मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने..

महाराष्ट्र, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी;एक वास्तव-

वेडी स्वप्न पाहायची आणि सनदशीर मार्गाने वाटेल ते करून ती पूर्ण करायची हे मराठी माणसाच्या रक्तात आहे. त्यासाठी पडतील ते कष्ट करायची, संयमाने वाट पाहायची त्याची तयारी आहे. महाराष्ट्रात जन्मलेला माणूस ‘मराठी’ असुनही त्याला केवळ ‘मराठी’ हे ‘प्रांतिय’ लेबल लावलेलं आवडत नाही कारण देशातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा मराठी माणूस आणि महाराष्ट्र जास्त ‘राष्ट्रीय’ असतो आणि म्हणून तर प्रांतीय आंदोलने महाराष्ट्राच्या मातीत दीर्घकाळ यशस्वी होवू शकत नाहीत. ‘महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले’ ही भावना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजतागायत उराशी जपलेली आहे. आणि जेंव्हा जेंव्हा राष्ट् अडचणीत येतं, तेंव्हा तेंव्हा राष्ट्राच्या हाकेला प्रथम ‘ओ’ जातो तो महाराष्ट्राचाच.

अश्या ह्या कडव्या राष्ट्राभिमानी महाराष्ट्राचा मानभंग केलेला मात्र महाराष्ट्राची माती कधीच खपवून घेत नाही. याचा अर्थ असा नाही, की ती उठसुट आपल्या हक्कासाठी पेटून उठते. मराठी माती वाट पाहाते, अन्याय झाला असल्यास, करणाराला तो निवारणाची संधी देते. अगदी शिशुपालासारखे शंभर अपराध भरल्यानंतरच ती प्रतिकाराला सिद्ध होतो, ती मात्र सोक्षमोक्ष लावायचाच या जिद्दीने. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रास्त मागणीत दुजाभाव होतो आहे हे लक्षात येताच मराठी माणसाने स्वत:चे प्राण देऊन त्याचा प्रतिकार केला आणि स्वत:वर अन्याय होऊ दिला नाही.

असा हा कडवा राष्ट्राभिमानी मराठी माणूस आपली मातृभाषा मराठीसाठी आग्रही का होत नाही हेच कळत नाही. मराठी शाळा बंद होत आहेत, मराठीजनच आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यामाच्या शाळेत घालण्यासाठी वाटेल ते करत आहेत. मुलांना इंग्रजी संभाषण यावं यासाठी घरी-दारी त्याच्याशी आग्रहाने इंग्रजीत संवाद करत आहेत. इंग्रजीच का, सर्वच भाषा बोलायला आल्या पाहिजेत असं माझंही ठाम मत आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की त्यासाठी मातृभाषा मराठीचा त्याग करायला(च) हवा. हल्ली तर अशी परिसिथिती आहे, की घरी मुलाला किंवा मुलीला जेंव्हा शाळेत घालायची वेळ येते, तेंव्हा त्याला किंवा तिला कोणत्या शाळेत घालावं यावरून छोटेसे वाद होतात. फार कमी घरं याला अपवाद असतील. वाद कोणत्या शाळेत, म्हणजे कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालावं यावरून होतात. इथे आश्चर्याची गोष्ट अशी, की मातृभाषेच्या माध्यमात मुलाला घालण्यास बहुतेक घरात ‘मातृ’पक्षाचाच विरोध असतो. यालाही अपवाद असतील, पण ते ही औषधापुरतेच..!

“केवळ काॅन्व्हेंटमध्ये शिकतात म्हणून मुलं ‘आपली’ भाषा विसरत नाहीत, तर त्या भाषेचे जिवंत प्रेम त्यांना घरी कुठेच दिसत नाही व म्हणून ती भाषा मुलं त्याज्य ठरवतात. ‘आम्ही आपल्या भाषेचे प्रेमी आहोत’ असं उठ-सूट बोलण्यापेक्षा, त्या भाषेचे प्रेम मुलांना आपल्या आई-वडीलांच्या जगण्या-वागण्यातून आपसूक जाणवायला लागते आणि ते तसे जाणवले तरच ते पुढे मुलांकडून जोपासले जाते; मग ती कोणत्या का माध्यमातून शाळा शिकेनात.!!” पुलंचं हे म्हणणं केवळ मराठीच नव्हे, तर प्रत्येक भारतीय भाषेला लागू आहे. म्हणून वर केवळ ‘आपली’ भाषा असा उल्लेख केला आहे..! मराठी, गुजराती, मारवाडी अशा सर्वच देशी भाषांबद्दलची त्या त्या भाषीक समाजातील अनास्था वाढत चालली असल्याचे समाजात वावरताना लक्षात येते. इंग्रजी शिकणे म्हणजे स्वत:ची भाषा कमी लेखणे किंवा विसरणे नव्हे, हे कोणी लक्षात घ्यायला मागत नाहीय..! त्यात या अनास्थेत ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ अशी परिस्थिती आहेच..।!

