माझं ‘पुल’दैवत..!!

माझं ‘पुल’दैवत..!!

पु.ल.देशपांडे, अर्थात ‘पुल’. पुलंना मी माझं ‘पुल’दैवत मानतो. आज पुलंचा जन्मदिवस. मी देवळातल्या देवाला नाही, मात्र पुलंना माझं दैवत मानलं आहे. परंतु आज पुलं आपल्यात असते आणि माझे हे शब्द त्यांनी वाचले असते, तर ह्यातील दैवत ह्या शब्दाला पुलंनी हरकत घेतली असती. अर्थात, मी ही तो शब्द ‘देव’ ह्या अर्थाने वापरला नाही..

पुलंनी देवाला नाकारलं नाही, मात्र देवाच्या नांवाखाली विविध धर्मस्थळांच्या ज्या टपऱ्या, दुकानं आणि मॉल्स चालतात, त्याला मात्र पुलंनी त्यांच्या साहित्यातून विनोदाच्या सोट्याने भरपूर झोडपलेलं आहे. देवाच्या नांवाखाली चालणाऱ्या बुवाबाजीला पुलंनी नेहेमीच विरोध केला आहे. आणि लोकांनी त्यांच्या नादाला न लागता, प्रत्येकाने आपापल्या सद्सद्विवेकबुद्धीने वागावं, असा नकळतचा उपदेश केला आहे. पुलंना आपण डोक्यावर घेतलं, पण त्यांची ही शिकवण मात्र कधीही मनावर घेतली नाही. पुलंच्या साहित्यावरच माझा पिंड पोसलेला असल्याने, माझ्या विचारांवरही पुलंच्या विचारांचा पगडा राहिलेला आहे.

माझाही देवाला विरोध नाही, मात्र दैवतीकरणास नेहेमीच विरोध राहिलेला आहे. देवा पेक्षा देवाच्या दैवतीकरणाने आपल्या सर्वच समाजाचा ताबा घेतलेला आहे. शिक्षणाने हे सर्व कमी होईल असा आशावाद अनेक थोऱ्या-मोठ्यांनी गत काळात व्यक्त केला होता. मात्र तसं काहीच घडलेलं दिसत नाही. उलट वाढत्या शिक्षणाबरोबरच आपल्या समाजातलं दैवतीकरणाचं महत्व तेज गतीने रोजच्या रोज वाढताना दिसत आहे आणि परिणामी आपला समाज अधिक निष्क्रीय होत चाललेला दिसत आहे. एकदा का देवावर भरवसा टाकला, की मग आपल्याला भक्तीशिवाय करण्यासारखं काहीच शिल्लक राहात नाही. ह्यातून वाढते ती फक्त निष्क्रियता आणि देववरच अवलंबित्व. हे फक्त हिन्दूंमधेच होतंय असं नाही, तर हिन्दू संस्कृतीचाच भाग असलेल्या आपल्या समाजातील इतरही सर्व धर्मियांत ही परिस्थिती दिसून येते. देवाची नांव वेगळी, भक्त आणि देव यांत संवाद साधून देणाऱ्या मध्यस्थ-दलालांची नांवं धर्मानुसार वेगवेगळी, पण वृत्ती तिच, सामान्य लोकांना देवाच्या नांवाखाली आपल्या कच्छपी लावण्याची..! पुलंनी, ते आज असते तर, हे कदापिही सहन केलं नसतं..!!

भारतीय समाजमनाची जडण-धडण अध्यात्मिक असल्याने, भारतीय माणसं कुणाचाही चटकन देव बनवून टाकतात. हा खेळही तसा फार जुनाच आहे. कुणालाही देव म्हणून देव्हाऱ्यात बसवलं, की मग आपली सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकून आपण बेजबाबदार वागायला मोकळे होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण ह्यासाठी पुरेसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपण ‘महाराष्ट्राचं आराध्य दैवत’ बनवून टाकलं. पण महाराजांचे गुण, महाराजांचं न्यायीपण, महाराजांची तत्वनिष्ठा आपल्यापैकी किती जणांनी आपल्या अंगात बाणवली ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर, हाती फक्त निराशाच येईल. महाराजांना देव बनवून पुजणाऱ्याना, महाराजांसारखा पराक्रम गाजवून आपणही काही तरी लोकोत्तर कर्तुत्व गाजवावं, असं मात्र वाटत नाही, म्हणून तर आज ३-४०० वर्षांनतरही महाराजांचं नांव आपल्याला घ्यावं लागतं. त्या तोडीचा लोकोत्तर पुरुष महाराष्ट्रात नंतर निपजला नाही, हा आपला कमीपणा तर आहेच, शिवाय महाराजांचाही अपमान आहे.

