श्री स्वामी समर्थ आणि इतर अवतारी पुरुषांचा मूक संदेश..

श्री स्वामी समर्थ आणि इतर अवतारी पुरुषांचा मूक संदेश..

अक्कलकोट स्वामींचा आज प्रकटदिन
अक्कलकोटचे स्वामी माझं (पुर्वीचं)श्रद्धास्थान. सहा-सात वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही सर्व मित्र मिळून दरवर्षी अक्कलकोटला जायचो. पण जसजसा मी ‘अवतार’ या विषयावर विचार करायला लागलो, तस तस मला या अवतारांबद्दल एक वेगळीच समज यायला लागली आणि अवतार स्थानांवर जाण्याचं प्रमाण कमी कमी व्हायला लागलं. अगदी अलीकडे, म्हणजे २०१५च्या नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये आम्ही मित्र मिळून अक्कलकोट स्वामीचं प्रकटस्थान मानलं गेलेल्या कर्दळीवनाची यात्रा करून आलो. पण यात्रे मागे आमची श्रद्धेपेक्षा एखादी ॲडव्हेन्चर ट्रीप करण्याचा हेतू जास्त होता..तो सफलही झाला. ही यात्रा आम्ही अत्यंत सुलभतेने आणि कोणतेही कष्ट न होता पूर्ण केली..

अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज किंवा नागडेबाबा इत्यादी कोणत्याही अवतारांबाबत माझा सखोल असा अभ्यास नसला, तरी एक निरीक्षण आहे आणि ते माझ्यापुरतं तरी खरं आहे हे मला पटलेलं आहे. अर्थात, माझं मत आपल्याला मान्य असायलाच हवं, असा काही माझा आग्रह नाही. मला या अवतारी पुरुषांबद्दल काय वाटतं ते मी या लेखात मांडायचा प्रत्न केला आहे. या लेखातून कोणाच्या भावना दुखावाव्यात असा माझा हेतू नाही.

स्वामीसमर्थ काय किंवा साईबाबा काय किंवा गजानन महाराज काय आणि भालचंद्र महाराज काय, ह्या सर्व अवतारांचा जन्म आणि नंतरचं त्याचं प्रकटीकरण वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. स्वामी समर्थ कार्दळीवनात प्रकटले आणि नंतर देशभर फिरत फिरत सोलापूर नजीकच्या मंगळवेढ्यात येऊन स्थिरावले आणि नंतर पुढं अक्कलकोटात येऊन ते अवतारी पुरुष म्हणून मान्यता पावले. तर साई बाबांच्या जन्माबाबत ठोस माहिती नसली तरी ते महाराष्ट्रातल्या पाथरी गावातल्या भुसारी कुटुंबात जन्मले असे म्हणतात. मात्र ते साईबाबा म्हणून मान्यता पावले ते शिर्डी येथे आल्यानंतर. शेगावच्या गजानन महाराजांच्या जन्माबाबातही ठोस माहिती उपलब्ध नाही मात्र ते ही ‘गजानन महाराज’ म्हणून प्रसिद्धीस आले ते शेगावी आल्यानंतरच. कणकवलीच्या भालचंद्र महाराजांचा जन्म बऱ्यापैकी माहित आहे, मात्र ते महाराज म्हणून मान्यता पावले ते कणकवलीत आल्यावर. या कथा सर्वाना माहित आहेत.

मला आपलं लक्ष वेधून घ्यायचं आहे, ते या सर्व विभूतींच्या अवतारी असण्याबद्दलची लोकांची खात्री पटली त्या पूर्वीच्या त्यांच्या अवस्थेकडे. यातील बहुतेक सर्वच अवतारी पुरुषांकडे ते गावाच्या बाहेर किंवा जंगलात, भिकारी किंवा फकिराच्या वेशात, उकिरड्यावर, गांवात भिक्षा मागताना किंवा वेड्यासारखे वागताना लोकांचं त्यांच्याकडे लक्ष गेलेले त्यांच्या चरित्रात लिहिलेलं लक्षात येतं..नेमका हाच मुद्दा मला विचार करण्यासारखा वाटतो.

श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे गावांत प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत. क्वचित गावात येत. ते गांवात आले, की कुणीतरी त्यांना भोजन देत असे. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोट येथे आले, त्या वेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते अशी माहिती त्यांच्या चरित्रात मिळते. पुढे स्वामींचे भक्त म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले अशीही माहिती मिळते. चोळाप्पांच्या घरातील मंडळी त्यांनी ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’ असे म्हणत. तर साईबाबां अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी अश्या फकिराच्या वेशात चांदभाईना जंगलात सापडले. त्यांच्यासोबत बाबा शिर्डीत आले. शिर्डीतही ते भिक्षा मागण्यासाठी फिरत असत अशी माहिती उपलब्ध आहे. श्री गजानन महाराज हे त्यांच्या ऐन तारुण्यात प्रथमतः वऱ्हाडातील शेगावी दिसले. ते प्रथम दिसले त्यावेळी ते एका मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात होते आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित होते असा उल्लेख आहे. पुढे गोविंद महाराज टाकळीकर बेफाम असलेल्या घोड्याच्या चौपायांत श्री गजानन महाराज निजत असत अशीही माहिती मिळते. भालचंद्र महाराजांचीही अशीच काहीशी कथा आहे..

मला या लेखातून या महापुरुषांच्या अवतारी असण्याबद्दल कोणतीही शंका उपस्थित करायची नाही. परंतु हे सर्व अवतारी पुरुष, जे साधारणत: एकाच अवस्थेत असताना लोकांना सापडले, ती अवस्था मात्र मला विचार करायला भाग पडते. माझ्या अल्पमतीने मला विचार करता यातून एकाच गोष्ट समजते, ती म्हणजे हे सर्व अवतारी पुरुष एकाच संदेश देतात आणि तो म्हणजे ‘गोरगरीब, विपन्न, परिस्थितीमुळे भिकाऱ्यासारख्या राहणाऱ्या, भुकेलेल्या लोकांची सेवा करावी’ हा.

