मुंबईचा आद्य राजा बिंब..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा
लेखांक – ३० वा

मुंबईचा आद्य राजा बिंब..

ज्यांना मुंबईच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते किंवा ज्यांना मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असतो, त्यांना मुंबईवर लिहिल्या गेलेल्या विविध पुस्तकांचं वाचन करताना, मुंबईचा ‘राजा बिंब’ भेटतोच भेटतो. मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी स्थापन करणारा हा पहिला राजा. परंतु या बिंबाच्या नावाचा आणि तो कधी होऊन गेला, याबद्दल खूप गोंधळ आहे. बिंब राजाचा उल्लेख बऱ्याचदा ‘बिंबराजा’, ‘भिम’, ‘भिमराजा’ असा वेगवेगळ्या पद्धतीने येतो आणि मनात अगोदरच झालेला गोंधळ आणखी वाढतो.

बिंब राजाचे नांव आणि त्याच्या कारकीर्दीचा समय यावर माझ्या वाचनात आलेली ‘महिकावातीची बखर’ उत्तम प्रकाश पाडते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी विश्लेषण केलेली ही ‘महिकावतीची बखर’, ‘बिंब राजा’ अगदी स्पष्ट करून सांगते. वि. का.. राजवाडेंनी या बखरीतल्या नावांच्या आणि बिंब राजा आणि संबंधितांच्या होऊन गेलेल्या काळाच्या स्पष्टतेसाठी तर बखरीवर प्रचंड मेहेनत घेतलेली पुस्तकाच्या पानापानावर दिसून येते. इतिहासाचार्यांचा या क्षेत्रातील आदरयुक्त दबदबा पाहाता, त्यांनी या पुस्तकात नोंदलेल्या निरीक्षणाबद्दल माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही. माझ्या माहिती प्रमाणे त्याकाळची माहिती देणारा हा एकमेव दस्तऐवज आज उपलब्ध असल्याचं समजतं.

बखरीत नोंदल्याप्रमाणे मुंबईवर वेगवेगळ्या कालावधीत एकूण दोन वेगवेगळ्या बिंबानी राज्य केलं. माहीम मुंबई येथे राजधानी स्थापन करणारा पहिला राजा होता राजा ‘प्रताप बिंब’ आणि याच्या नंतर जवळपास १५५ वर्षांनी आलेला ‘बिंब यादव’..! या दोन राजांच्या नांवात असलेल्या साधर्म्यामुळे, माहीम येथे राजधानी स्थापन करणारा हा बिंब नेमका कोण आणि ते होऊन गेलेल्या काळात जवळपास १५५ वर्षांचं अंतर असल्याने, त्यातील नेमका कुठला बिंब कधी होऊन गेला यातही विविध लेखकांत मतभेद आढळून येतात. महिकावतीची बखर’ मात्र हे दोन्ही बिंब, पहिला बिंब आणि त्यानंतर १५५वर्षांनी आलेला दुसरा बिंब व त्या दोघांच्या दरम्यान होऊन गेलेले अन्य राजे यांचा पट अगदी व्यवस्थित उलगडून दाखवते.

मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब –

मुंबईतील माहिम या ठिकाणी राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब म्हणजे प्रताप बिंब राजा. ‘प्रताप’ हे त्याचं नांव आणि ‘बिंब’ हे आडनांव. हा गुजरातेतल्या अनहिलवाडच्या चालुक्याचा मंडलिक असलेल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिम्बाचा भाऊ. शके १०६०, म्हणजे इसवी सन ११३८ मध्ये गोवर्धन बिम्बाने आपला भाऊ प्रताप बिंबाला उत्तर कोकणवर स्वारी करण्याचे आदेश दिले. उत्तर कोकण म्हणजे साधारणत: गुजरातेतल्या दमण पासून ते मुंबईच्या मलबार हिलपर्यंतचा प्रदेश. आपल्या भावाची आज्ञा शिरसावंद्या मानून हा प्रताप बिंब जानेवारी सन ११३८ ला उत्तर कोकण प्रान्त सर करण्यास गुजरातेतून निघाला.

राजकीय व्युह रचनेचा भाग म्हणून प्रताप बिंब थेट उत्तर कोकणावर चालून न येता प्रथम पैठणला गेला. पैठणला त्या काळी राज्य करणारा भौम आडनांवाचा संस्थानिक होता, तो या प्रताप बिम्बाच्या नातेवांईकांपैकी होता. किंबहूना प्रताप बिम्बाचं ‘बिंब’ हे आडनांव देखील ‘भौम’ या आडनांवाचा अपभ्रंश आहे, असं राजवाडे म्हणतात. या भौमाकडे प्रताप बिंब तब्बल दोन वर्ष राहीला. ही दोन वर्ष प्रताप बिम्बाने चढाईसाठी लागणारं द्रव्य आणि साधन-सामग्रीचीजमवा-जमाविसाठी घालवली. सर्व तयारी पूर्ण होताच, इसवी सन ११४० मध्ये प्रताप बिंब त्याचा प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी, एक ब्राह्मण पुरोहित हेमाडपंत आणि सात मराठा (सोमवंशी-सूर्यवंशी मराठा) सरदाराना घेऊन उत्तर कोकणच्या मोहिमेची सुरुवात दमणवर स्वारी करून करायची ठरवलं.

त्याच वर्षी, शके १०६२, म्हणजे इसवी सन ११४० मध्ये प्रताप बिंब दमणमध्ये दाखल झाला. कोकणावर त्याकाळी राज्य असणाऱ्या शिलाहारांचा मांडलिक असलेला दमणचा दुर्बळ राजा काळोजी सिरन्या प्रताप बिंबला शरण आला. विनासायास दमण हाती आल्यावर प्रताप बिंब आणखी दक्षिणेकडचा प्रदेश सर करण्यास निघाला. चिंचणी-तारापूर, पालघर, केळवे-माहिम, वसई पर्यंतचा प्रदेश प्रताप बिंबाने वेगाने काबिज केला. दमण ते वसईच्या खाडीच्या उत्तर किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश आता प्रताप बिंबाच्या अधिपत्याखाली आला.

दमण नंतर केळवे-माहिमचा राजा विनाजी घोडेलही प्रताप बिंबास शरण आला. दमण ते पालघर-वसईपर्यंतचा हा प्रदेश सुंदर असला तरी, या प्रदेशावर राज्य करणाऱ्या शिलाहारांचा हा पडता काळ होता आणि या प्रदेशातूल त्यांच्या मांडलिक राजांवर शिलाहारांचा कोणताही वचक नसल्याने, या मांडलिकांचा निरंकूश राज्य कारभार चालल्याने, हा सर्व प्रदेश वैराण आणि उध्वस्त झालेला होता. मुळातच सुंदर असलेल्या या प्रदेशात आपल्या मुळ प्रदेशातून लोक आणून त्यांना इथे वसवण्याच प्रताप बिंबाने ठरवलं आणि त्याने आपला पुत्र मही बिंब यास चंपानेर-गुजरातहून वसाहत करण्यासाठी लोक आणण्यास सांगीतलं. मही बिंब गुजरातेहून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी असे सर्व मिळून ६६ कुळे घेऊन निघाला. मही बिंबाने पैठणहून काही ब्राह्मणांनाही बोलावलं. दमण-माहिमची व्यवस्था लावण्यासाठी प्रताप बिंब स्वत: केळवे- माहिम येथे राहीला. केळवे-माहिमला त्साने राजधानी स्थापण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा एक अधिकारी हरबाजी कुळकरणी याला दमणची व्यवस्था पाहाण्यासाठी धाडून दिलं. एवढं झाल्यावर प्रताप बिंबाने त्याचा प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी यास इसवी सन ११४२ मधे पुढच्या मोहिमेस, म्हणजे वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश सर करण्यास जाण्याची आज्ञा केली.

पुढच्या महिनाभरात बाळकृष्णराव सोमवंशी यांने वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणला. वाळकेश्वाराच्या टेकडीवर, म्हणजे मलबार हिलवर जिथे आज राजभावन आहे तिथे, बाळकृष्णरावाने आपल्या सैन्याचा तळ ठेवला. वाळकेश्वराचं आणि तिथल्या मारुतरायाचं दर्शन घेतलं. माझ्या मते हा मारुती* म्हणजे सोबतच्या चित्रातला असावा. काही दिवस वाळकेश्वराला मुक्काम झाल्यावर त्यांने प्रताप बिंबाला वाळकेश्वरी येऊन आपला प्रदेश पाहाण्याची व तिथे वसाहत करण्याची विनंती केली.

एवढ्यात मही बिंब केळवे-माहिमात याऊन ठेपला होता. मही बिंबासोबत वसाहत करण्यासाठी आलेल्या कुळांची व्यवस्था केळवे-माहिम, पालघर परिसरात लावून, प्रताप बिंबाने मही बिंब आणि त्याने सोबत आलेल्या सोमवंशी क्षत्रिय मराठा-सूर्यवंशी क्षत्रिय मराठा आणि शेषवंशीय क्षत्रिय मराठा कुळांपैकी काही कुळं व पैठणहून आणलेले काही ब्राह्मण सोबत घेतले आणि तो वाळकेश्वराकडे निघाला. पुढच्या काही दिवसांत प्रताप बिंबाचा लवाजमा वाळकेश्वरी पोचला. तिथे काही दिवस राहून प्रताप बिंबाने वाळकेश्वराच्या साक्षीने स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला व तो दमण ते वाळकेश्वरापर्यंतच्या जवळपास ८४ मैल, म्हणजे १३५ किलो मिटर (आजच्या काळात हे अंतर ११५ किमि. भरतं) पसरलेल्या राज्याचा राजा म्हणून घोषित झाला. अगोदरच मुक्रर केल्याप्रमाणे या नविन राज्याची राजधानी म्हणून केळवे-माहिम ठरली. इथे त्याने बक्षिस म्हणून पैठणहून राज्याभिषेकासाठी आलेल्या माध्यंदिन ब्राह्मणांना काही जहागिरींचं वाटप केलं. पैकी गंगाधर नाईक सांवखेडकर यांना पसपवली, म्हणजे आताच्या पवंई नजिकचं पासपोली गांव इनाम दिलं, तर विश्वनाथपंत कांबळे (होय, कांबळेच..!) यांस गोरेगांव नजिकचं पहाडी गांव वंशपरंपरागत जहागिरी म्हणून दिलं. वाळकेश्वरास बसून त्याने वाळकेश्वरापासून एवढ्या लांबच्या गांवांचं वाटप का केलं, हे समजण्यास काही मार्ग नाही.

वाळकेश्वरी काही दिवस मुक्काम करुन राजा प्रताप बिंब पुन्हा केळवे-माहिमला येण्यास निघाला. वाळकेश्वराहून परत येताना राजा प्रताप बिंबाचा पहिला मुक्काम ‘वहिनळे-रांजणफर’ या गांवांत पडला. ही गांवं आताच्या मुंबंईच्या नकाशावर नक्की कुठली, ते सापडणं अवघड आहे, तरी ही गांवं वांद्रे-खार परिसरातली असावीत असं वाटतं. कारणं वांद्रे येथील मेहेबूब स्टुडीयोच्या नजीक एक ‘रनवर’ किंवा ‘रानवर’ नांवाचे गाव अजूनही आहे. आणखी एक ‘राजान’ नांवाचं गांव त्याच परिसरात आहे. ह्या दोन गांवांपैकी कुठलं तरी गांव पूर्वीचं रांजणफर असावं आणि ‘वहिनळे’चंच पुढे ‘वांद्रे’ झालं असावं की काय, अशी दाट शंका मला येते. असो. या मुक्कामात राजा प्रताप बिंबाने आणखी काही जहागिरींचं वाटप केलं. मरोळची जहागिरी रखमाजीराव सोमवंशी यांना तर मालाडची जहागिरी गंगाधररावांना दिली व त्यांच्या त्यांच्या वतनात त्यांना वसाहती करण्याचे हुकून दिले व राजा पुढच्या प्रवासासाठी निघाला.

