चौपदरीकरणाच्या राजमार्ग –

आज दिनांक २६. ०२. २०२०.. रोजी  ‘दै. लोकमत’-सिंधुदुर्ग आवृत्तीत प्रसिद्ध झालेला माझा लेख –

चौपदरीकरणाच्या राजमार्ग –

“तुला समजलं का, त्या अमुक तमुकला एवढे पैसे मिळाले..!,”. मला काहीच बोध येईना. माझ्या चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचून, माझा मित्र मला पुढे स्पष्टीकरण करायला लागला, ” अरे तो आपला हा आहे ना, त्याची खारेपाटणात हायवेच्या शेजारी मोठी जागा होती. जागा पडिकच होती, पण त्याची ती जागा बोंबे-गोवा रोडच्या रुंदीकरणात गेली आणि त्याचा मोबदला म्हणून त्याला भरपूर कोटी मिळाले” आता माझ्या लक्षात आलं. माझ्या मित्राच्या मित्राची हायवेच्या जागा गेली आणि त्याला भरपूर पैसे मिळाले. माझा मित्रही सिंधुदुर्गातील असल्याने, तो हे आनंदाने सांगत होता की असूयेने, हे माझा लक्षात येईना. असूया त्याच्या मित्राला भरपूर पैसे मिळाले याची नाही, तर आपल्या वाड वडिलांनी हायवेच्या शेजारी जागा का घेऊन ठेवली नाही, याची..! (खोटं कशाला सांगा, असं मलाही वाटलं)

अश्याच प्रकारचा संवाद पुढे आमच्या जिल्ह्यातील अनेकांच्या मुखातून अनेकांबद्दल ऐकायला मिळाला. एकंदरीत ह्याच सार एवढंच, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या माध्यमातून कोकणात (इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात) भरपूर पैसा आला. पण ह्या पैशांची गुंतवणूक त्या लोकांनी कशी आणि कुठे केली या बद्दल कुणाला माहिती नव्हती. तशी माहिती असण्याची काही गरजही नव्हती कारण तो संपूर्णपणे खाजगी मामला असतो. मी कोकणातला, म्हणजे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कायमचा रहिवासी नाही, त्या मुले तिथली लोक कितपत अर्थसाक्षर आहेत, ते मला माहित असण्याची शक्यता नाही. पण माझ्याही अंगात तेच कोकणी रक्त खेळात असल्याने, कोकणी जनता काटकसरीने वागणारी आहे, हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो. पण, अशा प्रकारे अनपेक्षितपणे मिळालेल्या पैशांचं करायचं काय, हा प्रश्न तुलनेने कमी पैसा पाहिलेल्या माणसाच्या समोर उभा राहातोच. मग पैसे खर्च करण्याचे सोपे मार्ग सुचू लागतात. सोनं, गाड्या, नवनविन घरं, घराची पुनर्बांधणी आणि मुंबईसारखं इंटेरिअर यावर प्रचंड पैसा खर्च करण्याची इच्छा मूळ धरू लागते. हे सर्व झालं, की मग घरातल्या तरुणाला राजकारण खुणावू लागतं आणि सोन्याने लगडलेल्या एखादा भावी युवा नेत्याला नाक्या नाक्यावर (आपल्याच पैशानं) लागलेलं दिमाखदार बॅनर मनातल्या मनात दिसू लागतं. पैसे आला आहे म्हटल्यावर, चार खुशामतखोर टाळकी जवळ येतात आणि ‘सायबा’ला चढवून स्वतःच्या खाण्यापिण्याची सोया करून घेतात. युवा नेत्याचं स्वप्न बॅनरच्या रूपाने (फक्त)नाक्यानाक्यावर झळकू लागतं आणि मग एका वाटेने चालत आलेली लक्ष्मी,  दहा मार्गाने धावत कधी निघून जाते, हे लक्षातही येत नाही. ते लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि युवा नेता पुन्हा कार्यक्रता बनून निवडणकांच्या मांडवात जेवणाच्या अपेक्षेने आशाळभूतपणे घुटमळताना दिसतो. हे कोकणात होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. 

