वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल..-(भाग तिसरा व शेवटचा )

मुंबईतील ऐतिहासीक पाऊलखुणांचा मागोवा – लेखांक ३६ वा.

(भाग तिसरा व शेवटचा )

आजच वयाच्या १५० व्या वर्षात पदार्पण करणारं, मुंबईच वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेल..-

जॉनला केवळ हॉटेल बांधायचं नव्हतं, तर ते वेगळ्या पद्धतीनेही बांधायचं होत. सन १८६५ मध्ये जॉनने गासकाईनने (Gascoign) नावाच्या आर्किटेक्टला त्याच्या मनातल्या कल्पनेवरून त्या प्रकारचं हॉटेलचं डिझाईन करायला सांगितलं. गासकाईनने जॉनच्या कल्पनेतल्या पोलादी फ्रेमच्या सांगाड्यावर आधारलेलं ‘लोखंडी सांगाड्या’सारखं डिझाईन करून जॉनला दाखवलं. त्यावर चर्चा होऊन काम पुढे सरकण्याआधीच अचानक गासकाईन मरण पावला. गासकॉईनच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या कच्च्या डिझाईनवरून, मेसर्स ओर्डीश अॅन्ड ला फेबर (M/s Ordish & Le Febre) कंपनीचे सिव्हिल इंजिनिअर रोलँड मॅसन ओर्डीश (Rowland Mason Ordish) याने हॉटेलचं डिझाईन पूर्ण केलं. लंडनमध्ये १८५१ मध्ये भरलेल्या ‘द ग्रेट एक्झिबिशन’ मध्ये केवळ पोलाद आणि काचेचा वापर करुन तयार केलेल्या भव्य ‘क्रिस्टल पॅलेस’च्या डिझाईनचा आणि निर्मितीत सहभागी असल्याने, ओर्डीशला ताशा प्रकारच्या बांधकामाचा अनुभव होता ( १८५१ सालत लंडनला भरलेल्या ‘द ग्रेट एक्झिबिशन’ला जॉनने भेट दिली असण्याची शक्यता आहे आणि तिथेच त्याने पोलाद आणि काचेचा वापर करून बनवलेला क्रिस्टल पॅलेस पहिला असावा आणि त्यावरूनच जॉन वॅटसनला तशाच प्रकारची इमारत बांधण्याची कल्पना सुचली असावी. १८५१ मधे जाॅन लंडनलाच होता). ओर्डीशने हॉटेलचं डिझाईन बनवताना, हॉटेलचं छत, म्हणजे गच्ची, लंडनच्या सेंट पांक्रास (St. Pancras ) स्टेशनच्या छताच्या डिझाईनच्या धर्तीवर आखलं होत. बऱ्याच चर्चानंतर जॉन हडसन वॅट्सनने हॉटेलचा आराखडा मंजूर केला. लोखंडी फ्रेम्सवर आधारलेला पाच मजली आराखडा मंजुरीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला. पहिलं असं काही होऊ शकेल, हेच त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नव्हतं. जाॅनने चिकाटीने ते त्यांच्या गळी उतरवलं आणि अधिकाऱ्यांनी एकदाची परवानगी दिली, पण बांधकाम पूर्ण दोन वर्षांत पूर्ण करण्याची अटही टाकली..

दोन वर्षांची अट पाहून बहुदा जाॅन चरकला असावा, कारण त्याच्या मनात हाॅटेलात इंग्लंड दाखवायचं होतं. हाॅटेल बांधण्यासाठी लागणारं सारं साहित्य त्याने आपल्या मायदेशातून मागवण्याचं ठरवलं होतं आणि त्याकाळचं भारत आणि इंग्लंडमधलं अंतर, जहाजाने बांधकामासाठी वेगवेगळं साहित्य येण्यासाठी लागणारा वेळ, त्या साहित्याची जोडणी करण्यासाठी लागणारा काळ, याचं गणित दोन वर्षांत कसं बसवायचं, याची चिंता त्याला लागली असणारच. पण दोन वर्ष तर दोन वर्ष, मंजुरी मिळालीय, तर सुरुवात करु म्हणून जाॅनने कामाला सुरुवात केली.

