मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा- लेखांक ३४ वा.
वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल..-( एकूण दोन भागांत)
भाग पहिला-
सन १८७० पूर्वीची मुंबईतील हॉटेल्स-
दक्षिण मुंबईचा फोर्ट विभाग अनेक देखण्या इमारतींनी व्यापलेला आहे. ह्या भागात फेरफटका मारताना, अगदी आजही, आपण इंग्लंडातील परिसरात फिरत आहोत असं वाटतं. गोरे, अस्सल विलायती साहेब जाऊन, काळे देशी नकली साहेब सर्वत्र दिसतात, हाच काय तो ठळक फरक. भाषा मात्र साहेबाचीच कानावर पडते. हे देशी साहेब काम करत असलेल्या या फोर्ट विभागातील बहुतेक इमारती मात्र इंग्रजी राजवटीत बांधल्या गेल्या आहेत आणि १००-१५० वा त्याहूनंही अधिक काळ उलटून गेल्यावरही, त्या जशाच्या तशा आहेत. एवढच नव्हे तर, दिवसागणिक वाढणारा त्यांच्यातल्या कामाचा व्यापही समर्थपणे सांभाळत आहेत.
फोर्ट विभागच्या दक्षिणेला असणारा एक भाग म्हणजे “काळा घोडा”. काळा घोड्याच्या पश्चिम दिशेला असलेल्या एल्फिन्स्टन काॅलेजची इमारत, डेव्हिड ससून लायब्ररीची इमारत, तिच्या शेजारची आर्मी अॅन्ड नेव्ही बिल्डींग या वास्तू आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहात नाहीत. गाॅथिक, व्हिक्टोरीयन, रोमानिस्क, इंडो-सारसेनिक शैलीत ब्रिटिश काळात बांधलेल्या या वास्तू केवळ देखण्या नाहीत, तर त्या पैकी प्रत्येकीला आपला स्वत:चा असा इतिहास आहे. इतकंच नव्हे तर, त्यापैकी अनेक इमारतींच्या दगडी भिंतींच्या आत, देशाच्या इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या काही घटनाही घडलेल्या आहेत. त्यातलीच एक वास्तू आहे, एस्प्लनेड हॉटेलची.
या ऐतिहासिक इमारतींच्या रांगेतच, आर्मी-नेव्ही बिल्डींगच्या डाव्या बगलेत, कोपऱ्यावर, परिसरातील इमारतींच्या वास्तूशैलीशी बिलकूल फटकून असणारी, म्हणून वेगळी दिसणारी, कित्येक वर्षांच्या देशी बेपर्वाईमुळे कुरूप दिसणारी, जराजर्जर झालेली, बांबूंच्या आधारावर उभी असलेली आणि तरीही आता आतापर्यंत हव्यासी मानवी वावर असलेली एक इमारत, तिच्या (दुरा)अवस्थेमुळे आपलं लक्ष वेधून घेते. ही इमारत आहे ‘एस्प्लनेड हाॅटेल’ची..! ही आपली आजच्या कथेची नायिका.
‘वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल’..! आताच्या ‘स्टार’ पद्धतीत सांगायचं तर, हे मुंबईतलं (किंवा देशातलंही म्हणायला हरकत नाही) सर्वात पहिलं ‘फाईव्ह स्टार’ हाॅटेल. येत्या ४ फेब्रुवारी, २०२० रोजी एस्प्लनेड हॉटेलची हि इमारत, तिच्या वयाची १५० वर्ष पूर्ण करत आहे हे देशातलं पहिलं फाईव्ह स्टार हाॅटेल. केवळ पाहिलं पंच तारांकित हॉटेल नव्हे, तर हॉटेल म्हणून बांधण्यात आलेलीही ही देशातील पहिली इमारत. इथेच ह्या इमारतीची ओळख थांबत नाही, तर इतरही अनेक बाबतीत देशांत आणि जगातही पहिलेपणाचा मान या हाॅटेलकडेच आहे. त्या निमित्ताने तिची याद जागवून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला चार शब्द लिहावेशे वाटले.
