यापुढे केवळ बुद्धिनिष्ठ विचारच आपल्याला तारू शकेल..

यापुढे केवळ बुद्धिनिष्ठ विचारच आपल्याला तारू शकेल..

महाराष्ट्र विधानसभेची यंदाची निवडणूक फार गाजली. निकालानंतर सर्वच पक्ष सत्तास्थापनेसाठी ज्या कोलांटउड्या मारण्यात दंग झाले होते, त्या पाहून सुरुवातीला मनोरंजन, नांतर उत्कंठा, नंतर कंटाळा आणि शेवटी शेवटी तर वैताग येऊ लागला होता. ‘ह्या पक्षांचं जे काही चालू होत, ते फक्त सत्तेसाठी होत आणि ज्या जनतेच्या आशा आकांक्षांवर आणि मतावर हे सर्वजण निवडून आले आहेत, त्या जनतेशी ह्यांचा काहीच संबंध नाही;किंबहुना कधीही नव्हता, हा सर्वात महत्वाचा धडा मी ह्या निवडणुकीतून शिकलो. अर्थात हे काही नवीन नाही, पण उम्मीद पे दुनिया कायम है ह्या उक्तीनुसार दार निवडुकानानंतर काहीतरी बदलेल अशी अशा धरून मतदान केलं जात. नंतरचा ह्या राजकीय पक्षांचा कारभार पाहून मात्र दरवेळेस ते वाया गेलं असंच वाटत. ह्या निवडणुकीनंतर तसंच वाटलं. पण त्याचसोबत ह्या निवडणुकीने जनमानसावर एक नकळतच परिणाम केला आहे, ज्याचे पडसाद आपल्याला येत्या काळात जाणवत राहणार आहेत आणि तो म्हणजे, ह्या निवणुकीने मतदारांची ‘भविष्यात चांगलं काही होईल’ ही उमेद मात्र पार घालवून टाकली आहे. आपल्या देशातले एकूणच राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा, संविधानिक पदं ह्याविषयी कमालीची उदासीनता जशी माझ्या मनात भरून राहिली आहे, तशीच आपल्याही मनात भरून राहिली असावी, अशी माझी खात्री आहे.

ह्या निवडणुकीने शिकवलेला दुसरा धडा म्हणजे, प्रत्येक राजकीय पक्षाचे तळाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाची बाजू घेऊन एकमेकांच्या उरावर बसले होते. अगदी एकमेकांची आयमाय उद्गारात होते. हे ही प्रत्येक निवडणुकीतून होत आलय. पण सोशल मिडियाच्या आणि साक्षरतेच्या कुपोषित प्रसारामुळे, ह्या प्रकारची पातळी बिभित्स वाटावी एवढ्या निम्न पातळीवर घसरली होती. तिकडे राजकीयपक्ष आणि त्यांचे शीरसस्थ नेतेही ह्यात मागे नव्हते. कार्यकतें एकमेकांचे गळे दाबण्यासाठी एकमेकांच्या उरावर बसत होते, तर राजकीय पक्ष भाद्रपदीय श्वानांसारखे जुगण्यासाठी, हाच काय तो फरक. पातळी दोघांनीही सोडली होती. राजकीय क्षेत्रातून किमान सभ्यता आता पार तडीपार झालेली आहे, हे पाहून जनतेत राजकीय उदासीनता आणखी वाढीला लागलेली दिसत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी लोकशाही व्यवस्थेची केलेला हा विकृत कुंटणखाना पाहून अनेक जणांनी पुढच्या निवडणुकांतून ‘नोटा’ पर्याय वापरण्याची भाषा केली आहे, ते ह्या व्यवस्थेविषयी वाढत चाललेल्या उदासीनतेचंच द्योतक आहे.