या अवतारी पुरुषांची अपेक्षा लोकांनी त्यांना देव बनवून त्यांची पुजा करावी अशी मुळीच नसावी. तर त्यांच्यासारख्या अवस्थेत राहाणाऱ्या लोकांची सेवा करावी, अशी असावी. या सर्वांनी एकाच संदेश दिला आहे तो म्हणजे समाजाच्या अन्त्योदायासाठी प्रयत्न करणे. यातील एकही पुरुष जात-धर्म मानणारा नव्हता हे लक्षात घेतले, म्हणजे आपण तसे अनुयायांनी वागावे हे ही त्यांना अपेक्षित असावे. त्यांची पुर्वावस्था लोकांना हेच सुचवू पाहतेय असं मला वातं. परंतु आपण मात्र त्यांना देव बनवल. त्यांना सोन्याच्या सिंहासनावर बसवलं आणि पैशांच्या राशी त्यांच्यापुढे नेऊन ओतू लागलो, ज्याची त्यांना मुळीच आवश्यकता नव्हती आणि नाही. हेच पैसे किंवा ह्या साधनांनी समाजातील तळागाळातील, उपेक्षीत आणि दुर्लक्षित लोकांना मदत करा असा संदेश हे सर्व अवतारी पुरुष देऊ पाहाताहेत, परंतु आपण मात्र भल्यामोठ्या देणग्या देऊन आपल्या नांवाची पावती किंवा एखादी संगमरवरी पाटी या महाराजांच्या देवळाच्या पायरीशी लावून अमर व्हायचा प्रयत्न करत आहोत. लाखो खर्च करून आपण पालख्या काढतोय, भंडारे उधळतोय, जो चारी ठाव पोट फुटेस्तोवर जेवतोय त्यालाच पुन्हा जेवू घालतोय आणि त्याच वेळेस मंडपाबाहेर बसलेल्या एखाद्या भिकाऱ्यास उष्ट्या पत्रावळ्या, आपल्याला वाटलं तर देतोय. परिसरातल्या एखाद्या गरीब परंतु हुशार विद्यार्थ्याच शिक्षण पैशामुळे अडतंय किंवा जवळ पैसे नसल्यामुळे एखाद्यावर आवश्यक ते उपचार करता येत नाहीत याकडे, पालखी आणि भंडाऱ्यात भान हरपलेल्यांचं फार लक्ष आहे असं दिसून येत नाही. अर्थात या अवतारी पुरुषांच्या नांवाने सुरु असलेळ्या काही संस्था हे काम करीत आहेत, नाही असं नाही परंतु ते पुरेसं नाही.

या अवतारी पुरुषांचे परमभक्त म्हणवणारांनी समाजातील आपल्या आजुबाजूच्या गरजूंना आपल्याला जमेल तशी मदत करायला हवी. समाजातील आपल्याच शेजारच्या दारिद्रीनारायणाची सेवा करायला घेतली की मग अक्कलकोट स्वामी किंवा साईबाबा किंवा गजानन महाराज किंवा नागडेबाबांची सेवा केल्यासारखंच आहे, हे ज्या दिवशी आपल्याला कळेल, त्या दिवशी ह्या अवतारी पुरुषांची पूजा बांधल्याचं खरं पुण्य आपल्याला मिळेल… ’जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो अपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या अभंगाच्या ओळीतील नेमका अर्थ लक्षात येतो. आपल्या जवळच्या रंजल्या-गांजलेल्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी जरी आपण मदत करु शकलो, तरी त्या पुरुषांची सेवा होईल..!!

आज स्वामींचा प्रकटदिन..या निमित्ताने स्वामींनी दिलेल्या वरील संदेशाची मला उजळणी करावीशी वाटली..

-©️नितीन साळुंखे
9321811091

सन १८९६ ला मुंबईत पडलेली प्लेगची साथ आणि ती निवारणाचे सरकारी प्रयत्न..!

सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेली ‘कोरोना’ची साथ आणि तिच्याशी लढण्यासाठी सरकारचे सर्व पातळ्यांवर चाललेले प्रयत्न पाहून, मला १८९६मधल्या मुंबईतल्या प्लेगच्या आणि त्याकाळातील सरकारने त्यावर केलेल्या अशाच उपाययोजनांच्या आठवणी जागवण्याचा हा एक प्रयत्न..

मुंबईतील ऐकिहासिक पाऊलखुणांचा मागोवा- लेखांक ३९वा

सन १८९६ ला मुंबईत पडलेली प्लेगची साथ आणि ती निवारणाचे सरकारी प्रयत्न..!

१८९६च्या आॅगस्ट-सप्टेंबरच्या महिन्यांच्या दरम्यान मुंबईच्या मांडवी परिसरातली माणसं अचानक ताप येऊन मरायला लागली होती. काय होतंय हे समजायच्या आतच, ही मृत्यूची लाट भराभर पसरत नजिकच्मायाच नागपाडा, डोंगरी, कामाठीपुरा पासून थेट गिरगांवपर्यंत मृत्यूनं थैमान घातलं होतं. साधा ताप येऊन माणूस झोपयचा आणि उठायचा तो काखेत गाठ घेऊनच आणि काही उपचार मिळायच्या आतच, सहा-सात दिवसांच्या कालावधीत तो निजधामास जात असे. माणसं अशी मोठ्याप्रमाणावर मृत्युमुखी पडत असताना, हे कशामुळे होतंय, त्यामागची कारणं काही कुणाला सापडत नव्हती. काही कळायच्या आतच, पाहाता-पाहाता मृत्युची पकड नजिकच्या नागपाडा, कामाठीपुरा, डोंगरी करत करत गिरगांवातल्या खेतवाडी-फणसवाडी-भुलेश्वरपर्यंत पोहोचली. सर्वच हवालदील झाले होते. थातुरमातूर उपचार-गंडेदोरे-तावित वैगेरे उपाय करुन झाले होते, पण मरण काही लांबत नव्हतं आणि थांबतही नव्हतं.

दक्षिण मुंबईतला हा मांडवी परिसर पुर्वीपासूनच दाट लोकवस्तीच्या. आजही तो तसाच आहे. नानाप्रकारच्या व्यवसायाचा. ‘मांडवी’ शब्दाचा अर्थ, ‘कस्टम हाऊस’ किंवा कर भरण्याचंकार्यालय. पूर्वीच्या मुंबईतला व्यापार आणि मालाचीआवक-जावक आणि वितरण याच परिसरातून चालतअसल्याने, सरकारी कर भरण्याची चौकी इथे असल्याने,या परिसराला मांडवी असं नांव मिळालं आणि आजही ते कायम आहे. तर या परिसरात सर्वच प्रकारचा माल विविध ठिकाणांहून येत असल्याने, ह्या ठिकाणी माल साठवणूकीची प्रचंड मोठी गोडावून्स होती. अगदी आजहीआहेत. यात धान्याच्या गोदामांची संख्या जास्त आहे. दाट लोकवस्ती, सततची गर्दी, अगदी प्राथमिक स्वरुपाच्याही पायभूत सोयी नाहीत, रोगट हवा अस्वच्छता, उघडी गटारं याचा परिणाम म्हणून उंदीर-घुशी, पिसवा, घोंघावणाऱ्या माश्या यांचा सुळसुळाट ह्या परिसरात झाला होता. गोदामांतून उंदीरच वस्तीला असत. तिथेच जगत आणि तिथेच मरत. ह्या सर्व घाणेरड्या, परंतु रोगराईला पोषक वातावरणाचा, व्हायचा तोच परिणाम झाला आणि प्लेगने (अर्थात, हा प्लेग आहे, हे नंतर समजलं होतं.) थैमान घातलं. या सर्व बजबजपुरीत रोगाने पटापट मरून पडणाऱ्या उंदीर-घुशी, त्यांच्या मेल्या शरिरावर बसलेल्या माश्या-पिसवा माणसांच्या संपर्कात येऊन, माणसांना मोठ्या प्रमाणार प्लेगची लागण होऊ लागली आणि माणसं पटापट मरू लागली. हा आजार संसर्गजन्य असल्याने, तो वायुवेगाने सगळीकडे पसरत गेला. हा रोग उत्तरेला तुलनेने कमी लोकवस्ती असलेल्या माहिमपर्यंत पसरला होता. १८९७ च्या जानेवारीपर्यंत संपूर्ण मुंबईत ह्या रोगाने आपला प्रभाव टाकला होता.