जॉन हडसन वॅटसन ह्या कापडाच्या व्यापारात असलेल्या इंग्लिश व्यापाऱ्याने हाॅटेलसाठी म्हणून ही इमारत बांधली. इसवी सनाच्या १८७० सालात ह्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं. वर म्हटल्याप्रमाणे हॉटेल म्हणून वापराकरिता वॅट्सनने ही इमारत बांधली, म्हणजे मुंबईत त्याकाळी हॉटेल्स नव्हती का, असा प्रश्न माझ्या मनात आला आणि मी जेंव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत गेलो, तेंव्हा माझ्या हाती मनोरंजक माहिती लागत गेली.
इसवी सनाच्या १८७० सालात वॅटसनचं एस्प्लनेड हॉटेल उदयाला येण्यापूर्वी, मुंबईत एकूण ३ क्लब आणि २७ हॉटेल्स होती. मुंबईतली त्या काळातली वस्ती मुंबईच्या किल्ल्याच्या तटबंदीच्या आत आणि तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला थेट माझगाव-भायखळा परिसरात असल्याने, ह्या हाॅटेलांची गर्दी फोर्ट आणि माझगाव भागातच होती..!
‘फोर्ट’च्या तटबंदीच्या आत असलेली हाॅट्लं-
१८३८ मध्ये मुंबईच्या फोर्ट विभागात छोटेखानी ‘व्हिक्टोरिया हॉटेल’ होतं. ह्या हॉटेलची नेमकी जागा सांगता येत नाही, परंतु ह्याच नावाचं आणि त्याकाळच्या पद्धतीचं बांधकाम असलेलं एक हॉटेल, जीपीओनजीक, आताच्या शाहिद भागात सिंग मार्गावर आहे. ते बहुतेक हेच असावं. फोर्टच्या तटबंदीच्या आत, पूर्वी जिथे ‘काळा घोडा’ नावाने आजही मशहूर असलेला सातव्या एड्वर्डचा पुतळा होता, त्याच्या समोर ‘टेम्पल बार'(१८६९) हॉटेल होतं. ही जागा म्हणजे सध्याच्या ‘खैबर’ हाॅटेलची वा त्याच्या उजव्या बाजुचा इमारत. ऱ्हिदम हाऊसच्या उजव्या बाजूने पूर्वेकडे जाणारा रास्ता, जो आज व्ही. बी. गांधी मार्ग म्हणून ओळखला जातो(पूर्वीचा फोर्ब्स स्ट्रीट), त्या रस्त्यावर ‘केम्ब्रिज हॉटेल'(१८६४) होतं. त्या रस्त्यावरून आत गेल्यावर, नागिनदास मास्टर मार्गावर आजही ब्रिटिश हॉटेल लेन नावाची एक चिंचोळी गल्ली आहे, तिथे ‘ब्रिटिश हॉटेल’ होतं. ते १८६२ सलात बंद झाल्यावर, त्याच गल्लीत नंतर ‘इंग्लिश हॉटेल’ आलं. टॅमरिंड लेनमध्ये (हि गल्ली ह्याच नावाने अजूनही ओळखली जाते) ‘रॉयल हॉटेल’ (१८५९) होतं. चर्चगेट स्ट्रीटवर, म्हणजे आताच्या वीर नरिमन मार्गावर ‘बोंबे एक्स्चेंज हॉटेल’ होतं, तेंव्हाच्या एल्फिन्स्टन सर्कलमध्ये, म्हणजे आजच्या हॉर्निमन सर्कल परिसरात ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ हॉटेल होतं. ह्या हॉटेलांव्यतिरिक्त फोर्ट विभागातच वेव्हर्ली हॉटेल (ह्याच पाहिलं नांव ‘जेरुसलेम हॉटेल होतं), इंपिरिअल हॉटेल, लंडन हॉटेल, प्रशियन हॉटेल(१८६४), ऑस्ट्रेलेशिअन हॉटेल, ऑकलंड हॉटेल, युरोप हॉटेल अशी अनेक हॉटेलं होती.
माझगाव परिसरातली हाॅटेलं-
माझगाव परिसरात ‘होप हॉल फॅमिली हॉटेल'(१८३७), हॅमिल्टन हॉटेल (१८६६ मधे हे हाॅटेल बंद झालं. हे हॉटेल म्हणजे आजची नागपाड्याची पोलीस हॉस्पिटलची इमारत असावी ), नेसबीट लेनमध्ये ‘क्लेअरडन फॅमिली हॉटेल’, ‘माझगाव हॉटेल’, माझगाव युरोप हॉटेल, ओरिएंटल हॉटेल अशी हॉटेलं होती.
