नंदनवन- सोमनाथ -(पूर्वार्ध)

नंदनवन-सोमनाथ-हेमलकसा-ताडोबा-दीक्षाभूमी..

गेला आठवडा, म्हणजे दिनांक १६ डिसमेंबर ते २१ डिसेम्बर असे ७ दिवस मी सपत्नीक विदर्भात होतो. विदर्भात बाबा आमटेंनी उभारलेले आणि त्यांचे दोन्ही पुत्र समर्थपणे पुढे नेट असलेले नंदनवन, सोमनाथ आणि हेमलकसा हे प्रकल्प पाहायचे आणि शेवट ताडोबाच्या वाघोबाच्या दर्शनाने पावन व्हायचं, असा आमचा कार्यक्रम होता.

इथे जाण्याचं ठरलं, त्यांच्या काही दिवस अगोदरपासून आपल्या देशात जे काही सरकारी उपद्व्याप तेंव्हा सुरु होते आणि वेगवेगळ्या अद्याक्षरी रजिस्टरांवरून जो काही गोंधळ माजला (किंवा माजवला गेला) होता आणि त्यामागे, मी ज्या संविधानाला माझा पवित्र ग्रंथ मानतो, त्याला धक्का लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत की काय, ह्या शंकेने मी फार अस्वस्थ होतो. या देशातलं माझं अस्तित्वच धोक्यात येणार असल्याची माझी भावना होत होती. मी या देशाचा नागरिक आहे की नाही किंवा ठरवला जाईन की नाही, नसेन तर मग मला काय करावं लागेल (किंबहूना ‘ते’ माझं काय करतील), या व अशा अनेक भयग्रस्त प्रश्नांची मालिका मनात उभी राहीली होती. या प्रश्नांमुळे मिर्माण झालेल्या माझ्या सांभाव्य अस्तित्वहीनतेच्या चिंतेने मला ग्रासलं होतं. इकडे डिटेन्शन कॅम्प्सची चर्चा सुरू झाली असल्याने, दुसऱ्या महायुद्धाच्या चित्रपटांतून पाहिलेल्या हिटलरच्या शुद्ध रक्ताच्या वेडेपणातून निर्माण झालेल्या कान्सन्ट्रेशन कॅम्प्सची दृष्य डोळ्यासमोर यायची. तसलाच काहीतरी करायची ‘त्यांची’ योजना आहे की काय, असे विचार मनात येत होते. मी अधिकच अस्वस्थ होत होतो. देशात काही विधायक घडताना दिसत नव्हतं. काय करावं आणि काय नाही, हे लक्षात येत नव्हतं.

अशातच एके दिवशी माझ्या पत्नीने विदर्भात बाबा आमटेंच्या प्रकल्पात जाण्याची कल्पना मांडली. सुरुवातीला मी तयारच नव्हतो, पण तिचा फारच आग्रह झाला, तेंव्हा म्हटलं जाऊन येऊ. देशात सर्वच विघातक गोष्टी घडत असताना, काही विधायक कामं पाहून त्यातून मनाला शांती लाभावी आणि ताजंतवानं यासाठी, मी माझ्या पत्नीच्या आग्रहाला मान देऊन तिथे जाण्याचा निर्णय घेतला.

आमची ही सहल विलेपार्ल्याच्या ‘अव्हेन्यूस अराऊंड द वर्ल्ड’ ह्या श्रीमती सुप्रिया लिमये ह्यांनी आयोजित केली होती. ह्या टूरमध्ये आमची नांव नोंदवली आणि दुसरीच धाकधूक माझ्या मनात सुरु झाली. ती होती सहप्रवासी कोण असतील आणि त्यांचं आमचं जमेल का, याची. संपूर्ण अनोळखी माणसासोबत जायचं म्हणजे अवघडच असते. त्यात ओळख होऊनही विचार जमले नाहीत तर ती शिक्षाच असते. असं झाल्यास त्या ग्रुपमध्ये आपण एकटेच असतो आणि सहा-सात दिवस असे काढायचे म्हणजे आणखी कठीण शिक्षा. पण काही काळाने लिमयेबाईंनी पाठवलेली सहप्रवाशांची नाव वाचली, आणि अंदाज आला की आपला ह्यांच्याशी चांगलं जमणार म्हणून;आणि खरंच आमचं उत्तम जमलं. गोरेगांवच्या पांचाळ आणि मेस्त्री कुटुंबातलली पांच माणसं, माहिमचं नाडकर्णी दाम्पत्य आणि पुण्याचे सुधाकर भावे काका. भावेकाका एकटेच, शिडे आले होते. वयाने आमच्यात सर्वात मोठे, पण उत्साह लहान मुलाचा. भावेकाका आणि पांचाळांची तरुण कन्या सोडली, तर आम्ही इतर आठजण आम्ही साधारण सारख्याच, उंबरठ्यावरील वयातले. आमचा ग्रुपलीडर समीर दोडेकर वयाने अगदी धाकटा, पण संपूर्ण दौऱ्यामध्ये आमची काळजी त्यांनी थोरल्याच्या मायेने घेतली..

आमची ही सहल एकूण पांच पूर्ण दिवसांची होती. पहिल्या दिवशी सोमनाथ प्रकल्प पाहिला, दुसरा संपूर्ण दिवस आनंदवनात घालवला. तिसरा आणि चौथा दिवस डॉक्टर प्रकाश आमटेंच्या लोक बिरादरी प्रकल्पात हेमलकसा इथे होतो, तर पांचव्या दिवसातील सकाळ ताडोबातल्या वाघोबाच्या शोधात गेली आणि सायंका दीक्षाभूमीच्या दर्शनाने पावन झाली. याच आमच्या प्रवासाचा हा अनुभव, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा एकूण दोन भागात मी शब्दबद्ध केला आहे.. यातील पूर्वार्धात नंदनवन-सोमनाथ, तर उत्तरार्धात हेमलकसा-ताडोबा आणि दीक्षाभूमीच्या अनुभव कथन केला आहे..

#नंदनवन_सोमनाथ -(पूर्वार्ध)

गेल्या आठवड्यात, दिनांक १६ ते २१ डिसेम्बर दरम्यान विदर्भात होतो. बाबा आमटेंचं नंदनवन, त्यांचेच सोमनाथ आणि हेमलकसा असे दोन अन्य प्रकल्प आणि शेवटी ताडोबाच्या जंगलात एक दिवस, असा आमचा प्रवास होता.

