मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की,…

मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की,…

काल ‘महाविकास आघाडी’चे प्रमुख आणि महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून, श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर संपन्न झालेला शपथविधी सोहळा मी पाहिला. आजवरच्या आयुष्यात मी पाहिलेला हा पहिलाच शपथविधी सोहळा.

माझं दादर, शिवाजी पार्क परिसरात जाणं तसं नेहेमीचंच. माझ्या संतोष, अर्थात, बाळा माने या मित्राचं कार्यालय शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी परिघावर आहे. मित्राला त्याच्या कामात मी मदत करत असल्याने, तिथे माझं रोजच जाणं-येणं असत. त्यांच्या ऑफिसात जायचं तर शिवाजी पार्क टाळताच येत नाही. दादर स्टेशनला उतरलं की, पश्चिमेला बाहेर पडून ‘सुविधा’ समोरच्या ‘लीना बार अँड रेस्टॉरंट’ अशी पाटी असलेल्या चिंचोळ्या बोळात शिरायचं, बारच्या आधारानेच नांदत असलेल्या चहावाल्याकडे कटिंग चहा मारायचा, बाहेर येऊन छबिलदासवरून टिळक पूल ओलांडायचा आणि प्लाझाचा फुटपाथ पकडून रमत-गमत शिवाजी पार्क परिसरात शिरायचं आणि पुढे शिवाजी पार्कला उजवी घालून मित्राच्या ऑफिसात जायचं. संध्याकाळी हाच क्रम उलट. कधीतरी रस्त्यातल्या ‘आयडियल’ मध्ये किंवा शिवाजी मंदिरातील ‘मॅजेस्टिक’मध्ये डोकावायचं. खिश्याने परवानगी दिली तर एखाद दुसरं पुस्तक खरेदी करायचं, हा माझा जवळपास रोजचाच परिपाठ. त्यामुळे कालचा दिवसही माझ्यासाठी काही वेगळा नव्हता.

पण, कालचा दिवस शिवाजीपार्क परिसरासाठी मात्र वेगळा होता. काळ शिवसेनेच्या नेतृत्वाखाली, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचं सरकार स्थानापन्न होणार होत आणि ह्या सरकारचे प्रमुख म्हणून श्री. उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ ग्रहण करणार होते. ह्या सोहळ्याचं उत्साह सकाळपासूनच दिसून येत होता. पार दादर स्टेशनपासूनच तीनही पक्षांचे झेंडे रस्त्याच्या दोन्ही बाजूने फडकत होते. तसा एरवी हा परिसर, काही विशेष दिवस असला की, भगव्या रंगात न्हालेला असतो, पण काल मात्र त्या भगव्यासोबत इतर दोन्ही पक्षांचे, तिरंग्याशी साम्य असणारे झेंडेही विपुलतेने दिसत होते. त्यातही काँग्रेस पक्षाचे झेंड्यांचा प्रमाण अंमळ जास्तच होतं. त्यामुळे भगवा थोडा फिकुटलेलाच दिसत होता (पण हे चांगलं लक्षण आहे, असं मी समजतो. नाहीतरी भगवा हल्ली जास्त गडद होत रक्तवर्णी होण्याच्या दिशेने निघाला होता.).

शिवाजी पार्कच्या दिशेने लोकांची गर्दी निघाली होती. त्यातही कडक खादीचे सफेत कपडे आणि गांधी टोप्यांचं प्रमाण जास्तच होत. आपल्यासाख्याच साध्या कपड्यातले, मानेभोवती भगवे गमचे ओढलेले, साधे सुधे दिसणारे शिवसैनिकही त्यात होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा असाही काही वेष नसतो. ते त्यांच्या काहीश्या आक्रमक देहबोलीवरूनच ओळखावे लागतात. बहुतेकांची सावल्या ते काळ्या रंगाची भक्कम शरीरयष्टी, पांढरा शर्ट आणि सावध डोळे आणि ‘आम्ही सत्ता राबवण्यासाठीच जन्माला आलो आहोत’, असा चेहेऱ्यावरचा भाव, ही त्यांची मुख्य वैशीष्ट्ये. गोरे-गोमटे आणि कातडी बचाव मध्यमवर्गीय फार तुरळक दिसत होते. आणि जे दिसत होते, ते, ‘आपला काय बुवा याच्याशी संबंध नाही’, असा भाव चेहेऱ्यावर असणारे. तर, काल सकाळपासून गांधी टोपीतला लिननचा पांढरा वेष, भगवे गमचे आणि भक्कम शरीरयष्टी शिवाजी पार्कच्या दिशेने जाताना दिसत होत्या.

