सन १८९६ ला मुंबईत पडलेली प्लेगची साथ आणि ती निवारणाचे सरकारी प्रयत्न..!

सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेली ‘कोरोना’ची साथ आणि तिच्याशी लढण्यासाठी सरकारचे सर्व पातळ्यांवर चाललेले प्रयत्न पाहून, मला १८९६मधल्या मुंबईतल्या प्लेगच्या आणि त्याकाळातील सरकारने त्यावर केलेल्या अशाच उपाययोजनांच्या आठवणी जागवण्याचा हा एक प्रयत्न..

मुंबईतील ऐकिहासिक पाऊलखुणांचा मागोवा- लेखांक ३९वा

सन १८९६ ला मुंबईत पडलेली प्लेगची साथ आणि ती निवारणाचे सरकारी प्रयत्न..!

१८९६च्या आॅगस्ट-सप्टेंबरच्या महिन्यांच्या दरम्यान मुंबईच्या मांडवी परिसरातली माणसं अचानक ताप येऊन मरायला लागली होती. काय होतंय हे समजायच्या आतच, ही मृत्यूची लाट भराभर पसरत नजिकच्मायाच नागपाडा, डोंगरी, कामाठीपुरा पासून थेट गिरगांवपर्यंत मृत्यूनं थैमान घातलं होतं. साधा ताप येऊन माणूस झोपयचा आणि उठायचा तो काखेत गाठ घेऊनच आणि काही उपचार मिळायच्या आतच, सहा-सात दिवसांच्या कालावधीत तो निजधामास जात असे. माणसं अशी मोठ्याप्रमाणावर मृत्युमुखी पडत असताना, हे कशामुळे होतंय, त्यामागची कारणं काही कुणाला सापडत नव्हती. काही कळायच्या आतच, पाहाता-पाहाता मृत्युची पकड नजिकच्या नागपाडा, कामाठीपुरा, डोंगरी करत करत गिरगांवातल्या खेतवाडी-फणसवाडी-भुलेश्वरपर्यंत पोहोचली. सर्वच हवालदील झाले होते. थातुरमातूर उपचार-गंडेदोरे-तावित वैगेरे उपाय करुन झाले होते, पण मरण काही लांबत नव्हतं आणि थांबतही नव्हतं.

दक्षिण मुंबईतला हा मांडवी परिसर पुर्वीपासूनच दाट लोकवस्तीच्या. आजही तो तसाच आहे. नानाप्रकारच्या व्यवसायाचा. ‘मांडवी’ शब्दाचा अर्थ, ‘कस्टम हाऊस’ किंवा कर भरण्याचंकार्यालय. पूर्वीच्या मुंबईतला व्यापार आणि मालाचीआवक-जावक आणि वितरण याच परिसरातून चालतअसल्याने, सरकारी कर भरण्याची चौकी इथे असल्याने,या परिसराला मांडवी असं नांव मिळालं आणि आजही ते कायम आहे. तर या परिसरात सर्वच प्रकारचा माल विविध ठिकाणांहून येत असल्याने, ह्या ठिकाणी माल साठवणूकीची प्रचंड मोठी गोडावून्स होती. अगदी आजहीआहेत. यात धान्याच्या गोदामांची संख्या जास्त आहे. दाट लोकवस्ती, सततची गर्दी, अगदी प्राथमिक स्वरुपाच्याही पायभूत सोयी नाहीत, रोगट हवा अस्वच्छता, उघडी गटारं याचा परिणाम म्हणून उंदीर-घुशी, पिसवा, घोंघावणाऱ्या माश्या यांचा सुळसुळाट ह्या परिसरात झाला होता. गोदामांतून उंदीरच वस्तीला असत. तिथेच जगत आणि तिथेच मरत. ह्या सर्व घाणेरड्या, परंतु रोगराईला पोषक वातावरणाचा, व्हायचा तोच परिणाम झाला आणि प्लेगने (अर्थात, हा प्लेग आहे, हे नंतर समजलं होतं.) थैमान घातलं. या सर्व बजबजपुरीत रोगाने पटापट मरून पडणाऱ्या उंदीर-घुशी, त्यांच्या मेल्या शरिरावर बसलेल्या माश्या-पिसवा माणसांच्या संपर्कात येऊन, माणसांना मोठ्या प्रमाणार प्लेगची लागण होऊ लागली आणि माणसं पटापट मरू लागली. हा आजार संसर्गजन्य असल्याने, तो वायुवेगाने सगळीकडे पसरत गेला. हा रोग उत्तरेला तुलनेने कमी लोकवस्ती असलेल्या माहिमपर्यंत पसरला होता. १८९७ च्या जानेवारीपर्यंत संपूर्ण मुंबईत ह्या रोगाने आपला प्रभाव टाकला होता.