प्रवासाची सुरुवात बाबा आमटेंच्या आनंदवनापासून केली. नंदनवनातल्या धुळीने मला पावन करण्याची ही दुसरी खेप. पहिल्यांदा नंदनवनात गेलो होतो, तो सन २००९ सालात. तेंव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या मिनित्ताने, तेंव्हा आमदार असलेल्या माझ्या एका मित्रासोबत १५ दिवसांसाठी मी नागपुरात मुक्कामाला होतो. अधिवेशनाच्या दरम्यान एके दिवशी काहीतरी फुटकळ कारणाने विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालेलं असताना, रिकाम्या वेळेचं काय करायचं म्हणून, नागपूरपासून शंभरेक किलोमिटर अंतरावर असलेल्या नंदनवनात जायचं ठरवलं आणि जाऊनही आलो. पण ती भेट तशी धावती होती. नेमके त्याच वेळेस डॉक्टर तात्याराव लहानेंनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं शिबीर नंदनवनात भरवलं होत, त्याचीही गडबड सुरु होती. त्यावेळेस साधनाताई उपाख्य ताई आमटे हयात होत्या. त्या सर्व व्यस्त कार्यक्रमांतूनही त्यांनी व डॉक्टर विकास आमटे यांनी त्यातल्या त्यात वेळ काढून आमच्याशी छानश्या गप्पाही मारल्या होत्या. डॉक्टर लहानेंशीही उभ्या उभ्या गप्पा झाल्या होत्या. डॉक्टर प्रकाश आमटे, मला आठवतं त्यानुसार, त्यावेळेस हेमलकसात होते आणि म्हणून त्यांची भेट होऊ शकली नव्हती.

त्यानंतर आता जवळपास १० वर्षांनंतर तिथे पुन्हा जाण्याचा योग आला. गत १० वर्षांत नंदनवन आणि हे नंदनवन जिथे आहे, त्या वरोरा गांवाची रुपरेषा पार बदललेली दिसली. मी दहा वर्षांपूर्वी जेंव्हा तिथे गेलो होतो, तेंव्हा हे ठिकाण गांवकुसाच्या काहीसं बाहेर असल्यासारखं होतं, आता दहा वर्षांनंतर ते गांवच नंदनवनाच्या कुशीत वस्तीला आल्यासारखं वाटलं.

वरचे परिच्छेद वाचताना तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं असेल. मी ‘आनंदवना’चा उल्लेख चुकून ‘नंदनवन’ केलाय की काय, असंही तुम्हाला वाटलं असे. पण तसं नाही. मी ते नंदनवनच लिहिलंय आणि ते ही मुद्दाम. कारण त्याच नांव आनंदवन असलं तरी, ते नंदनवनच आहे. आनंदवन म्हणायचा कितीही प्रयत्न केला तरी, माझ्या मनात आनंदवनासाठी नंदनवन हाच शब्द येतो. साधनाताई आणि बाबा आमटेनी फुलवलेलं आनंदवन नावाचं नंदनवन. नंदनवन म्हणजे स्वर्गातली बाग. इथे तर बाबानी ती पृथ्वीवर फुलवलीय. ती ही कुष्ठरोग झाल्यामुळे कटुंबातून, समाजातून बहिष्कृत करून कचऱ्यासारखं रस्त्यावर फेकल्यामुळे, जिवंतपणीच मरणाच्या यातना भोगणाऱ्या परंतु, भाव-भावना जिवंत असणाऱ्या माणसांना सोबत घेऊन फुलवलेली. बाबानी अशा महारोग्यांना आपलं मानून, त्यांना जवळ घेऊन आणि त्यांच्यातलाच एक होऊन इथे जो स्वर्ग निर्माण केला आहे, त्याला तोड नाही. समाजाने ज्या महारोग्यांना कचरा म्हणून उकिरड्यावर फेकून दिलं होतं, त्यांनाच सोबत घेऊन जी आनंदाची स्वर्गासम बाग बाबानी फुलवली, ते आनंदवन.! ही बाग बाबांनी केवळ भरड जमिनीवरच फुलवली असं नाही, तर ती सामाजिक अवहेलना, उपेक्षेमुळे कुष्ठरोग झालेल्यांच्या भरड झालेल्या मनातही नंदनवन फुलवलं..! म्हणून तर आनंदवनासाठी माझ्या मनात ‘नंदनवन’ हाच शब्द येतो व लिहिलाही जातो..!!

ज्या काळात कुष्ठरोग म्हणजे गेल्या जन्मीचे पाप समजून, तो झालेल्या माणसाला चक्क रस्त्यावर फेकून दिल जायचं, थंडी, वर, ऊन-पाऊस यात रिकाम्या पोटी रस्त्यावर खितपत पडलेल्या अशा माणसांच्या वाऱ्यालाही उभा राहायचं नसत, नाहीतर देवाचा कोप आपल्यावर होऊन तो रोग आपल्यालाही होईल, अशी समजूत असण्याच्या काळात जाऊन पाहिलं, तर बाबाचं त्यांच्यात राहून त्यांच्यासाठी कार्य करण्याचा त्याकाळातला निर्णय समाजाच्या विरोधात जाणारा आणि म्हणून किती धाडसाचा होता हे लक्षत येईल. आनंदवन, साधनाताई-बाबा आमटे, त्यांचं कार्य पुढे नेणारे त्यांचे दोन्ही सुपुत्र यांच्या अकुणच कार्यावर प्रचंड लिखाण झालं आहे आणि पुढेही होणार आहे. मी त्यावर अधिक वेगळं काय लिहिणार? पण बाबानी जे केलं, त्यातलं एक महत्,व जे आता आनंदवनात गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे, त्त्यावर मात्र मी इथे आवर्जून लिहिणार आहे.

