मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की,…

मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की,…

काल ‘महाविकास आघाडी’चे प्रमुख आणि महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून, श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर संपन्न झालेला शपथविधी सोहळा मी पाहिला. आजवरच्या आयुष्यात मी पाहिलेला हा पहिलाच शपथविधी सोहळा.

माझं दादर, शिवाजी पार्क परिसरात जाणं तसं नेहेमीचंच. माझ्या संतोष, अर्थात, बाळा माने या मित्राचं कार्यालय शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी परिघावर आहे. मित्राला त्याच्या कामात मी मदत करत असल्याने, तिथे माझं रोजच जाणं-येणं असत. त्यांच्या ऑफिसात जायचं तर शिवाजी पार्क टाळताच येत नाही. दादर स्टेशनला उतरलं की, पश्चिमेला बाहेर पडून ‘सुविधा’ समोरच्या ‘लीना बार अँड रेस्टॉरंट’ अशी पाटी असलेल्या चिंचोळ्या बोळात शिरायचं, बारच्या आधारानेच नांदत असलेल्या चहावाल्याकडे कटिंग चहा मारायचा, बाहेर येऊन छबिलदासवरून टिळक पूल ओलांडायचा आणि प्लाझाचा फुटपाथ पकडून रमत-गमत शिवाजी पार्क परिसरात शिरायचं आणि पुढे शिवाजी पार्कला उजवी घालून मित्राच्या ऑफिसात जायचं. संध्याकाळी हाच क्रम उलट. कधीतरी रस्त्यातल्या ‘आयडियल’ मध्ये किंवा शिवाजी मंदिरातील ‘मॅजेस्टिक’मध्ये डोकावायचं. खिश्याने परवानगी दिली तर एखाद दुसरं पुस्तक खरेदी करायचं, हा माझा जवळपास रोजचाच परिपाठ. त्यामुळे कालचा दिवसही माझ्यासाठी काही वेगळा नव्हता.

पण, कालचा दिवस शिवाजीपार्क परिसरासाठी मात्र वेगळा होता. काळ शिवसेनेच्या नेतृत्वाखाली, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचं सरकार स्थानापन्न होणार होत आणि ह्या सरकारचे प्रमुख म्हणून श्री. उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ ग्रहण करणार होते. ह्या सोहळ्याचं उत्साह सकाळपासूनच दिसून येत होता. पार दादर स्टेशनपासूनच तीनही पक्षांचे झेंडे रस्त्याच्या दोन्ही बाजूने फडकत होते. तसा एरवी हा परिसर, काही विशेष दिवस असला की, भगव्या रंगात न्हालेला असतो, पण काल मात्र त्या भगव्यासोबत इतर दोन्ही पक्षांचे, तिरंग्याशी साम्य असणारे झेंडेही विपुलतेने दिसत होते. त्यातही काँग्रेस पक्षाचे झेंड्यांचा प्रमाण अंमळ जास्तच होतं. त्यामुळे भगवा थोडा फिकुटलेलाच दिसत होता (पण हे चांगलं लक्षण आहे, असं मी समजतो. नाहीतरी भगवा हल्ली जास्त गडद होत रक्तवर्णी होण्याच्या दिशेने निघाला होता.).

शिवाजी पार्कच्या दिशेने लोकांची गर्दी निघाली होती. त्यातही कडक खादीचे सफेत कपडे आणि गांधी टोप्यांचं प्रमाण जास्तच होत. आपल्यासाख्याच साध्या कपड्यातले, मानेभोवती भगवे गमचे ओढलेले, साधे सुधे दिसणारे शिवसैनिकही त्यात होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा असाही काही वेष नसतो. ते त्यांच्या काहीश्या आक्रमक देहबोलीवरूनच ओळखावे लागतात. बहुतेकांची सावल्या ते काळ्या रंगाची भक्कम शरीरयष्टी, पांढरा शर्ट आणि सावध डोळे आणि ‘आम्ही सत्ता राबवण्यासाठीच जन्माला आलो आहोत’, असा चेहेऱ्यावरचा भाव, ही त्यांची मुख्य वैशीष्ट्ये. गोरे-गोमटे आणि कातडी बचाव मध्यमवर्गीय फार तुरळक दिसत होते. आणि जे दिसत होते, ते, ‘आपला काय बुवा याच्याशी संबंध नाही’, असा भाव चेहेऱ्यावर असणारे. तर, काल सकाळपासून गांधी टोपीतला लिननचा पांढरा वेष, भगवे गमचे आणि भक्कम शरीरयष्टी शिवाजी पार्कच्या दिशेने जाताना दिसत होत्या.

वातावरणात उत्साह होता. वातावरणातला उत्साह, नाही म्हटलं तरी, आपल्या तना – मनातही भरून येतो, तसा तो माझ्यातही भरून आला. मग म्हटलं, इतक्या जवळ आहोतच तर जाऊ शपथविधीला..! एक नवीन राजकीय प्रयोग महाराष्ट्रात होऊ पाहतोय, तर त्या त्या प्रयोगाचा आपण साक्षीदार व्हायला हरकत नाही, असा विचार करून मी शपथविधी सोहळ्याला जायचं ठरवलं. त्यासाठी मला वाटही वाकडी करावी लागणार नव्हती आणि कार्यक्रमही माझ्या वेळेच्या गणितात बसत होता.

संध्याकाळी ५.च्या सुमारास मी शिवाजी पार्कवर पोहोचलो. मित्र शिवाजी पार्क जिमखान्याचा सन्माननीय सदस्य असल्याने, जिमखान्याच्या गच्चीवर आमच्या बसण्याची ( म्हणजे शपथविधी सोहळा पाहण्यासाठी बसण्याची..!) व्यवस्था केली होती. आमची बसण्याची जागा ते समोरचं भव्य व्यासपीठ, यामध्ये दृष्टीला कोणताही अडथळा नव्हता. ५.-५.३० च्या दरम्यान मैदान फारसं भरलेलं नव्हतं. जिमखान्यातही जेमतेम पाच-सहा माणसं दिसत होती. जस जसा वेळ जाऊ लागला, तस तशी गर्दी वाढू लागली. मैदान भरू लागलं आणि जिमखानाही भरू लागला. नंदेश उमपने व्यासपीठाचा ताबा घेतला आणि हळूहळू वातावरणात रंग भरू लागला. महाराष्ट्र गीत सुरु झालं आणि वातावरणात एकदम उत्साह आला. मैदानात लोक आता झुंडीने शिरत होते. पाहता पाहता मैदान पूर्ण भरू लागलं. व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे सुरु होते. लोक घोषणा देत होते. एरवी लोकांना विभागणारे तिन्ही पक्षांचे झेंडे, एकमेकांच्या शेजाराने आणि साथीने फडकताना पाहून आनंद वाटत होता. तीच गत जमलेल्या गर्दीचीही होती. गर्दी ‘विविधता में एकता’वाली ‘भारतीय’ वाटत होती..!

विविध पक्षांचे नेते यायला सुरुवात झाली. पहिले श्री. अजित पवार आले. महाविकास आघाडीचे शिल्पकार श्री. शरद पवार आले. त्यांच्या नावाने स्वागताच्या घोषण्या उठल्या. काँग्रेसचे नेते आले. त्यांच्याही नावानी घोषणा उठल्या. सर्वात दमदार एन्ट्री झाली ती श्री. राज ठाकरेंची. श्री. राज ठाकरे आपल्या आईसमवेत येताना दिसले, आणि अक्ख्या मैदानाने हात वर करून त्यांचं स्वागत केलं. घोषणा देऊन त्यांना अभिवादन केलं. राज ठाकरे सर्वांमध्ये किती लोकप्रिय आहेत, हे पुन्हा एकदा दिसलं. राज ठाकरें एवढं जोशात स्वागत त्याआधी कुणाचाही झालं नाही आणि नंतर फक्त श्री. उद्धव ठाकरे यांचं झालं. पुढे बरोबर ६. ३५ वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी व्यासपीठावर आले. राष्ट्रगीत वाजलं. आता उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. श्री. उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले आणि लगेचच काही वेळात तुडुंब भरलेलं शिवाजी पार्क मैदान जे शब्द कानात साठवण्यासाठी आतुरलं होतं, ते शब्द कानी पडले,
‘मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या आई-वडिलांना स्मरून शपथ घेतो की…..’ !
हे शब्द कानी पडले आणि शिवाजी पार्क घोषणांनी दुमदुमून गेलं..!

ज्या शिवाजी पार्क जिमखान्यात बसून मी हा शपथविधी सोहळा पहिला, तो शिवाजी पार्क जिमखाना हा तसा उच्च मध्यमवर्गीयांचा इलाखा. उच्च शिक्षित, विचारी, सधन लोकांची हि वस्ती. श्री. उद्धव ठाकरे आणि इतर काही मंत्र्यांचा शपथविधी झाला आणि जिमखान्यात शपथविधी सोहळ्यासाठी जमलेल्या लोकांच्या चर्चा रंगल्या. चर्चेचा सूर, ‘जे झालं ते योग्यच झालं’ असा होता. विशेषतः: काहीच दिवसांपूर्वी उत्तररात्री रंगलेल्या चोरट्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर, आजचा सोहळा होणं अत्यंत आवश्यक होतं, असंही लोक म्हणत होते. शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होऊन बाहेर पडत असलेल्या सर्वसामान्य लोकांचीही काहीशी अशीच भावना होती.