वातावरणात उत्साह होता. वातावरणातला उत्साह, नाही म्हटलं तरी, आपल्या तना – मनातही भरून येतो, तसा तो माझ्यातही भरून आला. मग म्हटलं, इतक्या जवळ आहोतच तर जाऊ शपथविधीला..! एक नवीन राजकीय प्रयोग महाराष्ट्रात होऊ पाहतोय, तर त्या त्या प्रयोगाचा आपण साक्षीदार व्हायला हरकत नाही, असा विचार करून मी शपथविधी सोहळ्याला जायचं ठरवलं. त्यासाठी मला वाटही वाकडी करावी लागणार नव्हती आणि कार्यक्रमही माझ्या वेळेच्या गणितात बसत होता.

संध्याकाळी ५.च्या सुमारास मी शिवाजी पार्कवर पोहोचलो. मित्र शिवाजी पार्क जिमखान्याचा सन्माननीय सदस्य असल्याने, जिमखान्याच्या गच्चीवर आमच्या बसण्याची ( म्हणजे शपथविधी सोहळा पाहण्यासाठी बसण्याची..!) व्यवस्था केली होती. आमची बसण्याची जागा ते समोरचं भव्य व्यासपीठ, यामध्ये दृष्टीला कोणताही अडथळा नव्हता. ५.-५.३० च्या दरम्यान मैदान फारसं भरलेलं नव्हतं. जिमखान्यातही जेमतेम पाच-सहा माणसं दिसत होती. जस जसा वेळ जाऊ लागला, तस तशी गर्दी वाढू लागली. मैदान भरू लागलं आणि जिमखानाही भरू लागला. नंदेश उमपने व्यासपीठाचा ताबा घेतला आणि हळूहळू वातावरणात रंग भरू लागला. महाराष्ट्र गीत सुरु झालं आणि वातावरणात एकदम उत्साह आला. मैदानात लोक आता झुंडीने शिरत होते. पाहता पाहता मैदान पूर्ण भरू लागलं. व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे सुरु होते. लोक घोषणा देत होते. एरवी लोकांना विभागणारे तिन्ही पक्षांचे झेंडे, एकमेकांच्या शेजाराने आणि साथीने फडकताना पाहून आनंद वाटत होता. तीच गत जमलेल्या गर्दीचीही होती. गर्दी ‘विविधता में एकता’वाली ‘भारतीय’ वाटत होती..!

विविध पक्षांचे नेते यायला सुरुवात झाली. पहिले श्री. अजित पवार आले. महाविकास आघाडीचे शिल्पकार श्री. शरद पवार आले. त्यांच्या नावाने स्वागताच्या घोषण्या उठल्या. काँग्रेसचे नेते आले. त्यांच्याही नावानी घोषणा उठल्या. सर्वात दमदार एन्ट्री झाली ती श्री. राज ठाकरेंची. श्री. राज ठाकरे आपल्या आईसमवेत येताना दिसले, आणि अक्ख्या मैदानाने हात वर करून त्यांचं स्वागत केलं. घोषणा देऊन त्यांना अभिवादन केलं. राज ठाकरे सर्वांमध्ये किती लोकप्रिय आहेत, हे पुन्हा एकदा दिसलं. राज ठाकरें एवढं जोशात स्वागत त्याआधी कुणाचाही झालं नाही आणि नंतर फक्त श्री. उद्धव ठाकरे यांचं झालं. पुढे बरोबर ६. ३५ वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी व्यासपीठावर आले. राष्ट्रगीत वाजलं. आता उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. श्री. उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले आणि लगेचच काही वेळात तुडुंब भरलेलं शिवाजी पार्क मैदान जे शब्द कानात साठवण्यासाठी आतुरलं होतं, ते शब्द कानी पडले,
‘मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या आई-वडिलांना स्मरून शपथ घेतो की…..’ !
हे शब्द कानी पडले आणि शिवाजी पार्क घोषणांनी दुमदुमून गेलं..!