आपल्यापैकी ज्यांचा जन्म ६० -७० दशकात किंवा त्याच्या थोडा पुढे मागे झाला आहे, अशाना त्याकाळात रस्त्यावर नेहेमी दिसणार एक दृश्य आठवत असेल. रस्त्यावर एक पांगुळगाडा, त्यावर झडलेला नाकाचा शेंडा, हातापायांच्या झडलेल्या बोटांना जुनाट चिंध्या बांधून, झडलेल्या बोटांचे तेच हात पसरून भीक मागणारी एक व्यक्ती, तो पांगुळगाडा ओढणारी मळकट खाकी रंगाची अर्धी चड्डी घातलेली आणखी एक व्यक्ती, सोबत झांज आणि इतर वाद्य वाजवणारी इतर तशीच नाक, हात, पाय झाडलेली, झडलेल्या अवयवांना चिंध्या गुंडाळलेल्या दोन तीन माणसांचं एक टोळकं रस्त्यावर भिक मागताना त्याकाळात दिसत असे. ह्या सर्वांच्या डोक्यावर ‘HELP’ अशी इंग्रजी अक्षर लिहिलेली टोपी हमखास असे. ते एक गाणंही म्हणत, पण ते मला आता नेमकं आठवत नाही. भीक मागणाऱ्या ओंगळवाण्या माणसंच हे दृश्य त्याकाळात अनेकदा दिसत असे. त्यांना लोक पैसेही देत असत, पण ते दुरून फेकून. त्यांच्या जवळ कुणी जात नसे. स्पर्श करण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यांच्याबाबत मोठ्यांकडे विचारणा केली असता, ते लोक म्हणजे ‘महारोगी’ आहेत आणि ते त्यांच्या पूवजन्माचे पाप ह्या जन्मात भोगत आहेत’ अशी उत्तर त्या काळात मिळत असत. त्यामुळे ‘महारोगी’ म्हणजे पापी आणि त्याच्या वाऱ्यालाही उभा राहायचं नसत, अशी समजूत लहानपणी मनात बसली होती.

काल आनंदवनात गेल्यावर अचानक लक्षात आलं की, गेली अनेक वर्ष रस्त्यांवर हे दृश्य आपल्याला दिसलेलं नाही. नाही म्हणायला रेल्वे स्टेशनच्या परिसरात काही कुष्ठरोगी भिक मागताना दिसतात, पण त्याकाळच्या तुलनेत त्यांचं प्रमाण तुरळकच. एकूणात ‘ती’ माणसं इतकी उपेक्षित आणि दुर्लक्षित होती, की ती रस्त्यावर भिक मागताना अलीकडे जवळपास दिसेनाशी झालेली आहेत हे आताच्या खेपेला आनंदवनात जाईपर्यंत माझ्या लक्षातही आलं नव्हतं.

कालच्या आमच्या आनंदवनाला दिलेल्या भेटीत, कुष्ठरोगाचं भारतातून निर्मुलन झालं आहे का, हा प्रश्न आमच्यातल्या कुणीतरी डाॅक्टर विकास आमटेंना विचारला. त्यावर विकास आमटेंनी दिलेलं उत्तर म्हणजे बाबा आमटेंचं खरं कार्य होतं. डाॅक्टर म्हणाले, “हा रोग भारतातून नाहीसा झालेला नाही, ह्या रोगाची शिकार झालेल्या व्यक्ती आजही आहेत, पण हा रोग योग्य त्या औषधोपचारांनी संपूर्ण बरा होऊ शकतो आणि तो मुळीच संसर्गजन्य नाही, हे लोकांना पटलं आहे. म्हणून अशा रोग्यांना पुर्वीसारखं उकिररड्यावर टाकलं जात नाही, तर कुटुंबांकडून त्यांच्वार उपचार करुन घेतले जातात आणि कुणाही अन्य आजाराने ग्रस्त कुटुंब सदस्यांप्रमाणे त्यांचीही सुश्रूषा केली जाते”.

कुष्ठरोग झालेली माणसं हल्ली रस्त्यावर भिक मागताना का दिसत नाहीत, याचं हे उत्तर होतं. बाबांनी आनंदवनात दोन-चार हजार कुष्ठरोग्यांना आश्रय दिला असेल, पण त्याने काही हा प्रश्न मिटणार नव्हता. अब्जावर लोकसांख्य असलेल्या ह्या देशात लाखोंनी कुहष्ठरोगी असतील. त्या सर्वाना काही एकटे बाबा आमटे कितीसे पुरे पडणार होते..! गरज होती ती ह्या रोगाबद्दलची भीती आणि किळस समाजाच्या मनातून नाहीशी करण्याची. बाबानी आपल्या कृतीतून तेच साध्य केलं. शेकडो व्याख्यानं व्याख्यान आणि करोडो रुपयांच्या प्रचार मोहीमा राबवून जे साध्य झालं नसत, ते बाबानी आपल्या कृतीतून साध्य करून दाखवलं. अर्थात त्यासाठी त्यांनाही त्या काळात कडवा संघर्ष करावा लागलं होता. स्वतःवर प्रयोग करून घ्यावे लागले होते, स्वतःला त्यात गाडून घ्यावं लागलं होत आणि नंतरच हे अवघड कार्य सोपं झालं आहे.

त्यांचं हे कार्य त्यांचे चिरंजीव डॉक्टर विकास आमटे अधिक व्यापक प्रमाणावर पुढे नेत आहेत. बाबा आमटेंनीच सुरु केलेला, आनंदवनापासून न नजीकच असलेला सोमनाथ प्रकल्प, डॉक्टर विकास आमटे यांनी, त्यांच्याकडे जन्मजात असलेलं इंजिनिअरिंगच ज्ञान वापरून अधिक अमर्थपणे पुढे नेला आहे. ह्या प्रकल्पाबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. मलाही नव्हती. सुरुवातीला ऐकलं, तेंव्हा वाटलं की हे काहीतरी भगवं प्रकरण असावं, पण प्रत्यक्ष पाहिलं तेंव्हा ते चक्क हिरवंगार निघालं. तिथे असलेल्या शंकराच्या प्राचीन देवळावरून त्याला सोमनाथ हे नांव मिळालं आहे. हा प्रकल्प ज्या गांवात आहे, त्या गावाचं नांव ‘मूल’. आपले माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांचं हे मूळ गांव..!

व्याप्तीमध्ये आनंदवनापेक्षा जवळपास तीनपट मोठा असलेला हा शेती प्रकल्प, कुष्ठरोग्यांनी त्यांच्या कष्टाने हिरवागार केला आहे. या प्रकल्पासाठी बाबाना सरकारकडून मिळालेली जमीन ताडोबाच्या घनदाट जंगलाचा एक भाग होती. त्यामुळे वाघ-बिबळ्यादी जंगली प्राण्यांचा तिथे नित्य वावर होता.निवास-पाण्याची काहीच सोय तिथे नव्हती. बाबा आणि बांचे सहकारी, वेळोवेळी आयोजित केलेल्या श्रम-छावण्या, त्यातून दिलेलं अनेक लोकांनी त्यांचं योगदान आणि डॉक्टर विकास आमटे यांची कल्पकता यातून इथे आज हिरव्या सोन्याचा शेतीस्वर्ग फुलला आहे. इथेही कुष्ठरोग्यांच्या कुटुंबांचं पुनर्वसन केलं गेलं आहे.