तसा मी काही शिवसैनिक नाही. शिवसेनेचा कधी मतदारही नव्हतो. पण मला शिवसेनेची माणसं माझी वाटतात. त्यांचा अकृत्रिम जिव्हाळा आणि रांगडेपणा मला आवडतो. काँग्रेस-राष्ट्रवादी मला कधी फारशी पटली नाही आणि त्यांच्या जवळ जावं असंही कधी वाटलं नाही. मी भाजपच्या जवळचा, पण वाजपेयींच्या भाजपच्या. आताच्या भाजपचा आणि समाजाला संभ्रमात टाकणाऱ्या भाजप नीतीचा मी ठाम विरोधकच. त्यात भाजपचे आताचे कार्यकर्ते ते नेते, असे, एखाद दुसरा अपवाद सोडल्यास, सर्वच ‘रंग आमचा वेगळा’ पद्धतीने वागणारे. रिफाईंड तेलासारखे. आमच्यासारख्या पाण्यात न मिसळणारे आणि म्हणून मला कधीही माझे न वाटणारे.

मी जरी शिवसेनेच्या जवळचा नसलो तरी, बाळासाहेब ठाकरेंच्या जहाल शिवसेनेचं रूपांतर संयमी शिवसेनेत करणारे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री माणूस म्हणून मला आवडतात. त्यांचं शांत, संयमी आणि संयत बोलणार व्यक्तिमत्व मला आवडत. शिवाय त्यांचं कलावंत असणंही मला आवडत. राजकारणी माणसात असलेला ‘मी’पणा, उद्धटपणा, खोटं बोलण्याची असाधारण क्षमता मला श्री. उद्धव ठाकरेंमध्ये कधी आढळली नाही. किंबहुना मला कधी ते राजकारणी वाटलेच नाहीत.

अश्या ह्या शांत, संयमी, नम्र आणि कुटुंबवत्सल वाटणाऱ्या श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याकडे महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा आली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ‘महाविकास आघाडीच’ सरकार त्यांना चालवायचं आहे. वाटेत धोके, अडचणी अनेक आहेत, पण त्यातून ते मार्ग काढून पुढील पांच वर्ष सरकार चालवण्यात यशस्वी होवोत, यासाठी त्यांना व त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा..!!

-नितीन साळुंखे
9321811091
29.11.2019

Photo Credit my friend Ashish Rane, principal photographer-mid-day and Sudhir More

photographer-mid-day and Sudhir More

यापुढे केवळ बुद्धिनिष्ठ विचारच आपल्याला तारू शकेल..

यापुढे केवळ बुद्धिनिष्ठ विचारच आपल्याला तारू शकेल..

महाराष्ट्र विधानसभेची यंदाची निवडणूक फार गाजली. निकालानंतर सर्वच पक्ष सत्तास्थापनेसाठी ज्या कोलांटउड्या मारण्यात दंग झाले होते, त्या पाहून सुरुवातीला मनोरंजन, नांतर उत्कंठा, नंतर कंटाळा आणि शेवटी शेवटी तर वैताग येऊ लागला होता. ‘ह्या पक्षांचं जे काही चालू होत, ते फक्त सत्तेसाठी होत आणि ज्या जनतेच्या आशा आकांक्षांवर आणि मतावर हे सर्वजण निवडून आले आहेत, त्या जनतेशी ह्यांचा काहीच संबंध नाही;किंबहुना कधीही नव्हता, हा सर्वात महत्वाचा धडा मी ह्या निवडणुकीतून शिकलो. अर्थात हे काही नवीन नाही, पण उम्मीद पे दुनिया कायम है ह्या उक्तीनुसार दार निवडुकानानंतर काहीतरी बदलेल अशी अशा धरून मतदान केलं जात. नंतरचा ह्या राजकीय पक्षांचा कारभार पाहून मात्र दरवेळेस ते वाया गेलं असंच वाटत. ह्या निवडणुकीनंतर तसंच वाटलं. पण त्याचसोबत ह्या निवडणुकीने जनमानसावर एक नकळतच परिणाम केला आहे, ज्याचे पडसाद आपल्याला येत्या काळात जाणवत राहणार आहेत आणि तो म्हणजे, ह्या निवणुकीने मतदारांची ‘भविष्यात चांगलं काही होईल’ ही उमेद मात्र पार घालवून टाकली आहे. आपल्या देशातले एकूणच राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा, संविधानिक पदं ह्याविषयी कमालीची उदासीनता जशी माझ्या मनात भरून राहिली आहे, तशीच आपल्याही मनात भरून राहिली असावी, अशी माझी खात्री आहे.

ह्या निवडणुकीने शिकवलेला दुसरा धडा म्हणजे, प्रत्येक राजकीय पक्षाचे तळाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाची बाजू घेऊन एकमेकांच्या उरावर बसले होते. अगदी एकमेकांची आयमाय उद्गारात होते. हे ही प्रत्येक निवडणुकीतून होत आलय. पण सोशल मिडियाच्या आणि साक्षरतेच्या कुपोषित प्रसारामुळे, ह्या प्रकारची पातळी बिभित्स वाटावी एवढ्या निम्न पातळीवर घसरली होती. तिकडे राजकीयपक्ष आणि त्यांचे शीरसस्थ नेतेही ह्यात मागे नव्हते. कार्यकतें एकमेकांचे गळे दाबण्यासाठी एकमेकांच्या उरावर बसत होते, तर राजकीय पक्ष भाद्रपदीय श्वानांसारखे जुगण्यासाठी, हाच काय तो फरक. पातळी दोघांनीही सोडली होती. राजकीय क्षेत्रातून किमान सभ्यता आता पार तडीपार झालेली आहे, हे पाहून जनतेत राजकीय उदासीनता आणखी वाढीला लागलेली दिसत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी लोकशाही व्यवस्थेची केलेला हा विकृत कुंटणखाना पाहून अनेक जणांनी पुढच्या निवडणुकांतून ‘नोटा’ पर्याय वापरण्याची भाषा केली आहे, ते ह्या व्यवस्थेविषयी वाढत चाललेल्या उदासीनतेचंच द्योतक आहे.

मी आता पर्यंत बोलायच टाळत होतो, पण आता मात्र बोलावत लागेल अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात वाढीला लागलेली जातीयता. ह्या निवडणुकीच्या आणि निवडणुयक निकालानंतर ती स्पष्टपणे समोर आली. अगदी निर्लज्ज उघड्यानागड्यापणाने समोर आली. आता हे कुणीही कबूल करणार नाही, पण माझं निरीक्षणही चुकीचं आहे, असं मी म्हणणार नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी पुन्हा येणार नाहीत, हे स्पष्ट होताच सोशल मिडीयावर श्री. फडणवीसांच्या जातीव्यतिरीक्त बहुतेक इतर जातींनी घातलेला आनंदगोधंळ आणि श्री. फडणवीसांच्या ज्ञातिबंधुंपैकी बहुतेकांनी व्यक्त केलेलं अतीव दु:ख, मी पाहत होतो. ह्या नंतर काही काळातच, अत्यंत नाट्यमय रीतीने पहाटेच्या अंधारात श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच, तोच विकृत आनंद आणि तेवढंच विकृत दु:ख सोशल मिडियावर उलट क्रमाने व्यक्त होताना दिसलं. श्री. देवेंद्र फडणवीस हे केवळ ब्राहमण असल्याने त्यांच्यावर अन्याय कसा होतोय आणि ते ब्राह्मण असल्याने, जे होतंय ते योग्यच होतंय, असं उघड आणि आडून सुचवणाऱ्या अनेक पोस्ट लेख ह्या काळात व्हाट्सअँप आणि फेसबुकवर वाचायला मिळाल्या. श्री. फडणवीस ह्यांच्या जागी इतर कुठल्या जातीची व्यक्ती असती तरी, तीव्रता कमी-जास्त झाली असती, मात्र हेच घडलं असत, ह्या विषयी माझ्या मनात कोणतीही अनुभवसिद्ध शंका नाही. ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासारख्या कोणतीही जात न मानणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत क्लेशदायक होत्या. एकविसाव्या शतकातही आपण राज्याच्या प्रमुखपदी येऊ पाहणाऱ्या व्यक्तीच कर्तृत्व आणि चारित्र्य न पाहता, तो केवळ माझ्या जातीचा आहे की नाही, हे पाहून आनंद किंवा दु:ख व्यक्त करणार असू, तर मग आपल्या समाजाचं आणि त्याचा अविभाज्य हिस्सा होणार असलेल्या भावी पिढ्यांचं भवितव्य अत्यंत अवघड आहे, असं वाटून माझं मन अधिक उदास झालं..! आपलं काहीही कर्तव्य नसताना केवळ योगायोगाने आपल्याला लाभलेल्या जन्मजातीचा अभिमान, दुराभिमान इत्यादी आणि तेवढाच दुसऱ्या जातींबद्दलचा त्वेष-द्वेष जे काही असेल ते आपापल्या मनातून त्वरित त्यागायला हवं