वर उल्लेख केलेले मांडवी, नागपाडा, गिरगांव हे परिसर दाट लोकवस्तीचे आणि त्यामुळे ह्या रोगाचा सांसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. मृत्यूचं प्रमाण आणि वेग एवढा होता की, घरातल्या एका माणसाचं मृत शरीर दहन-दफन करुन आल्यावर, लगेचंच त्याच घरातील दुसरं प्रेतही तयार असायचं. आठवड्याला साधारण हजार-दोन हजार माणसं ह्या रोगाला बळी पडायला सुरूवात झाली होती. स्मशानात प्रेतं जाळण्यासाठी रांगा लावण्याची परिस्थिती उद्भवली होती. घाऊकपणे माणसं मारते, ती महामारी, या अर्थाने प्लेगला त्यावेळी ‘महामारी’ असं म्हटलं जात होतं. आजाराचं निदान होत नव्हतं. आणि त्यामुळे अर्थातच औषध योजनाही करता येत नव्हती. माणसं घाबरली. बचावलेल्यांनी आपापल्या गांवाकडची वाट धरली.

मुंबईचे आणि मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने ‘दु:खहर्ता’ म्हणता येईल असं टाटा कुटुंब याही वेळी मुंबईकरांच्या मदतीला सरसावलं होतं. ज्यांना मुंबईच्या उपनगरांत मोकळ्या परिसरात जायचं होतं, त्यांच्यासाठी जमशेटजी टाटांनी हव्या त्या स्वरुपाची मदत देऊ केली. मुंबईच्या उपनगरांची वाढ होण्यास, गिरण्या, रेल्वेप्रमाणे हे देखील एक कारण आहे. अनेकांनी या काळात उपनगरांना जवळ केलं होतं. परंतु ज्यांचं पोटच हातावर होतं, अशांनी काय करावं? जावं तरी मरण आणि न जावं तरी मरणच..!

अशातच सप्टेंबर महिन्याच्या २३ तारखेला, त्यावेळच्या मुंबई नगरपालिकेच्या आरोग्य खात्यात कार्यरत असणाऱ्या एका डाॅक्टरने, ह्या मृत्यूचं नेमकं निदान करून, हा ‘ब्युबाॅनिक प्लेग’ रोग असल्याचं सरकारकडे जाहिर केलं. ब्युबाॅनिक या शब्दाचा अर्थ लहान गाठ असा होतो. हे डाॅक्टर होते, डाॅ. अॅकॅशिओ गॅब्रियल वेगास (Dr. Accacio Gabriel Viegas). हे आपल्या आताच्या गोव्याचे. गोव्यातल्या ‘आरपोरा’ गांवचे. म्हणजे त्यावेळच्या ‘पोर्तुगीज इंडीया’तले.

पुढे जाण्यापूर्वी थोडसं विषयांतर करुन ह्या डाॅक्टरांची थोडीशी माहिती सांगणं मला आवश्यक वाटतं. गोव्याला जन्मलेल्या ह्या डाॅक्टरांचं माध्यमिक आणि महाविद्यालयीन, म्हणजे ‘डाॅक्टरकीचं’, शिक्षण मुंबईत झालं. ग्रॅन्ट मेडीकल काॅलेजमधून, म्हणजे आताचं जे. जे. हाॅस्पिटल, त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्णकेलं आणि मुंबई नगरपलिकेच्या माध्यामातून त्यांनी मुंबईच्या मांडवी भागात, म्हणजे मशिद बंदर-सॅंडह्रर्ल्ट रोड परिसरात, आपली वैद्यकीय सेवा नागरिकांना द्यायला सुरुवात केली होती.

आता पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊ. डाॅ. वेगासनी या रोगाचं निगान केलं., हे वर आपण पाहिलं. दाटीवाटीची वस्ती आणि अस्वच्छता हे रोगाचं महत्वाचं कारण आहे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आता त्या कारणांचं निराकारण आणि रोगावरचा जालिम उपाय शोधायचा होता. त्यातहीअडचण होतीच. डाॅ. वेगास ह्यांनी हा रोग सुक्ष्म जंतुंमुळे(बॅक्टेरीया किंवा जिवाणू) होतो आणि जंतुंचा प्रादुर्भाव अस्वच्छतेमुळे जास्त होतो, असं सांगितलं तरी, असं काही कारण असू शकतं, हेच अनेकांना पटत नव्हतं. असं वाटणाऱ्यांत त्यावळच्या सरकारी यंत्रणेतलेही काही लोक होते. म्हणून सरकारी यंत्रणेने सर्वात पहिलं काय तेलं असेल तर, डाॅ. वेगासचं केलेलं निदान आणि त्यामागची कारणं, बरोबर आहे किंवा कसं, याची तपासणी करण्यासाठी, तज्ञांच्या चार टिम्स कामाला लावल्या.