कोकणच्या शहाणपणावर माझा विश्वास आहे, पण तरीही सावध राहायला हवं. आलेला पैसा, गेल्या जमिनीतून आलेला आहे आणि तो आयुष्यभर पुरवायचा आहे, ह्या विचाराने वागायला हवं. योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी, जेणेकरून त्या पैशातून नियमित उत्पन्न मिळत राहील मला हे सांगावंसं वाटतं, या मागे काही कारणही आहे. काही वर्षांपूर्वी ठाण्यानजिकच्या भिवंडीचं भाग्यही इसंच फळफळलं आणि तिथल्या लोकांच्या जमिनीला सोन्याचं मोल मिळालं. सुरुवातीच्या काळात तिथल्या लोकांनी मिळालेल्या पैशांतून पहिली आपली स्वप्न पूर्ण केली. स्त्री-पुरुष अशा दोघांनाही, शरीराच्या ज्या ज्या अवयवात सोनं अडकवता येईल, त्या त्या अवयवात सोनं अडकवून ते पिवळे धमक झाले. देशी-परदेशी गाड्या घेतल्या. साध लिटरभर  दुध आणायलाही परदेशी बनावटीची गाडी लागायची. पार्ट्या तर काय रोजच्याच होत्या. झालं, अनप्रोडक्टीव्ह गोष्टीवर पैसे खर्च झाला आणि पुन्हा आपल्याच विकलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या दुसऱ्याच्या कंपनीत नोकरी धरायची वेळ आली. कोकणात हे होता कामा नये. पुण्याजवळच्या मुळशी गावातही हेच घडलं. त्यावर आधारलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा आपण आवडीने पाहीलाही असेल. त्यातून यथोचित बोधही घेतला असेल. कोकणात हे घडू नये. कोकणातली माणसं तशी शहाणी आहेत. पण पैसा भल्या भल्यां शहाण्यांना वेडं करतो, म्हणून सावध राहायला हवं.

कोकणाचं बलस्थान हे तेथील अनाघ्रात  निसर्ग आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. शहरात राहणाऱ्या माणसांना ह्याचाच भारी अप्रूप आहे. आजही रेल्वे तुडुंब भरून वाहताना आणि महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असतानाही, पुण्य-मुंबईकडचे लोक ह्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद लुटायला जीव धोक्यात टाकून कोकणात येत असतात.  सटी-समाशी कधीतरीच गावी जाणारा पुणे-मुंबैकर कोकणी, आता जवळपास दर आठवड्याला किंवा जोडूनची सुट्टी असल्यास, कोकणच्या दिशेने प्रस्थान ठेवतो, तो ह्या निसर्गाच्या ओढीने. सुट्टी साली की  कोकणाकडे जाणारे चहूदिशाचे रस्ते वाहनांनी तुंबून गेले, ह्या बातम्या आता नेहेमीचेच झाल्या आहेत. मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणानंतर ही वर्दळ अधिक वाढणार आहे. हिच संधी असणार आहे, पर्यटन वाढीची. कोकण म्हणजे निसर्गसौंदर्याची खान आहे, असं नुसतं म्हणून चालणार नाही, तर ह्या खाणीतली बहुमोल रान, म्हणजे निर्मल स्मुद्रकिनारे, गार्ड झाडीत, सह्याद्रीच्या कुशीत वसलेली निवांत गावे, सह्याद्रीतील जैव विविधता, कोकणी खाद्य संस्कृती, लोककला इत्यादी, नजकतीने जगासमोर ठेवण्याची गरज आहे.  गुजरात सारख्या राज्याने अमिताभ बच्चनना घेऊन जगात वाळवंटही विकून दाखवलंय. आज ते वाळवंट पाहण्यासाठी, वाळवंटातच जन्मलेले, मोठे झालेले आणि आयुष्यभर वाळवंताशिवाय काही न पाहिलेले मध्यपूर्व देशातले लोकही मोठ्या प्रमाणावर येत असतात. मग कोकण तर मग कोकणचं अनाघ्रात गूढ निसर्ग सौंदर्य, स्वच्छ समुद्र किनारे, महाराजांचे गड किल्ले, लोकजीवन- लोककला- खाद्य जीवन, सह्याद्रीतील जैवविविधता, घनदाट जंगलं यांचा दृष्टीनुभव घेण्यासाठी जग आलं तर मला नवल वाटणार नाही. गरज आहे ती फक्त कल्पकता वापरण्याची. आपल्याकडे असलेल्या खुबाईंचा कल्पक्तेने वापर करून पर्यटन उद्योगासारखा उद्योग विकसित करायचा विचार कोकणी जनतेने करावा आणि ह्यासाठी सरकारी अवतारावर अजिबात अवलंबून राहू नये. अवतार ह्या कल्पनेने आपलं खूप नुकसान केलाय. कुणीतरी अवतार जन्म घेईल आणि आमचं भलं करेल, अश्या कथा पुराणात वाचायला छान वाटतात. प्रत्यक्षात मात्र आपल्या उद्धारासाठी आपल्यालाच अवतार घ्यावा लागतो, ही वास्तवता आहे. तर सरकारी मिथ्या वातारावर अवलंबून न राहता. कोकणातल्या छोट्या छोट्या गटांनी एकत्र येऊन, आपापल्या गावातील खुब्यांचं मार्केटिंग सुरु करावं. सोशल मीडियामुळे जगासमोर जण खूप सोपं झालाय, ह्याचा लाभ जरूर उठवावा. हे करताना आपापसातलं विविध पातळ्यांवरच राजकारण निक्षून बाजूला ठेवावं आणि पक्षीय राजकारणापासून तर अंतर राखूनच राहावं. 