वर उल्लेख केलेले मांडवी, नागपाडा, गिरगांव हे परिसर दाट लोकवस्तीचे आणि त्यामुळे ह्या रोगाचा सांसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. मृत्यूचं प्रमाण आणि वेग एवढा होता की, घरातल्या एका माणसाचं मृत शरीर दहन-दफन करुन आल्यावर, लगेचंच त्याच घरातील दुसरं प्रेतही तयार असायचं. आठवड्याला साधारण हजार-दोन हजार माणसं ह्या रोगाला बळी पडायला सुरूवात झाली होती. स्मशानात प्रेतं जाळण्यासाठी रांगा लावण्याची परिस्थिती उद्भवली होती. घाऊकपणे माणसं मारते, ती महामारी, या अर्थाने प्लेगला त्यावेळी ‘महामारी’ असं म्हटलं जात होतं. आजाराचं निदान होत नव्हतं. आणि त्यामुळे अर्थातच औषध योजनाही करता येत नव्हती. माणसं घाबरली. बचावलेल्यांनी आपापल्या गांवाकडची वाट धरली.

मुंबईचे आणि मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने ‘दु:खहर्ता’ म्हणता येईल असं टाटा कुटुंब याही वेळी मुंबईकरांच्या मदतीला सरसावलं होतं. ज्यांना मुंबईच्या उपनगरांत मोकळ्या परिसरात जायचं होतं, त्यांच्यासाठी जमशेटजी टाटांनी हव्या त्या स्वरुपाची मदत देऊ केली. मुंबईच्या उपनगरांची वाढ होण्यास, गिरण्या, रेल्वेप्रमाणे हे देखील एक कारण आहे. अनेकांनी या काळात उपनगरांना जवळ केलं होतं. परंतु ज्यांचं पोटच हातावर होतं, अशांनी काय करावं? जावं तरी मरण आणि न जावं तरी मरणच..!

अशातच सप्टेंबर महिन्याच्या २३ तारखेला, त्यावेळच्या मुंबई नगरपालिकेच्या आरोग्य खात्यात कार्यरत असणाऱ्या एका डाॅक्टरने, ह्या मृत्यूचं नेमकं निदान करून, हा ‘ब्युबाॅनिक प्लेग’ रोग असल्याचं सरकारकडे जाहिर केलं. ब्युबाॅनिक या शब्दाचा अर्थ लहान गाठ असा होतो. हे डाॅक्टर होते, डाॅ. अॅकॅशिओ गॅब्रियल वेगास (Dr. Accacio Gabriel Viegas). हे आपल्या आताच्या गोव्याचे. गोव्यातल्या ‘आरपोरा’ गांवचे. म्हणजे त्यावेळच्या ‘पोर्तुगीज इंडीया’तले.

पुढे जाण्यापूर्वी थोडसं विषयांतर करुन ह्या डाॅक्टरांची थोडीशी माहिती सांगणं मला आवश्यक वाटतं. गोव्याला जन्मलेल्या ह्या डाॅक्टरांचं माध्यमिक आणि महाविद्यालयीन, म्हणजे ‘डाॅक्टरकीचं’, शिक्षण मुंबईत झालं. ग्रॅन्ट मेडीकल काॅलेजमधून, म्हणजे आताचं जे. जे. हाॅस्पिटल, त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्णकेलं आणि मुंबई नगरपलिकेच्या माध्यामातून त्यांनी मुंबईच्या मांडवी भागात, म्हणजे मशिद बंदर-सॅंडह्रर्ल्ट रोड परिसरात, आपली वैद्यकीय सेवा नागरिकांना द्यायला सुरुवात केली होती.

आता पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊ. डाॅ. वेगासनी या रोगाचं निगान केलं., हे वर आपण पाहिलं. दाटीवाटीची वस्ती आणि अस्वच्छता हे रोगाचं महत्वाचं कारण आहे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आता त्या कारणांचं निराकारण आणि रोगावरचा जालिम उपाय शोधायचा होता. त्यातहीअडचण होतीच. डाॅ. वेगास ह्यांनी हा रोग सुक्ष्म जंतुंमुळे(बॅक्टेरीया किंवा जिवाणू) होतो आणि जंतुंचा प्रादुर्भाव अस्वच्छतेमुळे जास्त होतो, असं सांगितलं तरी, असं काही कारण असू शकतं, हेच अनेकांना पटत नव्हतं. असं वाटणाऱ्यांत त्यावळच्या सरकारी यंत्रणेतलेही काही लोक होते. म्हणून सरकारी यंत्रणेने सर्वात पहिलं काय तेलं असेल तर, डाॅ. वेगासचं केलेलं निदान आणि त्यामागची कारणं, बरोबर आहे किंवा कसं, याची तपासणी करण्यासाठी, तज्ञांच्या चार टिम्स कामाला लावल्या.

तर दुसरीकडे जनतेच्या पातळीवर वेगळीच गम्मत सुरू होती. त्या काळी धार्मिक पगडा जास्त आणि डाॅक्टरी उपायांवर विश्वास कमी असल्याने अनेकांना, अगदी त्याकाळातील सुशिक्षित म्हणता येईल अशा लोकांनाही, हा दैवी प्रकोप वैगेरे वाटला आणि त्यावर त्यांना दैवी उपायही सुरू केले. हे आपल्या भारतीय मानसिकतेशी मिळतं-जुळतंच होतं. (आजही काही फार फरक पडलाय असं मला वाटत नाही. उलट आताची जनता देव आणि देवापेक्षा बाबा-बापू-माॅ-अम्मा इत्यादी देवांच्या एजंटांवरही जास्त विश्वास दाखवू लागली आहे. अर्थात, आता लोक जाहिरपणे तसं दाखवत नाहीत एवढाच काय तो फरक. अर्थात तेंव्हा प्राणिकपणाची मात्रा आताच्या तुलनेत जास्त होतीच म्हणा).

तज्ञांच्या टिम्सने डाॅ. वेगासचं निदान बरोबर असल्याचं जाहिर केल्यावर, सरकार कामाला लागलं. त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर असणाऱ्या सॅंडहर्स्ट यांनी वाल्डेमार हाफकीन यांना मुंबईत पाचारण केलं. हाफकीन ह्यांनी काही काळा पूर्वीच कलकत्त्यात पसरलेल्या काॅलऱ्याच्या साथीवर प्रभावी लस शोधली होती आणि त्यांनी आता मुंबईच्या प्लेगवरही लस शोधावी म्हणून त्यांना मुंबईत पाचारण करण्यात आलं होतं. हाफकीन यांना जेजे हाॅस्पिटलात एक प्रयोगशाळा उपलब्ध करुन देण्यात आली आणि तिथे त्यांचे प्लेगवर लस शोधण्याचे प्रयोग सुरू झाले.