तर दुसरीकडे जनतेच्या पातळीवर वेगळीच गम्मत सुरू होती. त्या काळी धार्मिक पगडा जास्त आणि डाॅक्टरी उपायांवर विश्वास कमी असल्याने अनेकांना, अगदी त्याकाळातील सुशिक्षित म्हणता येईल अशा लोकांनाही, हा दैवी प्रकोप वैगेरे वाटला आणि त्यावर त्यांना दैवी उपायही सुरू केले. हे आपल्या भारतीय मानसिकतेशी मिळतं-जुळतंच होतं. (आजही काही फार फरक पडलाय असं मला वाटत नाही. उलट आताची जनता देव आणि देवापेक्षा बाबा-बापू-माॅ-अम्मा इत्यादी देवांच्या एजंटांवरही जास्त विश्वास दाखवू लागली आहे. अर्थात, आता लोक जाहिरपणे तसं दाखवत नाहीत एवढाच काय तो फरक. अर्थात तेंव्हा प्राणिकपणाची मात्रा आताच्या तुलनेत जास्त होतीच म्हणा).

तज्ञांच्या टिम्सने डाॅ. वेगासचं निदान बरोबर असल्याचं जाहिर केल्यावर, सरकार कामाला लागलं. त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर असणाऱ्या सॅंडहर्स्ट यांनी वाल्डेमार हाफकीन यांना मुंबईत पाचारण केलं. हाफकीन ह्यांनी काही काळा पूर्वीच कलकत्त्यात पसरलेल्या काॅलऱ्याच्या साथीवर प्रभावी लस शोधली होती आणि त्यांनी आता मुंबईच्या प्लेगवरही लस शोधावी म्हणून त्यांना मुंबईत पाचारण करण्यात आलं होतं. हाफकीन यांना जेजे हाॅस्पिटलात एक प्रयोगशाळा उपलब्ध करुन देण्यात आली आणि तिथे त्यांचे प्लेगवर लस शोधण्याचे प्रयोग सुरू झाले.

इकडे प्रशासनाच्या पातळीवर शहरातील अस्वच्छता दूर करण्याची, घराघरात जाऊन सर्वांची तपासणी करण्याची धडक कारवाई सुरू झाली होती. रस्ते, गटारं, गोदाम यांतील अस्वच्छता निर्मुलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. पोलीसी बळावर तपासणी सुरू झाल्याने लोक चिडू लागले होते. असंतोष वाढत चालला होता. प्रशासन आपल्या भल्यासाठीच हे करत आहे, हे लेक समजून घेत नव्हते. याला कारणं दोन. एक म्हणजे, अस्वच्छतेमुळेच हा रोग झपाट्याने पसरला आहे, हे लोकांना पटत नव्हतं आणि दुसरं कारण त्याकाळच्या ब्रिटिश सरकारविषयीचा असंतोष आणि आपण पारतंत्र्यात असल्याची जनतेची भावना.

तिकडे पुढच्या चार-पांच महिन्यांत (काही ठिकाणी जानेवारी १८९७ असाही उल्लेख आहे, पण लस शोधण्यासाठी चार-पांच महिन्यांचा कालावधी लागला असावा, असा माझा अंदाज) हाफकीनला प्लेगवरची लस शोधण्यात यश आलं होतं, परंतु त्या लशीची विश्वासार्हता तपासायची होती. मानवी शरिरावर ह्या लशीचे काय परिणाम-दुष्परिणाम होऊ शकतात, ते पाहिल्याशिवाय लस बाजारात आणता येणार नव्हती.

अशावेळी स्वत:वर प्रयोग करणे हा उपाय असतो, पण तो विश्वासार्ह मानता येत नाही. त्यासाठी आणखी काही माणसांची आवश्यकता होती. म्हणून भायखळा तुरुंगातील कैद्यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर, हाफकीन वाळकेश्वरला ज्या बंगल्यात राहात होता, तिकडच्या शेजारची एक महिला आणि तिच्या मैत्रिणी स्वखुशीने पुढे आल्या. ती शेजारीण होती फ्लोरा ससून..! मुंबईचे प्रसिद्ध ज्यू व्यापारी, ससून डाॅकचे निर्माते अब्दुल्ला उपाख्य सर अल्बर्ट ससून यांची नात. अवघ्या चाळीसएक वर्षाची होती ती तेंव्हा..!!

