भाजप-शिवसेनेतील भांडणाचं नक्की कारण काय असावं?

भाजप-शिवसेनेतील भांडणाचं नक्की कारण काय असावं?

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत, शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष युती म्हणून मतदारांना सामोरे गेले आणि सत्ता स्थापन करता येईल इतक्या जागा महाराष्ट्रातील मतदारांनी त्यांच्या झोळीत टाकल्याही. तशी ह्या दोन पक्षांची युती फार जुनी, तीस वर्षांपासून चालत आलेली. भांडत भांडत का होईना, ते एकत्र नांदत आलेले आहेत. गेल्या निवडणुकांच्या खेपेस हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, मात्र निकालानंतर अगदी ऐनवेळी ते एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. गेली पांच वर्ष हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असूनही सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसत आले आहेत. सत्तेत सहभागी असलेल्या या दोन्ही पक्षांनी वेळोवेळी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, हे आपल्याला आठवत असेल. असं असूनही ह्या दोन्ही पक्षांनी यंदाची विधानसभा निवडणूक मात्र एकत्र लढवली आणि सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेलं संख्याबळही मिळवलं. मात्र असं असूनही ते एकत्रितरित्या सत्ता स्थापन करू शकलेले नाहीत. ‘’मुख्यमंत्री कुणाचा’ यावर सर्व गाडं अडलेलं होतं आणि आता हे गाडं पार दुरुस्त होण्याच्या पलीकडे गेलेलं आहे.

शिवसेना आणि भाजप ह्यांच्यातलं भांडण मुख्यमंत्री कुणाचा, ह्यावरून आहे, हे आपण सर्व जाणतोच. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रपदासाठी हटून बसले आहेत. निवडणुकांच्या पूर्वी ह्या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांत पदं आणि जबाबदाऱ्या कशा वाटल्या जाव्यात ह्याची चर्चा झाल्याचं आणि त्या प्रमाणे आता पदं आणि जबाबदाऱ्या ह्यांचं वाटप होत नसल्याचं सांगत, दोन्ही पक्ष एकमेकांवर खोटारडेपणाचे आरोप करीत आहेत. खरं पाहता, ज्या पक्षाचे आमदार संख्यने जास्त, त्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, हा साधा तर्क आहे. ह्या परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री होणं क्रमप्राप्त होत. पण तसं न होता, भाजपच्या तुलनेत शिवसेनेच्या जागा कमी होऊनही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर आपला दावा केला आणि तो दावा शिवसेना कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्याच्या मन:स्थितीत नाही. आता ह्या दोघांचं एवढं फाटलंय, की पुन्हा ते एकत्र येतील अशी परिस्थिती राहीलेली नाही. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, हे जरी खरं असलं तरी. भाजप-सेना युती पुन्हा कधी एकत्र नांदू शकेल, याची शक्यता आता अत्यंत धुसर झालेली आहे.

शिवसेना भाजपमधे एवढा टोकाचा दुरावा का यावा? ह्या दोघांतील तीस वर्षांच्या मैत्रीला न सांधण्याएवडा तडा का जावा, ह्यामागे नक्की काय कारण किंवा कारणं आहेत, ह्याचा विचार केला असता, एक कारण ठळकपणे समोर येतं आणि ते म्हणजे, हिंदुत्व..! महाराष्ट्रातल्या हिंदू व्होट बँकेची ह्या दोन पक्षांमधे गत तीस वर्षांच्या कालावधीत होत गेलेली विषम विभागणी..! तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोठा भाऊ असलेली शिवसेना आता भाजपच्या तुलनेत अगदी धाकटी झालेली आहे आणि शिवसेनेची व्होट बॅंक भाजपने आपल्या ताब्यात जवळपास घेतलेली आहे. आणि आता जर भाजपला शह दिला नाही, तर मग आपल्या भविष्यातील अस्तित्वालाच धोका निर्माण होईल, हे शिवसेनेच्या लक्षात आलं आहे आणि म्हणून मुख्यमंत्रीपदाचा वाद उकरुन शिवसेना भाजपच्या विरोधात उभी ठाकलीय, असं मला वाटतं..!

