१८७० सालचं ‘वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल’..-( एकूण दोन भागांत)

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा- लेखांक ३४ वा.

वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल..-( एकूण दोन भागांत)

भाग पहिला-

सन १८७० पूर्वीची मुंबईतील हॉटेल्स-

दक्षिण मुंबईचा फोर्ट विभाग अनेक देखण्या इमारतींनी व्यापलेला आहे. ह्या भागात फेरफटका मारताना, अगदी आजही, आपण इंग्लंडातील परिसरात फिरत आहोत असं वाटतं. गोरे, अस्सल विलायती साहेब जाऊन, काळे देशी नकली साहेब सर्वत्र दिसतात, हाच काय तो ठळक फरक. भाषा मात्र साहेबाचीच कानावर पडते. हे देशी साहेब काम करत असलेल्या या फोर्ट विभागातील बहुतेक इमारती मात्र इंग्रजी राजवटीत बांधल्या गेल्या आहेत आणि १००-१५० वा त्याहूनंही अधिक काळ उलटून गेल्यावरही, त्या जशाच्या तशा आहेत. एवढच नव्हे तर, दिवसागणिक वाढणारा त्यांच्यातल्या कामाचा व्यापही समर्थपणे सांभाळत आहेत.

फोर्ट विभागच्या दक्षिणेला असणारा एक भाग म्हणजे “काळा घोडा”. काळा घोड्याच्या पश्चिम दिशेला असलेल्या एल्फिन्स्टन काॅलेजची इमारत, डेव्हिड ससून लायब्ररीची इमारत, तिच्या शेजारची आर्मी अॅन्ड नेव्ही बिल्डींग या वास्तू आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहात नाहीत. गाॅथिक, व्हिक्टोरीयन, रोमानिस्क, इंडो-सारसेनिक शैलीत ब्रिटिश काळात बांधलेल्या या वास्तू केवळ देखण्या नाहीत, तर त्या पैकी प्रत्येकीला आपला स्वत:चा असा इतिहास आहे. इतकंच नव्हे तर, त्यापैकी अनेक इमारतींच्या दगडी भिंतींच्या आत, देशाच्या इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या काही घटनाही घडलेल्या आहेत. त्यातलीच एक वास्तू आहे, एस्प्लनेड हॉटेलची.

या ऐतिहासिक इमारतींच्या रांगेतच, आर्मी-नेव्ही बिल्डींगच्या डाव्या बगलेत, कोपऱ्यावर, परिसरातील इमारतींच्या वास्तूशैलीशी बिलकूल फटकून असणारी, म्हणून वेगळी दिसणारी, कित्येक वर्षांच्या देशी बेपर्वाईमुळे कुरूप दिसणारी, जराजर्जर झालेली, बांबूंच्या आधारावर उभी असलेली आणि तरीही आता आतापर्यंत हव्यासी मानवी वावर असलेली एक इमारत, तिच्या (दुरा)अवस्थेमुळे आपलं लक्ष वेधून घेते. ही इमारत आहे ‘एस्प्लनेड हाॅटेल’ची..! ही आपली आजच्या कथेची नायिका.

‘वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल’..! आताच्या ‘स्टार’ पद्धतीत सांगायचं तर, हे मुंबईतलं (किंवा देशातलंही म्हणायला हरकत नाही) सर्वात पहिलं ‘फाईव्ह स्टार’ हाॅटेल. येत्या ४ फेब्रुवारी, २०२० रोजी एस्प्लनेड हॉटेलची हि इमारत, तिच्या वयाची १५० वर्ष पूर्ण करत आहे हे देशातलं पहिलं फाईव्ह स्टार हाॅटेल. केवळ पाहिलं पंच तारांकित हॉटेल नव्हे, तर हॉटेल म्हणून बांधण्यात आलेलीही ही देशातील पहिली इमारत. इथेच ह्या इमारतीची ओळख थांबत नाही, तर इतरही अनेक बाबतीत देशांत आणि जगातही पहिलेपणाचा मान या हाॅटेलकडेच आहे. त्या निमित्ताने तिची याद जागवून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला चार शब्द लिहावेशे वाटले.

जॉन हडसन वॅटसन ह्या कापडाच्या व्यापारात असलेल्या इंग्लिश व्यापाऱ्याने हाॅटेलसाठी म्हणून ही इमारत बांधली. इसवी सनाच्या १८७० सालात ह्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं. वर म्हटल्याप्रमाणे हॉटेल म्हणून वापराकरिता वॅट्सनने ही इमारत बांधली, म्हणजे मुंबईत त्याकाळी हॉटेल्स नव्हती का, असा प्रश्न माझ्या मनात आला आणि मी जेंव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत गेलो, तेंव्हा माझ्या हाती मनोरंजक माहिती लागत गेली.

इसवी सनाच्या १८७० सालात वॅटसनचं एस्प्लनेड हॉटेल उदयाला येण्यापूर्वी, मुंबईत एकूण ३ क्लब आणि २७ हॉटेल्स होती. मुंबईतली त्या काळातली वस्ती मुंबईच्या किल्ल्याच्या तटबंदीच्या आत आणि तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला थेट माझगाव-भायखळा परिसरात असल्याने, ह्या हाॅटेलांची गर्दी फोर्ट आणि माझगाव भागातच होती..!

