महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचा अन्वयार्थ –

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचा अन्वयार्थ –

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निर्णय लागून आता दहा पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. आपल्याच बरोबर हरियाणा राज्याच्या विधानसभेचा निकाल लागला आणि लगेचच पुढच्या चार दिवसात तिकडे सरकार स्थापन होऊ त्यांचा कारभारही सुरु झाला. आपल्याकडे मात्र मुख्यमंत्री कुणाचा यावरून सरकार स्थापन होण्याचं गाड अडलं आहे. मुख्यमंत्री पद आणि सत्तेतला सामान वाटा मिळावा ह्यासाठी भाजप-सेना युतीत रंगलेला कलगीतुऱ्याचा सामना रोज पाहायला मिळतो आहे. सुरुवातील ह्या सामन्यामुळे करमणूक होतेय असं वाटत असलं तरी, आता मात्र ह्या दोघांचीही कींव येऊ लागली आहे. काही दिवसांनी ह्या किवेचं रुपांतर किळस येण्यात झाली, तर कुणाला नवल वाटू मये. महाराष्ट्रातील राजकारण आणि सत्ताकारण किती हीन पातळीवर येऊन थांबलंय हे मात्र ह्यानिमित्ताने जगासमोर आलं.

निवडणूक लढायच्या, जिंकायच्या त्या फक्त सत्तेसाठी, लाभांच्या पदासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या लाभासाठी हेच यातून सिद्ध होतंय. अर्थात, कोणतीही निवडणूक हे युद्ध मानलं तर, युद्ध हे जिंकण्यासाठीच लढलं जातं. तसंच निवडणुकांचही आहे. निवडणुकाही जिंकण्यासाठीच लढल्या जातात. परंतु इतर युद्ध आणि निवडणका, यांच्यात एक महत्वाचा फरक असतो. तो म्हणजे, या निवडणूक युद्धात जिंको कुणीही, त्या जिंकलेल्याने सर्वसामान्य लोकांचं हित पाहणं हे अंतिम असत. महाराष्ट्रात नेमकं उलट चित्र दिसतंय; इथे आपापलं हित कशात आहे हे जिंकलेले पक्ष पाहत आहेत आणि जनतेला वाऱ्यावर सोडल्लं आहे, हे जे चित्र दिसतंय, ते अत्यंत विदारक आहे..! ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य’ ही लोकशाहीची व्याख्या बदलून आता, राजकारण्यांनी राजकारण्यांसाठी लोकांच्या जिवावर चालवलेलं राजकारण्यांचं राज्य’ अशी करायला हरकत नाही असं महाराष्ट्रातला सत्तेसाठी (पक्षी:मुख्यमंत्रीपदासाठी) चालवलेला तमाशा पाहून वाटायला लागलंय. असो..!

माझ्या लेखाचा विषय मुख्यमंत्री कोणाचा होणार हा नाही. तर, ह्या निवडणुकांचा मला लागलेला अर्थ काय, तो सांगणं हा आहे..!

महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-सेना युतीच्या बाजूने आपला कौल दिला. त्याच बरोबर काॅंग्रेस-राष्ट्रवादीलाही निराश केलेलं नाही. त्यांना विरोधीपक्षाची भुमिका बदावण्यास सांगितले आहे. ह्या चौघाही मुख्य पक्षांना त्यांच्या त्यांच्या पात्रतेप्रमाणे म्हणा वा क्षमतेप्रमाणे म्हणा, कौल देताना मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सरकार स्थापन करता येऊ नये याची व्यवस्थित काळजी घेतल्याचं दिसून येतं. कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी कौल देणं म्हणजे स्वत:च्या पायावर आणि भवितव्यावर स्वत:च धोंडा मारून घेणं, हे आपल्या मतदारांना अनुभवातून एव्हाना कळलं अाहे, असा याचा अर्थ. आपल्या नसानसांत राजेशाही रुजली असल्याने, कुणाही एकट्या पक्षाला मिळालेलं बहुमत त्या पक्षाला (आणि त्या पक्षाच्या समर्थकांनाही) लहरी, विक्षिप्त आणि एककल्ली राजासारखं वागायला भाग पाडतं, हे आपली गेल्या काही वर्षांचा अनुभव डोक्यात ठेवून, ह्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत न देण्याचा निर्णय घेतला, हे महाराष्ट्राच्या प्रकृतीशी सुसंगतच आहे. ‘अबकी बार…’ म्हणणाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या मतदारांनी ‘पंक्चर पार..’ असं उत्तर देऊन त्यांची खोड चांगलीच जिरवलेली दिसते. महाराष्ट्र माजलेल्यांचा माज उतरवण्यासाठीच इतिहासात प्रसिद्ध आहे. त्याचीच पुनरावृत्ती ह्या निवडणुकींत झाली, असा या निवडणुकांचा मला समजलेला अर्थ..!