लशीची चाचणी झाली आणि प्लेगनिर्मुलनासाठी वाल्डेमार हाफकीनने शोधलेली लस उपयोगी येते हे सुद्ध झाल्यावर, ती लोकांना टोचण्याची मोहिम हाती घेतली. परंतु प्रचंड धार्मिक श्रद्धा-अंधश्रद्धा, डाॅक्टरी उपायांवरचा संशय इत्यादी कारणांमुळे ही लस टोचून घेण्यास तयार नव्हते. मग सरकारने जे करायला हवं होतं, तेच केलं. पोलिसी बळाचा वापर सुरू केला. जशी साफसफाईची मोहिम पोलीसी मगतीने हाती घेण्यात आली होती, त्याचप्रमाणे लस टोचणीचाही मोहिम हाती घेण्यात आली होती. लोकांमधे प्रचंड असतोष माजला होता, पण सरकारने तिकडे अजिबात लक्ष न देता आपली मोहिम फत्ते केलीच..

त्यातून पुढे काय (आणि काय काय) घडलं, हे आपण सर्वच जाणतो..!

आता जगभरात पसरत असलेली ‘करोना’ची साथीचे परिणाम पाहून, मला मुंबईच्या इतिहासाचं वाचन करताना वांरवार समोर येत गेलेल्या, इसवी सनाच्या १८९६ मधे मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीची आठवण झाली. लहानमणी जाणत्यांकडुनही ह्या प्लेगच्या आठवणी ऐकलेल्या मला आठवतायत. त्याच बरोबर आता सरकार ज्या तऱ्हेने ‘करोना’च्या साथीचा मुकाबला करण्यासाठी जशी पावलं उचलत आहे, तसेच प्रयत्न त्या वेळच्या ब्रिटिश सरकारने केले असल्याचं वाचल्याचं आठवलं. अगदी शब्दही तेच. आज वापरले जात आहेत, तेच. आयसोलेशन, क्वारंटाईन, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी, घराघरांत जाऊन लोकांची तपासणी. रोगी आणि बाधित लोकांचं फोर्स्ड इव्हॅक्सुएशन आणि डिटेन्शन. आज महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे लोक ज्या प्रकारे सोसायट्या-सोसायट्यांची तपासणी करत आहेत, तशीच. फक्त फरक एकच, त्या वेळी ही तपासणी पोलीस करत असत..! लोकांचं आपापल्या गांवाकडे, सुरक्षित जागांकडे पलायन करणंही अगदी आतासारखंच. प्रचंड घाबरले होते लोक तेंव्हाही.

सरकार आपल्या सुरक्षेसाठीच ही व अशी पावलं उचलत आहे आणि त्या प्रयत्नांना संपूर्ण सहकार्य करणं हे आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. १८९६चं सरकार हे आपलं शत्रू होतं, तर आताचं सरकार आपलं हितचिंतक आहे, मग ते कोणत्याही पक्षाचं असो, हे आपल्यापैकी प्रत्येकाने स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्याही मनावर आपण बिंबवायला हवं..!

त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धांना मनात आणि सामाजिक माध्यमांवरील भक्तीरसाने ओथंबलेल्या संदेशाकडे अजिबात थारा देऊ नये..! ह्यावर विज्ञानच उत्तर शोधणार आणि ते हा लवकरच शोधणार, याची मनात खात्री बाळगावी. तोवर स्व-संयम हाच उपाय आहे..!! सरकारला बळाचा वापर करायची वेळ येऊ देता कामा नये.

सोबत सन १८९७ चा मुंबई शहराचा एक नकाशा देत आहे, त्यात माहिम येथे सरकारने सुरू केलेला ‘क्वापंटाईन कॅम्प’ स्पष्ट दिसेल. त्यावेळी माणसं रेल्वे आणि बोटींने प्रवास करत आणि माहिम हे मुंबई शहराचं उत्तरेकडील प्रवेशद्वार असल्याने, तिथे अशी सोय करण्यात येणं, हे सहाजिकच होतं..!

-©️नितीन साळुंखे

21.03.2020

9321811091

संदर्भ-

१. ‘मुंबई नगरी’- लेखक प्रा. नरहर रघुनाथ फाटक, १९८१

२. ‘स्थल-काल’- लेखक डाॅ. अरुण टिकेकर, २००४

३. ‘Plague in Bombay; response of Britain’s Indian subject to clolonial intervention’- श्रीमती नताशा सरकार यांचा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या निबंधातील काही भाग.

४. श्रीमती शांता गोखले यांच्या ‘शिवाजी पार्क’ या पुस्तकावर आधारीत इंटरनेटवरील लेख.

५. ‘मुंबैसंगे आम्ही (बि)घडलो’-लेखक डाॅ. सुधाकर प्रभू, २०१०

६. विकिपेडीया-

फोटो सौजन्य इंटरनेट