मी आता पर्यंत बोलायच टाळत होतो, पण आता मात्र बोलावत लागेल अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात वाढीला लागलेली जातीयता. ह्या निवडणुकीच्या आणि निवडणुयक निकालानंतर ती स्पष्टपणे समोर आली. अगदी निर्लज्ज उघड्यानागड्यापणाने समोर आली. आता हे कुणीही कबूल करणार नाही, पण माझं निरीक्षणही चुकीचं आहे, असं मी म्हणणार नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी पुन्हा येणार नाहीत, हे स्पष्ट होताच सोशल मिडीयावर श्री. फडणवीसांच्या जातीव्यतिरीक्त बहुतेक इतर जातींनी घातलेला आनंदगोधंळ आणि श्री. फडणवीसांच्या ज्ञातिबंधुंपैकी बहुतेकांनी व्यक्त केलेलं अतीव दु:ख, मी पाहत होतो. ह्या नंतर काही काळातच, अत्यंत नाट्यमय रीतीने पहाटेच्या अंधारात श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच, तोच विकृत आनंद आणि तेवढंच विकृत दु:ख सोशल मिडियावर उलट क्रमाने व्यक्त होताना दिसलं. श्री. देवेंद्र फडणवीस हे केवळ ब्राहमण असल्याने त्यांच्यावर अन्याय कसा होतोय आणि ते ब्राह्मण असल्याने, जे होतंय ते योग्यच होतंय, असं उघड आणि आडून सुचवणाऱ्या अनेक पोस्ट लेख ह्या काळात व्हाट्सअँप आणि फेसबुकवर वाचायला मिळाल्या. श्री. फडणवीस ह्यांच्या जागी इतर कुठल्या जातीची व्यक्ती असती तरी, तीव्रता कमी-जास्त झाली असती, मात्र हेच घडलं असत, ह्या विषयी माझ्या मनात कोणतीही अनुभवसिद्ध शंका नाही. ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासारख्या कोणतीही जात न मानणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत क्लेशदायक होत्या. एकविसाव्या शतकातही आपण राज्याच्या प्रमुखपदी येऊ पाहणाऱ्या व्यक्तीच कर्तृत्व आणि चारित्र्य न पाहता, तो केवळ माझ्या जातीचा आहे की नाही, हे पाहून आनंद किंवा दु:ख व्यक्त करणार असू, तर मग आपल्या समाजाचं आणि त्याचा अविभाज्य हिस्सा होणार असलेल्या भावी पिढ्यांचं भवितव्य अत्यंत अवघड आहे, असं वाटून माझं मन अधिक उदास झालं..! आपलं काहीही कर्तव्य नसताना केवळ योगायोगाने आपल्याला लाभलेल्या जन्मजातीचा अभिमान, दुराभिमान इत्यादी आणि तेवढाच दुसऱ्या जातींबद्दलचा त्वेष-द्वेष जे काही असेल ते आपापल्या मनातून त्वरित त्यागायला हवं

मित्रानो, वरीलपैकी कोणतीही गोष्ट आपल्याला परवडणारी नाहीय. धोक्यात येऊ पाहणाऱ्या लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा दृढ होण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने माझा पक्ष, माझा झेंडा, माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा नेता, भगवा-हिरवा-निळा झेंडा ह्यापलीकडे जाऊन केवळ आणि केवळ संपूर्ण समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. असं न केल्यास, आपण एका धोक्याच्या वळणावर उभे आहोत, हे समजावं. शक्य आहे की, काही शक्ती आपला लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडावा, आपण आपापल्या जाती-धर्मांत विभागले जावेत यासाठी कार्यरत असतील. त्या देशांतर्गत असतील, तसेच बाहेरच्याही असू शक्तील. आपण ह्या सर्वाना धर्मनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष आणि पक्षनिरपेक्ष विचार करून शहाणपणाने शह द्यायला हवा. जात-धर्म-पक्ष-रंग पक्ष-रंग ह्यापैकी कुणाच्याही प्रेमात पडून चालणार नाही, तर ह्या सर्व शुल्लक गोष्टींचा केवळ बुद्धिनिष्ठ विचार करून पुढे जायला हवं. तर आणि तरच आपण ह्या उदासीनतेवर मात करू शकू. अन्यथा आपल्या समाजाचं भविष्य आणि भवितव्य, दोन्ही संकटात आहेत असं समजावं..

तसं होता कामा नये..!

-नितीन साळुंखे

9321811091

28.11.2019