इसवी सन १८६५ सरता सरता, जहाजाने बांधकामाचं साहित्य यायला सुरुवात झाली. आणि पुढची दोन वर्ष, म्हणजे १८६७ पर्यंत फक्त साहित्यच येत होतं. बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. जाॅनला सरकारने दिलेली मदत संपून गेली. जाॅनने सरकार दरबारी आपलं सर्व कौशल्य पणाला मुदत वाढवून घेतली आणि १८६८ येता येता सर्व साहित्य जुळणीला सुरुवात झाली..!

एस्प्लनेड हाॅटेलच्या बांधकामासाठी लागणारं एकही प्रकारचं साहित्य भारतातलं नव्हतं. ओतीव लोखंडाचे खांब, ज्यावर हाॅटेलचा सारा डोलारा पेलला आहे, ते इंग्लंडमधल्या डर्बी येथल्या फिनिक्स फांऊंड्रीतबन आणले होते. आतील बांधकामासाठी लागणारं सिमेंट आणि विटा थेम्सच्या काठवरच्या वाळुपासून बनवून आणल्या होत्या, लोखंडी पिलर्सना आधार देणारे पायचे दगड पेरिन्थहून आणले होते, तर आतल्या टाईल्स स्टॅफर्डशायरहून आणल्या होत्या. इथले बहुतेक मजूरही जाॅनने घेतले नसावेत, कारण लोखंडी पिलर्स आणि बिम्स एकमेकांना जोडण्याच्या कामाचं ज्ञान, त्यावेळी इथल्या लोकांना होतं की नाही, याबद्दल काही सांगता येत नाही..

हीॅटेलच्या प्लींटवक आलेल्या साहित्याची जुळणी सुरू झाली..हाॅटेलचा लोखंडी सांगाडा हळुहळू वर येऊ लागला आणि टिकाकार जागे होऊ लागले. एस्प्लनेडवर काहीतरी कुरुप असं जन्म घेतंय, पक्ष्याचा मोठा पिंजरा बांधायला काढलाय, मोकळ्या क्षितिजाच्या पार्श्वभुमीवर डोळ्यात खुपणारं असं काहीतरी, जे लोकांना अजिबात आकर्षित करु शकणार नाही, अशी टिका होऊ लागली. वेगळं काही तरी करु इच्छिणाऱ्यांवर अशी टिका सर्वच काळात होत असते. पण जाॅनने त्या टिकेला काहीच उत्तर दिलं नाही. त्याला आपल्या कामावर विश्वास होता.

पाहाता पाहाता हाॅटेल आकार घेऊ लागलं. जसं जसं हाॅटेलला रंग-रुप येऊ लागलं, तसं तसं लोकांच्या नजरेत आश्चर्य दिसून येऊ लागलं. दोन वर्ष सरली आणि १८७० च्या शेवटी शेवटी हाॅटेल संपूर्ण तयार झालं.

काय नव्हतं या हाॅटेलात..! त्या काळच्या युरोपीय सुखसुविधांच्या व्याख्येत बसण्यासाठी उपलब्ध असणारी प्रत्येक गोष्ट या हाॅटेलात हजर होती. तळ मजला व वरती चार, अश्या एकूण पाच मजल्यांचं भव्य बांधकाम. त्यातल्या तळमजल्याची उंजी वीस फूट होती. तर शेवटच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यांची उंची प्रत्येकी १४ फुटांची होती. हाॅटेलची लांबी १९० फूट, तर रुंदी ८० फुटाची होती. हे डायमेन्शन आजही तसंच असावं..!

