सन १८९६ मधे मुंबईत पसरलेली प्लेगची साथ आणि आताचा ‘कोरोना’

सन १८९६ मधे मुंबईत पसरलेली प्लेगची साथ आणि आताचा ‘कोरोना’

इसवी सनाच्या १८९६च्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिण्यापासून मुंबईत प्लेगची साथ पसरण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळच्या सरकारने आता सारखंच लाॅक डाऊन, आयसोलेशने, क्वारंटाईन इत्यादी उपाय योजले होते आणि ते सक्तीने अमलातही आणले होते. त्यावेळच्या सरकारने लोकांना थाळ्या-टाळ्या नि पणत्या-मेणबत्त्या पेटवायला सांगितलं होतं की नाही, ते मात्र त्यावेळच्यी बातम्यांतून दिसलं नाही.

त्या काळात या साथीत मरणाऱ्या माणसांचा वेग एवढा भयानक होता की, आठवड्याला सरासरी २००० माणसं मरत होती. घरातल्या मेलेल्या एका माणसाला सरणावर जाळून परत येतायत तोवर, त्याच घरातलं दुसरं मयत तयारच असायचं, इतकं मरण या काळात फोफावलं होतं.  मरणाचं कुणाला काही वाटेनासंच झालं होतं. माणसांनी संवेदना हरवल्या होत्या आणि ते सहाजिकच होतं..स्मशानांना उसंत नव्हती. रोजच्या, सरणाच्या भट्ट्या २४ तास पेटत्या होत्या. नव्हे, दर तासा मिनिटाच्या मरणाला कोण रडणार. लाकडं जाळावीत तशी आणि त्याच संवेदनशुन्यतेने माणसं जाळली जात होती..! अश्रू सुकले होते.  माणसाचं मढं आणि सरणावर जळू पाहणार लाकूड, जणू एकंच झालं होत. त्यामानाने आता खूप बर आहे. ‘कोरोनाने मारण्याचं प्रमाण खूप कमीआहे. इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजन वाहिन्यांच्या निर्बुद्ध आणि संवेदनाशून्य बातम्या ऐकून, धक्क्याने मारणारी संख्या कदाचित जास्त असेल. 

ह्या रोगावर उपचार करणारे डॉक्टर्सही बळी  पडत होते. सोबत दिलेल्या एका बातमीत डॉक्टर नॅन्सन नावाचे एक प्रमुख डॉक्टर प्लेगमुळे मृत्युमुखी पडल्याचं म्हटलं आहे. 

त्यावेळीही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्वाना मुंबईबाहेर पळायची आतासारखीच घाई लागली होती. प्लेगच्या साथीतून वाचण्यासाठी मुंबईतले गिरणी कामगार नोकऱ्या सोडून आपापल्या गावी, आपाल्या प्रांतात चालले होते (गांववालेही त्यांचं स्वागतच करत होते. गावाकडे माणुसकी शिल्लक असल्याने, आतासारखी ‘गांवबंदी’ तेंव्हा घातली गेली नव्हती). कामगारांअभावी गिरण्या बंद पडत चालल्या होत्या. मुंबईतल्या जवळपास ७५ टक्के गिरण्या ह्या काळात बंद पडल्या होत्या. मग गिरणी मालकांनी कामगारांना प्रलोभन (आणि गरज) म्हणून रोजचा पगार रोख द्यायची तयारी दर्शवली होती, जेणे करुन कामगारांनी इथेच थांबावं आणि त्यांचं घरही चालावं. तरीही कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतं.

जवळपास ३,२५,००० माणसांनी तेंव्हा मुंबई सोडली होती. असं सोबतच्या एका बातमीतून लक्षात येईल. त्याकाळातली मुंबईची लोकसंख्या २०-२५ लाख असावी आणि ती पाहता, हा आकडा खूपच मोठा होता. आताच्या ‘कोरोना’च्या साथीतही असं काही तरी करावं, असं खाजगी कारखानदारांना, उद्योग-धंद्यांच्या मालकांना आणि विविध प्रकारची पॅकेज देऊ करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारांनाही का सुचू नये, याचं आश्चर्य वाटतं..! हा उपाय करुन पाहायला हवा होता. निदान काही लोक तरी मुंबई सोडून जायचे थांबले असते.

मुंबईतल्या मस्जिद बंदर भागात उद्भवलेली ही साथ पुढे पुणे आणि कराची पर्यंत कशी पसरत गेली, त्याचीही बातमी तुम्हाला सोबत दिसेल. 

आताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पुढचा बराच काळ आपल्याला कोरोनासोबतच जगायचं असल्याचं अनेक तज्ज्ञ आपल्याला सांगत आहेत आणि ते खरंही आहे. अगदी अशीच भावना १८९६-१९०० पर्यंत मुंबई आणि देशात धुमाकूळ घातलेल्या प्लेगबाबतही होती. सोबतच्या एका बातमीत तसं स्पष्ट म्हटलेलं दिसतंय. ही  बातमी आहे २९ नोव्हेम्बर १९०२ची. ‘The plague in Bambay is now being treated as Permanent Disease.’ असं म्हटल्याचं ह्या बातमीत दिसेल. प्लेग आपल्याबरोबर कायम राहील असं जे १९०२ सालात म्हटलं गेलं होत, ते आता पर्यंत कितपत खरं ठरलंय, हे तुमचं तुम्ही ठरवा. 

असंच कोरोनासंबंधीही होईल. कोरोनाची आपल्याला सवय होईल आणि त्याच्यासोबत जगायला पण शिकू;कीं  बहुना आपण त्याला आपल्यासोबत जगायला शिकवू, हा आशावाद कायम बाळगा. योग्य ती काळजी घ्या आणि टीव्हीवरच्या बातम्या पाहायचं टाळा. विशेषतः मराठी. हिंदी बातम्याही टाळल्यास उत्तम, त्यामुळे हिंदू-मुसलमानात द्वेषाचा व्हायरस पसरण्यास अटकाव होईल. अर्थात १८९६च्या प्लेगच्या काळात हिंदू-मुसलमान व्हायरस अजिबात पसरला नव्हता आणि हे श्रेय त्यावेळच्या ‘जुलमी’ ब्रिटिश सरकारचं.  

ह्या लेखाचा उद्देश शंभर -सव्वाशे वर्षांपूर्वीचा तो काळ आणि आताच काळ यातला (फारसा पडलेला नसलेला) फरक दाखवून देण्याचा आहे. 

#सोबत नमुन्यादाखल दिलेल्या बातम्यांचा कालावधी जानेवारी १८९७ ते १९०२च्या दरम्यानचा आहे आणि शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या सदर बातम्या मला मिळवून देण्याचं श्रेय माझा कोल्हापूर निवासी मित्र भरत महारुगडे याच आहे. 

-©️नितीन साळुंखे

9321811091

12.05.2020

नशा है सब पे मगर, रंग नशे का है जुदा..!

“नशा है सब पे मगर,

रंग नशे का है जुदा..!”

गेले काही दिवस, लाॅक डाऊन-३ मधे दारू विकावी की न विकावी, याबद्दल चाललेला सरकारी गोंधळ आणि त्यानंतर ती विकावी असं ठरवल्यानंतर मद्यप्रेमींनी घातलेला गोंधळ हा आपल्या खास भारतीय स्वभावाला साजेसा होता. ह्या प्रकारावरून सोशल मिडीयात उधाणलेले विनोद आणि इलेक्ट्राॅनिक मिडीयाची, ‘मी नाही त्यातली, कडी लाव आतली’ पद्धतीची ट्रायल पाहून, हसावं की रडावं, हेच समजत नव्हतं.

त्यातही सोशल मिडीयात, स्वत:ला सार्वजनिक सुसंस्कृततेचे आपण स्वयंघोषित किंवा जन्मसिद्ध पाईक आहोत असं समजणाऱ्या आणि म्हणून इतरांना संस्कृती, परंपरा, चांगलं-वाईट शिकवून मार्गावर आणण्याचा आपल्याला(च) अधिकार आहे, अशा पद्धतीने नेहेमी टिचिंग मोडमधे( ह्या ‘टिचिंग’ मोडचं सक्रिय रुपांतर ‘लिंचिंग’ मोडमधेही होतं. दोन्ही शब्दांचे अर्थ भिन्न असले तरी, दोन्हींमधे ‘धडा शिकवणं’ गृहीत धरलेलं असतं.) असणाऱ्या एका वर्गाचा दारू विक्रीवर आणि पिणारांवर प्रचंड राग असल्याचं दिसून आलं. हा वर्ग दारुच कशाला, त्यांना न पटलेल्या, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त इतर आवामला मनापासून पटत असलेल्या प्रत्येक गोष्टीला, समजाला किंवा श्रद्धेला वाईटच ठरवत असतो.