आपल्याला लोकशाही समजलीय की नाही असं मला नेहेमी वाटायचं. कधी भावनेच्या आहारी जाऊन मतदान कारण, तर कधी आपल्या जाती-धर्माच्या उमेदवाराला मतदान करणं, अलीकडे तर दिखाऊ देशप्रेमाच्या कृत्रिम लाटेवर सवार होऊन मतदान करणं, ह्या लोकशाहीला मारक असलेल्या गोष्टी पाहून मला नेहेमी तसं वाटायचं. लोकशाहीत विरोधी पक्षाचं असता काम नये, अशी भावना अलीकडे बळावत जाऊन, देशातील विविध ठिकाणी त्या भावनेच्या आहारी जाऊन, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत झालेलं मतदान पाहून मी तसा निष्कर्ष काढलेला होता. महाराष्ट्राच्या ह्या निवडणुकांतही हे मुद्दे उपस्थित केले गेले, नाही असं नाही;परंतु त्या मुद्द्यांच्या आहारी न जाता महाराष्ट्रातील मतदारांनी शहाणपणाने केलेलं मतदान पाहून, किमान महाराष्ट्रातल्य मतदारांत तरी लोकशाही सुज्ञपणा येत चाललाय, असं म्हणायलाही मला आवडेल. विरोधी पक्षांशिवायची लोकशाही म्हणजे हुकूमशाहीच असते आणि ह्या एककल्ली हुकूमशाहीला, निदान महाराष्ट्रातल्या मतदारांना तरी, महाराष्ट्रात विरोध पक्षांना आपलं समर्थन देऊन ह्या निवडणूकीत महाराष्ट्रापुरता अटकाव केला आहे असा आणखी एक अर्थ मी माझ्यापुरता काढला आहे. असा अर्थ काढताना, महाराष्ट्रातले बहुतेक सर्व विरोधी पक्ष, विविध सरकारी यंत्रणांची भीती दाखवून सत्ताधारी पक्षांकडून रिकामे करण्याचा बराचसा यशस्वी म्हणावा प्रयत्न केला गेला होता आणि असं घडूनही विरोधी पक्षांचं संख्याबळ गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकांत किरकोळ का होईना, पण वाढलेलं आहे, हे मी लक्षात घेतलेलं आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुका गाजल्या त्या निवडणूकपूर्व पक्षांतराबद्दल. अर्थातच, हे पक्षांतर विरोधी पक्षातून सत्ताधारी किंवा ज्यांची सत्ता येण्याची खात्री वाटली, त्या पक्षांच्या दिशेने झालं. आम्ही कोणत्याही पक्षातून उभे राहिलो तरी आम्ही निवडून येणार(च ) असा ह्या पक्षांतर करणाऱ्यांचा समज होता की काय कुणास ठाऊक..! पण निवडणूक निकालानंतर, त्यापैकी बहुतेकांची जमिनीला पाठ लागली. ह्या वरून तो समज त्यांचा गैरसमज होता हे मतदारांनी ह्या निवडणुकांतून त्यांना आणि त्यांना आयात करणाऱ्या पक्षांनाही दाखवून दिला. ‘आम्हाला ह्यापुढे गृहीत धरी नका” असा इशाराच त्या त्या क्षेत्रातील मतदारांनी त्या त्या आयाराम-गयारामांना दिला असा ह्याचा अर्थ..!

राजकीय दृष्ट्या आणखी एक परिपक्वता महाराष्ट्रातूल मतदारांनी दाखवलेली दिसून येते. ती म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांनी ह्या निवडणकांत केलेला ‘NOTA’ ह्या पर्यायाचा प्रभावी वापर. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाने मतदारांना मिळालेल्या ‘नोटा’ ह्या ‘नकाराधिकारा’विषयी फारशी जागृती निवडणूक आयोगाकडून केली गेली नव्हती. ‘नोटा’ का वापरावा, हेच बहुसंख्य मतदारांना माहित नव्हतं. ह्यात अतिशिक्षित, सुशिक्षित आणि अशिक्षित, असे सर्व प्रकारचे मतदार आहेत. अनेकांना तर, नोटा वापरणं म्हणजे मत वाया घालवणं, असंच वाटायचं. परंतु ह्या निवडणुकांतून केला गेलेला ‘नोटा’चा प्रभावी वापर पाहून, मतदारांना आपल्या नकाराधिकाराची जाणीव होत चाललीय आणि याचाच अर्थ महाराष्ट्रातील मतदार राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होत चाललाय, असं मला म्हणावसं वाटतं. ‘आमच्यावर राज्य करण्यास तुमच्यापैकी एकहीजण पात्र नाही’ ही मतदारांची नाराजी ‘नोटा’च्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या नेत्यांपर्यंत पोहोचवता येते, हे मतदारांना समजत चललंय, असं म्हणायला हरकत नाही. ‘नोटा’चा सुज्ञ वापर यापुढच्या निवडणुकांते जेवढा जास्त होत जाईल, तेवढं आपल्या राजकीय व्यवस्थेचं शुद्धीकरण होत जाईल आणि राजकीय व्यवस्थेतून बाजूला फेकल्या गेलेल्या सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य येत जाईल, हे मतदारांनी यापुढेही कायम लक्षात ठेवायला हवं.