भायखळा भागातली हाॅटेलं-
भायखळ्याला ‘बॉईस हॉटेल’ होतं, अडेल्फी हॉटेल (१८५९) होतं. ‘बाँबे हॉटेल’ होतं, ज्याचं नामकरण पुढे ‘भायखळा हॉटेल’ झालं. नागपाडा जंक्शनवरच हे हाॅटेल होत. भायखळा ब्रिजच्या बेचक्यात दबून गेल्यासारखा आजचा ‘खडा पारशी’चा जो पुतळा उभा आहे, तो अगोदर या नागपाडा जंक्शनवरच होता. खडा पारशीचे जुने फोटो पाहिल्यास, त्याच्या मागे ही भव्य इमारत उभी असेलेली दिसते. आता तिथे खडा पारशीही नाही आणि हे हाॅटेलही नाही. हाॅटेलच्या जागेवर आता गगनचुंबी इमारत उभी आहे.
वरच्या फोर्ट, माझहांव आणि भायखाळा परिसरातल्या हाॅटेल्सव्यतिर्क्त, मुंबईत दोन सार्वजनिक आणि एक खाजगी, असे तीन क्लब्स होते. त्यातला ‘बाॅम्बै क्लब’ नांवाचा क्लब रॅम्पार्ट रो, म्हणजे आताच्या के. दुभाष मार्गावर ‘बोंबे क्लब’होता. दुसरा १८३३ साली स्थापन झालेला क्लब ‘भायखळा क्लब’ त्याच्या नांवाप्रमाणे भायखळ्याला होता. तरी तिसरा क्लब एका खाजगी कंपनीचा असून तो माझहांवला ‘सांताब्राझ’ नांवाच्या बंगल्यात होता..!
सन १८७० पूर्वी मुंबईत इतकी हाॅटेल्स असुनही जाॅन वॅटसनला आणखी एक हाॅटेल बांधावसं का वाटलं, या प्रश्नाचं उत्तर मुंबईच्या त्या काळच्या ठेवणीत शोधता येतं.
आज दिनांक २३ जानेवारी २०२० रोजीच्या, ‘दै. सामना’च्या विशेष पुरवणीत पान क्रमांक १७ वर प्रसिद्ध झालेला माझा लेख-
मुंबई शहर; खुल्या आसमानाखालचं संग्रहालय –
मुंबईबद्दल माझ्या मनात जबरदस्त कुतूहल आहे. ह्या कुतूहलाचा बीज माझ्या मनात पडलं त्याला कारणीभूत झाले दैनिक लोकसत्ताचे तत्कालीन संपादक डॉक्टर अरुण टिकेकर. नेमकं कोणतं ते आता आठवत नाही, पण १९९२-९३ साल असावं, डॉक्टर अरुण टिकेकरांची ‘जन-मन’ आणि ‘स्थल-काल’ नावांची एक साप्ताहिक लेखमाला त्यावेळी रविवारच्या लोकसत्तेत प्रसिद्ध व्हायची. मुंबईच्या गत तीन-चारशे वर्षांच्या वाटचालीत महत्वाची भुमिका बजावलेली विविध ऐतिहासिक स्थळ, मुंबई शहराला घडवणारी देशी-विदेशी (ह्यात ब्रिटिश जास्त हे ओघानेच येतं) व्यक्तिमत्व, इथले रस्ते आणि त्यांचा मुंबईच्या जडणघडणीत असलेला वाटा, इथल्या इमारती, गाड्या-घोडे इत्यादींची अत्यंत सुंदर शब्दांत टिकेकर माहिती देत असत. ती लेखमाला वाचताना डोळ्यासमोर तो काळ अक्षरक्ष: उभा करण्याचं सामर्थ्य टिकेकरांच्या शब्दांत होतं. मी. भान विसरून ते सारं वाचायचो, मनानेच त्या काळात क्षणबर जाऊन मी तो काळ जगायचे. मी तेंव्हाच ठरवलं होत की, पुढे कधीतरी संधी मिळताच टिकेकरांनी त्या लेखांतून दिलेल्या ठिकाणांना भेट द्यायची, मुंबईचा आपण आपल्या नजरेने शोध घ्यायचा म्हणून. मुंबईच्या वाटचालीचा शोध घ्यायचं बीज टिकेकरांनी माझ्या मनात माझ्याही नकळत पेरलं होत.