‘फोर्ट’च्या तटबंदीच्या आत असलेली हाॅट्लं-

१८३८ मध्ये मुंबईच्या फोर्ट विभागात छोटेखानी ‘व्हिक्टोरिया हॉटेल’ होतं. ह्या हॉटेलची नेमकी जागा सांगता येत नाही, परंतु ह्याच नावाचं आणि त्याकाळच्या पद्धतीचं बांधकाम असलेलं एक हॉटेल, जीपीओनजीक, आताच्या शाहिद भागात सिंग मार्गावर आहे. ते बहुतेक हेच असावं. फोर्टच्या तटबंदीच्या आत, पूर्वी जिथे ‘काळा घोडा’ नावाने आजही मशहूर असलेला सातव्या एड्वर्डचा पुतळा होता, त्याच्या समोर ‘टेम्पल बार'(१८६९) हॉटेल होतं. ही जागा म्हणजे सध्याच्या ‘खैबर’ हाॅटेलची वा त्याच्या उजव्या बाजुचा इमारत. ऱ्हिदम हाऊसच्या उजव्या बाजूने पूर्वेकडे जाणारा रास्ता, जो आज व्ही. बी. गांधी मार्ग म्हणून ओळखला जातो(पूर्वीचा फोर्ब्स स्ट्रीट), त्या रस्त्यावर ‘केम्ब्रिज हॉटेल'(१८६४) होतं. त्या रस्त्यावरून आत गेल्यावर, नागिनदास मास्टर मार्गावर आजही ब्रिटिश हॉटेल लेन नावाची एक चिंचोळी गल्ली आहे, तिथे ‘ब्रिटिश हॉटेल’ होतं. ते १८६२ सलात बंद झाल्यावर, त्याच गल्लीत नंतर ‘इंग्लिश हॉटेल’ आलं. टॅमरिंड लेनमध्ये (हि गल्ली ह्याच नावाने अजूनही ओळखली जाते) ‘रॉयल हॉटेल’ (१८५९) होतं. चर्चगेट स्ट्रीटवर, म्हणजे आताच्या वीर नरिमन मार्गावर ‘बोंबे एक्स्चेंज हॉटेल’ होतं, तेंव्हाच्या एल्फिन्स्टन सर्कलमध्ये, म्हणजे आजच्या हॉर्निमन सर्कल परिसरात ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ हॉटेल होतं. ह्या हॉटेलांव्यतिरिक्त फोर्ट विभागातच वेव्हर्ली हॉटेल (ह्याच पाहिलं नांव ‘जेरुसलेम हॉटेल होतं), इंपिरिअल हॉटेल, लंडन हॉटेल, प्रशियन हॉटेल(१८६४), ऑस्ट्रेलेशिअन हॉटेल, ऑकलंड हॉटेल, युरोप हॉटेल अशी अनेक हॉटेलं होती.

माझगाव परिसरातली हाॅटेलं-

माझगाव परिसरात ‘होप हॉल फॅमिली हॉटेल'(१८३७), हॅमिल्टन हॉटेल (१८६६ मधे हे हाॅटेल बंद झालं. हे हॉटेल म्हणजे आजची नागपाड्याची पोलीस हॉस्पिटलची इमारत असावी ), नेसबीट लेनमध्ये ‘क्लेअरडन फॅमिली हॉटेल’, ‘माझगाव हॉटेल’, माझगाव युरोप हॉटेल, ओरिएंटल हॉटेल अशी हॉटेलं होती.

भायखळा भागातली हाॅटेलं-

भायखळ्याला ‘बॉईस हॉटेल’ होतं, अडेल्फी हॉटेल (१८५९) होतं. ‘बाँबे हॉटेल’ होतं, ज्याचं नामकरण पुढे ‘भायखळा हॉटेल’ झालं. नागपाडा जंक्शनवरच हे हाॅटेल होत. भायखळा ब्रिजच्या बेचक्यात दबून गेल्यासारखा आजचा ‘खडा पारशी’चा जो पुतळा उभा आहे, तो अगोदर या नागपाडा जंक्शनवरच होता. खडा पारशीचे जुने फोटो पाहिल्यास, त्याच्या मागे ही भव्य इमारत उभी असेलेली दिसते. आता तिथे खडा पारशीही नाही आणि हे हाॅटेलही नाही. हाॅटेलच्या जागेवर आता गगनचुंबी इमारत उभी आहे.

वरच्या फोर्ट, माझहांव आणि भायखाळा परिसरातल्या हाॅटेल्सव्यतिर्क्त, मुंबईत दोन सार्वजनिक आणि एक खाजगी, असे तीन क्लब्स होते. त्यातला ‘बाॅम्बै क्लब’ नांवाचा क्लब रॅम्पार्ट रो, म्हणजे आताच्या के. दुभाष मार्गावर ‘बोंबे क्लब’होता. दुसरा १८३३ साली स्थापन झालेला क्लब ‘भायखळा क्लब’ त्याच्या नांवाप्रमाणे भायखळ्याला होता. तरी तिसरा क्लब एका खाजगी कंपनीचा असून तो माझहांवला ‘सांताब्राझ’ नांवाच्या बंगल्यात होता..!

सन १८७० पूर्वी मुंबईत इतकी हाॅटेल्स असुनही जाॅन वॅटसनला आणखी एक हाॅटेल बांधावसं का वाटलं, या प्रश्नाचं उत्तर मुंबईच्या त्या काळच्या ठेवणीत शोधता येतं.

पुढील कथा दुसऱ्या भागात…

-नितीन साळुंखे

9321811091

30.01.2020

फोटो – इंटरनेटच्या सौजन्याने

लेखातील माहितीचे संदर्भ दुसऱ्या भागाच्या शेवटी.