मित्रानो, वरीलपैकी कोणतीही गोष्ट आपल्याला परवडणारी नाहीय. धोक्यात येऊ पाहणाऱ्या लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा दृढ होण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने माझा पक्ष, माझा झेंडा, माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा नेता, भगवा-हिरवा-निळा झेंडा ह्यापलीकडे जाऊन केवळ आणि केवळ संपूर्ण समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. असं न केल्यास, आपण एका धोक्याच्या वळणावर उभे आहोत, हे समजावं. शक्य आहे की, काही शक्ती आपला लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडावा, आपण आपापल्या जाती-धर्मांत विभागले जावेत यासाठी कार्यरत असतील. त्या देशांतर्गत असतील, तसेच बाहेरच्याही असू शक्तील. आपण ह्या सर्वाना धर्मनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष आणि पक्षनिरपेक्ष विचार करून शहाणपणाने शह द्यायला हवा. जात-धर्म-पक्ष-रंग पक्ष-रंग ह्यापैकी कुणाच्याही प्रेमात पडून चालणार नाही, तर ह्या सर्व शुल्लक गोष्टींचा केवळ बुद्धिनिष्ठ विचार करून पुढे जायला हवं. तर आणि तरच आपण ह्या उदासीनतेवर मात करू शकू. अन्यथा आपल्या समाजाचं भविष्य आणि भवितव्य, दोन्ही संकटात आहेत असं समजावं..

तसं होता कामा नये..!

-नितीन साळुंखे

9321811091

28.11.2019

भारतीय संविधान चिरायू होवो..!

आज ‘संविधान दिवस’..!

काही काळापूर्वी महाराष्ट्राचे उप- मुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची आणि आताच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यासाठी राज्यपालांकडे जाणार असल्याची बातमी ऐकली. गेला माहिनाभर, संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपून, संविधानिक मूल्यांचे आचरण करण्याची नाटकं करणाऱ्या, परंतु, प्रत्यक्षात संविधानिक मूल्यांचा पालापाचोळा करून त्यावर थयथया नाचू पाहणाऱ्या राजकीय पक्षांचा आणि ज्यांच्यावर संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे अशा गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या आणि संविधानिक पदावर विराजमान असलेल्या काळ्या टोप्यांचा आणि पाताळयंत्री डोक्यांचा जे काही निर्लज्ज नर्तन सुरू होत, त्याला ह्या राजीनाम्या प्रकरणाने वेगळं वळण मिळालं आणि सामान्य माणसांच्या इच्छा आकांक्षांची ताकद असलेल्या संविधानाची, त्या शक्तींना असलेली जरब पुन्हा एकदा आपल्या समोर आली.

संविधानावरून लोकांचा विश्वास उडावा आणि संविधानाच्या आधारावर उभ्या असलेल्या लोकशाही समाजव्यवस्थेबद्दलच एकंदर समाजात घृणा निर्माण व्हावी म्हणून हे सर्व खेळ मुद्दाममहून केले जात होते की काय, ह्याची दाट शंका यावी, अश्या पद्धतीने हे सर्व खेळ चालू होते. एकदा का जनतेचा संविधान आणि संविधानाचा भक्कम आधार घेऊन उभ्या असलेल्या लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडाला, की मग आपल्याला (म्हणजे त्यांना) आवडणारी एखादी ‘शाही’ ह्या देशावर लादणं सोपं होईल, याच हेतूने हे सर्व काही सुरू होत, अशाच पद्धतीने हे सर्व सुरु होत. महाराष्ट्रातील निवडणुकांत आपण पार पाडलेल्या मतदानाच्या ‘पवित्र कर्तव्या’नंतर, निवडून आलेल्या माणसांचा सुरू असलेला अपवित्र पावित्रा पाहून, अनेकजण, ‘या पुढे आपण मतदान करायचंच कशाला?’ असा प्रश्न उपस्थित करून, एकंदर मतदान प्रत्रियेविषयीच निराशा प्रकट करत होते. लोकशाहीतल्या अत्यंत महत्वाच्या प्रक्रियेविषयी लोकमाणसात उदासीनता निर्माण झाली, की मग लोकशाहीच धोक्यात येऊन, ज्या संविधानाने आपल्याला आपला आवाज आणि अस्तित्वही दिलंय, ते संविधान संदर्भहीन होऊन रद्दी पुस्तकागत पडावं, यासाठी आपल्याच देशातील काही शक्ती कार्यरत असाव्यात की काय, हयाची खात्री पटत चालली असतानाच, अनैतिक पद्धतीने सत्तेवर कब्जा करू पाहणाऱ्याना, आजच्या ‘संविधान दिवशी’च तोंडावर पडण्याची पाळी यावी, यामागे सामान्य माणसाचा संविधानावरील विश्वास उडू नये, हाच संकेत असावा असं मी समजतो.

संविधान कितीही चांगलं असलं तरी, ते अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या संविधानाचे मातेरे होते. मात्र संविधान कितीही वाईट असलं आणि ते राबवणारे लोक चांगले असतील तर ती संविधान निःसंशय चांगले ठरते, ह्या अर्थाचे विधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी केले होते. आपल्या संविधानाचा अपमान करण्याचा यशस्वी-अयशस्वी प्रयत्न सर्वच सत्ताधार्यांनी वेळो वेळी केला आहे. परंतु भारतीय समाजातील असंख्य जाती-जमाती, उंच-निचतेच्या कल्पनांनी, गावकुसाबाहेर राहण्यास मजबूर केलेल्या मोठ्या जनसमुदायास, इतर भारतीय समाजाच्या बरोबरीने, भारतीय समाजाचा सन्माननीय घटक म्हणून, विशेषतः माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधानच नैतिक अधिष्ठानच इतकं, पवित आणि नतिक आहे की, तसे प्रयत्न करणारांना वेळोवेळी त्याच्या नैतिकतेपुढे आणि पावित्र्यापुढे मान तुकवावी लागली आहे. इथे संविधान राबवणारे लोक पवित्र किंवा चांगले आहेत की वाईट, हा प्रश्नच उद्भवत नाही, मात्र ते ज्यांच्यासाठी राबवायचे आहे, ते लोक मात्र संविधानावर असीम श्रद्धा ठेवणारे आहेत आणि म्हणून आपल्या मनाप्रमाणे संविधान राबवू पाहणाऱ्या लोकांना वेळ येताच संविधानापुढे आणि त्यावरील सामान्य लोकांच्या अदृश्य श्रद्धेपुढे नमते घ्यावेच लागते..!

आज पुन्हा एकदा हे सिद्ध झाले.

ही आहे सामान्य माणसांसाठी सामान्य माणसांनी जन्माला घातलेल्या संविधानाची ताकद आणि जरब..!

भारतीय संविधान चिरायू होवो..!

-नितीन साळुंखे

9321811091

26.11.2019

भाजप-शिवसेनेतील भांडणाचं नक्की कारण काय असावं?

भाजप-शिवसेनेतील भांडणाचं नक्की कारण काय असावं?

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत, शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष युती म्हणून मतदारांना सामोरे गेले आणि सत्ता स्थापन करता येईल इतक्या जागा महाराष्ट्रातील मतदारांनी त्यांच्या झोळीत टाकल्याही. तशी ह्या दोन पक्षांची युती फार जुनी, तीस वर्षांपासून चालत आलेली. भांडत भांडत का होईना, ते एकत्र नांदत आलेले आहेत. गेल्या निवडणुकांच्या खेपेस हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, मात्र निकालानंतर अगदी ऐनवेळी ते एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. गेली पांच वर्ष हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असूनही सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसत आले आहेत. सत्तेत सहभागी असलेल्या या दोन्ही पक्षांनी वेळोवेळी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, हे आपल्याला आठवत असेल. असं असूनही ह्या दोन्ही पक्षांनी यंदाची विधानसभा निवडणूक मात्र एकत्र लढवली आणि सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेलं संख्याबळही मिळवलं. मात्र असं असूनही ते एकत्रितरित्या सत्ता स्थापन करू शकलेले नाहीत. ‘’मुख्यमंत्री कुणाचा’ यावर सर्व गाडं अडलेलं होतं आणि आता हे गाडं पार दुरुस्त होण्याच्या पलीकडे गेलेलं आहे.