दारू चांगली की वाईट, ती कशी नुकसान करते, त्यांने माणसाचं चारित्र्य कसं बिघडवते, पिणारी माणसं कशी गुन्हेगारी प्रवृत्तीची असतात वैगेरे वैगेरे याची जेंव्हा फेसबुरी चर्चा सुरू झाली तेंव्हा मला जरा आश्चर्यच वाटलं..! मुळात दारू-सिगारेट-गुटखा-तंबाखू इत्यादी व्यसनांबाबत आपला सांस्कृतिक गोंधळच जास्त आहे. पुन्हा आपल्याकडे ह्या व्यसनं समजल्या गेलेल्या गोष्टींपेक्षा, ती करणाऱ्या माणसाला वाईट म्हणण्याची खोड जास्त असते. ही माणसं म्हणजे पार वाईट, समाजावर धब्बा असे शिक्के मारून आपण मोकळे होतो. याचा दुसरा अर्थ म्हणजे, अजिबात कोणतंही व्यसन नसलेली माणसं म्हणजे सज्जन किंवा समाजाचं भुषण, असा होतो. इथे मला प्रष्न पडतो की, सुपारीच्या खांडाचंही वसन नसलेल्या एखाद्या निर्व्यसनी, परंतु लांच खाणाऱ्या, आपल्या पद-पैसा-प्रतिष्ठेचा वापर, इतरांचा हक्क मारून केवळ आपण स्वत: आणि आपल्या बगलबच्च्यांचं भलं करु पाहाणाऱ्या, सत्तापदावर बसलेल्या निर्व्यसनी माणसाला काय म्हणावं, हा? हिटलरला बाई-बाटली कशाचंही व्यसन नव्हतं, म्हणून आपल्या भारतीय व्याख्येप्रमाणे तो चांगला, नितीवान माणूस ठरतो आणि दारू-सिगरेट व्यर्ज्य नसलेले पंडीत नेहेरू आपल्या दृष्टीने अनैतिक ठरतात. दारूची व ती सेवन करणारांची सांगड आपल्या भारतीय मानसिकतेने नैतिकतेशी घातलेली असल्याने, मी वर म्हणालो तो निर्माण झालेला सांस्कृतिक गोंधळ तो हाच..!

माणसाला व्यसन लागतं, ते तो त्या करत असलेल्या गोष्टींतील नशेच्या आहारी जातो तेंव्हा. मग ती नशा केवळ दारूचीच कशाला हवी? नशा अनेक चिजांची असू शकते. कुणाला सत्तेची नशा चढलेली असते, तर कुणाला संपतीची..! कुणाला प्रतिष्ठेची, तर कुणाला लोकप्रियतेची, तर आणखी कुणाला कशाची..! महानायक अमिताभ बच्चनच्या ‘शराबी’ ह्या चित्रपटातलं ‘ लोग कहते है, मै शराबी हूमं..’ हे सुप्रसिद्ध गाणं आठवतंय? ह्या गाण्यातील पुढचे बोल,

‘किसीपे हुस्न का गुरूर जवानी का नशा

किसीके दिल पे मोहब्बत की रवानी का नशा

किसीको देखे साँसों से उभरता है नशा

बिना पिये भी कहीं हद से गुज़रता है नशा’

हेच तर सांगातायत. ह्या बोलांतील हुस्न, मोहोब्बत इत्यादी शब्दांच्या जागी सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, पेहेचान, पहूॅंच आदी कोणतीही न पिता नशा चढू शकणारी गोष्ट ठेवून पाहा. अर्थ तोच, जो अट्टल दारूबाजांकडून आपण गृहीत धरत असतो..!!

ह्याच गाण्यात बच्चनजी विचारणा करतायत की,

“नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा

किसे है होश मेरे सामने तो लाओ ज़रा.”

आहे ना आपल्याला नेत्यांपासून भक्तांपर्यंत एकदम फिट्ट बसणारी गोष्ट. “नशा है सब पे मगर रंग नशे का है जुदा..!” अशी आपली परिस्थिती. आज आपल्यापैकी प्रत्येकजण वेगवेगळ्या नशेत झिंगत असताना, दारू मात्र फुकटची बदनाम केली जातेय..!

अती प्रमाणात केली जाणारी कोणतीही गोष्ट, मग ती दारूच कशाला हवी, दारूबरोबर म्हटली जाणारी दुवा आणि दवाही वाईटच. गेल्या काही वर्षांत आपण आपल्या देशांत अमर्याद सत्तेच्या नशेतून घेतले गेलेले काही नशेबाज निर्णय आणि त्यातून सर्वसामान्यांना झालेला मनस्ताप आपण अनुभवतोय. दारच्या नशेच्या व्यसनात वाताहात होत असेल(च) तर, निदान ती पिणाराची व तो पियक्कड ज्या कुटुंबाचा सदस्य असतो, तेवढ्यापुरतीच ती मर्यादीत असते. पण सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, लोकप्रियता, भक्ती अन्आता तर राष्ट्रवाद, धर्म आणि (आपापल्या)जातीभिमानाच्या नशा-व्यसनात अख्खा देश दोशोधडीला लागतो, हे सिद्धसत्य मात्र आपण सोयिस्कररित्या विसरतो..! ह्या नशा दारूपेक्षा कितीतरी पटीने विनाशक असतात.

