बाबासाहेब नांवाचा माणूस..

बाबासाहेब नांवाचा माणूस..

आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस. इसवी सन १९५६ सालातल्या आजच्याच दिवशी बाबासाहेब आपल्याला पोरकं करुन गेले..खरं तर त्यांनी आपल्याला पोरकं केलेलं नाही. त्यांच्या विचारांच्या वारश्याच्या रुपाने ते सतत आपल्यासोबत आहेत. मार्गदर्शन करत आहेत. पण आपणच करंटे. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्यापेक्षा, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यापेक्षा, त्यांची जयंती आणि पुण्यतिथी करण्यातच आपण धन्यता मानत आहोत आणि वर स्वत:.ला त्यांचे अनुयायीही म्हणवून घेत आहेत..

काही लोक बाबासाहेबांना महामानव म्हणतात, तर काही देव. महामानव कसा असतो, त्याचं वर्णन मला ठाऊक नाही. म्हणून मी बाबासाहेबांना माहामानव मानत नाही. देव तर त्याहुनही मानत नाही. देव आहे, यावरच माझा विश्वास नाही. ज्यांनी देवाला पाहिलंय अशी माणसंही मला आढळलेली नाहीत. ज्यांचा देवावर विश्वास आहे, ते लोक देव आहे असं ‘मानतात’. आता तो ‘मानावा’ लागतो, म्हणजे त्याचं अस्तित्वच संशयास्पद आहे. देव असलाच तर, तो कुणा दिन-दुबळ्याच्या सहाय्यास आलेला माझ्या तरी पाहाण्यात वा ऐकिवात नादही. तसं झालेलं फक्त पौराणिक पोथ्या-पुराणांतच वाचायला किंवा चित्रटांतून पाहायला मिळालेलं आहे. स्वत:ला देवाचे भक्त म्हणवणाऱ्या माणसांनीही, त्यांच्यासारखीच माणसं असणाऱांवर अनन्वित अत्याचार केल्याचाही आपला ताजा इतिहास आहे. त्यावेळीही आपल्या भक्तांना तसं न वागण्याची बुद्धी त्यांच्या देवाने दिल्याचं माझ्या माहितीत नाही. अशा वेळी त्या दिन-दुबळ्या आणि अत्याचार सोसणाऱ्या माणसांचं दु:ख बाबासाहेबांना समजलं. त्यांनी अशा वंचितांचे अश्रू पुसले. त्यांना मार्ग दाखवला.

बाबासाहेबांनी अन्यायाचा प्रतिकार केला, ते बाबासाहेब माणूस होते म्हणून. माणसाचं दु:ख माणसालाच समजू शकतं. नव्हे, ते माणसानेच समजून घ्यावं लागतं. देवाच्या वा देवाचे लाडके भक्त म्हणवणाऱ्यांच्या बस की ती बात नाही..

ममाणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हा आग्रह बाबासाहेबानी धरला. म्हणून बाबासाहेबांना मी महामानव किंवा देवापेक्षा माणूस म्हणूनच स्वीकारतो..अशा या माणसातल्या माणसाला माझं विनम्र अभिवादन..!!

-नितीन साळुंखे

9321811091

06.12.2019