राजा प्रताप बिंबाने त्याचा पुढचा मुक्काम नीट कळत नाही, पण तो जोगेश्वरी किंवा कान्हेरीच्या गुंफात केला असावा. या मुक्कामात त्याने मुंबई-माहिम आणि वरळीची जहागिरी गंभिरराव सूर्यवंशी यांना दिली. दमणच्या हरबाजी कुळकर्ण्यांना मालाडपासून घोडबंदरपर्यंतचा परिसर वतनात दिला आणि पुत्र मही बिॅबाला त्याने कल्याणची भुमी सर करण्यास पाठवलं..

राजा प्रताप बिंब वाळकेश्वराला स्वत:ला राज्याभिषेक करायला केळवे-माहिमहून (महिकावती) निघाला, तो जिंकलेल्या सर्व प्रदेशाची घडी बसवत बसवत परतीच्या प्रवासाला निघाला, त्यास साधारणत: वर्षभराचा अवधी लागला असावा, असं बखरीत दिलेल्या काळावरून लक्षात येतं.

राजा प्रताप बिंबाची वर्षभराची मोहिम वसईच्या खाडीच्या दक्षिणेकडे सुरू असताना, त्याच्या महिकावतीच्या राज्यात, म्हणजे केळवे-माहिम परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. बिंब राजा, राजपुत्र व बहुतेक सर्व महत्वाच्या सरदारांची त्या परिसरातली अनुपस्थिती पाहून, शिलाहारांनी राजा प्रताप बिंबाच्या वसई ते दमण परिसरावर हल्ला करुन राजधानी महिकावती, म्हणजे केळवे-माहिम आपल्या ताब्यात घेतली आणि राजा प्रताप बिंबाला वसईच्या खाडीच्या दक्षिणेस वाळकेश्वरापर्यंतच्या प्रदेशात कोंडून टाकलं.

प्रताप बिंबाने आपली राजधानी केळवे-माहिम शिलाहारांच्या ताब्यात गेल्याचे वर्तमान समजल्यानंतर, पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असावेत. त्यासाठी त्याने याच्या सैन्याचं आणि स्वत:च्या मुक्कामाचं स्थान म्हणून मुंबई-माहिम ठरवलं असावं. पुढचा काही काळ राजा प्रताप बिंबाने आपली जुनी राजधानी घेण्याचे प्रयत्न केले असावेत व त्या प्रयत्नांना यश येत नाही हे पाहून शेवटी आपली राजधानी म्हणून त्याने मुंबंई माहिम मुक्रर केली असावी. अर्थात, रादा बिंबाने ‘बिंबस्थान-माहिम’ येथे राजधानी स्थापन केली’ एवढाच उल्लेख बखरीत आहे. बखरीत दिलेल्या काळातील फरकाचा तपशील भरून काढण्यासाठी मी या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे कल्पनेने मांडणी केलेली आहें.

या माहिम बेटाला पूर्वी नांव नव्हतं. ओसाड, वेराण असलेल्या या बेटाला ‘बरड बेट’ किंवा बॅरन लॅन्ड असं म्हणत. शके १०६० च्या अखेरीस, म्हणजे इसवी सन ११३८, राजा प्रताप बिंबाने या ठिकाणाला आपली राजधानी बनवलं आणि आपल्या जुन्या राजधानीचंच ‘माहिम’ हे नांव दिलं आणि तेंव्हापासून या बेटाला माहिम हे नांव पडलं, असं म्हणता येतं. माहिमला ‘बिंबाच्या लष्कराचे ठाणे’ या अर्थाने ‘बिंबस्थान’ असंही एक नांव त्याने दिलं. केवळ माहिमच नव्हे, तर केळवे माहिम परिसरातल्या आणखीही काही ठिकाणची नांव त्यांने मुंबईतील काही ठिकाणांना दिली. उदा. नायगांव, धारावी इ. राजा प्रताप बिंबाने त्याची कुळदेवता ‘प्रभावती’ हिची स्थापना माहिम येथे केली असावी, असं मानण्यास जागा आहे, कारण कुळदेवतेचं देऊळ स्थापन करण्याची आजही प्रथा आहे. हिच प्रभावती पुढे ‘प्रभादेवी’ म्हणून प्रसिद्धीस पावली. आजही हिचं मंदिर (आणि आता रेल्वे स्टेशनही) मुंबईत आहे..!!

असा हा ‘राजा प्रताप बिंब’ सध्याच्या मुंबईतल्या माहिमला राजधानी स्थापन करणारा या अर्थाने मुंबईचा पहिला राजा. राजा प्रताप बिंबाने इसवी सन ११५९-६० पासून पुढची ९ वर्ष मुंबईवर राज्य केलं. राजा प्रताप बिंब आणि त्याच्यानंतर माहिमच्या गादीवर बसलेले राजे आणि त्यांची कारकिर्द खालील प्रमाणे होती..;

**राजा प्रताप बिंब –
शके १०६२-१०६९ या कालावधीतला वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या राज्याचा राजा म्हणून ७ वर्ष. मुंबई-माहिम ही राजधानी आणि वाळकेश्वर ते वसईपर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून ५ वर्ष.

प्रताप बिंबाचा पुत्र मही बिंब –
शके १०६९ ते ११३४- एकूण ६५ वर्ष

मही बिंबाचा पुत्र केशवदेव बिंब-
शके ११३४ ते ११५९ – एकूण २५ वर्ष

केशवदेवास पुत्र नसल्याने जनार्दन प्रधान दत्तक आला व पुढची शके ११५९ ते ११६३ अशी चार वर्ष.

जनार्दन प्रधानाचा पराभव चौलचा वैश्य राजा नागरशाने केला व त्या नंतर माहिम-मुंबईवर त्याने शके ११६३ ते शके १२१६ पर्यंत अशी ५३ वर्ष राज्य केलं.

शके १२१६ मधे या परिसरात अवतरला, तो देवगिरीच्या रामदेवराव जाधव(यादव) याच्या तीन पुत्रांपैकी एक ‘बिंब जाधव (यादव)’. हा माहिम-मुंबईवर राज्य केलेला दुसरा बिंब. याने शके १२२५ पर्यंत या प्रदेशावर राज्य केले. याच्यानंतरही शके १२६९-७०पर्यंत काही राजे इथे होऊन गेले व त्यानंतर इथे मुसलमानी अंमल सुरू झाला.

शके १०६२ मधे आलेल्या पहिल्या बिंबाचं नांव ‘प्रताप’ असून, आडनांव ‘बिंब’ होतं. तर त्याच्या नंतर जवळपास १५५ वर्षांनी झालेला दुसऱ्या बिंबाचं नांव ‘बिंब’, तर आडनांव ‘जाधव (यादव)’ होतं. सुमारे १५५ वर्षांच्या अंतराने झालेल्या दोन्ही बिंबांनी ९ वर्षच राज्य केलं, ही गोष्ट मला आश्चर्याची वाटते. या दुसऱ्या बिंबाची कथा पुन्हा कधीतरी सांगायचा प्रयत्न करेन. दोन्ही बिंबातल्या नावांच्या सारखेपणामुळे लेखाच्या सुरुवातीला म्हणालो तसा गोंधळ होतो व मग असा गोंधळ त्यांच्या होऊन गेलेल्या काळातही परावर्तित होतो.

-©️नितीन साळुंखे
9321811091

महत्वाच्या टिपा-

  1. *मारुतीची फोटो. बाळकृष्णरावाने दर्शन घेतलेला वाळकेश्वराचा मारुती हाच असावा असा माझा अंदाज आहे, खात्री नव्हे.
  2. **महिकावतीची बखर अनेकदा वाचून त्याचं सार वरील लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही प्रमाणात गोंधळ उरतोच. सदर बखरीतल्या घटना प्रत्यक्ष घडल्यानंतर ‘काही शे’ वर्षांनी लिहिल्या गेल्या असल्यामुळे, तपशीलात तेवढासा सुसंगतपणा जाणवत नाही. इतिहासाचार्य राजवाडेंनी या बखरीचं विश्लेषण करताना त्यात बरीच सटीकता आणण्याचा प्रयत्न केला आहे हे जाणवलं तरी काही प्रमाणात अद्यापही त्यात सुसंगतता दिसते. उदा. प्रताप बिंब शके १०६० मधे दक्षिण कोकणावर स्वारी करण्यास निघाला, तो दोन वर्षांनी शके १०६२ मधे पैठण मार्गे कोकणतल्या दमण येथे आला, असं बखरीत नोंदलं आहे. पुढे त्याने मुंबई-माहिम येथे राजधानी स्थपन केल्याचा शके पुन्हा १०६० दिलं आहे व त्यानंतर त्याने ९ वर्ष इथून राज्य सांभाळल्याचा उल्लेख आहे. मुळात तो मुंबई प्रांतात आलाच शके १०६२ ला, तर मग तो ९ वर्ष इथे राज्य करेलच कसा, हा प्रश्न मला पडला व ती दुरुस्ती मी अंदाजाने ५ वर्ष असावीत अशी करुन घेतली आहे.
  3. मुंबई-माहिमला राजधानी करणारा पहिला बिंब कोण, येवढेच स्पष्ट करण्यासाठी हा लेख आहे. त्यामुळे इतर तपशील मी यात लिहिलेला नाही. मुंबई-माहिम ही जरी प्रताप बिंबीने वसवलेली असली तरी, त्यावेळच्या राजकीय धामधुमीत या राज्याची भुमी वाळकेश्वर ते वसई व पुढे दमणपर्यंत कमी-जास्त होत राहीली होती, हे लक्षात ठेवावं.
  4. प्रताप बिंब हा मुळचा गुजरातेतील अनहिलपाटण किंवा अहीनलवाडचा व येताना तो मुंबईत तिकडून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी कुळं घेऊन आला असं म्हटलं आहे. शेषवंशी समाज म्हणजे आताचा भंडारी समाज, तर सोमवंशी व सूर्यवंशी म्हणजे साधारणत: पाटील, म्हात्रे, चौधरी, चुरी, वर्तक, सावे वैगेरे आडनांवांचा समाज. हा समाज आजही केळवे-माहिम व मुंबईत मोठ्यासंख्येने सापडतो व त्यांच्या गांवच्या बोलीत गुजराती-मारवाडी शब्द सापडतात. सोमवंशी-सूर्यवंशी आणि शेषवंशी समाजाचा किंवा त्यांच्या बोलीचा मी जाणकार नव्हे, तर मी एका माहितगार व्यक्तीकडून ही माहिती विचारून ही टिप लिहिली आहे. त्यात काही चुक असल्यास ती माझी समजावी व माझ्या लेखाचा मुख्य हेतू लक्षात घेऊन दुरुस्ती सुचवावी.
  5. मुंबईचे मुळ रहिवासी असलेल्या कोळ्यांनतर सोमवंशी क्षत्रिय पाठारे, सूर्यवंशी क्षत्रिय व शेषवंशी क्षत्रिय हे मुंबईचे दुसरे मुळनिवासी ठरतात. सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाज व पाठारे प्रभू समाज हे पूर्णत: वेगळे. पाठारे प्रभु दुसऱ्या बिंबासोबत, म्हणजे शके १२१६ मधे मुंबईत आले. याचा अर्थ पाठारे प्रभू समाज कोळी, सोम.-सूर्य-शोष वंशीयांनंतरचे मुंबईला घडवणारा तिसरा महत्वाचा समाज होतो.
  6. सोमवंशी क्षत्रिय, सूर्यवंशी क्षत्रिय व शेषवंशी क्षत्रिय या तिन्ही समाजांचा बखरीतला एकत्रित उल्लेख ‘मराठा’ असा आहे. याचा अर्थ त्या काळात ‘क्षत्रिय’चा समानार्थ ‘मराठा’ असा होत असावा, असं मला वाटतं.
  7. हा लेख लिहिताना इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंचं ‘महिकावतीची बखर’ हे पुस्तक आधारभूत मानलेलं आहे. काही तपशिलांच्या पुष्टीकरता श्री. अशोक सावेंचं ‘महिकावतीची बखर’ याच नांवाचं पुस्तकही संदर्भासाठी घेतलेलं आहे. श्री. अशोक सावेंच्या मत आणखीही एक बिंब होता, परंतू शिलाहारांपैकी असून तो प्रताप बिंबाच्या पूर्वी होऊन गेला होता. काही शिलालेखांवर त्या बिंबाचा उल्लेख सापडतो असं श्री. सावेंनी लिहिलं आहे. हा बिंब मुंबईचा पहिला राजा बिंबाच्या पूर्वी होऊन गेला, असंही श्री. सावेंनी लिहिलं आहे, परंतू मुंबईच्या संदर्भात ज्या बिम्बाचा किंवा बिंब राजाचा उल्लेख वारंवार येतो, तो हा बिन्ब खचितच नव्हे. म्हणून याचा उल्लेख मात्र इथे केला आहे, ते केवळ तो माहिती असावा म्हणून..!!
  8. सोमवंशी, सूर्यवंशी व शेषवंशी समाजाचे आणखीही अंतर्गत भेद आहेत, मात्र ते इथे देणं अपेक्षित नसल्याने, त्यांचं ढोबळ वैशिष्ट्य माझ्या विदुषी स्नेही डाॅ. सौ. सुनिता सुवेन पाटील यांच्याकडून माहित करून घेतलं आहे. त्यांनी बरोबरच सांगीतलं असेल, लिहिण्यात काही चूक असल्यास ते पाप माझे.
  9. ‘शके’वरून इसवी सन काढताना ‘शके’त ७८ मिळवावेत. उदा शके १०६२+७८= इसवी सन ११४०.
  10. केळवे-माहिम म्हणजे ‘महिकावती’ आणि मुंबई-माहिम म्हणजे ‘बिंबस्थान’.