तशी संधी मला त्यानंतर जवळपास २५ वर्षांनी मिळाली. एव्हाना मी नोकरीतून मुक्त होऊन पूर्णवेळ वाचन आणि जमल्यास लेखन या माझ्या छंदांना देण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान माझ्या वाचनात इसवी सनाच्या १८६२ सालात गोविंद नारायण मडगांवकर यांनी लिहिलेलं, ‘मुंबईचे वर्णन‘ हे पुस्तक आलं. या काळाच्या मुंबईच मडगावकरांनी त्याकाळच्या मराठी भाषेच्या वळणात जे बहारदार वर्णन केलंय, त्याला तोड नाही. ते पुस्तक वाचताच, मला टिकेकरांच्या २५ वर्षांपूर्वीचे ते सारे लेख आठवले. मडगावकरांचं पुस्तक वाचून, जुन्या मुंबईवरील आणखी वाचन करण्याची उर्मी माझ्या मनात दाटून आली आणि वर्तमानातील मुंबईत, काळाच्या दीर्घ माऱ्याला तोंड देत अद्यापही टिकून असलेल्या जुन्या काळातल्या मुंबईच्या काही पाऊलखुणा शिल्लक आहेत का आणि असल्यास त्या कोणत्या परिस्थितीत आहेत, याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली.
सुरुवात करताना, मुंबईवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांच्या जास्तीच्या वाचनापासून केली. मुंबईवर विविध काळातल्या विविध लेखकांनी प्रचंड प्रमाणावर लेखन केलंय.ह्यातलं बरंचसं लेखन स्वातंत्र्यपूर्व काळात झालेलं आहे आणि ते बहुतेक सर्व इंग्रजीत आहे. मराठीतही मुंबईवर लेखन झालंय, पण त्याच प्रमाण खूपच कमी आहे. त्यातही, काही अपवाद वगळता, फारशी विस्तृत माहिती मिळत नाही. तरीही ती पुस्तकं मी मिळवून वाचली आणि जास्तीच्या संदर्भासाठी मी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचा सदस्य झालो. एशियाटिक सोसायटीत मुंबई ह्या विषयावरची इंग्रजीतली अनेक पुस्तक मला वाचायला, अभ्यासायलामिळाली.मुंबईवरच्या पुस्तकांचं वाचन करताना, ह्या विषयाचा एकूण आवाका आणि माझे एकूण इतर व्याप लक्षात घेऊन, माझा मुंबईवरचा अभ्यास, मुंबई शहरापुरता, म्हणजे कुलाब्यापासून पश्चिम बाजूस माहीम आणि पूर्व बाजूस सायन इथपर्यंतच मी मर्यादित ठेवला. काळाचा विचार करता, पोर्तुगीजांकडून मुंबईची बेटं १६६१ साली आंदण म्हणून जेंव्हा ब्रिटिशांकडे आली तेंव्हा पासून, ते साधारण आपल्या स्वातंत्र्यपर्यंतचा कालावधी मी अभ्यासाकरीता घेतला. माझ्या सारख्या इतिहासाच्या अभ्यासाचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या हौशी अभ्यासकासाठी ह्या मर्यादा आखून घेणं आवश्यक होत.
विविध पुस्तकातून जुन्या मुंबईचा शोध घेताना, मुंबई शहारातील म्युझियम्सना भेटी देणं साहजिकच होत. ह्यापूर्वी म्युझियमच्या आणि माझा संबंध लहानपणीच काय तो आला होता. काळा घोडा नजिकच्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमबद्दल त्यामुळे माहिती होती, पण बालपणीच्याह्या म्युझियम भेटीमागे ज्ञानार्जनापेक्षा सहलीचा आनंद घेणे एवढाच हेतू होता. आता मात्र मी म्युझियम सजगतेने पाहायला सुरुवात केली. मुंबईच्या राणी बागेत भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय आहे आणि तिथे जुनी मुंबई उलगडून दाखवणाऱ्या अनेक वस्तू-शिल्पे आहेत हे मला ह्याच वेळी समजलं. भाऊ दाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर ब्रिटिश कालीन मुंबईवर अधिकार गाजवणाऱ्या आणि त्याकाळात मुंबईच्या फोर्ट भागात नाक्या नाक्यावर बसवलेल्या अनेक इंग्रजांचे पुतळे हारीने मांडून ठेवलेलं आढळले आणि मला पुस्तकातून माझ्या वाचनात आलेली जुनी मुंबई प्रत्यक्षात भेटायला सुरुवात झाली.