शिवसेना आणि भाजप ह्यांच्यातलं भांडण मुख्यमंत्री कुणाचा, ह्यावरून आहे, हे आपण सर्व जाणतोच. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रपदासाठी हटून बसले आहेत. निवडणुकांच्या पूर्वी ह्या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांत पदं आणि जबाबदाऱ्या कशा वाटल्या जाव्यात ह्याची चर्चा झाल्याचं आणि त्या प्रमाणे आता पदं आणि जबाबदाऱ्या ह्यांचं वाटप होत नसल्याचं सांगत, दोन्ही पक्ष एकमेकांवर खोटारडेपणाचे आरोप करीत आहेत. खरं पाहता, ज्या पक्षाचे आमदार संख्यने जास्त, त्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, हा साधा तर्क आहे. ह्या परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री होणं क्रमप्राप्त होत. पण तसं न होता, भाजपच्या तुलनेत शिवसेनेच्या जागा कमी होऊनही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर आपला दावा केला आणि तो दावा शिवसेना कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्याच्या मन:स्थितीत नाही. आता ह्या दोघांचं एवढं फाटलंय, की पुन्हा ते एकत्र येतील अशी परिस्थिती राहीलेली नाही. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, हे जरी खरं असलं तरी. भाजप-सेना युती पुन्हा कधी एकत्र नांदू शकेल, याची शक्यता आता अत्यंत धुसर झालेली आहे.

शिवसेना भाजपमधे एवढा टोकाचा दुरावा का यावा? ह्या दोघांतील तीस वर्षांच्या मैत्रीला न सांधण्याएवडा तडा का जावा, ह्यामागे नक्की काय कारण किंवा कारणं आहेत, ह्याचा विचार केला असता, एक कारण ठळकपणे समोर येतं आणि ते म्हणजे, हिंदुत्व..! महाराष्ट्रातल्या हिंदू व्होट बँकेची ह्या दोन पक्षांमधे गत तीस वर्षांच्या कालावधीत होत गेलेली विषम विभागणी..! तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोठा भाऊ असलेली शिवसेना आता भाजपच्या तुलनेत अगदी धाकटी झालेली आहे आणि शिवसेनेची व्होट बॅंक भाजपने आपल्या ताब्यात जवळपास घेतलेली आहे. आणि आता जर भाजपला शह दिला नाही, तर मग आपल्या भविष्यातील अस्तित्वालाच धोका निर्माण होईल, हे शिवसेनेच्या लक्षात आलं आहे आणि म्हणून मुख्यमंत्रीपदाचा वाद उकरुन शिवसेना भाजपच्या विरोधात उभी ठाकलीय, असं मला वाटतं..!

वरच्या परिच्छेदातलं माझं म्हणणं अधिक स्पष्ट करून सांगतो. महाराष्ट्रात (कदाचित देशातही, माहित नाही) हिंदुत्वाचा उघड पुरस्कार करणारे आणि हिंदुत्वाच्या नावावर मतं मागणारे हे दोनच राजकीय पक्ष आहेत. किंबहुतना ते एकत्र येण्यात हिंदुत्व हा त्यांच्यातला एकमेव सामान मुद्दा आहे. देशातील बहुसंख्य हिंदूंचा उघड उच्चार करून, हिंदूंच्या भल्यासाठी डंके कि चोट पर राजकारण करण्याचं धाडस करणारे आणि त्या धाडसामध्ये बऱ्यापैकी यशस्वीही होणारे हे दोनच पक्ष आहेत. त्यातील भाजप हा देशव्यापी राष्ट्रीय पक्ष आहे, तर शिवसेनेची ताकद महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा शिरकाव झाला तो शिवसेनेचं बोट धरूनच. आपण फार मागचा विचार न करता, गेल्या १५ वर्षांचा इतिहास पाहू. २००४ सालची विधानसभा निवडणूक भाजप-सेनेने युतीत लढवली. शिवसेना त्यावेळी मोठ्या भावाच्या भुमिकेत असल्याने, सेनेने जास्त जागा लढवल्या, तर धाकट्या भाजपने तुलनेत कमी जागा लढवल्या. असं असूनही त्यावेळी भाजपचा स्ट्राईक रेट सेनेपेक्षा जास्त होता. ह्या निवडणुकीत भाजपने ५४ तर सेनेने ६२ जागा जिंकल्या. त्या वेळपर्यंत भाजप धाकटाच होता. त्या नंतर झालेल्या २००९च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि सेनेने अनुक्रमे ४६ आणि ४४ जागा जिंकल्या. या निवडणीकतही सेनेच्या तुलनेत भाजपचा स्ट्राईक रेट जास्त होता. सेनेच्या तुलनेत भाजपला दोन का होईना, पण जास्त जागा मिळाल्या होया. धाकट्या भावाची उंची वाढू लागली होती. याच निवडणूकीत सेनेची उंची कमी व्हायला आणखी एक घटक कारणीभूत ठरला, तो म्हणजे शिवसेनेतून फुटून निघालेल्या श्री. राज ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने(मनसे)’ने निवडणूकांत घेतलेला यशस्वी सहभाग. मनेसेने या त्याच्या पहिल्याच निवडणुकीत १३ जागा जिंकल्या. मनसेला मिळालेल्या मतांमधे शिवसेनेच्या मतांचा बराच मोठा टक्का होता. तिकडे हिन्दुत्वाच्या मुद्द्यावर सेनेशी युती केलेला भाजप सेनेची मतं कायमची आपल्या बाजुने कशी येतील याचा प्रयत्न करत असतानाच, मनसेने मराठी माणसाचा मुद्दा उचलून सेनेच्या मतांत घट केली होती. सेनेची उंची कमी होण्यास इथुनच सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकू नये.

२०१४ साली झालेली निवडणूक मात्र दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली व ह्यात भाजपने तब्बल १२२ जागा जिंकल्या तर सेना ६३ जागांवर रेंगाळली. ह्या निवडणकांत भाजपला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व ‘अच्छे दिन आयेंगे’चा नारा देत त्याच वर्षी देशाच्या पंतप्रधानपदावर आरूढ झालेल्या श्री. नरेंन्द्र मोदी यांच्या करिश्म्याचा व लाटेचा फायदा झाला. भाजपचं हिन्दुच्व अधिक कडवं होण्यास सुरूवात झाली, ती याच सुमारास. याचा परिणाम भाजपचं संख्याबळ लक्षणीयरित्या वाढण्यास झाला. श्री. राज ठाकरेंच्या मनसेला ह्या निवडणुकीत फारसं यश मिळालं नाही. त्यांच्या मताचा काही टक्का सेनेकडे, तर बराचसा भाजपकडे वळला. सेनेचं थोरपण जाऊन आता सेना धाकटी बनली होती. भाजपने हिन्दू मतांचा आणि मनसेने मराठी मतांचा आपल्या हातून हिसकावून घेतलेला टक्का पाहून सेना अस्वस्थ झाली असावी असं म्हणता येतं आणि सेनेच्या ह्या अस्वस्थपणाचे दृष्य परिणाम सेने-भाजप ह्या एकत्र सत्तेत असुनही एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या आणि सेनेकडून सातत्याने राजीनामा देण्याच्या धमक्यांच्या राजकारणातून गेला पांच वर्ष आपण सारेच पाहात आलेलो आहेत. मनसेला सेनेने अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला.

यंदा झालेल्या ताज्या निवडणूकांचा निर्णय आपल्या समोर आहे. त्यानंतरचं सत्तानाट्यही आपण दररोज पाहातो आहोत. ते इतक्या निर्लज्जपणाने सुरू आहे, की सुरुवातीला होणाऱ्या मनोरंजनाचं रूपांतर, आता त्या सर्वांबद्दलच एकप्रकारची किळस निर्माण होण्यात झालं आहे. परंतु, त्याबद्दल न बोलता, सेना तिच्या जागा कमी होऊनही मुख्यमंत्रीपदासाठी का अडून बसलीय, त्या मागचं मला वाटणारं कारण पाहू.

जन्माच्या वेळी मराठी माणसाच्या भल्यासाठी म्हणून स्थापन झालेली शिवसेना, पुढे हिंदुत्वाच्या मार्गाने गेली. हिंदुत्वावर मतं मागणारे हे दोनच पक्ष असल्याने, निदान महाराष्ट्रात तरी, त्यापैकी एकाची घट झाल्याशिवाय दुसऱ्याची वाढ होऊ शकत नाही, हे काही नव्याने सांगायची गरज नाही. २०१४ साली विकासाचा जयघोष करत केंद्रात भाजपप्रणित एनडीएला मिळाले सत्ता, श्री. नरेंद्र मोदींसारखे करिश्माई नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी हिंदुत्ववादी देशव्यापी संघटना ह्याचा अपरिहार्य परिणाम, त्यानंतर देशभरात झालेल्या निवडणुकांत होऊन देशभरातले बहुतेक सर्वच पातळीवरील सत्ताकेंद्र भाजपच्या ताब्यात गेली. अशी सत्ता केंद्र स्थापन करताना भाजपने त्या त्या राज्यातल्या प्रबळ प्रादेशिक पक्षांचं आधार घेतला होता आणि नंतरच्या पांच वर्षांच्या काळात त्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांचा प्रभाव पद्धतशीरपणे कमी कमी करत आणला होता. महाराष्टातही हेच घडलं आणि सेनेमधे आपल्या भविष्यातल्या अस्तित्वावरच घाला येतो आहे हे पाहून अस्वस्थता निर्माण झाली.