-©️नितीन साळुंखे
9321811091

दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे; भारतीय रेल्वेची संक्षिप्त जन्मकथा..!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा लेखमाला – लेखांक २६ वा

दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे;
भारतीय रेल्वेची संक्षिप्त जन्मकथा..’

१६ एप्रिल १८५३.
मुंबई शहराचं आणि पर्यायाने देशाचंही भाग्य बदलवणारा हाच तो ऐतिहासिक दिवस.


बरोबर १६७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत ‘लोखंडी रस्त्या’वरून ‘आगीची गाडी’ गाडी धावली आणि मुंबई ‘महामुंबई’ म्हणून भराभर वाढू लागली.


देशाच्या आठही दिशांतून मुंबईकडे गर्दी खेचणारं हे एक अत्यंत ताकदवान ‘लोह’चुंबक..! मुंबईच्या इतिहासात रेल्वेचं वर्णन, मुंबईकडे गर्दी खेचणारी ‘हिराॅईन’, असं केलं गेलंय.

मुंबईचीच नव्हे, तर पुढे देशाची झालेलाा ही हिराॅईन आज १६७ वर्षांची झाली. इतकं वय होऊनही जराही न थकता ही आपला करिश्मा अजून टिकवून आहे. हिच्या आगमनानंतर, जवळपास ८० वर्षांनी देशात विमानसेवेचा पाया घातला गेला. रेल्वेपेक्षा कितीतरी पटीने वेगवान असलेले विमान नंतरच्या काळात हळुहळू लोकप्रियही होतं गेलं. असं असलं तरी रेल्वेच्या लोकप्रियतेत तसुभरही फरक पडला नाही. आकाशातल्या देवलोकातून प्रवास करणाऱ्या विमानापेक्षा, आपल्या पोटातून अलम भारत घेऊन जमिनीवरून प्रवास करणारी रेल्वे आपण भारतीयांना आजही तितकीच प्यारी आहे. 

अशा या रेल्वेला तिच्या जन्माच्यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. अनेकांचा विरोध, अफवा यांना पुरून उरत, हिचा जन्म शेवटी झालाच व पुढे सर्वांचे डोळे दिपण्याएवढा पराक्रम हिने गाजवला व अजुनही गाजवते आहे. ‘रेल्वे’ ही स्त्री लिंगी मानली गेली आहे आणि आपल्या देशात कोणत्याही स्त्रीचा जन्म आजही संघर्षातूनच होतो. स्त्री भ्रुणाची जगण्याची इच्छा, स्त्रीचा जीवनसंघर्ष पुरुषापेक्षा जबर असतो, असं शास्त्र सांगते आणि ते रेल्वेच्याबाबतीतही खरं ठरलं. 

आपल्या देशातीलच नव्हे, तर आशीया खंडातली पहिली रेल्वे मुंबईत जरी १६ एप्रिल १८५३ रोजी धावली असली तरी, लंडन-अमेरीकेत ती यापुर्वीच अवतरली होती व तिची उपयुक्तताही सिद्ध झाली होती. आपल्या देशाचे तत्कालीन राज्यक्रते असलेल्या ब्रिटीशांना,  ब्रिटीश इंडीयातील त्यांच्या वाढत्या प्रभाव क्षेत्रावर व्यापारी व लष्करी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक जलद व एकाच वेळेस जास्त वाहतूक करू शकणाऱ्या वाहनाची गरज भासू लागली होती व त्यासाठी त्यांच्या नजरेसमोर रेल्वेएवढं सोयीचं साधन त्याकाळी दुसरं नव्हतं. 

इकडे मुंबईतही रेल्वे सुरू करण्याच्या हालचाली १८४३ सालीच सुरू झाल्या होत्या. मुंबईत रेल्वे सुरू करावी म्हणून याच साली ‘दि ग्रेट इस्टर्न रेल्वे कंपनी’ स्थापन केली व त्यात सार्वजनिक कार्यात नेहेमी पुढाकार घेणारे जगन्नाथ शंकरशेट व सर जमशेटजी जिजीभाई या दोघांनी  पुढाकार घेतला होता. नाना शंकरशेट व सर जमशेटजी जिजीभाई यांच्या सहीने तसा अर्ज लंडनला रवाना झाला. दि. १९ एप्रिल १८४५ रोजी कंपनीच्या चालकांची सभा टाऊन हाॅलमधे (आताची एशियाटीक सोसायटी) भरली. या सभेत रेल्वेच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी ‘दि इनलॅन्ड रेल्वे असोसिएशन’ ही समिती नेमून या समितीच्या अध्यक्षस्थानी कर्नल जर्व्हीस या ब्रिटीश अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. समितीत नाना व जमशेटजींव्यतिरिक्त मिस्टर विलोधवी आणि मुंबईचे आणखी एक दानशूर व्यक्तीमत्व फ्रामजी कावसजी यांचाही समावेश करण्यात आला होता. 

व्यापार रक्तात मुरलेले ब्रिटीशही तिकडे लंडनमधे काही गप्प बसलेले नव्हते. मुंबईच्या हालचालींवर त्यांची बारीक नजर होती. नामांच्या अर्जाला प्रतिसाद म्हणून सन १८४५ साली ब्रिटीशांनी कंपनीची सुत्रं आपल्या हाती ठेवण्यासाठी लंडनला ‘दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे’ ही कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या वतीने मिस्टर चॅपमन नावाचा एक अधिकारी मुंबईत प्रत्यक्ष पाहाणी करण्यासाठी पाठवला. मुंबईत आल्यावर मिस्टर चॅपमनने, मुंबईत स्थापन झालेल्या ‘बॉम्बे ग्रेट ईस्टर्न रेल्वे’ समितीच्या सदस्यांशी संपर्क साधला आणि या सदस्यांनी आपल्याला मदत करावी, असा आग्रह धरला. शेवटी लंडन आणि मुंबईतल्या दोन्ही समित्यांचं एकाच समितीत विलीनीकरण करण्यात आलं आणि मुंबईतील कंपनीच्या संचालकांना त्या कंपनीच्या संचालक मंडळावर घेतलं गेलं. पुढे या समितीतर्फे मुंबईत रेल्वेमार्ग बांधण्यासाठी आयोग नेमण्यात आला. या आयोगाच्या अध्यक्षपदी मिस्टर जाॅन विलोधवी यांची नेमणूक करण्यात आली. या आयोगाचं उद्दिष्ट एकच होतं, मुंबईत वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे धावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे व काम तडीस नेणे..!

पुढे  या आयोगाचे अध्यक्ष मिस्टर विलोधवी, मिस्टर चापमन आणि इतर महत्वाच्य् अधिकाऱ्यांनी, प्रस्तावित रेल्वेमार्गाचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून जुलै १८४८ मधे मुंबईत ३५ कि.मि.ची रेल्वे बांधण्याची शिफारस केली. या रेल्वेमार्गाच्या बांधणीसाठी मुख्य अभियंता किंवा चिफ इंजिनिअर म्हणून जेम्स बर्कले यांची नियुक्ती करण्यात आली होती.

ब्रिटीशांनी मुंबईत सार्वजनिक उपयोगाचं जे जे केलं, त्यासाठी त्यांनी त्याकाळच्या मुंबईकरांकडून वर्गणी जमवून केलं हे इतिहासात नमूद आहे. त्यालाच जागून त्यांनी मुंबईकरांना रेल्वेसाठी वर्गणी (कंपनीचे शेअर्स) घेण्याचं आवाहन केलं. त्यासाठी मोठमोठ्या जाहिराती लावण्यात आल्या. सुरूवातीला हा सरकारचा आपले पैसे लुबाडून लंडनला घेऊन जाण्याचा डाव आहे असं समजून लोकांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. दुसरं म्हणजे अशी काही गाडी असती तर आपच्या ज्ञानी ऋषी-मुनींमी ती अगोदरच सांगीतली असती अशी लोकांची भाबडी समजूत असल्यामुळे लोकांचा विश्वासही बसेना. शेवटी हे बघून कंपनीने स्वत:चं भांडवल म्हणून स्वत:चा काही हिस्सा टाकला. नाना, जमशेटजी, फ्रामजी बानाजी यांनीही काही शेअर्स घेतले व मग मात्र पुढे लोकांनी कंपनीचे शेअर्स घेतले.

पुरेसे भांडवल जमल्यानंतर सन १८५० मधे कंपनीच्या कामास सुरूवात झाली. दि. ३१ आॅक्टोबर १८५० रोजी मिस्टर विलोधवी यांच्या हस्ते शिव (आताचं अपभ्रष्ट नांव सायन) येथे रुळ टाकण्याची सुरूवात झाली व पुढं सर्वच काम त्वेरेने होऊन पुढच्या तीन वर्षांनी त्या रुळांवरून दि. १६ एप्रिल १८५३ या दिवशी रेल्वे, दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे’ धावलीसुद्धा..!

तत्पूर्वी १८५२ च्या आरंभास या मुंबईत धावण्यासाठी म्हणून एक महाकाय इंजिन मुंबईत अवतरल होतं. बंदरापासून भायखळ्यापर्यंत हे इंजिन रस्त्याने शेकडो मजुरांकरवी ओढत नेण्यात आलं होत. रसत्याने जाणाऱ्या त्या राक्षसासम भासणाऱ्या अगडबंद धुडाची वरात पाहाण्यासाठी हजारो मुंबैकर रसत्याच्या दुतर्फा जमले होते. एवढा अजस्त्र प्राणी वेगाने धावणार तरी कसा, असा प्रश्नही त्यांच्या चेहेऱ्यावर उमटला असणं शक्य आहे. तत्कालीन गव्हर्नर एवढाच हा प्राणी ताकदवान दिसल्याने असावं कदाचित, या इंजिनाचं नामकरण मुंबैकरांनी उत्स्फमर्तपणे ‘लाॅर्ड फाॅकलंड’ केलं असावं..!भायखळ्यानजिक इंजिनाच्या चाचण्या सुरू झाल्या. एव्हाना इथपर्यंत रुळ टाकून झाले असावेत. पुढच्या महिनाभरातच, म्हणजे १८ फेब्रुवारी १८५२ राजी हे इंजिन मुंबैकरांना पहिल्यांदा धवलं ते भायखळा ते परेल दरम्यान. 

१८ फेब्रुवारी १८५२ रोजी पहिलं इंजिन धावल्यानंतर पुढच्या १४ महीन्यांच्या कालावधीत आणखी तीन इंजिनं मुंबैत अवतरली असावित. कारण जेव्हा १६ एप्रिल १८६३ रोजी जी पहिली गाडी धावली, तिला सिंध, साहिब आणि सुलतान अशा तीन इंजिनांनी खेचली होती..! त्यात ‘लाॅर्ड फाॅकलंड’चा समावेश नव्हता. किंवा सिंध, साहिब आणि सुलतान यापैकी एका इंजिनाचं पहिलं नांव लाॅर्ड फाॅकलंड असावं. असं वाटण्याचं कारण म्हणजे १८५२ ला मुंबईत अवतरलेल्या पहिल्या इंजिनाचं ‘लाॅर्ड फाॅकलंड’ हे नामकरण जनतेने केलेलं होतं, ते त्याचं अधिकृत नांव नव्हतं.