इकडे प्रशासनाच्या पातळीवर शहरातील अस्वच्छता दूर करण्याची, घराघरात जाऊन सर्वांची तपासणी करण्याची धडक कारवाई सुरू झाली होती. रस्ते, गटारं, गोदाम यांतील अस्वच्छता निर्मुलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. पोलीसी बळावर तपासणी सुरू झाल्याने लोक चिडू लागले होते. असंतोष वाढत चालला होता. प्रशासन आपल्या भल्यासाठीच हे करत आहे, हे लेक समजून घेत नव्हते. याला कारणं दोन. एक म्हणजे, अस्वच्छतेमुळेच हा रोग झपाट्याने पसरला आहे, हे लोकांना पटत नव्हतं आणि दुसरं कारण त्याकाळच्या ब्रिटिश सरकारविषयीचा असंतोष आणि आपण पारतंत्र्यात असल्याची जनतेची भावना.

तिकडे पुढच्या चार-पांच महिन्यांत (काही ठिकाणी जानेवारी १८९७ असाही उल्लेख आहे, पण लस शोधण्यासाठी चार-पांच महिन्यांचा कालावधी लागला असावा, असा माझा अंदाज) हाफकीनला प्लेगवरची लस शोधण्यात यश आलं होतं, परंतु त्या लशीची विश्वासार्हता तपासायची होती. मानवी शरिरावर ह्या लशीचे काय परिणाम-दुष्परिणाम होऊ शकतात, ते पाहिल्याशिवाय लस बाजारात आणता येणार नव्हती.

अशावेळी स्वत:वर प्रयोग करणे हा उपाय असतो, पण तो विश्वासार्ह मानता येत नाही. त्यासाठी आणखी काही माणसांची आवश्यकता होती. म्हणून भायखळा तुरुंगातील कैद्यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर, हाफकीन वाळकेश्वरला ज्या बंगल्यात राहात होता, तिकडच्या शेजारची एक महिला आणि तिच्या मैत्रिणी स्वखुशीने पुढे आल्या. ती शेजारीण होती फ्लोरा ससून..! मुंबईचे प्रसिद्ध ज्यू व्यापारी, ससून डाॅकचे निर्माते अब्दुल्ला उपाख्य सर अल्बर्ट ससून यांची नात. अवघ्या चाळीसएक वर्षाची होती ती तेंव्हा..!!

लशीची चाचणी झाली आणि प्लेगनिर्मुलनासाठी वाल्डेमार हाफकीनने शोधलेली लस उपयोगी येते हे सुद्ध झाल्यावर, ती लोकांना टोचण्याची मोहिम हाती घेतली. परंतु प्रचंड धार्मिक श्रद्धा-अंधश्रद्धा, डाॅक्टरी उपायांवरचा संशय इत्यादी कारणांमुळे ही लस टोचून घेण्यास तयार नव्हते. मग सरकारने जे करायला हवं होतं, तेच केलं. पोलिसी बळाचा वापर सुरू केला. जशी साफसफाईची मोहिम पोलीसी मगतीने हाती घेण्यात आली होती, त्याचप्रमाणे लस टोचणीचाही मोहिम हाती घेण्यात आली होती. लोकांमधे प्रचंड असतोष माजला होता, पण सरकारने तिकडे अजिबात लक्ष न देता आपली मोहिम फत्ते केलीच..

त्यातून पुढे काय (आणि काय काय) घडलं, हे आपण सर्वच जाणतो..!

आता जगभरात पसरत असलेली ‘करोना’ची साथीचे परिणाम पाहून, मला मुंबईच्या इतिहासाचं वाचन करताना वांरवार समोर येत गेलेल्या, इसवी सनाच्या १८९६ मधे मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीची आठवण झाली. लहानमणी जाणत्यांकडुनही ह्या प्लेगच्या आठवणी ऐकलेल्या मला आठवतायत. त्याच बरोबर आता सरकार ज्या तऱ्हेने ‘करोना’च्या साथीचा मुकाबला करण्यासाठी जशी पावलं उचलत आहे, तसेच प्रयत्न त्या वेळच्या ब्रिटिश सरकारने केले असल्याचं वाचल्याचं आठवलं. अगदी शब्दही तेच. आज वापरले जात आहेत, तेच. आयसोलेशन, क्वारंटाईन, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी, घराघरांत जाऊन लोकांची तपासणी. रोगी आणि बाधित लोकांचं फोर्स्ड इव्हॅक्सुएशन आणि डिटेन्शन. आज महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे लोक ज्या प्रकारे सोसायट्या-सोसायट्यांची तपासणी करत आहेत, तशीच. फक्त फरक एकच, त्या वेळी ही तपासणी पोलीस करत असत..! लोकांचं आपापल्या गांवाकडे, सुरक्षित जागांकडे पलायन करणंही अगदी आतासारखंच. प्रचंड घाबरले होते लोक तेंव्हाही.

सरकार आपल्या सुरक्षेसाठीच ही व अशी पावलं उचलत आहे आणि त्या प्रयत्नांना संपूर्ण सहकार्य करणं हे आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. १८९६चं सरकार हे आपलं शत्रू होतं, तर आताचं सरकार आपलं हितचिंतक आहे, मग ते कोणत्याही पक्षाचं असो, हे आपल्यापैकी प्रत्येकाने स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्याही मनावर आपण बिंबवायला हवं..!

त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धांना मनात आणि सामाजिक माध्यमांवरील भक्तीरसाने ओथंबलेल्या संदेशाकडे अजिबात थारा देऊ नये..! ह्यावर विज्ञानच उत्तर शोधणार आणि ते हा लवकरच शोधणार, याची मनात खात्री बाळगावी. तोवर स्व-संयम हाच उपाय आहे..!! सरकारला बळाचा वापर करायची वेळ येऊ देता कामा नये.

सोबत सन १८९७ चा मुंबई शहराचा एक नकाशा देत आहे, त्यात माहिम येथे सरकारने सुरू केलेला ‘क्वापंटाईन कॅम्प’ स्पष्ट दिसेल. त्यावेळी माणसं रेल्वे आणि बोटींने प्रवास करत आणि माहिम हे मुंबई शहराचं उत्तरेकडील प्रवेशद्वार असल्याने, तिथे अशी सोय करण्यात येणं, हे सहाजिकच होतं..!

-©️नितीन साळुंखे

21.03.2020

9321811091

संदर्भ-

१. ‘मुंबई नगरी’- लेखक प्रा. नरहर रघुनाथ फाटक, १९८१

२. ‘स्थल-काल’- लेखक डाॅ. अरुण टिकेकर, २००४

३. ‘Plague in Bombay; response of Britain’s Indian subject to clolonial intervention’- श्रीमती नताशा सरकार यांचा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या निबंधातील काही भाग.

४. श्रीमती शांता गोखले यांच्या ‘शिवाजी पार्क’ या पुस्तकावर आधारीत इंटरनेटवरील लेख.

५. ‘मुंबैसंगे आम्ही (बि)घडलो’-लेखक डाॅ. सुधाकर प्रभू, २०१०

६. विकिपेडीया-

फोटो सौजन्य इंटरनेट

देश-परदेशातील माझ्या वाचकांनो..

देश-परदेशातील माझ्या वाचकांनो.. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नवीन प्रयोग होतोय. जिल्ह्यातील आयडियाबाज युवक-युवतींसाठी, आम्ही सुरु  करत असलेल्या नवीन पायवाटेची माहिती देणारा हा खालचा उतारा लआपण लक्षपूर्वक वाचावा आणि आपल्या काही सूचना आणि कल्पना असल्यास, मला माझ्या  93218 11091 ह्या फोनवर अवश्य कळवाव्यात. 

