लेख आढळला नाही. के. रघुनाथजींच्या पुस्तकातही शितलादेवी नाही, मात्र शितलादेवी ज्या मंदिरात आहे, त्या मंदिराचा ‘महादेवाचं मंदिर’ म्हणून उल्लेख आहे व त्यात शित्लादेवीची प्रतिमा आहे असं म्हटलेलं आहे. शक्यता अशी आहे की, मुळात हे महादेवच मंदिर असाव आणि नंतर शितलादेवीच्या नांवाने प्रसिद्ध झालेलं असाव. ती शक्यता नाकारता येत नाही, परंतू लिखित काही मला सापडलं नसल्यामुळे स्वीकारताही येत नाही. कदाचित असंही असू शकेल की, प्रताप बिंबाच्या काळात बांधलेलं मूळ मंदीर आताच्या शितला देवीच्या मंदीराच्या जागी असावं आणि बिंब यादवाच्या काळात त्याच स्थलांतर कोटवाडीत केलं असावं. परंतु ठोस अशी काही माहिती मला उपलब्ध न झाल्याने, तूर्तास हे मंदीर माहीमच्या कोटवाडी येथे होतं, हे समजणं योग्य..!

माहीमच्या कोटवाडीच्या मंदिरात श्री प्रभादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सन १२९४-९५ मध्ये झाल्यावर पुढची दोनेकशे वर्ष शांतते नंतर मुसलमान आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांची दृष्टी मुंबई आणि परिसरातल्या देवस्थानांवर गेली आणि ती देवस्थान उध्वस्त करण्याची मोहीम त्यांनी सुरु केली. परधर्म आक्रमकांच्या याच मोहिमेत माहीमच्या कोट वाडीतल श्री प्रभादेवीचं मंदीर जमिनदोस्त करण्यात आल्याचा उल्लेख के, रघुनाथजींच्या पुस्तकात आहे. मंदिर उध्वस्त होणार याची कुणकुण लागलेल्या या देवीचे पूजक असलेल्या पाठारे प्रभु समाजाच्या त्या काळच्या लोकांनी, देवीच्या मुर्तीची परकीय आक्रमकांकडून विटंबना होऊ नये म्हणून ती मुर्ती एक विहिरीत दडवून ठेवली. हा काळ होता साधारणत: सन १५१० ते १५२० च्या दरम्यानचा. पुढे जवळपास २०० वर्षांपेक्षा जास्त काळ ही मुर्ती विहिरीच्या तळाशी पडून राहिली. पुढे जेंव्हा धर्मांध आक्रमकांचा जोर ओसरला, तेंव्हा पाठारे प्रभू समाजाच्या ज्या व्यक्तीच्या बागेतील विहिरीत ती मूर्ती दडवली होती, त्याच्या स्वप्नात जाऊन देवीने तिला वर काढायची आज्ञा केली. त्यानुसार ती मुर्ती विहिरीतून काढून तिची विक्रम संवत १७७१, म्हणजे इसवी सन १७१५ सालात आताच्या मंदीरात तिची प्रतिष्ठापना केलेली आहे. असा शिलालेख प्रभादेवीच्या मंदिरात पाहायला मिळतो.

प्रभादेवीच्या आताच्या मंदीरालाही ३०० पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली आहेत. या मंदीरातील देवीची मुर्ती मात्र कमीतकमी ७२५ ते जास्तीत जास्त ८७९ वर्षांपूर्वीची आहे असं खात्रीपूर्वक म्हणता येतं.

आताचं मंदीर दक्षिणोत्तर असून, मंदीरात प्रवेश करताच अगदी उजव्या हाताला श्री प्रभादेवीचं गर्भगृह आहे. श्री प्रभादेवीच्या उजव्या हाताला श्री कालिका देवीची मुर्ती आहे, तर प्रभादेवीच्या डाव्या हाताला श्री चंडीका देवीची मुर्ती आहे. श्री प्रभावती, श्री चंडीका आणि श्री कालिका या मुख्य देवतांव्यतिरिक्त या मंदीरात श्री सर्वेश्वर आणि श्री लक्ष्मी नारायण यांचीही स्वतंत्र गर्भगृहं आहेत. मंदीराच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला श्री शितलादेवी, श्री हनुमान व श्री खोकलादेवीच्या मुर्ती आहेत. मंदीरात दोन दिपमाळाही आहेत. मंदीरात असलेला प्राचीन नंदी काही वर्षांपूर्वी मुंबईच्या प्रिन्स आफ वेल्स म्युझियममधे दिलेला असून, आताचा नंदी नव्याने स्थापन करण्यात आल्याची माहिती मंदीराचे ट्रस्टी श्री मिलिंद वाझकर व श्रीमती उज्वला आगासकर यांनी दिली. श्री प्रभादेवीच्या मंदीराचं व्यवस्थापन ‘दी किर्तीकर फॅमिली प्रभादेवी चॅरिटेबल इन्स्टीट्यूशन’ या संस्थेकडे आहे.