आम्हाला हा संपूर्ण प्रकल्प तिथे निवासाला असलेल्या श्री. हरिभाऊ पाटील यांनी फिरून दाखवला. हा प्रकल्प इतका मोठा आहे, की हा वाहनातूनच फिरून पाहावा लागतो. वाघ-बाबल्या कधीही दत्त म्हणून इथे समोर येऊन उभा राहू शकतो, त्यामुळे हरिभाऊ आम्हाला त्यांच्या नजरेआड होऊ देत नव्हते. कुष्ठरोगाचे शिकार झालेले हरिभाऊ गेली ३५ वर्ष आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्पावर आहेत. इकडचे काळजीवाहकच आहेत ते. हरिभाऊ लक्षात राहिले ते त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे. पूर्वाश्रमीचे शिक्षक, त्यामुळे समजावून सांगण्याची हातोटी विलक्षण. झाड-पेडांची आणि त्यांच्या उपयोगाची सखोल माहिती हरिभाऊंनी होती.

सोमनाथविषयी बाबा सुरुवातीपासून म्हणत की, ‘सोमनाथ चालेल तर संस्था चालेल’, बाबांचं ते म्हणणं आज खरं ठरलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने हा प्रकल्प पाहायला हवा.

-नितीन साळुंखे

9321811091

27.12.2019

बाबासाहेब नांवाचा माणूस..

बाबासाहेब नांवाचा माणूस..

आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस. इसवी सन १९५६ सालातल्या आजच्याच दिवशी बाबासाहेब आपल्याला पोरकं करुन गेले..खरं तर त्यांनी आपल्याला पोरकं केलेलं नाही. त्यांच्या विचारांच्या वारश्याच्या रुपाने ते सतत आपल्यासोबत आहेत. मार्गदर्शन करत आहेत. पण आपणच करंटे. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्यापेक्षा, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यापेक्षा, त्यांची जयंती आणि पुण्यतिथी करण्यातच आपण धन्यता मानत आहोत आणि वर स्वत:.ला त्यांचे अनुयायीही म्हणवून घेत आहेत..

काही लोक बाबासाहेबांना महामानव म्हणतात, तर काही देव. महामानव कसा असतो, त्याचं वर्णन मला ठाऊक नाही. म्हणून मी बाबासाहेबांना माहामानव मानत नाही. देव तर त्याहुनही मानत नाही. देव आहे, यावरच माझा विश्वास नाही. ज्यांनी देवाला पाहिलंय अशी माणसंही मला आढळलेली नाहीत. ज्यांचा देवावर विश्वास आहे, ते लोक देव आहे असं ‘मानतात’. आता तो ‘मानावा’ लागतो, म्हणजे त्याचं अस्तित्वच संशयास्पद आहे. देव असलाच तर, तो कुणा दिन-दुबळ्याच्या सहाय्यास आलेला माझ्या तरी पाहाण्यात वा ऐकिवात नादही. तसं झालेलं फक्त पौराणिक पोथ्या-पुराणांतच वाचायला किंवा चित्रटांतून पाहायला मिळालेलं आहे. स्वत:ला देवाचे भक्त म्हणवणाऱ्या माणसांनीही, त्यांच्यासारखीच माणसं असणाऱांवर अनन्वित अत्याचार केल्याचाही आपला ताजा इतिहास आहे. त्यावेळीही आपल्या भक्तांना तसं न वागण्याची बुद्धी त्यांच्या देवाने दिल्याचं माझ्या माहितीत नाही. अशा वेळी त्या दिन-दुबळ्या आणि अत्याचार सोसणाऱ्या माणसांचं दु:ख बाबासाहेबांना समजलं. त्यांनी अशा वंचितांचे अश्रू पुसले. त्यांना मार्ग दाखवला.

बाबासाहेबांनी अन्यायाचा प्रतिकार केला, ते बाबासाहेब माणूस होते म्हणून. माणसाचं दु:ख माणसालाच समजू शकतं. नव्हे, ते माणसानेच समजून घ्यावं लागतं. देवाच्या वा देवाचे लाडके भक्त म्हणवणाऱ्यांच्या बस की ती बात नाही..

ममाणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हा आग्रह बाबासाहेबानी धरला. म्हणून बाबासाहेबांना मी महामानव किंवा देवापेक्षा माणूस म्हणूनच स्वीकारतो..अशा या माणसातल्या माणसाला माझं विनम्र अभिवादन..!!

-नितीन साळुंखे

9321811091

06.12.2019

बलात्कार का होतात?

(ह्या लेखात मी माझी मतं मांडलीत. अर्थात ती अंतिम नव्हेत. या विषयावर चर्चा अपेक्षित आहे. कृपया हा लेख काळजीपूर्वक वाचावा ही विनंती..)

बलात्कार का होतात?

बलात्काराची साध्या शब्दात व्याख्या करायची म्हणजे, पुरुषाने स्त्रीचा बळजबरीने घेतलेला शारिरीक उपभोग. निसर्गाने प्राणीमात्रांचं वंशसातत्य कायम राहावं म्हणून नर आणि मादी अशा दोन भिन्न जाती बनवल्या आणि त्यांच्यात आकर्षण निर्माण केलं. हे आकर्षण त्या दोघांनी गरजेनुसार एकत्र यावं आणि त्यांच्यासारखाच नविन जीव निर्माण करावा यासाठी निर्माण केलं गेलं. दोघांनी एकत्र यावं याचा अर्थ, त्यांच्यात ‘सेक्स’ची क्रिया घडावी इतका साधा, सरळ आणि नैसर्गिक आहें. पृथ्वीतलावरचे सर्व प्राणीमात्र त्यांचं निसर्गाने ठरवून दिलेलं हे कर्तव्य बिनबोभाट पार पडत असतात.