ह्या अस्वस्थतेतूनच आपलं हिंदुत्व भाजपपेक्षा कमी नाही हे दाखवण्यासाठी शिवसेनेने भाजपाला निकराचा विरोध सुरु केला. लोकसभा निवडणुकीच्या आगे-मागे शिवसेना पक्षाध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी ‘पहले मंदिर, बाद मे सरकार’ असा नारा देत सहकुटुंब जी अयोध्या यात्रा केली, त्यामागे भाजपाकडे हिंदुत्वाच्या नांवावर जाणारा आपला जनाधार थांबण्यासाठीच होता, असा निष्कर्ष काढता येतो. अगदी अलीकडेही, अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर, श्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येत होणाऱ्या राममंदिराच्या पहिल्या चार विटा शिवसेनेच्या असतील असं जे काही शिवसेनेकडून सांगितलं गेलं, त्या मागे उरली सुरली हिंदू व्होट बँक शिवसेनेपासून दुरावू नये हाच प्रयत्न होता असं म्हणता येईल.

सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाने स्वत:च्या बळावर संसदेत पूर्ण बहुमत मिळवलं. भाजपला तर आता कुणाचीच आवश्यकता राहिलेली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. याचे पडसाद त्यानंतर लगेचच होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दिसणार आणि भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करणार, असा आत्मविश्वास भाजप नेतृत्वाला आला. भाजपचा हा (अती)आत्मविश्वास त्याच्या नेत्यांच्या व सोशल मिडियातील भाजप समर्थकांच्या उद्दाम बोलण्यातून आणि नेत्यांच्या तेवढ्याच आक्रमक देहबोलीतून दिसू लागला होता. यातूनच भाजपने सेनेला कोलायला आणि मतदारांनाही गृहित धरायला सुरूवात केली. याच सहा महिन्यांच्या काळात भाजपच्या दिखावू देशप्रेमातली हवा निघून जाऊ लागली होती. देशभरात अनेक उद्योग बंद पडू लागले होते. बेकारी वाढू लागली होती. शेतकरी कधी नव्हे एवढा अस्मानी संकटात सापडला होता. भाजपच्या विरोधात जनमत तयार होत होतं, पण जनतेला बेगडी देशभक्तीचे तीनशेसत्तरी डोस पाजण्यात मग्न असलेल्या भाजपला बदलत्या जनमताचा अंदाज येत नव्हता. स्वप्रतिमेच्या प्रेमात पडलेल्यांना आजुबाजूच्या परिस्थितीचं भान राहात नसतंच. भाजपचं तसंच झालं आणि लोकसभेच्या निवडणुकांत मिळवलेल्या दैदिप्यमान यशानंतरच्या अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांत, ‘अब की बार कितीतरी पार’च्या उन्मादात अडकलेल्या भाजपचं गाडं अवघ्या १०५ जागांवर (‘कमळा”वर निवडणूक लढवलेल्या मित्रपक्षांच्या जागांसहित) येऊन थांबलं.

निवडणुकांच्या निर्णयानंतर भाजपच्या फुग्यातील हवा गेली आणि भाजपपासून अनेक मुद्द्यांवर दुरावलेली मतपेढी, भविष्यातल्या आपल्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण होऊन अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने आपल्या ताब्यात घेण्यासाठी लगेचच प्रयत्न सुरू केले. दोन भावांतील वारशातील वाटणीचं, हे भांडण आहे, असं माझ्या लक्षात येतंय. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदा’साठी हटून बसणे, प्रसंगी युती तोडण्यास मागेपुढे न पाहाणे, हे त्यातूनच आलेलं आहे. पुन्हा भाजपचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व यात मोठा फरक आहे. भाजपचं हिंदुत्व सांगण्यासाठी सर्व हिन्दूंसाठी असलं तरी, प्रत्यक्षात ते तसं नाही, हे आता अनेकांच्या लक्षात येत गेलंय. उमानाबाद येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांची निवड झाल्यानंतर, त्यांच्या निवडीवर ज्या संस्थांनी आणि व्यक्तींनी जाहीर हरकत घेतली, त्याकडे नजर टाकली असता, भाजपच हिंदुत्व कोणत्या प्रकारचं आहे, हे सहज लक्षात येऊ शकत. तसेच, हे लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी फेसबुकसारख्या समाज माध्यमावर सक्रिय असलेल्या भाजप समर्थकांनी त्यांच्या नकळत मोठी भूमिका बजावलेली आहे. ह्या सर्वच गोष्टींचा परिणाम, सर्वसामान्य मतदार भाजपपासून दुरावण्यात झाला. भाजपपासून दूर जाऊ पाहणारी ही सर्वसामान्य हिन्दुंची व्होटबॅंक आपल्या बाजूने करण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न आहे, असं मला वाटत. शिवसेना ही सर्व हिन्दुंसाठी, विशेषतः हिंदूंमधील सर्व जाती जमातींसाठी आहे (आणि खरंच ती तशी आहेही..!), हे शिवसेना गेल्या वीस-पंतवीस दिवस अप्रत्यक्षपणे, पण मुद्दामहून दाखवून देत आहे. २४ आॅक्टोबर नंतरच्या शिवसेनेच्या चालींचा निट अर्थ लावला तर, ही सहज लक्षात येणारी बाब आहे. शिवसेनेचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा संघर्ष हा, भाजपपासून दुरावलेल्या सर्वसामान्य हिंदू मतांची मतपेढी आपल्याकडे खेचण्यासाठी चाललेला संघर्ष आहे, असं माझं मत आहे.

ह्यात शिवसेना भविष्यात कितपत यशस्वी होते, हे पाहाणं औत्सुक्याचंच ठरेल..!!

-नितीन साळुंखे

9321811091

17.11.2019

(लेख शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या दुरावलेल्या संबंधांचं कारण शोधणारा असल्याने, ह्यात इतर पक्ष आणि त्यांचं राजकारण याचा विचार केलेला नाही.)

प्रसिद्धी- ‘साप्ताहिक किरात’, वेंगुर्ले. दिनांक २०.११.१९

I_stand_with_JNU_students

#I_stand_with_JNU_students

जवाहरलाल नेहरू विद्यापिठ, अर्थात जेएनयूमधे सर्वकाही आलबेल नाही. अवाजवी शुल्कवाढीच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदेलनाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा.

बाकी तिकडे जे वेगवेगळ्या ‘इझम्स’चं खरं-खोटं राजकारण चालतं, त्याला पाठिंबा नको, पण विद्यार्थ्यांना सवलतीच्याच दरात कशाला, पूर्ण पणे मोफत शिक्षण मिळायला हवं, या मागणीला पाठिंबा मिळायला हवा. विद्यार्थ्यांची विचारसरणी उजवी, डावी, मधली आणि वरची किंवा खालची अशी कोणतीही असो, त्याला त्याच्या इच्छेनुसार मोफत अथवा सहज परवडेल अशा शुल्कात शिक्षण मिळायलाच हवं. विद्यार्थांचे विचार कसे असावेत हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्या त्या विद्यार्थ्याला असतो. सरकारने या भानगडीत पडू नये. आपणही विद्यार्थ्यांची विचारसरणी कोणती आहे ते न पाहाता, शिक्षण, ते ही सवलतीच्या दरात, त्यांना मिळायलाच हवं, या त्यांच्या मागणीस पाठिंबा द्यायला हवा.

फक्त जेएनयूमधीलच नव्हे, तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या देशभरातल्या सर्वच विद्यार्थ्यांना सरकारने मोफत आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यायला हवं.

ज्या देशांत सर्वांनाच दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसेवा मोफत किंवा अगदी निम्न स्तरावरच्या माणसांनाही सहज परवडेल अशा दरांत उपलब्ध असते, त्याच देशाला स्वत:ला जागतिक महाशक्ती म्हणवून घ्यायचा अधिकार असतो. तसं नसेल तर मग तशा केल्या जाणाऱ्या घोषणा केवळ दिखावू, पोकळ आणि निवडणुकीय जुमलेबाजीच्या ठरतात. अशा धोषणा करण्यात भारतदेशीच्या राजकारण्यांचा सर्वात अव्वल नंबर लागतो.

-नितीन साळुंखे

9321811091

आजच्या ‘लोकसत्ता’तील हा 👇लेख सर्वांनी अवश्य वाचावा.

http://epaper.loksatta.com/c/45952699

आंतरराष्ट्रीय ’पुरुष दीना’च्या निमित्ताने..

‘बलात्कार का होतात?’ ह्या माझ्याच एका लेखातला एक परिच्छेद आजच्या ‘आंतरराष्ट्रीय पुरूष दिना’च्या निमित्ताने..