आज या घटनेला १६७ वर्ष झालाी. मध्यंतरी १९५१ मधे ‘ग्रेट इंडीयन पेनिन्सुला रेल्वेचं’ नामकरण ‘मध्य रेल्वे’ असं करण्यात आलं.


वयाच्या १६८ व्या वर्षीही सुरुवातीच्याच उत्साहात धावणाऱ्या रेल्वेचा आपल्या देशाच्या आणि आपण देशवासीयांच्या विकासात अत्यंत महत्वाचा वाटा आहे. दिवसाच्या आणि रात्रीच्याही कोणत्याही प्रहरी, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या रेल्वेमार्गावरून, अनेक धर्म, नाना पंथ, शेकडो जातीच्या प्रवाशांना एकाच वेळी आपल्या पोटात घेऊन रेल्वे सतत धावत असते. रेल्वेतूव एकमेकाला एकमेकाशी बांधून ठेवणारा एक मिनी भारत सतत प्रवास करत असतो. भारताच्या अन् भारतीयांच्या विकासात महत्वाचा वाटा असणाऱ्या रेल्वेने, भारताची एकात्मता टिकवून ठेवण्यातही महत्वाची भुमिका बजावलेली आहे आणि त्यासाठीही आपण तिच्याप्रती कृतज्ञ असलं पाहिजे. त्याचसाठी हा लेखन प्रपंच..!!


-नितीन साळुंखे
9321811091
मूळ लेख 16.04.2017
पुनर्लेखन 16.04.2020.

संदर्भ-
1. मुंबईचा वृत्तांत -ले. मोरो विं शिंगणे व बापू आचार्य.
2. मुंबईचे वर्णन -ले. गोविंद मडगावकर
3. स्थल-काल-ले. डाॅ. अरूण टिकेकर
४. रेल्वेची रंजक सफर- डाॅ. अविनाश वैद्य

अत्यंत महत्वाची टिप-
‘HALT STATION INDIA’ हे श्री. राजेन्द्र आकलेकर यांनी इंग्रजीत लिहिलेलं पुस्तक, रेल्वेची दुनिया जाणून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पी.एचडी.च्या प्रबंधाच्या तोडीचं असलेलं हे पुस्तक, श्री. रोहन टिल्लू यांनी ‘कहाणी पहिल्या आगीनगाडीची’ या नांवाने अत्यंत ओघवत्या शैलित मराठीत अनुवादीत केलं आहे. आपण सर्वांनी ते अवश वाचावं, अशी माझी विनंती आहे.

श्री. उद्धवजी ठाकरे यांस खुले पत्र..!!

श्री. उद्धवजी ठाकरे
माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.

सस्नेह नमस्कार..!

कोरोनाचं संकट सर्वच देशावर, किं बहूना सबंध जगावर आलेलं आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने त्या संकटाचा सामना करतो आहे. आपल्या देशाचं नेतृत्वही सर्वशक्तीनिशी आणि उपलब्ध साधनांनिशी या संकटाचा सामना करतो आहे. आपलं महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही.

परंतु उद्धवजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या संकटाविरुद्धच्या लढाईत ज्या जिद्दीने उतरला आहात, त्याला तोड नाही. ह्या संकटाशी राज्याची आरोग्य यंत्रणा लढतेच आहे, त्याच वेळी या लढाईतलं प्रमूख सैन्य असलेल्या सामान्य जनतेला तुम्ही ज्या खाबिर्याने धीर देताय ना उद्धवजी, ते पाहून हे युद्ध तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकणारच, या विषयी माझ्या मनात तरी कुठलीही शंका नाही.

खरं सांगू का, मी आताशा, आपल्याला नसलेला रोग चिकटवण्याची अफाट क्षमता असणाऱ्या कोरोनाच्या टिव्हीवरच्या बातम्या पाहाणं बंद केलंय. पण तुम्ही टिव्हीवर दिसलात, की मी तिथे आवर्जून थांबतो. तुमचं सयत बोलणं मला आश्वस्त करतं. कुठेही पंतोजी उपदेश केल्याचा आव नसतो, की ढोंगी डायलाॅगबाजीचा, आक्रस्ताळेपणाचा लवलेश नसतो. तुमचं आश्वासक बोलणं उद्धवजी, संकटात सापडलेल्या एखाद्या कुटुंबाला, त्या कुटुंबाचा कुटुंबप्रमूख ज्या पद्धतीने, ‘मी आहे ना’ या तीन शब्दांनी धीर देतो ना, अगदी तस्संच वाटतं.

कोरोनाची लढाई प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक पातळीवर लढायची आहे आणि राज्यातील प्रत्येक नागरिक तशी ती लढतोही आहे. पण तसं वैयक्तिक पातळीवर लढतानाही, या लढाईत आपण एकटे नाही, तर आपल्या पाठीशी कुणीतरी खंबिरपणे उभं आहे., ही भावनाच त्या कुणाही एखाद्याला संकटाशी लढायला बळ देते. आज तशी भावना तुम्ही राज्यातल्या प्रत्येक सान-थोर नागरिकामधे जागवण्यात यशस्वी झाला आहात, असं मला तुम्हाला आवर्जून सांगावयं वाटतं. ज्याच्या खांद्यावर आश्वस्त होऊन मान ठेवावा असे तुम्ही आज आम्हा सामान्यांचे ‘बाप’ झालात..! बाप पाठीशी असल्यावर अंगी दहा हत्तींचं बळ येतं हो, कुठलंही संकट अंगावर घ्यायला मग माणूस तयार होतो..आम्ही आज जे लढतोय, त्या मागचा कार्यकारण भाव आपण आहात उद्धवजी..!

तुमच टिव्हीवरचं दिसणंच मोठं धीर देणारं असतं. अगदी तुमचा वेषही आम्ही सर्वसामान्य माणसं वापरतो तसाच, त्यात कुठही रंगीबेरंगी जॅकेटी दिखावूपणा नाही, कडक इस्त्रीच्या घडीचंही अंतर नाही. तुमच्याकडे अंगावर येणारी देहबोली नाही. तुम्ही केलेला साधा नमस्कारही तुमच्यातल्या सुसंस्कृत आणि नम्र माणसाची ओळख पटवून जातो. एका लयीत, परंतु ठाम शब्दांतलं, समजावून सांगणारं तुमचं बोलणं, तुमचं सज्जन वागणं आम्हाला धीर देतं. या संकटातही काही जण संधी शोधत असताना, परिस्थितीशी तुमचं प्रामाणिक असणं आम्हाला आवडतं. तुम्ही आम्हाला आमच्यातलेच वाटता. आमच्यातलाच एक माणूय कोरोना संकटाशी ज्या विजिगीषु वृत्तीने आमच्यासाठीच लढतोय, ते पाहून आम्हालाही लढायला बळ मिळतं उद्धवजी..!

कोरोनाशी मुकाबला करताना काही माणसं अजुनही सरकारच्या सुचना पाळताना दिसत नाहीत. अशांना तुम्ही वारंवार समजावता. पण तसं समजावताना, ती माणसं तशी का वागतात, याचाही तुम्ही विचार करता हे जाणवतं. विशेषत: मुंबईसारख्या शहरात, जिथे ७० टक्के जनता झोपडपट्टीत, १५०-२०० चौरस फुटाच्या घरात राहाते, सार्वजनिक स्वच्छता(?)गृहांचा वापर करतो, तिथे सोशल डिस्टंन्सिग पाळणं किती अवघड आहे, याची तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला कल्पना आहे. म्हणून असे विभाग आयसोलेट करताना, त्या विभागातील जनतेला कमीतकमी त्रास होईल याचीही दक्षता तुम्ही घेत असल्याचं मला जाणवतं. म्हणूनच कदाचित आणखी कठोर सैनिकी उपाय अद्याप आपण योजत नसावेत, असं मला वाटतं. अशा वस्त्यांमधे राहाणाऱ्या माणसांचा नाईलाज तुम्ही कुटंबवत्सलतेने समजून घेता, यातच तुमचं मोठेपण आहे.

उद्धवजी, राज्याचे मुखमंत्री म्हणून तुम्ही या राज्याची सुत्र हाती घेतलात, तेंव्हा एक अननुभवी व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसली म्हणून तुमच्यावर टिका झाली होती. तीन वेगवेगळी विचारसरणी असलेल्या पक्षांचं सरकार चालवण्यास उद्धव ठाकरे सक्षम नाहीत, अशीही कुजबूज होती. तुमच्या टिकाकारात मी ही होतो. पण, राज्यावर येऊन जेम तेम चार महिने होतायत न होतायत, तोवर जगावर, देशावर आणि पर्यायाने राज्यावर कोरोनाचं महासंकट आदळलं आणि आपण त्या संकटाला ज्या धिरोदात्तपणे आणि सर्वांना सोबत घेऊन तोंड देत आहात ते पाहाता, आपल्यावरची टिका चुकीची होती, हे मला कबूल करायला आवडेल. अर्थात यात आरोग्यमंत्री श्री. राजेशजी टोपे आणि सरकारात सामील असलेल्या सर्वपक्षियाॅचं आपल्याला या संदर्भात मिळत असलेलं सक्रीय सहकार्य याचाही मोलाचा वाटा आहे, याची मला कल्पना आहे. परंतु यातंही आपलं कर्तुत्व दिसून येतं आणि ते म्हणजे तुम्ही जसा आम्हा सामान्यांचा विश्वास संपादन केला आहात, तसाच आपल्या सहकाऱ्यांचाही विश्वास संपादन करण्याच यशस्वी ठरला आहात. ज्याचं श्रेय त्याला दिलं, की देणारा आपोआप आदरास प्राप्त होतो. तुमच्याबद्दल तसंच झालंय..!

राज्याचे आरोग्यमत्री श्री राजेश टोपे हे देखील आपल्या खांद्यास खांदा लावून या लढाईत उतरले आहेत. ते ही अतिशय सक्षमपणे सांप्रत परिस्थिती हाताळत आहेत. आपणही मुख्यमंत्री या नात्याने, त्यांना मायलेज मिळेल असा कोता विचार न करता, त्यांच्या कामात संपूर्ण स्वतांत्र दिलेलं दिसून येतं. हे तुमचं मोठेपण. उपमुख्यमत्री श्री. अजितदादा पवार, गृहमंत्री श्री. अनिल देशमुख व इतरही मंत्रीगण आपापलं काम चोख बजावतायत आपणही त्यांना पुरेशी मोकळीक व ते करत असलेल्या कामाचं श्रेय हातचं न राखता देत आणि म्हणूनच आपलं मोठं अनुनही जमिनीवर असलेल साधेपण अधिक उठून दिसत आहे..!

उद्धवजी, एखाद्या नेत्याला वा कुणाही व्यक्तीला उद्देशून जेंव्हा सार्वजनिक लेखन केलं जातं, तेंव्हा त्यांच्या नांवापुढे ‘जी’, ‘साहेब’ वा तत्सम उपाध्या लावू नयेत असा संकेत आहे आणि असं लेखन करताना मी तो संकेत कटाक्षाने पाळत आलोय. मात्र आज मी तो संकेत मोडलाय. म्हणजे माझ्याकडून तो मुद्दामहून तोडला गेलेला नाहीय, तर तसं ते आपसूक झालंय. अगदी सहजपणे. म्हणजे, कुठल्याही मराठी माणसाने, कुठूनही ‘छत्रपती शिवाजी महाराज की’ असे शब्द ऐकले, की त्याच्या तोंडून ज्या सहजतेने ‘जय’ असे शब्द येतात, त्याच सहजतेने आज माझ्याकडून आपल्यासाठी, आपल्या नांवाच्या मागे ‘जी’ ही उपाधी लिहिली गेलीय. ही उपाधी ‘जी जी’ ची हुजरेगिरी नाही, तर गेले काही दिवस आपण आपल्या राज्यातील जनतेला ‘कोरोना’चा सांसर्ग होऊ नये यासाठी ज्या तळमळीने धडपडता आहात, त्या तळमळीला, तुमच्या संवेदनशीलतेला माझ्या मनाने केलेला हा मुजरा आहे..!!