आजची परिस्थिती आणखीनच वेगळी आहे. विविध क्षेत्रात, विशेषतः राजकारणात, स्वयंभू देव तयार झाले आहेत. कुठलंही पाच-पोच नसलेली हुशार, बुद्धिमान माणसं त्यांच्या नादाला लागलेली आहेत. दैवतीकरणाची प्रक्रिया ह्या देशात एकदम जोरात सुरु आहे. ह्या दैवतीकरणात ज्या भक्तांचं उखळ पांढरं होणार आहे, ते त्या त्या दैवतांची भक्ती, त्या त्या दैवताचे भक्तगण आंधळे आणि बहिरेपणाने करत आहेत. देवाने, म्हणजे आकाशातल्या देवाने, आपल्याला बुद्धी नामक एक इंद्रिय दिलं आहे आणि ते विचार करण्यासाठी दिलेलं आहे, हे कुणाच्याच ध्यानात असलेलं दिसत नाही. माझ्या देवाने फक्त माझं भलं करावं, मग बाकीच्या दुनियेचं वाटोळं झालं तरी चालेल, अशी मानसिकता वाढीला लागलेली आहे. देवाची भक्ती करायला हरकत नाही, मात्र ती भक्ती डोळस असावी. त्या त्या देवाची भक्ती करताना, देवही पारखून घ्यावा. पारखून घ्यावा अशासाठी म्हटलं की, हल्ली देवाच्या रूपात सैतानच सगळीकडे माजलेले दिसत आहेत. त्यांच्या सैतानी कारवायांवर टीका करण्यापेक्षा, पुलंच्या वाटेवर चालणारे साहित्यातले बहुसंख्य नामवंत वारकरी गप्प आहेत. वास्तविक समाजाला योग्य ते नि:पक्ष मार्गदर्शन करण्याची जबाबदारी साहित्यिक आणि कलावंतांची असते. परंतु आजच्या दैवतीकरणाच्या लाटेत, असे बहुतेक प्रतिभावंत, आपलाच देव कसा चांगला हे सांगत, त्या त्या देवाच्या देवळात चाळ कुटताना दिसत आहेत. जे बोलतात, त्यांना वेगळ्याच कुठल्यातरी देवाचे भक्त म्हणून शिक्का मारण्यात विरोधी भक्तगण मश्गुल आहेत. आमचा देव ताकदवान झाला, की आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशा प्रेमळ सूचना दिल्या जात आहेत. सर्वत्र आपापल्या दैवतांचं उदोउदो आणि अंधानुकरण करण्याच्या लाटेत, आमच्यासारख्याना आधार देणाऱ्या पुलंची कमतरता कधी नव्हे एवढी आमच्यासारख्याना जाणवतेय..

आवाज पुलंची जन्मशताब्दी. पुलंसारख्या लोकोत्तर साहित्यिक-तत्त्ववेत्त्यांची, समाजाला दिशादर्शन करणारांची जन्मशताब्दी साजरी करून आपण काय साधणार? त्या पेक्षा त्यांचे विचार अंगी बनवण्याची खटपट केली तर ते अधिक उत्तम होईल. पण तस करायचं तर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, अनेकांशी वाकडेपणा घ्यावा लागतो, सर्वात महत्वाचं म्हणजे, स्वार्थाला तिलांजली द्यावी लागते. ते कोण करणार? त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज किंवा पुलंसारख्याना देवता बनवून त्यांच्या जयंत्या-मयंत्या धुमधडाक्यात साजऱ्या करणं केंव्हाही सोपं. एकदा का त्यांना देवत्व दिलं, तर मग त्याच्यासारखा विचार करण्याची, वागण्याची कोणतीही जबाबदारी आपल्यावर येत नाही. हा मार्गच सर्वात चांगला नाही का आजच्या काळात?

मी मात्र असं कारण नाकारलंय. मी मनोमन पुलंना माझं ‘पुल’दैवत मानलंय, ते त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करण्यासाठी. कुणाचीही, अगदी (असलाच तर) आकाशातल्या देवाचीही भक्ती मी आंधळेपणाने करणार नाही. माझ्या पुलदैवतांची ही शिकवण मी नेहेमी लक्षात ठेवेन..! हाच त्याचा आशीर्वाद आणि प्रसादही समजेन.

– नितीन साळुंखे

9321811091

08.11.2019

पुलंचं चित्र व्हॉट्सअँपवरून प्राप्त