वरच्या परिच्छेदातलं माझं म्हणणं अधिक स्पष्ट करून सांगतो. महाराष्ट्रात (कदाचित देशातही, माहित नाही) हिंदुत्वाचा उघड पुरस्कार करणारे आणि हिंदुत्वाच्या नावावर मतं मागणारे हे दोनच राजकीय पक्ष आहेत. किंबहुतना ते एकत्र येण्यात हिंदुत्व हा त्यांच्यातला एकमेव सामान मुद्दा आहे. देशातील बहुसंख्य हिंदूंचा उघड उच्चार करून, हिंदूंच्या भल्यासाठी डंके कि चोट पर राजकारण करण्याचं धाडस करणारे आणि त्या धाडसामध्ये बऱ्यापैकी यशस्वीही होणारे हे दोनच पक्ष आहेत. त्यातील भाजप हा देशव्यापी राष्ट्रीय पक्ष आहे, तर शिवसेनेची ताकद महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा शिरकाव झाला तो शिवसेनेचं बोट धरूनच. आपण फार मागचा विचार न करता, गेल्या १५ वर्षांचा इतिहास पाहू. २००४ सालची विधानसभा निवडणूक भाजप-सेनेने युतीत लढवली. शिवसेना त्यावेळी मोठ्या भावाच्या भुमिकेत असल्याने, सेनेने जास्त जागा लढवल्या, तर धाकट्या भाजपने तुलनेत कमी जागा लढवल्या. असं असूनही त्यावेळी भाजपचा स्ट्राईक रेट सेनेपेक्षा जास्त होता. ह्या निवडणुकीत भाजपने ५४ तर सेनेने ६२ जागा जिंकल्या. त्या वेळपर्यंत भाजप धाकटाच होता. त्या नंतर झालेल्या २००९च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि सेनेने अनुक्रमे ४६ आणि ४४ जागा जिंकल्या. या निवडणीकतही सेनेच्या तुलनेत भाजपचा स्ट्राईक रेट जास्त होता. सेनेच्या तुलनेत भाजपला दोन का होईना, पण जास्त जागा मिळाल्या होया. धाकट्या भावाची उंची वाढू लागली होती. याच निवडणूकीत सेनेची उंची कमी व्हायला आणखी एक घटक कारणीभूत ठरला, तो म्हणजे शिवसेनेतून फुटून निघालेल्या श्री. राज ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने(मनसे)’ने निवडणूकांत घेतलेला यशस्वी सहभाग. मनेसेने या त्याच्या पहिल्याच निवडणुकीत १३ जागा जिंकल्या. मनसेला मिळालेल्या मतांमधे शिवसेनेच्या मतांचा बराच मोठा टक्का होता. तिकडे हिन्दुत्वाच्या मुद्द्यावर सेनेशी युती केलेला भाजप सेनेची मतं कायमची आपल्या बाजुने कशी येतील याचा प्रयत्न करत असतानाच, मनसेने मराठी माणसाचा मुद्दा उचलून सेनेच्या मतांत घट केली होती. सेनेची उंची कमी होण्यास इथुनच सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकू नये.

२०१४ साली झालेली निवडणूक मात्र दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली व ह्यात भाजपने तब्बल १२२ जागा जिंकल्या तर सेना ६३ जागांवर रेंगाळली. ह्या निवडणकांत भाजपला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व ‘अच्छे दिन आयेंगे’चा नारा देत त्याच वर्षी देशाच्या पंतप्रधानपदावर आरूढ झालेल्या श्री. नरेंन्द्र मोदी यांच्या करिश्म्याचा व लाटेचा फायदा झाला. भाजपचं हिन्दुच्व अधिक कडवं होण्यास सुरूवात झाली, ती याच सुमारास. याचा परिणाम भाजपचं संख्याबळ लक्षणीयरित्या वाढण्यास झाला. श्री. राज ठाकरेंच्या मनसेला ह्या निवडणुकीत फारसं यश मिळालं नाही. त्यांच्या मताचा काही टक्का सेनेकडे, तर बराचसा भाजपकडे वळला. सेनेचं थोरपण जाऊन आता सेना धाकटी बनली होती. भाजपने हिन्दू मतांचा आणि मनसेने मराठी मतांचा आपल्या हातून हिसकावून घेतलेला टक्का पाहून सेना अस्वस्थ झाली असावी असं म्हणता येतं आणि सेनेच्या ह्या अस्वस्थपणाचे दृष्य परिणाम सेने-भाजप ह्या एकत्र सत्तेत असुनही एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या आणि सेनेकडून सातत्याने राजीनामा देण्याच्या धमक्यांच्या राजकारणातून गेला पांच वर्ष आपण सारेच पाहात आलेलो आहेत. मनसेला सेनेने अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला.

