वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल..-भाग दुसरा

मुंबईतील ऐतिहासीक पाऊलखुणांचा मागोवा – लेखांक ३५ वा.

#वॅटसन्स_एस्प्लनेड_हाॅटेल..-

(एकूण दोन भागात असलेला हा लेख, अधिकच्या माहितीस्तव तीन भागात विभागावा लागला आहे. त्यातील हा दुसरा भाग )

भाग दुसरा –

#कापडाच्या_व्यापारात_असलेल्या_जॉन_हडसन_वॅटसनला_हॉटेल_बांधावं_असं_का_वाटलं_?

पूर्वी फोर्ट विभाग तिनही दिशांना मजबूत तटबंदीने बांधलेला होता. या तटबंदीतून आत-बाहेर येण्या-जाण्यासाठी तिनही दिशांना मुख्य दरवाजे होते. तटबंदीच्या आत ब्रिटिशांचं मुख्य ठाणं असलेला फोर्ट, गोदी, विविध सरकारी कार्यलयं, देशाी व ब्रिटीश व्यापाऱ्यांच्या पेढ्या-दुकानं आणि देवळं-चर्चही होती.

किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर पश्चिमेच्या समुद्राला भिडलेलं, दक्षिणोत्तर पसरलेलं लांबच्या लांब मोकळं मैदान, एस्प्लनेड होतं. समोर लांबवर पसरलेल्या मोकळ्या समुद्रातून येणाऱ्या स्थानिक व परकी शत्रुच्या जहाज-गलबतांवर सहज नजर ठेवता यावी आणि वेळ पडल्यास त्यांच्यावर हल्ला करता यावा, यासाठी ही योजना असे. या मैदानात सैनिकांच्या पलटनीही कायम ‘अटेन्शन’मधे असत. म्हणून त्या काळच्या मराठी भाषेत या मैदानाला ‘कांपाचे(Camp) मैदान’ असंही म्हणत. आजच्या भाषेत सांगायचं तर, कुलाबा काॅजवे जिथून सुरू होतो, तिथपासून ते क्राॅफर्ड मार्केटपर्यंत हे मैदान(एस्प्लनेड) पसरलेलं होतं. आज आपल्याला माहित असलेली कुपरेज, ओव्हल, क्राॅस आणि आझाद मैदानं, हे या एस्पलनेडचेच आजचे तुकडे आहेत. इसवी सनाच्या १८६२ पर्यंत, मुख्य मुंबई ही इशी किल्त्साच्या तटबंदीच्या आत कोंडलेली होती..

आता थोडसं मागच्या काळात येऊ. १८५० पर्यंत मुंबईच्या सात बेटांमधल्या खाड्या भरून काढण्याचं काम जवळपास पूर्डीण झालं होतं. सायन नजिक चुनाभट्टी आणि माहिमच्या खाडीवरचा माहिम काॅजवे बांधून मुंबई उपनगरांशी जोडली गेली होती. १८६० च्मा दशकाच्या पहिल्या दोन-चार वर्षांतच मुंबईत रेल्वे आणि कापड गिरण्यांची पायाभरणी झाली होती. याच दशकात अमेरिकन सिव्हिल वाॅरमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतने मुंबईचा कापसाचा व्यापार बहराला आला होता. व्यापार रोजगाराच्या संधींच्या शोधात मुंबईत ठिकठिकाणाहून लोकांचं स्थलांतर होण्यास सुरुवात झाली होती. बंदरातील बोटींची आवक-जावक वाढली होती. मुंबईचा गव्हर्नर परळच्या गव्हर्नमेंट हाऊसमधे राहायला गेला असला तरी, मुंबईचं मुख्य व्यापारी आणि प्रशासकीय केन्द्र अजुनही मुंबईचा किल्ला असल्याने, किल्ल्याचा तटबंदीच्या आत व्यापाऱ्यांची, प्रशासकीय अधिकाऱ्यांची, बोटींवरच्या विविध दर्जाच्या अधिकाऱ्यांची आणि खलाशांची, सैनिकांची गर्दी वाढू लागली होती.