तळमजल्यावर प्रशस्त दुरानं/शोरुम्स, राजेशाही डायनिंग हाॅल आणि बिलियर्ड रुम होती. पहिल्या मजल्यावरही आणखी भव्य डायनिंग हाॅल, ड्राॅईंग हाॅल आणि बिलियर्ड रुम होती. हाॅटेलाच्या वरच्या तीन मजल्यांवर सर्व मिळून एकूण १३० सेल्फ कन्टेन्ड, प्रशस्त खोल्या होत्या. त्यातल्या शेवटच्या चौथ्या मजल्यावरच्या खोल्या केवळ ‘बॅचसर्स’ आणि एकट्या-दुकट्या फिरस्त्यांसाठी रारखीव होत्या. लोखंडी खांबांवर आधारलेलं हाॅटेल असल्याने, लांब-रुंद खिडक्या ठेवणं शक्य झालं होतं. त्यामुळे, त्या काळात हाॅटेलच्या आजुबाजूला काहीच बांधकामं झालेली नसल्याने, हाॅटेलच्या खोल्यांमधे भरपूर मोकळी हवा, उजेड राखता येणं आपोआप शक्य झालं होतं. एवढं असुनही हाॅटेलच्या प्रत्येक खोलीत कापडाच्या लांब, आडव्या पंख्याची व्यवस्था केली होती. त्याकाळी वीज नसल्याने, ते पंखे छताला लटकवलेले असून, त्याची दोरी हलवण्यासाठी प्रत्येक खोलीच्या बाहेर ‘पंखवाले’ बसवलेले असत. असे पंखे आपण जुन्या काळातील ब्लॅक अंन्ड व्बाईट चित्रपटात पाहिले असतील. खोलीत युरोपिय पद्धतीचं फर्निचर व स्वच्छता गृहांमधे त्याच पद्धतीची फिटींग्स होती. एंकंदरीत वॅटसनचं हे एस्प्लनेड हाॅटेल म्हणजे, त्या काळातील युरोपिय ऐशारामाची परमावधी होती. फक्त ओर्डिशने डिझाईन केलेलं हाॅटेलचं देखणं छत प्रत्यक्षात येऊ शकलं नाही. कदाचित पैशांची कमतरता भासली असावा..

१८७० साल संपता संपता तयार झालेल्या ह्या हाॅटेलचं उद्घाटन, १८७१ सालच्या आजच्याच दिवशी, म्हणजे ४ फेब्रुवारीला झालं आणि त्यावेळच्या ‘बाॅम्बे गॅझेट’ या वर्कमानपत्रात बातमी झळकली, “without doubt, the finest hotel in the city..built at enormous cost..on perhaps the best site in Bombay”.

त्या काळतल्या ह्या एस्प्लनेड हाॅटेलने अनेक बाबतीत पहिलेपणाचा मान पटकावला होता. केवळ हाॅटेल म्हणून बांधण्यात आलेली ही देशातील पहिली इमारत. वाफेच्या सहाय्याने वर-खाली चालणारी लिफ्ट असलेलीही ही हाॅटेलची पहिलीच इमारत. हाॅटेलांत राहाण्यासाठा येऊ इच्छिणाऱ्या पाहुण्यांना बंदरावरुन किंवा स्टेशनातून नेण्या आणण्याकरीता, म्हणजे आजच्या भाषेत पिकअप आणि ड्राॅपची व्यवस्था असलेलं हे पहिलंच हाॅटेल. केवळ लोखंडी खांब आणि तुळयांवर आधारलेलं बांधकाम असणारा ही बहुमजली(त्या काळातल्या व्याख्येनुसार) इमारत, केवळ मानवी अधिवासाकरीता बांधलेली जगातलीही पहिली इमारत..! या पूर्वी अशा प्रकारचं बांधकाम केवळ प्रदर्शनात ठेवण्यासाठी किंवा औद्योगिक वापरासाठी केलं गेलं होतं. न्युसाॅर्कच्या ‘सोहो’ (South of Houston Street) भागात अशा इमारती अजुनही निगुतीने राखण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती मीना प्रभूंच्या ‘न्यू याॅर्क न्यू याॅर्क’ पुस्तकात मिळते.

हाॅटेलच्या बांधकामासाठी वापरलेलं साहित्यच नव्हे, तर आत काम करण्यासाठी वेटर आणि वेट्रेस, शेफ इत्याही कर्मचारीही युरोपातले होते. त्यावेळी गंमतीने म्हटलं जायचं, की ‘जाॅनला शक्य असतं तर त्याने युरोपातलं हवामानही ह्या हाॅटेलात आणलं असतं..’., इतकं हे हाॅटेल युरोपिय होतं..!

पण दुर्दैवाने, इतक्या मॅग्निफीशंट हाॅटेलचं स्वप्न पाहाणारा आणि ते साकारणाराही आपला जाॅन हडसन वॅटसन, हाॅटेलचा मालक, हाॅटेलचं उद्घाटन पाहू शकला नाही. १८७० सालातच त्याला तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे , सपत्निक लंडनला परत जावं लागलं होतं आणि त्या नंतरच्या दोनच वर्षात, १८७१ सालच्या मे महिन्यात तो त्याच्या कॅसल कॅराॅक गांवी मरण पावला. त्याची पत्नी हॅना पुढे चार वर्षांनी तिथेच मरण पावली. इथे भारतात त्याच्या हाॅटेलचं स्वप्न त्याचा भाऊ विल्यम वॅटसनने पूर्ण केलं. विल्यमनंतर एस्प्लनेड हाॅटेलचा व्यवसाय जाॅनचे मुलगे जेम्स प्राॅक्टर वॅटसन आणि जाॅन वॅटसन ज्युनियर पाहात होते..