सिंधुदुर्गातील ‘आयडियाबाज’ नवयुवक आणि नवयुवतींनो..

व्यवसायाची काहीतरी नविन कल्पना राबवू इच्छिणाऱ्या सिंधुदुर्गातील नवयुवक आणि नवयुवतींनो, हे👇लक्षपूर्वक वाचा. ही संधी आहे तुमच्या कल्पकतेला. तुमच्या जिद्दीला आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना..

चला, भविष्य घडवा. स्वत:चं, आपल्या जिल्ह्यातं आणि अवघ्या कोकणचही..

तुमच्यासाठी #कणकलीत_सुरू_होतंय_टेक्नाँलाँजी_बिझनेस_इनक्युबेशन_सेंटर’..!

‘टेक्नाँलाँजी बिझनेस इनक्युबेशन सेंटर’ म्हणजे काय?

१. काही अतिशय छोट्या कल्पना योग्य वातावरण मिळाल्यास मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतात व त्याला एखाद्या मोठ्या उद्योगाचे रूप येते, हे आपण पाहतो. मात्र योग्य वेळीच अशा कल्पनांना इतर आवश्यक घटकांचे सहाय्य मिळणे आवश्यक ठरते. अशा नाविन्यपूर्ण कल्पना किंवा इनोव्हेटिव्ह आयडीयाज प्रत्यक्षात येण्यासाठी पैसा, प्रयोगशाळा, यंत्रसामुग्री, व्यवस्थित कॉर्पोरेट ऑफिस स्ट्रक्चर, कायदेशीर माहिती अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. ही आवशयकता पुरविण्याचे काम या *टेक्नाँलाँजी बिझनेस इंक्युबेशन सेंटर* मार्फत करण्यात येते. जशी नवजात अशक्त बालकाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ‘इनक्यूबेटर’ची आवश्यकता असते. त्याच पद्धतीने एखादी अभिनव नवजात कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी जी यंत्रणा मदत  करते, तिला *टेक्नाँलाँजी बिझनेस इनक्युबेशन सेंटर* म्हणतात.

२.अशा कल्पनानाच स्टार्ट अप म्हणतात व त्यांना सरकारचे भरीव अर्थसहाय्य व इतर स्कीमची मदत मिळण्यासाठी *टेक्नाँलाँजी बिझनेस इनक्युबेशन सेंटर* हा राजमार्ग ठरतो.

३. या सर्व गोष्टींची गरज ओळखुन *एस एस पी एम टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन सेंटरची* स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. स्थानिक आमदार श्री. नितेश नारायण राणे ह्यांनी ही संपूर्ण कल्पना मुळापासून समजून घेऊन, इथल्या युवा वर्गासाठी व नवीन काहीतरी करू इच्छिणाऱ्या भावी उद्योजकांसाठी ‘सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळा’च्या माध्यमातून *एस एस पी एम टेक्नॉलॉजी बिजनेस इनक्युबेशन सेंटर* सुरु करण्याचे धाडसी पाऊल उचललं आहे. यासाठी त्यानी स्वतःच्या शैक्षणिक संस्थेतील 14 ते 15 हजार चौरस फुटांची जागा सर्वप्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा स्वखर्चाने उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ह्या सोयी-सुविधांचा  वापर सिंधुदुर्गातील  नवउद्योजकांनी करून आंपल्या कल्पनेतील ‘उद्योगी बाळां’ना वाढवायचं आहे. 

४. फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल अशा शैक्षणिक संस्थां न उभारता, त्याहीपुढे जाऊन *टेक्नाँलाँजी बिझनेस इनक्युबेशन सेंटर* साठी विचार करणे ही फार दूरदृष्टीची गोष्ट आहे  कारण यातून स्वतःसाठी शून्य फायदा असतो, परंतु नवीन काहीतरी करू पाहणाऱ्या कोकणातील असंख्य तरुणानां ह्या गोष्टीचा प्रचंड मिळणार असतो. इथला तरुण, शिक्षित वर्गाने काही हजारांची फुटकळ नोकरी करण्यासाठी आता इतरत्र स्थलांतर न  करता, *टेक्नाँलाँजी बिजनेस इनक्युबेशन सेंटर*चा चा फायदा उचलून, इथे राहूनच काहीतरी व्यवसाय करावा, अशी मनीषा हे केंद्र सुरु करण्यामागे आहे. 

५. ह्या *एसएसपीएम टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन सेंटर* ची वैशिष्ट्य खालील प्रमाणे सांगता येतील.

६.आज पर्यंत ची सर्व केंद्र शहरी भागातच झाली आहेत कोकणासारख्या ग्रामीण भागात असं सेंटर प्रथमच उभारले जात आहे.  *मेकॅनिकल, बायोटेक, एग्रीटेक, आणि आयटी इंडस्ट्री डेव्हलप व्हावी, हा या टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन सेंटर* चा प्रमुख उद्देश आहे. कोकणात बुद्धिमत्तेची कमी नाही. एकूण ‘भारतरत्न’पैकी सहा भारतरत्न कोकणातील आहेत. या बुद्धिमत्तेला योग्य पद्धतीने वाव देणारा हा उपक्रम आहे. प्रभावी कल्पनांसाठी किंवा ज्याला स्टार्टअप म्हटलं जातं अशा कंपन्यांसाठी सरकारी मदत ही केवळ *टेक्नाँलाँजी बिझनेस इनक्युबेशन सेंटर* मार्फतच दिली जाते. त्यामुळे अशा *टेक्नाँलाँजी बिझनेस इनक्युबेशन सेंटरची* कोकणाला नितांत आवश्यकता होती.

७.सुरुवातीच्या सीड फंडिंग नंतर एंजल इन्वेस्टर किंवा व्हेंचर कॅपिटलिस्ट मिळण्यासाठी हे एक महत्त्वाचे माध्यम किंवा व्यासपीठ ठरते. कोकणातील बेरोजगारीवर मात करताना इथल्या तरुण व युवा वर्गाच्या बुद्धिमत्तेला इथेच वाव मिळावा व त्यांचे स्वतःचे उद्योग येथेच उभारले जावेत ह्या साठी *टेक्नाँलाँजी बिझनेस इनक्युबेशन सेंटर* महत्त्वाची भूमिका पार पाडते.

८. या *टेक्नाँलाँजी बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या* माध्यमातून पारंपरिक चालत आलेल्या रोजगाराच्या पुढे जाऊन तंत्रज्ञानाच्या साथीने जिल्ह्याचा विकास पर्यायाने राज्याचा व देशाचा विकास गाठण्याचे उदिष्ट आहे.

९. आधुनिक युगात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संशोधन क्षेत्रात इनोव्हेशनची संकल्पना राबवावी लागणार आहे. ईन्होवेशन, इनक्युबेशन व स्टार्टअप ही त्रिसूत्री आज जगभर राबविली जाते.त्यातूनच नवीन पेटंट्स,उद्योग निर्माण होत असतात. भारतात नाविन्यपूर्ण संशोधनाचं बीज रोवण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असल्यामुळे, देशातील तरूण संशोधकांना हेरून, त्यांच्यातील सृजन शक्तीबरोबर स्थावीभाव असलेल्या धाडसाची जोड दिल्यास त्यातून नाविन्यपूर्ण संकल्पना साकार होत असल्यामुळे या युवावर्गाला योग्य दिशा देण्याचे कार्य जनजागृतीतून करावे लागणार आहे.