“..सेक्समधे स्त्री आणि पुरुष असं दोघांचंही असणं आवश्यक असते. प्रेम किंवा कर्तव्य अशी भावना उद्दीपीत करणारी कोणतीही नांवं दिली, तरी त्या क्रियेतून आनंदाव्यतिरिक्त निसर्गाला अपेक्षित अशी वंशसातत्याची क्रियाही घडत असते. सेक्सच्या खेळात पुरूष ‘अॅक्टीव्ह’, तर स्त्री ‘पॅसिव्ह’ असते. स्त्रीची कितीही इच्छा असेल आणि पुरुषाची नसेल, तर सेक्स घडू शकत नाही. याच्या उलट स्त्रीची इच्छा नसेल आणि पुरुषाची असेल तरी सेक्स घडतो..थोडक्यात सेक्सची क्रिया निसर्गाने संपूर्णपणे पुरुषाच्या मर्जीवर ठेवलेली आहे. तरीही स्त्रीच एक बलस्थान आहे. पुरुषाच्या तुलनेत स्त्री सेक्सच्या खेळत, तिची इच्छा असो व नसो, अमर्याद काळापर्यंत भाग घेऊन शकते किंवा तिला भाग घेण्यास भाग पाडले जाऊ शकते. पुरुषाच्या या खेळत एका वेळेस भाग घेण्याच मर्यादा अत्यंत सीमित असते किंवा पुरुषाला सेक्स करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. एका संभोग नंतर पुरुष काही काळ आपलं ‘पुरुषत्व’ गमावतो व त्याला पुन्हा तयार होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. माझं तर असंही म्हणण आहे, की स्त्रीमधल्या सेक्सच्या खेळात मर्जीने अथवा गैर मर्जीने भाग घेण्याच्या या अमर्याद शक्तीला ओळखून स्त्रीला विविध व्रतवैकल्याच्या जाळ्यात पुरुषाने अडकवलं आणि योनी शुचीतेच्या कल्पना तिच्या मनावर बिंबवल्या आणि पातिव्रताच्या जाळ्यात तिला अडकवलं. स्वत:ची दुर्बलता झाकण्यासाठी, सबलेला बंधनात टाकलं..!

ताकदवान पुरूषाने, स्वत:तलं हे मुद्दलातलं दौर्बल्य ओळखून, पुरुष आणि पुरुषी वृत्ती ही सर्वोच्च आहे आणि स्त्री दुय्यम आहे अशी लोक भावना निर्माण केली आणि समाजातही तसे नियम केले..!”

आंतरराष्ट्रीय ’पुरुष’ दिनाच्या सर्व पुरूषांना शुभेच्छा..!

-नितीन साळुंखे

9321811091

बाळासाहेबांच्या त्या भेटीचा तो क्षण..

बाळासाहेबांच्या त्या भेटीचा तो क्षण..

सन २०१०च्या जानेवारीत बाळासाहेबांसोबत भेटीचा योग आला होता..हा फोटो त्या भेटीच्या वेळचा आहे. अर्थात मी बाळासाहेबांच्या भेट मागितली आणि ती मिळाली, अस काही घडायला मी काही मोठा नव्हतो. मी तर त्यांचा साधा शिवसैनिकही नव्हतो. परंतु काही गोष्टी घडण्यासाठी आपलं नशीब लागतं आणि ते नशिब फळण्यासाठी योगही यावा लागतो. तसंच काहीसं या भेटीबाबत घडल. ही भेट घडली अगदी योगायोगाने आणि त्याला निमित्त होते माझे मित्र आणि कणकवलीचे तत्कालीन आमदार श्री. प्रमोद जठार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या २००९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत कणकवली मतदार संघातून मिळवलेला विजय. या विजयाची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो.

कणकवली मतदार संघ हा ओळखला जातो, तो महाराष्ट्राच्या राजकारणातल एक बड प्रस्थ श्री नारायण राणे यांचा म्हणून. तसाच या मतदार संघातील पूर्वीचा देवगड हा भाग, भाजपचा पारंपारीक मतदार संघ. देवगडचं प्रतिनिधित्व पूर्वी अप्पासाहेब गोगटे आणि नंतर श्री. अजित गोगटे या भाजपच्या नेत्यांनी केल असलं तरी, उभ्या महाराष्ट्रात हा मतदार संघ आणि हा मतदार संघ ज्या जिल्ह्यात येतो, तो सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो तो श्री. नारायण राणे यांचा म्हणूनच. श्री. जठार यांच्या पूर्वी या मतदारसंघाचं प्रतीनिधित्व भाजपच्याच श्री. अजित गोगटे यांच्याकडे होत. परंतु श्री. अजित गोगटे निवडून आले होते तेंव्हा शिवसेना आणि भाजप युती होती आणि नारायणरावही तेंव्हा शिवसेनेत होते.

सन २००५ मध्ये श्री. नारायण राणे यांनी कोन्ग्रेस पक्षात प्रवेश केला आणि पुढे सिंधुदुर्ग आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्वच गणित बदलली. तशीच ती सिंधुदुर्गातही बदलली. सन २००९ साली झालेल्या निवडणुकीत नारायण राणेंच्या कणकवलीत राणेंच्या विरुद्ध उभं राहून विजय मिळवणं सोपं नव्हत. विजय सोडा, कणकवलीतून राणेच्या विरोधात उभं राहून राणेंना कशाला अंगावर घ्यायचं, या विचाराने अनेक इच्छुकांनी निवडणुकीला उभं राहण्याचा बेत मनातल्या मनात रिचवला होता. या पार्श्वभूमीवर राजकारणात एकदम नवखे असलेल्या श्री. प्रमोद जठाराना भाजपने तिकीट देऊ केलं आणि या पूर्वी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणूक न लढवलेल्या, परंतु लालबागचं नडू रक्त अंगात खेळवणाऱ्या जाठारानीही हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं. कणकवली मतदार संघातून तेंव्हा कोन्ग्रेसतर्फे ठाण्याच्या श्री. रवींद्र फाटकांना तिकीट मिळालेले होते. कणकवली मतदार संघाची ख्याती अशी, की इथे श्री. नारायण राणेंच्या नांवाने धोंडा जरी उभा केला तरी तो निवडून येणार. इथे तर श्री. रवींद्र फाटकासारखा मुंबईचा बडा नेता उभा राहिला होता. जठारांचा पराभव पक्का, याच गुर्मीत सगळे वावरत असताना निवडणुकांचा रिझल्ट लागला आणि श्री. प्रमोद जठार अवघ्या ३४ मतांनी या मतदारसंघातून विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं. श्री. नारायण राणेंनी हा पराभव हलक्यात घेतला नाही. वारंवार पुनर्मोजणी केली गेली. शेवटी सायंकाळी पांच-साडेपांचच्या दरम्यान अंतिम निर्णय जाहीर करून श्री. प्रमोद जठार यांना कणकवली मतदार संघातून विजयी घोषित करण्यात आलं. सर्वात कमी मतांनी विजय मिळाला असला तरी मतमोजणीसाठी सर्वात जास्त वेळ लागलेला हा मतदारसंघ आणि श्री. जठारांचा हा विजय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमचा नोंदला गेला.

भाजपच्या श्री. प्रमोद जठार यांनी २००९च्या विधानसभा निवडणूकीत कणकवलीत मिळवलेला विजय, या माझ्या भेटीच्या मागे आहे. त्याचं झालं असं, की या विजयानंतर दोनेक महिन्यांत श्री. जठाराना ‘मातोश्री’वरून, बाळासाहेब त्यांना भेटू इच्छितात, असं कळवणारा फोन आला आणि सांगितलं गेलं, की तुम्ही कधी येणार हे कळवावं. त्याचबरोबर असंही सांगण्यात आलं, की बाळासाहेबांची प्रकृती बरी नसल्याने ते जास्तीजास्त ५ मिनिट भेटू शकतील. सुरक्षिततेच्या दृष्टीने, सोबत कोण येणार त्यांची नावं कळवावी असंही सांगण्यात आलं. आता मला तारीख नक्की आठवत नाही, परंतु २०१०च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्री. व सौ. जठार आणि त्यांच्यासोबत आम्ही चार-पांचजण असे ‘मातोश्री’वर भेटीला येतो असं आम्ही कळवलं.