पुढची पन्नास वर्ष, १९२० पर्यंत,  हे हाॅटेल, हाॅटेल म्हणून कार्यरत राहिलं. त्या काळातल्या अनेक नामवंत पाहुण्यांनी ह्या हाॅटेलचा पाहुणचार घेतला होता. १८९५-९६ च्य सुमारास जगप्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन काही दिवस ह्या हॉटेलात मुक्कामाला होता. ह्या हॉटेलच्या प्रशस्त बाल्कनीत बसून त्याने तिथे येणाऱ्या कावळ्याचं निरीक्षण करून, भारतीय कावळ्यांवर एक सुरेख लेख लिहिला आहे, जो त्याच्या ‘फॉलोविंग द इक्वेटर’ ह्या १८९८ सलत लिहिलेल्या पुस्तकात आहे. हे पुस्तक इंटरनेटवर पीडीएफमध्ये वाचण्यासाठी उपलब्ध आहे. पुढे जगाला गवसणी घालणाऱ्या भारतीय सिने उद्योगाची सुरूवात ह्याच हॉटेलमध्ये ७ जुलै १८९६ मध्ये झाली. कारण चित्रपटाच्या तंत्राच्या शोध लावणाऱ्या साक्षात ल्युमिए बंधूनी, पॅरिसमध्ये त्यांनी चित्रपट तंत्राचा शोध लावल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात,  ह्याच हॉटेलात ७ जुलै १८९६ रोजी त्यांच्या एकूण सहा चित्रपटाचे खेळ दाखवले होते. ते चित्रपट होते, ‘Entry of Cinematographe’, ‘Arrival of a Train’, ‘The Sea Bath’, A Demolition’, Leaving the Factory’ आणि Soldiers on Wheels’.अगदी प्राथमिक अवस्थेतील प्रयोग होता तो, तरीही त्याकाळातील हे आश्चर्यच होत. हे खेळ पाहण्यासाठी प्रत्येकी १ रुपया तिकीटही लावण्यात आलं होत. 

असं हे अनेक बाबतीत ऐतिहासिक असणार आणि काही बाबतीत इतिहास घडवणारं हॉटेल, आता हॉटेल नसलं तरी, त्याच्या लोखंडी खांब आणि तुळयांच्या इमारतीच्या रूपात आजही ‘काळा घोडा’ चौकात  उभं आहे. तळ मजल्यावरचे त्याचे देखणे लोखंडी खांब अजूनही लक्ष वेधून घेतात. आज ४ फेब्रुवारी २०२० रोजी ह्या हॉटेलची इमारत आपल्या १५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने ह्या हॉटेलवर ही तीन भागाची लेखमाला लिहून हॉटेल आणि ह्या हॉटेलचं स्वप्न पाहणाऱ्या जॉन हडसन वॅटसनप्रति कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली..!! 

प्रत्येक सच्च्या मुंबैकराने, ह्या वास्तूविषयी कृतज्ञ राहायला हवं..!!


-नितीन साळुंखे 

9321811091

04.02.2020

टीप-

मधल्या काळात टाटांचं ‘ताजमहल हॉटेल ’ सुरू झालं होतं,  ताजमहाल हॉटेल उभारणारे टाटा आणि जॉनच वॅटसन हॉटेल, यांची एक कथा नेहेमी सांगितली जाते, पण ती नांतर कधीतरी लिहीन. ताजमहाल नंतर रिगल जवळ ‘अपोलो हाॅटेल’ सुरू झालं होतं, गव्हर्नर विल्यम हाॅर्नबीचं निवसस्थान आणि त्यापूर्वी हायकोर्ट असलेल्या असलेल्या इमारतीत ‘द ग्रेट वेस्टर्न हाॅटेल’ सुरू झालं होतं. स्पर्धा वाढू लागली होती. जाॅनच्या एस्प्लनेड हाॅटलची मालकी ही एका हातांतून दुसऱ्या हातात जात राहिली होती. काही काळ ह्या हॉटेलची मालकी हैदराबादच्या जंग यार ह्या नवाब घराण्याकडेही होती ह्या इमारतीची नांवही नंतर दोन वेळ बदलण्यात आली होती. तो एक स्वतंत्र इतिहास असल्याने, त्यावर विस्तारभयास्तव इथे लिहिता येत नाही. त्यावर पुन्हा कधीतरी. 
आता ही इमारत पडून टाकावी की तिला तिच्या मूळ स्वरूपात आणून जातं करावी, ह्यावर दिरंगाई आणि बेपर्वाईसाठीच जास्त प्रसिद्ध असलेल्या सरकारी यंत्रणा आणि न्यायालयात लढाई सुरु आहे. ती संपेपर्यंत ही आगळीवेगळी इमारत टिकून राहो, हीच सदिच्छा..! 