भाऊ दाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर ठेवलेल्या पुतळ्यांमध्ये मला राणी व्हिक्टोरियाचा, आता उन्हा -पावसाच्या माऱ्यानेविद्रुप झालेला, परंतु कधीकाळी देखणा असलेला संगमरवरी पुतळा दिसला आणि पुस्तकात वाचलेली ह्या पुतळ्याची आठवण जागी झाली. राणी व्हिक्टोरियाच्या हा पुतळा चर्चगेट नजीकच्या सीटीओच्या मागे, म्हणजे आता जो टाटा कम्युनिकेशन्सचा (पूर्वीचं विदेश संचार लिमिटेड)उंच टॉवर उभा आहे, बरोबर त्या जागी होता. पण जुन्या पुस्तकातून पाहिलेल्या तिच्या पुतळ्याच्या चित्रात, एक शोभिवंत कलाकुसर केलेला संगमरवरी मखरही पाहिलेलं मला आठवत होतं. तो काही मला इथे दिसेना. मी म्युझियममध्ये चौकशी केली, पण त्यांनाही सांगता येईना. मग मी तो मखर कुठे असेल या दिशेने शोध घ्यायला सुरुवात केली. पुढे बऱ्याच काळाने इंटरनेटवर मुंबईवरचा लेख वाचताना, व्हिक्टोरियाच्या तो मखर जुहू येथे एका उद्योगपतीच्या बंगल्यात असल्याचं समजलं. लगेच तिथे गेलो, पण तिथे तो नव्हता. शोध सुरूच राहिला आणि अचानक एके दिवशी मला तो मखर मुंबईच्या नेपियन सी रस्त्यावरच्या एक आधुनिक इमारतीच्या दर्शनी भागावर असल्याचं कळलं आणि मी तो लगेच पाहूनही आलो. जुन्या मुंबईचा पुस्तकायुन वाचलेला, चित्रातून पाहिलेला अस्सल तुकडा, असा मला रस्त्यावर सापडला आणि माझ्या लक्षात आलं, की मुंबई शोधायची असेल तर, केवळ पुस्तक वाचून भागणार नाही, म्युझियमना भेटी देऊनही ती मिळणार नाही, तर डोळे उघडे ठेऊन रस्त्यातून फिरल्यासच ती सापडू शकेल. आणि मी मुंबईचा शोध तिच्या रस्त्यावर उतरून घ्यायला सुरुवात केली आणि जुनी मुंबई माझ्या डोळ्यासमोर, मधला काळाचा जाड पडदा दूर करून येऊन उभी राहू लागली.
त्याच दरम्यान कधीतरी मुंबईत अजुनही अस्तित्वात असलेल्या ब्रिटीश कालीन माईलस्टोन्सची माहिती देणारा एक लेख माझ्या वाचनात आला. त्यातील एक माईलस्टोन माझ्या नेहेमीच्या रस्त्यावर, दादरच्या आंबेडकर मार्गावर असलेल्या चित्रा सिनेमासमोर असल्याचं समजलं. लगेच तिथे गेलो अगदीच दुर्लक्षित आणि बेवारस स्थितीत असलेला तो मुंबईच्या गेल्या दोन-अडीचशे वर्षांतील बदलांचा ऐतिहासिक मूक साक्षीदार पाहून मला भरून आलं. त्याच्यासमोर उभा राहिलो आणि दादरच्या आंबेडकर रोडवरची प्रचंड वाहतूक माझ्या समोरून आपोआप नाहीशी झाली. कडेला घनदाट झाडी असलेला, तेंव्हाही आता एवढाच रुंद असलेला आंबेडकर रोड नाहीसा होऊन त्याजागी ब्रिटिश काळातला व्हिन्सेंट रोड मला दिसू लागला. बग्गीतून जाणारे विदेशी लाटसाहेब आणि देशी व्यापारी, बैलगाडीतून जाणारे एतद्देशीय त्या रस्त्यावरून जाताना मला दिसू लागले. त्यावेळची साधी, तरीही मनाला मोहवणारी मुंबई मला दिसू लागली. हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता. मला टाईम मशिनमधून दोन-अडिचशे वर्षांचा उलटा प्रवास केल्याचा अनुभव आला. असाच अनुभव मला पुढे सायन, आर्थर रोड, दादरच्या कबुतर खान्याजवळचा माईलस्टोन्स पाहताना आला.