हे कर्तव्य प्राणीच असलेल्या मनुष्यालाही चुकलेलं नाही. जशी पोटाची भूक असते, तशीच शरीराचीही भूक असते आणि ती योग्य वेळी जागृतही होत असते. मात्र मनुष्य’प्राणी’आणि उर्वरित प्राणीमात्रात फरक आहे तो विकसित बुद्धीचा. तशी ‘फिक्सड वायरिंग’ पद्धतीची बुद्धिमत्ता सर्व प्राण्यात असते परंतु ती त्यांची दैनंदिन कर्तव्य पार पाडण्यापुरातीच मर्यादित असते. मनुष्याची बुद्धी मात्र सातत्याने विकसित होत असते. म्हणून सर्व प्राणीमात्रात मनुष्यप्राणी हा वेगळा ठरतो. सेक्सची क्रिया केवळ वंशसातत्याबरोबरच आनंद देणारीही क्रिया असल्याचा शोध मनुष्याला पुर्वी कधीतरी लागला आणि मग इतर प्राणीमात्रांप्रमाणे मनुष्याचा सेक्स, इतर प्राणीमात्रांप्रमाणे केवळ ब्रिडींग पिरियडपुपता मर्यादीत न राहाता, सर्वकाळ होऊ लागला. बुद्धीमान मनुष्याने या सेक्समधे प्रेम, मोहोब्बत, मैत्री-दोस्ती इत्यादी भावना मिसळल्या आणि सेक्सचा आनंद वाढवायचा प्रयत्न केला. प्रेम-दोस्ती या भावना कितीही उदात्त असल्या तरी त्या भावनांचं उद्यापन शेवटी सेक्समधेच होतं हे कोणाला नाकारता येणार नाही. ‘प्रेम हे फुकट मध्ये सेक्स करण्याच नांव आहे’ असं आम्ही कॉलेजमध्ये असताना बोललं जायचं, ते काही उगाच नव्हे. एक मात्र आहे, प्रेमपात्राबरोबरचा अथवा चांगली मैत्री असलेल्या स्त्री-पुरुषांमधला सेक्स, कर्तव्यभावनेने केलेल्या ‘मॅकॅनिकल’ पद्धतीच्या सेक्सपेक्षा आनंद द्विगुणीत करणारा असतो यात अजिबात दुमत नाही..

सेक्समधे स्त्री आणि पुरुष असं दोघांचंही असणं आवश्यक असते. प्रेम किंवा कर्तव्य अशी भावना उद्दीपीत करणारी कोणतीही नांवं दिली, तरी त्या क्रियेतून आनंदाव्यतिरिक्त निसर्गाला अपेक्षित अशी वंशसातत्याची क्रियाही घडत असते. सेक्सच्या खेळात पुरूष ‘अॅक्टीव्ह’, तर स्त्री ‘पॅसिव्ह’ असते. स्त्रीची कितीही इच्छा असेल आणि पुरुषाची नसेल, तर सेक्स घडू शकत नाही. याच्या उलट स्त्रीची इच्छा नसेल आणि पुरुषाची असेल तरी सेक्स घडतो..थोडक्यात सेक्सची क्रिया निसर्गाने संपूर्णपणे पुरुषाच्या मर्जीवर ठेवलेली आहे. तरीही स्त्रीच एक बलस्थान आहे. पुरुषाच्या तुलनेत स्त्री सेक्सच्या खेळात, तिची इच्छा असो वा नसो, अमर्याद काळापर्यंत भाग घेऊन शकते किंवा तिला भाग घेण्यास भाग पाडले जाऊ शकते. पुरुषाच्या या खेळत एका वेळेस भाग घेण्याच मर्यादा अत्यंत सीमित असते किंवा पुरुषाला सेक्स करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. एका संभोगा नंतर पुरुष काही काळ आपलं ‘पुरुषत्व’ गमावतो व त्याला पुन्हा तयार होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. माझं तर असंही म्हणण आहे, की स्त्रीमधल्या सेक्सच्या खेळात मर्जीने अथवा गैरमर्जीने भाग घेण्याच्या या अमर्याद शक्तीला ओळखून स्त्रीला विविध व्रतवैकल्याच्या जाळ्यात पुरुषाने अडकवल असावं आणि योनी शुचीतेच्या कल्पना तिच्यावर बिंबवल्या असाव्यात. बुद्धीमान मानवाने पुरुष आणि पुरुषी वृत्ती ही सर्वोच्च आहे अशी भावना निर्माण केली आणि समाजातही तसे नियम केले, यामागे इतर काही कारणांप्रमाणे हे ही एक कारण असावं अस मी समजतो..

पुरुषाच्या मर्जीशिवाय संभोग होऊ शकत नसला तरी, अपत्यप्राप्तीसाठी कोणत्या नराच्या बिजाला आपल्या गर्भाशयात स्थान द्यायचं हे ठरवण स्त्रीच्या मर्जीवर अवलंबून असतं. हे तत्व निसर्गात सर्व प्राणीमात्र पाळताना दिसतात. निसर्गात प्राणी-पक्षांमधे नराला देखणं बनवलं आहे तर मादी कुरुप किंवा सर्वसाधारण म्हणता येईल अशी असते. प्राणी-पक्षांच्या ब्रिडींग काळात मग मोर पिसारा फुलवतो, कोकीळ गातो (मादी कोकीळेला कंठ नसतो. तरी ‘गान कोकीळा’ का म्हणतात हे कळत नाही.). वाघ-सिंहांमधे कळपातील माद्यांसाठी लढाया होतात व वरचढ कोण हे ठरवण्याची स्पर्धा लागते. या सर्वातील जो नर मादीला देखणा वाटतो किंवा शुर वाटतो, त्याला मादी तिच्याशी संभोग करण्याची मूक परवानगी देते आणि बाकीचे नर वेगळ्या कळपातील माद्यांच्या शोधात चार दिशेला गुमान निघून जातात. हे असं घडण्यामागे मादीला आपला गर्भ देखणा, शुर आणि ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या निसर्गाच्या तत्वात बसणारा हवा असतो, हे साधं नैसर्गिक गणित असतं. माणसासहीत सर्व माद्यांमधे ही निसर्गसुलभ भावना जन्मत:च असते, परंतु या भावनेची जाणीव नसते. याच गोष्टीचा मनुष्यातील अविष्कार म्हणजे, पूर्वीची स्वयंवरं आणि आपल्या पिढीतील मुलगी दाखवून आणि मुलाची संपूर्ण माहिती काढून मगच केली जाणारी लग्न..! स्वयंवरातून हुशार आणि शूर राजकुमारच्या गळ्यात राजकन्या वरमाला घालायची आणि नंतर आमच्या वेळी जो मुलगा शिकलेला असेल, गरीब असला तरी विचाराने चांगला असेल त्याला पसंत केलं जायचं. हल्लीच्या काळात मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी मुलांकडून जे काही प्रकार केले जातात, तो त्यांनी केलेला मादीचा अनुनयच असतो. निसर्गातील सर्व माद्याप्रमाणेच मनुष्यातही होणारे हे प्रकार, आपलं होणारं अपत्य उत्तम निपजावं ह्या भावनेतूनच केले जातात. प्रेमविवाह ही याच सुप्त भावनेने केले जातात. कर्तुत्ववान पुरुषाच्या आयुष्य अनेक स्त्रिया येतात, त्या स्त्रीच्या या भावनेतूनच. त्या कर्तुत्ववान पुरुषासारखं अपत्य आपल्याला प्राप्त व्हावं, ही निसर्गातील कोणत्याही मादी प्रमाणे मनुष्याच्याही मादीची भावना असल्यास नवल नाही.