चला तर मग, कामाला लागा..
आणि भविष्य घडवा..
स्वत:चं अन् जिल्ह्याचंही
नोकऱ्या मागू नका,
नोकऱ्या देणारे व्हा..!!

-नितीन साळुंखे
9321811091

#अधिक माहितीसाठी संपर्क साधा-
श्री. राजेन्द्र गांगण @ +91 90292 96912

चि. सौ. कां.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त..

चि. सौ. कां.

सध्या लग्नांचा सिझन चालू आहे..पत्रिका छापताना मुलासाठी केवळ ‘चिरंजीव’ आणि मुलीसाठी चिरंजीव ‘सौभाग्यकांक्षिणी’ असं लिहिलं जाताना आपण वाचलं असेल. हे असं लिहिणं प्रथेचा भाग म्हणून ते वाचून सोडूनही दिलं असेल. परंतू असा भेद का, हा प्रश्न कुणाला कधी पडतो असं मला वाटत नाही..चिरंजिवित्व आणि चिरतरुणत्व तर प्रत्येकालाच हवं असतं हे खरंच आहे. मग पत्रिकेत ते फक्त मुलालाच का आणि मुलीसाठी ‘सौभाग्यकांक्षिणी’ असा वेगऴा शब्दप्रयोग का, असा प्रश्न मला पडला..अर्थात माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ असल्याने, हा वेळ घालवण्यासाठी असले काहीतरी प्रश्न मला पडत असतात..जगण्याच्या संघर्षात अशा प्रश्नांचा काहीच उपयोग नसतो हे मला कळतं, पण मला अश्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन पुढेही जाता येत नाही हे ही खरंय..

हल्ली सगळंच बदललं असलं तरी मराठी लग्नपत्रिकेवरच्या मुलीचा उल्लेख मात्र ‘चि.सौ.कां’ असाच केला जातो. असं का, या प्रशाचं उत्तर शोधायचं, तर आपल्या प्रचिन समाजातील समजुतींचा विचार करावा लागतो.

पुढे जाण्यापुर्वी ‘चि. सौ. कां’ या शब्दांतील प्रत्येकाचा शब्दश: अर्थ काय ते पाहावं लागतं. ‘चि.’ हा शाॅर्टफाॅर्म ‘चिरंजीव’ या शब्दाचा अाहे, ज्याचा अर्थ ‘मरण, अंत किंवा शेवट नसलेला/नसलेली’ असा होतो. आणि शेवटच्या ‘कां.’ या शब्दाचा फुसफाॅर्म ‘कांक्षिणी’ असा होतो, ज्याचा अर्थ ‘इच्छा बाळगणारी’ असा होतो. आता राहीला मधला शब्द, जो अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे ‘सौभाग्य’. ‘सौभाग्य’ या, विशेषत:य स्त्रीच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा नेमका अर्थ लक्षात घेतल्यास, पत्रिकेतील ‘चि. सौ. कां’ या शब्दांचा अर्थ उलगडतो आणि तो मुलींसाठीच का वापरला जातो याचा अर्थही कळतो..

‘सौभाग्य’ हा शब्द ‘सु+भग’ या दोन शब्दांवरून तयार झाला आहे. यातील ‘सु’ हा शब्द चांगलं, उत्तम या अर्थाने आला आहे. आणि ‘भग’ हा शब्द? तर, ‘भग’ या शब्दाचे विविध अर्थ सापडतात. ‘भग’ म्हणजे सुख, वैभव, सुदैव इ. आणि या सगळ्यांसाठी आपण ‘भाग्य’ हा एकच शब्द वापरतो. ‘भाग्य’ हा शब्द ‘भग’या शब्दाचं एक रुप आहे. आपण सर्वच जण काही चांगलं घडलं, की ‘हे माझं सौभाग्य’ असं म्हणतो. मुलगी लग्न होऊन चांगल्या घरी गेली आणि ती सुखात नांदू लागली ती सौभाग्यशाली आहे असं म्हणतात, तसंच मुलाला चांगली बायको मिळाली तरी तोही सौभाग्यशाली आहे असंच म्हणतात. थोडक्यात भाग्य या अर्थाने वापरला जाणारा ‘भग’ हा शब्द स्त्री आणि पुरूष या दोघांसाठी एकाच अर्थाने वापरला जातो. याला इंग्रजीत ‘लक’ किंवा ‘फाॅर्च्यून’ असा प्रतिशब्द आहे.

‘भग’ या शब्दाचा दुसरा अर्थ मात्र फक्त मुली-स्त्रीयांसाठी वापरला जातो आणि या अर्थाचाच लग्न पत्रिकेतील ‘चि.सौ.कां.’शी जास्त नजिकचा संबंध आहे.

‘भग’ या शब्दाचा दुसरा अर्थ आहे ‘स्त्री जननेंद्रीय’ किंवा इंग्रजीत ‘Vagina’..! बहिणीसाठी किंवा इतर समवयस्क स्त्रीचा उल्लेख करताना वापरला जाणारा ‘भगिनी’ हा शब्दही याच ‘भग’चं एक रुप आहे. आता ‘सु-भग’ या अर्थाने लग्नपत्रिकेत येणारा ‘सौभाग्य’ या शब्दाचा अर्थ लाॅजिकने तुम्हालाही उलगडेल..

लग्नाला आपण काहीही नांव दिलं आणि त्यातून काहीही अर्थ काढला, तरी एक त्यातून एकच गोष्ट ध्वनित होते, ती म्हणजे त्यातून समाजाला मान्य असलेले ‘शरीरसंबंध’ प्रस्थापित होणे. पूर्वीच्या लग्नपत्रिकेत विवाह, लग्न असे गोड शब्द नसायचे, तर त्यासाठी ‘शरीरसंबंध’ असा रोकडा शब्द चक्क छापला जायचा हे अनेकांना माहित असेल. कारण लग्नामुळे होतात ते शरीरसंबंधच..!!

लग्नानंतर त्या लग्न झालेल्या मुला-मुलीत शरीर संबंध प्रस्थापित होतात, मग फक्त मुलीचाच उल्लेख ‘सौभाग्य कांक्षिणी’ असा का केला जातो याचा उलगडा करायचा, तर आपल्या समाजाच्या नियमांकडे आणि संकेतांकडे पाहावं लागतं. आपल्या समाजाने स्त्रीला विवाहापूर्वी आणि वैधव्यानंतर पुरुषसंबंध नाकारलेला आहे. मुलीचे शरीरसंबंध विधीवत लग्नानंतरच व्हावेत असा संकेत आहे. पुरुषावरही अशी बंधने असली, तरी ती पाळली जात नाहीत आणि जरी पुरुषांने अशी बंधने तोडली तरी त्याकडे गांभिर्याने पाहिलं जात नाही. ही सुट स्त्रीला नाही. ‘आपल्या लग्नानंतर आपल्याला आपल्या नवऱ्याकडून(च) अखंड शारीरिक सुख मिळो ही आकांक्षा बाळगणारी ती चिसौकां’..!