तुमच्या नेतृत्वाखाली सामान्य जनता लढत असलेली ही जीवघेणी लढाई आपण जिंकणार आहोत. नक्की जिंकणार आहोत उद्धवजी..!!

धन्यवाद उद्धवजी, मनापासून धन्यवाद..!!

-नितीन साळुंखे
9321811091
10.04.2020
salunkesnitin@gmail.com
http://www.nitinsalunkheblog.wordpress.com

सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं; तारतम्याची गरज..!

सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं; एक तारतम्य..

मी सोशल मिडीयावर सिहीतो. खूप लिहितो. बऱ्याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही आणि पुन्हा या विचारांचा तसा काही उपयोगही नाही (असं त्याचं मत). सध्या ‘प्रोफेशनलिझम’ची चलती असल्यामुळे, उपलब्ध वेळेचं रूपांतर जास्तीत जास्त पैसे मिळवण्यात कसं करता येईल याच्याच विचारात सर्व असतात, त्यामुळे फुकट विचार करायला वेळ का घालवायचा, असा त्यांचा विचार असेल तर तो चुकीचाही म्हणता येणार नाही.

पैसे कमावण्यापुढे इतरही काही विचार असतात वैगेरे गोष्टी बहुतेकांच्या गांवी नसतं. मी तर असंही एकलंय, खरं खोटं माहित नाही, की बडे ‘प्रोफेशनल’, ज्यांना लिफ्टमधे भेटल्यावर आपण ‘गुड मॉर्निंग, कसे आहात’ असं विचारलं तरी तेवढ्या वेळेचं कॉन्फरन्सचं बील पाठवतात. अशी सर्व परिस्थिती असताना, मनातले विचार मग मनातच जिरून गेले तर त्यात नवल ते काय..! आणि बाहेर पडू पाहाणारं काहीही ‘जिरवणं’ तब्येतीला चांगलं नसतं, असं वैद्यकशास्त्र सांगतं. असं असूनही आपण कितीतरी गोष्टी जिरवत असतोच की, मग विचार जिरवले तर काय एवढा मोठा फरक पडणार आहे? पण ते तसं नाही. पोटातल्या जिरवण्यावर औषध आहे, मात्र मानतल्या जिरवण्यावर औषध नाही..

निसर्गाचं एक तत्व आहे, ‘युज इट ऑर लूज इट’. आपल्याला निसर्गाने दिलेला प्रत्येक अवयव किंवा अक्कल, जिला सॉफिस्टीकेटेड भाषेत बुद्धी असंही म्हणतात, त्याचा वेळोवेळी वापर करणं गरजेचं असतं, न पेक्षा तो अवयव किंवा ती क्षमता नाहीशी होते. आपली शेपटी किंवा अंगावरील केस असेच नाहीसे झालेत.(थोडं विषयांतर. स्त्रीया विविध तऱ्हेने केसांची स्टाईल करून केसांचा सतत उपयोग करतात म्हणून त्यांचे केस लंबे और घने असतात आणि बहुतेक पुरूष दिवसातून एकदा किंवा दोनदाच, आरशात न बघता, डोक्यावरून –केसांतून नाही- कंगवा किंवा हात फिरवतात म्हणून तर त्यांचे केस जातात, असंही ‘युज इट ऑर लूज इट’ असेल का?). तर, जसा आपण आपल्या सर्वच अवयवांचा कारणपरत्वे उपयोग करतो, तसा जीवनातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यासाठी बुद्धीचाही उपयोग करणं गरजेचं असतं. माझं कोण ऐकणार म्हणून विचार जिरवण्यापेक्षा, कोण काय म्हणेल याचा विचार न करता ते व्यक्त करणं गरजेचं असतं असं मी समजतो. पूर्वी हे व्यक्त करण बरचसं होत होतं कारण माणसं एकमेकांशी मोकळेपणाणं बोलायची. पण तंत्रज्ञानाची आणि आर्थिक क्षमतेची जस जशी प्रगती होत गेली, तस तशी माणसा मानसांमधली संवादता कमी कमी होत गेली आणि अर्थातच त्यांचं व्यक्त होत जाणं कमी कमी होत गेलं. सध्यातर कानातले इअर फोन आणि मोबाईलच्या वाढत्या स्क्रिनमधे खुपसलेल्या डोळ्यांमुळे प्रत्येक माणूस एक हवाबंद डब्बा झालाय की काय, असं वाटावं अशी परिस्थिती आहे. कान आणि डोळे ही महत्वाची ज्ञानेंद्रीय आहेत आणि तिच बंद म्हटल्यावर माणसं विचार करतात की नाही याचीच शंका येते, तिथे ते व्यक्त करणं तर बहुत दूर की बात वाटते..

पण, कान-डोळे बंद असले तरी विचार सुरुच असतात. त्या विचारांचे विषय मर्यादीत असतील, पण त्यावर नकळत विचार सुरु असतात. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. (पुन्हा थोडसं विषयांतर. तसे कुत्री-मांजरंही विचार करतात असं माझं निरिक्षण आहे. एखादा कुत्रा घाईघाईत कुठेतरी निघालेला दिसतो आणि तो मधेच क्षणभर थांबतो आणि दिशा बदलतो किंवा परत फिरतो. तो क्षणभर थांबून काहीतरी विचार करुन परत जातो, असं मला अनेकदा वाटतं). माणसाच्या मनात येणारे हे विचार कुणाकडे व्यक्त करण्याचीही सोय राहिलेली नाही. अशा तुंबलेल्या वैचारिक परिस्थितीत सोशल मिडिया अवतरला आणि माणसं व्यक्त होती झाली.

मी ही तोच मार्ग पत्करला. मनातले विषय मनातच जिरवण्यापेक्षा मी सोशल निडीयावर व्यक्त होऊ लागलो. अनेकांना माझं लिखाण आवडतं, तर काही जणांना नाही. आता आपण लिहीलं, म्हणजे ते सर्वांना आवडायलाच पाहिजे असा काही नियम नाही आणि माझा तसा आग्रहही नाही. पण व्यक्त होणं माझ्यासाठी गरजेचं, म्हणून मी वेळोवेळी मला पटलेल्या व माझ्यावर येऊन आपटलेल्या, परंतु न पटलेल्या विचारांवर, विषयांवरही व्यक्त होत असतो.

सोशल मिडिया माझ्यासारख्या अनेकांसाठी वरदान आहे हे खरय. सोशल मिडीयाने अनेकांच्या सुप्त गुणांना वाव दिला, हे ही खरं आहे. अनेक लोक इथे लिहिते झाले आणि लोक विचार(?) करत नाहीत हा माझा समज अ(र्ध)सत्य ठरतोय असं वाटू लागलं. आपले विचार कुठेतरी छापून यावेत हे लिहीणाऱ्या प्रत्येकाला मनापासून वाटत असतं. सोशल मिडीया अवतरण्यापूर्वी आपलं काहीचरी छापून येण्याचा केवळ वर्तमानपत्र किंवा एखादं साप्ताहिक/मासिक एवढेच एक-दोन मार्ग उपलब्ध असायचे. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणंही तेवढंच अवघड असायचं. पुन्हा पोचलोच तिथपर्यंत, तर मग त्या पेपर किंवा मासिकाचा ‘विचार’ आपल्या लेखनाच्या ‘विषया’शी जुळणारा असेल तर ठीक, अन्यथा सर्व ‘साभार परत’. अशावेळी मग शाळा-कॉलेजची हस्तलिखीतं किंवा पेपरमधला वाचकांचा पत्रव्यवहार हाच मार्ग शिल्लक राहायचा. तो ही प्राप्त नाही झाला तर मात्र पास अथवा नापास असा कोणताही शेरा असलेली मार्कशिट हा मात्र आपलं नांव, ‘विषय’ आणि (ना)लायकाीही छापून येण्याचा हमखास मार्ग होता.

अशा साचलेपणाच्या वेळी नेमका व्हाट्सअॅप, फेसबुकसारखा सोशल मिडीया अवतरला आणि माझ्यासारख्या अनेकांना व्यक्त होण्यासाठी एक हक्काचं व्यासपिीठ मिळालं.

सोशल मिडीयाने अनेकजणांना लिहित केलं. खरंच, काय आवाका असतो एकेकाच्या/ एकेकीच्या प्रतिभेचा..! एकच गोष्ट किती आयामातून बघता येते हे सोशल मिडीयामुळे कळलं. यामुळे आपल्याही विचारांची कक्षा रुदावल्यासारखी होते व आपल्या सर्नानाच असलेल्या बुद्धीचं रुपांतर हळुहळू अकलेमधे होत जातं. बुद्धी उपजतंच असते, अक्कल मात्र दाढेसोबत नंतर फुटते..!

मी ही सोशल मिडीयामुळे लिहीयला लागलो. पहिल्या परिच्छेदाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे माझे म्हणून जे काही विचार आहेत, ते कोणाला पटोत वा न पटोत, ते सोशल मिडीयावर मोकळेपणांने मांडता यायला लागले. माझ्या मनात विचाराचा बराच गुंता असल्याने सोशल मिडीयावर माझ्या लेखनात त्याचं प्रतिबिंब पडणं सहाजिकच होतं. म्हणून कदाचित माझ लेखन काहीस जड व समजण्यास अवघड असं होत असावं याची मला कल्पना आहे. आश्चर्य म्हणजे माझ्या जड जड विचारांशी सहमत असणारेही बरेच मित्र/मैत्रीणी भेटल्या. बद्दकोष्ठाची औषधं आवडीने घेणारी माणसंही असतात, याचा साक्षात्कार सोशल मिडीयामुळे झाला.

मी अभ्यास करून लिहितो हे अनेकांचं म्हणणं आहे आणि ते खरंही आहे. मला अभ्यास केल्याशिवाय लिहिता येत नाही, कारण मला बुद्धी असली तरी तेवढीशी अक्कल मात्र नाहीय. आणि अभ्यास करून लिहायला कुठं अक्कल लागते? वर्षभर घोकंपट्टी करून परिक्षेचा पेपरात ओकंपट्टी करण्यासारखंच असतं ते. सोशल मिडिया आणि परीक्षेचा पेपर यात फरक एकच, इथं परिक्षा नसते व इतक्या ओळीत उत्तर लिहा अशी धमकीवजा सुचनाही नसते..! आपल्याला वाटेल ते व पटेल ते आणि कितीही लहान-मोठं लिहीता येते. पुन्हा यात मार्कांची स्पर्धा नसते हा फायदा.

पण अभ्यासपूर्ण लिखाणापेक्षा मला मनापासून कौतुक वाटत ते कविता –कथा-व्यक्तिचित्र लिहिणाऱ्यांचं..! यासाठी खरी प्रतिभा लागते. कल्पनाशक्ती लागते. जे अमूर्त आहे त्याला मूर्तरुप देणं ही खरी प्रतिभा. सर्वाना समान उपलब्ध असलेल्या मुळाक्षरातल्या ५२(कदाचित ५३-५४ही असतील हो, माहित नाही) अक्षरांची मांडणी हे प्रतिभावंत अशा पद्धतीने करतात की, ज्याचं नांव ते..! थोडक्या शब्दांत काय मोठा आशय सांगून जातात..! म्हणून कुठलेतरी जुने ग्रंथ वाचून वैचारीक लिहीणाऱ्यांपेक्षा, कल्पनेच्या स्वच्छंद आणि अचाट भराऱ्या मारणाऱ्या कवी-कथाकारांच मलाही मनापासून कौतुक वाटतं. खर तर हेवा वाटतो. आपल्यालाही तसं लिहिता यायला हवं असंही वाटत, मी तसा प्रयत्नही करतो, पण नाही जमत हेच खरं..! सोशल मेडिया नसता तर हे प्रतिभावंत कसे भेटले असते कुणास ठावूक..! मी तर मला स्वत:ला पार एवढासा समजतो या गिफ्टेड लोकांपुढे..!!