निसर्गातील मादीप्रमाणेच नराच्याही निसर्गसुलभ भावनांचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं. मुळात नर-मादीची निर्मितीच वंशसासतत्यासाठी झालेली आहे. मादीला आपल्या गर्भात कोणाचं बीज रुजवून घ्यायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे, हे आपण वर पाहिलं. कारण त्या बीजातून निर्माण झालेल्या गर्भाचं पालनपोषण करण्याची जबाबदारी निसर्गाने मादीवरच सोपवली आहे. तर मग नराचं प्रयोजन फक्त तिच्या पोटात बीज सोडण्यापुरतंच आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. मादीप्रमाणे नराला आपण कोणाशी संग करतोय याच्याशी फार कर्तव्य नसतं, त्याला फक्त आपलं बीज त्या मादीच्या गर्भाशयात स्थापन करायचं असतं. इथे निसर्गाने निर्माण केलेली एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एक नर एकाच वेळेस जीतक्या माद्यांच्या गर्भाशयांत आपलं बीज सोडेल, तेवढ्या संख्येने एकाच वेळी होऊ शकणाऱ्या अपत्यांची संख्या वाढते, तर मादीचा संबंध एकाच वेळी अनेक मरांशी आला, तरी अपत्य संख्या केवळ एकच राहाते. मादीच्या पुनरुत्पादन क्षमतेला निसर्गतःच मर्याद आहे आणि पुरुष मात्र मरेपर्यंत प्रजननक्षम असतो, ही देखील वंश सातत्य टिकवण्यासाठी निसर्गाने केलेली योजना आहे. बहुपत्नीत्व यातूनच आलेलं आहे. स्त्री आणि पुरुषांच्या सेक्सकडे पाहाण्याच्या दृष्टीत हा मुलभूत नैसर्गिक फरक आहे. यावर अधिक वाचण्यासाठी माझा ‘भ्रमर’ हा लेख वाचवा..! (https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1358928180828702)

नर आणि मादी त्यांना निसर्गाने सोपवलेले कर्तव्य अगदी बीनबोभाट पार पाडत असतात. याच भावना मनुष्य प्राण्यांत असुनही हीच गोष्ट वादावादीची होते याचं कारण, मनुष्याने समाजाचं केलेले नियमन..मुळात कुटुंबव्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेले विविध नाते संबंध आणि त्यातील नैतिक-अनैक्तिक भावना या समाजाचं वागण नियंत्रित करण्यासाठी केली गेलेली कृत्रिम निर्मिती आहे. मनुष्याच्या काम भावनांची पूर्ती समाजाने ठरवून दिलेल्या नियमातच व्हावी आणि समजत स्वैराचार मजू नये असा त्यामागचा विचार आहे. अनेक वर्षांच्या नियमातून, संस्कारामुळे आपल्या या नैसर्गिक भावना दाबल्या गेलेल्या असतात, मात्र नाहीश्या झालेल्या नसतात आणि संधी मिळताच त्या उफाळून येतात. इथेच अनैतिक संबंध निर्माण होतात आणि मग त्यातून बलात्कारासारखे प्रकारही घडतात. अनैतिक संबंधाची करणे अनेक आहेत, परंतु तूर्तास आपला तो विषय नसल्याने त्याची चर्चा इथे करत नाही. त्यावर पुन्हा कधीतरी बोलू. आता फक्त बलात्कार या विषयाची चर्चा करू.

चौथ्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे, प्राणीमात्रात मादीने पसंत केलेल्या नराव्यतिरिक्तचे सर्व नर मग दुसऱ्या माद्यांच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने निघून जातात. निसर्गात मादीच्या मनाविरुद्ध तिचं आणि नराचं मिलन होत नाही. हा नियम निसर्गात कटाक्षाने पाळला जातो. मनुष्याच्या बुद्धीने (वाम बुद्धीने म्हणा हव तर) मात्र त्याला असं करण्यापासून परावृत्त केलं. याचं एक कारण, वर म्हटल्याप्रमाणे, संभोग हा केवळ अपत्यप्राप्तीसाठी नसून आनंदासाठीही असतो हा त्याला लागलेला शोध. या आनंदापोटीच (विकृत आनंद म्हणा हवं तर) मला हवी ती मादी मी कशीही करून मिळवणारच हा हट्ट मनुष्याच्या मनात बसला आणि मग इथे बलात्काराने जन्म घेतला.

आपल्या समाजात बलात्कार का होतात?

आपल्याला हव्या त्या मादीचा, तिची मर्जी असो वा नसो, हव्यास बलात्काराला कारणीभूत ठरतो. मग त्या मादीच्या प्राप्तीसाठी तिला भुलवण्याचे विविध प्रकार सुरु होतात. यात प्रामुख्याने येतो तो पुरुषाने तिला स्वतःबद्दलच्या खऱ्या-खोट्या विविध गोष्टी तिला सांगून तिला भुलवण्याचा प्रकार. खोटी आश्वासनं, लग्नाचं वचन, एखाद्या मोक्याच्या जागेवरची नेमणूक किंवा निवडणूकीच तिकीट आणि अशीच बरीच काही आश्वासनं दिली जातात ..!. पुरुषाच्या भूल-थापांना, त्याच्या खऱ्या-खोट्या कर्तुत्वाला भुललेली ती स्त्री स्वतःला त्याच्या स्वाधीन करते. पुढे बऱ्याच कधीतरी आपण फसवले गेलोय हे तिच्या लक्षात येते आणि मग त्या पुरुषावर बलात्काराचे आरोप केले जातात. वास्तविक आपण फसव्लो गेलोय हे तिला कळेपर्यंत तिच्याशी त्या पुरुषाने ठेवलेलं संबंध तिच्या सहमतीने (अल्पवयीन मुली वगळता) ठेवलेले लैंगिक संबंध असतात. त्यामुळे त्यांना बलात्कार म्हणावं, की आणखी काही हे नीट समजत नाही..यात अज्ञान किंवा सज्ञान मुली-स्त्रीया असा भेद नसतो. यातील बरेचसे संबंध महिनोंमहीने किंवा दिवसेंदिवस सुरु असतात आणि याची प्रत्यक्षात उघडणूक बऱ्याच काळाने होते आणि त्यांची व्याख्या बलात्कार अशी केली जाते. असे बलात्कार सिद्ध होणं अवघड असतं. पुरुषाच्या दृष्टीने ती त्याची वासना पूर्ती असते.