त्या माईलस्टोन्सवर असलेला चर्चगेटच्या सेंट थॉमस ह्या १८१८ साली बांधकाम पूर्ण झालेल्या चर्चचा उल्लेख पाहुन मी त्या चर्चला भेट दिली. तिथे तर मुंबईच्या इतिहासाला वैभवशाली बनवणारे अनेक ब्रिटिश दिग्गज चिरनिद्रा घेत असल्याचं मला समजलं. त्यातलादेणारा, तो ही चर्चमध्ये, देणार हा मला माहित असलेला एकमें ख्रिश्चन मानून. एकमनव त्याची समाधी ह्या चर्चमध्ये आहे असा उल्लेख मला अन्य एका पुस्तकांतही सापडला होता, ती मी प्रत्यक्ष पहिली. जोनाथन डंकन, ज्याने मुंबई उपनगराशी रास्ता मार्गाने जोडण्याचा सर्वात पहिला यशस्वी प्रयत्न केला. तो रस्ताही त्याने श्रमदानातून बांधून घेतला होता आणि खर्च वसूल करण्यासाठी त्या रस्त्यावर टोलही बसवला होता. हा देशातला पहिला टोल रोड. ऐतिहासिक महत्वाचा हा एकेकाळचा हमरस्ता, आज दिनवाणा होऊन एका बाजुला पडलेला अजुनही पाहाता येतो. मी पाहिला. त्यावरुन अदबीने चार पावलं चाललोही.
गव्हर्नर म्हणून डंकनचं वास्तव्य ज्या इमारतीत होतं, ती देखणी इमारत ह्या चर्चपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. वेळ मिळाला तशी ह्या इमारतीही भेट दिली. याच इमारतीत डंकनचं निधन झालं होतं. आज वडापाव, सॅडविच आणि चहाच्या ठेल्यांनी वेढलेली फोर्टमधली ही देखणी इमारत म्हणजे, त्या काळचं ‘गव्हर्नमेट हाऊस’, म्हणजे आजच्या भाषेत ‘राजभवन’,होतं. त्याचा अभ्यास करताता मला समजलं की, मलबार हिलवर असलेलं ‘राजभवन’ धरून मुंबईत एकून पांच राजभवन(गव्हर्नमेंट हाऊस’) आहेत आणि त्यातील चार तर आजही सर्वांना पाहाता येतात, हे समजलं आणि त्या चारही वास्तूंमधे मी फिरुन आलो. ती राजकीय खलबतं, हल्ले आणि तहनाम्याच्या चर्चा आणि कारस्थानही ऐकलेल्या तिथल्या भिंतींवर हात फिरवला. तो काळ नजरेसमोर आणला. त्या काळात क्षणभर वापरूनहीआलो.
मुंबईच्या आणि देशाच्याही औद्योगिक जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या जमशेटजी नुसेवानजी टाटा यांच्या फोर्टमधल्या मूळ घरावरून लाखो मुंबईकर दररोज ये जा करतात. मी ही करायचो. पण ते टाटांचं घर आहे हे मला एका पुस्तकातून समजलं आणि नंतर माझी त्या घराकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली. तिथूनच पुढे काही मीटर्सवर त्यांचा पुत्र नवल टाटा यांचं हवेली सारखं प्रशस्त घर आहे, ते ही मला सापडलं. मी इथे गेलो. माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखी असणाऱ्या त्या दोन्ही वास्तू नव्या दृष्टीने डोळे भरून पाहिल्या. त्या समोरच्या रस्त्यावरून जाणारी टाटांची, पहिल्या भारतीयाची देशातील पहिली मोटरगाडीही मला दिसू लागली.
