भारतीय संविधान चिरायू होवो..!

आज ‘संविधान दिवस’..!

काही काळापूर्वी महाराष्ट्राचे उप- मुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची आणि आताच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यासाठी राज्यपालांकडे जाणार असल्याची बातमी ऐकली. गेला माहिनाभर, संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपून, संविधानिक मूल्यांचे आचरण करण्याची नाटकं करणाऱ्या, परंतु, प्रत्यक्षात संविधानिक मूल्यांचा पालापाचोळा करून त्यावर थयथया नाचू पाहणाऱ्या राजकीय पक्षांचा आणि ज्यांच्यावर संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे अशा गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या आणि संविधानिक पदावर विराजमान असलेल्या काळ्या टोप्यांचा आणि पाताळयंत्री डोक्यांचा जे काही निर्लज्ज नर्तन सुरू होत, त्याला ह्या राजीनाम्या प्रकरणाने वेगळं वळण मिळालं आणि सामान्य माणसांच्या इच्छा आकांक्षांची ताकद असलेल्या संविधानाची, त्या शक्तींना असलेली जरब पुन्हा एकदा आपल्या समोर आली.

संविधानावरून लोकांचा विश्वास उडावा आणि संविधानाच्या आधारावर उभ्या असलेल्या लोकशाही समाजव्यवस्थेबद्दलच एकंदर समाजात घृणा निर्माण व्हावी म्हणून हे सर्व खेळ मुद्दाममहून केले जात होते की काय, ह्याची दाट शंका यावी, अश्या पद्धतीने हे सर्व खेळ चालू होते. एकदा का जनतेचा संविधान आणि संविधानाचा भक्कम आधार घेऊन उभ्या असलेल्या लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडाला, की मग आपल्याला (म्हणजे त्यांना) आवडणारी एखादी ‘शाही’ ह्या देशावर लादणं सोपं होईल, याच हेतूने हे सर्व काही सुरू होत, अशाच पद्धतीने हे सर्व सुरु होत. महाराष्ट्रातील निवडणुकांत आपण पार पाडलेल्या मतदानाच्या ‘पवित्र कर्तव्या’नंतर, निवडून आलेल्या माणसांचा सुरू असलेला अपवित्र पावित्रा पाहून, अनेकजण, ‘या पुढे आपण मतदान करायचंच कशाला?’ असा प्रश्न उपस्थित करून, एकंदर मतदान प्रत्रियेविषयीच निराशा प्रकट करत होते. लोकशाहीतल्या अत्यंत महत्वाच्या प्रक्रियेविषयी लोकमाणसात उदासीनता निर्माण झाली, की मग लोकशाहीच धोक्यात येऊन, ज्या संविधानाने आपल्याला आपला आवाज आणि अस्तित्वही दिलंय, ते संविधान संदर्भहीन होऊन रद्दी पुस्तकागत पडावं, यासाठी आपल्याच देशातील काही शक्ती कार्यरत असाव्यात की काय, हयाची खात्री पटत चालली असतानाच, अनैतिक पद्धतीने सत्तेवर कब्जा करू पाहणाऱ्याना, आजच्या ‘संविधान दिवशी’च तोंडावर पडण्याची पाळी यावी, यामागे सामान्य माणसाचा संविधानावरील विश्वास उडू नये, हाच संकेत असावा असं मी समजतो.

संविधान कितीही चांगलं असलं तरी, ते अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या संविधानाचे मातेरे होते. मात्र संविधान कितीही वाईट असलं आणि ते राबवणारे लोक चांगले असतील तर ती संविधान निःसंशय चांगले ठरते, ह्या अर्थाचे विधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी केले होते. आपल्या संविधानाचा अपमान करण्याचा यशस्वी-अयशस्वी प्रयत्न सर्वच सत्ताधार्यांनी वेळो वेळी केला आहे. परंतु भारतीय समाजातील असंख्य जाती-जमाती, उंच-निचतेच्या कल्पनांनी, गावकुसाबाहेर राहण्यास मजबूर केलेल्या मोठ्या जनसमुदायास, इतर भारतीय समाजाच्या बरोबरीने, भारतीय समाजाचा सन्माननीय घटक म्हणून, विशेषतः माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधानच नैतिक अधिष्ठानच इतकं, पवित आणि नतिक आहे की, तसे प्रयत्न करणारांना वेळोवेळी त्याच्या नैतिकतेपुढे आणि पावित्र्यापुढे मान तुकवावी लागली आहे. इथे संविधान राबवणारे लोक पवित्र किंवा चांगले आहेत की वाईट, हा प्रश्नच उद्भवत नाही, मात्र ते ज्यांच्यासाठी राबवायचे आहे, ते लोक मात्र संविधानावर असीम श्रद्धा ठेवणारे आहेत आणि म्हणून आपल्या मनाप्रमाणे संविधान राबवू पाहणाऱ्या लोकांना वेळ येताच संविधानापुढे आणि त्यावरील सामान्य लोकांच्या अदृश्य श्रद्धेपुढे नमते घ्यावेच लागते..!

आज पुन्हा एकदा हे सिद्ध झाले.

ही आहे सामान्य माणसांसाठी सामान्य माणसांनी जन्माला घातलेल्या संविधानाची ताकद आणि जरब..!

भारतीय संविधान चिरायू होवो..!

-नितीन साळुंखे

9321811091

26.11.2019