मुंबईत आलेल्या आणि येणाऱ्या लोकांची राहाण्याची सोय करणे, हाच मोठा प्रश्न होता. जे लोक एकटे-दुकटे येत, ते तटबंदी बाहेरच्या एस्प्लनेडमधे, म्हणजे मैदानात तंबू टाकून राहात. त्या काळी असे तंबू मुंबईत भाड्याने मिळण्याची सोय होती. काही लोक किल्ल्सातील आपल्या ओळखीच्यांच्या घरात आसरा घेत. परंतु हा मार्ग एकट्या-दुकट्याला, तो ही काही काळापुरताच शक्य होता. तंबूत किंवा कुणाच्या घरात फार काळ निवास करणं शक्य नसे. कुटुंबासाहीत येणाऱ्या लोकांची तर फारच अडचण होत असे. त्यात स्त्रियांचे हाल तर विचारूच नका, असे होत असत..!!

नेमकी या अटितटीच्वा परिस्स्तथितीत असलेली व्यापाराची संधी मुंबईतल्या उद्यमी, हुशार आणि प्रामाणिक म्हणून ख्याती असलेल्या पारशांनी ओळखली आणि मुंबईत हाॅटेल व्यवसायाची सुरुवात झाली. वरच्या काही परिच्छेदांतून उल्लेख केलेली हाॅटेलं फोर्ट, माझगांव आणि भायखळा भागात स्थापन झाली आहेत, ती नेमक्या १८४० ते १८६० या वीस वर्षांच्या काळातच आणि त्यापैकी बहुसंख्य हाॅटेलांची नावं विलायती असली तरी, त्यांची स्थापना पारशांनीच केलेली आहे. यात पालनजी पेस्तनजी पोचखानावाला हे नांव आघाडीवर होत. पोचखानावाला या नांवातला ‘पोचखाना’ हा शब्द मराठीतल्या ‘पोसखाना’ या शब्दाचा अपभ्रंश आहे आणि पोसखाना म्हणजे जिथे माफक पैसे आकारून खाऊ-पिऊ घातलं जातं आणि राहायचीही सोय होते, अशी जागा. ‘मुंबईचे वर्णन’ या १८६२ सालात गोविंद मडगांवकरांनी लिहिलेल्या पुस्तकात हाॅटेलांसाठी ‘पोसखाना’ असा शब्द वापरलाय, तो याच अर्थाने..!! पालनजी पेस्तनजी यांचा मुख्य व्यवसाय हॉटेलांचा असल्याने, त्यांना हे आडनांव प्राप्त झालं होत.

साधारण १८६१-६२ पर्यंत मुंबईच्या किल्ल्याच्या तटबंदीच्या आतली वस्ती सहन होण्याच्या मर्यादेबाहेर गेली. किल्ल्यातल्या चिंचोळ्या गल्ल्या, माणसांची अतोनात गर्दी, मालवाहतूक करणाऱ्या बैलगाड्या, घोड्यागाड्या, स्वच्छतेचा अभाव आणि त्यामुळे होणारी रोगराई, कोलाहल गोंगाट यामुळे किल्ल्यातली घुसमट वाढली होती. एव्हाना मुंबईवरील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन, देश थेट इंग्लंडच्या राणीच्या अधिपत्याखाली आला होता. या काळात ब्रिटिशांनी त्यांच्या बहुतेक सर्व शत्रूंवर विजय मिळवला होता किंवा त्यांच्याशी करार विविध करून त्यांना दूर ठेवण्यात ब्रिटिशाना यश आलं होत. ब्रिटिशांना प्रबळ असा कुणी शत्रूच उरला नव्हता आणि म्हणून आता किल्ल्याच्या सभोवतालचा खंदक, तटबंदी आणि दरवाजे याची काहीच आवश्यकता उरली नव्हती. किल्ल्यातील वाढत्या वस्तीला आता पश्चिमेच्या तटबंदीच्या आणि उत्तरेच्या दिशेने वाट करून यायची आवश्यकता वाटू लागली होती.