जगभरची प्राचीन मानवी वस्ती ज्या प्रमाणे नद्यांच्या काठी फुलली, फळली आणि बहरली, त्याचप्रमाणे अर्वाचीन अथवा आधुनिक मानवी वस्ती रेल्वेमार्ग आणि रस्त्यांच्या काठाने फुलताना, फलटण आणि भरताना दिसते. रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्ग ह्या आधुनिक काळातल्या नद्याच आहे. म्हणून तर त्यावरून वाहतूक होते व ते दुथडी भरून वाहताना दिसतात, असे शब्द प्रयोग जन्माला आले. कोकणातूनही येत्या काही काळात मुंबई-गोवा महामार्गाची ‘गंगा’ दुथडी भरून वाहू लागणार आहे. ही गंगा समृद्धी घेऊन येणार आहे. ह्या गंगेला प्रसन्न करून घेण्यासाठी पर्यटनासारखा दुसरा पवित्र व्यवसाय नाही. पवित्र ह्यासाठी की, अतिथीची सेवा करण्याचं भाग्य ह्या उद्योगात मिळत शिवाय सोबत हायवेच्या रूपाने आलेल्या गंगेची पूजा केल्याने, लक्ष्मीही प्रसन्न होते, हा दुसरा फायदा.  

लक्ष्मी प्रसन्न होते, ती पूजा करणार्यापेक्षा नम्रतेने वागणाऱ्या माणसांवर. ‘ह्यो काय माका शिकयतलो’ हे हा कोकणी बाणा थोडा दूर ठेवण्याची गरज आहे. कोकणी माणसे, इथल्या गावातील विविध देवळातील महादेवासारखी स्वयंभू आहेत, ह्याची मला कल्पना आहे. मोडेन पण वाकणार नाही, हा बाणा कोणत्याही स्वयंभू माणसांत असतोच. तसा तो कोकण्यांतही आहे. पर्यटनासारख्य किंवा कुठल्याही उद्योगात, एकदा नव्हे शंभर वेळा वाकावे लागते. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाहेरून इथे चार दिवसांसाठी आलेला पाहुणा, इथल्या निसर्गाचा, लोकजीवनाचा, खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला आलेला आहे, काही शिकवायला नाही. झालाच तर तो काहीतरी शिकवूनच जाणार आहे. त्यामुळे त्याच्याशी शक्य तेवढ्या नम्रपणे वागावं आणि त्याची होता होईल तेवढी मर्जी राखावी, हे मला आवर्जून सांगावस वाटत. ह्या बाबतीत मारवाड-गुजराती समजला आपला आदर्श मानावं.     मुंबई-गोवा महामार्गाची गंगा ज्याप्रमाणे कोकणात समृद्धी आणणारा आहे, त्याचप्रमाणे ती सोबत विकृतीही आणणारी आहे. नदीच्या प्रवाहासोबत जसा सुपीक गाळ येतो, तसाच दूरच्या गावातील केरकचराही येतो. ही विकृती मोठमोठ्या प्रकल्पांच्या आकर्षक स्वरुपात असेल. मोठमोठे प्रकल्प आणून, स्थानिकांच्या जमिनी घेऊन, कुटुंबातील कुणाला तरी नोकरी देण्यातं आमिष देणारांपासून कोकणवासियांनी कायम सावध राहायला हवं, कारण यापुढे तुमच्या जमिनींना सोन्याचा नव्हे, तर प्लॅटिनमचा भाव येणार आहे. मोठमोठे राक्षसी प्रकल्प आणू इच्छिणारांची वक्र दृष्टी, कोकणवासीयांच्या उन्नतीपेक्षा, जमिनींकडे असणायचीच शक्यता जास्त आहे. मोठ मोठे प्रकल्प आणण्याची स्वप्न दाखवून, प्रकल्पांना लागणाऱ्या जमिनी स्थानिकांकडून विकत घ्यायच्या आणि त्याच दाम दुपटीने प्रकल्पांना विकायच्या हे देशात सर्वंकडेच  झालंय, ते कोकणात घडणारच नाही, असं मुळीच समजू नका. स्वप्न दाखवणारांपासून सावधान राहायला हवं. आणि अशी स्वप्न दाखवणारे राजकीय नेते असतील, तर अधिकच सावध राहायला हवं. ह्या संदर्भातही मी पुन्हा भिवंडीचंच उदाहरण देईन. 