सोशल मिडीयाच्या वरदानामधे मोठी अडचण असते ती फाॅरवर्डेड मेसेजेसची. कुठले मेसेज फाॅरवर्ड करायचे आणि कुठले नाही, हे समजण्यासाठीही थोडीशी बुद्धी लागते. एक मान्य, की सर्वानाच लिहायला जमतं असं नाही, पण फाॅरवर्ड काय करावं आणि काय नाही हे समजायला, मला वाटतं फार बुद्धी लागत नसावी. बरं, मेसेज फाॅरवर्ड करताना त्या मेसेजचं खरं-खोटेपण पडताळून पाहायला किती वेळ लागतो? हातातल्या स्मार्टफोनच्या ब्राऊजर मधे त्याची माहिती मिळू शकते. पण नाही, तेवढं सुचत नसावं. किंवा सुचलं तरी तेवढी सवड नसावी. फोन बुद्धीमान झाला आणि माणूस मात्र बुद्धूच राहीला. ‘पयला मेसेज आपलाच जायला पायजे’ या भुमिकेतून कणभर खरं अन् मणभर खोटं पुढे ढकललं जातं. बरं, तसं करतानाही त्या मेसेजबद्दल आपलं मत काय आहे, हे दोन ओळीत लिहायला काय हरकत आहे? असं केलं तर एकच मेसेज आणखी दहा जणांकडून आल्यास, तो मेसेज एकच असला तरी त्याबद्दल दहा वेगळी मतं वाचायला मिळू शकतात. दोन ओळीत आपलं मत लिहा आणि मेसेज फाॅरवर्ड करा, बघा एकाच मेसेजचं स्वरुप किती वेगळं होतं ते..! दोन ओळी लिहीण्यायेवढी बुद्धी तर देवदयेने सर्वांकडेच आहे. पण तेवढं तारतम्य बाळगताना कुणी दिसत नाही. ‘लोक विचार करत नाहीत हा माझा समज अ(र्ध)सत्य ठरतोय असं वाटू लागलं’ असं वर म्हणताना ‘विचार’ शब्दाच्या पुढे कंसात जे प्रश्नचिन्ह टाकलंय, ते यामुळेच..!

सर्वात जास्त विट आणतात ते सुविचार. सकाळ, दुपार, संध्याकाळ सुविचारांचा जो मारा सुरु असतो, त्यामुळे जगात सर्वच आनंदी आनंद आहे, लोकांचं वागणं नैतिकतेचं आहे वैगेरे वाटायला लागतं आणि प्रत्यक्ष अनुभव मात्र उलटा येतो. काहीजण खरंच छान लिहितात. विशेषत: स्त्रीया खुप छान व्यक्त होतात. बहुतांश पुरुष मात्र, विषय कोणताही असो, शेवट करताना मात्र राजकारणात अडकून हमरातुमरीवर येताना दिसतात.(राजकारणही त्याच नीच पातळीवर गेलंय म्हणा. शेवटी समाजाचंच प्रतिबिंब तिकडे दिसतं.)

सोशल मिडीयाचा वापर तारतम्याने करणं गरजेचं आहे. त्यातील नाविन्य टिकवलं नाही तर त्याचं महत्व हरवून लोक कंटाळण्यास वेळ लागणार नाही आणि म्हणून त्यातील नाविन्य टिकवणं सर्वस्वी आपल्याच हातात आहे. इथं तारतम्य वापरणं गरजेचं आणि सर्वांच्या हिताचंही आहे.

-नितीन साळुंखे

9321811091

मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवणारा एक रस्ता..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवणारा एक रस्ता..

मुंबईतील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांना स्वतःचा असा इतिहास आहे..मुंबईवर राज्य केलेल्या (आताच्या नाही, पूर्वीच्या) राज्यकर्त्यांप्रमाणेच मुंबईतील काही रस्त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यात अहं भूमिका बजावलेली आहे..या रस्त्यांच्या निर्मितीची एक स्वतंत्र कथा आहे तश्याच याच्या शेजारी असलेल्या वास्तुंच्याही कथा-कहाण्या आहेत..

आपल्याला व्यवसाय-धंद्यानिमित्त अनेक ठिकाणी फिरावं लागत..आपण ज्या रस्त्यावरून रोज ये-जा करतो त्या रस्त्याचे ऐतिहासिक महत्व आपल्या लक्षात येत नाही..हे दुर्लक्ष नव्हे कारण आपल्याला त्याची माहिती नसते..असाच एक आद्य रस्ता मुंबईला बृहन्मुंबई बनवण्यास कारणीभूत आहे..तो आता निवृत्त झालेल्या वयोवृद्ध माणसासारखा शांत होऊन एका बाजूला पहुडलेला आहे..या रस्त्याला फारशी वर्दळ नसते..पिक अवर्सला, शाळांच्या वेळात काय वर्दळ असेल तेवढीच..बाकी सर्व शांत, शांत..!

दादर टी.टी. वरून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने ठाण्याच्या दिशेने निघालो की प्रथम आपण पोहोचतो तो सायन हॉस्पिटलच्या समोर..आता फ्लाय ओव्हर सोडून आपण खालच्या रस्त्याने निघालो की आपण थेट पोहोचतो ते इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या तोंडाशी. इस्टर्न एक्सप्रेस हायवे सायनला जिथून सुरू होतो, त्याच्या वीस-पंचवीस पावलं अलिकडे आपल्या डाव्या हाताला हायवेपासून फुटून एक रस्ता जाताना दिसतो..हा रस्ता चुनाभट्टीला, म्हणजे आताच्या हार्बर रेल्वेच्या ‘चुनाभट्टी’ या स्टेशनाकडे, जातो व पुढे कुर्ल्याला मिळतो..हाच तो मुंबईला ‘बृहत’ बनवून तीला उपनगरांची जोड देण्यास कारणीभूत ठरलेला मुंबईचा ऐतिहासीक रस्ता, ‘सायन काॅजवे’..! याचं आताचं नांव ‘एन.एस.मंकीकर मार्ग’..

आता थोडसं मागच्या काळात जाऊ.. १६६१ मध्ये पोर्तुगीजाकडून मुंबई बेट ब्रिटीशांच्या ताब्यात आली. मुंबईची हद्द तेंव्हा माहीम-सायनपर्यंतच मर्यादित असून त्यापुढच्या मिठी नदी (माहीमची खाडी) पलीकडील ठाणे-वसई व पुढचा भूभाग ‘साष्टी’म्हणून ओळखला जायचा व या विस्तृत भूभागावर पोर्तुगीजांच राज्य होतं. एका अर्थाने मिठी नदी म्हणजे ब्रिटीश व पोर्तुगीज यांच्या राज्यामधील नैसर्गिक हद्द होती..आपल्या हद्दीच्या रक्षणाकरिता ब्रिटीशानी मिठीच्या दक्षिण तीरावर सायन, धारावी व पश्चिमेस माहीम असे तीन किल्ले राखले होते ते त्यासाठीच..सन १७३९ मध्ये चिमाजीअप्पांनी पोर्तुगीजांकडून साष्टी हस्तगत केली आणि या बेटांवरचा पोर्तुगीज अंमल संपून मराठ्यांचं राज्य आलं…पुढे काही वर्षांनी सन १७७५ मध्ये रघुनाथराव पेशव्यांशी झालेल्या एका करारान्वये साष्टीची बेट व्यापाराकरिता म्हणून ब्रिटीशांच्या ताब्यात देण्यात आली..हा संपूर्ण इतिहास हा स्वतंत्र विषय असल्याने त्याचा इथे विचार केलेला नाही..

साष्टीचा भूभाग ब्रिटीशांच्या ताब्यात तर आला परंतु मधल्या मिठी नदीच्या विस्तृत पात्रामुळे साष्टीमधील वांद्रे-कुर्ला व त्यापलीकडील परिसराशी संपर्क साधनं तेवढ सोप्प नव्हत..साष्टीशी त्वरित संपर्कासाठी मधली खाडी बोटीने पार करून पलीकडे जाण शक्य असलं तरी प्रॅक्टीकल नव्हतं..आता ब्रिटीशांना या खाडीवर कायमस्वरूपी रस्त्याची किंवा पुलाची निकड ब्भासू लागली आणि बऱ्याच विचारानंतर कंपनी सरकाने खाडीत ( नदीत) भरणी करून रस्ता -काॅजवे- बनवायचा निर्णय घेतला..ब्रिटीशशासीत मुंबईच्या मुळ सात बेटांमध्ये भरणी घालून बेटं जोडण्याचं काम याच सुमारास बऱ्यापैकी पुर्ण होत आलं होतं..

सायन काॅजवे बांधण्याचा निर्णय झाला तेंव्हा मुंबईचा गव्हर्नर होता जोनाथन डंकन. जोनाथन डंकनने हा रस्ता सन १७९६ मध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आणि कामास सुरुवात केली..आर्थिक अडचणी, प्रशासकीय दिरंगाई तेंव्हाही होती..नेमका त्याच दरम्यान, म्हणजे १८०२-१८०३ च्या दरम्यान देशात मोठा दुष्काळ पडला होता. लोकांचे तांडेच्या तांडे देशभरात अन्नाच्या शोधात निघाले होते. त्यातलेच काही लोक मुंबईच्या हद्दीत येऊन थडकले..इथे पैशांच्या अभावी रस्ता बांधायला विलंब होत होता..मोठ्या प्रमाणावर दुष्काळी भागातून आलेले लोक पाहिल्यावर जोनाथन डंकनच्या डोक्यात या लोकांकडून अन्नाच्या मोबदल्यात रस्त्याचे काम करून घेण्याची कल्पना अली आणि बघता बघता पुढच्या दोन-तीन वर्षात, सन १८०५ साली हा रस्ता बांधून तयार झाला आणि मुंबई बृहन्मुंबई होण्याच्या दिशेने सुसाट सुटली..पुढच्या काळात साष्टीतील ठिकाणं मुंबईची उपनगर म्हणून ओळखली जाऊ लागली त्याची सुरुवात या रस्त्याने केली..हा रस्ता मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवण्यास कारणीभूत ठरला..जोनाथन डंकनचा सन्मान म्हणून या रस्त्याला ‘डंकन-सायन काॅजवे’ असं सार्थ नांव देण्यात आलं..आज नांव जरी बदललं असलं तरी हा रस्ता अजुनही ‘डंकन काॅजवे’ म्हणूनच ओळखला जातो..

या रस्त्यच्या सायन बाजूकडे काही वर्षांपूर्वीपर्यंत एक संगमरवरी कोनशीला होती व त्यावर या रस्त्याच्या निर्मितीची व निर्मात्याची थोडक्यात माहिती होती..ही पाटी सध्या गायब आहे..आपल्या महानगरपालिकेने रस्ता दुरुस्तीच्या वेळेस ती काढून टाकली असावी बहुदा..त्या पाटीचा माझा शोध सुरूच राहाणार आहे.

‘रोजगार हमी’तून बांधला गेलेला देशातील हा पहिला रस्ता असावा..अर्थात तेंव्हा शब्द जन्माला आला नव्हता..दुष्काळी भागातून आलेल्या मजुरांकडून हा रस्ता बांधण्यासाठी तेंव्हा ५०,५७५ रुपये खर्च आला. हाच रस्ता सरकारी पैशाने बांधला गेला असता तर किमान दीड-दोन लाख रुपये खर्च आला असता असा उल्लेख बहुतेक सर्व जुन्या पुस्तकांतून आढळतो..

हा रस्ता बांधण्यासाठी सरकारला आलेला खर्च वसूल करण्यासाठी ‘टोल’ आकारला गेलेलाही हा देशातील पहिला रस्ता म्हणायलाही हरकत नाही..या रस्त्यावरून वरून येणाऱ्या बैल किंवा घोडागाडीला जोडलेल्या बैल किंवा घोड्यांच्या संख्येवर टोल आकारला जायचा..पुढे सन १८३१ सालात सरकारच्या लक्षात आले की या रस्त्याला आलेला खर्च कधीचाच भरून निघाला आहे, तेंव्हा सरकारने ताबडतोब यावरील टोल बंद करून टाकला..टोल बंद करण्याची सूचना या टोल नाक्यावर वसुलीचे काम करणाऱ्या एका साधारण ब्रिटीश कामगाराने केली होती हे विशेष..! आजच्या पार्श्वभूमीवर हे चित्र जरा विपरीत वाटते ना?