सुड किंवा बदला घेण्याच्या निनित्तानेही बलात्कार केला जातो. दोन व्यक्ती किंवा दोन कुटुंब किंवा दोन समाज किंवा दोन देश यामधील भांडणात शत्रुपक्षातील स्त्रियांवर बलात्कार केला जाणे अगदी नित्याचे आहे. या बालात्कारामागे वासनांची पूर्ती हा उद्देश नसतो, तर शत्रूला धडा शिकवणे हा उद्देश असतो. इथे बलात्काराचा उपयोग एक हत्यार या पेक्षा जास्त नसतो. असे बलात्कार हा ठरवून केला जातात असं ठामपणे म्हणता येणार नाही. देशाविरुद्ध, समाजाविरुद्र किंवा व्यक्तीविरुद्धचा बदला किंवा सूड या भावनेतून असे बलात्कार होत असतात. सामुहीक बलात्कारांची कारणे बऱ्याचदा अपमानाचा बदला किंवा सुड ही असु शकतात. एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीने दिलेल्या नकाराचा राग ठेवून, आपल्या झालेल्या तथाकथित अपमानाचा बदला घेण्यासाठी बलात्काराचा हत्यार म्हणून उपयोग केला जातो.

आपल्यासारख्या असंख्य जाती-जमातीच्या देशात त्यां त्यां जाती-जमातींच्या उच-निचतेच्या कल्पनाही सामुहीक बलात्काराला कारणीभूत असतात. स्त्री ही संपत्ती असा समज असल्याने, स्रीवर केलेला बलात्कार हा संपत्तीच्या लूटीसमान मानण्याची आपली पुरातन कल्पना आजही आपल्या मनात कुठेतरी शाबूत असल्याच्या मानसिकतेतून असे बलात्कार घडतात. योनीशुचीतेच्या आपल्या सांस्कृतिक कल्पनाही बलात्कार घडवण्यास कारणीभूत असतात. त्यातून शत्रूच्या स्त्रीला नासवणे ही भावना या बलात्काराच्यामागे असते. शिवाय कोणत्याही मोठ्या भांडणात स्त्री हे सॉफ्ट टार्गेट असल्याने, सामुहीक किंवा वैयक्तिक बलात्कारांच्या घटना घडतात. हे बलात्कार सिद्ध करून त्यांना कायद्याच्या चौकटीतून शिक्षा देणं तुलनेने सोपं असतं. सेक्स मध्ये मोकळ्या ढाकळ्या असणाऱ्या पाश्चिमात्य समाजातील बलात्कार साधारण या मुळे घडतात.

आता आपल्या देशातील सर्वात जास्त प्रकारच्या बलात्कारांबद्दल. आपल्या सारख्या बंदिस्त समाज व्यवस्थेत स्त्री-पुरुषांच्या काम भावनांच्या पूर्तीचा समाजमान्य मार्ग म्हणजे केवळ लग्न ही व्यवस्था असते. ‘नातिचरामी नातिचरामी’ किंवा ‘सात जन्म हाच पती किंवा पत्नी’ या भावना कितीही उदात्त असल्या, तरी लग्नाच्या बंधनात अडकलेल्या त्या स्त्री –पुरुषांच्या काम भावनांना त्या मर्यादेत ठेवतात असं ठामपणे म्हणता येणार नाही. अशा अनेक स्त्री-पुरुषांमध्ये कामभावनांची पूर्ती होऊ न शकल्यामुळे मग त्यांच्यात विकृती निर्माण होते. स्त्रीवर असलेली बंधन, समजाची नजर, विविध बंधनं यामुळे स्त्री आपल्या या भावना दडपून टाकते, तर पुरुष हा समाजात मोकळा असल्याने, आपल्या काम भावनांची पूर्ती करण्यासाठी तो विविध मार्ग छुप्या रीतीने शोधत असतो. यातूनच मग अंगवस्त्र, वेश्याव्यवसाय, अनैक्तिक संबंध वैगेरे निर्माण होतात. ‘वेश्या नसत्या तर चांगल्या घरातील बायका मुलीना घराबाहेर पडण मुश्कील झाल असत’ असं म्हणतात ते याचमुळे. पुरुष आपल्या लैंगिक भावना फार काळ दाबून ठेवू शकत नाही. पूर्वीपेक्षा समाज अधिक मोकळा झाल्याने अनैक्तिक संबंधाच प्रमाण आपल्याकडे वाढत आहे ते याचमुळे. अशा संबंधात स्त्रीचाही सहभाग असलातरी तिची अशा संबंधातली गुंतणूक बहुतकरून भावनिक असते, तर पुरुषाची संपूर्णपणे शारीरिक. स्त्रीचा अनैतिक समजला जाणारा संबंध एका पुरुषा पर्यंत मर्यादित असू शकतो, तर त्याच वेळेस त्या पुरुषाचे अनेक स्त्रियांशी असे संबंध असू शकतात. असे संबंध उघडकीस आल्यावर मात्र बऱ्याच स्त्रिया त्यांची बदनामी होईल म्हणून गप्प बसतात तर काहींकडून त्या पुरुषावर बलात्काराचा आरोप ठेवला जातो, हे सत्यही समजून घेण्याची गरज आहे.