मी दारूचं किंवा तत्सम कोणत्याही गोष्टींचं समर्थन करत नाहीय किंवा दारूबंदीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या लोकांचा मला अवमानही करायचा नाही, तर नशा डोक्यात भिनवणारी कोणतीही गोष्टी वाईटच, हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्व काही तारतम्याने केलं, तर त्यात वाईट असं काहीच नसतं, असं मी समजतो. पण आपण फक्त दारुची(च) सांगड नैतिकतेशी घालून गोंधळ घालून ठेवला आहे. नैतिकतेचा संबंध विचारांशी, प्रामाण्कतेशी, अंतर्बाह्य शुचितेशी असायला हवा, केवळ दारूशी नाही.

मित्रो(😊), नशा डोक्यात असते, “नशा शराब मे होती तो, नाचती बोतल..’ हे लक्षात ठेवा. स्वत:च्या आणि इतरांच्याही डोक्यात जाणारी दारुचीच कशाला, तर कोणतीही नशा वाईटच..!

सबब, दारूला दोष देताना, “नशा है हम सब पे मगर, रंग नशे का है जुदा..!” हे लक्षात ठेवलेलं बरं..!!

-©️नितीन साळुंखे

9321811091

07.05.2020

मुंबई-माहीमच्या गादीवर आलेला दुसरा बिंब..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा

लेखांक – ३१ वा

मुंबई-माहीमच्या गादीवर आलेला दुसरा बिंब..

मुंबईच्या माहिमला राजधानी करणाऱ्या मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंबाने शके १०६२-१०६९ या कालावधीतला वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या राज्याचा राजा म्हणून ७ वर्ष राज्य केलं, तर मुंबई-माहीम ही राजधानी आणि वाळकेश्वर ते वसईपर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून राजा प्रताप बिंबाने ५ वर्ष राज्य केलं. ह्या प्रताप बिंबानंतर जवळपास १५५ वर्षाने दुसरा, वेगळ्याच घराण्याचा बिंब यादव माहिमच्या गादीवर आला. पहिला राजा प्रताप बिंब ते दुसरा राजा बिंबदेव यादव यांच्यात १५५ वर्षांचं अंतर होतं. ह्या १५५ वर्षात माहीमच्या राज्यात नांदलेल्या राजांची ही धावती कथा.

मुंबईच्या माहिमला राजधानी करणाऱ्या मुंबईचा मधे राजा प्रताप बिंब शके १०६९ निधन पावल्ा आणि त्याचा पुत्र मही बिंब माहीमच्या गादीवर आला. राजा मही बिंबाने या प्रदेशावर शके ११३४ पर्यंत, म्हणजे एकूण ६५ वर्ष राज्य केलं. या ६५ वर्षांच्या शेवटच्या कालावधीत, म्हणजे शके १११० मध्ये चौलच्या भोजराजाने महिकावतीचे राज्य जिंकण्याचा मोठा प्रयत्न केला. आताच्या कळव्यात मही बिंब आणि भोजराजाचे सैन्य एकमेंकांस भिडले. या युद्धात चौलचा भोजराजा मारला गेला. मही बिंबाचा जय झाला.

या युद्धात लढलेल्या आपल्या सरदारांना बक्षिस म्हणून राजा मही बिंबाने विविध पदव्या आणि मान-सन्मान प्रदान केले. कोणाला देसाईपद दिलं, तर कुणाला ठाकूरपद दिलं. कुणाला वाद्याचा मान दिला, तर कुणाला गळ्यातलं पदक दिलं. कुणाला सरदेशकी दिली, कुणाला वंशपरंपरेने राऊतपद दिलं. कांदीवलीच्या आपल्या निष्ठावानांना त्यांने वंशपरेचं चौगुलेपद दिलं. मही बिंबाने आपल्या सरदारांना अश्याप्रकारे वश करत आपलं राज्य एकूण ६५ वर्ष सांभाळलं.