आणखी एक..सायनच्या मुख्य रस्त्यावरून आपण जेंव्हा या रस्त्यावर जायला डावीकडे वळतो, त्याच कॉर्नरवर आपल्याला एक जुनाट, पडीक अवस्थेत असलेलं सरकारी पिवळट रंगच घर दिसत. हे बहुतेक जूनं टोल वसुलीचं ऑफिस असावं किंवा मग सायन स्टेशन जवळची आयुर्वेदिक कोलेजची रस्त्यालगतची इमारत टोलचं कार्यालय असाव अशी दाट शंका येते..काही पुस्तकांत हे कार्यालय सायन पोलिस स्थानकाच्या शेजारी असल्याचाही उल्लेख आहे..याचीही नीट माहिती मिळत नाही..

हा रस्ता बांधला गेला आणि मुंबईमध्ये पार ठाणे, कल्याण व त्याही पुढेपासून लोकांची व मालाची आवक व्हायला सुरुवात झाली..मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व्हायला खरी सुरुवात झाली ती या रस्त्यामुळे.. माहिमचा कॉजवे त्याच्या खूप नंतर म्हणजे सन १८४३ ला बांधला गेला व रेल्वे त्याच्याही नंतर म्हणजे १८५३ साली सुरु झाली..इस्टर्न एक्सप्रेस हायवे व पश्चिमेचा सीएसटी रोडही नंतरच बांधला गेला.

असा हा एके काळचा मुंबई-साष्टी जोडणारा, वर्दळीचा महामार्ग आता मात्र निवृत्त होऊन शांतपणे एका बाजूला पहुडला आहे..अतिवर्दळीचं, गोंगाटाचं, ट्राफिक जामचं सायन अगदी लगटून असूनही त्या वर्दळीचा याच्याशी काहीच संबंध राहिलेला नाही..कधी जमल्यास, कृतज्ञता म्हणून, थोडीशी वाकडी वाट करून या रस्त्यावरून एक फेरफटका जरूर मारून या, त्यालाही बरं वाटेल..!!

जाता जाता –

याच रस्त्यावर सायन पासून पुढे आलो की काही अंतरावर आपल्या उजव्या हाताला एक पुरातन शिवमंदिर दिसतं..या मंदिराला लागून एक तळंही आहे..हे शिवमंदीर अतीप्राचीन असल्याचं सांगितलं जातं..सायनच मूळ नांव ‘शिव’ असून इंग्रजांनी त्यांच्या स्पेलिंग मध्ये “SION” असं केलं हे आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे..(उदा. ‘गांवकर” ची स्पेलिंग सरळ ‘Gavkar’ अशी न करता ‘Gaonkar’ केली, तसं झालाय हे बहुतेक. कदाचित अनुनासिक उच्चारामुळे असाव..पण मग ‘शिव’मध्ये अनुस्वार कुठेच नसताना असं का झालं असाव? ). माझ्या मते सायनच मुळ नांव ‘शिव’ म्हणजे भगवान शंकरावरून आल असावं व त्याला कारणीभूत हे प्राचीन मंदिर असावं..कारण आपण ‘शीव’ हे मूळ नांव समजतो ते ‘हद्द’ या अर्थाने परंतु ‘हद्द’ असण्यासाठी मुळात कोणाचे तरी राज्य असावे लागते..मुंबईचा राजकीय इतिहास पाहता मुंबईवर व शेजारील साष्टीवर अनेक घराण्यांनी, शाह्यानी, युरोपियनानी वेळोवेळी राज्य केलेलं लक्षात येत..त्या सर्वांची हद्द वेळोवेळी बदलत होती. राज्य कोणाचंही असलं तरी ह्या भागात त्या काळात कोळी समाजाची व ती ही तुरळक वस्ती असावी आणि त्यांची बोली लक्षात घेता ते हद्दीला ‘शीव’ न म्हणता ‘वेस’ म्हणत असण्याचीच शक्यता जास्तं वाटते..याचाच अर्थ ब्रिटिशानी केलेली Sion अशी स्पेलिंग ‘शीव’ची म्हणजे हद्दीची नसून ‘शिव’ची म्हणजे शंकराची असावी..मसजिद व सांताक्रुझ ही अशीच आणखी दोन उदाहरणं.।!!

ज्या जोनाथन डंकनने हा रस्ता बांधला तो डंकन हा ‘हिंदू डंकन’म्हणून प्रसिद्ध होता. ह्याची आपल्या हिंदू धर्मशास्त्रावर अमाप श्रद्धा होती..ह्याच डंकनन वाराणसी येथील संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता..देशात होणाऱ्या भ्रुणहत्या थाबवण्यासाठी कायदा करण्यास प्रथम सुरूवात करणारा जोनाथन डंकनच होता..असा हा जोनाथन डॅकन मुंबईतील फोर्ट विभागात असलेल्या ‘गव्हर्नर हाऊस’मध्ये १८ आॅगस्ट १८११ रोजी मरण पावला..आपल्या मृत्यू पश्चात आपल्या समाधीवर एखाद्या ‘हिंदू’चा पुतळा कोरण्यात यावा अशी इच्छा डंकनने प्रदर्शित केली होती व त्यानुसार त्याच्या समाधीवर एका ‘हिंदू’ पंडीताची प्रतिमा संगपरवरी म्युरल रुपात कोरली गेलीय आणि ती आपल्याला चर्चगेटच्या सेंट थोमस चर्चमध्ये आजही बघायला मिळते….हिंदू माणसाचं म्युरल एका ख्रिस्ती माणसाच्या समाधीवर धारण करणारं सेंट थॉमस हे जगातील बहुदा एकमेव चर्च असावं आणि असं करणारा डंकनही पहिला व शेवटचा ख्रिश्चन असावा ..! आपणही एकदा या चर्चमध्ये जाऊन हे सर्व प्रत्यक्ष बघून यावं..

सोबत डंकनच्या चर्चमधील समाधीवर असलेलं ‘हिन्दू’ म्युरलचा मी काढलेला फोटो देत आहे..

-नितीन साळुंखे
9321811091

संदर्भ –
१. ‘मुंबईचे वर्णन’, ले. गोविन्द माडगावकर -१८६२
२. ‘मुंबईचा वृत्तांत’, ले. शिंगणे – आचार्य १८९३
३. ‘स्थल-काल’, ले. अरुण टिकेकर -२००४

टिप-

  1. ब्रिटीशांच मुंबईवर राज्य होत म्हणजे फक्त पश्चिमेस माहीम व पूर्वेस सायन एवढ्याच भूभागावर त्याचं राज्य होत..तेंव्हा मुंबई एवढीच होती आणि आजही महानगर पालिकेच्या रेकॉर्डवर मुंबई एवढीच आहे..पश्चिम रेल्वेवरील वांद्रेपासून पुढे व मध्य रेल्वेवरच्या कुर्ल्यापासुनची पुढची सर्व ठिकाण उपनगर म्हणून अधिकृतरीत्या ओळखली जातात..
  2. मुंबई हे सर्वांचं आश्रयस्थान आहे असं सर्वच म्हणतात परंतु मुंबई हे माझे घर आहे असं म्हणताना सहसा कोणी आढळणार नाही..आपल्या घराची जशी आपण आपुलकीने देखभाल करतो, त्याला जपतो, घराचा इतिहास जपला जातो, अभिमानाने मिरवला जातो.. धर्मशाळेबाबत अशी कोणतीच भावना कोणाच्या मनात नसते..आपल्या मुंबईचं नेमकं हेच झालंय.।
  3. चिमाजीआप्पा ते रघुनाथराव या काळातला इतिहास प्रदीर्घ मोठ्या सखोल अभ्यासाचा विषय आहे. परंतु तो आपला विषय नसल्याने इथे त्याचा केवळ संदर्भासाठी उल्लेख केलेला आहे..

-नितीन साळुंखे
9321811091

मुंबईला ‘तिची जमीन’ देणारा एक रस्ता..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा-

मुंबईला ‘तिची जमीन’ देणारा एक रस्ता आणि मुंबईतल्या उच्चभ्रूंच्या ‘ब्रीच कँडी’ची जन्मकथा..–

प्राचीन काळा पासून मानव शहर वसवत आलाय..बरीशी जागा, आजूबाजूला पाण्याची सोय बघायची आणि वसती करायची हा पुरातन परिपाठ आहे..प्राचीन हरप्पा किंवा मोहोन्जादारो शहर असतील किंवा अगदी आता-आता पर्यंत वसलेली शहर असोत, अगदी याच पद्धतीने त्यांची निर्मिती झाली आहे..या सर्व शहरात आणि मुंबई शहरात एक जमीन अस्मानाचा फरक आहे आणि तो म्हणजे मुंबईला वसण्यासाठी तिची, स्वतःची अशी जमीनच नव्हती..पाच लहान-मोठी बेटं, त्यात भरतीचं पाणी शिरलं की ती सात दिसायची, अश्या मुंबई नामक बेटा-बेटांच्या ओसाड टापूचं एक जागतिक दर्जाच महानगर बनतं हे आश्चर्याच आहे..आणि हे आश्चर्य घडवून आणलं ते सायबाच्या पोरानं..!

इंग्रजांच्या ताब्यात मुंबई यायच्या अगोदरही मुंबईवर अनेक राजे-सुलतान व पोर्तुगीजांसारख्या युरोपियनांचे राज्य होतं परंतु या कोणाच्याही मनात मुंबईची बेटं जोडून एकसंघ शहर करावे असे आले नाही..कदाचित आलेही असेल परंतु त्याकाळची राजकीय अस्थिरता आणि द्रव्याची कमतरता या मुळे ते शक्यही झालं नसेल..चलाख इंग्रजांच्या मनात मात्र हे शहर त्यांच्या ताब्यात आले तेंव्हापासून ही योजना असावी..आणि त्यामुळेच त्यांनी पोर्तुगीज राजकन्येशी आपल्या राजाच्या लग्नाचा घाट घालून तो यशस्वीपणे घडवून आणला असण्याची शक्यता जास्त वाटते..

इस्ट इंडिया कंपनीने १६७१-७२ साली गव्हर्नर जेराल्ड ऑन्जीयर याला मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केले. मुंबईच महत्व ओळखलेला हा एक द्रष्टा इंग्रज. अनेक इतिहासकार मुंबईचा जनक (फादर ऑफ बॉम्बे ) म्हणतात. तेंव्हाच्या मुंबईच्या विकासाला पहिली चालना दिली ती या इंग्रजाने ऑन्जीयरच्या मनात मुंबईची विखुरलेली बेट भरणी घालून एकसंघ करण्याची योजना इथे आल्यापासून घोळत होती. तशी मंजुरीही त्याने त्यांच्या हेड ऑफिसकडे म्हणजे इंग्लंडकडे मागितली होती परंतु इस्ट इंडिया कंपनी नफ्या-तोट्याचा विचार करणारी व्यापारी कंपनी असल्याने एवढा खर्च करणे शक्य नसल्याचे त्यांनी उत्तर दिलं. तरी ऑन्जीयर व त्यांच्या नंतर आलेल्या अनेक ब्रिटीश गव्हर्नरानी आपले प्रयत्न चालू ठेवले..

या नंतर बरोब्बर शंभर वर्षांनी सन १७७१ मध्ये विलियम हॉर्नबी ह्याची मुंबईच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली. एव्हाना शहर बऱ्यापैकी वाढले होते..लोक बाहेरून इथे स्थायिक होण्यासाठी येत होते आणि साहजिकच त्यांच्या निवासासा-व्यापारास जागा अपुरी पडू लागली होती..आता मात्र बेटांमध्ये भरणी केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली..