ज्या शिवाजी पार्क जिमखान्यात बसून मी हा शपथविधी सोहळा पहिला, तो शिवाजी पार्क जिमखाना हा तसा उच्च मध्यमवर्गीयांचा इलाखा. उच्च शिक्षित, विचारी, सधन लोकांची हि वस्ती. श्री. उद्धव ठाकरे आणि इतर काही मंत्र्यांचा शपथविधी झाला आणि जिमखान्यात शपथविधी सोहळ्यासाठी जमलेल्या लोकांच्या चर्चा रंगल्या. चर्चेचा सूर, ‘जे झालं ते योग्यच झालं’ असा होता. विशेषतः: काहीच दिवसांपूर्वी उत्तररात्री रंगलेल्या चोरट्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर, आजचा सोहळा होणं अत्यंत आवश्यक होतं, असंही लोक म्हणत होते. शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होऊन बाहेर पडत असलेल्या सर्वसामान्य लोकांचीही काहीशी अशीच भावना होती.

तसा मी काही शिवसैनिक नाही. शिवसेनेचा कधी मतदारही नव्हतो. पण मला शिवसेनेची माणसं माझी वाटतात. त्यांचा अकृत्रिम जिव्हाळा आणि रांगडेपणा मला आवडतो. काँग्रेस-राष्ट्रवादी मला कधी फारशी पटली नाही आणि त्यांच्या जवळ जावं असंही कधी वाटलं नाही. मी भाजपच्या जवळचा, पण वाजपेयींच्या भाजपच्या. आताच्या भाजपचा आणि समाजाला संभ्रमात टाकणाऱ्या भाजप नीतीचा मी ठाम विरोधकच. त्यात भाजपचे आताचे कार्यकर्ते ते नेते, असे, एखाद दुसरा अपवाद सोडल्यास, सर्वच ‘रंग आमचा वेगळा’ पद्धतीने वागणारे. रिफाईंड तेलासारखे. आमच्यासारख्या पाण्यात न मिसळणारे आणि म्हणून मला कधीही माझे न वाटणारे.

मी जरी शिवसेनेच्या जवळचा नसलो तरी, बाळासाहेब ठाकरेंच्या जहाल शिवसेनेचं रूपांतर संयमी शिवसेनेत करणारे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री माणूस म्हणून मला आवडतात. त्यांचं शांत, संयमी आणि संयत बोलणार व्यक्तिमत्व मला आवडत. शिवाय त्यांचं कलावंत असणंही मला आवडत. राजकारणी माणसात असलेला ‘मी’पणा, उद्धटपणा, खोटं बोलण्याची असाधारण क्षमता मला श्री. उद्धव ठाकरेंमध्ये कधी आढळली नाही. किंबहुना मला कधी ते राजकारणी वाटलेच नाहीत.

अश्या ह्या शांत, संयमी, नम्र आणि कुटुंबवत्सल वाटणाऱ्या श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याकडे महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा आली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ‘महाविकास आघाडीच’ सरकार त्यांना चालवायचं आहे. वाटेत धोके, अडचणी अनेक आहेत, पण त्यातून ते मार्ग काढून पुढील पांच वर्ष सरकार चालवण्यात यशस्वी होवोत, यासाठी त्यांना व त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा..!!

-नितीन साळुंखे
9321811091
29.11.2019

Photo Credit my friend Ashish Rane, principal photographer-mid-day and Sudhir More

photographer-mid-day and Sudhir More