शके ११३९ मध्ये मही बिंबाच्या निधनानंतर त्याचा पुत्र केशवदेव बिंब माहीमच्या गादीवर आला. केशवदेवाचे वय या वेळेस फक्त ५ वर्षांचे होते, म्हणून केशवदेवाची आई कामाई ही त्याच्यावतीने राज्यकारभार पाहू लागली. केशवदेवाच्या काज्य कारभाराला १२ वर्ष होताच, म्हणजे तो वयाचा १७ वर्षांचा होताच त्याने स्वत:ला ‘राज पितामह’ अशी पदवी धारण केली. त्याच्या भाटांनी केशवदेवाची महती सांगणारे पोवाडे रचून आजुबाजूच्या लहान-सहान संस्थानात जाऊन ते गाऊ लागले. केवळ १७ वर्षांच्या राजचे हे पोवाडे ऐकणं आजुबाजूच्या संस्थानांतील वयाने ज्येष्ठ राजांना अपमानास्पद वाटू लागलं.

त्यातच एक होता *चौलचा राजा भोजराजा. ह्याचा पराभव केशवदेवाचा बाप राजा मही बिंबाने केला होता, तो राग याच्या मनात होताच. त्याच मही बिंबाचा अवघा १७ वर्षांचा पोर स्वत:ला राज पितामह म्हणवून घेतंय हे ऐकल्यावर भोजराजा संतापाने पेटून उठला. त्याने केशवदेवास धडा शिकवायचं ठरवून तो आपलं सैन्य घेऊन महिकावतीच्या राज्यावर हल्ला करण्यास निघाला. ही बातमी मिळताच केशवदेवाने त्याचे देवनारचे वतनदार विनायक म्हात्रे यांना भोजराजाला थोपवून ठेवण्याचा हुकूम केला. कळव्यात पुन्हा एकदा भोजराजाचे सैन्य आणि केशवदेव बिंबाचे सैन्य एकमेंकास भिडले. देवनारकर विनायक म्हात्रे यांनी पराक्रमाची शर्थ करून भोजराजाचा पराभव केला. एवढ्यात भोजराजाच्या वतीने **म्हसगडचा संस्थानिक जसवंतदेव युद्धात उतरला, तर त्याच्वावर केशवदेव बिंबाचा एकसरचा म्हात्रे वतनदार धावून गेला. परंतू म्हात्र्यांना थांबवून सिंधे नामक सरदार म्हसगडच्या संस्थानिकाच्या अंगावर गेला व त्याचा पराभव केला. अशारितीने भोजराजाचा संपूर्ण पराभव झाला ते साल होते शके ११४६, म्हणजे इसवी सन १२२४. यावेळी महिकावतीचा राजा केशवदेव बिंब व चौलचा राजा भोजराजानधे तह झाला. पुढे शके ११५९ पर्यंत केशवदेवाने वाळकेश्वर ते वसईची खाडी या पट्ट्यात राज्य केले.

शके ११५९ मधे राजा केशवदेव मरण पावला. परंतू केशवदेवास पुत्र नसल्याने, राजाच्या सर्व अधिकाऱ्यांनी विचार विनिमय करून जनार्दन प्रधानास दत्तक घेऊन गादीवर बसण्याची विनंती केलीं. जनार्दन प्रधानास गादी सोपताना सर्व सरदारांनी, केशवदेवाने त्याच्या अधिकाऱ्यांना दिलेले सर्व अधिकार तसेच ठेवू, असं वचन घेतलं होतं. पुढची शके ११५९ ते ११६३ अशी चार वर्ष जनार्दन प्रधानाने राज्य केलं.

जनार्दन प्रधानाच्या राज्याभिषेकांस चार वर्ष होतात न होतात तोच # घणदिवेचा राजा नागरशा माहीमवर चालून आला. तो ज्या मार्गाने माहीमवर आदळला, तो मार्ग सोबतच्या नकाशात दाखवला आहे. ठाण्यास झालेल्या युद्धात नागरशाने जनार्दन प्रधानाचा पराभव केला. पराभुत जनार्दन प्रधानालाच नागरशाने आपला प्रधान नेमून नागरशा माहीमला राजधानीत राहू लागला. अशारितीने शके १०६२ साली चंपानेरच्या प्रताप बिंब राजघराण्याची सुरु झालेली, आधी दमण ते वाळकेश्वर (राजधानी केळवे माहीम) आणि नंतर वसई ते वाळकेश्वरवरील (राजधानी मुंबई-माहीम), सत्ता शके ११६३ साली संपुष्टात आली. मुंबई-माहीम येथे राजधानी स्थापन करणाऱ्या प्रताप बिंबाच्या घराण्याने मुंबईवर १०१ वर्ष राज्य केलं.