पुढे जाण्यापूर्वी मुंबईच्या बेटामधल्या त्या काळच्या परिस्थितीची थोडी कल्पना घेऊ. कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, वरळी, माहीम, परळ व माझगाव अशी मुंबईची सात बेटं. त्यात मुंबई हे आकाराने सर्वात मोठ आणि इंग्रजांचं मुख्य ठाण. साहजिकच तेंव्हाची वस्ती व व्यापारी पेढ्या या बेटावर दाटीवाटीने वसल्या होत्या. मुंबई बेटा खालोखालची वसती मुंबईच्या शेजारी एका चिंचोळ्या खाडी पलीकडच्या माझगाव बेटावर होती इतर बेटांवर तुरळक वस्ती होती. मुंबई आणि त्याच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात जवळचे बेट वरळी यात जवळपास एका मैलाचं अंतर होत जे भरतीच्या काळात पाण्याने भरून जायचं. मुंबईच्या सात बेटांपैकी या ठिकाणाहून सर्वात जास्त पाणी आत शिरायचं. इथे कोणत्याही काळी जायचे तर बोटीला पर्याय नव्हता..(तुम्हाला अंदाज येण्यासाठी सोबत मुंबई व बेटांचा ढोबळ नकाशा पाठवत आहे)

या दोन बेटातून भरतीच्या वेळेस पाणी आत घुसायच ते थेट पूर्वेच्या माझगावला जाऊन भिडायचं. या दोघांच्या मधला भायखळा, भेंडीबाजार, पायधुनी वैगेरे विभाग सखल असल्याने हा भाग संपूर्णपणे पाण्याने भरून जायचा..परिणामी पलीकडच्या माझगाव आदि परिसराशी संपर्कासाठी लहान होदिशिवाय पर्याय नसायचा. त्यात भारती ओसरली की ती जागा कायम ओलसर, चिखलाची आणि दलदलीची राहायची..अश्या जमिनीत डास-चिलटांची भरमसाट पैदास होऊन सर्वत्र रोगराई थैमान घालायची..असे म्हणतात की त्यावेळेस मुंबई बेटावर नोकरी साठी आलेल्या कैक युरोपियनांचे आजारपणामुळे मरण ओढवले होते..

विलियम हॉर्नबीने आता उचल खाल्ली आणि मुंबई बेटावरील सध्याच्या ‘महालक्ष्मी’ ते वरळी बेटामध्ये समुद्राचे आत येणारे पाणी अडविण्यासाठी सध्याच्या ‘अत्रिया’ मॉल पर्यंत एक बांध घालून त्यावरून त्यावर वरळी व त्यापलीकडील बेटांशी संपर्क साधण्यासाठी कायम स्वरूपी सडक बांधण्याचा विचार करून त्यास परवानगी व फंड्स उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आपल्या लंडनच्या मुख्य कचेरीस पाठवला. त्याच्या गाठीशी पूर्वीच्या गव्हर्नरानी केलेला याच बाबतीत केलेल्या पत्रव्यवहाराच्या व त्यावर कम्पनीने लावलेल्या नकारघंटाचा अनुभव असल्याने, या पठ्याने कंपनीच्या परवानगीची वाट न पाहता सन १७८१-८२ मध्ये कामाला सुरुवातही केली.. हॉर्नबी याने कामाला सुरुवात तर केली परंतु पैश्याचा प्रश्न उभा राहिला..असे म्हणतात की हॉर्नबी ह्याने त्याकाळी माझगावात कोणो ‘मिस रोज नेसबीट’ नांवाची एका श्रीमंत बाई राहत होती तिला गाठलं व तिच्याकडून पैसा उभा केला..ह्यावेळेस त्याची गवर्नर पदाची मुदत संपायला केवळ दोन-अडीच वर्षे शिल्लक होती..(विलियम हॉर्नबी याच्या सस्पेन्शनच्या घटनेला मी वाचलेल्या पुस्तकांत आधार नाही असे म्हटलेले आहे. तरी त्याकाळची परिस्थिती पाहता ते नाकारता येण्यासारखे नाही..)

एव्हाना हॉर्नबीने विना मंजुरी वरळीचे खिंडार बुजवायच्या कामाला सुरुवात केल्याची बातमी इस्ट इंडिया कंपनीच्या लंडन स्थित कार्यालयात जाऊन थडकली होती..झाले, लगेच फर्मान सुटले आणि हॉर्नबीला गव्हर्नर पदावरून त्वरित सस्पेंड केल्याचा लखोटा दोन महिन्यात मुंबईत येऊन थडकला.तेंव्हा सर्व पत्रव्यवहार बोटीनेच येत असल्यामुळे दोन-तीन महिन्यांचा कालावधी सहज लागायचा..हॉर्नबीच्या हाती लखोटा पडला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणेच त्यात त्याच्या सस्पेन्शनची ऑर्डर होती. आता थोडेसेच काम शिल्लक राहिले होते आणि नवीन गव्हर्नर चार्ज घेण्यासाठी येण्यास आणखी दोन-तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. हॉर्नबीने जराही न डगमगता सस्पेन्शनची ऑर्डर दाबून ठेवली व काम पुढे सुरु ठेवले आणि शेवटी सन १७८४ मध्ये हा बांध आणि त्यावरील रस्ता बांधून पूर्ण केला आणि मगच आपल्या पदाचा चार्ज नवीन गव्हर्नरकडे दिला सोडला..

पेडर रोड उतरून आपण खाली आलो की वरळीकडे येताना आपल्याला एका प्रशस्त अर्धचंद्राकृती रस्त्यावरून यावं लागतं. डाव्या बाजूला समुद्रात हाजी अली तर उजव्या बाजूला लाला लजपतराय कॉलेज, रेसकोर्स, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदी ठिकाण लागतात व पुढे आपण ‘अत्रीया’ मॉल मागे टाकून महापालिकेच्या ‘लव्ह ग्रोव्ह’ उदंचन केंद्रापर्यंत पोहोचतो.. हिरा-पन्ना शॉपिंग सेंटर ते वरळीच्या ‘लव्ह ग्रोव्ह’ पर्यंतचा हा सुरेख देखणा रस्ता म्हणजेच विलियम हॉर्नबीने स्वतःचे पद पणाला लावून तयार केलेला रस्ता, ‘हॉर्नबी व्हेलार्ड’..! आजचा लाला लजपतराय मार्ग..!! या रस्त्याला त्याच्या निर्मात्याचे नाव त्यावेळच्या मुंबईकर जनतेने दिले होते.

हा रस्ता व त्याखालचा बांध बांधल्यामुळे नक्की काय झालं? तर, आज आपल्याला जो रेसकोर्स, पटेल स्टेडियम पासून पुढे पूर्वेला भायखळा, माझगाव पर्यंतचा जो विस्तृत टापू दिसतो तो निर्माण झाला..जवळपास ४०००० एकर नवीन जमीन यामुळे निर्माण झाली असे गोविंद मडगावकरांनी त्यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात नोंदले आहे..आज मध्य मुंबई नावाने जो भाग ओळखला जातो तो हा भूप्रदेश..धगधगत्या मुंबईचा धडकता आत्मा..एवढी मोठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे साहजिकच वस्ती-व्यापार वाढला…पूर्वी या ठिकाणी उथळ खाजण व दलदलीची जमीन असल्याने नित्यनेमाने होणारी रोगराई आटोक्यातच आली नाही तर संपली..मुंबई भरणी करून एकसंघ करण्याचा जो मोठा प्रोजेक्ट हॉर्नबीने राबवला तो देशातील पहिला मोठ्या स्वरूपाचा इंजिनीअरिंग प्रोजेक्ट ठरला..पुढे कालांतराने सर्वच बेटात भरणी करून नवीन जमीन तयार करण्यात अली आणि मुंबईला तिला स्वतःची जमीन मिळाली त्याची ही सुरस कथा..!

जाता जाता –

विलियम हॉर्नबी याला या प्रचंड बांधकामासाठी लागणारी रक्कम मिस रोज नेसबीट या अतिश्रीमंत बाईने पुरवली होती असा उल्लेख गोविंद मडगावकरांनी केला आहे. या बीची कहाणी शोधण्याचा मी प्रयत्न केला असता तीने या कामी हॉर्नबीला पैसे पुरवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही..या बाईची प्रचंड मालमत्ता असून ती मुंबईतील सर्वच बेटांवर पसरलेली होती..त्या मालमत्तेची देखभाल करणे तिलाही दळण-वळणाच्या दृष्टीने कठीणच होत असणार. आपलीही सोय होईल हा ‘स्वार्थातून परमार्थ’ साधणारा विचार करून तीने पैसे दिले असतील कदाचित..मुंबईच्या प्रसिद्ध ‘माहीम कॉजवे’ची निर्मितीही लेडी जमशेदजींच्या हातून अशीच झालेली आहे. मिस नेसबिट यांच्या नावाने माझगावात आजही एक मोठा रस्ता आहे. जेजे हॉस्पिटलचा फ्लाय ओव्हर उतरून आपण दादरच्या दिशेने यायला निघालो की भायखळ्याचा ‘खडा पारशी’चा ब्रिज चढण्यापूर्वी आपल्याला ‘इस्माईल मर्चंट’ चौकातला सिग्नल लागतो. या सिग्नलपासून जो रस्ता पुढे माझगावात जातो तो ‘नेसबिट रोड’. याच रस्त्यावर पुढे ‘सेंट अॅन’स चर्च’ व ‘सेंट मेरी इन्स्टिट्यूट’ लागते तिथे मिस नेसबिटच्या अस्थी पुरलेल्या आहेत. सेंट अॅन’स चर्च हे पूर्वी मिस नेसबिटने बांधलेलं छोटं चॅपेल होत ते नंतर चर्च मध्ये रुपांतरीत झालं.

विलियम हॉर्नबीने बांधलेल्या या बांधामुळे ‘Breach Candy’ या मुंबईच्या गर्भश्रीमंत उच्चभ्रूंच्या मशहूर निवासी भागाचा जन्म झाला. मुंबई व वरळी दरम्यानच्या या समुद्राच्या खुल्या भागाला इंग्रज ‘The Great Breach” असे म्हणायचे.. Breach या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ ‘मोडणे” किंवा ‘भगदाड’ असा होतो..सोबतची Candy मराठी ‘खिंडार’चा अपभ्रंश असण्याची शक्यता आहे..जमिनीला समुद्रापाशी असलेले मोठे भगदाड या अर्थाने Breach Candy हा शब्द वापरला जायचा. सन १७८४-८५ च्या आसपास हा बांध पूर्ण होऊन मुंबईत मोठ्या प्रमाणावर जमीन निर्माण झाली आणि फोर्ट माझगावात दाटीवाटीने वसलेली वस्ती मोकळी होऊन आताच्या पेडर रोड, महालक्ष्मी नजीकच्या भागात प्रशस्त जागी राहण्यास येऊ लागली..येणारे अर्थातच युरोपियन अधिकारी, देशी मोठे व्यापारी किंवा श्रीमान संस्थानिक-राजे-राजवाडे होते..मोठे महाल, वाड्या, हवेल्या इथे उठू लागल्या आणि हा विभाग मुंबईच्या अतिश्रीमंत लोकांचा म्हणून जाणला जायला लागला तो अगदी आज पर्यंत..आजही या परिसरात काही मोठे महाल, पॅलेस जीर्णावस्थेत दिसतात ते त्याकाळचे अवशेष आहेत..

त्याकाळी चार-पाच लाख रुपये खर्चून बांधलेल्या या बांधाने मुंबईला केवळ तिची ‘जमीन’च मिळवून दिली नाही तर मुंबईला ‘महामुंबई’ होण्याचा मार्ग खुला केला..गोष्ट खरी-खोटी कोण जाणे, परंतु मुंबईला आकार देण्याच्या कैफात स्वतःच गव्हर्नरपद धाब्यावर बसवलेला विलियम हॉर्नबी हा मुंबईचा पहिला गव्हर्नर. दुसरा आपण मागच्या एका भागात पाहिलेला आर्थर क्राफर्ङ. आता कधी त्या रस्त्यावरून येण-जाणं झाल्यास विलियम हॉर्नबीची आठवण काढण्यास विसरू नका..याच रस्त्याने मुंबईकरांचं मोठ दैवत ‘महालक्ष्मी’ला जन्म दिला, त्याची कहाणी पुढच्या भागात..

-नितीन साळुंखे
9321811091

संदर्भ –
१. ‘मुंबईचे वर्णन’, ले. गोविन्द डगावकर -१८६२
२. ‘मुंबईचा वृत्तांत’, ले. शिंगणे – आचार्य १८९३