जोनाथन डंकन, राजभवन किंवा जमशेदजी टाटा ही केवळ काही उदाहरण झाली. पुढे मी मुंबईतील ऐतिहासिक अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. ती ती ठिकाणं, मधला तीन-चारशे वर्षांचा काळाचा पडदा कल्पनेनं दूर करून, त्या त्या काळात कल्पनेनेच जाऊन पाहण्याचा, अनुभवण्याचा नवाच छंद मला जडला. त्यात मुंबईची प्राचीन देवस्थान आहेत, दर्गे आहेत, चर्च आहेत, रस्ते आहेत, गल्ल्या आहेत, पूल आहेत आणि मुंबईच्या कुशीत, तीन-चारशे वर्षांपूर्वीच पोर्तुगीजकालीन वैशिष्ट्य आजच्या काळातही टिकवून जगणारं एक अक्ख गावही आहे. ही सर्व माहिती अनेक पुस्तकांतून दिलेली आहे, पण मुंबई पुस्तकांतून आणि म्युझियममधून मला जेवढी समजली, त्याहीपेक्षा ती प्रत्यक्ष त्या त्या जागेवर जाऊन पाहिल्यानंतर कितीतरी पटीने जास्त चांगली समजली. किंबहुना, अखंड मुंबई शहर हेच एक मोठं पुस्तक आणि खुल्या आभाळाखालच संग्रहालय आहे, मुंबई खुल्या आसमानाखाली जेवढी चांगली समजते, तेवढी पुस्तकाच्या उघडलेल्या पानातून आणि बंदिस्त वस्तुसंग्रहालयातून समजत नाही, मी हे मुंबईविषयी बोलत असलो तरी, हे आपल्या देशातील प्रांतांना, ठिकाणांना, शहरांना सारखंच लागू असलेलं समीकरण आहे. इतिहास पुस्तकातून वाचता येतो, संग्रहालयातून त्याचे काही जीर्ण तुकडे पाहताही येतात. पण इतिहास साक्षात अनुभवायचा असेल तर, त्या त्या ठिकाणांना भेटी देण्याला पर्याय नाही..!
मी पाहिलेल्या मुंबईतील ऐतिहासिक ठिकाणांचा मला आलेला अनुभव मी शब्धबद्ध करत गेलो आणि तो पुस्तकी संदर्भासहित सोशल मीडियावर लोकांसाठी टाकत गेलो. त्याला प्रचंड म्हणावा असा प्रतिसाद मला मिळाला. माझ्या लेखांतून उल्लेख केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आल्याचही मला अनेकांनी कळवलं. मुंबईच्या इतिहासात रस निर्माण होऊन, अनेकांनी त्या इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात केल्याचाही मला आवर्जून सांगितलं. रोज पाहण्यात येणारी मुंबईतली काही ठिकाण, पायाखालचा एखादा रोजचा रस्ता, एखाद देऊळ ऐतिहासिक दृष्ट्या किती महत्वाचं आहे हे लोकांना समजलच नाही तर, त्यांना त्याच महत्वच समजणार नाही आणि एखाद्या गोष्टीच महत्वच समजलं नाही तर त्याविषयीचा अभिमान निर्माण तरी कसा होणार?
एक उदाहरण सांगतो. परेलच्या चौकात, जिथे आज महानगरपालिकेच्या एफ विभागाचं कार्यालय आहे, त्या चौकाला ‘मडकेबुवा चौक‘ असं नांव दिल आहे. ह्या ठिकाणाला आदल्या पिढीचे लोक ‘परेल पोयबावडी‘ किंवा ‘परेल टीटी‘ म्हणून ओळखायचे. मुंबईतील वाहतुकीचा मुख्य साधनघोडागाड्या, बैलगाड्या असतानाच्या काळात इथे त्या गाडयांना जुंपलेल्या घोडयाना किंवा बैलांना पाणी पाजायचं हे ठिकाण होत. त्याच्या समोरच्या बाजूला पारेलच ट्राम टर्मिनस होत, जिथून ट्राम परतीचा प्रवास सुरु करत सत. आजच्या पिढीपैकी किती जाणं हे माहित असेल या बषांकाचं आहे. आज त्या चौकात नांव ‘मडकेबुवा चौक आहे. एका महत्वाच्या चौकाला ज्यांचं नांव दिलाय, ते मडकेबुवा कोण होते, त्यांचं चरित्र काय, त्यांनी मुंबई शहरासाठी नेमकं काय केलाय, हे किती मुंबईकरांना माहित आहे? दहा पैकी आठ जणांना ते माहित असण्याची शक्यताच नाही. आता जे माहीतच नाही, त्याविषयी प्रेम, आपुलकी कशी काय निर्माण होणार.? मग तसंप्रेम, आपुलकी निर्मण होणासाठी काय करावं लागेल? तर काही भव्यदिव्य करायची गरज नाही. एक लहानशी पाटी, जीवर त्या ठिकाणचा इतिहास संक्षिप्त पद्धतीने लिहिला गेलाय, अशी तिचेलावली तरी मोठं काम होण्यासारखं आहे. फोर्ट मधल्या काळाघोड्याची अशी माहिती तिथे दिल्याने, त्या ठिकाणाचं वेगळेपण लोकांना माहित होऊ लागलय आणि त्यांची त्या ठिकाणाकडे पाहायचीदृष्टीच बदलून गेलेली मी अनुभवलंय.