जनार्दन प्रधानाला हरवून मुंबईच्या गादीवर बसलेल्या घणदिव्याच्या नागरशाने पुढील ३० वर्षे या प्रदेशावर राज्य केले. राज्याचा कडकोट बंदोबस्त करावा म्हणून नागरशाने ठिकठिकाणी सैन्याचे तळ उभारले. ह्याच दरम्यान नागरशाला मुलगा झाला. राज्याला वारस मिळाला. ह्या मुलाचे नांव त्याने ‘त्रिपुरकुमर’ असं ठेवले. ह्या मुलाच्या जन्माबरोबरच नागराशाच्या राज्यात भाऊबंदकीची बीज रोवली गेली.

नागराशाला नानोजी, विकोजी, बाळकोजी असे तीन मेव्हणे होते. ह्या तिन्ही मेव्हण्यांनी नागरशाला उत्तर कोकणावर विजय मिळवण्यासाठी मदत केली होती. परिणामी त्यांना सत्तेत वाटा मिळावा अशी अपेक्षा होती. हे तीनही मेव्हणे महत्वाकांक्षी आणि सत्ताकांक्षी होते आणि म्हणून नागराशाला पुत्रप्राप्ती झाल्यावर ह्यांना आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली. जस जसा नागराशाचा पुत्र त्रिपुरकुमार मोठा होत होता, तस तसे हे तिघेहीजण अस्वस्थ होत होते. पुढे आपले महत्व कमी होणार हे जाणून, ह्या मेव्हाण्यानी आपली चाल खेळायला सुरुवात केली. त्यांनी नागराशाकडे ठाणे, मालाड आणि मरोळ ही गावे बक्षिस म्हणून मागितली, जेणेकरून त्यांना तिथे स्वतंत्रपणे राज्य करता यावे. नागराशाने अर्थातच ही मागणी नाकारली. ह्यावरून नाराज झालेल्या ह्या तिन्ही मेव्हण्यांनी देवगिरीच्या €रामदेवराव यादवाच्या कानावर आपले गाऱ्हाणे घातले व त्याच्याकडे आश्रय मागितला.

त्यावेळी, म्हणजे शके ११९३ मध्ये, रामदेवराव नुकताच सम्राट पदावर आरूढ झालेला होता. रामदेवराव हा काही पराक्रमी म्हणून प्रसिद्ध नव्हता. कथा, शास्त्र, चर्चा, परमार्थ यातच त्याचे जास्त लक्ष होतं. केवळ वंशपरांपरागत हक्काने तो गादीवर आला होता. असं असलं तरी तो एका मोठ्या राज्याचा अधिपती होता आणि म्हणून नागरशाच्या मेव्हण्यांनी त्याचा आधार घ्याचं ठरवलं. त्याने तिघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नागरशाला धडा शिकवून तुम्हाला न्याय मिळवून देतो, असं सांगितलं. रामदेवरायालाही ह्या युद्धाची स्वत:ला सिद्ध करण्यासाठी गरज होतीच. त्याने ही संधी ओळखून आपला प्रधान हेमाडपंडित याला तिघांबरोबर सैन्य देऊन नागराशाचे राज्य काबीज करण्यासाठी रवाना केले.

रामदेवारायाचे हे सैन्य कळवा येथे पोचले असता त्याची गाठ नागराशाचा मांडलिक चेंदणी येथील पाटलाशी पडली. कळव्यात धमासान युद्ध झाले आणि त्याची परिणीती रामदेवरायाच्या सैन्याचा पराभव होण्यात झाली. तो पर्यंत जवान झालेला नागर्शाचा पुत्र त्रिपुरकुमार सैन्य घेऊन चेंदणी पर्यंत पोचला होता. त्रिपुरकुमारने रामदेवरायाच्या सैन्याचा पाठलाग सुरु केला. हेमाडपंडीताचे सैन्य माहुली किल्ल्याच्या आश्रयास गेले असताना, त्रिपुरकुमारने तिथे पराक्रमाची शर्थ करून हेमाडपंडीताचा पराभव केला. नागरशाचे तिनही मेव्हणे पराभुत होऊन पळून गेले. रामदेवरायाच्या सैन्याने माघार घेतली आणि नागरशाचे महिकावतीचे राज्य सलामत राहीले.

नागरशाने केलेल्या रामदेवरायाच्या केलेल्या पराभवानंतर, नागरशाचे प्रस्थ वाढलं. खरं तर रामदेवराय फारसा शुर नसला तरी, सर्वच अर्थाने मोठ्या अशा दक्षिणेचा सम्राट. ह्या सम्राटाचा पराभव तुलनेनं लहान अशा नागरशाने करावा, ही गोष्ट रामदेवरायच्या जिव्हारी लागली होती आणि ह्या पराभवाचा बदला घेण्याची एक योजना रामदेवरायाच्या मनात शिजत होती. ही महत्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यासाठी रामदेवरायाने अजिबात घाई केली नाही. पहिली आपल्या राज्याला बळकट करण्याचे उद्दीष्ट ठेवून त्यावर कार्यवाही केली. इतर बारीक-सारीक अडचणी सोडवल्या. ह्यात जवळपास १२-१५ वर्षांचा कालावधी निघून गेला होता.