अशातच दिनांक ‪२४ एप्रिल‬ १८६२ रोजी मुंबईचा गव्हर्नर म्हणून सर बार्टल फ्रियर यांनी सूत्र हाती घेतली आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला तो ही तटबंदी तोडण्याचा. सर बार्टल फ्रिअर यांनी तटबंदी पाडायचा निर्णय लगेच अंमलात आणला, आणि किल्ल्यात कोंडलेली मुंबई तटबंदी बाहेरच्या अफाट मोकळ्या मैदानात आली. तटबंदी तोडल्यामुळे मोकळ्या झालेल्या मैदानाचे प्लॉट पाडून १८७० मध्ये सरकाने त्यांचा लिलाव पुकारला आणि त्यातलाच दोन एकराचा एक प्लॉट, ‘एस्पलनेड हाॅटेल’ची जन्मदाता जाॅन हडसन वॅटसन याने, ११० रुपये प्रति चौरस यार्ड ह्या भावाने विकत घेतला.

जाॅन हडसन वॅटसनचा जन्म सन १८१८ मधे इंग्लंडमधल्या कंब्रिया (Cumbria) काऊन्टीमधल्या कॅसल कराॅक या लहानशा गांवात, आई जेन हडसन व वडील जाॅन वॅटसन यांच्या पोटी झाला. आई-वजील शेतकरी होते. जाॅन त्यांचं पहिलं अपत्य. जॉनला दोन बहिणी आणि दोन भाऊ होते. जॉनच सर्व शिक्षण त्या खेड्यातच झालं आणि शिक्षणानंतर तो आपल्या आई-वडिलांसोबत शेती करू लागला ओटा. १८४० सालात , त्याच्या वयाच्या २२ व्य वर्षी त्याच लग्न हॅना प्रोक्तर बरोबर झालं आणि कापडाचा (Drapery) व्यवसाय करावा म्हणून जॉनने पत्नी हॅना आणि धाकटा भाऊ विल्यमसोबत लंडनला निघून आला.

१८४० ते १८५३ मध्ये जॉनने लंडनमधे कापडाच्या व्यवसायात चांगलाच लैकिक आणि संपत्ती कमावली आणि अधिक पैसे कमावण्यासाठी त्याने १८५३ मधेच मुंबईला प्रयाण केलं. मुंबईत त्यावेळी देश-विदेशातून असे व्यापारी नांव आणि पैसे कमावण्यासाठी येत होते. मुंबईतला कापसाचा आणि पर्यायाने कापडाचा व्यापार तेजीत येईल अशी चिन्ह होती आणि त्याचा लाभ जॉनने घायचा ठरवलं आणि तो पत्नी आणि भावासोबत त्याच वर्षी मुंबईला निघून आला.

१८५३ ते १८६०-६१ पर्यंत जॉनने मुंबईत आपलं चांगलं बस्तान बसवलं. फोर्ट विभागातल्या मेडोज स्ट्रीट (आताचा नागिनदास मास्टर रॉड), चर्चगेट स्ट्रीट (आताचा वीर नरिमन रोड) आणि हमाम स्ट्रीटवर (आताचा अंबालाल दोशी मार्ग ) अशा तीन ठिकाणी त्याच्या तीन पेढ्या किंवा दुकानं/कार्यालय होती. ह्या परिसरातली बहुतेक दुकान/कार्यालयं बिरीतीश किंवा इतर देशातून आलेलय गोर्यांचीच असल्याने, त्या काळात हा परिसर ‘अंग्रेज बझार’ म्हणून ओळखला जायचा. जॉनने आपल्या हुशारीने आणि कल्पकतेने व्यवसायात चांगलंच बस्तान बसवलं होतं आणि तो आता एका मोठ्या, प्रशस्त जागेच्या शोधात होता. आणि अशातच १८६४ मध्ये किल्ल्याची तटबंदी पाडली गेली आणि एस्प्लनेडवर मोकळ्या झालेल्या जागेचे प्लॉट पडून सरकारने त्यांचा लिलाव पुकारला. त्यातलेच एक एक एकराचे दोन सलग प्लॉट, प्लॉट नंबर १० व ११, रुपये ११० प्रति चौरस यार्ड ह्या भावाने जॉनने लिलावात विकत घेतले. प्लॉट चार रस्त्यांच्या चौकातला असल्याने, त्यासाठी स्पर्धाही होती, पण जॉन प्लॉट घेण्यात यशस्वी झाला.