आपला देश हा असंख्य जाती-पंथ आणि धर्माचं आगर आहे. इथे कुठल्याही एका धर्मच किंवा जातीचं पगडा नैसर्गिकरीत्याच फार काळ राहत नाही. त्यामुळे त्या त्या धर्माचा आणि जातींचा अघोषित घोष करणारा कोणताही पक्ष किंवा कोणतेही पक्ष फार काळ अनिर्बंध सत्ता उपभोगू शकत नाहीत. त्यातून महाराष्ट्र तर नेहेमीच पुरोगामी विचारांचं राज्य राहिलं आहे. इथे तर ती शक्यताच नाही. आपल्या देशात आणि राज्यातही सरकार असलंच, तर ते युत्या आणि आघाड्यांचं असावं, असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटलं आणि म्हणून जनतेने असा कौल दिला असही मला वाटतं. थोडा मागचा आढावा घेतला तर, आपल्या देशात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या , त्या त्या युत्या-आघाड्यांच्या सरकारच्याच काळात घडलय हे लक्षात येत. (अर्थात, त्या काळात भ्र्रष्टाचारही घडला. पण भ्रष्टाचार हा राजकारणाचा आता स्थायी भाव झालेला आहे आहे. सर्वच पक्ष आणि नेते तो करत असतात. मुळात लोक राजकारणात, त्यातही सत्तेत जातात, तेच कायद्याच्या संरक्षणात राहून भ्र्रष्टाचार करण्यासाठी असं आपलं माझं मत आहे. उगाच का मंत्रिपदाचा वर्गीकरण चांगली मंत्रीपदे आणि दुय्यम मंत्रीपदे असं केलं जातं ?). तरीदेखील युत्या आणि आघाड्यांच्या सरकारांत, सत्ताधारी पक्षांमधलय रस्सीखेचीत, सत्तेचा तोल सांभाळला जातो, हे गेल्या पाच वर्षात आपण महाराष्ट्रात पाहिलेलं आहे. ते लक्षात घेऊनच जनतेने यंदाही ‘आपल्याला हंग गव्हर्नमेंट’ हवं असा कौल दिला, असाही एक अर्थ मला ह्या निवडणुकांच्या निकालातून दिसतो.

आणखी एक महत्वाचं निरीक्षण ह्या निवडणुकीत मी नोंदवलं आहे. ते म्हणजे, जेंव्हा जेंव्हा लोकशाही व्यवस्था ध्वस्त करण्याचे प्रयत्न होतात, तेंव्हा तेंव्हा भारतीय मतदार निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रयत्नांना हाणून पाडतो. अहं डोक्यात भिनलेल्या राजकारण्यांना भारतीय मतदार नेहेमीच धडा शिकवत आलेला आहे, हा इतिहास आहे. आपल्या लोकशाहीत नेत्यांचा आणि पक्षांचं उदो उदो होत आलेला असला तरी, आपल्या लोकशाहीचा खरा केंद्रबिंदू मतदार हाच आहे, इथे कुणाचा माज चालत नाही आणि हे राजकारण्यांनी आणि राजकीय पक्षांनी नेहेमी लक्षात ठेवावं, असा धडा भारतीय मतदार वेळ येताच त्यांना शिकवत आला आहे. महाराष्ट्राच्या सोबतीनेच झालेल्या हरियाणातल्या निवडणुकांबद्दल माझा अभ्यास नाही, परंतु हरयाणातल्या मतदारांनीही हाच विचार केला असावा. महाराष्ट्र तर विचारी राज्य आहे, इथेही ह्याच भावनेनं मतदान केलं गेलं, हा महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या निर्णयाचा महत्वाचा अन्वयार्थ..!

-नितीन साळुंखे

‪9321811091‬

06.11.2019