अखेर तो दिवस उजाडला. आम्ही सायंकाळी सहाच्या सुमारास आम्ही ‘मातोश्री’वर पोहोचलो, प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आम्हाला पुन्हा सूचना देण्यात आली, की आपली भेट फक्त पाच मिनिटांची आहे आणि बाळासाहेबना प्रकृतीचा त्रास होत असल्याने फार बोलू नका. आम्हाला बोलणं तर लांबचं होतं, बाळासाहेबांच अगदी जवळून दर्शन झाल तरी खूप होत. नंतर आम्हाला बाळासाहेबांच्या, मला वाटतं, दुसऱ्या मजल्यावरील खोलीपाशी घेऊन जाण्यात आल आणि आम्ही आत प्रवेश करताच समोरच बाळासाहेबांच्या कृश परंतु अत्यंत तेजस्वी कुडीच साक्षात दर्शन घडलं. आम्ही पाहतोय ते स्वप्ंन की खरं, हेच कळेना. काय बोलावं किंवा काय करावं हे ही सुचेना. आम्हा सर्वांची हीच परिस्थिती. आम्हाला भानावर आणत बाळासाहेबांनी हातानेच आम्हाला बसायला सांगितलं. श्री. प्रमोद जठाराना जवळ बोलावलं, त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि बाळासाहेबांच्या त्या कृश कुडीतून आलेल्या त्याच त्यांच्या चीरपरिचित धारदार आवाजात बाळासाहेबांनी उद्गार काढले, ‘पोरा, तू करून दाखवलस, माझ स्वप्न पूर्ण केलंस’..!

श्री नारायण राणेच्या कणकवली मतदारसंघातून श्री. प्रमोद जठारांनी मिळवलेला विजय भाजपच्या नेत्यांना तर सुखावून गेलाच होता, पण त्याहीपेक्षा त्या विजयाचा बाळासाहेबांना झालेला आनंद कैक पटीने जास्त होता, हे आम्हाला जाणवून गेलं. श्री. जठारांनी प्रत्यक्ष राणेंना हरवलं नसलं, तरी ‘कणकवली जठारांची’ अशी बाळासाहेबांना सुखावणारी नविन ओळख जठारामुळ् कणकवलीला मिळाल्याचा तो आनंद होता.

श्री. नारायण राणेंच शिवसेनेतून जाणं बाळासाहेबांन खूप लागलं होत असा त्याचा अर्थ..आणि म्हणून त्यांना झालेला आनंद त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून जाणवत होता..

श्री. प्रमोद जठारांसोबत त्या क्षणाला मी व आणखी चार-पाचजणं होतो. सर्वांनी बाळासाहेबांना वाकून नमस्कार केला. सर्वांनाच एकएक करून काही क्षण बाळासाहेबांनी त्यांच्या त्या खुर्चीच्या शेजारी बसवून घेतलं. आम्हा प्रत्येकाच्या पाठीवर मायेने हात फिरवून आम्हा सर्वांची चौकशी केली, आशीर्वाद दिला. आमची पाच मिनिटांची ठरलेली भेट पाऊण तासावर कधी गेली, हे आम्हाला कळलंच नाही. आम्ही घड्याळाकडे लक्ष देत आवरतं घेत होतो, पण साहेबांनी आग्रह करून बसवून घेतलं. वर, ‘डॉक्टरांना काय कळतंय, आज माझ आयुष्य काही काळासाठी वाढल’, असही ते मिश्कील हसत म्हणले. श्री. राज ठाकरेंनी तयार केलेली बाळासाहेबांची ‘फोटोबायोग्राफी’ आणि आणखी काही पुस्तक या प्रसंगी आम्हाला भेट म्हणूनही दिली..या भेटाप्रसंही बाळासाहेबांच्या स्नुषा सौ रश्मी ठाकरे, स्वीय सहाय्यक, बहुतेक म्हात्रे असावेत आणि त्यांचा तो प्रसिद्ध नेपाळी सेवक हजर होते.

आज या घटनेला नऊ वर्ष झाली. माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. वरच्या लेखात उल्लेख केलेल्या व्यक्तींच्या आणि माझ्या संबंधातही जाणवण्याइतका वेगळेपणा आला. असं असलं तरी माझ्या आयुष्यातला बाळालाहेबांसोबतचा तो पाउण तास मला कधीही विसरता आलेला नाही. विसरणं शक्यही नाही.

आज रविवार दि.१७ नोव्हेंबर २०१९.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनाम्मित्त तो सुवर्णक्षण पुन्हा जगावासा वाटला..

हा फोटो त्या सुवर्ण क्षणाचा आहे..! हा क्षण टिपलाय त्या प्रसंगी हजर असलेला आमचा फोटोग्राफर मित्र व बाळासाहेबांच्या अगदी जवळचा असलेल्या बाळा तुळसकरांनी..

-नितिन साळुंखे

9321811091

सर्वांनी वाचायलाच हवं असं काही-

पडद्याआडची न्यूड्स …

‘ नग्नता : चित्रातली आणि मनातली ‘ या अंकाचं खास आकर्षण ठरला तो चित्रकार सुहास बहुळकर यांचा ‘न्यूड’ल्स हा लेख. या लेखात त्यांनी न्यूड चित्रकलेचा अगदी आदिमानव कालापासून थेट आजपर्यंतचा अगदी सोदाहरण आढावा घेतला आहे. या जवळजवळ ५० पेक्षा अधिक पान पसरलेल्या बहुळकरांच्या लेखात त्यांची अभ्यासूवृत्ती तर दिसते पण त्याचबरोबर त्यांच्या लिखाणातला शैलीदारपणा देखील. अत्यंत खुमासदारपणे ते विषयाचा एकेक पदर उलगडत जातात. प्रसंगी त्यांच्यातला मिश्कीलपणा हा डोकावतच राहतो. साहजिकच त्यांच्या लिखाणाला अत्यंत वाचनीयता प्राप्त होते. आता उदाहरणार्थ बडीगेर यांचा पुढील परिच्छेद वाचा.

डी. जी. बडीगेर ( १९०२ – १९६७ ) हेदेखील याच मालिकेतील एक चित्रकार. जेजेमधील शिक्षणानंतर १९२९ मध्ये ते लंडनच्या रॉयल अकादमीत उच्च शिक्षणासाठी गेले. तिथं केलेली नग्न रेखाचित्रं, पेन अँड इंक ड्रॉइंग्ज व पेंटिग्ज हे सारं म्हणजे नग्न अभ्यासचित्रांचा अप्रतिम खजिनाच आहे. एस.एम.पंडित त्यांना गुरु मानत आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या घरी जाऊन ही नग्नचित्रं तासानंतास बघत बसत. ही चित्रं बघण्याची संधी मला २००२ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीसाठी मी करत असलेल्या ‘ मास्टर्स स्ट्रोक्स II ‘ या प्रदर्शनामुळे मिळाली. त्यासाठी बडीगेरांच्या चिरंजीवाच्या माटुंग्याच्या घरी मी पोचलो.

चित्रं दाखवण्यासाठी त्यांची पत्नी मला घरातील बेडरूममध्ये घेऊन गेली. आत गेलो तर भिंतीवर एकही चित्र नव्हतं. एक डबल बेड, कपाट, टेबल खुर्ची हेच सामान होतं. डाव्या बाजूच्या भिंतीवर मात्र संपूर्ण भिंतभर पडदा होता. आत जाताच त्यांनी मला प्रथम बसवलं व कानडी मिश्रित मराठीत हेल काढून त्या बोलू लागल्या, ” तुम्हांला सांगतंय बघा … त्याचं काय हाये की आमचं घर म्हंजे मुलाबाळांचं की वो, आमचं फादर इन लॉ धार्मिक … अगदी कर्मठ, फार चांगलं माणूस बघा. पण त्यांचं ते चित्र वो म्हंजे कपडे न घातलेलं… नागवं हो … आता या मुलाबाळांच्या आणि बायामानसांच्या घरात कसं लावणारं ? पण तरीही आम्ही लावलंय. पण त्याला पडदा लावून झाकून ठेवलंय. कुणी आलं की पडदा उघडून दाखवतो. ” असं म्हणून त्यांनी पडदा सरकवला. समोर भिंतीवर स्त्री-पुरुषांची अनेक अप्रतिम तैलचित्रं व रेखाचित्रं बघून मी अवाक झालो. पडदाआडच्या त्या चित्राव्यतिरिक्त त्यांच्या कोठीच्या खोलीतील पेटीतूनही अनेक नग्नचित्रं मिळाली व ही चित्रं जहांगीर आर्ट गॅलरीच्या ‘ मास्टर्स स्ट्रोक II ‘ या प्रदर्शनाचं आकर्षण ठरली.

( रु. १३५० किंमतींची संग्राह्य प्रकाशनं फक्त रु. ८०० मध्ये )

[ ‘नग्नता’ अंक हवा असल्यास 90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर Chinha 3 हा मेसेज आपल्या नाव पत्यासह पाठवा आणि ‘नग्नता’ अंकावर ( रु. ७५० + टपाल खर्च रु. ५० = ८०० रुपये ) ५०० रुपयांची ‘गायतोंडे’ जनावृत्ती आणि चित्रकलाविषयक ५०० टिप्स असलेलं १०० रुपयांचं ‘ चित्रसूत्र ‘ पुस्तक भेट मिळवा. ]

भाईचारा बनाएॅं रखे..!!

जब मुल्ला को मस्जिद में राम नजर आए,

और पंडित को मंदिर में रहमान..।

सुरत ही बदल जाए इस दुनिया की,

गर इन्सान को इन्सान में ‘इन्सान’ नजर आए..।।

माझं ‘पुल’दैवत..!!