मराठी माणसाचा आपला जो कडवा देशाभिमान, जी वैभवशाली सांस्कृतिक आणि महान सामरीक परंपरा आहे ना, ती आपसुकपणे आणि सहजतेने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मातृभाषा हे एकमेंव उपलब्ध साधन आहे, हे आपल्याला समजत का नाहीय? आपली ‘मराठी’भाषा मेली तर तो देशाच्या बरोबरीने कोणतही संकट झेलण्यासाठी छाती पुढे ताणून उभा राहीलेला महाराष्ट्र पुन्हा दिसणार नाही, अशी मला चिंता वाटते. मुलांना मराठी भाषाच समजली नाही तर नसानसांत स्फुल्लिंग चेतवणाऱ्या कविता, रक्त सळसळवणारे शाहीरांचे पोवाडे, स्फुर्ती देणारी भाषणे-व्याख्याने मराठी मुलांच्या मनाला कशी भिडणार? भाषा संस्कृतीची वाहक असते आणि भाषा संपली की ती भाषा बोलणारी संस्कृती, ही साधी गोष्ट आपल्याला कधी समजणार? आपणच आपल्या मुळावर उठलोय याचं तरी भान आपल्याला आहे का?

‘खबरदार जर टांच मारूनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या’ या कवितेतील त्या लहान मुलाचा जोश आणि शत्रुप्रतीचा त्वेष किंवा ‘काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी’ या पोवाड्यातील शौर्य त्या ओळींतून आपल्या मुलांच्या मना-अंगात भिनण्यासाठी, त्या शब्दांचा अर्थ तर मुलांना कळायला हवा..! आणि मराठी भाषाच मुलांना आली नाही, येऊ दिली नाही, तर त्यांना तो कळायचा कसा. मग त्याच्या तो जाश निर्माणच कसा व्हायचा..? नविन पिढीला दोष देऊन काहीच उपयोग नाही, हा दोष त्या पिढीला घडवणाऱ्यांचा म्हणजे आपला आहे.

केवळ इंग्रजी उत्तम बोलता यावं यामागे त्याला चांगल नोकरी लागावी, परदेशात मुलाने जावं हाच मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्याचा बहुतेकांचा उद्देश असतो, पण या संकुचित विचारापायी आपण आपल्या मुलाच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्याही भावविश्वाचा खुन करतोय हे आपल्या लक्षात का येत नाहीय? मुलांचं भावविश्व विकसित होण्यासाठी मातृभाषेची बैठक पक्की लागते. ही बैठक पक्की असली का जगातील कोणतीही भाषा असाध्य नसते, ही साधी गोष्ट ज्या दिवशी मराठी माणसाला समजेल तो मराहाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी गौरवाचा दिवस असेल आणि तो सुदिन लवकरच यावा अशी तुम्हा सर्वांप्रती प्रार्थना.

गतवर्षीच ‘मराठी भाषा’ दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या विधानमंडळात मान. राज्यपालांचं अभिभाषण मराठी भाषेत भाषांतरीत न केल्यामुळे राज्यपालांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या प्रमुखांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केल्याची बातमी वाचली आणि मन विषण्ण झालं. आपण मराठी राज्याच्या राज्यकारभारासाठी निवडून दिलेल्या मराठी राज्यकर्त्यांची राजभाषेविषयीची आस्था किती पोकळ आणि बेगडी आहे, हे या प्रसंगावरून लऱ्क्षात येते. पण यालाही कारणीभूत आपण जनताच आहोत. प्रजेतच आपल्या भाषेविषयी ममत्व नसेल, तर ते राजात कुठनं येणार?

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मराठी माणसाला भांडल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्यापासून ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रापर्यंत मराठी जनांनी सर्व भांडूनच मिळवलंय. फक्त दुर्दैव येवढच, की आता मराठी भाषेसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या लोकांशीच भांडायची वेळ आली आहे.

माझ्या मराठी बांधवांनो, “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!” या ओळींचा महापूर फक्त मराठी भाषा दिनाच्या निनित्ताने येतो. एकदा का तो मराठीचा ‘दिन’ केला, की आपले कर्तव्य पार पाडले एवढीच त्यामागील आपली भूमिका. परंतू कुसुमाग्रजांच्या काळात डोक्यावर राजमुकूट घालून मंत्रालयाच्या दाराशी फाटक्या कपड्यात उभ्या असेलेल्या माझ्या मराठी भाषेची ती फाटकी वस्त्रही आपण, तिचीच लेकरं म्हणवणारांनी, फिदीफिदी दात विचकत ओढून काढली आहेत आणि आपल्या लेकरांपासूनच स्वत:चं लज्जारक्षण व्हावं म्हणून आपली ती ‘माय’ मराठी मंत्रालयाच्या नव्याने बांधलेल्या उंचं पायऱ्यांच्या सांदीत कुठेतरी लपून बसली आहे..मराठीचा ‘दिन’ करण्यापेक्षा मराठी ‘दीन’ होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.

मित्रांनो, अजुनही वेळ गेलेली नाही. आपणच ‘अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या’ आपल्या मराठी भाषेला आपल्या प्रेमाची संजीवनी देऊन जिवदान देऊ शकतो. मराठीवर प्रेम करा, आपल्या भाषेत कटाक्षाने व्यवहार करा, आपल्या मुलांना किमान इयत्ता ७वी पर्यॅत तरी मराठी माध्यमात शिकवा असं आवाहन सर्व मराठी भाषकांना करावसं वाटतं;नाहीतर तिचे दिवस करण्याची पाळी आपल्यावर लवकरच येईल..

-नितीन साळुंखे
9321811091