जे जननेंद्रीय नवऱ्याचं सुख मिळण्यास पात्र आहे ते ‘सुभग’ एवढाच याचा अर्थ नाही. तर हे सुख कशासाठी, तर त्यातून अपत्य प्राप्ती होवो हा त्यामागचा सर्वात महत्वाचा अर्थ आहे. वयात आलेली कोणतीही स्त्री, तिचा पुरुषाशी आलेल्या संबंधानंतर अपत्य प्रसवण्यास समर्थ असते. मात्र आपल्या समाजनियमांनुसार स्त्रीचे असे पुरुष संबंध -ते ही नवऱ्यासोबतचे आणि तत्पश्चातची अपत्य निर्मिती-ती ही नवऱ्याकडूनच, ही फक्त वैध मानली जाते. स्त्रीचे नवऱ्याव्यतिरिक्तच्या पुरुषांशी आलेले संबंध अनैतिक मानले जाता आणि त्यातून होणारी अपत्यप्राप्ती अनौरस. लग्नाचं प्रयोजन एवढ्यासाठीच. ‘लग्नानंतर स्त्रीची कुस सदैव हिरवी राहो’ किंवा ‘सदा सुहागन रहो’ किंवा ‘दुधो नहावो फुलो फलो’ किंवा ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ हे आशीर्वाद किंवा शुभेच्छा म्हणजे स्त्रीला सतत अपत्यप्राप्ती होवो किंवा तिचं ‘भग’ सतत संततीक्षम राहो हिच इच्छा प्रदर्शित करत असतात..विधवा स्त्रीला किंवा लग्न न झालेल्या कुमारीकेला आपल्या समाजात मान नाही तो या ‘सु-भगा’मुळेच..! कारण अशा स्त्रीयांना पुरुषसुख आणि नंतरची अपत्यनिर्मिती नाकारली गेली आहे.

पतिसुख शेवटपर्यंत मिळो आणि तीचं ‘भग’ शेवटपर्यंत ‘सु’फल राहो अशी इच्छा बाळगणारी ती ‘सौभाग्यकांक्षिणी’. शेवटी लग्नाचा हेतूच स्त्री-पुरुषांच्या शारीरिक गरजांची पूर्ती व्हावी आणि त्यातून अपत्य निर्मिती व्हावी आणि समाजाता गाडा चालत राहावा हा आहे. जी विवाहित स्त्री अपत्य जन्माला घालते तिच्याकडे पाहाण्याची समाजाची दृष्टी कौतुकाची असते, तर जी स्त्री विवाहित असुनही अनेक कारणांमुळे अपत्य जन्माला घालू शकत नाही, तिच्याकडे हेटाळणीने पाह्यलं जात. कुमारी माता, बलात्कारामुळे मातृत्व आलेल्या मुली किंवा विधवेचं मातृत्व आजही तिरस्काराचं धनी होतं, मग त्यात त्यांची चुक असो वा नसो..!

लग्न जुळवताना आजही मोठ्या प्रमाणावर मुला-मुलिंच्या जन्मपत्रिका जुळवल्या जाता. दोघांच्या पत्रिकेतील गुण जुळत नसल्यास विवाह करु नये असा संकेत आहे. पत्रिकेतील गुणमेलन हा प्रकार, पत्रिकेतला मंगळ विचार आणि लग्नानंतर स्त्री धारण करत असलेले मंगळसूत्र या गोष्टी संपूर्णपणे स्त्रीच्या शरिरसंबंधांचा आणि त्यातून होऊ शकणाऱ्या अपत्य निर्मितीचाच विचार करतात..!!

अर्थात आता बदललेल्या परिस्थितीनुसार स्त्री-पुरुष संबंधात मोकळेपणा येत चालला आहे. शिक्षणामुळे, टेक्नीॅलाॅजीमुळे समाजाचे हे नियमही आता ढिले होत चाललेत. स्त्री-पुरष आता एकाच पातळीवर आल्यात जमा आहेत. स्त्रीला इच्छा असल्यास ती लग्नाशिवाय आणि पुरुषशिवायही अपत्य जन्माला घालू शकते किंवा आवडत्या पुरुषाबरोबर लग्न न करताही त्याच्यापासून अपत्य निर्मिती करु शकते. जुन्या काळातली नीना गुप्ता ह्या अभिनेतेत्रीने अशा संबंधातून मसाबा या मुलीला जन्म दिलाय. अर्थात तिने केलेलं धाडस त्याकाळाच्या खुप पुढे होतं पण आता तसं झाल्यास काही आश्चर्य वाटणार नाही.

वर केलेलं विवेचन आताच्या काळात लागू आहे की नाही याचा विचार करणं हा या लेखाचा उद्देश नाही, तर तो तेंव्हा का आला हे सांगणं हा मुळ उद्देश आहे. चुल सांभाळणं, नवऱ्याला सुखी ठेवणं आणि मुलांना जन्म देण येवढ्यातच स्त्रीचं भाग्य सामानवलेलं आाहे असं समजण्याच्या काळातला हा शब्द आहे. माझा हा लेख लग्नपत्रिकेतील ‘चिसौकां’ या त्रिअक्षरी शब्दाचं अस्तित्व तिथं का आलं, हे सांगणारा आहे आणि हा लेख त्या काळाच्या संदर्भातच वाचावा.

माझं वैयक्तिक मत असं, की आता बदलत्या काळानुसार विवाह पत्रिकेवर लग्नाळू मुलगा-मुलगी अशा दोघांसाठीह ‘चिरंजीव’ म्हणायला हरकत नाही. ‘सौभाग्यकाक्षिणी’ हा शब्द आपल्या त्यावेळच्या सामाजीक परिस्थितीचा निदर्शक आहे, त्याला आधुनिक काळात तसा काहीच अर्थ आता राहीलेला नाही. तरीही गतकाळाची आठवण म्हणून तो तसा राहायलाही हरकत नाही, कारण तो कालबाह्य झालेला असला तरी, तो केवळ एक शब्द नाही, तर आपल्या समृद्ध प्रथा-परंपरांचा गतकाळचा प्रतिनिधी आहे..

-@नितीन साळुंखे, मुंबई
9321811091

जन्मकुंडलीतील ‘मंगळ’दोष व नाहक अडलेली लग्न..!

जन्मकुंडलीतील ‘मंगळ’दोष व नाहक अडलेली लग्न..!

जन्मकुंडलीतील ‘मंगळ दोष’ अनेक गुणी मुला-मुलींच्या लग्नात आडवा येतो व अशा लग्नाळू मुला-मुलींचे लग्न काही ठोस कारण नसताना रखडते. मुळात हा खरोखरच एक अशुभ दोष असतो का, तर याचे माझे उत्तर नाही असेच आहे. आपल्या सर्वांच्याच पत्रिकेत इतर ग्रहांप्रमाणेच मंगळ हा ही एक ग्रह असतो. पण १,४,७,८ व १२ या स्थानात मंगळ असल्यास तो ‘मंगळ दोष’ मनाला जातो व तो हटकून लग्नाला आडवा येतो.