खरं तर जॉनने दोन एकराची आपल्या ड्रेपरीच्या व्यवसायासाठी म्हणून घेतला होता. पण वेगाने वाढणारी मुंबई त्याला दिसत होती. शेजारच्या जागेत आर्मी-नेव्ही इमारतीची आखणी झाली होती, रस्त्याच्या पलीकडे मुंबई विद्यापीठ आणि त्याच्या शेजारी हाय कोर्टाची इमारत येऊ घातली होती. मुंबईच्या एस्प्लनेडवर उभ्या राहू पाहणाऱ्या टोलेजंग इमारतीतून लोकांची ये-जा वाढणार होती. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आणि राहण्याचा व्यवसायात असलेली संधी हुशार जॉनने बरोबर हेरली.

पहिल्या भागात आपण पाहिलं, की त्याकाळच्या मुंबईत असलेली हॉटेल्स एकत्र भायखळा-माझगाव परिसरात होती किंवा किल्ल्याच्या तटबंदीच्या आड होती. भायखळा माझगाव भागातली हॉटेलं प्रशस्त असली तरी, मुंबईच व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र असलेल्या फोर्ट विभागापासून दूरच्या अंतरावर होती. तिथून किल्ल्यात ये-जा करणं गैरसोयीचे होत, त्यामुळे अगदी नाईलाज झाला तर किंवा मग जे परदेशी लोक कुटुंबासहित मुंबईत येत, तेच तिकडच्या हॉटेलांतून राहणं पसंत करीत. व्यापारी वर्ग, मुंबईत ड्युटीवर हजार होण्यासाठी आलेले ब्रिटिश अधिकारी, नौसैनिक, सैनिक इत्यादी मात्र फोर्टमधल्या दाटीवाटीने वसलेल्या हॉटेलांचा आधार घेत. ह्या हॉटेलांची उंची, सुरक्षेच्या कारणास्तव किल्ल्याच्या तटबंदीच्या उंचीपेक्षा जास्त असू शकत नव्हती, त्यामुळे त्यांना दोन किंवा तीन मजल्यांची मर्यादा होती. आडवं विस्तारू शकत नाही आणि उंचीही वाढू शकत नाही, अशी १८६२ पूवी तटबंदीच्या हॉटेलांची परिस्थिती होती. चिंचोळ्या बोळांतल्या, एकमेकांना खेटून असलेल्या दोन-तीन मजल्याच्या इमारती, माणसं-जनावराचा कोलाहल, गर्दी, अस्वच्छता इत्यादींच्या वातावरणात असलेल्या हॉटेलांचा नाईलाजाने लोक आधार घेत.

माझगाव-भायखळा आणि फोर्ट विभागातल्या हॉटेलांची आणखी एक अडचण होती. ह्या दोन्ही ठिकाणची हॉटेलं एकतर राहत्या घरात/बंगल्यात/इमारतीत किंवा कार्यालयात किरकोळ बदल करून तयार केलेली होती. केवळ हॉटेल म्हणून वापराकरिता यातील कोणतंही हॉटेल बनवलेलं नसल्याने, ती काहीशी गैरसोयीची होती. मग अशा हॉटेलांतून युरोपीय पद्धतीचं फर्निचर, युरोपीय नांव, आतल्या खोल्यांची युरोपीय लोकांना आवडेल अशी मांडणी केली जायची. तरीही इथे राहणाऱ्या लोकांना अडचण हि होतच असे. कापडाच्या व्यवसायात असलेल्या जॉन हडसन वॅटसनने ह्या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून, हॉटेल व्यवसायात असलेली संधी बरोबर हेरली आणि लिलावात खरेदी केलेल्या जागेवर आपलं टोलेजंग दुकान न बांधता, तेवढच टोलेजंग हॉटेल बांधण्याचं ठरवलं आणि तो कामाला लागला…!

(पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात हॉटेल कसं बांधलं, त्यात काय काय सामग्री वापरली, हॉटेलमध्ये कोणत्या विशेष सुविधा दिल्या होत्या, कोणत्या गोष्टीत हॉटेल, मुंबई, देश आणि जगात पाहिलेपणाचा मन पटकावणारं ठरलं आणि त्याची आताची स्थिती, याबद्दल वाचायला मिळेल)

-नितीन साळुंखे

9321811091

01.02.2020

टीप- संदर्भ यादी शेवटच्या तिसऱ्या भागात वाचायला मिळेल.

फोटो सौजन्य इंटरनेट