आपल्याकडील ‘स्त्री ही एका क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता’ असते हे सत्यही नवरा-बायकोच्या काम संबंधात अडथळा आणते, अशी तक्रार माझ्याकडे मी ‘भ्रमर’ हा लेख लिहिल्यानंतर अनेक ‘नवऱ्यांनी’ केली होती. माझंही मत काही वेगळं नाही. खरच, आपल्याकडे माता होण्यासाठीच स्त्री पत्नी होते की काय, अशी वाटण्यासारखी परिस्थिती आहे खरी. एकदा का ती त्या मुलात गुंतली, की मग पत्नीधर्म ती साफ विसरून गेलीय की काय, असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते हे खरंय. अगदी शंभर टक्के नव्हे, परंतु ह्या सत्याची टक्केवारी बरीच मोठी आहे. पुरुषाला चळण्यासाठी हे ही एक कारण आहे.

वेश्यांकडे जाण्याचे धारिष्ट्य नसलेले किंवा प्रयत्न करूनही अनैतिक संबंध प्रस्थापित न करू शकलेले पुरुष मग आपल्या लैंगिक भावनांच्या पूर्तीसाठी सॉफ्ट टार्गेट्सच्या शोधात असतात. असे टार्गेट त्यांना त्यांच्या घरात, शेजारी किंवा जवळच्या नातेसंबंधात सहज उपलब्ध होऊ शकते. अशी टार्गेट बहुतकरून अल्पवयीन मुली (हल्ली मुलंही) असतात. लहान मुलांच्या घरातील किंवा शेजारच्या वयाने मोठ्या असलेल्या काका-मामा वैगेरे पुरुषाविषयी असलेल्या भीतीयुक्त आदराचा आणि लहान मुलीना यातलं फारसं काही कळत नसल्याचा पुरुषांकडून गैरफायदा घेतला जातो आणि आपल्या काम भावनांची विकृत पुरती केली जाते. लहान मुलींशी मोठ्या वयाच्या पुरुषाने केलेल्या संभोगामुळे त्या पुरुषाच्या लैंगिक ताकदीत वाढ होते या सारख्या खुळचट कल्पनाही काही ठिकाणी अशा प्रकारच्या संबंधात असतात. यात बळी पडणाऱ्यांत अल्पवयीन मुलींचा भरणा जास्त असतो. अल्पवयीन बालांवर केल्या जाणाऱ्या बलात्कारांना मी ‘बालात्कार’ असं म्हणतो.

‘भारतीय गुन्हे नोंद ब्युरो NCRB’च्या माहितीनुसार आपल्या देशातील जवळपास ९५ टक्के बलात्कार घरातील जवळच्या माणसांकडून अथवा नातेवाईकांकडून केले जातात. ‘बाला’त्कारांचा हेतूच मुळात पुरुषाच्या विकृत वासनेची पूर्ती हा असतो. आपल्याकडे हे बलात्कार फारसे उघडकीस येत नाहीत, कारण ‘समाज काय म्हणेल’ ही भिती. कारण यात पुरुषापेक्षा स्त्रीची किंवा त्या मुलीचीच बदनामी होत असते. आपण आज कितीही शिकलो सवरलो किंवा जगाला दिशा वैगेरे देण्याच्या गप्पा जरी मारल्या, तरी आजही कुठल्याही वयाच्या स्त्रीकडे पाहाण्याचा आपला एकूणच दृष्टीकोन हिनतेचाच आहे. स्त्रीची सामाजिक बदनामी होऊ नये म्हणून अशा बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद पोलिसात होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे.

आणखी एक बलात्कार आपल्याकडे नित्यनेमाने होत असतो. ह्या बलात्काराला किमान आपल्या देशातील सर्व वयोगटाच्या मुली-स्त्रिया दररोज आणि सकाळ संध्याकाळ बळी पडत असतात. हा बलात्कार म्हणजे नजरेने केला जाणारा बलात्कार. असा बलात्कार करणाऱ्यामध्ये तरुणांपासून पुढील सर्व वयोगटाचे, संस्कृतीचा अभिमान असणारे आणि नसणारेही, सर्व प्रकारच्या हुद्द्यावारचे, अमीर-गरीब अश्या सर्व प्रकारचे पुरुष कमी-अधिक प्रमाणात सामील असतात. समाज, नियम, कायद्याची भीती किंवा धाडसाचा अभाव यामुळे हे प्रत्यक्षात काही करत नाहीत, परंतु केवळ नजरेने समोरच्या स्त्रीला तिची वस्त्र फेडून आरपार पाहत, तिच्याशी ते काल्पनिक संग करत असतात. हा बलत्कार सिद्ध करता येत नाही, मात्र कोणत्याही वयाच्या स्त्रीला तो व्यवस्थित जाणवतो. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना विचारून पहा, त्या बरोबर सांगतील. गर्दीचा फायदा घेऊन धक्का मारणे, बसच्या कमी अधिक होणाऱ्या गतीचा फायदा घेऊन स्त्रियांच्या अंगचटीला जाणे, काही न काही निमित्ताने स्त्रियांशी बोलणे, तिला स्पर्श करणे हा बलात्कार आहे. ह्यात किंवां घरगुती गैरप्रकारात बहुसंख्य स्त्रिया याची वाच्यता करीत नाहीत कारण आपल्या समाजाची स्त्रीलाच दोष देब्ण्याची वृत्ती.

देशात नुकत्याच घडणाऱ्या विविध बलात्कारांच्या बातम्या आणि त्यतून सरकारवर केले दोषारोप हा राजकारणाचा भाग आहे. बलात्काराची कारण सामाजिक आणि मानसिक आहेत. स्त्री-पुरुषांचा सेक्स बद्दल असलेला नैसर्गिक कल या मागे आहे. कोणतंही सरकार आणि कितीही कठोर शिक्षा बलात्कारांना आळा घालू शकत नाहीत. अखाती देशातील शिक्षा अत्यंत क्रूर म्हणता येतील अशा असूनही त्या देशातील बलात्कार आणि स्त्रियांचं लैंगिक शोषण थांबलेलं नाहीय. याउलट पुढारलेल्या देशात सेक्स हा अत्यंत सामान्य जाणारा प्रकार असूनही तेथील बलात्कार थांबलेले नाहीत. आपल्या देशात तर सेक्स हा शब्दही चारचौघात उच्चारण अशिष्ट मानल जात, तिथे प्रत्यक्ष काम भावनांचं काय होत असेल याची कल्पना करा. तरी आता आपला समाज बराच मोकळ झालाय आणि त्याच प्रतिबिंब टीव्ही मालिकांमधल्या अनैतिक संबंधातून दिसतंय. जो पर्यंत काम भावना आहे, तो पर्यंत अनैतिक संबंध आणि बलात्कार होणारच आहेत..!

-©️नितीन साळुंखे, मुंबई

9321811091