यंदा झालेल्या ताज्या निवडणूकांचा निर्णय आपल्या समोर आहे. त्यानंतरचं सत्तानाट्यही आपण दररोज पाहातो आहोत. ते इतक्या निर्लज्जपणाने सुरू आहे, की सुरुवातीला होणाऱ्या मनोरंजनाचं रूपांतर, आता त्या सर्वांबद्दलच एकप्रकारची किळस निर्माण होण्यात झालं आहे. परंतु, त्याबद्दल न बोलता, सेना तिच्या जागा कमी होऊनही मुख्यमंत्रीपदासाठी का अडून बसलीय, त्या मागचं मला वाटणारं कारण पाहू.

जन्माच्या वेळी मराठी माणसाच्या भल्यासाठी म्हणून स्थापन झालेली शिवसेना, पुढे हिंदुत्वाच्या मार्गाने गेली. हिंदुत्वावर मतं मागणारे हे दोनच पक्ष असल्याने, निदान महाराष्ट्रात तरी, त्यापैकी एकाची घट झाल्याशिवाय दुसऱ्याची वाढ होऊ शकत नाही, हे काही नव्याने सांगायची गरज नाही. २०१४ साली विकासाचा जयघोष करत केंद्रात भाजपप्रणित एनडीएला मिळाले सत्ता, श्री. नरेंद्र मोदींसारखे करिश्माई नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी हिंदुत्ववादी देशव्यापी संघटना ह्याचा अपरिहार्य परिणाम, त्यानंतर देशभरात झालेल्या निवडणुकांत होऊन देशभरातले बहुतेक सर्वच पातळीवरील सत्ताकेंद्र भाजपच्या ताब्यात गेली. अशी सत्ता केंद्र स्थापन करताना भाजपने त्या त्या राज्यातल्या प्रबळ प्रादेशिक पक्षांचं आधार घेतला होता आणि नंतरच्या पांच वर्षांच्या काळात त्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांचा प्रभाव पद्धतशीरपणे कमी कमी करत आणला होता. महाराष्टातही हेच घडलं आणि सेनेमधे आपल्या भविष्यातल्या अस्तित्वावरच घाला येतो आहे हे पाहून अस्वस्थता निर्माण झाली.

ह्या अस्वस्थतेतूनच आपलं हिंदुत्व भाजपपेक्षा कमी नाही हे दाखवण्यासाठी शिवसेनेने भाजपाला निकराचा विरोध सुरु केला. लोकसभा निवडणुकीच्या आगे-मागे शिवसेना पक्षाध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी ‘पहले मंदिर, बाद मे सरकार’ असा नारा देत सहकुटुंब जी अयोध्या यात्रा केली, त्यामागे भाजपाकडे हिंदुत्वाच्या नांवावर जाणारा आपला जनाधार थांबण्यासाठीच होता, असा निष्कर्ष काढता येतो. अगदी अलीकडेही, अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर, श्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येत होणाऱ्या राममंदिराच्या पहिल्या चार विटा शिवसेनेच्या असतील असं जे काही शिवसेनेकडून सांगितलं गेलं, त्या मागे उरली सुरली हिंदू व्होट बँक शिवसेनेपासून दुरावू नये हाच प्रयत्न होता असं म्हणता येईल.

सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाने स्वत:च्या बळावर संसदेत पूर्ण बहुमत मिळवलं. भाजपला तर आता कुणाचीच आवश्यकता राहिलेली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. याचे पडसाद त्यानंतर लगेचच होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दिसणार आणि भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करणार, असा आत्मविश्वास भाजप नेतृत्वाला आला. भाजपचा हा (अती)आत्मविश्वास त्याच्या नेत्यांच्या व सोशल मिडियातील भाजप समर्थकांच्या उद्दाम बोलण्यातून आणि नेत्यांच्या तेवढ्याच आक्रमक देहबोलीतून दिसू लागला होता. यातूनच भाजपने सेनेला कोलायला आणि मतदारांनाही गृहित धरायला सुरूवात केली. याच सहा महिन्यांच्या काळात भाजपच्या दिखावू देशप्रेमातली हवा निघून जाऊ लागली होती. देशभरात अनेक उद्योग बंद पडू लागले होते. बेकारी वाढू लागली होती. शेतकरी कधी नव्हे एवढा अस्मानी संकटात सापडला होता. भाजपच्या विरोधात जनमत तयार होत होतं, पण जनतेला बेगडी देशभक्तीचे तीनशेसत्तरी डोस पाजण्यात मग्न असलेल्या भाजपला बदलत्या जनमताचा अंदाज येत नव्हता. स्वप्रतिमेच्या प्रेमात पडलेल्यांना आजुबाजूच्या परिस्थितीचं भान राहात नसतंच. भाजपचं तसंच झालं आणि लोकसभेच्या निवडणुकांत मिळवलेल्या दैदिप्यमान यशानंतरच्या अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांत, ‘अब की बार कितीतरी पार’च्या उन्मादात अडकलेल्या भाजपचं गाडं अवघ्या १०५ जागांवर (‘कमळा”वर निवडणूक लढवलेल्या मित्रपक्षांच्या जागांसहित) येऊन थांबलं.

निवडणुकांच्या निर्णयानंतर भाजपच्या फुग्यातील हवा गेली आणि भाजपपासून अनेक मुद्द्यांवर दुरावलेली मतपेढी, भविष्यातल्या आपल्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण होऊन अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने आपल्या ताब्यात घेण्यासाठी लगेचच प्रयत्न सुरू केले. दोन भावांतील वारशातील वाटणीचं, हे भांडण आहे, असं माझ्या लक्षात येतंय. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदा’साठी हटून बसणे, प्रसंगी युती तोडण्यास मागेपुढे न पाहाणे, हे त्यातूनच आलेलं आहे. पुन्हा भाजपचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व यात मोठा फरक आहे. भाजपचं हिंदुत्व सांगण्यासाठी सर्व हिन्दूंसाठी असलं तरी, प्रत्यक्षात ते तसं नाही, हे आता अनेकांच्या लक्षात येत गेलंय. उमानाबाद येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांची निवड झाल्यानंतर, त्यांच्या निवडीवर ज्या संस्थांनी आणि व्यक्तींनी जाहीर हरकत घेतली, त्याकडे नजर टाकली असता, भाजपच हिंदुत्व कोणत्या प्रकारचं आहे, हे सहज लक्षात येऊ शकत. तसेच, हे लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी फेसबुकसारख्या समाज माध्यमावर सक्रिय असलेल्या भाजप समर्थकांनी त्यांच्या नकळत मोठी भूमिका बजावलेली आहे. ह्या सर्वच गोष्टींचा परिणाम, सर्वसामान्य मतदार भाजपपासून दुरावण्यात झाला. भाजपपासून दूर जाऊ पाहणारी ही सर्वसामान्य हिन्दुंची व्होटबॅंक आपल्या बाजूने करण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न आहे, असं मला वाटत. शिवसेना ही सर्व हिन्दुंसाठी, विशेषतः हिंदूंमधील सर्व जाती जमातींसाठी आहे (आणि खरंच ती तशी आहेही..!), हे शिवसेना गेल्या वीस-पंतवीस दिवस अप्रत्यक्षपणे, पण मुद्दामहून दाखवून देत आहे. २४ आॅक्टोबर नंतरच्या शिवसेनेच्या चालींचा निट अर्थ लावला तर, ही सहज लक्षात येणारी बाब आहे. शिवसेनेचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा संघर्ष हा, भाजपपासून दुरावलेल्या सर्वसामान्य हिंदू मतांची मतपेढी आपल्याकडे खेचण्यासाठी चाललेला संघर्ष आहे, असं माझं मत आहे.

ह्यात शिवसेना भविष्यात कितपत यशस्वी होते, हे पाहाणं औत्सुक्याचंच ठरेल..!!

-नितीन साळुंखे

9321811091

17.11.2019

(लेख शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या दुरावलेल्या संबंधांचं कारण शोधणारा असल्याने, ह्यात इतर पक्ष आणि त्यांचं राजकारण याचा विचार केलेला नाही.)

प्रसिद्धी- ‘साप्ताहिक किरात’, वेंगुर्ले. दिनांक २०.११.१९