ठाण्यानजीकच्या भिवंडीच्या जमिनींना अचानक भाव आल्यानंतर, तिथल्या आदल्या पिढीने जमिनी फुंकून टाकल्या. आलेल्या पैश्यांवर मौजमजा कशी केली हे आपण ह्या लेखातल्या तिसऱ्या परीच्छेदात पाहिलं. पण पहिल्या पिढीकडून नकळत घडलेली तशी चूक, त्यांच्या दुसऱ्या पिढीने मात्र केली नाही. नवीन पिढी शहाणपणाने वागली. ह्या नवीन तरुण पिढीने आपल्या उरल्या सुरल्या जमिनी न विकता त्या विविध उद्योगांना भाड्याने दिल्या. काही जमीन मालकांनी आपल्या जमिनी भांडवल म्हणून नव्याने त्या भागात येऊ पाहणाऱ्या उद्योगातून गुंतवल्या, तर काहींनी स्वतःचे उद्योग सुरु केले. अशा प्रकारे हातची जमीन जाऊ न देता, आपल्या तहहयात उत्पन्नाची सोय केली. आज भिवंडी परिसरातील हि नवीन पिढी, हातच काहीही न गमावता, जुन्या पिढीसारखच सर्वप्रकारचा सुखोपभोग घेत आहे. हे शहाणपण कोकणातील तरुणांनी दाखवावं आणि दाखवतील असा माझा विश्वस आहे.  हायवेवरून धावत येणाऱ्या विकृतीला काही झालं तरी कोकणी माणसाने बळी पडू नये. देशाची लक्ष्मी असलेल्या मुंबईला घडवणारा कोकणी माणूसच होता, पण केवळ ह्याबाबतीत धोरणीपणाने न वागल्यामुळे आज मुंबईचा शिल्पकार असलेला मुंबईकर, मुंबईतून पार हद्दपार झालेला आहे. ते कोकणात होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. 

मुंबई गोवा महामार्गाचा रुंदीकरण, भविष्यात नव्याने होणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग, हे कोकणात होऊ घातलेल्या अर्थक्रांतीची चाहूल आहे. ह्या होऊ घातलेल्या अर्थक्रांतीला भानावर राहून सामोरं जायला हवं. क्रांती आपल्याच पिलांना खाते, हे वाचन खोटं ठरवण्याची जबाबदारी आता कोकणवासीयांची आहे. त्याचसोबत कोकणी जनतेला मार्गदर्शन करण्याची, तेथील जनतेला अर्थसाक्षर करण्याची जबाबदारी कोकणातील विविध संस्था, वर्तमानपत्र आणि राजकीय नेत्यांचीही आहे. ह्या सर्व घटकांनी आपापला स्वार्थ बाजूला ठेवून केवळ कोकणी जनतेच्या भल्याचा विचार करण्याची गरज आहे. 

-नितीन साळुंखे 

9321811091

26.02.2020