पाश्चिमात्य देशात इतिहास कितीही काळाकुट्ट असला तरी तो निगुतीने सांभाळला जातो. तो इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा तिथल्या वैयक्तिक, सरकारी आणि संस्थापातळीवर यशस्वी प्रयत्नही केला जातो. येणाऱ्या पिढयांना आपल्या भूमीचा, निदान आपण राहतो त्या ठिकाणचाइतिहास, तो घडवणाऱ्या आपल्या पूर्वजांची कर्तबगारी माहित असेल तर आणि तरच त्या पिढीची इतिहासाशी नाळ जोडली जाऊ शकते आणि आपल्या देशाविषयी, भूमीविषयी, प्रांताविषयी वा अगदी शहराविषयीही तिच्यात अभिमान निर्माण होऊ शकतो. परदेशातून असे करण्यात तिथल्या अभ्यासकांचा,साहित्यिकांचा, कलावंतांचा आणि अगदी सरकारचाही प्रयत्न सुरु असतो. आपल्याकडे त्याविषयी उदासीनताच दिसते.
तसं आपल्याकडेही इतिहासाचं लेखन होतं, नाही असं नाही. पण ते बरंचसं इंग्रजी भाषेत असतं किंवा मग कुठल्यातरी ग्रंथालयातील कपाटाची शोभा आणि धूळ वाढवीत असतात. सामान्य लोकांना समजेल अशा लोकभाषांमधे इतिहासाचं फारसं लिखाण होत नाही, काही तुरळक सन्माननीय अपवाद सोडले तर, मराठीत तसे फारसे प्रयत्नही होताना दिसत नाहीत. नवीन पिढीला आपल्या इतिहासाची ओळख करून देण्याची जबाबदारी आपण आणि म्हणून नवीन पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाविषयी काहीच कल्पना नसते आणि ज्याची काही कल्पनाच नाही, त्याचा अभिमान निर्माण व्हायचा तरी कसा, याचा विचारही कुणी करताना दिसत नाही.
मुंबई हे सर्वांचं आश्रयस्थान आहे असं सर्वच म्हणतात, परंतु मुंबई हे माझे घर आहे असं म्हणताना सहसा कोणी आढळणार नाही..आपल्या घराची जशी आपण आपुलकीने देखभाल करतो, त्याला जपतो, घराचा इतिहास जपला जातो, अभिमानाने मिरवला जातो.. धर्मशाळेबाबत अशी कोणतीच भावना कोणाच्या मनात नसते..आपल्या मुंबईचं नेमकं हेच झालंय.।.
इथल्या रस्त्यावरून चालताना सहज म्हणून पायाने उडवलेला दगडही त्याच्या उरात इतिहास जपून आहे. तो माहित नसतो म्हणून आपल्याला त्याची किंमत कळतनाही आणि आपल्या शहराबद्दल आपल्या उरात प्रेम निर्माण होत नाही. ते व्हावं असं वाटत असेल तर, आपल्यापैकी प्रत्येकाने इथला इंच न इंच सजग नजरेने पहिला पाहिजे. आणि ज्यांना ह्याबद्दल माहिती आहे, ती त्यांनी लोकांच्या भाषेत उपलब्धही करून दिली पहिले. तर आणि तरच आपल्या शहराबद्दल प्रेम निर्माण होऊ शकेल
आपली मुंबई हे एक खुलं पुस्तक आणि खुल्या आभाळाखालच एक म्युझियम आहे.फक्त तए पुस्तक आणि म्युझियम पाहण्याची दृष्टी खुली हवी.. !! तशी दृष्टी देण्याचं काम लोकभाषेत लिहिणाऱ्याइतिहासकारांचं आहे, लेखकांचंआहे आणि शासनाचंही आहे.