आता आपल्या योजना अंमलात आणायची वेळ आली असं रामदेवरावाला वाटलं आणि तो तयारीला लागला. त्याला असलेल्या शंकरदेव, केशवदेव, बिंबदेव आणि प्रतापशा अशा ४ पुत्रांपैकी थोरला पुत्र शंकरदेव यास स्व-रक्षणार्थ स्वतःजवळ ठेवून घेतलं. केशवदेवास देवगिरी दिली, बिंबदेवास उदगीर प्रांत दिला, तर प्रतापशाला अलंदापूर-पाटण दिले आणि स्वत: कधी देवगिरीस, तर कधी पैठणला जाऊन येऊन राहू लागला. रामदेवराय आपल्या पद्धतीने सर्व तयारी करत असला तरी, मुळातच त्याच्या शौर्याचा अभाव होता. हे त्याचे शत्रु सोडाच, स्वकीय आणि मांडलिकही जाणून होते व त्याची परिणिती त्याचे राज्य वरवर शक्तीशाली दिसत असले तरी आतून पोखरलेलंच होतं राज्या कुणी कुणाला जुमानेसं झालं होतं. विविध ठिकाणच्या मांडलिकांनी स्वत:चं राज्य असल्यासारखं वागायला सुरुवात केली होती. नेमकं हेच हेरून रामदेवरावाने मुंबईच्या नागरशावर स्वारी करण्यापूर्वीच शके १२१० मधे गुजरातमार्गे अल्लाऊद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली. या स्वारीत अल्लाऊद्दीन खिलजीने रामदेवरावाचा पराभव केला, परंतू त्याचं राज्य न बळकावताच तो आल्या वाटेने परत निघुनही गेला.

देवगिरीतही काही घटना घडत होत्या. देवगिरीला असलेला रामदेवरावाचा पुत्र केशवदेव मरण पावून त्याचा मुलगा रामदेवराव (दुसरा) गादीवर आला होता. प्रतापशा नांवाचा दुसरा पुत्र आलंदपूर-पाटण येथेच होता. ##राजा रामदेवराव यादव व त्याचा मोठा पुत्र शंकरदेव बहुदा मरण पावले असावेत.

रामदेवरावाचा चौथा पुत्र बिंबदेव यादव मात्र नागरशाने शके ११९४-९५ मधे केलेल्या पराभवाचं उट्टं काढण्याच्या प्रयत्नात होता. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरु असतानाच, शके १२१० मधे अल्लाऊद्दीन खिलजी देवगिरीवर आदळला आणि बिंबदेवाने खिलजीवर त्याच्या पिछाडीवरून हल्ला करण्याचे योजून त्या मार्गे कूच केले. परंतू अल्लाउद्दीन त्या पूर्वीच परत गेला होता. अल्लाऊद्दीन पुन्हा शके १२१६ पुन्हा देवगिरीवर चाल करून आला, तोवर बिंबदेव महिकावतीच्या दिशेने निघाला होता.

बिंबदेवाने आपला मोर्चा महिकावतीच्या नागरशाच्या दिशेने वळवला त्या वेळी नागरशाचा मुलगा त्रिपुरकुमार गादीवर आला होता. त्या परिसरातल्या इतर संस्थानिकांपेक्षा त्रिपुरकुमारची शक्ती बरीच मोठी असली तरी, बिंबदेव यादवाचे सामर्थ्य त्याहून मोठं होतं. बिंबदेव यादव त्रिपुरकुमारच्या राज्यात प्रतापपुरापर्यंत, म्हणजे मरोळपर्यंत विनासायास आला. पुढे बिंबदेव यादवाचे सामर्थ्य पाहून त्रिपुरकुमाराने आपले राज्य बिंबदेव यादवाच्या सुपुर्द केलं आणि तो त्याचे मुख्य गांव चौलच्या दिशेने निघून गेला. ह्या दोघांच्यात कोणतीही लढाई झाल्याचा वृत्तांत बखरीत नाही. अशा तऱ्हेने बिंबदेव यादवाच्या हातात महिकावतीचं राज्य आलं. बिंबदेव यादव मुंबईचा राजा झाला.