माझं ‘पुल’दैवत..!!

पु.ल.देशपांडे, अर्थात ‘पुल’. पुलंना मी माझं ‘पुल’दैवत मानतो. आज पुलंचा जन्मदिवस. मी देवळातल्या देवाला नाही, मात्र पुलंना माझं दैवत मानलं आहे. परंतु आज पुलं आपल्यात असते आणि माझे हे शब्द त्यांनी वाचले असते, तर ह्यातील दैवत ह्या शब्दाला पुलंनी हरकत घेतली असती. अर्थात, मी ही तो शब्द ‘देव’ ह्या अर्थाने वापरला नाही..

पुलंनी देवाला नाकारलं नाही, मात्र देवाच्या नांवाखाली विविध धर्मस्थळांच्या ज्या टपऱ्या, दुकानं आणि मॉल्स चालतात, त्याला मात्र पुलंनी त्यांच्या साहित्यातून विनोदाच्या सोट्याने भरपूर झोडपलेलं आहे. देवाच्या नांवाखाली चालणाऱ्या बुवाबाजीला पुलंनी नेहेमीच विरोध केला आहे. आणि लोकांनी त्यांच्या नादाला न लागता, प्रत्येकाने आपापल्या सद्सद्विवेकबुद्धीने वागावं, असा नकळतचा उपदेश केला आहे. पुलंना आपण डोक्यावर घेतलं, पण त्यांची ही शिकवण मात्र कधीही मनावर घेतली नाही. पुलंच्या साहित्यावरच माझा पिंड पोसलेला असल्याने, माझ्या विचारांवरही पुलंच्या विचारांचा पगडा राहिलेला आहे.

माझाही देवाला विरोध नाही, मात्र दैवतीकरणास नेहेमीच विरोध राहिलेला आहे. देवा पेक्षा देवाच्या दैवतीकरणाने आपल्या सर्वच समाजाचा ताबा घेतलेला आहे. शिक्षणाने हे सर्व कमी होईल असा आशावाद अनेक थोऱ्या-मोठ्यांनी गत काळात व्यक्त केला होता. मात्र तसं काहीच घडलेलं दिसत नाही. उलट वाढत्या शिक्षणाबरोबरच आपल्या समाजातलं दैवतीकरणाचं महत्व तेज गतीने रोजच्या रोज वाढताना दिसत आहे आणि परिणामी आपला समाज अधिक निष्क्रीय होत चाललेला दिसत आहे. एकदा का देवावर भरवसा टाकला, की मग आपल्याला भक्तीशिवाय करण्यासारखं काहीच शिल्लक राहात नाही. ह्यातून वाढते ती फक्त निष्क्रियता आणि देववरच अवलंबित्व. हे फक्त हिन्दूंमधेच होतंय असं नाही, तर हिन्दू संस्कृतीचाच भाग असलेल्या आपल्या समाजातील इतरही सर्व धर्मियांत ही परिस्थिती दिसून येते. देवाची नांव वेगळी, भक्त आणि देव यांत संवाद साधून देणाऱ्या मध्यस्थ-दलालांची नांवं धर्मानुसार वेगवेगळी, पण वृत्ती तिच, सामान्य लोकांना देवाच्या नांवाखाली आपल्या कच्छपी लावण्याची..! पुलंनी, ते आज असते तर, हे कदापिही सहन केलं नसतं..!!

भारतीय समाजमनाची जडण-धडण अध्यात्मिक असल्याने, भारतीय माणसं कुणाचाही चटकन देव बनवून टाकतात. हा खेळही तसा फार जुनाच आहे. कुणालाही देव म्हणून देव्हाऱ्यात बसवलं, की मग आपली सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकून आपण बेजबाबदार वागायला मोकळे होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण ह्यासाठी पुरेसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपण ‘महाराष्ट्राचं आराध्य दैवत’ बनवून टाकलं. पण महाराजांचे गुण, महाराजांचं न्यायीपण, महाराजांची तत्वनिष्ठा आपल्यापैकी किती जणांनी आपल्या अंगात बाणवली ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर, हाती फक्त निराशाच येईल. महाराजांना देव बनवून पुजणाऱ्याना, महाराजांसारखा पराक्रम गाजवून आपणही काही तरी लोकोत्तर कर्तुत्व गाजवावं, असं मात्र वाटत नाही, म्हणून तर आज ३-४०० वर्षांनतरही महाराजांचं नांव आपल्याला घ्यावं लागतं. त्या तोडीचा लोकोत्तर पुरुष महाराष्ट्रात नंतर निपजला नाही, हा आपला कमीपणा तर आहेच, शिवाय महाराजांचाही अपमान आहे.

आजची परिस्थिती आणखीनच वेगळी आहे. विविध क्षेत्रात, विशेषतः राजकारणात, स्वयंभू देव तयार झाले आहेत. कुठलंही पाच-पोच नसलेली हुशार, बुद्धिमान माणसं त्यांच्या नादाला लागलेली आहेत. दैवतीकरणाची प्रक्रिया ह्या देशात एकदम जोरात सुरु आहे. ह्या दैवतीकरणात ज्या भक्तांचं उखळ पांढरं होणार आहे, ते त्या त्या दैवतांची भक्ती, त्या त्या दैवताचे भक्तगण आंधळे आणि बहिरेपणाने करत आहेत. देवाने, म्हणजे आकाशातल्या देवाने, आपल्याला बुद्धी नामक एक इंद्रिय दिलं आहे आणि ते विचार करण्यासाठी दिलेलं आहे, हे कुणाच्याच ध्यानात असलेलं दिसत नाही. माझ्या देवाने फक्त माझं भलं करावं, मग बाकीच्या दुनियेचं वाटोळं झालं तरी चालेल, अशी मानसिकता वाढीला लागलेली आहे. देवाची भक्ती करायला हरकत नाही, मात्र ती भक्ती डोळस असावी. त्या त्या देवाची भक्ती करताना, देवही पारखून घ्यावा. पारखून घ्यावा अशासाठी म्हटलं की, हल्ली देवाच्या रूपात सैतानच सगळीकडे माजलेले दिसत आहेत. त्यांच्या सैतानी कारवायांवर टीका करण्यापेक्षा, पुलंच्या वाटेवर चालणारे साहित्यातले बहुसंख्य नामवंत वारकरी गप्प आहेत. वास्तविक समाजाला योग्य ते नि:पक्ष मार्गदर्शन करण्याची जबाबदारी साहित्यिक आणि कलावंतांची असते. परंतु आजच्या दैवतीकरणाच्या लाटेत, असे बहुतेक प्रतिभावंत, आपलाच देव कसा चांगला हे सांगत, त्या त्या देवाच्या देवळात चाळ कुटताना दिसत आहेत. जे बोलतात, त्यांना वेगळ्याच कुठल्यातरी देवाचे भक्त म्हणून शिक्का मारण्यात विरोधी भक्तगण मश्गुल आहेत. आमचा देव ताकदवान झाला, की आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशा प्रेमळ सूचना दिल्या जात आहेत. सर्वत्र आपापल्या दैवतांचं उदोउदो आणि अंधानुकरण करण्याच्या लाटेत, आमच्यासारख्याना आधार देणाऱ्या पुलंची कमतरता कधी नव्हे एवढी आमच्यासारख्याना जाणवतेय..

आवाज पुलंची जन्मशताब्दी. पुलंसारख्या लोकोत्तर साहित्यिक-तत्त्ववेत्त्यांची, समाजाला दिशादर्शन करणारांची जन्मशताब्दी साजरी करून आपण काय साधणार? त्या पेक्षा त्यांचे विचार अंगी बनवण्याची खटपट केली तर ते अधिक उत्तम होईल. पण तस करायचं तर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, अनेकांशी वाकडेपणा घ्यावा लागतो, सर्वात महत्वाचं म्हणजे, स्वार्थाला तिलांजली द्यावी लागते. ते कोण करणार? त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज किंवा पुलंसारख्याना देवता बनवून त्यांच्या जयंत्या-मयंत्या धुमधडाक्यात साजऱ्या करणं केंव्हाही सोपं. एकदा का त्यांना देवत्व दिलं, तर मग त्याच्यासारखा विचार करण्याची, वागण्याची कोणतीही जबाबदारी आपल्यावर येत नाही. हा मार्गच सर्वात चांगला नाही का आजच्या काळात?

मी मात्र असं कारण नाकारलंय. मी मनोमन पुलंना माझं ‘पुल’दैवत मानलंय, ते त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करण्यासाठी. कुणाचीही, अगदी (असलाच तर) आकाशातल्या देवाचीही भक्ती मी आंधळेपणाने करणार नाही. माझ्या पुलदैवतांची ही शिकवण मी नेहेमी लक्षात ठेवेन..! हाच त्याचा आशीर्वाद आणि प्रसादही समजेन.

– नितीन साळुंखे

9321811091

08.11.2019

पुलंचं चित्र व्हॉट्सअँपवरून प्राप्त