संदर्भ-
प्राथमिक संदर्भ-

 1. मुंबईचे वर्णन- गोविंद मडगांवकर, १८६२
 2. मुंबईचा वृत्तांत – आचार्य आणि शिंगणे, १८८३
 3. स्थल-काल – ढाॅ. अरुण टिकेकर
 4. Fort Walk – शारदा द्विवेदी व रोहीत मेहरोत्रा
 5. Watson’s Hotel- Wikipedia

सखोल संदर्भ-

 1. वॅटसन हाॅटेल आणि हाॅटेलचा जन्मदाता जाॅन हडसन वॅटसन यांच्या माहितीचा स्त्रोत-

जाॅन हडसन वॅटसन याच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतची आणि त्याने जन्माला घातलेल्या ‘एस्प्लनेड हाॅटेल’च्या निर्मिती बाबतची संपूर्ण माहिती, इंग्लंडमधल्या वॅटसनच्या Castle Carrok गांवात राहाणाऱ्या आणि तिथेच वॅटसनच्या मुलाने सन १८९६ मधे आपल्या वडीलांच्या नांवाने सुरू केलेल्या ‘वॅटसन इन्स्टीट्युट’शी संबंधीत असलेल्या मिस्टर टाॅम स्पाईट (Mr. Tom Speight) यांनी विना विलंब पाठवून दिली. त्यामुळे ती माहिती थेट वॅटसन इन्स्टिट्यूटमधून मिळालेली असल्याने, ती खरी आहे असं मानता येतं. ह्या माहितीला दुजोरा देणारी माहिती वॅटसन्स एस्प्लनेड हाॅटेलशी संबंधीत इतरही भरपूर वेबसाईटवर आहे.
वॅटसन हाॅटेलचा, कॅसल कॅराॅक गांवातील ‘वॅटसन इन्स्टिट्चूटमधे लावलेल्या मूळ पेंटीगचा फोटोही टाॅम यांनी मला मेलवर पाठवून दिला, तोच मी लेखात वापरला आहे.
अन्य वेबसाईट्स-

 • Finding Watson’s Hotel in a sleepy Cumbrian village- Deepa Krishnan
 • Indias most fragile World Heritage Building- Anshika Jain
 • Bombay Presidency- Rajesh Kapoor
 1. पहिल्या भागात आलेली मुंबईतील जुन्या हाॅटेल्सची नांवं व त्यांच्या स्थापनेच्या काळाची माहिती.
 2. Cultural Intermediaries in a Colonial City: Parsi of Bombay-c 1860 to 1921 (p 113 to p 151) written by Simin Patel, D. Phil. in Oriental Studies.
 3. Western india in 1838, Vol I (p.34-35) by Mrs. Mariana Postans- published in 1839.
 4. Gazetteer of Bombay City and Island-1909, Vol I (p33, p346) by Eduards S. .M.
 5. Handbook of Bombay Presidency with an account of Bombay City, Vol I, Second Edition (p113-114) by John Murray, 1881
 6. The Byculla Club- 1833 -1916, History by Samuel T. Shefard, 1916.
 7. Following the Equator (p345-p356) by Mark Twain, 1896.
 1. तिसऱ्या भागातला बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचा उल्लेख- Indian Express, 07.10.2009,

मला आवश्यक ती माहिती मिळवून देण्यासाठी माझे मित्र व मुंबईतील इतिहास व पुरातन देवस्थानांचे अभ्यासक सईद बेग यांनी बहुमोल मदत केली आहे, त्यांचे आभार.