शके १२१६ मध्ये, म्हणजे इसवी सन १२९४ मध्ये मुंबई-माहीमला राजधानी स्थापन करणारा बिंबदेव यादव हा दुसरा बिंबराजा. पहिल्याचं आडनांव बिंब, तर दुसऱ्याचं स्वत:चं नांव बिंब. पहिला बिंब, प्रताप बिंब इसवी सन ११४० मधे आला, तर हा दुसरा बिंब १२९४ मधे. दोन बिंबांच्या दरम्यान १५५ वर्षांचं अंतर आहे. प्रताप बिंबाच्या ताब्यात वाळकेश्वर ते वसईची खाडीपर्यंतचाच प्रदेश होता, तर बिंब यादवाने संजाणपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्या घेतला होता.केवळ नांवातल्या सारखेपणामुळे ह्या दोन बिंबांच्या संबंधीत घटनांमधे गोंधळ उडताना दिसतो. गंम्मत म्हणजे दोन्ही बिंबांचा राज्य करण्याचा कालावधी ९ वर्ष एवढाच असल्याने, हा गोंधळ आणखी होतो. हा गोंधळ कमी व्हावा म्हणून ह्या लेखाचं प्रयोजन.

-@नितीन साळुंखे

9321811091

टिपा-

1. या लेखासाठी श्री. वि. का. राजवाडे आणि श्री. अशोक सावे ह्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेल्या, परंतु ‘‘महिकावतीची बखर’ ह्याच नांवाच्या दोन वेगवेगळ्या पुस्तकाचा आधार घेतला आहे.

2. मुंबई-माहिमला राजधानी करुन राज्य करणारे दोन बिंब कोण आणि ते कधी होऊन गेले, हे दाखवणं येवढाच मर्यादित हेतू ह्या आणि ह्या पूर्वीच्या लेखाचा आहे. ह्या दोन्ही बिंबासमवेत मुंबईत वसण्यासाठी आलेल्या कुळांचा उल्लेख इथे केवळ संदर्भासाठा आहे.

3. 3. दोन घटनांमधला काळ आणि प्रसंग काही ठिकाणी बखरीत स्पष्टपणे दिलेला नसल्याने, मी तो तर्काने, परंतू प्रसंगाला साजेल असा रंगवला आहे. मी हौशी अभ्यासक आहे, तज्ञ नव्हे ही बाब इथे आवर्जून लक्षात ठेवावी.

4. * चंपावती- चौलचंच एक नांव. बखरीत सर्वत्र चंपावती किंवा धारचंपावती असा उल्लेख आहे. केशवदेवावर आलेला हा भोजराजा(दुसरा) असावा. कारण पहिल्या भोजाला केशवदेवाचा बाप, राजा मही बिंबाने मारलं होतं.

5. ** म्हसगड-हे ठिकाण नक्की कुठेहे सांगता येणार नाही, मात्र मुरबाड नजिकचं सध्याचं ‘म्हसे’ या गांवापाशी ते कुठेतरी असावं, असं या क्षेत्रातल्या काही जाणकारांशी बोललो असता समजलं.

6. € रामदेवराव किंवा बिंबदेव यादव यांच्या आडनांवाचा बखरीत काही ठिकाणी ‘जाधव’ असाही उल्लेख केलेला आहे.

7. # घणदिवे हे गुजरातमधिल चिखली गांवाजवळ आहे. सोबतच्या नकाशात हे गांव पाहाता येईल.

8. ## राजा रामदेवराव यादव व त्याचा मोठा पुत्र शंकरदेव बहुदा मरण पावले असावेत, असं मी तर्काने म्हटलेलं आहे, कारण त्यांचा कुठलाही उल्लेख नंतर बखरीत सापडत नाही.

9. इसवी सन ११४० मधे आलेल्या प्रताप बिंबासोबत सोमवंशी-सूर्यवंशी-शेषवंशी कुळे मुंबईतल्या वास्तव्यासाठी आली, तर इसवी सन १२९४ मधे आलेल्या बिंब यादवासोबत जे ५४ सोमवंशी-सूर्यवंशी-शेषवंशी सरदार मुंबईत आले, ते सर्वच्या सर्व एकजात पाठारे प्रभू होते. पाठारे प्रभुंचं मुंबईत झालेलं हे पहिलं आगमन.

10. ‘शके’वरून इसवी सन काढताना ‘शके’त ७८ मिळवावेत. उदा शके १०६२+७८= इसवी सन ११४०.

11. केळवे-माहिम म्हणजे ‘महिकावती’ आणि मुंबई-माहिम म्हणजे ‘बिंबस्थान’. वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या राज्याचा उल्लेख महिकावती असा केलेला आहे.

-©️नितीन साळुंखे

9321811091