श्री प्रभादेवीची वार्षिक जत्रा पौष पौर्णिमेला भरते. आपल्या गांवातील कोणत्याही जत्रेसारखी ही जत्रा असते. मंदीरावर आकर्षक रोषणाई केली जाते. विविध दुकानं, खाद्यपेयांचे स्टाॅल्स लागतात. उत्साही भाविक मोठ्या भक्ती भावाने लांब लांबहून या जत्रेसाठी येतात. जत्रेचा कालावधी १० दिवसांचा असून, जत्रेची सुरुवात पौष पौर्णिमा म्हणजेच शाकंभरी पैर्णिमेला होते. या देवीचं अन्य नांव श्री शाकंभरी असंही आहे. या मंदीराची इतर माहिती मंदीराच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कमीत कमी ७२५ ते जास्तीत जास्त ८५० वर्षाॅचा मुंबईचा, मुंबईवर राज्य करणाऱ्या राजघराण्यांचा, त्यांच्या सोबत आलेल्या आणि मुंबई समृद्ध बनवण्याचा पाया घातलेल्या अनेक समाजांचा, लढायांचा, परकीय आक्रमकांचा इतिहास उरात बाळगून असलेल्या या आई प्रभादेवीचं मंदीर नेमकं कुठं आहे, हे आज अनेक मुंबईकरांना सांगता येत नाही. मलाही माहित नव्हतं. परवाच म्हटलं, की श्री प्रभादेवीवर लिखाण करण्यापूर्वी जाऊन एकदा मंदीरात जाऊन तिचं दर्शन घेऊन येऊ म्हणून त्या परिसरात पोहोचलो आणि अनेकांना विचारत विचारत मंदिरात पोहोचलो. इथे एक देऊळ आहे, पण ते कोणाच हे त्याच परिसरातल्या अनेकांना सांगता येत नव्हत. पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोड स्टेशनला ‘प्रभादेवी’ नांव दिल्याच्या किंवा देणार असल्याच्या बातम्या आपण आनंदाने वाचतो, ते नांव द्यायलाच हवं असं आपल्याला वाटतंही. पण का, ते मात्र नाही सांगता येत.

आई प्रभादेवीच्या मंदिरात गेल्यावर माझ्या वाचनात आलेला मुंबईचा आणि मंदिराचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. हा अनुभव आपणही घेऊ शकता. मुंबईच्या जडण-घड्निशी जवळचा संबंध असलेला इतिहास उरात बाळगून असलेलं एक पुरातन मंदीर आणि परकियांच्या आक्रमणाला पुरून उरलेल्या आई श्री प्रभादेवीचं दर्शन सर्वांनी घ्यायलाच हवं..!!

-नितीन साळुंखे

9321811091

संदर्भ-

1. महिकावतीची बखर – श्री. वि. का. राजवाडे

2. मुंबईचे वर्णन– श्री. गोविंद नारायण मडगांवकर

3. मुंबईतील आद्य जागृत शक्तिपीठे –श्री. भालचंद्र आकलेकर

4. Bombay Gazetteer of Bombay City and Island- Vol. I, II, III-1906

5. Hindu Temples in Bombay – Shri. k. Raghunathji 1890-95.- Published in 1900.

6. श्री प्रभादेवी मंदीराचं संकेतस्थळ

7. श्रीमती उज्वला आगासकर – आर्किटेक्ट आणि छायाचित्र पत्रकार

8. श्री. मिलिंद वाझकर, विश्वस्त- दी किर्तीकर फॅमिली प्रभादेवी चॅरिटेबल इन्स्टीट्यूशन

9. The Rise of Bombay- A Retrospect – S. M. Edwardes 1902.

#पुढचा_लेख_श्रीगुंडीदेवी