मंगळाच्या मुलाचे लग्न मंगळ असलेल्या मुलीशीच होणे आवश्यक मानले जाते. ते तसे झाले नाही तर त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीतरी अशुभ घडते या श्रद्धेपायी – खरं तर अंधश्रद्धेपायी- अशा मुला-मुलींची, एकमेकांना सर्वार्थाने अनुरूप असूनही, लग्नं होत नाहीत किंवा घरातल्यांच्या रेट्यामुळे होऊ दिली जात नाहीत. यात अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत व गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच प्रकारच्या माणसांचा समावेश आहे.

काय असतो हा मंगळ दोष, तो असुनही लग्न केल्याय काय परिणाम होतो किंवा कसे यावर आपण सुशिक्षित लोकांनी डोळसपणे विचार करण्याची वेळ आता आलीय..!

माझा अनुभव सांगतो की मंगळाची पत्रिका म्हणजे १,४,७,८ व १२ या स्थानात मंगळाचं अस्तीत्व असणा-या व्यक्ती, स्त्री किंवा पुरूष, आपल्या भावना वा वासनांच्या बाबतीत अतिशय तीव्र किंवा आग्रही असतात. यांना ‘पेशन्स’ नसतात आणि पेशन्स नसलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत जे जे घडू शकते ते ते आणि तेवढेच मंगळ व्यक्तींच्या बाबतीत घडू शकते. यात मंगळाचा ग्रह म्हणून काहीही दोष नसतो.

मंगळ तशा अर्थाने बघायला गेलं तर एकप्रकारचा शुभ ग्रहच मानायला हवा. मंगळ म्हणजे अमाप उत्साह, जोश, ताकद..! मंगळ म्हणजे बाॅर्न लिडर..! मंगळाच प्रेमही धुसमुसळं असतं..! मंगळाला हळुवारपणा, चर्चा, लाडे-लाडे बोलणं वैगेरे हिन्दी सिनेमातल्या हिरोंप्रमाणे वागणं जमत नाही..!
मंगळ म्हणजे जातीवंत लढवय्या ! अन्यायाचा प्राणपणाने प्रतिकार..! न पटणारी गोष्ट कोणत्याही परिस्थितीत करणार नाहीत. एखादा गुंड मंगळाच्या प्रभावाखाली असू शकतो तसाच एखादा निष्णात सर्जनही..! मंगळाचे हे गुणधर्म आपल्या सर्वांच्याच कुंडलीत असतात पण ज्यांना मंगळ आहे असे म्हटले जाते त्या व्यक्तीत या क्वालिटी उठावदारपणे असतात एवढंच !

खरतर या विषयावर विस्तृतपणे लिहीण्यासारखं आहे पण इथे एवढच सांगू इच्छितो की जन्मपत्रीकेत असलेला मंगळदोष फारसा विचारात घेतला जाऊ नये. फक्त एवढंच लक्षात ठेवावं की, या ‘मंगळी’ व्यक्तींची वागण्याची त-हा खुप स्ट्रेट असते. ते नालायकाला थेट नालायकच म्हणणार, उगाच शब्दांचा घोळ घालत बसणार नाहीत. त्यांचं प्रेम आणि राग, दोनीही अतिशय तीव्र पण मनापासून असतं. त्यांना रोमॅंटीक होणं जमत नाही. ‘मंगळ्यां’चा हा स्वभाव नीट समजून घेतला तर या व्यक्ती पत्नी व नंतर कुटुंबीयांसाठी अतिशय प्रोटेक्टीव्ह ठरू शकतात.

‘मंगळ’वाल्या व्यक्तीला दुसरी ‘मंगळ’वालीच व्यक्ती समजून घेऊ शकते, या विचारातून मंगळयुक्त पत्रीकेची जुळणी मंगळयुक्त पत्रीकेशी करावी असा आग्रह धरला जातो. मंगळाचं धुसमुसळं रांगडं प्रेम, रोखठोक बोलण्याचा स्वभाव,गाडी ८०-१०० पेक्षा कमी वेगाने चालवणे गुन्हा आहे हा विश्वास, चर्चेने प्रश्न सुटू शकतो यावरचा प्रचंड अविश्वास, पटलेली गोष्ट कोणाचाही -अगदी स्वत:च्या जीवाचाही- मुलाहीजा न ठेवता करणे या गोष्टींमागील एक निरोगी व नि:स्वार्थी मन लक्षात घेतल्यास ‘मंगळ’ पत्रीकेएवढी लग्न करण्यास योग्य दुसरी पत्रीका नाही. हे विधान मी अतिशय जबाबदारीने करत आहे. मी नुसतं सांगत नाहीत तर ज्योतिषी या नात्याने मी जवळच्या नातेवाईकांची लग्न करण्यास पुर्ण जबाबदारीने अनुमती दिलेली आहे व अशा जोडप्यांचे संसार आजतागायत व्यवस्थीत चालू आहेत..!!

आता मंगळ व्यक्तीने मंगळ नसलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यास काय अशुभ घडू शकतं? तर, मंगळाचा दे-धडक मेंढा स्वभाव न समजल्याने मग त्या नवविवाहतांमध्ये खटके उडू लागतात. वर म्टल्याप्रमाणे मंगळाचा शांतपणे चर्चा याप्रकारावर विश्वास नसल्याने हे गडी वा बाई थेट लढाईच्या मैदानात उतरतात. हे विवाह बंधन काही काळाने त्या दोघानाही नकोसं वाटू लागतं व शेवट त्यांनी विभक्त होण्यात होऊ शकतो.

या व्यक्तींचा जोडीदार त्याच्यासारखाच ‘मंगळ’ असेल तर दोघेही लढतात, भांडतात, प्रसंगी मारामारीही करतात व काही वेळाने तेवढं जोरात प्रेमातही येतात. मंगळ असलेल्या व्यक्तींनी बीन मंगळाच्या वा मंगळ नसलेल्यानी मंगळाच्या पत्रीकेशी लग्न करण्यास कोणतीही हरकत नाही मात्र मंगळाचा ‘लाल’ स्वभाव समजून घ्यावा..! तर मग हे लग्न काकणभर जास्तंच यशस्वी होऊ शकतं. अशा विवाहांमध्ये बीन मंगळाच्या व्यक्तीने थोडासा जास्त समजूतदारपणा दाखवणं गरजेचं असतं.

शेवटी लग्न म्हणजे काय तर दोन व्यक्तींनी एकमेकावा समजून घेत आयुष्याचा मार्ग काटणे. जोडीदारांतील बेटर अंडरस्टॅण्डींग प्रत्येक लग्न टिकण्यासाठी अत्यावश्यक असतो,

मंगळाला नाहक बदनाम करण्यात काही अर्थ नाही..नाहीतरी लग्न झाल्याची निशाणी म्हणून ‘मंगळयूत्र’ घालता ना, गणपतीचे ‘मंगल’ रूप प्रसन्न व्हावे म्हणून मंगळवारी आणि अंगारिकेला कडक उपवास करता, मग थेट ‘मंगळ’च गळ्यात घालून घेण्यास काय हरकत आहे..?

-नितीन साळुंखे
9321811091